सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.
नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती.
१. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट
वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले.
२. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले.
पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.
३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन
४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत)
इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात.
इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता.
६ व ७. ग्रिफिन
पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.
८,९, व १० स्फिंक्स
हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.
११. नहपान विहाराचा अंतर्भाग.
आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे.
१२. देवीलेणीचे मुखदर्शन
इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत.
१३. लेणीचा भार वाहणारे यक्ष
१४.
इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.
गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'
असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे.
१५. गौतमी बलश्रीचा शिलालेख
गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते-
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे.
१६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार)
याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.
१७ व १८.
१९ व २०
२० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन
हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत.
२२. देवीलेणीचा अंतर्भाग
विहारातील स्तूपाची रचना
हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो.
क्रमशः
हा भाग प्रवासवर्णन आणि इतिहास यांची नीटशी सांगड घालता न आल्यामुळे विस्कळीत झाला आहे तरी आपण तो गोड मानून घ्यावा. पुढील भागात पांडवलेण्यातील इतर लेण्यांचे फक्त फोटो व थोडेसेच वर्णन टाकेन.
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 11:42 pm | जयंत कुलकर्णी
फोटो मस्त. देवीलेण्याचा चांगलाच आलाय !
11 Oct 2011 - 11:55 pm | पैसा
हे सर्व बघावंसं वाटतंय. सोबतच्या माहितीमुळे परिपूर्ण लेख झालाय. आणि हे एक "क्रमशः" जे पाहून किती बरं वाटलं सांगता येत नाही!
12 Oct 2011 - 8:21 pm | मी-सौरभ
नवसंपादिकाबाईंशी १००% सहमत ...
12 Oct 2011 - 12:03 am | आत्मशून्य
.
12 Oct 2011 - 2:06 am | विलासराव
>>>>पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे
ते एक मोठं गार्डन आहे तिथे. तिथुन ईतक्या जवळ आहे का ही पांडवलेणी?
मुंबईवरुन नाशिकला जाताना उजव्या हाताला अंबड( एमायडीसी) नंतर आहे तेच का?
12 Oct 2011 - 6:59 am | प्रचेतस
तेच ते, त्या बागेला लगटून जो डोंगर आहे त्यातच ही लेणी खोदली गेली आहेत.
12 Oct 2011 - 3:49 am | चित्रा
धन्यवाद.
माझे थोडे विस्कळित विचार. नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे. पण सातकर्णीने नाहपण किंवा त्याच्या जावयाकडून म्हणजे ऋषभदत्ताकडून बरेच राज्य मिळवले होते असे नक्की. मौर्यांनंतर उदयाला आलेल्या या घराण्याने मौर्यांच्या नाण्यांवरचे टेकड्यांसारखे चिन्ह स्विकारलेले दिसते.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे? तेच वसिष्ठीपुत्र श्री पुलुमावी या नावाचे. ही घराणी मातृसत्ताक असावी असे नाही. पण राण्यांची नावे नद्यांना दिली गेली असतील का? किंवा उलटेही असू शकते. गौतमी हे नाशिकच्या प्रसिद्ध गोदावरीचे नाव आहे (किंवा तिच्या एखाद्या उपनदीचे) आणि तसेच वसिष्ठी हे चिपळूणजवळील नदीचे नाव आहे. अर्थात ही नावे कधीपासून प्रचलित आहेत कल्पना नाही, पण सातवाहनांच्या राज्यामधील नद्यांची नावे त्यांच्या घराण्यातून आली असतील का असा एक प्रश्न पडला. ( ह्या ठिकाणाहून राज्य करणार्या राजांनी नद्यांची नावे मातेसमान स्विकारलेली असू शकतात का? )
सातवाहनांच्या राण्यांपैकी नागनिका आणि गौतमी या दोघींची नावे प्रसिद्ध आहेतच.
सातवाहनांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. पण आपल्याला फार थोडे माहिती असते एवढेच वाटते. जे धागेदोरे लागतात ते तत्कालिन समाजपद्धतीवर जेमतेमच प्रकाश टाकतात, एकसलग, एकसंध चित्र उभे करू शकत नाहीत असे वाटते. त्यासाठी तत्कालिन साहित्यही वाचावे लागेल असे वाटते.
12 Oct 2011 - 7:13 am | प्रचेतस
नहपान हा गौतमीपुत्राचा समकालीन, पण गौतमीपुत्रापेक्षा वयाने मोठा होता. नहपानाचा जावई हा उज्जैनचा क्षत्रप रूद्रदामन आणि रूद्रदामनाचा जावई हा ऋषभदत्त (प्राकृत नाव-उषवदत्त)
रूद्रदामनाने आपल्या मुलीचा विवाह गौतमीपुत्राच्या मुलाशी म्हणजे वासिष्ठिपुत्र पुळुमावीशी करून दिला होता. वर्णसंकर न करणार्या सातवाहनांसाठी हा विवाह म्हणजे राजकारणाचाच एक भाग. गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर बर्याच काळाने रूद्रदामनाने परत नासिक भाग जिंकून घेतला व पुळुमावीचा पराभव केला परंतु सोयरसंबंधांमुळे त्यांचे संपूर्ण उच्चाटन केले गेले नाही. यांनत्र मात्र सातवाहन पैठण, आंध्र आणि दक्षिणेकडे सरकत गेले. त्यामुळेच नंतर त्यांना आंध्रभृत्य हे नाव पडले.
गौतमीपुत्राच्या आधी सातवाहन राजे हे वैदिक नावे लावत. उदा. वेदिश्री, स्कंदश्री, हकुश्री. शक्तीश्री इ. गौतमीपुत्राच्या वेळी आईचे नाव लावण्याची प्रथा सुरु झाली असावी. गौतमीपुत्र महान मातृभक्त होता यात शंकाच नाही त्याच्या शिलालेखांवरूनही हे दिसते. तीच प्रथा त्याच्या पुढच्या पिढ्यांकडूनही पाळली गेली.
उदा. वासिष्ठिपुत्र, कौशिकिपुत्र, मढारीपुत्र.
नद्यांना नावे पण बहुधा ह्याच राजांवरून दिली गेली असावीत.
12 Oct 2011 - 9:07 am | चित्रा
माझे विकीपांडित्य सांगते की नहापणाचा जावई ऋषभदत्त, आणि रुद्रदमनाने आपली मुलगी पुळुमावीला दिली.
http://en.wikipedia.org/wiki/Nahapana
http://en.wikipedia.org/wiki/Rudradaman_I
रुद्रदमन आणि ऋषभदत्ताचे नाते काय होते हे विकीवरून कळलेले नाही.
12 Oct 2011 - 9:17 am | प्रचेतस
बरोबर आहे.
माझी समजण्यात काही चूक झाली.
नहपानाचा जावई हा ऋषभदत्त. आणि रूद्रदामनाचा पुळुमावी.
रूद्रदामन हा महाक्षत्रप होता आणि त्याचा महाअमात्य हा ऋषभदत्त.
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
14 Oct 2011 - 5:54 pm | चित्रा
चूक फारशी नाही. ही सर्व नावे गोंधळात टाकणारीच आहेत. काही नावांचा उल्लेख तर आपल्या राज्याच्या क्रमिक (बालभारती) पुस्तकांमधून वगळलेलाच दिसतो. (उदा. नहपान - नहापण किंवा गौतमी बलश्री).
12 Oct 2011 - 8:41 am | स्पा
वल्ली रॉक्स
मस्तच फोटू....
:)
माहिती देखील सुरेख
12 Oct 2011 - 9:27 am | मराठी_माणूस
छान फोटोसहीत माहीती.
पुढच्या भागात जमल्यास, पांडवलेण्याच्या डोंगरावरुन दिसणार्या नाशिक शहराच्या फोटोचा सामावेश करावा. अतिशय सुंदर दृश्य दिसते.
(अवांतरः कृपया नासिक ऐवजी नाशिक असा उल्लेख करावा)
15 Oct 2011 - 7:42 am | शिल्पा ब
ओ पंडीत!! नासिक हाच उच्चार बरोबर आहे.
15 Oct 2011 - 10:30 am | मिहिर
मी तर बहुतांशी वेळा 'नाशिक' असेच ऐकले आणि वाचले आहे. आणि जर उच्चार 'नासिक' असेल तर शाळेतील भूगोलाच्या पुस्तकात नेहमी 'नाशिक' का बरे असते?
15 Oct 2011 - 11:06 am | प्रचेतस
मूळ संस्कृत अथवा प्राकृत शब्द नासिकच आहे.
खुद्द नासिकच्या पांडवलेण्यातील शिलालेखातही नासिक असाच उल्लेख आहे जे मी वर लिहिलेही आहे. जुन्नरच्या एका लेण्यातही नासिक असाच उल्लेख आढळतो.
नासिक हे नाव शूर्पणखेची नासिका जिथे कापली त्या स्थानावरून आले आहे अशी आख्यायिका आहे.
कालौघात त्याचे नाशिक असे रूपही प्रचलित झाले.
12 Oct 2011 - 9:32 am | किसन शिंदे
पुर्वकल्पना दिली असून सुध्दा न बोलावल्याबद्दल वल्लीचा निषेध.. :stare:
अंकाई टंकाईला जाणार होतास ना, गेला नाहीस काय?
12 Oct 2011 - 4:53 pm | सूड
काय हे वल्ली !! हे वागणं बरं न्हवं....
काडी टाकली आता पळ्ळा.....!! ;)
12 Oct 2011 - 9:41 am | गवि
एकदम झकास.
छान जागा आहे रे.
मुंबई नाशिक प्रवासात प्रत्येक वेळी पाटी पाहिली. डोंगरही पाहिला पण गेलो कधी नाही. मिस केलं असं वाटतंय.
स्फिंक्सचं दर्शन आणि उल्लेख स्तिमित करणारा आहे. पूर्वीच्या काळी इजिप्तशी काय कनेक्शन असेल आपल्या कल्पनेपलीकडचं आहे सगळं. पुढच्या भागाची वाट पाहतोय.
12 Oct 2011 - 10:17 am | प्रचेतस
इथला स्फिंक्स हा ग्रीक दंतकथांवरून आलाय. महाराष्ट्रातील काही लेण्यांचे विहार हे ग्रीकांनी (यवन) दिलेल्या दानातून खोदलेले आहेत. येथे इजिप्त कनेक्शनचा तसा काही संबंध नाही.
@किसनः निषेध मान्य आहे. :) अंकाई टंकाईला जाणे जमले नाही.
12 Oct 2011 - 11:12 am | ५० फक्त
जबराच रे, इथे एकदा फक्त फोटो काढण्यासाठी जाउ या, माझ्या एका मित्राने परवाच फुजीचा ३ डि कॅमेरा घेतला आहे, त्याला पकडतो एकदा,
बाकी वल्ली यांनी काढलेले फोटो आणि माहिती जबरदस्तच. अतिशय धन्यवाद.
12 Oct 2011 - 11:22 am | जागु
छान.
12 Oct 2011 - 11:28 am | सुहास झेले
मस्त फटू... आवडले !!
12 Oct 2011 - 11:31 am | प्यारे१
मस्त रे वल्ली....!
12 Oct 2011 - 12:14 pm | मनराव
मस्त........!!!
12 Oct 2011 - 12:34 pm | गणेशा
वल्ली द ग्रेट ...
फोटो तर नेहमीप्रमाणे सुंदर आहेच.. पण प्रत्येक गोष्टीचा येव्हडा बारीक आभ्यास करणे म्हणजे ग्रेटच..
मस्त एकदम..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
16 Oct 2011 - 11:27 am | पाषाणभेद
तेच म्हणतो. पांडवलेण्यासाठी तिन दिवस देवून सखोल अभ्यास करणे हे सर्वसामान्यांना जमणारे नाही. लेख लिहून आपण योग्य तो न्याय दिला आहे. आपली अभ्यासूवृत्ती आत्मसातकरण्याजोगी आहे.
आम्हीही या पांडवलेण्याला भेट दिली असता आमच्या नजरेतून दिसलेले काही फोटो येथे पाहता येतील. या फोटोंत काही जणांनी मागणी केल्याप्रमाणे पांडवलेण्यावरून दिसणारे नाशिकशहर दिसत आहे.
वरील फोटोत अगदी समोर दुरवर मध्यभागी जो त्रिकोणाकृती डोंगर दिसतो आहे त्यात 'चांभारलेणी' खोदलेली आहेत. त्यावर जैनांचे प्रार्थनास्थळ आहे.
सटाणा (बागलाण) तालूक्यात साल्हेरमुल्हेर, मांगीतुंगी डोंगर आहेत. अनेक नद्या या डोंगररांगात उगम पावतात. जर येथे जाण्याचे प्रयोजन असेल तर आता पावसाळ्यानंतर जाण्याचे ठरवावे. या काळात निसर्गाची हिरवाई असते.
12 Oct 2011 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा
वल्ली महाराज की जय हो.... खरोखर क्लासिक वर्णन आणी फोटूही,,,
12 Oct 2011 - 1:56 pm | शाहिर
पण पांडव लेणी का म्हणतात ?
महाराष्ट्रामधे काहिही अवघड किंवा कोरीव मंदीर किन्वा गुंफा दिसली कि हे पांडवांनी केली असा म्हणण्याची पद्धत आहे , असे अनुभवास आले आहे
12 Oct 2011 - 4:50 pm | ५० फक्त
मग कांग्रेसी घोटाळा का म्हणतात,
भारतामध्ये काहिही लपडेबाज किंवा संशयास्पद किंवा घोटाळा किंवा भानगड दिसली कि हे कांग्रेसवाल्यानी केले असे म्हणण्याची पद्धत आहे, असे अनुभवास आले आहे
बिगरराजकिय शाहिर.... (हजारो अण्णा.)
12 Oct 2011 - 5:44 pm | वपाडाव
मग डु आय डि का म्हणतात,
संस्थळावर काहिही एकतर्फी, आग लावणारे, टुकार आणि प्रतिसाद्खेचक धागा आला की लेखक डु आय्डि आहे असे म्हणतात असे अनुभवास आले आहे
वाचनमात्र माहिर...
12 Oct 2011 - 8:26 pm | मी-सौरभ
हा एक फार ज्वलंत विषय आहे....याची चर्चा ईथे नको...
बादवे: सगळ्या लेण्यांना पांडवलेणी म्हणतात का? या वाक्यावर वल्लींचे अनुभवांती आलेले मत महत्वाचे आहे....
-स्पष्टविचार जाहिर
12 Oct 2011 - 1:57 pm | गणपा
फारा वर्षांपुर्वी नाशिकला जाताना ही लेणी पाहिली होती.
पण तुम्ही दिलेली माहिती तेव्हा माहित नव्हती.
धन्यवाद. :)
12 Oct 2011 - 3:46 pm | वपाडाव
अजोनतरी नाशकाला पाय नाही लागलेत.....
बरंच काही आहे नाशकात पाहण्यासारखे.....
ही माहिती न्यानात फारच मोठी भर पाडुन गेली....
अवांतर :: मांगी-तुंगी या सटाणा तालुक्यातील पर्वतांविषयी काही ऐकलंय का?
12 Oct 2011 - 7:09 pm | प्रचेतस
५/६ वर्षांपूर्वी सटाण्याजवळ जाणे झाले होते. तेव्हा मांगी तुंगीची दोन उत्तुंग शिखरे पाहिली आहेत. त्या दोन सुळक्यांमध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. जैनांचे ते महाराष्ट्रातले मोठे तीर्थस्थान आहे असे ऐकून आहे.
12 Oct 2011 - 8:28 pm | मी-सौरभ
जैनांची स्थाने बघण्यासारखी असतात म्हणे ;)
13 Oct 2011 - 9:17 am | प्रचेतस
मग करायचा का आता साल्हेर, मुल्हेर, मांगी, तुंगी असा जंबो ट्रेक.? डिसेंबरात जाउयात.
13 Oct 2011 - 9:53 am | वपाडाव
करा, पण तो ट्रेक ३ ते ४ दिवस खाइल....
इतक्या सुट्ट्या दिसेंबरात कुणाला गटायच्या नाहीत.....
पुन्हा अॅड्जस्ट्मेंट कराव्या लागतील त्या वेगळ्याच........
13 Oct 2011 - 11:09 am | मी-सौरभ
लेको, थोडी डावीकडे उजवीकडे अॅडजस्टमेंट करुन जमवूया...
त्र्य त्र्य बुत दोन्त च्र्य असं विंग्रजीत म्हणतातच ना......
13 Oct 2011 - 11:22 am | ५० फक्त
''त्र्य त्र्य बुत दोन्त च्र्य ''
ओ हे तर अब्राम्हि वाटतंय - याचा अर्थ - तुच तुच भुता दोनदा चावलास असा आहे.
13 Oct 2011 - 12:03 pm | इरसाल
नक्कीच जा पण त्यात सापुतारा(थंड हवेचे ठिकाण) जायचे विसरू नका.रस्त्यात चांदवडला रेणुकामातेचे जागृत देवस्थान आहे त्यालाही भेट देवू शकाल, बाजूलाच डोंगरावर चंद्रेश्वर म्हणून शंकराचे मंदिर पण आहे छोटासा ट्रेक होवून जाईल.आणि जर चांदवड गावात गेलात तर अहिल्याबाई होळकरांचा महाल/राजवाडा आहे रंगमहाल म्हणून.
12 Oct 2011 - 4:54 pm | सूड
अतिशय माहितीपूर्ण लेख. पुभाप्र.
12 Oct 2011 - 11:24 pm | मेघवेडा
असेच म्हणतो. लेख व फोटो आवडले. पुभाप्र.
12 Oct 2011 - 6:06 pm | प्रास
नाशिकच्या पाण्डवलेण्याची फोटोंसहित ओळख आवडली.
एकदा जाऊन यावं म्हणतो.....
धन्यवाद!
:-)
15 Oct 2011 - 1:19 am | शैलेन्द्र
सुंदर लेख.. प्रवासवर्णनाबरोबर, ऐतीहासीक माहीती म्हणजे सोनेपे सुहागा..
15 Oct 2011 - 7:49 am | शिल्पा ब
ही लेणी पाहीली आहेत पण त्यामागचा इतिहास माहीत नव्हता. छान माहीती.
खवचटपणे नाही तर गंभीरपणे विचारते की तुम्ही देत असलेल्या माहीतीचा सोर्स काय? नै म्हणजे कीतपत विश्वास ठेवायचा म्हणुन. कृपया रागाउ नये.
15 Oct 2011 - 8:35 am | प्रचेतस
लिटररी अॅन्ड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडोलोजी -वा. वि. मिराशी'
सार्थवाह-मोतीचंद्र,
सातवाहनास अॅन्ड वेस्टर्न क्षत्रप्स् - अजय शास्त्री,
महाराष्ट्राची कुळकथा - मधुकर ढवळीकर,
विकिपेडीया,
थोडासा गूगल शोध.
आणि
सातवाहनकाळाविषयीची अपार उत्सुकता.
बाकी विश्वासावर इतिहास बदलतो थोडाच. :)
17 Oct 2011 - 12:07 pm | वपाडाव
और ये लगा सिक्सर !!!
_ _ /\ _ _
15 Oct 2011 - 1:41 pm | विसुनाना
सचित्र माहिती देणारा लेख आवडला.
१. आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे. त्यात उल्लेखित संशोधनावरून आंध्रभृत्य हे नाव मुळात पुण्याजवळील एका भूभागावरून आले आहे असे वाटते.सातवाहनांच्या इतिहासाची ती चर्चा महत्त्वाची आहे.
२.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
15 Oct 2011 - 5:17 pm | प्रचेतस
तिकडची सविस्तर चर्चा वाचली, बरीच नविन माहितीही समजली.
हे मत आहे ते सह्याद्रीकार स. आ. जोगळेकरांचे. अर्थात हा फक्त तर्कावर आधारीत पुरावा असून त्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा (नाणी, शिलालेख, उत्खनने) इ. स्वरूपात अजून मिळाला नाही.
पण सातवाहन हे महाराष्ट्रीय यात काहीच संशय नाही. ते आंध्राकडे सरकल्यानंतर (पुळुमावीनंतर) बर्याच कालावधींनी पुराणे तयार झाली (साधारण इ.स. ४/५ व्या शतकात) त्यामुळे आधीच्या घटनांचा धांडोळा पुराणांकडून न घेतला जाता सातवाहनांच्या शेवटच्या निवासावरून त्यांना आंध्रभृत्य ठरवले गेले.
खतियनिर्दालक हा शब्द माझ्याकडून चुकीचा लिहिला गेला. मूळ शिलालेखातील शब्द आहे 'खतियदपमानदमन' अर्थात क्षत्रियांचा गर्व हरण करणारा (निर्दालन करणारा/नष्ट करणारा अशा अर्थाने नव्हे)
ब्राह्मणनस, खतियदपमानदमन ही बिरुदे सातवाहन ब्राह्मण आहेत असे सिद्ध करतात. अर्थात यावरही बरीच मतमतांतरे आहेतच.
संदर्भः
१. शास्त्री के.एन.ए.-मौर्यास ऑफ सातवाहन इन हिस्टरी ऑफ साउथ इंडिया -ऑक्सफर्ड १९५८,
२. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख-मिराशी वा. वि. १९७८.
15 Oct 2011 - 5:48 pm | ५० फक्त
श्री. वल्लि, आपण मिपावरील ब-याच अभ्यासक मेंबरापैकी एक आहात याचि आज खात्री पटली.
17 Oct 2011 - 1:02 pm | प्यारे१
>>>>आपण मिपावरील ब-याच अभ्यासक मेंबरापैकी एक आहात याचि आज खात्री पटली.
फक्त अभ्यासाचा 'विषय' वेगळा इतकंच....! ;)
22 Oct 2011 - 6:08 pm | अप्पा जोगळेकर
आपण मिपावरील ब-याच अभ्यासक मेंबरापैकी एक आहात याचि आज खात्री पटली.
असेच म्हणतो. फोटोसुद्धा मस्त आहेत.
15 Oct 2011 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. माहितीपूर्ण लेखन. नाश्काला इतक्या वेळेस गेलो पण आम्हाला सालं कोणी पांडवलेणी फिरून दाखवली नाही. अर्थात आपल्या लेखनाने तीही इच्छा पूर्ण झाली. पुढील भागात अधिक माहिती येईलच.
”ब्राह्मणनस’ उल्लेख असलेला शिलालेखाचा फोटो काढलाय का ? मला केवळ उत्सूकता म्हणून बघायचा आहे.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2011 - 11:11 pm | प्रचेतस
धन्यवाद प्रा.डॉ.
शिलालेखांचे काही फोटो तर काढलेले आहेतच पण दुर्दैवाने मला ब्राह्मी येत नसल्याने हाच तो शिलालेख असे नक्की सांगता येत नाही.
३ र्या क्रमाकांच्या देवीलेणीतील ओसरीवरच्या संबंध भिंतीवर गौतमीपुत्राची महती गाणारे शिलालेख लिहिले आहेत त्यातीलच एक तो असावा.
19 Oct 2011 - 7:42 pm | चित्रा
गौतमीच्याच शिलालेखात हा उल्लेख आहे.
http://www.preservearticles.com/2011092013668/short-notes-on-gautamiputr...
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
(उपक्रमावरील प्रियाली यांच्या लेखात सिमुकाआधी बरेच राजे होऊन गेले आहेत असा उल्लेख आढळला. कदाचित तसे असेलही, पण माझ्या वाचनाप्रमाणे) या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा माझा एक कयास :) त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही.
हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो).
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते.
दुसरे एक आपण असे तपासू शकतो की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत होती का? कल्पना नाही. याआधी (ब्राह्मण) शुंगांनी स्वतःच्या अशा मूर्ती केल्या होत्या का हे बघावे लागेल. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात. यावरूनही काही अंदाज बांधता येईल असे वाटते.
[ अन्य टीपः कदाचित याचा काळाप्रमाणे काही संबंध असेल असे नाही. पण कुळकर(णी) हे पद सोपारा इ. भागात ऋषभदेवाच्या काळापासून जैनांमध्ये माहिती होते अशी माहिती कळते. जैनांच्या आदिनाथाचा (किंवा ऋषभदेवांचा) पिता नाभि राजा हा कुळकर होता असे समजले जाते. (आज आपल्याला माहिती असलेली 'कर्णी' याने अंत असलेली आडनावे ब्राह्मण असणे सूचित करू शकतात असे वाटते, पण म्हणून केवळ ब्राह्मणच असतीलच असे नाही). ]
19 Oct 2011 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते.
सातवाहन राजांच्या एकूण संखेबाबात वाद आहेत म्हणतात. कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करुन शुंगाची सत्ता नष्ट करुन सिमुख (क) सातवाहन हा सिंहासनावर आला. सिमुखाआधी किती राजे होऊन गेलेत काही माहिती मिळाली तर मला सांगा. सातवाहन साम्राज्यात भर घालण्याचे काम निनाद ने सुरु केले होते. थोडा हातभार आम्ही लावला आहे, अधिक भरीव काम करेन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
21 Oct 2011 - 1:47 am | चित्रा
हे सांगणे थोडे कठीण आहे. काही आधीचे आणि काही नंतरचे असतील. :) मुळात सातवाहन कुळात सातवाहन नामक राजा होऊन गेला, हे देखील काही थोड्या (आणि बिरुदामुळे) सिद्ध केले आहे असे समजते. कोंडापुरम येथे असे एक नाणे आहे, मला वाटते वरंगळ येथे अजून एक आहे (चट्टोपाध्याय). अन्यथा पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आंध्र म्हणून आहे. सातवाहन या नावाने नाही.
सिमुकाआधीचे राजे कोण होते ते माहिती करून घेण्यासाठी नाण्यांचे विश्लेषण करता आले पाहिजे. तूर्तास तुम्ही मिसळपावावरच्या आणि उपक्रमावरच्या चर्चा/लेखांची लिंक मराठी विकिपिडियावर देऊ शकता.
21 Oct 2011 - 8:44 am | प्रचेतस
मूळ 'सातवाहन' असे नाव असलेले नाणे उत्खननात सिमुकाच्या आधीच्या थरांत सापडलेले आहे त्यामुळे सिमुकाच्या आधीही सातवाहन राजा होता हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही.
राहिला मुद्दा आंध्रांचा, तर सातवाहनांचे सर्व शिलालेख हे पाकृतात आहे आणि तेलगूत एकही नाही.
वासिष्ठिपुत्र पुळुवामी नंतर सातवाहनांनी पश्चिम महाराष्ट्र गमावून दक्षिणेत स्थलांतर केले होते. त्यानंतर श्री यज्ञ सातकर्णीने परत गेलेला प्रदेश परत मिळवला. यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या र्हासाला सुरुवात होवून पैठणही गमावले गेले व त्यांना कायमस्वरूपी आंध्रात जावे लागले. पुराणांचा काळ त्यानंतरचा त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख हा पुराणांत आंध्रभृत्य असाच येतो.
21 Oct 2011 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
' सातवाहनकालीन महाराष्ट्र' हे डॉ.रा.श्री.मोरवंचीकरांचे एक पुस्तक हाती लागले आहे. चर्चेत आपली आणि चित्रा यांची माहिती अगदी बरोबरच आहे. अधिक माहितीसाठी आणि आपल्या प्रतिसादांना पुरक अशी माहिती डकवता आली तर डकवेन.
-दिलीप बिरुटे
21 Oct 2011 - 8:49 pm | प्रचेतस
माझ्याकडेही हे पुस्तक आहेच. लेखातले काही संदर्भ तेथूनच घेतले आहेत. अर्थात त्या पुस्तकातली मोठी त्रुटी म्हणजे शिलालेखांचे प्राकृत भाषांतर त्यात फारसे नाही शिवाय सातवाहनकालीन किल्ल्यांचे वर्णनही त्यात नाही.
पण एकंदरीत त्याकाळचा महाराष्ट्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहेच.
शिलालेखांसाठी वा. वि. मिराशींचे 'सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप-इतिहास आणि कोरीव लेख' हे पुस्तक अतिशय उत्तम आहे पण सध्या कुठेच मिळत नाही.
19 Oct 2011 - 10:43 pm | प्रचेतस
सिमुख सातवाहन हा आद्य सातवाहन समजला जात असे, पण सातवाहन असे नाव असलेली तांब्याची आणि शिशाची नाणी नासिक आणि नेवासे येथील उत्खननात मिळाली असल्यामुळे सातवाहन हाच या घराण्याचा मूळ पुरुष होय असे अलीकडे मानले जाते. याच्याच नावावरून सातवाहन कुलाची सुरुवात झाली. सिमुखाचा हा पिता अथवा आजा असावा तथापि त्यांचे नक्की नाते तसेच आद्य सातवाहनाचा राज्यविस्तार याबद्दल नक्की सांगता नाही.
कण्वाला पराभूत मूळ सातवाहनानेच केलेले असावे किंवा त्यानंतर सातवाहनांचा राज्यविस्तार कण्वांना पराभूत करून सिमुकाने केलेला असावा. पण कालमापनाने पाहिल्यास हेही जुळत नाही. कण्व सत्ता ही साधारण इ.स.पूर्व७५ ते इ.स.पूर्व २६ अशी आहे तर सातवाहनांचा काळ त्याही आधीचा म्हणजे साधारण इ.स.पूर्व २३० असा येतो. पुराणे आणि काही शिलालेखांवरून हा काळ निश्चित केला आहे. म्हणजे कण्वांचा पराभव हा सातवाहनांच्या नंतरच्या पिढीच्या काळात झाला असावा. अशोकाच्या मृत्युनंतरच्या दशकभरातच सातवाहन मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून देउन सत्तेवर आले.
कण्व-सातवाहन यांत संघर्ष झाल्याचे कधी कुठल्याही शिलालेखात आलेले नाही हेही विशेष.
याबद्दल बरेचसे वाद आहेतच. सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते.
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला म्हणजे त्याच्या काळात वर्णसंकर होत नसे. त्याच्या आधी वर्णसंकर होताच. उदा. नागनिका. वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा विवाह राजकारणाचाच भाग हे निश्चितच पण हा विवाह कदाचित गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर झाला असावा. नक्की काळ माहित नाही. (कान्हेरी लेण्यामध्ये वाशिष्ठिपुत्राच्या पत्नीचा शिलालेख आहे त्यात तिच्या पित्याचा-रूद्रदामन क्षत्रपाचा उल्लेख आहे.)
जैनांबद्दल माहित नाही पण बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
20 Oct 2011 - 7:53 am | चित्रा
सिमुकाबद्दल सहमत आहे, तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल. अर्थात त्याचे आधी सत्ताकेंद्राजवळ असणे (म्हणजे मांडलिकत्व) अध्याहृत आहे. (पण आद्य म्हणजे अनेकदा आपण म्हणतो आमच्या घराण्याचा मूळ पुरुष अमूक. त्याआधी घराणे होतेच, पण नावारुपाला आले ते या काळापासून, म्हणून आद्य).
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
>पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
मी ते पाहिलेले नाहीत. फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन. धन्यवाद.
20 Oct 2011 - 9:27 am | प्रचेतस
सिमुक या कुळातील मुख्य राजा होताच हे मान्य. पण आद्य सातवाहन हाही मुख्य राजा असावा.ज्याअर्थी त्याची स्वतंत्र नाणी आहेत त्याअर्थी त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले होते हे निर्विवाद. अर्थात सिमुकापासूनच सातवाहन घराणे नावारूपाला आले यात काहीच संशय नाही.
नेवाशाचा संदर्भ वा.वि. मिराशींच्याच पुस्तकात आला आहे. बहुधा सांखलियांच्या पुस्तकातही तो आहे.
फोटो वर दिलेलेच आहेत. फोटो क्र. १७,१८,१९,२० यात गौतमीपुत्राचा जीवनपट रूपकार्थाने कोरलेला आहे.
20 Oct 2011 - 9:33 am | चित्रा
मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
माझ्या अजून थोड्या वाचनातून लक्षात आले की - त्रिपिटकामध्ये बुद्धाचे म्हणणे I call "a brahmana" (एकब्राह्मण), who is free from moral corruption and from attachment. (बाकीचे भोवडी ब्राह्मण! ) ह्याच्याशी गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा. गौतमीला बुद्धाचे त्रिपीटक माहिती होते किंवा महत्त्वाचे वाटत होते असे दिसते. ( आपण सध्या ज्या अर्थाने हे ब्राह्मण आणि क्षत्रिय धरतो तसेच अर्थ सातवाहनांच्या काळी धरले जात नसावेत असे वाटते, ब्राह्मण आणि क्षत्रिय वेगवेगळे असले तरी "जाती" तयार झालेल्या नव्हत्या असे दिसते. ).
20 Oct 2011 - 9:48 am | प्रचेतस
नाणेघाटातल्या गुहेत ही सर्व शिल्पे आहेत/होती पण दुर्दैवाने त्यांचे आज फक्त पायच शिल्लक आहेत. वर लिहिलेल्या शिलालेखांतील नावावरूनच ही शिल्पे नेमकी कोणाची हे ओळखता येते.
हा पहा मी काढलेला नाणेघाटातल्या गुहेतील शिल्पाचा पाय शिल्लक असलेला फोटो
सातवाहन ब्राह्मण नसतीलही. ते ब्राह्मण असण्याचा किंवा नसण्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही. पण ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
त्याकाळी जाती नव्हत्याच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही व्यवस्थाच सर्वसामान्यपणे प्रचलित होती. बरेचसे वैश्य मात्र बौद्ध झाले असावेत असे विविध दातृत्वाच्या शिलालेखांवरून दिसते.
20 Oct 2011 - 6:02 pm | चित्रा
फोटोसाठी धन्यवाद. हा फोटो थोडा मोठा लावला असता तर बरे झाले असते की साहेब. असो.
गौतमीने म्हटलेल्या एकब्राह्मणाचा उगम त्रिपिटकांत असावा ही माझ्या स्वतःच्या विचारांची निष्पत्ती आहे. कुठच्याही पुस्तकात मी आतापर्यंत हे वाचलेले नाही (मिराशींचे पुस्तक मला उपलब्ध नाही). मिराशी यावर काही म्हणतात का हे जाणून घ्यायला आवडेल.
उद्देश ते ब्राह्मण नव्हतेच हे सिद्ध करण्याचा नाही. माझे म्हणणे खरे असले तर आता गौतमीचे लिहीणे असे दर्शवते की -
१. तिला बौद्ध साहित्य आणि विचार माहिती होते.
२. आपला मुलगा स्वच्छ मनाचा आणि मोहजालापासून दूर आहे (म्हणून बौद्ध विचारांजवळ आहे) असे सिद्ध करायचे असावे. पण म्हणजेच बौद्धांना जवळ ठेवणेही ती महत्त्वाचे समजत असावी. म्हणजे तो बौद्ध नसावा, ब्राह्मणही असावा. :)
अजून काही
तुमच्या लेखात आले आहे की - "स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे. " मला हे वाक्य असेच्या असे भांडारकरांच्या भाषांतरात दिसलेले नाही. वरील वाक्यावरून तेव्हा जाती होत्या आणि तो केवळ ब्राह्मणांचे रक्षण करत होता असे वाटण्याचा संभव आहे.
भांडारकरांनी दिलेल्या भाषांतरात
he protected all who sought asylum with him and regarded the happiness and misery of his subjects as his own
स्वजाती म्हटलेले नाही.
गौतमीच्या लेखाचे इतर कोणी केलेले भाषांतर (मिराशी?) वाचायला आवडेल.
पण माझ्या मते (आणि इतर काही अभ्यासकांच्या मते) आपण ज्याला आता ब्राह्मण म्हणतो तशा त्या जाती गौतमीपुत्राच्या काळी नव्हत्या, शिवाय ब्राह्मण हे वैदिक धर्माचे (म्हणजे यज्ञ वगैरे) आचरण करत असा अर्थ असल्याचे दिसते, बाकी मुख्य बेटीबंदी नव्हती, समुद्रबंदी नव्हती, हे तर सर्व दिसतेच आहे.
>ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
वर लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
21 Oct 2011 - 2:02 pm | प्रचेतस
गौतमीला त्रिपीटकांचे ज्ञान असावे. पण त्याविषयी नक्की माहित नाही शिवाय कुठला संदर्भही मिळत नाही.
पांडवलेण्यातील गौतमी बलश्रीच्या मूळ ब्राह्मी लेखाचे देवनागरीतील प्राकृत लिप्यंतर तसेच मराठीतील मिराशींचे पुस्तक सध्या तरी माझ्याजवळ नाही. ते लवकरच मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्याआधारेच मग नेमके शब्द त्या लेखात काय आहेत ते सांगता येईल. मूळ शिलालेख हा थोडासा खंडित असल्याने वाचणे अवघड आहे. माझ्याजवळच्या संदर्भात अशीच वाक्ये दिलेली आहेत. (मोरवंचीकर रा. श्री.)
जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील शिलालेखाविषयीच्या जयंत कुलकर्णीच्या या लेखात सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत.
समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
ते पुढच्या भागात येणारच आहे. या पहिल्या भागाचा उद्देश फक्त नासिक लेण्यांतील ३ व १० क्रमांकाच्या सर्वात महत्वाच्या अनुक्रमे नहपान आणि गौतमी बलश्रीच्या लेण्यांची माहिती करून देणे हाच होता.
दुसर्या भागात इतरही काही शिलालेखांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
17 Oct 2011 - 2:34 pm | दीप्स
खूप छान फोटो आणि वर्णन. धन्यवाद !! पुंन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झल्या. कॉलेजला असतांना मी माझ्या ग्रुपसोबत अनेकदा येथे जायचे हा आमचा आवडता स्पॉट होता. पायर्या चढतांना उजव्या बाजूला एका आजीची टपरी आहे तिथे खूप छान बटाटेवाडे मिळायचे (आता बरीच वर्ष जाने नाही त्यामुळे आता तिथे ती टपरी आहे कि नाही माहित नाही) आणि आमच्या ग्रुपचा प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही तिथेच साजरे करायचो खूप मज्जा यायची. त्यावेळी बौद्ध विहार झलेले नव्हते छान वनराई होती. आता मात्र चित्र पूर्ण बदलले आहे. छान बौद्ध विहार आहे, दादा साहेब फाळके स्मारक आहे ते खूप सुंदर आहे. काही पुरातन अवजारे तेथे ठेवण्यात आलेली आहे तसेच जुन्या फिल्म इंडस्ट्रीचे छान छान फोटो पाहण्यास मिळतात. पांडव लेणीच्या बाजूलाच नेहरू गार्डन आहे ते देखील खूपच सुंदर आहे.
तसेच नाशिक मध्ये बघण्यासारखी खूप छान छान ठिकाणे आहेत. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकला जातांना अंजनेरी, गुरुपीठ प्रकल्प (श्री स्वामी समर्थ - दिंडोरी प्रणीत), पुढे ब्रम्हागिरी, सोमेश्वर, सीतागुंफा, पंचवटी, काळाराम मंदिर, असे स्पॉट आहेत.
कधी मिपाकारांपैकी कुणी गेलीच नाशिकला तर या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
18 Oct 2011 - 10:02 am | मदनबाण
चांगला लेख,चांगली माहिती,सुंदर फोटु आणि मस्त प्रतिसाद... :)
21 Oct 2011 - 6:42 am | रेवती
सुंदर माहिती, छायाचित्रे.
खरंतर हा माझ्या आवडीचा विषय नाही पण प्रतिसाद आणि उपप्रतिसाद अगदी मुद्देसूद आहेत.
चर्चा वाचताना गुंगून गेले होते.
अगदी छान!
पांडवलेण्यांना भेट दिली होती पण तेंव्हा मी यत्ता चौथीत होते. आता काही आठवत नाही.
फोटोंमध्ये लेण्यांची स्वच्छता राखली असल्याचे दिसते.
21 Oct 2011 - 10:19 pm | भास्कर केन्डे
वल्ली, चित्राताई आणि बिरुटे सर,
खूप दिवसांनी मिपावर आलो आणि आपली वरील चर्चा वाचून मधल्या एक्-दोन वर्षांत मिपावर न आल्याने काय गमावले असेल या विचाराने चटका लागून गेला. आपल्या गहन अभ्यासातून इथे चर्चारुप प्रसाद दिल्याबद्दल आभार!
21 Oct 2011 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्ली, चित्रा, आणि अन्य सदस्य यांनीच ही चर्चा लेखाच्या निमित्ताने उत्तम चालवली आहे. आम्ही आपले उगाच मधेमधे. सातवाहनकाळाचा कितीतरी संदर्भ आपल्या महाराष्ट्राचा जसा आहे तसा अधिक संदर्भ आपल्या पैठणचा आहे. सातवाहनांची राजधानी पैठण असून इतिहासाचे काही ठसे पैठण मधे फारसे सापडत नाही. पालथी नगरीत खापरं सापडतात. कधी खूप मोठ्या विटा सापडतात. सोनं सापडतं. पुरातत्त्व विभागाने काही विशिष्ट भागाला तारेचे कुंपन टाकलेले आहे. उत्खनन मात्र काहीच केले नाही. असो,
बाकी, मन१ यांनी आपली आणि काही मराठवाड्यातील मित्रांची आठवण कालच काढली होती. बाकी, तुम्ही मिपावर नियमित येत चला. किती लांब दांडी मारली तुम्ही. चला अनुपस्थिती भरुन काढा. :)
पैठण येथील हा स्तंभ सातवाहन काळातील आहेत असे म्हणतात.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2011 - 7:23 am | प्रचेतस
आजच्या पैठणला सातवाहनकालीन अवशेष मिळवणे कठीणच आहे कारण मूळच्या सातवाहनकालीन पैठणच्या थरावरच आजचे पैठण वसले आहे त्यामुळे उत्खनन अशक्य आहे.
त्या स्तंभाबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. परंतु तो सातवाहनकालीन वाटत नाही. बांधकामाच्या शैलीवरून तो मध्ययुगीन कालखंडातला असावा.
22 Oct 2011 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैठणच्या थरावरच आजचे पैठण वसले आहे त्यामुळे उत्खनन अशक्य आहे.
उत्खनन होऊ शकतं. असो, तो वेगळा मुद्दा. बाकी,स्तंभाबद्दल माझ्याकडे काही अधिक माहिती नाही. स्तंभाला भेट देतेवेळेस माझ्यासोबत असलेले माझा मिपाकर मित्र सहजराव सोबत होते. स्तंभावर काही लिहिलेले दिसते की काय असे म्हणत होते. ते काही फोटोत टीपता आले नाही. स्तंभ सातवाहन काळातीलच आहे काय, या पुष्ट्यर्थ माझ्याकडे कोणाताही पुरावा नाही. पण डॉ. मोरवंचीकर म्हणता त्या प्रमाणे ' सातवाहनांच्या नाण्यावर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, गजलक्ष्मी,अश्व,चक्र, जहाज, आदि चिन्हे आढळतात'' [पृ.क्र.३४] यापैकी त्या स्तंभावर काही आहे, काय शोधलं पाहिजे.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 10:59 pm | इंटरनेटस्नेही
मस्त मस्त! वल्लीभाऊ अॅट हिज बेस्ट!
14 Dec 2011 - 11:33 am | गवि
वल्ली..
तुझा हा लेख खालील ठिकाणी चोप्य पस्ते.. किंवा चौर्य पस्ते करण्यात आलेला दिसत आहे..
http://keshavrajwaghmare.blogspot.com/2011/11/blog-post_02.html
14 Dec 2011 - 11:39 am | प्रचेतस
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद गवि.
सदर चौर्यकर्माच्या मागोवा घेण्यात येऊन त्या व्यक्तीवर लवकरच कारवाई करणेत येईल.
5 Jun 2014 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीच्या नादाने दगड-मातीत सौंदर्य, कला, ते सातवाहन, ते सिमुक, ते क्षत्रप ते अमुक ते धमुक असा शोधायचा ज्यांना ज्यांना नाद लागला असेल त्यापैकी आम्ही एक. रविवारी नाश्काला गेलो. वाट्सपचा एक अॅक्टीव्ह गृप आहे. गप्पा आणि भटकंतीचा नाद असलेला. दोन चार धार्मिक, दोन चार लैच नास्तिक दोन चार धड इकडे नै अन तिकडे नै अशा सर्वांचा नाश्काला जायचा बेत ठरला. त्र्यंबकेश्वर, नवीन गजानन महाराजांचं एक सुंदर मंदिर. मग नेहमीचे काळाराम, गोराराम, तपोवन, कपालेश्वर, सिता गुंफा, असे करत एकदाचे पांडव लेणीला पोहोचलो. मस्त एका बाजूला लेणी तर एका बाजुला नुसतं चाफ्यांच्या फुलांचा सडा.
मस्त पाय-यांनी चढत रमत गमत लेणीला पोहोचलो. गेल्याबरोबर आपल्याला दहा क्रमांकाची लेणीचं दर्शन होतं. अर्रर्र...लेणीत तर काहीच नाही, असं इथे पाहिल्याबरोबर वाटायला लागतं. पांडव लेणी बघायला जाण्यापूर्वी वल्लीशेठचा हा लेख मोबाईलवर उघडून मग लेणी बघायला पाहिजे. आमच्या दुर्दैवाने मिपा त्या दिवशी बंद होतं. मला वल्ली सारखं निरखून बघता आलं नाही. मला ना शिलालेख दिसले ना ते ग्रीफिन दिसले. मला गौतमबुद्धांच्या मुर्त्या, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, चैत्य, महापरिनिर्वाणाचे शिल्प असे ठळक ठळक ओळखू आले. वल्लीशेठचा लेख वाचल्यावर मग एकेक शिल्पाची ओळख व्हायला लागते. बाकी, ते अवलोकितेश्वर, उषवदत्ता, चक्र, त्रिरत्न, वेगवेगळी प्रतिके, शिलालेख हे फक्त वल्लीला दिसतं. आपण पाहिलं ते नहापान विहार वगैरे हेही वल्लीशेठच्या कृपेने कळतं. बाकी, फोटो टाकतो. माहिती वल्लीशेठच देतील.
पांडव लेणी पाहुन फाळकेस्मारकालाही भेट दिली.सायंकाळी फाळके स्मारकाला प्रचंड गर्दी होते. उद्यान आणि प्रदर्शन पाहण्यासारखं. रात्रीच्या वेळी रंगेबिरंगी संगीत कारंजे. अनेक कुटुंबाच्या चाललेल्या डबापार्टी. एक हायफाय क्लासवाल्यांचं हॉटेलिंग, बाळगोपाळ खेळात रमलेले आणि आपल्याच दुनियेत मशगुल असलेले हातात हात घेऊन आणाभाका घेत असलेले, रुसलेले, तो आणि ती. :)
-दिलीप बिरुटे
6 Jun 2014 - 9:33 am | प्रचेतस
धन्यवाद सर.
हा जो पांडवलेणीत प्रवेश करताना समोरच येतो तो नहपान विहार. ह्याच्या स्तंभांच्या मागचे बाजूस (ओसरीचे बाजूस) स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स आणि ग्रिफिन आहेत. आणि ह्याचे ओसरीच्या भिंतींवर नहपानाचा जावई ऋषभदत्त याचे दानधर्माचे शिलालेख आहेत. तर ३ क्र. चा विहार हा देवीलेणी किंवा गौतमीपुत्र विहार म्हणून ओळखला जातो. याचे स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स नाहीत, ग्रिफिन मात्र आहेत. याचे ओसरीतील भिंतींवर गौतमीपुत्राच्या पराक्रमाचे लेख त्याची आई गौतमी बलश्री आणि पुत्र वाशिष्ठिपुत्र पुळुवामी यांनी कोरवून घेतलेले आहेत.
बुद्धाच्या मूर्ती असलेल्या लेण्या ह्या नहपान विहाराच्या डाव्या बाजूने सुरु होतात. यातच काही लेण्यांमध्ये १० व्या/ ११ व्या शतकात जैन मूर्ती सुद्धा कोरलेल्या आहेत. बौद्ध मूर्तींमध्ये मानुशी बुद्ध, ध्यानी बुद्ध, अवलोकितेश्वर इत्यादी मूर्ती आहेत. ह्या सर्व महायान कालखंडात४ थ्या शतकापासून खोदल्या गेल्या आहेत. बर्याचशा मूर्ती ओबडधोबड आहेत. अपवाद यज्ञ विहारातल्या प्रचंड बुद्धमूर्तीचा.
फाळके स्मारकाचा पूर्वीचा डौल आता राहिला नाही. बरेच खराब झालेय.
बाकी तुम्ही टाकलेला खालून तिसरा फोटो हा पांडवलेणीमधला नसून वेरूळच्या कैलास लेणीच्या डावे बाजूस असलेल्या एका लहानश्या लेण्यातील सप्तमातृकांचा आहे. ;)
6 Jun 2014 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> बाकी तुम्ही टाकलेला खालून तिसरा फोटो हा पांडवलेणीमधला नसून वेरूळच्या कैलास लेणीच्या डावे बाजूस असलेल्या एका लहानश्या लेण्यातील सप्तमातृकांचा आहे.
:) च्यायला, खरं आहे. पांडवलेणीत हे कुठून आलं. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्स.
प्रा.डॉ. दिलीप विसरभोळे. ;)
5 Jun 2014 - 9:56 pm | कंजूस
जुना लेख वर आणल्याबद्दल सरांना धन्यवाद .फोटोही छान .पर्यटनाचे लेख साठवतो त्यामुळे ते कधीही उघडून वाचता येतात .इकडे २०१२ जानेवारीत गेलेलो .माझ्याकडे विडिओ आहेत ते पाहत बसतो .वल्लीची माहिती नेहमीप्रमाणेच छान .
अंकाई टंकाई ला २००७ मध्ये गेलो होतो .
कसे जावे ?उत्सुकता असल्यास पोस्ट लिहीन .
6 Jun 2014 - 12:45 pm | एस
मस्त छायाचित्रे आणि चित्रा व तुमचे दोघांचेही या अभ्यासपूर्ण चर्चेसाठी मनापासून आभार.
काय सांगता? माझा तर पक्का समज झाला होता की तुम्हांला ही लिपी वाचता येते.
बादवे, जयंतरावांच्या नाणेघाटाच्या लेण्यांसंबंधीच्या का कुठल्यातरी धाग्यात मी विचारले हेच विचारले होते. आज या मूर्त्या नष्ट झाल्या आहेत की कुठल्यातरी संग्रहालयात वगैरे असाव्यात? कुणाला काही कल्पना आहे काय? मागे एकदा तिथे झालेल्या एका चर्चेत कुणा ट्रेकरने या मूर्त्या मुंबईला हलवण्यात आल्या असे ठामपणे सांगितले होते.
6 Jun 2014 - 1:19 pm | प्रचेतस
तेव्हा येत नव्हती.
आता थोडी थोडी वाचता येते. :)
सध्या स्वतःच घरीच चार्ट बनवून शिकतोय.
6 Jun 2014 - 3:20 pm | एस
बादवे त्या मूर्त्यांबद्दल काही माहिती आहे का? सध्या कुठे आहेत?
6 Jun 2014 - 3:29 pm | प्रचेतस
काही कल्पना नाही.
दुर्दैवाने एका मोठ्या ठेव्याला मुकलो आपण.
सातवाहनांचे एकमेव ऐहिक लेणे ते.
6 Jun 2014 - 3:49 pm | एस
अरेरे... *sad*
एकतर आधीच भारतीयांना इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहून ठेवायची आवड नाही. त्यात आहे ती पाने जीर्ण होऊन फाटून चालली तर त्याविषयीही खंत नाही. कुकडेश्वर येथे का अजून कुठे तरी चक्क एक पुष्करिणी बुजवून त्यावरून डांबरी रस्ता केला आहे. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हाची ती विस्तीर्ण पुष्करिणी आणि त्यातील कोनाड्यात असलेल्या काही मूर्त्या अजून स्मरणात आहेत.
तेवढे कुकडेश्वराचे हेमाडपंथी मंदिर परत उभारले आहे पुरातत्व खात्याने. असो!
6 Jun 2014 - 3:54 pm | प्रचेतस
कुकडेश्वराचे देऊळ परत उभारलंय पण बरेचसे अवशेष आजूबाजूला तसेच पडून आहेत. जीर्णोद्धारात काही प्रतिमा चुकीच्या स्थानी लावल्या गेल्यात.
कुकडेश्वरची पुष्करिणी आहे अजून पण ती तशी लहानशीच आहे.
13 Jun 2014 - 12:13 am | एस
तुम्ही म्हणालात मग काय राहवेना. रविवारी उशीरा आम्ही कुकडेश्वराला अचानकच धडक मारून आलो. संध्याकाळी सात वाजता तिथे पोहोचल्यामुळे जास्त प्रकाश मिळाला नाही. तरी प्रतिमा मिळाल्या ही डीएसएलआरची कृपा. प्रतिमा फक्त डॉक्युमेंटरी प्रकारच्या काढल्या आहेत त्यामुळे दर्जा सांभाळून घेणे.
13 Jun 2014 - 7:03 am | प्रचेतस
अजूनही अवशेष तसेच पडून राहिलेले दिसताहेत. जीर्णोद्धार तसा फक्त नावालाच आहे.