राजवाड्यांचे शहर

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
8 Jun 2008 - 12:53 pm

आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे. गांवातील कोठल्याही धनाढ्य माणसाचा वाडा, हवेली, कोठी वगैरेपेक्षा तिथला राजवाडा नेत्रदीपक आणि आलीशान असायलाच हवा. राजघराण्यातील व्यक्तींचे कडेकोट संरक्षण करण्यासाठी त्याचे बांधकाम चांगले भरभक्कम असे, त्याच्या सभोवती अभेद्य अशी तटबंदी, त्यावर तोफा ठेवण्यासाठी बुरुज, हत्तीला सुध्दा दाद देणार नाहीत असे मजबूत दरवाजे वगैरे सारा सरंजाम त्यात असे. पुरातन कालापासून असेच चालत आले आहे. इंग्रजी भाषेतल्या परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कृतीपूर्ण किस्से, आपल्या पौराणिक कथा-कहाण्या या सगळ्यात पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यांचे रसभरित वर्णन असतेच. त्यांच्या बांधकामामुळे हजारो मजूरांना रोजगार मिळतो, कुशल कारागीरांना आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, त्यातून नवे कुशल कलाकार तयार होतात, प्रजेला सुंदर कलाकृती पहायला मिळतात, त्यामुळे तिची अभिरुची विकसित होते, वगैरे अनेक कारणांसाठी त्यावर होणा-या अमाप खर्चाचे समर्थन किंवा कौतुकच केले जात असे. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर आताचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यकर्ते देखील व्हाइट हाउस किंवा राष्ट्रपती भवन यासारख्या भव्य वास्तूमध्येच रहातात. ही परंपरा अशीच यापुढे राहणार असे दिसते.

कुठलेही ऐतिहासिक गांव पाहतांना त्या जागी कधीकाळी बांधलेला राजवाडा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मध्ययुगात बांधलेल्या दणकट ऐतिहासिक वास्तू दिल्ली वा
आग्र्यासारख्या कांही थोड्या ठिकाणी अद्याप शाबूत राहिलेल्या दिसतात तर इतर अनेक ठिकाणी त्यांचे भग्न अवशेष पाहून इतिहास काळातील त्यांच्या गतवैभवाची कल्पना करावी
लागते. इतिहासाच्या आधुनिक कालखंडात म्हणजे ब्रिटीशांच्या राजवटीत तत्कालीन राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांनी आपापल्या राज्यात एकापेक्षा एक सुंदर राजवाड्यांचे बांधकाम
करवून घेतले. त्या बहुतेक इमारती आजही सुस्थितीत दिसतात आणि रोजच्या वापरात त्यांचा उपयोग होतांना दिसतो. बडोदा, ग्वाल्हेर, जयपूर आदि अनेक गांवांमध्ये हे दृष्य
आपल्याला दिसते. अशा सा-या शहरांत मैसूरचा क्रमांक सर्वात पहिला असावा असे वाटावे इतके भव्य आणि सुंदर राजवाडे या ठिकाणी बांधले गेले आहेत. मैसूरच्या प्रसिध्द मुख्य
राजवाड्याखेरीज जगन्मोहन पॅलेस, जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहाल, वसंतमहाल, कारंजीविलास, चेलुअंबा विलास, राजेंद्र विलास वगैरे महाल किंवा पॅलेस या शहराची
शोभा वाढवतात.

मैसूरच्या राजवाड्याला मोठा इतिहास आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरीस वाडियार राजांनी मैसूरचे राज्य स्थापन केले तेंव्हापासून याच जागेवर त्यांचा निवास राहिला आहे. चौदाव्या
किंवा पंधराव्या शतकात बांधलेला पुरातन राजवाडा कधीतरी वीज कोसळून पडून गेल्यावर सतराव्या शतकात त्या जागी एका सुंदर राजवाड्याची उभारणी केली होती. तिचे वर्णन
असलेल्या साहित्यकृती व दस्तऐवज उपलब्ध आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस तो जीर्ण झालेल्या अवस्थेत असतांना टिपू सुलतानाने तो पाडून टाकला. इंग्रजांनी टिपू सुलतानाला
मारून राज्याची सूत्रे पुन्हा वाडियार राजाकडे सोपवली. त्या राजाने त्याच जागी अल्पावधीत नवा राजवाडा बांधला. शंभर वर्षे टिकल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा
बराचसा भाग आगीत जळून खाक झाला. तत्कालीन राणीने त्याच जागी आणि सर्वसाधारणपणे जुन्या राजवाड्याच्याच धर्तीवर नवा आलीशान राजवाडा उभारायचे ठरवले. त्यासाठी
नेमलेल्या इंजिनियराने अनेक शहरांना भेटी देऊन तिथल्या उत्तमोत्तम इमारतींची पाहणी करून नव्या राजवाड्याच्या इमारतीचा आराखडा बनवला आणि एका भव्य वास्तूची निर्मिती केली. युरोपात विकसित झालेले त्या काळात प्रचलित असलेले स्थापत्यशास्त्र, वास्तुशिल्पकला आणि परंपरागत भारतीय शैलीच्या शिल्पकलेचा आविष्कार या सर्वांचा सुरेख संगम या
इमारतीच्या रचनेत झाला आहे. ती बांधण्यासाठी दूरदुरून खास संगमरवर आणि ग्रॅनाइटचे शिलाखंड आणून त्यावर कोरीव काम केले आहे. सुंदर भित्तीचित्रांनी त्याच्या भिंती सजवल्या
आहेत. तसेच खिडक्यांसाठी इंग्लंडमधून काचा मागवून त्यावर सुरेख चित्रे काढून घेतली आहेत. रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाची आठवण करून देणारी अनुपम चित्रे छतावर
रंगवली आहेत. तिथे बायबलमधील प्रसंग दाखवले आहेत तर मैसूरच्या राजवाड्यात दशावतार आणि तत्सम पौराणिक कथांचे दर्शन घडते. या इमारतीतले खांब, कमानी, सज्जे,
त्यावरील घुमट वगैरेंच्या आकारात पाश्चिमात्य, मुस्लिम आणि भारतीय अशा सर्व शैलींचा सुरेख संगम आढळतो. राजवाड्याच्या चारी बाजूंना भरपूर मोकळी जागा ठेवून त्याच्या
सभोवती तटबंदी आहे.

कॉलेजमध्ये असतांना मी मैसूरचा राजवाडा दसरा महोत्सवासाठी शृंगारलेल्या स्थितीत पाहिला होता. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिलीच ितकी संदर इमारत असावी. कदाचित
त्यामुळे आजही मला ही वास्तू यासम ही वाटते. ताजमहालसारखे सुंदर महाल रिकामे रिकामे वाटतात आणि सिसिटीम चॅपेलसारख्या इमारतीत कलाकुसरीच्या वस्तू मुद्दाम मांडून
ठेवल्यासारख्या दिसतात. मैसूरच्या राजवाड्यात त्या नैसर्गिकरीत्या जागच्या जागी ठेवल्यासारके वाटते. तिथले एकंदर वातावरण चैतन्यमय आहे. दरबार हॉलमध्ये हिंडतांना
कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो.

जगन्मोहन पॅलेसमध्ये सुरेख आर्ट गॅलरी आहे. त्यात अनेक जुन्या चित्रकारांची तैलचित्रे तशीचइतर माध्यमातल्या कलाकृती आहेत. हळदणकर यांचे ग्लो ऑफ होप हे चित्र यातले
खास आकर्षण आहे. एक संपूर्ण दालन फक्त राजा रविवर्मा यांनी काढलेल्या भव्य चित्रांनी भरले आहे. ललितामहालमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. जयलक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मैसूर
विद्यापीठाचे मुख्यकार्यालय आहे, तसेच त्याच्या कांही भागात लोककला आणि पुरातत्व या विषयांवरील पुराणवस्तुसंग्रहालय आहे. चलुअंबा पॅलेसमध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकेल
इन्स्टिट्यूट आहे. अशा प्रकारे इतर राजमहालांचा या ना त्या कारणासाठी उपयोग करण्यात येत आहे. मैसूरच्या रस्त्यांवरसुध्दा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, तसेच
चौकौचौकात चबुतरे वगैरे बांधून त्यावर राजा महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. शहरातून फेरफटका मारतांना ते राजवाड्यांचे शहर आहे याची जाणीव होत राहते.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

पक्या's picture

9 Jun 2008 - 3:00 am | पक्या

म्हैसूर राजवाड्याची ओळख चांगली करून दिलीत. सोबत राजवाड्याचा एखादा फोटो ही चढवायचा होता. म्हणजे वाचताना मजा आली असती.

प्रमोद देव's picture

9 Jun 2008 - 8:50 am | प्रमोद देव


दिवसाउजेडी!

रात्री विद्युत रोषणाईत!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चित्रा's picture

10 Jun 2008 - 9:33 am | चित्रा

सुरेख चित्रे! काय सुरेख काम आहे.

माहितीसाठी धन्यवाद.

यशोधरा's picture

9 Jun 2008 - 8:54 am | यशोधरा

अतिशय देखणा राजवाडा आहे हा!! मी गेल्या महिन्यातच बघून आले.

पक्या's picture

9 Jun 2008 - 12:57 pm | पक्या

धन्यवाद , प्रमोदकाका
राजवाड्याची दोन्ही प्रकाशचित्रे फारच छान आहेत. खरोखरीच देखणा आहे राजवाडा . आणि रोषणाईने त्यात अजूनच भर पडली आहे.

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2008 - 1:32 pm | स्वाती दिनेश

दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो.
असेच वाटले होते मलाही राजवाडा पाहताना..
लेख आवडला.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2008 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखात राजवाड्याच्या छायाचित्रांची गरज होतीच त्या शिवाय सुंदर लेखातील राज वैभव दिसलेच नसते.
अजून येऊ द्या असेच लेखन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे's picture

9 Jun 2008 - 7:54 pm | आनंद घारे

मिसळपाव या स्थळावर चित्र डकवण्यापूर्वी ते आधी कोठे तरी चिकटवून त्याचा दुवा द्यावा लागतो. ही दुहेरी प्रक्रिया करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मला ती देता आली नव्हती. माझे मित्र श्री. प्रमोद देव यांनी राजवाड्याची सुंदर छायाचित्रे देऊन ती कसर भरून काढली. या मदती बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सर्वसाक्षी's picture

9 Jun 2008 - 9:29 pm | सर्वसाक्षी

फार वर्षांपूर्वी पाहिलेला तो खरा. मागील भेटीत बहुधा सुट्टीचा काळ त्यात आणखी रविवार यामुळे भयानक गर्दी होती. आलेल्या बहुसंख्य लोकांना 'आम्ही राजवाडा पाहिला' या रक्यानात खूण करण्यापलिकडे काही स्वारस्य नसावे. पैसे खर्च करुन इथवर आलोच आहोत तर जे जे आहे ते सर्व बघुया अशा भावनेते लोक ढकला ढकली करत होते. एकुण आषाढीला पंढरीला होते तशी अवस्था होती. निमूटपणे माघार घेतली.

आणखी एक चित्र

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2008 - 11:06 pm | प्रभाकर पेठकर

मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. म्हैसूर पाहायलाच हवे.

राजे's picture

10 Jun 2008 - 9:50 am | राजे (not verified)

मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे.

हेच म्हणतो.. पाहीला आहे पुन्हा पुन्हा पाहण्याची ईच्छा आहे.. पण ह्यावेळी दस-याच्या वेळी !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अमोल केळकर's picture

10 Jun 2008 - 9:22 am | अमोल केळकर

मस्त माहिती
फोटो ही छान

चतुरंग's picture

10 Jun 2008 - 10:03 pm | चतुरंग

मी दिवसा पाहिलाय अगदी मनसोक्त!
पण दसर्‍याच्या रात्री पाहण्याची इच्छा आहे. पाहू कधी पूर्ण होईल.
छान लेख आनंदघन!

चतुरंग

आनंद घारे's picture

11 Jun 2008 - 11:11 am | आनंद घारे

राजवाड्यावर दर रविवारी रात्री एक तास रोषणाई केली जाते. दसरामहोत्सवात ती दररोज आणि अधिक वेळ असते. फक्त राजवाडाच नव्हे तर त्याच्या आसमतातील सर्व वास्तू असंख्य दिव्यांच्या प्रकशात उजळून निघतात. राजवाड्यासमोरील पटांगणात उभे राहून चारही बाजूला असंख्य दीपमाळा पाहण्यातला आनंद अद्भुत असतो.