तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं. असं असूनही 'द जर्नी होम' या नावाचं एक इंग्लिश पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या उपरोल्लेखित वैशिष्ठ्याला न जागता मी या पुस्तकाचा अगदी फडशा पाडला.
मुखपृष्ठ
१९६९-७० साली 'काऊण्टर कल्चर' किंवा ज्याला 'हिप्पी' संकृती असंही म्हटलं जातं, जेव्हा ऐन भरात होतं, तेव्हा 'रिचर्ड स्लेवीन' नावाचा शिकागोला राहणारा, महाविद्यालयात शिकणारा १९ वर्षांचा मुलगा त्यात सामील होतो आणि पूर्ण सत्याच्या शोधात घराबाहेर पडतो, त्याची ही कहाणी आहे. सामान्य गो~या अमेरिकन मुलांपेक्षा वेगळा विचार करणारा रिचर्ड धार्मिक, श्रद्धाळू, पापभीरू तर आहेच पण त्याला संगीत आणि तत्त्वज्ञानाचीही आवड आहे. तो उत्तम 'हार्मोनिका' वादक आहे आणि स्वत: धर्माने ज्यू असूनही त्याची ख्रिस्तावर श्रद्धा आहे. पण तरीही त्याच्या मनात परमेश्वराच्या मूळ स्वरूपाविषयी काही शंका आहेत. तत्कालीन समजुतीनुसार तुमची उत्तरं तुम्हीच शोधायची या विचाराने महाविद्यालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो तुटपुंजे पैसे गाठीला बांधून युरोपात आपल्या गॅरी नावाच्या बालमित्रासोबत सहलीला जातो. या सहली दरम्यान त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. हिप्पी कल्चरचा भाग झाल्याने प्रवासात त्याला समविचारी-समवयस्क मित्र भेटतात आणि त्यांच्याबरोबर रिचर्ड पुढे आपला प्रवास सुरू ठेवतो. पैशांच्या कमतरतेमुळे येणा~या-जाणा~या वाहनांकडे लिफ्ट मागून पुढल्या शहरात जायचे ही 'हिचहायकिंग' ची पद्धत संपूर्ण प्रवासात रिचर्ड वापरतो. त्याच्या प्रवासातले प्रत्येक नव्या देशात प्रवेश करण्यापूर्वी तिथल्या इमिग्रेशन ऑफिसचे अनुभवही विलक्षण असेच आहेत. अशा प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत इटली, इंग्लंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रांस असे देश फिरून तिथल्या धर्म-पंथांचा अभ्यास करून ग्रीस मध्ये आल्यावर त्याच्या मनात आवाज उमटतो, "भारतात जा".
रिचर्ड स्लेवीन १९७० (पासपोर्टवरील फोटो)
आपल्या अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन हा अननुभवी १९ वर्षांचा नवयुवक हिचहायकिंग करत ग्रीसहून तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे अत्यंत हालअपेष्टा सोसून, संकटांचा सामना करत भारतात दाखल होतो. भारतातही तो सत्याच्या शोधात परीव्राजकाचं जीवन स्वीकारतो. हिमालयातल्या जंगलांमध्ये नैसर्गिक गुहांमध्ये निवास करून राहणार्या रिचर्डला तिथल्या नागाबाबांचा एक गट आपल्यातच सामील करून घेतो. त्यांचे मुख्य त्याला आपल्या पंथाची दीक्षा देऊ इच्छितात पण रिचर्डची स्वतःच्या मनाची खात्री झाल्याखेरिज कुठलाही अशा प्रकारचा समर्पणाचा निर्णय घेण्याची तयारी नसते. पुढे त्यांची साथ सोडून तो एकटाच आपला शोध जारी ठेवतो. दरम्यान त्याला त्याच्यासारखेच एकटे ध्यान करणारे एक साधुबाबा भेटतात आणि ते खर्या अर्थाने एका साधुची जीवनी त्याला शिकवतात. त्याच्या पाश्चात्य कपड्यांचा त्याग करवून पूर्ण भारतीय असा कौपिन, उत्तरीय आणि अधरीय असा पोषाख देतात. एकमेकांची भाषा अजिबात न येणारे हे दोघे अनेक दिवस एकत्र ध्यान-धारणा करतात. पुढे त्यांच्या सहवासात पूर्ण साधु बनलेला रिचर्ड आपल्या पुढच्या प्रवासासाठी त्यांचा निरोप घेतो आणि आपलं मार्गक्रमण सुरू ठेवतो. या प्रवासातही अनेक साधुसंतांची तो भेट घेतो, अनेक पंथोपपंथीय साधु त्याला दीक्षा देण्याची तयारी दर्शवतात पण अखेर त्याच्या विचारांचा, मतांचा आदरही करतात.
हिमालयात गंगेच्या किनार्यावर वास्तव्य करत असताना त्याच्या हृदयाकाशात मंत्रबोध होतो आणि मंत्राचा अर्थ अजिबात कळत नसतानाही त्याचा सतत जप सुरू होतो. हिवाळ्यात रिचर्ड भारतातील इतर तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. तो अयोध्येतल्या रामभक्तीचा आस्वाद घेतो, काशी - प्रयागतीर्थाचं दर्शन करतो. तिथून परतीच्या प्रवासात दिल्लीला जाणार्या गाडीतून पाणी पिण्यासाठी खाली उतरलेल्या रिचर्डला पुन्हा गाडीत शिरायलाच मिळत नाही आणि त्या स्टेशनवरच राहतो. ते स्टेशन असतं मथुरा आणि तिथूनच त्याला त्याच्या पत्ता लागतो वृन्दावनाचा. वृन्दावनात पोहोचल्यावर त्याला त्याच्या आयुष्यभराच्या एकेका प्रश्नाचं उत्तर मिळून त्याच्यावर श्रीकृष्णाचं गारुड पडत जातं आणि श्रीकृष्ण-भक्तीची कवाडं त्याच्यासाठी उघडली जातात. याचाच एक भाग म्हणून पुढे मुंबई मुक्कामी क्रॉस मैदानातील एका कार्यक्रमात त्याची भेट 'आंतरराष्ट्रिय श्रीकृष्णभावनामृत संघा'च्या (इस्कॉन) संस्थापक आचार्यांशी, भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपादांशी होते. यांच्या साहित्याच्या वाचनानंतर, अभ्यासानंतर तो त्यांचं शिष्यत्व पत्करतो.
राधानाथ स्वामी
रिचर्ड स्लेवीनचे राधानाथ दास बनण्याची कथा आहे "द जर्नी होम". परमेश्वराला जाणण्याची उत्कट इच्छा असणार्या तरुणाच्या भावनिक आणि अध्यात्मिक अनुभवांची शिदोरी हे पुस्तक आपल्यापाशी उघडतं आणि स्वत: राधानाथ स्वामींच्या निर्मळ कथनातून आपण त्यांचे सहप्रवासी बनून त्यांच्या या जाणीव - नेणीवांचाच एक भाग बनतो.
जरूर वाचा!
या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'तृषार्त पथिक' नावाने प्रकाशित झाला आहे.
(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)
प्रतिक्रिया
2 Nov 2011 - 3:50 pm | गणेशा
धन्यवाद...
2 Nov 2011 - 5:32 pm | पिंगू
उत्तम माहिती आहे. उद्याच वाचनालयातून पुस्तक आणतो..
- पिंगू
2 Nov 2011 - 5:56 pm | नरेंद्र गोळे
प्रास,
छान पुस्तक परिचय करून दिलेला आहेत. त्यावरून पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे.
7 Nov 2011 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रास.....!
छान पुस्तक परिचय करून दिलेला आहेत. त्यावरून मराठी पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2011 - 6:11 pm | कवितानागेश
वाचायला हवं...
2 Nov 2011 - 6:30 pm | दादा कोंडके
अशाच प्रकारच्या एक-दोन लोकांची पुस्तकं वाचली आहेत (नाव सुद्धा लक्षात नाही आता).
प्रवासवर्णन, अनुभव वगैरे वाचायला ठिक आहे, पण अशांना नक्की कशाचा ध्यास असतो? नंतर कसलं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं? हे माझ्या बालबुद्धीला कळलेलं नाही. :)
2 Nov 2011 - 7:46 pm | सोत्रि
सहमत!
मलाही हे गौडबंगाल काय हे कळले नाही अजुन.
- (ब्रह्मज्ञान प्राप्तीची आस नसलेला) सोकाजी
2 Nov 2011 - 6:54 pm | विलासराव
वाचतो मालक.
2 Nov 2011 - 8:34 pm | सुवर्णा
पुस्तक वाचलेले आहे.. खूपच प्रभावी आहे!!
नक्कीच वाचणेबल..
2 Nov 2011 - 9:00 pm | यकु
एका मित्राच्या आग्रहावरुन तृषार्त पथिक वाचलेलं आहे.
लेखकानं केलेलं बरंच निवेदन आवडण्यासारखं आहे.
मात्र कृष्णाकडं आकर्षित होणं, ते स्वामीबिमी वगैरे पटत नाही.
.
एकूणच राधास्वामी, इस्कॉनवाल्या लोकांबद्दल मला अत्यंत तिटकारा वाटतो.
2 Nov 2011 - 9:58 pm | प्रास
असा कुणाचाही तिरस्कार करू नये.
:-)
2 Nov 2011 - 10:07 pm | यकु
ठरवुन नाही हो करत.
पण कधी चुकुन हुकुन कुठल्या चॅनलवर आकाशाकडं हात करुन राधे.. राधे करणारा जमाव पाहिला की आपलं टाळंकं सरकतं..
बाबा महाराज सातारकर, भीमसेन जोशी, अनुप जलोटांनी गायलेले तुकोबांचे, कबिरांचे अभंग ऐकताना आमच्याही डोळ्यात पाणी येतं.
चक्री भजन सुरु असलेलं पाहिलं की मला पण त्यात उड्या घ्याव्या वाटतात.
पण हे उगाच कुठल्या तरी मंचावर बसुन गावगप्पा करणार्या व आकाशाकडे हात करुन फालतुपणा करणार्या लोकांचा राग येतो म्हणजे येतो.. त्याला इलाज नाही.
2 Nov 2011 - 10:57 pm | मन१
अगदि मनातलं बोल्लात.
"राधे राधे" करत बसणार्यांचे कौतुक वाटत नाही व तुकोबांचे, ग्यानबांचे किम्वा अगदि कबीराचेही शब्द कानावर पडताच कसं बरं वाटतं अगदि. काय होतं, कसं होतं काही ठाउक नाही.
3 Nov 2011 - 1:24 am | पक्या
राधानाथ स्वामी मी रहात असलेल्या शहरामधील ईस्कॉन मंदिरात दरवर्षी येतात. खुपच प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. प्रसन्न आणि प्रेमळ मुद्रा, चेहर्यावरील शांत भाव , साधी रहाणी, संभाषण कौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही घटक.
वर मन आणि य. एकनाथ यानी तिटकारा वगैरे लिहिले आहे. खेद वाटला. मी खात्रीने सांगू शकतो राधानाथस्वामींना एकदा पाहिल्यावर , त्यांच्याशी बोलल्यावर नक्किच त्यांचे मत बदलेल. मी इस्कॉन पंथाचा अनुयायी नाही . घराजवळ मंदिर असल्याने दिवाळी , दसरा ह्या सारख्या मोठ्या सणांना कुटूंबाबरोबर मंदिरात जाणे होते. पण मला तरी मंदिरात गेल्यावर नुसते राधे राधे करणारे लोक दिसले नाहित. कृष्णनामाचा जप चालू असतो पण खूप छान भजनेही गायली जातात,
ही काहि या मंदिरातील राधानाथस्वामींची प्रकाशचित्रे -
१)![]()
" width="400" height="600" alt="" />
२)![]()
" width="400" height="600" alt="" />
३)![]()
" width="400" height="600" alt="" />
४)![]()
" alt="" />
सर्व चित्रे २०११ च्या उन्हाळ्यातील आहेत. वित्रसौजन्यः मंदिरातील एक भक्तगण अनिरुध्द.
जर्नी होम पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. माझ्याही संग्रहात आहे.
3 Nov 2011 - 1:53 am | यकु
राधानाथ स्वामी आणि 'राधास्वामी' यात घोळ होतोय. खरं म्हणजे राधास्वामी हा शब्दही तेवढा चपखल नाहीय, तो आणखी एक वेगळा पंथ आहे. मी वर कृपालू महाराज या टिव्हीवर दिसणार्या इसमाकडून जे चालतं त्याबद्दल बोलत होतो. हे पण राधे राधे वालेच.
बाकी राधानाथ स्वामी या अमेरिकनाने लिहीलेल्या वरील भाषांतरीत 'तृषार्थ पथिक' च्या निवेदनशैलीबद्दल मी चांगलच लिहीलंय. पुस्तकातलं जे पटलं नाही ते पण सांगितलंय.
3 Nov 2011 - 11:31 am | ५० फक्त
मी शक्यतो असली पुस्तकं वाचतच नाहि, च्यायला उगा सरळ साधं जगणं चालु आहे, मरणाची भिती डोळ्यांत घेउन हात गाडीचा अॅक्स्लेटर फिरवतोच आहे , अजुन ह्या गोष्टी कुठं लावुन घ्या मागं.
3 Nov 2011 - 12:52 pm | Mrunalini
पुस्तकाची वर्णन एकुन लगेच वाचावस वाटतय.. ऑनलाइन शोधायला पाहिजे पुस्तक.
7 Nov 2011 - 4:37 pm | मदनबाण
उत्तम पुस्तक परिचय !
आवडेश ! :)
7 Nov 2011 - 5:19 pm | निनाद मुक्काम प...
प्रास ह्यांचा नेहमीचा शैलीतील दर्जेदार लेखन. ह्यावरून आठवले.
की
जुलिया रोबर्ट ने हिंदू धर्म सुद्धा नीम करोली बाबा ह्यांचा मुळे स्वीकारला. हिलरी ,चेल्सी , बिल ह्यांचा आयुष्यात सुद्धा भारत भेटीत आलेल्याला आध्यात्मिक अनुभवाने सकारात्मक बदल झाला.
हिलरी ह्यांचे भारताविषयी ममत्व भारत भेटीत नेहमीच दिसून आले आहे.