४८ तासानंतर मी कर्नाटक सोडून परत माघारी महाराष्ट्रात जाणार ! बऱ्याच महिन्यांनी परत कोकणात जाणार याची उत्सुकता आहेच पण बेळगाव सुटणार याची पण रुखरुख लागलीये .पूर्वी संयुक्त महाराष्ट्र बद्दल फक्त घरी मॅगी खाताना टि.व्ही.वर पाहिलेलं. पण इथे प्रत्यक्षात आल्यावर समजलं की संयुक्त महाराष्ट्र कसा असतो ,कसा नसतो ,कसा दिसतो,कसा भासतो .बाकी जेव्हा मी इथे नवीन होतो तेव्हा आल्यावर बूट नीट बाजूला काढून ठेवून ,घड्याळ ,वॉलेट काढून जागेवर ठेवणे , कपडे बदलणे ,ते नीट टांगणे ,धुवायचे असतील तर धुवायला टाकणे ,सॅक नीट कपाटात ठेवणे आणि खाली विहिरीवर जाऊन एक कळशी ताजे थंडगार पाणी काढणे आणि तिथल्या दगडी फरशीवर उभे राहून हातपायतोंड धुणे आणि मग वर येऊन पेपर वाचत नाश्ता करणे अशी दिनचर्या होती.सध्या फक्त बाहेरून आलो की मोबाईल चार्जिंगला लाऊन धाडकन बेड वर आडवे होणे ह्यातच धन्यता मानतो . खरे सांगायचे झाले तर आताच्या महाराष्ट्रात देखील एवढी मराठमोळी परंपरा जपली जात नाही तेवढी इथे बेळगाव मध्ये जपली जाते .इथे सर्व सण अती उत्साहाने साजरे होतात .होळीपासून दिवाळीपर्यंत दणका सुरु असतो .अनंत चतुर्दशीला कपिलेश्वर तलावाकडे गणपती विसर्जन सोहळा हा प्रेक्षणीय असतो . इथे सगळे मराठी सण साजरे केले जातात आणि त्याला एक थोडी कर्नाटकी झाक पण आहे .
इथले खाद्यप्रकार मात्र लै भारी आहेत .बेळगावचा कुंदा आणि मांडे फेमस आहेत .कुंद्याचा दर्जा घसरतोय पण अजून काही ठिकाणी अप्रतिम कुंदा मिळतो .बाकी दिवाळी नंतर तिखट मीठ लावलेल्या चिंचा ,आवळे वगैरे घेऊन ठिकठिकाणी शाळांच्या अथवा बस थांब्याच्या बाजूला फेरीवाले बसलेले असतात .तसेच मग पुढे काकडी वगैरे येतात .सध्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्यांच्या फोडींवर शाळेतल्या लहान मुलामुलींच्या उड्या पडत असतात . खडे बाजारातला उसाचा रस ,ज्यूस आणि चायनीज.शेट्टीमधली पावभाजी , स्वस्तात अप्रतिम जेवण देणारी नेट कॅफे आणि हॉटेल राहुल ,अंबिका मधली भेळ आणि तिथे येणारी हिरवळ ही म्हणजे अगदीच :D बर का ! बाकी राजस्थानी ठसक्यात मोठ्यामोठ्याने ओरडत अप्रतिम भेळपुरी,पाणीपुरी,शेवपुरी,दहीपुरी इत्यादी बनवणारा अंबिका भेळवाला परत मला कुठेच भेटणार नाही .पराठा पॅलेस ,अजंठा ,अर्पण मध्ये भरमसाठ रेट्स आणि पैसे मॅनेज करताना आमची होणारी धडपड,लगेच बिल काढण्यासाठी मोबाईल मध्ये सुरु होणारे कॅलक्युलेटर आठवून हसायला येत .आमच्या क्लासच्या खाली एक मंजुनाथ म्हणून हॉटेल आहे तिथे दोन भले मोठे जाडजूड डोसे ,अतिशय रुचकर सांबर आणि ओल्या नारळाची चटणी,दोन चहा आणि २ पुऱ्या हे सगळे मिळून मी २४ रुपयात घेतो .एवढे स्वस्त आणि बेस्ट ऑफ क्वालिटी कुठेच नाही मिळणार .
मस्त पैकी ओ की ठो न कळणारी श्रवणीय कन्नड गाणी ,तयार होत असलेल्या पदार्थांचा खमंग वास ,ते इडलीच्या रगाड्याचा गाड गाड आवाज ,"येरडू उप्पियेट,वंदू इडल्ली" च्या सतत ऑर्डर्स ,सकाळची वेळ असल्याने सतत बाजूने जात असलेली हिरवळ आणि हॉटेलच्या बाहेर टेबल खुर्ची मांडून आम्ही सगळे मित्र "कल वो खान सर ने क्या टास्क दिया था बे ,मेरा हुआच नई तो " असं हैदराबादी वळणाच्या हिंदीत बोलत बोलत जे नाश्ता करत बसायचो तेव्हा काहीतरी खूप मज्जा यायची .कन्नड मिश्रित मराठीमध्ये हेल काढून कसे बोलायचो ते लगेच शिकलो इथे .हेल काढून बोलणे सोपे असते पण त्या वळणाने शब्द वापरून जी वाक्य फेक करायची असते ती मात्र खुबीने जमली पाहिजे ."बाहेर काढून बसलास का रे ,मग थांबून जराश्या वेळाने "हात म्हणतो की रे मी ,पाप " असं बोललं की पहिल्या वाक्याला समोरच्याची जी त्रेधा तिरपिट उडते आणि मग वाक्याच्या ह्या अश्या शेवटाने तो कसनुसा हसतो हे बघून जाम हसायला येत .पण शहर खूप मस्त आहे फिरायला.सध्या विश्व कन्नड संमेलनच्या नावाखाली बेळगाव चे सुशोभीकरण (?) करण्यात आले आहे . मारुती गल्ली,तानाजी गल्ली ,गणपत गल्ली ,दरबार गल्ली ,महाद्वार रोड ,कपिलेश्वर रोड ,किर्लोस्कर रोड ,खडेबाजार ,बोगारवेस ,टिळकवाडी ,आर.पी.डी. .किल्ला परिसर,उद्यमनगर ,नानावाडी सारखे भाग बेळगावची शान वाढवतात.मराठा लाईट इंफंट्री चे मुख्यालय इथेच आहे .देशातल्या मोजक्या सुरक्षित कारागृहांपैकी एक हिंडलगा कारागृह इथेच आहे .मिलिटरी महादेव हा अजून इथलाच शांत परिसर .
हे शहर सांस्कृतिक ,राजकीय ,क्रीडा,शैक्षणिक पातळीवर अग्रेसर आहे . सेंट पॉल्स,इस्लामिया,फिनिक्स आणि मराठी विद्यानिकेतन ह्या चार शाळांचा क्रीडाविषयक नावलौकिक आहे .इथे आता पूर्वीसारखे नाटयप्रयोग होतात नाही अर्थात कर्नाटक सरकारचा खोडता आणि महाराष्ट्र सरकारची पराकोटीची उदासीनता ह्यामुळे ते कर्मकठीण आहेच म्हणा .तरी इकडे मराठी साहित्य टिकवण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु आहेत .लोकमान्य ग्रंथालय आणि अजून इतर ४-५ ग्रंथालये आहेत ज्यामध्ये दर्जेदार साहित्य वाचायला उपलब्ध असते. के.एल.ई. ट्रस्टची भली मोठी कॉलेजेस,जी एस एस ,गोगटे,लिंगराज सारखी कॉलेज बेळगाव मध्ये आहेत.ह्यातली काही कॉलेज ही उत्तर कर्नाटकात सर्वोत्तम कॉलेज म्हणून गणली जातात . भव्य वनिता विद्यालय ,सेंट पॉल्स ,मराठी विद्यानिकेतन,इस्लामिया ,फिनिक्स सारखी विद्यालये पण दिमाखात असतात .बाकी इथे ज्या पूर्वीपासूनच्या कणखरपणे उभ्या असलेल्या मराठी शाळा आहेत त्याच कश्याबश्या तग धरून आहेत .बाकी कर्नाटक सरकार त्यांच्यावर नियोजनपूर्वक वरवंटा फिरवत आहेच .मग मराठी उत्तरपत्रिका कन्नड शिक्षकांकडून तपासून घेणे ,मराठी शिक्षक शिक्षिका यांना अजून कामावर जुंपणे ,किंवा मुद्दाम कन्नड शिक्षकांची मेजोरीटी वाढवणे वगैरे नाना प्रकार करून मराठी शाळांची गळचेपी सुरु असते .बाकी इकडे कन्नड मराठी वाद खूप गंभीर असले तरी आम्ही वाट्टेल ते झालं तरी मराठीतच बोलतो .कधीकधी वातावरण तंग पण होत म्हणा ! कन्नड वेदिकेचे गुंड गडबड करायला बघत असतात .ते चार असतात आणि मराठी चारशे .तरी वेदिका वाल्यांची कॉलर वर असते कारण ,त्यांना पोलिसांचा पाठींबा असतो .
एरवी क्लास वरून सरळ रोड ने एन डब्ल्यू के आर टी सी ची बस पकडून वीस मिनिटात घरी जाऊ शकत असताना मुद्दाम रेल्वे रोड ला उतरून खालच्या रस्त्याने मस्तपैकी गुलमोहराच्या झाडांची थंडाई अनुभवत चालत जाऊन शीतल मध्ये उसाचा रस,शेंगा आले पाक ,पोहे आले पाक खाणे मग शहाळीवाल्याला गाठून शहाळ्याचे पाणी पिणे आणि गणेश बेकरी नावाची बडे प्रस्थ असलेली बेकरी मध्ये खा खा खाणे आणि अपे फीजची बाटली घेऊन रस्त्यावर दोन्ही बाजूचे भव्य दिव्य बंगले बघत जाणे हा आमचा उद्योग .कंटाळा आला की असच करायचो .बस मधून उतरून आर.पी.डी. क्रॉस कडे उतरून सोसायटीच्या रस्त्यांमधून चालत जायचं आणि तिथल्या कुठल्या खिडकीतून कुठल्या युवतीने आमच्याकडे पाहील तर अगदी आईसफ्रूट सारखं गारेगार वाटायचं आणि तिच्या ऐवजी तिच्या भल्या दांडग्या कुत्र्याने पाहीले की इमॅजीन केलेले आईसफ्रूट ताबडतोब वितळून जायचे .आणि अशी मजल दरमजल करत घर गाठणे आणि आमच्या वाड्याच्या थंडगार फरशीवर झोकून देणे एवढेच काम असायचे .इथले जुने शंभर-शंभर वर्षापूर्वीचे वाडे मनाच कुतूहल वाढवतात .इव्हन मी ज्या वाड्यात राहतो त्याचे बांधकाम १६० वर्षापूर्वीचे आहे .अश्याच एका जुन्या असलेल्या रंगुबाई पॅलेसमध्ये सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यालय आहे .तो वाडा देखील स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात बांधला गेलाय मीन्स मोस्ट ऑफ द वाडे वेअर बिल्ट इन द एज ऑफ ब्रिटीश एम्पायर . खडे बाजारातून ,किर्लोस्कर रोड वरून ,वा आतल्या गल्ल्यातून ,अनगोळ,टिळकवाडी मधून फिरताना ते सर्व जुनं बांधकाम दिसत.बंद दगडी वाडे,लाकडी जिने ,त्या लाकडी महिरपी त्यावर आलेल्या वेली हे सर्व टिपिकल वाड्यासारखे दृश्य पाहायला मिळते . इथे फिरताना जाणवते की इथला मातीचा प्रत्येक कण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने मंतरलेला आहे . बाजारात असलेला हुतात्मा चौक पाहताना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यासमोरून झळकतो ,वयाची ८०वर्षे झाले तरी माझं शहर महाराष्ट्रात विलीन झालं की मी मरणार ही आशा बाळगणारे ते आजोबा आठवतात ,कन्नड वेदिकेची अरेरावी ,पोलिसांचा दबाव सहन करून देखील "येळ्ळूर : राज्य महाराष्ट्र " असा फलक लावून येळ्ळूर मधली लहान मुले आणि मोठी मनसे प्राणपणाने त्या फलकाची जपणूक करतात तेव्हा महाराष्ट्रातल्या अतिशय स्वार्थी राजकारण्यांची आणि फक्त संयुक्त महाराष्ट्रातल्या स्थितीवर नुसती सो कॉल्ड हळहळ व्यक्त करणाऱ्या त्या तमाम महाराष्ट्रीयन जनतेची खूप म्हणजे खूपच चीड येते .पोलिसांचा मार खाण्यात आणि काळा दिन पाळण्यात इथल्या पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या .
ह्या शहराला उपराजधानीचा दर्जा आहे पण आज बेळगाव बदलतंय .पूर्वी चिंचेच्या आणि गुलमोहराच्या दाट आणि हिरवेगार सावलीत लपलेल्या बेळगाववर आज कर्नाटकी सरकारचा वरवंटा फिरतोय .आज इथे गुंतवणूक वाढतेय, नवीन मॉल्स,मल्टीप्लेक्स उभे रहत आहेत पण कुठेतरी कृत्रिम वाटतंय.बेळगावचे कृष्णराव हरिहर म्हणजेच रावसाहेब ही पु.ल.देशपांडेनी लेखणीतून साकारलेली व्यक्तीरेखा आठवते आणि बेळगावच्या व्यक्तीची झलक दिसते तसेच ख्यातनाम लेखक प्रकाश नारायण संत यांच्या वनवास ,पंखा मधली लंपन ही व्यक्तिरेखा जुने बेळगाव दाखवते . पण एवढ नक्किये की आज जर तो लंपन परत जिवंत झाला तर तो सुद्धा ह्या राजकारणाने बरबटलेल्या ,झगमगाट वाढलेल्या ,जुनी थेटरे पाडून त्यावर मल्टीप्लेक्स आणि मॉल्स उभारलेल्या ,दडपशाहीने वृक्षतोड करून भकास केलेल्या ह्या बेळगाव मध्ये पावलोपावली अडखळेल. असो ,एक वर्ष राहिलो मी इथे ,पण इथल्या वातावरणाशी मी समरूप झालो .एक बाकीच्या कोकणस्थामध्ये जसं मी कोकणस्थ म्हणून मिरवतो तस आता एक बेळगावकर म्हणून पण उपाधी जोडायला मला आवडेल ..
परवा बोचऱ्या थंडीत ,स्ट्रीटलाईट्सच्या गंभीर पिवळ्या प्रकाशात मी पहाटे बाहेर पडेन घरी जाण्यासाठी आणि कदाचित कधी परत न येण्यासाठी .
मी माझं बेळगाव खूप मिस करेन ! घराकडे जातोय त्याचा आनंद व्यक्त करू की बेळगाव सोडतोय त्याच दुखः व्यक्त करू तेच समजत नाही .असो ,गुडबाय बेळगाव .
प्रतिक्रिया
22 Apr 2011 - 6:32 pm | माझीही शॅम्पेन
द्वयर्थी शब्द/अर्थ असलेली आणि शिव्या असलेली वाक्य सोडली तर लेख आवडला -
फोटो टाकता आले असते तर मजा आली असती !!
22 Apr 2011 - 6:32 pm | माझीही शॅम्पेन
द्वयर्थी शब्द/अर्थ असलेली आणि शिव्या असलेली वाक्य सोडली तर लेख आवडला -
फोटो टाकता आले असते तर मजा आली असती !!
22 Apr 2011 - 6:39 pm | चिरोटा
झकास वर्णन केले आहेस.
खरे आहे.मी सर्वात आधी म्हणजे ८४-८५च्या सुमारास जायचो तेव्हा उन्हाळयातही थंडी वाटायची. २००० सालानंतर शहराची रया गेली. वरवंटा वगैरे ठीक पण अजूनही मुंबई-पुण्यापेक्षा अस्सल मराठी पदार्थ येथे मिळतील्.मिसळ पाव असू दे वा अले पाक वा मांसाहारी जेवण इकडच्या खाण्याची सर ए.सी. हॉटेलात दाटीवाटीने बसून खायला येत नाही.
22 Apr 2011 - 7:36 pm | रेवती
बेळगावातल्या जुन्या खुणांचं वर्णन वाचून बरं वाटलं तर सरकारी धोरणांमुळे हळूहळू वाट लागतीये म्हणून वाईटही वाटलं.
माझ्या आजोबांना बेळगाव भारी आवडायचं. तिथून कर्नाटकात शिरलं की आमचं मूळ गाव! आजीआजोबा घरी मराठी बोलायचे पण ब्यांकेचे वेव्हार मात्र कानडीत बोलून करायचे.;)
असो. लेखन मात्र आवडलं.
22 Apr 2011 - 7:52 pm | सौप्र
तसा या शहराशी कधीही संबध आला नाही पण का कुणास ठाऊक बेळ्गांव विषयी बरीच आपूलकी वाटते. लंपन , रावसाहेब यांच्यामुळे असेल कदाचित. बाकी लेख उत्तम!
24 Apr 2011 - 8:03 am | ५० फक्त
खुप मस्त लिखाण, एक करा येताना जरा तो कुदा घेउन या माझ्याही नावचा आणि खा माझं नाव घेउन.
24 Apr 2011 - 9:34 am | यशोधरा
आमच्या ब्येळगांवबद्दल लिहून सोडलं की हो तुम्ही! :)
24 Apr 2011 - 1:14 pm | स्पंदना
तुमच? आवो त्ये तर आमच बेस्ट बेळगाव आहे. कुंदा खावा तर इथलाच. पण हल्ली थंडी कमी झाली आहे हे ही खरच.
24 Apr 2011 - 1:15 pm | स्पंदना
तुमच? आवो त्ये तर आमच बेस्ट बेळगाव आहे. कुंदा खावा तर इथलाच. पण हल्ली थंडी कमी झाली आहे हे ही खरच.
24 Apr 2011 - 1:28 pm | श्रावण मोडक
बरं, बरं. तुमचं का? हरकत नाही. तुमचं तर तुमचं. :)
24 Apr 2011 - 1:28 pm | यशोधरा
का हो असं? तुमचं असेलच हो, पण आमचं असू नी का? :)
26 Apr 2011 - 8:37 pm | धमाल मुलगा
बेळगावसारख्या सुंदर जागेबद्दल अस्स्ल बेळगावी लोण्यागत लेख!
मस्त मस्त एकदम! मजा आली मित्रा वाचायला. अन त्या गावाबद्दलची आपुलकी, त्या भावना, छान शब्दांतूनही पोहोचताहेत हे अधिक सुंदर.
आणि एव्हढा छान लेख कसाकाय मागे पडला असा प्रश्नही पडला.
26 Apr 2011 - 11:13 pm | सुधीर
"कुणाचं उष्टं कुठल्यागावी किती सांडावं याचा काही संकेत असावा"
"देवाने आपली लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या! न मागता दिल्या होत्या, न सांगता परत नेल्या!!"
--- इति पु. ल.
27 Apr 2011 - 2:57 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला..
स्वाती
27 Apr 2011 - 5:59 pm | अमोल केळकर
लेख मस्त आहे.
अमोल केळकर
30 Apr 2011 - 11:00 am | शिल्पा ब
लेख आवडला.
1 May 2011 - 9:00 pm | शैलेन्द्र
सुंदर लेख..
2 May 2011 - 2:27 am | विनायक बेलापुरे
मस्त आहे लेख. मंजूनाथ १ नंबर आहे. :)
मसाला अवलक्की (आपले कांदे पोहे ) खात होता की नाही ?
14 Jun 2012 - 7:05 pm | बॅटमॅन
अप्रतिम लेख. काही अंशी बेळगावसारखे असलेल्या धारवाडची आठवण झाली. तो सगळा भागच मस्त आहे एकदम. उत्तर कर्नाटकात कुठे मराठीची आमटी संपते आणि कुठे कन्नडचे सप्पिन सार सुरू होते ते कळतच नाही. :)
14 Jun 2012 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! हा धागा वाचलाच नव्हता! काय मस्तच लिहिलंय की हो! बेष्टच!
आम्हाला उगाचच आमच्या रावसाहेबांची आणि लंपूची आठवण आली उत्तर कर्नाटक म्हणलं की!
14 Jun 2012 - 7:30 pm | विजय_आंग्रे
सुंदर लेख..
16 Jun 2012 - 10:32 am | अक्षया
माझेपण गाव बेळगाव ..:)
लेख छान लिहिला आहे..आणि सगळे वर्णन ऐकून सुट्टीत मारुती गल्लीत असलेल्या घरी जायचो त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या..:)
तिथे असलेले आगत्य आणि आपुलकी कुठेच मिळणार नाही..
लाल माती आणि तिथले पाणी, तिथली हवा.. प्रदूषणमुक्त प्रसन्न वातावरण याचे वर्णन करू तेवढे कमीच आहे.
काही पदार्थांना तर तोडच नाही..
अजून कोण आहे बेळगाव चे मिपावर?