तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------
प्रतिक्रिया
3 Jul 2008 - 11:31 pm | देवदत्त
छान आहे.
वेगवेगळ्या वेळी माझ्याही मनात येणारे विचार इथे एकवटल्यासारखे वाटले. :)
ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरे मी ही शोधत आहे :? :B
4 Jul 2008 - 1:16 am | मुक्तसुनीत
अभिजित यांनी अगदी वर्मस्थानी बोट ठेवल्यासारखे वाटले. कधीकधी संवेदनशीलता हा शाप ठरतो तो असा. एकूणच माणसामाणासांमधले संबंध कधीकधी अतर्क्य वाटण्याजोगे असतात. त्याचे वर्णन कधी "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम" असे कुणी करतो , तर कुणी म्हणतो "यथा काष्ठं च काष्ठं च ..." . आणि कधीकधी " धिक् ताम् च तम् च मदनं च.." असे कुणी म्हणून जातो. माणासाच्या एकलेपणाची , जगापासून तुटलेपणाची भावना जर का कुठे सौम्य होत असेल तर ती मैत्री मधे. मग ती मैत्री दोन प्रौढ व्यक्तींमधली संवादाची असो , दोन लंगोटयारांची असो , सागरगोटे खेळणार्या मुलींची असो की याच्या सारखे कसलेच संदर्भ नसले तरीही "डोंगरमाथ्यावरच्या एकट्या झाडासारखी असो". स्नेहाच्या धाग्याने, कशाशी तरी जोडले जाण्याच्या ध्येयापोटी तुम्ही -आम्ही मैत्री करतो. पण कालौघ ही अशी निर्मम गोष्ट आहे की त्या ओघात सर्वसर्व कधीकधी वाहून जाते. संपर्क तुटतात तसे संदर्भही लोप पावतात. पारखेपणाच्या दु:खाकरताच जणू मैत्रीचे , स्नेहाचे सुख जन्माला आलेले असते. एव्हरीथिंग हॅज अ "सेल बाय" डेट , असा काहीसा अनुभव आपल्याला मैत्रीच्याही वाटावळणांवर येत रहातो...
4 Jul 2008 - 4:48 am | चतुरंग
जीवनातल्या एका सत्याला अभिजितने स्पर्श केलाय. बर्याच मित्रांबरोबरची माझी मैत्री ही गेल्या १०-१२ वर्षात एका वेगळ्या वळणावर आली आहे. सांसारिक, व्यावहारिक, नोकरी-धंद्यातल्या जबाबदार्या, कामानिमित्त वेगळ्या जागी स्थलांतर अशांमुळे पूर्वीइतका संपर्क रहात नाही. जाणीवपूर्वक काही घडते अशातला भाग नाही. माझ्याकडूनही संपर्क कमी होत जातो. पण त्यामुळे दरवेळी मैत्रीमधे बाधा येईलच असे नाही. काहींशी संपर्क साधूनही ते फारसे उत्सुक दिसत नाहीत त्यावेळी आपण काय ते समजून घ्यायचे असते. संवेदनशीलतेवर अनुभवाने मात करता येते/येऊ शकते!
बर्याच मित्रांना मी नवीन वर्षानिमित्त, किंवा बर्याचवेळा सहजही फोन करतो बोलतो. चॅटिंग किंवा इ-मेल पेक्षा मला असा संपर्क जास्त भावतो. असे माझे शाळा-कॉलेजमधले मित्र अजूनही घट्ट आहेत. भारतात मी येतो त्यावेळी काही तासांच्या भेटीकरता कित्येक मैलाचा प्रवास आम्ही करुन एकमेकांना भेटतो, रात्री जागून गप्पा-गोष्टी करतो. तेवढाही संपर्क पुन्हा प्रत्यक्ष भेटीपर्यंत पुरेल असा त्या मैत्रीचा गोफ घट्ट आहे!
मैत्रीला वेगवेगळ्या कारणाने पारखे होण्याचेही प्रसंग आले. काहीत माझ्या चुका होत्या, काहीत दुसर्याच्या होत्या, काहीत तसे बघता फारसे काही घडले नव्हते पण तिथे गणगोत साधले नाही हे खरे.
काही दानं उलटी पडली की सुलट्या पडलेल्या दानांचं महत्त्व आपल्याला कळतं मैत्रीतरी त्याला अपवाद कशी असेल?
चतुरंग
4 Jul 2008 - 8:56 am | सुचेल तसं
अभिजीत,
तुमची व्यथा अगदी बरोबर आहे. मला वाटतं की आपण जर भाग्यवान असलो तर त्या व्यक्तीचा सहवासही लाभती आपल्याला आणि सहवासाने खचितच मनं जुळायला मदत होते. कदाचित आपल्यातही एखादा, छोटासा का होईना, गुण अथवा स्वभाववैशिष्ट्य असण्याची अपेक्षा समोरची व्यक्ती बाळगत असेल. नियमित संपर्क न ठेवण्याबाबत त्या व्यक्तीचाही स्वभाव कारणीभूत ठरत असतो. कधी कधी माणसाला संपर्क ठेवायची तीव्र इच्छा होते तर कधी कधी त्याला एकटं रहायला आवडतं. त्यात आपला तसा काही दोष नसतो. पुढेमागे लहर आल्यावर ती व्यक्ती परत त्याच उत्साहाने आपल्याशी बोलायलाही लागते.
-ह्रशिकेष
http://sucheltas.blogspot.com
4 Jul 2008 - 9:05 am | भडकमकर मास्तर
अभिजितचे प्रश्न बर्याच वेळा मलाही छळतात...
वरच्या सर्वांच्या मताशी सहमत...
... पण कधी असंसुद्धा जाणवतं की मी जसा एखाद्याच्या मैत्रीसाठी , ती टिकण्यासाठी प्रतिसादाची वाट पाहतोय, पण मिळत नाहीये...तसाच माझ्याबद्दल कोणाचा समज असेलच की...त्यामुळं एकूणच हे सारं बॅलन्स होत असतं, असं मला वाटतं.....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
4 Jul 2008 - 10:35 am | गिरिजा
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय!
हो, खूप वेळा.. एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर भाळणं खूप वेळा नशिबात आलयं :)
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
4 Jul 2008 - 4:26 pm | अनिल हटेला
मला वाटतं की आपण जर भाग्यवान असलो तर त्या व्यक्तीचा सहवासही लाभती आपल्याला आणि सहवासाने खचितच मनं जुळायला मदत होते. कदाचित आपल्यातही एखादा, छोटासा का होईना, गुण अथवा स्वभाववैशिष्ट्य असण्याची अपेक्षा समोरची व्यक्ती बाळगत असेल. नियमित संपर्क न ठेवण्याबाबत त्या व्यक्तीचाही स्वभाव कारणीभूत ठरत असतो. कधी कधी माणसाला संपर्क ठेवायची तीव्र इच्छा होते तर कधी कधी त्याला एकटं रहायला आवडतं. त्यात आपला तसा काही दोष नसतो.
अगदी खरये......
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय!
हो रे बाबा ....
अनुभवाने माणुस शहाणा होतो अस म्हणतात....
पण मी नाही होउ शकलो......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~