(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)
अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||
रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|
हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|
...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|
प्रतिक्रिया
20 Nov 2011 - 11:37 am | अमोल केळकर
सुंदर :)
अमोल केळकर
20 Nov 2011 - 12:52 pm | अन्या दातार
रच्याकने: अंगणाऐवजी पार्किंग हा शब्द चालला नसता का?
20 Nov 2011 - 2:36 pm | सूड
मी टर उडवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण ते मीटर मध्ये बसलं नसतं. आताही चालीवर म्हणताना ओढाताण होतेय. एकंदरीत प्रयत्न आवडला.
20 Nov 2011 - 1:22 pm | तिमा
विडंबनाचा प्रयत्न आवडला. पण चालीवर म्हणून बघताना 'मीटर' मधे बसत नाही, त्यासाठी काही बदल आवश्यक.
20 Nov 2011 - 3:39 pm | सुहास झेले
चांगला प्रयत्न... :) :)
20 Nov 2011 - 4:20 pm | ५० फक्त
ती मिटरभर चालणार नाहीये मग मिटर मध्ये बसली काय अन नाय काय, जाम भारी आवडली कविता.
अजुन, या गंजलेल्या स्कुटीमु़ळं पुन्हा एकदा मुळ गाणं म्हणुन पाहिल आपण आयुष्यातलं बरेच गंजके क्षण असेच धरुन बसतो ना उगाचच, ना ते कुठं जाउ शकतात आणि ते आपल्याला कुठं नेउ शकतात, तरीसुद्धा आपण त्यांना दररोज पुसत वगैरे बसतो.
20 Nov 2011 - 11:59 pm | विदेश
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
पूर्ण चालीबरहुकूम मला स्वतःला इथला 'पेट्रोल' हा एकच शब्द अजूनही खटकतोय .
बाकी सर्व - पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना .
धन्य वाद.
21 Nov 2011 - 1:17 am | रेवती
पेट्रोलऐवजी फ्युएल जमतय का?
मला तरी आहे ते विडंबन आवडले.
22 Nov 2011 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा
वा वा विदेशा... येकदम टु स्ट्रोक ;-) विडंबन झालय रे....!
आणी मिटरमधे बसलं नसलं तरी महागाइच्या थर्मा-मिटर मधे एकदम चांगलच बसलय हो...!