कॉशसली ऑप्टीमिस्टीक

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
12 May 2011 - 1:40 am

डांबीसानी रसाची वाटी जरा निरीच्छेनीच बाजूला ठेवली.
मास्तराकडे बघत एकदा च्यक असा आवाज काढला.
आंबेवाले विजूभाऊ गॉड हसत म्हणाले "कसे होते आंबे.."
मास्तरानी एक विचीत्र आवाज काढत विजूभाऊंचं संभाषण मूळातच बंद करून टाकलं.
मुक्तसुनीत पेंगत होता.
श्रावण मोडकांनी त्याच्या हातातली जाडजूड कादंबरी हळूच काढून घेतली आणि त्याच्या डोक्याखाली ठेवली.
चतुरंग पाचव्यांदा ए-२ *सी-५ असं म्हणत जागा बदलत राहीला.
बिपीन होमसिक झाल्यासारखा खिडकीजवळ उभा राहून एखादा उंट दिसतो का ते बघत बसला होता.
एकदाच मास्तरांनी आदीतीला मानसकन्या म्हटल्यावर ती आल्यापासून मास्तरांच्या घरात उचकापचक करत होती आणि तूर्तास माळ्यावरची एक छत्री हुडकून त्यावरच्या गंजाच्या डागांचे निरीक्षण करत होती.
त्यामुळे ती गप्प होती म्हणून मास्तर सतत एकटेच बोलत होते .
डांबीसाने दातात अडकलेली एक दसडी काढून फेकली.
मास्तरांनाही हिरडीवर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं म्हणून आंब्याची दसडी समजून ती काढायचा जोराचा प्रयत्न केला आणि कळवळले .
त्यांनी स्वतःच्याच मिशीचा एक केस उपटल्याचं बघीतल्यावर विजूभाऊ जोरजोरात हसायला लागले.
"म्हातारा येतो असं म्हणाला आहे ना ?" डांबीसानी मास्तरांकडे दहाव्यांदा प्रश्न फेकला .
"आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. "मास्तर म्हणाले.
"गेल्या अर्ध्या तासात हाच शब्द वापरताय तुम्ही कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. " एका सणसणीत कोकणी शिवीची जोड देत डांबीस बोलला.
"आता मी तरी काय करू स्साला सक्काळपासून घरी एन्डीटीव्ही प्रॉफीट -टाईम्स नाउ- ब्लूमबर्ग -एन्डीटीव्ही आवाज शिवाय दुसरं चॅनेल कोणी लावत नाही. "
"ती बाई लाडे लाडे विचारते व्हॉट यु थिंक ईज द सिनेरीओ डाऊन नेक्स्ट सिक्स मंथ्स ...."
आणि प्रत्येक जण एकदा घसा खाकरून म्हणतो ... आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक .. "
आता हेच तेच ऐकल्यावर तोंडात तेच येणार ना ? "
मास्तर एकदाचे समेवर आले.
"पण म्हणजे नक्की काय ते सांगा ." श्रावण मोडकांनी सायंशाखा प्रमुखाचा आवाज देत विचारलं .
मोडकांच्या आवाजानी मुक्तसुनीतची झोपमोड झाली.त्यानी उशाखालची कादंबरी पुन्हा एकदा हातात घेत विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला .पण गाडी कॉशसली ऑप्टीमिस्टीक वर येऊन थांबली .
आता मोडक मुक्तसुनीतकडे वळून म्हणाले "तो जोसेफ कॉनराड काही म्हणतो की याबद्दल काही ?"
"मी आत्तातरी सदुसश्टाव्या पानावर आलोय .जर यावर्षी ही कादंबरी मी संपवली तर आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की ह्याचं उत्तर कुठेतरी मिळेल. "
डांबीस चवताळला." ### इकडे चॅनेलवर दुसरं काही नसतं का ?"
"असतं ना .पण चॉईस फारसा नाहीय्ये . एकतर बिझीनेस चॅनेल नाहीतर राखी सावंत ." विजूभाऊंनी डोळे मिटून उत्तर दिलं.
"म्हणजे सगळाच भोंगळपणा " श्रावण मोडकांनी तथ्यांश काढल्यासारखं सांगीतलं .
आता आदीतीला हवं तसं पिच मिळालं होतं . ती शास्त्रज्ञ असल्यामुळे मास्तरांच्या बाजूनी उठून डांबीसाच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली "आमच्यात असं कॉशसली ऑप्टीमिस्टीक काहीच नसतं .आमच्यात एक तर असतं किंवा नसतं पण हा कॉशसली ऑप्टीमिस्टीकचा घोळ नसतो. "
"पण अजून हा म्हातारा आला कसा नाही. तसा फारसा पीत नाही ना ?"
"नाय नाय" मास्तर कळवळत म्हणाले आणि
"पोराटोरांच्या कट्ट्यावर गेला तर ती बिचारी वयाचा मान ठेवून बिलं भरतात तेव्हा पितो" असं कोकणी खवचटपणाचं जोडवाक्य टाकलं .
"आज थत्ते चाचा आले असते तर नक्की त्यांनी कॉशसली ऑप्टीमिस्टीक बद्दल काहीतरी निर्णय दिला असता " विजूभाऊ म्हणाले. दोघांची अमदावादला भेट झाल्यापासून आपल्यात काहीतरी बदल झाला आहे असं त्यांना उगीचंच वाटत होतं.
"सालं नक्की सांगा बरं आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक म्हणजे काय ?" डांबीसाने प्रश्न धसाला लावायचंच ठरवलं होतं.
"मला काय ते कळलं नाही पण मी वाक्यात उपयोग करू शकतो. " विजूभाऊ म्हणाले . "उदाहरणार्थ आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की एप्रील फळे ला पर्यावरणवादी बक्षीस मिळेल. "
"म्हणजे आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की धनंजय बहुजनांना समजेल अशी कविता लिहील."बिपीन अचानक माणसात येऊन म्हणाला.
"म्हणजे आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की तू माती पूर्ण करशील ."आदीती म्हणाली .
"म्हणजे आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की सगळ्यांना बुध्दीबळाचे लेख समजतील "-चतुरंग .
"म्हणजे जसं मर्ढेकर म्हणाले तसं की फुटेल वेडी आशा होती ."कॉनराड बाजूला ठेवत मुक्तसुनीत म्हणाला.
हात जोडत डांबीस म्हणाला " कळलं आता मला हे चॅनेलवाले काय म्हणतात ते .थोडक्यात "कॉशसली ऑप्टीमिस्टीक म्हणजे जे होणार नाही ते मला माहीती आहे पण ते व्हावं असा माझा भाबडा विश्वास आहे "
मोडकांनी चिंतन बैठकीत वाजवतात तशा टाळ्या वाजवल्या.
**************************************************************
अचानक मास्तरांचे डोळे चकाकले .उत्तेजीत होऊन ते म्हणाले "आय नो . ह्या म्हातार्‍याला कसं शोधायचं ? येतो म्हणून सांगतो आणि जिथे बसला असेल तिथून मिपावर लॉग -इन करतो हा म्हातारा .मग खरड पाठवली की सॉरी म्हणून पळत येतो. "
बिपीननी लगेच त्याचा लॅपटॉप काढून नेट जोडलं .क्षणभर पडदा चमकला आणि चारच वाक्य आली ..
फेटल एरर.../.नोड / १६३२/ ..../ पान सापडले नाही
कपाळाला हात लावत डांबीस म्हणाला "आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की नीलकांत लवकरच ह्या समस्येवर तोडगा काढेल."

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

मनिष's picture

12 May 2011 - 2:07 am | मनिष

बघा, शेवटी आमच्या मुसुरावांनीच बरोबर उत्तर दिले की नाही? :)
जरा त्यांना लिहायला सांगा की हो, थोरामोठ्यांचे ऐकतील ते.

रामदास स्वामी, मला हा प्रकार आवडतोय हां!

- मनिष
ता.क. आय अ‍ॅम अल्सो कॉशसली ऑप्टीमिस्टीक की हा प्रतिसाद दिसेल! ;)

पिवळा डांबिस's picture

12 May 2011 - 10:40 am | पिवळा डांबिस

पहिलंच वाक्य वाचलं आणि पोटात गोळा उभा राहिला...
म्हटलं आता हा म्हातारा किती आणि कसा नडतोय कोण जाणे!!!!:)

पण जरा कॉशसली ऑप्टिमिस्टिक होऊन पुढलं वाचायला सुरवात केली...

आता आदीतीला हवं तसं पिच मिळालं होतं . ती शास्त्रज्ञ असल्यामुळे मास्तरांच्या बाजूनी उठून डांबीसाच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली "आमच्यात असं कॉशसली ऑप्टीमिस्टीक काहीच नसतं .
खरंच आहे ते!! आमच्यात डिग्री ऑफ सिग्निफिकन्स असतं!! आमच्यात "पी" व्हॅल्यू महत्वाची!!!!!
काय गं अदिती, या म्हातार्‍याची "पी" व्हॅल्यू काय असावी?;)

हात जोडत डांबीस म्हणाला " कळलं आता मला हे चॅनेलवाले काय म्हणतात ते .थोडक्यात "कॉशसली ऑप्टीमिस्टीक म्हणजे जे होणार नाही ते मला माहीती आहे पण ते व्हावं असा माझा भाबडा विश्वास आहे "
हां हां!! म्हणजे जेंव्हा मिपाकर डांबिसाला 'क्रमशः' लिहू नकोस म्हणून सांगतात, तेंव्हा ते कॉशसली ऑप्टिमिस्टिक असतात अस्संच ना!!!!;)

कपाळाला हात लावत डांबीस म्हणाला "आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की नीलकांत लवकरच ह्या समस्येवर तोडगा काढेल."
हे बाकी खरं!! तिच्यायला, नोकरीधंद्यातून, घरसंसाराच्या रगाड्यातून थोडासा वेळ नेटसर्फिंगसाठी मिळावा. इतर साईटस धडाधड ओपन व्हावेत. पण मिपा उघडलं की ते 'दळूबाई दळू- हळूबाई हळू' सुरु व्हावं!!!
अशावेळी कितीही संयम राखला तरी नीलकांताच्या नांवाने काही गोजिरवाणे शब्द निघतातच!!! :)

ही शब्दमंजूषा थांबवणं हे सर्वस्वी तुझ्याच हातात आहे रे नीलकांता!!!
आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टिमिस्टिक!!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2011 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यामुळे ती गप्प होती म्हणून मास्तर सतत एकटेच बोलत होते.

एवढ्या गर्दीत, श्रोत्यांच्या उपस्थितीत मास्तरांना गप्प करणं शक्य असेल तर ते फक्त काकूंनाच!

खरंच आहे ते!! आमच्यात डिग्री ऑफ सिग्निफिकन्स असतं!! आमच्यात "पी" व्हॅल्यू महत्वाची!!!!!

पिडाकाकांशी सहमत.

काय गं अदिती, या म्हातार्‍याची "पी" व्हॅल्यू काय असावी?

चारचौघात उत्तर देऊ का नीलकांतने खिशातले पैसे खर्च करून व्यनीची सोय करून दिली आहे तिचा वापर करू? ;-) मला हवं तसं पीच मिळालं तरी मी पी व्हॅल्यू क्यू डिस्कस करू?

बाकी मी मास्तरांच्या घरात, माळ्यावर चढून उचकपाचक करते आहे असं दृष्य डोळ्यासमोर तरळणार तेवढ्यात... प्रथेप्रमाणे ड्वाले पानावले. हल्ली मिपा बराच वेळ बंद असल्यामुळे ड्वाले कमी वेळा पानावतात हे ही खरंच!

धनंजय's picture

12 May 2011 - 3:17 am | धनंजय

चतुरंग तिथे वाइल्डली ऑप्टिमिस्टिक चाली खेळत आहे (ए२xसी५! एका खेळीत गर्भगळित प्रतिस्पर्धी डाव सोडतो!! तो तुमचा कास्पारोव्ह का आनंद का आखेलीन कधी खेळला होता का असली नामी चाल!!!).
आम्ही असतो तर आम्हीही वाइल्डली ऑप्टिमिस्टिक कवन चालू केले असते :

आधीच ऑप्टिमिस्टिक मद्य प्यालो,
आम्ही निरस्त-कॉशसदोष झालो,
आणीक कंडली अमुची काव्यबाधा,
चेष्टा वदू किती मग त्या अमुच्या अगाधा
...

मुक्तसुनीत's picture

12 May 2011 - 8:38 am | मुक्तसुनीत

गंमतीचा धागा पण विषय काही गमतीचा नव्हे खरा. ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा. चोखा डोंगा परि भाव नव्हे डोंगा.

राजेश घासकडवी's picture

12 May 2011 - 9:05 am | राजेश घासकडवी

रामदास आता पुन्हा भरघोस लिखाण करायला लागले आहेत असं कॉशसली ऑप्टिमिस्टिकली बोलू धजतो.

ए२xसी५! एका खेळीत गर्भगळित प्रतिस्पर्धी डाव सोडतो!!

ईश आपटेंशी चर्चा करण्याचा अनुभव येत असावा प्रतिस्पर्ध्याला. :)

ऋषिकेश's picture

12 May 2011 - 10:13 am | ऋषिकेश

सलाम!

५० फक्त's picture

12 May 2011 - 10:24 am | ५० फक्त

लई भारी रामदास काका.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2011 - 11:10 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. छान छान. रामदासांचे लेख वाचणे म्हणजे मेजवानीच जणू. बाकी या "फटाल" एररमुळे आम्ही फार परेशान झालो आहोत. नीलकांताने लवकरच फटाल एरर काढल्या जाईल असे बघावे.

सहज's picture

12 May 2011 - 12:13 pm | सहज

"आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की नीलकांत लवकरच ह्या समस्येवर तोडगा काढेल."

-----------------------------------------------------------------------------------
काळेकाका इज कॉशसली ऑप्टीमिस्टीक की अमेरीका आता पाकीस्तानचे जास्त लाड करणार नाही. :-)

गणपा's picture

12 May 2011 - 1:14 pm | गणपा

+२

"आय अ‍ॅम कॉशसली ऑप्टीमिस्टीक की नीलकांत लवकरच ह्या समस्येवर तोडगा काढेल."

बाकी बरेच दिवसांनी हलके चिमटे घेत केलेलं खुसखुशीत लेखन वाट्यास आलं. :)
रामदास काकांचा हा न्यु नॉर्म असाच चालु दे.

रामदास काकांचा हा न्यु नॉर्मल असाच चालु दे.

श्रावण मोडक's picture

12 May 2011 - 6:59 pm | श्रावण मोडक

ही सगळी टाळकी खरंच एकत्र जमली तर काय होईल?
कॉशसली ऑप्टीमिस्टीक सांगायचे तर तो कट्टा अगदी असाच होईल, असे वाटत नाही. तिथं आणखी काही वेगळा दंगा होईल.

पिवळा डांबिस's picture

13 May 2011 - 12:55 am | पिवळा डांबिस

ही सगळी टाळकी खरंच एकत्र जमली तर काय होईल?
अहो व्हायचेंय काय? तो कट्टा असा अभूतपूर्व होईल की त्याचा इथे टाकलेला वृत्तांत ताबडतोब उडवल्या जाईल!
काय समजलेंत!!!
:)

श्रावण मोडक's picture

13 May 2011 - 11:13 am | श्रावण मोडक

खरंय सालं. हे ध्यानातच आलं नाही. ;) बावळटच आहे मीही.

तिमा's picture

12 May 2011 - 6:59 pm | तिमा

माणूस ऑप्टिमिस्टिक असतो तेंव्हा त्याच्या डोळ्यांत काहीतरी मिस्टेक असते असं आपलं मला वाटायचं. असो. सगळे सिनियर्स 'राम दांताखाली' येत आहेत.

तिमा's picture

12 May 2011 - 7:03 pm | तिमा

तीच ती, फॅटल एरर!!

यात म्हातारा कोण म्हणायचा ? मिपा ?

प्रास's picture

12 May 2011 - 8:34 pm | प्रास

लई भारी.....