ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके १९३० - मंगळवार, १ जुलै २००८
सकाळी नेहमीप्रमाणे कन्सलटेशन सुरू होते. तेवढ्यात मोबाईल खणाणला. ऍड्रेस बुकातला नंबर दिसत नव्हता म्हणजे नेहमीच्या संपर्कातील व्यक्ती नसावी. आमची महत्वाच्या समस्येबद्दल जातकांबरोबर चर्चा चालू होती म्हणून कट केला. लगेच पुन्हा फोन. पुन्हा कट. तिसर्यांदा फोन आल्यावर पर्याय नव्हता. कोणीतरी भयंकर संकटात असेल तरच असे दोनदा फोन कट केल्यावर तिसर्यांदा फोन करतं. फोन उचलला. समोरून ते गृहस्थ किंचाळले,
"अहो पंत, फोन काय कट करताय सारखा. मी कितीवेळ ट्राय करतोय. एक तर इथे पावसामुळे पाणी साचलाय. घरचा फोन बंद आहे. मोबाईल कालच्या गडबडीत चार्ज करायचा राहिला म्हणून बाजारपेठेतून तुम्हाला फोन लावतोय."
या सर्व प्रस्तावनेत आपण कोण बोलतोय हेच सांगायचं ते विसरले. आम्ही विचारल्यावर ते घाईघाईत म्हणाले , " अहो मी प्रकाश सावंत बोलतोय चिपळूणवरून. "
प्रकाश सावंतचे नाव ऐकल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांची आणि त्यांच्या सौभाग्यवतींची पत्रिका पाहिली होती.
लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी संतती नाही. अनेक उपचार झाले. अनेक ज्योतिषांना कुंडली दाखवून झाली. वहिनींच्या कुंडलीत पंचमस्थान बिघडलेले आहे. संततीसुखाला कुंडली पोषक नाही असे बहुतेकांचे निदान होते. काहींनी पंचमातील गुरूचे भ्रमण पाहून त्या काळात संततीची शक्यता वर्तवली होती. पण गोचर गुरूने पंचमातून मुक्काम हलवला तरी काहीच झाले नाही.
अत्यंत हवालदिल होऊन हे जोडपे आमच्याकडे आले ते आमचे चिपळूणधील स्नेही श्री. जाधव यांच्या ओळखीने. त्यानंतर प्रकाशरावांचा आणि आमचा स्नेह वाढला. चिपळूणवरून जातांना काण्यांच्या हॉटेलात जेवल्यावर, ज्या स्नेह्यांना भेटून आम्ही पुढे मार्गस्थ होतो, त्या मंडळीत प्रकाशराव सामील झाले.
पत्रिका पाहण्याच्या वेळेस जाधव म्हणाले, " पंत, जे काही असेल ते स्पष्ट सांगा. काहीही ऐकण्याची तयारी करून आलो आहोत."
आम्ही पत्रिका पाहिल्या. प्रकाशरावांची पत्रिका संततीयोग उत्तम दाखवत होती. त्यात काहीच समस्या नव्हती. वहिनींच्या पत्रिकेतील पंचमाबद्दल मात्र बरीच चर्चा झाली होती. प्रकाशरावांच्या आईंनी "सुनेला मूल होत नाही" हा मुद्दा फार मोठा करून तिची पत्रिका अनेक ज्योतिषांच्या नजरेखालून घालून घेतली होती आणि "तुझ्या पत्रिकेत संततीयोग नाही, त्यामुळे माझ्या मुलाचे हाल होत आहेत" हे वारंवार तिला सुनावून तिची मनस्थिती पार बिघडवली होती.
एवढेच नव्हे तर " काय करणार हो? प्रकाशला काही समस्या नाही पण सुनबाईंच्या पत्रिकेत संततीसुख असले पाहिजे ना? नुसते प्रकाशच्या कुंडलीत असून काय होणार आहे?" असे येणार्या जाणार्या नातेवाईकांना सुनेसमोर वारंवार ऐकवून तिची बिचारीची मानसिकता उद्ध्वस्त करून टाकली होती.
आम्ही काळजी पूर्वक कुंडलीचे निरीक्षण सुरू केले. संततीबाबत सांगायचे तर, पंचमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर दोन, पाच, अकरा यापैकी भावांचा जर बलवान कार्येश असेल तर संतती होते. यापैकी एकाही भावाचा जर तो कार्येश नसेल तर संतती होत नाही. त्याचप्रमाणे पंचमाचा उपनक्षत्र स्वामी जर एक, चार, आठ, दहा, बारा या संततीविरोधी स्थानांचा जर कार्येश असेल तर संततीसंबंधी चिंता, गर्भपात, संतती होऊन जाणे अशा घटना घडतात.
वहिनींच्या कुंडलीवर विचार केल्यावर आम्ही जाधवांना म्ह्टले,
" जाधव, तुम्ही म्हणालात की काहीही ऐकण्याची तयारी करून तुम्ही मंडळी आमच्याकडे आला आहात."
वातावरण मुळातच तणावपूर्ण होते त्यातील तणाव वाढला. वहिनींनी मान खाली घातली. प्रकाशरावांनी खिशातून रुमाल काढला. जाधव सुन्न झाले.
" तर आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकण्याची तुमची तयारी आहे असे गृहीत धरून आम्ही सांगतो की..... वहिनींना लवकरच म्हणजे सव्वा वर्षांनी संतती होणार आहे".
सुरूवातीला त्या तिघांचाही आमच्या बोलण्यावर विश्वास बसला नसावा. ते सहाजिक आहे. ते सर्व इतक्या दडपणाखाली होते की त्या मानसिकतेतून त्यांना काही क्षणात बाहेर पडणे शक्य नव्हते. सर्वांच्या चेहर्यावरील प्रश्नचिन्ह पाहून आम्ही प्रकाशरावांना सांगितले की,
" तुम्हाला मूल होणार आहे. अजून सव्वा वर्षांनी. समजले?"
मग एकेकाचा चेहरा खुलला. पण प्रत्येकाच्या चेहर्यावर साशंकता होती. वहिनींनी मान वर केली. काय बोलावे हे कुणालाच सुचत नव्हते. जाधवांनी विषय सुरू केला. आडवळणांनी बोलायला लागले.
"म्हणजे .... पंत..... तुम्ही म्हणताय खरे.... पण तसे होईल ना? ...... नाही म्हणजे काय आहे..... आजपर्यंत इतरांनी जे काही सांगितलाय...... त्यात तुम्ही म्हणताय तसे काही नव्हते...... म्हणून आपली एक...... खात्री करण्यासाठी.... म्हणून विचारतोय" इति जाधव.
आम्ही त्यांना म्हटले " जाधव.... वहिनींच्या कुंडलीबाबत आम्ही जे काही सांगतोय ते गुरूवर्य कृष्णमूर्तीच्या व्यासंग आणि संशोधनातून निर्माण झालेल्या मूलभूत सिद्धांतांना धरुन सांगतोय. वहिनींच्या कुंडलीतील पंचमाचा सबलॉर्ड दोन पाच आणि अकरा यापैकी दोन व पाच ही स्थाने देतो आहे. त्यांना संतती होणार. पण त्याच बरोबर हा सबलॉर्ड अष्टमही देतो आहे. अष्टमाने दिलेला मनस्ताप तुम्ही भोगला आहेच. तो मंगळाशी संबंधीत आहे. त्यामुळे सिझेरियन करावे लागेल. नैसर्गिक प्रसुती संभवत नाही. सध्या त्यांना बुधाची महादशा आहे आणि राहुची अंतर्दशा आहे. महादशा आणि अंतर्दशा स्वामी संतती स्थानांचे कार्येश आहेत. गर्भधारणेचा काळ नऊ महिन्यांचा असतो. त्यामुळे प्रसुतीसंबंधी कालनिर्णयासाठी नऊ महिने सोडावे लागतात. त्यानंतर महादशा स्वामीच्या राशीतून आणि अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातून जेव्हा रविचे भ्रमण होईल तेव्हा वहिनींना संतती होईल. महादशा स्वामी बुधाच्या मिथुन राशीत राहुचे आर्द्रा नक्षत्र आहे. रवि साधारणपणे २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रात जातो. तो ४ जुलै पर्यंत आर्द्रामध्ये असतो. त्यामुळे २२ जून २००८ ते ४ जुलै २००८ या काळात वहिनींना संतती होईल".
एवढे तारखेनिशी सांगितल्यावर मग काय विचारता? ही सर्व गुरूवर्य कृष्णमूर्तींची कृपा. मग प्रकाशराव उगाचच काहीतरी नको त्या शंका काढायला लागले.
" पण ते सिझेरियन नीट होईल ना? त्याचा काही त्रास होणार नाही ना?"
आम्ही त्यांना म्हटले की, " हल्ली अर्ध्याहून अधिक स्त्रियांची प्रसुती सिझेरियननेच होते. ज्यांना गरज नसते त्यांचे पण सिझेरियन केले जाते. कारण नॉर्मल डिलिव्हरीत डॉक्टरच्या करिअरला जास्त स्कोप नसतो. हे आता उघडं सत्य आहे. त्यामुळे ते काही फार भयावह आहे असे समजण्याची गरज नाही. काळजी करू नका. सर्व व्यवस्थित होईल."
ते सर्व खुशीत चिपळूणला परतले . राहु अंतर्दशा सुरू झाली. वहिनींना दिवस गेल्याची बातमी प्रकाशरावांनी फोन करून दिली. अधूनमधून फोन सुरू होते.
आठव्या महिन्यात डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून आले. आम्हाला फोन केला. म्हणाले,
"पंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व घडत आहे. पण तुमचे एक भविष्य चुकणार आहे असे वाटते."
म्हटलं " ते कोणते?"
" तुम्ही म्हणालात की सिझेरियन होईल. पण डॉक्टरांनी सोनोग्राफी पाहून डिलिव्हरी नॉर्मल होईल असे सांगितले आहे. मी त्यांना दोनदा विचारलं. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरीच होईल. ते ऐकून बरं वाटलं. तुम्ही ते सिझेरियनच उगाचच टेन्शन देऊन ठेवलं होततं".
म्हटलं, "चांगलं आहे ना? तुमचे पैसे वाचतील."
आज सकाळी फोनवर समजले.....
वहिनींना काल सायंकाळी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलात भरती केले. प्रसुतीची वाट पाहिली. पण नंतर कळा कमी होत गेल्या. ब्लिडिंग सुरू झाले. पण कळाच नव्हत्या. पुन्हा सोनोग्राफी केली. नाळेची लांबी कमी आहे असे समजले.
"अजून वाट पाहू नका. धोका वाढेल. उगीच रिस्क घेण्यात अर्थ नाही. सिझेरियन करणे उत्तम", असे डॉक्टरांनी सांगितले. आज सकाळी सिझेरियन झाले. सर्व काही सुरळीत पार पडले. कन्यारत्न प्राप्त झाले. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत असे समजले. आनंद वाटला.
प्रसुतीच्या वेळेस म्हणजे आज रवी बुधाच्या मिथुन राशीत १६ अंशांवर म्हणजेच राहुच्या आर्द्रा नक्षत्राच्या तिसर्या चरणात आहे.
चला....गौराई अंगणी आली.
आठ वर्ष ज्या क्षणाची प्रकाशराव आणि वहिनींनी जागून वाट पाहिली तो क्षण आला.......
" जागून ज्याची वाट पाहिली..... ते सुख आले दारी"
ही गोड बातमी सांगण्यासाठी प्रकाशरावांची धडपड चालली होती. आम्ही दोनदा फोन कट केल्यावर तर त्यांचा संयमच सुटला होता. स्वाभाविक आहे. तिसर्या वेळेस फोन उचलल्यावर भरभरून बोलले. ज्यांचे कन्सलटेशन चालू होते त्या वेलणकरांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिली. वेलणकर समजुतदार माणूस. म्हणाले, " घ्या बोलून आरामात. आम्ही आहोतच ऑनलाईन."
प्रकाशरावांना आम्हाला भेटायचे आहे.
"बर्फीचा मोठ्ठा बॉक्स घेऊन येतो", म्हणाले.
म्हटलं, " नको. तोंड गोड करण्यापुरतीच आणा. कारण दहावी बारावीचे रिझल्ट लागल्यापासून त्यांचे पेढे खाऊन आम्ही कंटाळलो आहोत. त्यापेक्षा चिपळूणला आलो की झकास कोंबडीवडे खाऊ. वहिनींच्या हातचे बरेच महिन्यात खाल्लेले नाही. पुढील महिन्यात गुहागरला खेप होणारच आहे. तो पर्यंत वहिनी आरामात स्वयंपाकाला लागतील. मुसाभाई कडून चांगल्या कोंबड्या घेऊन ठेवा त्या सुमारास, म्हणजे झाले".
आपला,
(हर्षभरीत) धोंडोपंत
प्रतिक्रिया
2 Jul 2008 - 7:40 am | विसोबा खेचर
वा पंत! छान लिहिलं आहेत. जातकाच्या तपशीलात योग्य ते फेरफार करण्याची काळजी आपण घेतली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो!
पण काय हो पंत, तुम्ही इतक्या उत्तम पत्रिका पाहता तर लगे हाथ आमचंही एक काम करून टाका ना! आम्ही एका छानश्या मुलीच्या प्रेमात पडलो आहोत तर पुढे आमचं कितपत जमेल हेही सांगा ना! आधी मुळात ती आम्हाला पटेल किंवा नाही, तेही सांगा! :)
थांबा, एकवार वेळ काढून येतोच पत्रिका घेऊन तुमच्याकडे. काकूंनाही बर्याच दिवसात भेटलेलो नाहीये!
आपला,
(अजूनही मनाने कॉलेजकुमारच!) तात्या.
बाकी त्या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झालं याचा आनंद मिसळपाव परिवारही छानशी काजूकतली वाटून साजरा करत आहे!
ही घ्या बर्फी.....! :)
2 Jul 2008 - 7:59 am | विसोबा खेचर
ज्यांचे कन्सलटेशन चालू होते त्या वेलणकरांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिली.
कोण बुवा हे वेलणकर? 'तात्या अभ्यंकर' नावाच्या शनीचं काय करायचं असं तर विचारत नव्हते ना? :)
वेलणकर समजुतदार माणूस.
काय सांगता....!? :)
असो...
आपला,
(वेलणकरप्रेमी) तात्या.
2 Jul 2008 - 9:39 am | धमाल नावाचा बैल
जातकाच्या तपशीलात योग्य ते फेरफार करण्याची काळजी आपण घेतली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो!
हे तुमाला कसं काय कळालं?
2 Jul 2008 - 7:55 am | यशोधरा
शेवट गोड तर सारेच गोड!! :)
त्या वहिनींनी किती मनस्ताप भोगला असेल!!
2 Jul 2008 - 9:37 am | धमाल नावाचा बैल
धोंडीबा, तुमची लिवायची स्टाइल आवडली बरका! :-)
ही जाहिरात आहे का? असल्यास पेपरात जस कोपर्यात बारक्या अक्षरात 'जाहीरात' असं ल्हितात तसं हितं पण द्या की राव
आपला,
बैलोबा.