ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात.
नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की...
माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे.
ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते.
नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे. शिवाय हे उत्तर मलाच परिपूर्ण वाटले नाही. यात अजून भर घालायला हवी आहे असेही वाटले.
आशा आहे की, तरुण वयातले नैराश्य या विषयावर येथे चर्चा होईल.
पत्रोत्तरातला हा सल्ला तुटक वाटण्याची शक्यता आहे पण तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे.
---
प्रिय दीप्ती,
परिक्षा चांगली आणि वाईट गेल्याची तुझी मेल वाचली. असे दिसते आहे तू अभ्यास चांगला केला होता. अवघड विषयांचे चार्टस वगैरे बनवले होते म्हणजे तू तुझ्याकडून उत्तम प्रयत्न केला होतास. पण परीक्षेत जंबलींग झाले. याचा अर्थ असा की. तू त्याला फायनल टच दिला नसावा. - म्हणजे परीक्षेत तू हे कसे लिहीशील याचा विचार बहुदा केला नव्हता? मला वाटते की येथे अभ्यासापेक्षा परीक्षार्थी होणे जरुरीचे आहे. जुने पेपर्स आण आणि घड्याळ लाउन घरीच पेपर्स दे! परीक्षेला बसण्याच्या वातावरणाची सवय व्हायला हवी.
पेपर्स चांगले न जाण्याचे एक कारण तुला सापडले आहे ते म्हणजे, तुला परीक्षेत सिनेमाचे डायलॉग आठवत होते!
परीक्षेमध्ये जब वी मेट चे डायलॉग आठवण्यात काही गैर नाही. मलाही नेहमी असे होते - व्हायचे. मॅट्रीकच्या परीक्षेला मला किशोर कुमारचा हाफ टिकट सिनेमा आठवत होता. म्हणजे चक्क स्टार्ट टू एंड डोळ्यासमोर दिसत होता! आपला मेंदू ताण बाजूला ठेऊन रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत असतो. हा त्याचा परिणाम होता. परीक्षेचा ताण असणार - कदाचित तुला जाणवला नाही तरी असेलच!
मग यावर उपाय काय?
एक प्रश्न स्वतःला विचारायचा - माझे मन मला आता नक्की काय सांगते आहे?
जब वी मेट चे डायलॉग हे बाह्य स्वरूप झाले. पण मनाकडून येणारा नक्की मेसेज काय आहे?
मेसेज हा की, " बापरे परीक्षा चालली आहे. मला काही धड आले नाही तर?
मी परीक्षेत नापास झाले तर? एम सी ए पूर्ण झाले नाही तर...? आई ... बाबा? मामा काय म्हणेल...? आज्जी ला काय वाटेल...? माझे कसे होईल?"
म्हणजे मूळ मुद्दा नक्की काय आहे? इन सिक्युरीटी आहे का?
आपले मन आपल्याला काय सांगते आहे हे उलगडून पाहिले तर बरेचदा ताण गायब होतो.
कारण आपण त्या ताणाच्या कारणाच्या मुळाशी पोहोचतो!
आता मी तुला काही मंत्र देणार आहे. मला या मंत्रांचा नेहमीच उपयोग झाला आहे.
- अभ्यास करतांना म्हणायचा मंत्र "मी जे वाचते आहे ते मला परीक्षेत १००% आठवणार आहे"
- परीक्षेला जातांना म्हणायचा मंत्र "मला ही परीक्षा उत्तम जाणार आहे. मला योग्य वेळी सगळे निश्चित आठवेल"
- परीक्षा झाल्यावर म्हणायचा मंत्र " मी माझ्या कडून शक्य ते केले. आता जे होईल ते होईल - स्साला गेला उडत!"
- सगळे पेपर्स पुर्ण झाल्यावर म्हणायचा मंत्र "आता जे होईल ते होईल नापास तर नापास! हु केअर्स? स्साला चोच दिली आहे तर चारा पण देईलच!"
हे फार पावरबाज मंत्र आहेत.
परीक्षेच्या काळात फार मस्त चालतात! त्यातही परीक्षा झाल्यावरचा मंत्र माझा विशेष आवडता आहे!
आता आयुष्य इंटरेस्टींग न वाटण्याबद्दल - तुझे आयुष्य आहे. तुला ते 'इंटरेस्टींग नसलेले आवडते आहे' म्हणून तू तसे ठेवते आहेस.
इंटरेस्टींग आयुष्य तेथेच बाजूला पडलेले आहे. ते घेणेही तुझ्या आहात आहे. फक्त तुला इतकेच म्हणायचे आहे की " हो मजा येतेय! आयुष्य इंटरेस्टींग आहे'
असे संशोधनातून सिद्ध झाले आहे की, आपल्या मेंदूच्या पेशींना आनंदी किंवा दुखी: राहण्याकरता आपल्याला ट्रेन करता येते. तू त्यांना आनंदी राहणे शिकवले तर तू आनंदी राहशील. त्या साठी चक्क कधी कधी मोठ्याने म्हणायचे," मी आनंदी आहे कारण मला तसे हवे आहे" आणि मग तू एंजॉय केलेले आनंदी क्षण आठवायचे! त्यात काही अॅक्शन ची पण जोड दिली पाहिजे. म्हणजे आपल्याला जे आवडते ते करणे.
माझ्या आयुष्यात एक काळ असा वाईट होता की, मला असे क्षणही आठवायचे नाहीत!
नैराश्याच्या काळोखात लपून बसणेच बरे वाटत होते.
कारण त्याचा कामावर रोजच्या जगण्यावर परिणाम व्हायला लागला होता. कशात उत्साह नाही. उत्साह नाही म्हणून काही करणे नाही. काहीच केले नाही म्हणून अजून नैराश्य!
एका भयंकर चक्रात माझे मन आणि आयुष्य अडकून पडल्या सारखे झाले होते.
पण त्यातूनही बाहेर पडणे महत्त्वाचे होते.
बाहेरची मदत काही कामाला येते नव्हती! मला मदत करणारी फक्त एकच व्यक्ती होती. ती म्हणजे मी स्वतः!
या सगळ्याला खरोखर कंटाळून गेलो होतो. शेवटी प्रचंड प्रयत्नांनी मी आनंदी क्षण कोणते ते चक्क लिहायलाच बसलो. करता करता मला बरेच काही आनंदी आठवून गेले. एक दिवस तर बरा गेला. हळूहळू असे आनंदी क्षण आठवण्याची सवय मी स्वतःला लाउन घेतली. अजूनही मला कधी कधी निराश वाटते, बोअर होते पण तो आपल्या आयुष्याचा भागच आहे. असे झाले की मी तडक दोन तास पोहायला जातो!
कंट्रोल
मला टिव्ही पाहणे कंट्रोल करायला जमत नाही असे वाटते. ते जमले नाही म्हणून अजून बोअर होते.
असा एक मुद्दा तू मांडला आहेस.
हे बघ, कोणताही कंट्रोल हा हळूहळू येत असतो.
वर्षानुवर्षे चाललेल्या सवयी अचानक कशा बदलतील?
पण जेव्हा बदलायचा प्रयत्न केला होता आणि त्यात तू यशस्वी झाली होतीस, ते क्षण आठवले पाहिजेत. ते तुझे खरे यश!
ही एक लढाईच आहे. एक एक चकमक करत लढाई जिंकता येते. अनेक चकमकींमध्ये एखादी चकमचक हरलो तरी हरकत नाही. हरलेली बाजूला ठेवून जिंकलो कोणत्या ते पण पाहूया!
तुला वाटते की तू सल्ले निट अंमलात आणू शकत नाहीस.
मी सुचवलेले तू काही निट केले नाहीस असेही म्हणतेस.
पण मला तर असे दिसते की, मी सुचवलेले सगळे काही अगदी झकास पूर्ण केले आहेस. उदा. टायपींग... सहा महिन्यापूर्वी आपली बोलणे झाले, मी तुला सुचवले की, संगणक विषयात काम करायचे असेल तर की बोर्डवर हात बसलेला असणे अत्यावश्यक आहे. कीबोर्ड कडे न पाहता टंकन करता आले पाहिजे, टायपींग शिकून घे. तू तडका-फडकी टायपींग क्लासला नाव घातलेस. सहा महिन्यात तू ३० ची परिक्षा ही दिली - आणि आता तू झकास टायपींग करू शकतेस.
किती महत्त्वाचे कौशल्य तू सहजतेने मिळवले आहेस. मग हे निट केले नाही?
येथे मला एक विचारायचे आहे ते म्हणजे, तू स्वतः कडून फार जास्त मागते आहेस का?
या प्रश्नाचे उत्तर मला नको आहे. मला तू त्यावर विचार करायला हवा आहे.
तू म्हणते की,
> phon वर मला बोलता पण येत नाही यावर .... type केल्यावर बरे वाटले.
> खरंच stupid विचार करते का मी?
यात स्टुपीड वगैरे काही नाही. उलट हे एक मनमोकळे लेखन आहे. याला इंग्रजीमध्ये मोनोलॉग म्हणतात. स्वतःला प्रामाणिकपणे एक्स्प्रेस करता येणे सगळ्यांनाच जमत नाही!
अगं तू ते विचार टाईप करू शकलीस. मनातले विचार तेथेच ते बदलण्याचे बीज पेरले गेले ना? आपल्या विचारांचे विवेचन (अॅनॅलिसीस) करता येणे, ही त्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी असते आणि ती तू यशस्वीपणे गाठली आहेस! ब्राव्हो!
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायामाला सुरुवात कर.
सकाळी उठून फिरायला जात जा. परत आल्यावर १ तास पोहायला जात जा.
दोन्ही गोष्टी घराजवळ आहेत!
बघ काही फरक पडतो का विचारात ते!
----
असा सल्ला मी तिला दिला आहे.
पण तुम्हाला यात अजून काही भर घालावीशी वाटते आहे का?
या वयातले तुमचे अनुभव कसे होते?
कधी निराश वाटले का?
आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यावर आलेल्या अपयशावर आणि नैराश्यावर तुम्ही कशी मात केली?
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 7:41 am | १.५ शहाणा
तु झे पत्र मला खुप आवड्ले
6 Dec 2010 - 8:29 am | kalyani B
१-२ दिवसात माझीही परिक्षा सुरु होतेय.
तेव्हा तुमचा सल्ल्याबद्दल धन्यवाद.......
6 Dec 2010 - 8:44 am | मदनबाण
नैराश्य / फस्ट्रेशन कोणाला येत नाही ? पण त्यावर तुम्हालाच मात करावी लागते...
आयुष्य हीच सर्वात मोठी परिक्षा असुन तुम्हाला त्यात अनेक पेपर देत रहावेच लागतात्...त्यामुळे त्यापुढे इतर सर्व परिक्षा म्हणजे किस झाड की पत्ती ?
मनरुपी घोड्याचा लगाम हा कायम स्व हस्तातच असावा, घोडा उधळला तर त्याचा परिणाम होणारच !!! तेव्हा सतत लगाम व्यवस्थीत ठेवण्याकडे ल़क्ष द्यावे...
बदल हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे,त्यामुळे अपयश जरी आले तरी कधी यश मिळणारच नाही अशी मनाची कधीच समजुत करुन घेउ नये... जितक्यावेळा मी पडीन तितक्याच वेळा मी त्वेशाने उठुन उभा राहीन, पण खचणार नाही हे स्वतःशी पक्के करुन ठेवावे.
जाताजाता :--- हे जग जर युद्धभुमी असेल तर तुम्ही योद्धा म्हणुनच जगायला शिकले पाहिजे.
6 Dec 2010 - 3:45 pm | विजुभाऊ
जाताजाता :--- हे जग जर युद्धभुमी असेल तर तुम्ही योद्धा म्हणुनच जगायला शिकले पाहिजे.
जग जर गुत्ता असेल तर ?
अर्र टायपो मिष्टेक झाली
जग जर गुंता असेल तर?
6 Dec 2010 - 3:54 pm | मदनबाण
जग जर गुंता असेल तर?
तर त्या गुंत्यात आपली "भर" घालु नये... ;)
6 Dec 2010 - 8:50 am | शिल्पा ब
पत्र आवडले.
अवांतर: मला आधी वाटले शुचीचाच धागा आहे कि काय ;)
6 Dec 2010 - 10:45 am | लॉरी टांगटूंगकर
उपयोग होईल;९ पासून परिक्षा आहे.माझे ५ युनिट राहिलेत पूर्ण करायचे!!!
6 Dec 2010 - 10:52 am | डिजेबॉय
छान पत्र आहे.. :)
6 Dec 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
पंतांनु पत्र एकदम झ्याक हो :)
अनेक मिपाकरांना ह्या कानमंत्रांचा नक्कीच फायदा होईल.
आपला तर एक एकदम साधा फंडा आहे बघा, 'प्रत्येक वार हा रविवार.'
6 Dec 2010 - 12:56 pm | शिल्पा ब
<<आपला तर एक एकदम साधा फंडा आहे बघा, 'प्रत्येक वार हा रविवार.'
नोकरी नसल्याने जमतंय
6 Dec 2010 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार
असं करा ह्यावेळी तुम्ही इनो जेलोसील मधुनच घ्या.
6 Dec 2010 - 2:00 pm | शिल्पा ब
ते आणि कशाला? आम्हीसुद्धा नाहीच करत नोकरी..आता त्यासाठी परवानगी नाही हि गोष्ट वेगळी...पण म्हणून काय झालं?
6 Dec 2010 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार
अरे रे ! काय हे परावलंबी जिवन...
असो.. सहानभुती आहे.
6 Dec 2010 - 4:48 pm | टारझन
चालु दे रे तुझे चिकटगुंड्या :) ;)
- टारझन
टारावलंबी जिवन जगा , सहानुभुतीपासुन मुक्ती मिळवा
7 Dec 2010 - 11:28 am | शिल्पा ब
तुम्ही कोण सहानुभुती देणारे?
6 Dec 2010 - 6:02 pm | कुंदन
मराठी माणुस नोकरी न कर्ता व्यवसाय-धंदा करतोय हे कौतुकास्प्द आहे.
त्याला प्रोत्साहन द्यायचे सोडुन तुम्ही त्याचे खच्चीकरण करताय.
पर्या : काही भांडवल लागले तर सांग रे. ;-)
7 Dec 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
लागणार आहे. पण भांडवल दिल्यावर तु दर महिनाअखेरीला फोन करणार नाहीस ना ?
@ टार्या
काय रे वनमानवा ? टारावलंबी जिवन म्हणजे घरचे रेशन एका दिवसात संपायला सुरुवात.
7 Dec 2010 - 11:35 am | टारझन
ऐ .. आता डाएटिंग सुरु केलंय .. बोलायचं काम नाय ... आता रेशन दोन दिवस आरामात जातो.
8 Dec 2010 - 3:38 am | गुंडोपंत
तू काय रिटायरमेंटला आला आहे का?
माझे काही पेंन्शनीत निघालेले मित्र प्रत्येक वार हा रविवार असे म्हणायचे.
तू का म्हणतो?
आणि तू जर स्वतः व्यवसाय करतो आहेस तर तुला तर वर्षभरात रविवार आणि सुट्टी दिसताच कामा नये!
तुझे पुढच्या महिन्याचे व्यवसायाचे टारगेट काय आहे रे?
नसल्यास ठरव! असल्यास त्यात १०% वाढव आणि ते कसे साध्य करायचे त्याचा विचार कर.
दोन वर्षात व्यवसाय दुप्पट होईल याच्यासाठी तुझा प्लान काय आहे?
उगा टाईमपास करू नकोस - आम्ही तुझ्या बोलण्यावर हॅ हॅ हॅ करून विसरून जाऊ.
तू मात्र तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ घालवून बसशील.
असो,
तुला भरघोस यश मिळो आणि ते मिळाल्यावर तू आम्हा म्हातार्यांना (तो वर असलोच तर) ब्लॅक लेबल पाजो हीच सदिच्छा!
6 Dec 2010 - 12:31 pm | नितिन थत्ते
एकदम आवडले.
Falling down is not a crime, not trying to up afterward is crime.
6 Dec 2010 - 1:41 pm | अवलिया
+१
सुरेख !
7 Dec 2010 - 8:49 pm | शाहरुख
आवडले हो पंत !
आम्ही स्वतःला नेहमी "लाईफ इज डिफिकल्ट ? कंपेअर्ड टू व्हॉट ?? " या ओळीने धीर देत असतो.
6 Dec 2010 - 2:24 pm | बद्दु
अतिशय छान.
आम्ही मास्टर्स करत असतांना पेपर सोडवुन आलो की ( होस्टेलच्या) बिछान्यावर उड्या मारायचो आणि Relax Relax असे ओरडत खुप हासायचो..आश्चर्य म्हणजे आम्ही खरोखरच Relax व्हायचो. दुसरं म्हणजे अभ्यास करतांना परीक्षा झाल्यावर काय काय करायचं याची स्वप्न रंगवायचो त्यामुळे परीक्षेचा उत्साह टिकुन राहायचा. एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे "भरकटायचं नाही" अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे पक्क माहित असायचं आणि त्यासाठी एकमेकांना आधार द्यायचा त्यामुळे एखादा पेपर "घुसला" तरी उमेद शिल्लक राहायची. अभ्यास करतांना स्वतः वर विश्वास ठेवायचा आणि अभ्यास झाला की देवावर्..सगळं जमुन येतं बघा...
सल्ले खुप आहेत पण भारंभार सल्ले नको नाहीतर गोंधळायला होतं, परीक्षेचा बाउ नको ( मी १० वि पर्यंत Half- pant मध्ये शाळेत गेलो आणि १० वि च्या परीक्षेला सेंटर दुसर्याठिकाणी असल्यामुळे Full- pant मध्ये जावे लागणार म्हणुन आदल्या दिवशी जाउन एक जाडा-भरडा Full- pant घेउन आलो. तो नवा pant दुसर्या दिवशी तसाच घालुन गेलो. परीक्षा सुरु झाली आणि आमच्या नविन pant ने रंग दाखविणे सुरु केले. पुर्ण वेळ मी आपले दोन्ही पाय खाजवित होतो. परीक्षक एक दोनदा माझ्याजवळ येउन बघुन गेले ( त्यांना बहुतेक माझ्या जवळ भलतंच काही तरी असेल असे वाटले असावे)..तर असा माझा १०वि च्या बोर्डाचा पहिला पेपर.. सांगायचा मुद्दा असा की परीक्षेचा बाउ करु नये..(कारण इतकं होउनही मी उत्तम गुणांनी पास झालो...)
असो
शुभेच्छा..
6 Dec 2010 - 3:52 pm | स्पंदना
आवडल तुमच पत्र अन उहापोह! निदान तिला तुमच्या कडे वळायला मन मोकळ करायलाजागा आहे , बरेच जण आतल्या आत कुढत कसाबसा सामना करत रहातात.
6 Dec 2010 - 5:00 pm | सूर्यपुत्र
स्साले कुठेही, कधीही, कसेही आणि नेमके नको त्या वेळेसच का आठवतात, कोण जाणे... आम्हाला नेमके विपश्यना शिबीरात ध्यानाला बसलो, की आठवतात. जाम पंचाईत होते, नीट हसतां पण येत नाही...
6 Dec 2010 - 9:18 pm | शुचि
माफक प्रमाणात नियमित व्यायाम
उत्साही आणि सकारात्मक मित्र मैत्रिणी जोडणे
नको वाटणार्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देणे
सेल्फ्हेल्प पुस्तकांचा खुराक
7 Dec 2010 - 5:04 am | गुंडोपंत
kalyani B आणि मन्द्या all the best! परिक्षा उत्तम जाऊ दे!
मदनबाणा अजून भर घातल्या बद्दल धन्यवाद!
डिजेबॉय, परिकथेतील राजकुमार, नितिन थत्ते, अवलिया, शिल्पा ब
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद पण तुमचेही अनुभव वाचायला आवडतील.
शुचि - नेमके उपाय सांगितले आहेत, आवडले.
ध्येयहीन , बद्दु सही किस्सा! :)
aparna akshay - खरे आहे! बोलायला कुणीतरी विश्वासाचे असणे फार महत्त्वाचे असते. शिवाय मानसिकता समजून नेमका सल्लाही मिळणे गरजेचे असते. कधी कधी तर फक्त कुणीतरी आपले ऐकावे इतकीच अपेक्षा असते. पण दर वेळी असे कुणी मिळतेच असे नाही. अशावेळी सायकॉलॉजीस्ट हा उत्तम उपाय असतो. याला मी भाड्याचा मित्र/मैत्रिण म्हणतो. :)
प्रसंगी कुणी तरी बोलायला हवे - ते महत्त्वाचे!
7 Dec 2010 - 7:18 pm | सूर्यपुत्र
याला मी भाड्याचा मित्र/मैत्रिण म्हणतो.. ;)
9 Dec 2010 - 4:00 am | गुंडोपंत
भाड्याचा मित्र किंवा भाड्याची मैत्रीण यात काय वाईट आहे? मला समजले नाही...
मित्र किंवा मैत्रीण यांनी आपल्या हीताचा सल्ला देणे अपेक्षित असते. प्रसंगी सल्ला कडू किंवा त्या क्षणी आपल्याला न पटणारा असेल तरी त्यांनी तो दिला पाहिजे. या शिवाय मानसिक आधारही मित्र/मैत्रीण देतात.
हेच कार्य मानसोपचार तज्ञ करत असतो.
वेळेवर आणि नेमका सल्ला तज्ञ देतो. हा सल्ला त्यातल्या त्यात समतोल मिळण्याची शक्यता मानसोपचार तज्ञाकडे जाण्याने मिळते. कदाचित काही प्रसंगी मित्र/मैत्रीण हे करू शकत नाहीत. त्या तज्ज्ञाला आपण पैसे देतो, म्हणजे ते, काही काळ भाडे देऊन घेतलेले आपले मित्रच असतात. म्हणून मी त्यांना भाड्याचे मित्र/मैत्रीण म्हणालो.
मानसोपचार तज्ञाकडे जातांना एखादा तज्ञ पटला नाही तर अजून ठिकाणे जाऊन पाहायला काही हरकत नाही, असे माझे मत आहे. पण नंतर शक्यतो एका कडेच आपले खाते असावे. यामुळे आपल्या वागणूकीचा आणि दिलेल्या सल्ल्यांचा इतिहास तज्ज्ञाला माहितीचा असतो. पुढील सल्ल्यांसाठी त्याचा उपयोग होतो.
8 Dec 2010 - 3:52 am | धनंजय
पत्र आवडले.
पत्राचे उत्तर आले असेल, किंवा दीप्तीने तोंडी उत्तर सांगितले असेल, तर त्याबद्दलही जरूर सांगा.