इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस्स माईण्ड

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
23 Aug 2011 - 1:47 am

मागल्या आठवड्यात मित्र घरी आला होता. मस्त मालवणी जेवण आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आम्हा मित्रांच्या टोळक्यात क्रिकेट आणि राजकारणाविषयी बोल्लो नाही तर आम्ही सगळे ते डिस्कशन फाऊल धरतो. पण नुकताच आपला क्रिकेटविषयक स्वाभिमान इंग्रजीविषयाच्या "टेस्ट" मध्ये नापास झाला असल्याने आणि राजकारणात "अण्णा"नी दिल्लीच्या धुरंधरांची पुरती वाट लावलेली असल्याने त्या विषयांत त्या पलिकडे बोलायला जीभ धजवत नाही. म्हणून एकदम वेगळ्याच विषयाकडे वळलो.

"लग्नाचं काय?"
"ठरलंय." मित्र म्हणाला.
"छान! म्हणजे हे विचारल्यावरच सांगायचं का?"
"सांगणारच होतो. त्यासाठीच तुझा सल्ला घ्यायचा होता."
"सल्ला? मुलीशी ठरलंय असं मी समजतो."
मित्र ओशाळला, "हो रे. मुलगीच आहे. चित्तपावन आहे. घाटकोपरला राहते."
"अरेरे म्हणजे दुर्मिळ जमात. स्थळ आणि प्रजाती दोन्हींकडून."
"हो ना. अन त्यात शॉर्ट फिल्म्स बनवते. चित्रपटांचं भयंकर वेड आहेत तिला. इंग्रजी तर फारच."
"मग दाखवला की नाही कुठला चित्रपट?"
"हो ट्रान्स्फॉर्मर्स दाखवला."

मी गप्प. दोन मिनिटं शांतताच होती.

"मग लग्न तुटलंय की आहे शाबूत?", मी विचारण्याचं धैर्य केलंच.
"दुसऱ्या दिवशी हेच वाटलेलं", मित्र मुळूमुळू बोल्ला, "दोन दिवस काही बोल्लीच नाही माझ्याशी."
"मग आता?"
"तूच सांग. आपल्या टवाळमंडळात तूच अहेस. रोमॅन्टीक चित्रपट पाहणारा. असा सेंसिबल चित्रपट सांग जो सॅडिस्टीक आणि मेलोड्रामाटिक नसेल यू नो ‘नोटबुक’ किंवा ‘टायटानिक’ टाईप्स ... पण उथळही नको ’सेरेन्डिपिटी’ किंवा ’वाईल यु वेर स्लीपिंग’ प्रमाणे ... अगदीच व्यावसायिक सुद्धा नको जसा ’माय बेस्ट फ्रेण्ड्स वेडींग’ किंवा ’स्वीट होम अलाबामा’ सारखा आणि टीन रोमांस तर बिलकुल नाही... कंप्लीट नो नो फॉर ’ट्वायलाईट’ किंवा ’डर्टी डासिंग’."

"वहिनीने स्वतःची पसंती अगदी रोखठोक कळवलेली दिसतेय?"

"हं", तो बोलला जरा ऊसासाच टाकून.

मी पुन्हा गप्प झालो. आता मला सेंसिबल रोमॅंटिक चित्रपट शोधायचा होता जो मेल्लो नसेल आणि स्मार्ट असेल...

थिंक विनीत थिंक!!!

कसंबसं मी डोक्याचं रिवाईंड बटन दाबलं आणि शक्य तितके चित्रपट स्मृतीपटलावर मांडले... आणि तोच हा पिक्चर त्या क्षणाचा ताबा घेण्यासाठी आठवणींच्या दाराशी लपून बसलेला होता असं वाटतं... दार उघडलं तसा सर्रकन डॊळ्यांसमोर तराळला...

मला आवडलेल्या हॉलिवूडच्या नो-नॉन्सेन्स प्रेमकथांपैकी एक... अगदी मुलगेही पाहू शकतील असा...

इटरनल सन्शाईन ऑफ द स्पॉटलेस्स माईण्ड ...

जोएल बॅरीश (जिम कॅरी) सकाळी उठतो तो एक भयंकर डोकेदुखी घेऊनच. त्याचा मित्र बॅरीकडे झालेल्या पार्टीचा हॅन्गओवर असेल कदाचित. पण त्याच अवस्थेत ऑफिससाठी निघायचं असतं. घरातून निघल्यावर कळतं की गाडीला मोठ्ठा स्क्रॅच गेलाय... वैतागून जोएल नेहेमीसारखं सोसायटीच्या मुलांच्या नावाने चडफडतो पण गप्प बसतो.

जोएलचा लॉन्ग आयलण्डचा नेहेमीचा ऑफिससाठीचा ट्रेन प्रवास. त्यासाठी गाडी पार्क करून स्टेशनला पोचतो तो चेहेऱ्यावर वैताग घेऊनच. आल्याआल्या स्टेशनवर अनाउन्समेण्ट होते ती मोन्टॉकसाठी जाणाऱ्या ट्रेनची. ही जोएलची ट्रेन नाही. पण जोएलला काहीतरी वाटतं ... अचानक मनात काहीतरी दाटून येतं आणि तो धावत जाऊन मॉन्टॉकची ट्रेन पकडतो.

ऑफिसला सुट़्टीचं कळवतो आणि मॉन्टॉकला पोहोचतो तसं सोबत असते १४ फेब्रुवारी वॅलेन्टाईन्सडेची बोचरी भकास सकाळ.... ट्रेन रिकामीच असते पण ट्रेनच्या डब्यात अजूनही कुणीतरी असतं सोबत... निळ्या निळ्या रंगाचं.

असं अचानक मॉन्टॉकच्या बीचवर बॅरीच्या गेस्टहाऊसकडे यावसं आपल्याला का वाटलं? जोएल ह्याचं उत्तर शोधत असतो तसं त्याला ते निळसर कुणीतरी येऊन भेटतं.

क्लेमेन्टाईन क्रुक्झीन्स्की (केट विन्स्लेट), निळ्या केसांची, निळसर विंटरजॅकेट घातलेली. ध्यान जरा विचित्रच असतं तिचं. एवढं निळं कसं कुणी असेल. जोएलला तिच्यात प्रथमदर्शनी गुंतावसं वाटतंच नाही. पण आईस ब्रेक होतो तो क्लेमेन्टाईनकडूनच. ती जोएलच्या गुपचूप स्वभावाकडे आकर्षित होते. जोएलही तिच्या बडबड्या स्वभावाला भुलतो आणि सुरू होतं एका सकाळचं आकस्मित प्रेम...

जोएलसोबत परताना क्लेमेन्टाईन त्याला आपल्या घरी नेते आणि तिथे लताबाईंचं ‘वादा न तोड’ ऎकवत त्याला रात्रीसाठी थांबायची विनंती करते. पण जोएल रूक्षपणे ते नाकारतो.

घरी पोहोचतो तो स्वतःला दूषणं देत. आपल्याला वर्षं झालं लव्ह-रीलेशनशीप शिवाय. क्लेमेन्टाईन वाईट नाहीय. आपण का थांबलो नाही तिथे. मग त्याच अपराधीअवस्थेत तो तिला फोन करतो. पहिल्या रींगवरच क्लेमेन्टाईन उचलते ... "लेट फोन केलास!", त्याच्यावर लटकं रागावते... अगदी आपलं कुणीतरी असल्यासारखं...

रात्री डेट फिक्स होते... शहराच्या वेशीपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गोठलेल्या तळ्यावर... जोएलला तळ्यावर ऊभं राहून अन त्यात क्रॅक पाडून त्यात बुडून मरायचं नसतं पण क्लेमेन्टाईनच्या हट़्टापायी तो जातो... रात्रभर अवकाशवाचन होतं, आकाशात चांदण्या निरखल्या जातात. जोएल आणि क्लेमेन्टाईनची शरीरं गुंतलेली नसली तरी मन मात्र त्या गारठ्यात पार गुंततं.

सकाळी जोएल सोबत परतताना क्लेमेन्टाईन तिच्या घरी उतरते... बाहेर वाट बघत थांबलेल्या जोएलच्या कारच्या काचेवर कुणीतरी टकटक करतं... जोएल काच खाली करतो... एक पोरसवदा तरूण त्याला विचारतो... "इथे काय करतोयस?"... जोएल गोंधळतो... तो तरूण आठ्या पाडलेल्या अवस्थेत तडक क्लेमेन्टाईनच्या घरी जातो... क्लेमेन्टाईन त्याला बघून थोडी शरमते पण त्या क्षणाला खचितच तिला पॅट्रिक तिथे नको असतो... वैतागलेली क्लेमेन्टाईन पॅट्रिकला निघून जायला सांगते आणि आलेलं पोस्ट उचलून तडक जोएलच्या कार मध्ये येऊन बसते.

कार हाकत जोएल थोडा साशंकित झालेला क्लेमेन्टाईनकडे बघत असतो ... क्लेमेन्टाईन सुद्धा आपण पॅट्रिकशी असं का वागलो ह्याचं आकलन करत गप्प गप्प असते ... मूड ठिक व्हावा म्हणून तिला पोस्टातून कुणा ‘लक्युना इन्कॉर्पोरेट्स’ कडून आलेली एक अनोळखी ऑडीयो केसेट ती जोएलच्या कॅसेटप्लेयरमध्ये लावते...

तोच एक ओळखीचा आवाज त्यांच्या कानावर पडतो...

"मी क्लेमेन्टाईन क्रुक्झीन्स्की. मला जोएल बॅरीशला माझ्या स्मॄतींतून खोडायचंय... "

आणि टेप वाजत राहते ... जोएलच्या दुर्गुणांचा पाढा पढला जातो ... क्लेमेन्टाईनच्या थरथरणाऱ्या, चिडलेल्या स्वरांत.

जोएल आणि क्लेमेन्टाईन थक्क होऊन ऎकत राहतात... जोएल चिडलेला, झालेल्या प्रकाराने दु:खी होऊन तिला कारमधून उतरून निघून जायला सांगतो... क्लेमेन्टाईनच्या गोंधळाला तर पारावार राहत नाही... जोएलच्या नावाने खडे फोडणारा स्वतःचा आवाज ऎकलेला असतो तिनं... पण तिला तसं काही केलेलं आठवतंच नसतं... हे असं कसं शक्य आहे? ती स्वतःलाच पुसत राहते...

...
...
...

चार्ली कौफमनने योजलेली ही दहा मिनिटांची सुरूवात अन त्यानंतरची ऎंशी मिनिटं आपल्याला मानवी मनाच्या क्लिष्ट कंगोऱ्यांत घेऊन जातात. आपण जोएलच्या मनाच्या हळव्या कप्प्यात शिरतो आणि एका आदिम भावनेला प्रत्यक्ष घडताना पाहतो... एखाद्या नितांतसुंदर शिल्पासारखं ... ते असतं जोएल क्लेमेन्टाईनचं प्रेम!

तेच प्रेम ज्याचा जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा जोएल आणि क्लेमेन्टाईन ‘लक्युना’ कडे जाऊन ते आठणींतून खोडायचं म्हणतात ... पण आठवणींचा बाज त्यातल्या एकाला ... जोएलला .... तसं करू देत नाही... बोचणाऱ्या असल्या तरी त्या क्लेमेन्टाईनच्या आठवणी असतात... त्याच्या सर्वात खाजगी... जितक्या कडू तितक्याच मधुर ... घडाळ्याच्या उलट्या काट्यांगणिक घडणारा आठवणींचा मागोवा ब्रेकपने सुरू होतो ... कडवट असा .... अन शेवटी पहिल्या भेटीच्या सर्वात मधुर टप्प्याला येऊन थांबतो... जोएलला इथेच थांबायचं असतं... ती भेट आपल्या ओंजळीत लपवायची असतं ... ती क्लेमेन्टाईनचं ऊरलेली आठवण... पण स्मृती खोडणारा ‘लक्युना’चा डॉ. हार्वड ते होऊ देत नाही...

शेवटी ‘लक्युना’ मुळेच उध्वस्त झालेली डॉ. हार्वर्डची सेक्रेटरी मेरी (कर्स्टेन डन्स्ट ... स्पायडरमॅन मधली मेरीजेन) आणि जोएलच्या आठवणी खोडताना त्याचीच आयडेन्टीटी ढापून जोएलला विसरलेल्या क्लेमेन्टाईनवर जोएलच्याच पूर्वतऱ्हेने प्रेम जतवणारा पॅट्रिक (लॉर्ड ऑफ द रींग्स मधला फ्रोडो ... एलायजा वूड) त्यांना एकमेकांकडे परतण्यास उद्युक्त करतात... तेही अनाहूतपणे.

ह्या कौफमनला चित्रपट संपताच मी सलाम ठोकला. हॉलिवूडचे प्रसिद्ध मानसशास्त्रीय चित्रपट बहुदा सायन्स फिक्शन (इन्सेप्शन, द मायनॉरीटी रिपोर्ट), ऍक्शन (मेमेन्टो) किंवा सस्पेंस \ हॉरर (सिक्रेट विन्डो, द शटर आयलन्ड) च्या अंगाने जातात. पण ह्या बोजड कल्पनेतून एक हळूवार प्रेमकथा दाखवून देणारा चार्ली कौफमनच ‘ती कशी हॊऊ शकते’ हे जाणो. जिम कॅरी आणि केट विन्स्लेटच्या संयत (हो संयत जिम कॅरी!) पण विनोदी अभिनयाने हा चित्रपट जितका सजलाय तितकंच चार्ली आणि दिग्दर्शक मायकल गॉंड्रीच्या कुशाग्रतेने त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. म्हणूनच २००४ मध्ये ऑस्करला सर्वोत्तम पटकथेसाठी बिनविरोध निवडला गेलेला हा चित्रपट होता.

जगप्रसिद्ध साहित्यिक अलेक्झांडर पोप हे लॅक्युनर अम्निशिया झालेल्या रूग्णांच्या गळणाऱ्या स्मरणशक्तीला "स्पॉटलेस्स माईण्डलाअसं नाव देतात. अशा रूग्णांच्या बाबतीत ते म्हणतात....

How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!
Each prayer accepted, and each wish resign'd

म्हणजे ....

किती खूश असतील ती परमेशवराची मुलं
विस्मृतीत जाणाऱ्या जगालाच विसरून
त्या अढळ प्रकाशित निर्मळ मनात
प्रत्येक प्रार्थना अन कित्येक इच्छा सावरून.

म्हणूनच तुम्हीही विस्मृतीत जाण्याधी हा चित्रपट पाहाच... आणि ह्याची मनसोक्त मजा लुटा...

जसं चित्रपटाच्या अंतिम निसटणार्‍या आठवणींच्या क्षणी जोएल क्लेमेन्टाईनला म्हणतो ...

... "ह्या वाळूसारख्या हातातून निसटणाऱ्या क्षणाची मजा लुटूयात" ....

अगदी तसंच.

****************

तळटीप: माझ्या सल्ल्यानुसार हा चित्रपट दाखवल्यावर मित्रानं फोन करून कळवलं. होणारी बायको टॉकींग टर्म्स वर आलीय असं बोल्ला.

:-)

कलामौजमजाचित्रपटअनुभवआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 2:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छान लिहीलं आहेत.

बरीच वर्ष झाली हा चित्रपट पाहून! पुन्हा एकदा डीव्हीडी बाहेर काढावी लागणार. चार्ली कॉफमनचाच 'अ‍ॅडॅप्टेशन' हाही एक मजेशीर चित्रपट पहाण्यालायक आहे.

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 10:55 am | विनीत संखे

अडॅपटेशन आणि बिईंग जॉन मॅल्कोविच दोन्ही.

सिद्धार्थ ४'s picture

23 Aug 2011 - 2:38 am | सिद्धार्थ ४

हा picture दोनदा बघितला तेव्हा कुठे थोडाफार समजला होता. आता तुम्ही इतके सुंदर परीक्षण लिहिले आहे कि परत आज बघावा म्हणतो.

धनंजय's picture

23 Aug 2011 - 3:10 am | धनंजय

कथा बरीचशी विसरलो होतो, वाचून आठवली.

छान.

आत्मशून्य's picture

23 Aug 2011 - 3:15 am | आत्मशून्य

हा चित्रपट त्या काळी* अलकाला पाहीला होता. अर्थातच पूढील दोन दीवस सतत आयोडेक्स चोळत होतो, हे.वे.सा.न.ल. :)

* तो काळ म्हणजे जेव्हा आम्हाल इंग्रजी चित्रपटांचे सर्व डाय्लोग(वक्य अन वाक्य) व्यवस्थीत स्मजत नाही अशा गैर्समजात आम्ही होतो. (पण मल्टीप्लेक्स आल्यानंतर हा समज आपसूकच धूळीला मीळाला.)

अवांतर :- ’डर्टी डासिंग’." ला नो नो ? अहो मूली ला नक्की इंग्रजी चित्रपटांच वेड आहे का याची खात्री करा ? मला तरी उगीचच अभिजात मराठी कलात्मत (थोडक्यात भूक्कड ) चित्रपटाच वेड असणारं व्यक्तेमत्व भासत आहे. सॉरी जर प्रांजळ मत कडवट भासतं असेल तर.

’डर्टी डांसिंग’ विषयी सहमत हो आत्मशून्य. :)

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 10:52 am | विनीत संखे

डर्टी डांसिंग मलाही आवडतो हो. शेवटी पौगंडावस्थेत पाहिला होता ना. पण "इटरनल..." च्या कथेच्या समोर थोटका पडतो.

आत्मशून्य's picture

23 Aug 2011 - 7:14 pm | आत्मशून्य

इटर्नल सनशाइन बघताना चित्रपट संपल्यावर आपलं माइंड कायमंच स्पॉटलेस होइल की काय अशी भिती सातत्याने वाटत राहते :(

मस्त परिक्षण.
पाहिला होता. आता परत आठवण करून दिलीत. या विकंताला पाहणार.

बाकी "ट्रान्सफॉरमर्स" आवडला बॉ आपल्याला.

(ब्रूटल मारामारीचा फॅन)

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 8:45 am | पल्लवी

अतिशय रोचक लिहीलय !
हा चित्रपट नाही पाहिलेला, पण परिक्षण इतकं catchy आहे, की आता चित्रपट मिळवून पाहीन !

प्रास's picture

23 Aug 2011 - 10:11 am | प्रास

सुंदर परीक्षण!

इंग्लीश चित्रपटांचा पंखा असूनही "इटरनल सन्शाईन ऑफ द स्पॉटलेस्स माईण्ड ..." बघायचा राहिलाय.

आत्ता नक्की बघेन.

धन्यवाद :-)

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 1:00 pm | विनीत संखे

नक्की बघा

कानडाऊ योगेशु's picture

23 Aug 2011 - 1:20 pm | कानडाऊ योगेशु

सबटाईटल लावुन बघावा लागणार.
आपल्याला ते तोंडातल्या तोंडात पुटपुटलेले इंग्लिश संवाद झ्याट काही कळत नाही.!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला दुसर्‍यांदा पहातानाही सगळे संवाद नीट समजत नव्हते. या चित्रपटासाठी सबटायटल्स लावणं उत्तम.

कानडाऊ योगेशु's picture

23 Aug 2011 - 1:20 pm | कानडाऊ योगेशु

सबटाईटल लावुन बघावा लागणार.
आपल्याला ते तोंडातल्या तोंडात पुटपुटलेले इंग्लिश संवाद झ्याट काही कळत नाही.!

जाई.'s picture

23 Aug 2011 - 1:39 pm | जाई.

रोचक लिहीलय.
चित्रपट पाहिलेला नाही. लवकरच बघेन.

मुलूखावेगळी's picture

23 Aug 2011 - 2:14 pm | मुलूखावेगळी

+१

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्रपट ओळख आवडली!

गणपा's picture

23 Aug 2011 - 3:29 pm | गणपा

चित्रपट परिचय आवडला.
अजुन पाहिला नसल्याने 'टु बी वॉच्ड' यादित नाव टाकले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2011 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

+१...

प्यारे१'s picture

23 Aug 2011 - 3:35 pm | प्यारे१

अलका ला हा चित्रपट बघितल्यानंतर सात आठ वर्षांनी कळल्यासारखा वाटला या लेखामुळे.

धन्स! अजुन पाहिला नव्हता. आता पाहेन. उत्तम परिक्षण.

पप्पु अंकल's picture

23 Aug 2011 - 9:06 pm | पप्पु अंकल

नमनाच तेल अगदी कणेकरी स्टाईल वाट्ल.

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 11:51 pm | विनीत संखे

हो ... कणेकरांना नमूनच श्रीगणेशा केला लेखाचा.

;-)

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 9:02 am | चेतन सुभाष गुगळे

<<एवढं निळं कसं कुणी असेल. >>

हे वाचलं आणि एकदम गोष्टीतला निळा कोल्हा, दूरदर्शनवरचा निळूबुवा (या पात्राविषयी आता किमान तिशीत किंवा त्याहून अधिक वयस्कर असणार्‍यांनाच माहिती असू शकेल. गिनीपिग या गाजलेल्या मालिकेतील हे एक महत्वाचं पात्र होतं) आणि या संकेतस्थळावरील नीलकांत यांचीच आठवण झाली.

बाकी समीक्षण एकदम झकास. सवडीने चित्रपटही पाहिला जाईल.

विनीत संखे's picture

24 Aug 2011 - 1:11 pm | विनीत संखे

हो नं, गिनीपिग आठवला आणि निळूबुवा पण.

मुक्तसुनीत's picture

26 Aug 2011 - 11:58 pm | मुक्तसुनीत

संखेंच्या परीक्षणावरून प्रेरणा घेऊन सिनेमा मागवला , पाहिला.

चित्रपट निश्चितच नवं काहीतरी शिकवणारा आहे. त्यातली दोन प्रेमी जीवांची काव्यात्मकता, स्मृती पुसणार्‍या यंत्रणेचं अनीतीमान वर्तन आणि त्यातून निर्माण झालेलं नाट्य हे सगळं रोचक आहेच. परंतु याचा सर्वाचा मला जाणवलेला गाभा आहे तो हाच की "आपण म्हणजे शेवटी आपल्या आजवरच्या कडुगोड सुखददु:खद स्मृतींचा समुच्चय. यापैकी कुठलाही - मग तो अप्रिय का होईना - भाग पुसायचा म्हणजे आपल्या अस्तित्त्वाचाच क्षय करण्यासारखं आहे. "

चित्रपटाचं नैकरेषीय स्वरूप, घटनांचं उलट-सुलट ( बहुशः उलटच) कालक्रमाने उलगडत जाणं या सार्‍यांमुळे चित्रपटाची संगती लागणे , एकंदर काय प्रकार चालला आहे त्याचा थांग लागणे अवघड होते परंतु चित्रपटाखेरीस हे सारे परिश्रम वृथा गेले नाहीत असं वाटतं.

हा चित्रपट पाहताना "मेमेंटो" या दुसर्‍या (आणि गजनीनामक हॉरिबल प्रकाराने चुथडा केलेल्या) दुसर्‍या सिनेमाची आठवण येणं अपरिहार्य आहे. "मेमेंटो"मधे गुंतागुंतीच्या कालक्रमाच्या दोन वेगवेगळ्या धाग्यांना कृष्णधवल आणि रंगीत फीतीमधे चित्रित करून सादर करण्याची युक्ती कमालीपलिकडे यशस्वी झाली आहे. प्रस्तुत चित्रपटामधे अशा स्वरूपाचे तंत्र न वापरल्यामुळे काहीसा ठिसूळ , सैलसर परिणाम झाला असं मला वाटलं. अर्थात मेमेंटोचं शक्तीस्थान त्याची चिरेबंदी रचना हे असेल तर प्रस्तुत चित्रपटामधे काव्यात्मकता - आणि एकंदर अस्तित्त्वाच्या गाभ्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न या गोष्टीचे पारडे जड आहे.

एकंदर, बुद्धीची परीक्षा पहाणारा, परंतु एकंदर "रिवॉर्डींग" अनुभव.

विनीत संखे's picture

27 Aug 2011 - 12:15 am | विनीत संखे

माझ्या परीक्षणाशी सहमत झालात हे वाचून बरं वाटलं.

रिवॉर्डींग ... ह्या चित्रपटासाठी अतिशय तोडीचा शब्द.

:)

राजेश घासकडवी's picture

27 Aug 2011 - 2:32 am | राजेश घासकडवी

हलकीफुलकी सुरूवात करून मग गंभीर विषयाला हात घालणं हे सिनेमाच्या फॉर्मवरच छान बेतलं आहे. बघावासा निश्चित वाटतो आहे.

विनीत संखे's picture

27 Aug 2011 - 7:35 pm | विनीत संखे

धन्यवाद :)