अनादिसिद्ध हें आघवें ... होत जात स्वभावें ...

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
1 Dec 2010 - 12:06 pm

कधी कधी रिकामा वेळ सापडतो. सर्व कामं आटोपलेली असतात. पुढली कामं अवकाशाने केली तरी चालणार असतात. मस्त निवांत वेळ असतो. अशा वेळेस बसल्या बसल्या कधी एखादे गाणे गुणगुणतो, रेडीओ, सीडीप्लेअर लावतो अथवा टिव्ही लावतो. पण कधी कधी त्याचा कंटाळा येतो. मग उगाच टिवल्या बावल्या करण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचत बसतो. हे तर झाले नेहमीचे. पुस्तकातही सतत डोके घालुन वाचण्याचा कंटाळा आला की एखादे जुनेच वाचलेले पुस्तक मधुन मधुन पानं उघडत नजर टाकत, त्यातल्या एखाद्या वाक्यावर विचार करत बसणे हा माझा आवडता उद्योग. असंच एक पुस्तक उघडलं आणि त्यातल्या एका वाक्यावर नजर पडली.

अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥

बघता बघता मन विचारांच्या गर्तेत कसे गेले ते समजलेच नाही. हे जग कसे झाले, मी कोण आहे, कशाकरता हा पसारा आहे हे खरं तर सनातन प्रश्न. प्रत्येकालाच पडतात असं नाही. ज्यांना पडतात त्यांना त्याची उत्तरं मिळतातच असं नाही. ज्यांना मिळाली त्यांनी इतरांना सांगितली ती भावतात असं नाही. पण समजतच नाही असंही नाही. हे प्रत्येकाचे दैवच आहे असं म्हटलं तरी चालेल. किती तरी वेगळे विचार एकाच दिशेने जातात असं वाटतं पण ती दिशा दिसतेच असं नाही. जरा स्पष्ट झालं असं वाटतं तोच अंधारुन येतं. अंधारात खोल खोल जाणार असं वाटतं तोच चांदणं पडतं. समजत नाही हेच खरं.

ते सांगतात दा़खले मिळतात त्याच्या अस्तित्वाचे, देहधारी रुपाचे. कशावरुन म्हटले तर म्हणतात आमच्या गुरुंनी सांगितले. ते कसे खोटे असेल? खरं आहे. गुरु मार्गदर्शक असतो. चुकीचा मार्ग दाखवणार नाही पण मला भावत नाही त्यांचा विचार. विचार करतो तो देहधारी कसा दिसेल? मानवासारखा हात, पाय, तोंड असलेला पण उच्च कोटीची ताकद, बुद्धी असलेला असेल. असु शकेल. का पशुरुपी परंतु मानवी भावभावनांनी बनलेला अशा पद्धतीचा असेल. होय तसाही असु शकेल. देव झाला तरी माणसाच्याच रुपाचा असला पाहिजे हे थोडेच आहे? का शक्तिरुपी असेल? पृथ्वीवरील जीवनाचा प्रेरक आहे त्याची पूजा करा ते सांगतात. पण मला दिसत नाही तो त्याचे काय? मी विचार करतो.

मी घाबरतो. त्यांना दिसतो मग मला का दिसत नाही. मी आधार शोधतो. कुणी सांगतं अमुक अमुक महान तपस्वी आहेत ते तुला सांगतील काय ते. मी त्यांच्याकडे जातो. सांगा म्हणुन लकडा लावतो. माझे मनातले प्रश्न जणु त्यांना ठाऊक असतात पण त्यांची भाषा मला कळत नाही. ते अनेक सिद्धांत सांगतात. सर्परज्जु, शुक्तिरुपे इत्यादी काहीबाहीबोलतात. म्हणतात ईश्वरी अधिष्ठान शरीर विरहीत असल्याने ते प्रेरक होवु शकत नाही. कारण व्यवहारात तशी प्रचिती येत नाही. राष्ट्राचे नियामक असलेला राजा (वा प्रतिनिधी) हा शरीर रुपातच असतो. शरीरविरहीत राजा असुच शकत नाही. त्यामुळे ईश्वर मानणा-याला ईश्वराचे इंद्रियाधारभुत शरीर मानावे लागते. पण असे शरीर मानता येते का ? तर नाही मानता येत. कारण उघड आहे, प्रथम सृष्टी नंतर शरीर असाच क्रम आहे. म्हणजेच सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी शरीराचे अस्तित्व शक्य नाही. म्हणजेच ईश्वराला शरीर नाही त्यामुळे तो प्रेरक होणे शक्य नाही. व्यवहारात सुद्धा असाच अनुभव येतो. ते उलगडुन सांगतात.

मला काही म्हणता काही कळत नाही. त्यांना धीर धरुन विचारतो पण तो स्वेच्छाधारी असेल तर. ते हसतात आणि म्हणतात आता जर असे म्हटले की ईश्वराला स्वेच्छेने शरीर धारण करता येते तर तसे मानता येणार नाही. कारण सरळ आहे ते असे की असे मानल्यास ईश्वर इंद्रियाद्वारे भोग भोगतो असे मानावे लागेल. असे मानल्यास त्याच्या ईश्वरतत्वाची संगती लागत नाही, कारण ईश्वर भोग भोगतो असे मानल्यास त्याचे ईश्वरतत्व नाकारले जाते. नाकारावेच लागते.

मला घाम फुटतो. तर्काचा प्रांत आपला नव्हे. मी आपला शांत बसुन रहातो. शुन्यात नजर टाकुन बसतो. तिकडुन एक जण येतो. सगळं जग क्षणिक, भ्रांती आहे, शून्य आहे सांगतो. मी आपली मान डोलावतो. तोच मागचा तपस्वी पुढे येत म्हणतो पण शुन्याच्या साक्षीची गरज आहेच ना? क्षणिक भ्रांतीला अधिष्टान हवेच ना? ते कोठुन आणणार? त्या दोघांना सोडून मी चालत जातो. दुरुन एक स्वर ऐकु येतो. मधुर. आश्वासक. अगदी आतुन आल्यासारखा.

मी जवळ जातो. त्याच्या समोर बसतो. माझी तगमग त्याला आधीच कळली असावी. डोक्यावरुन हात फिरवतो. तो आश्वासक स्पर्श मिळतो. किती तरी दिवसांपुर्वी आई असाच हात फिरवायची. कधी घाबरलो, धडपडलो की आई असाच हात फिरवुन मला जवळ घ्यायची. सर्व जगातली दु:ख त्याच क्षणी मिटुन जायची. मी शांतपणे डोळे मिटुन घेतो. कानावर हलके हलके शब्द पडत असतात. मनातली किल्मिषं शंका सगळ्या दुर होत आहेत असं वाटतं. उरलेल्या शंका आता पटकन मिटतील असं वाटतं. तृप्त होत मी डोळे उघडतो. समोर कुणी नसतं असतं ते मगाचच पान आणि डोळे खिळलेले त्याच वाक्यावर

अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥

हे सर्व अनादी (प्रारंभ नसलेले ) जग आपल्या स्वभावाने उत्पन्न होत आहे, व नाश पावत आहे, तर सांग तुला येथे शोक करण्यासारखे काय आहे ?

माझे डोळे भरुन येतात. समोरचं धुसर व्हायला लागतं पण त्यातुन काही प्रतिमा दिसायला लागतात. मी डोळे फाडुन फाडुन बघण्याचा प्रयत्न करतो. तीच मगाचीच आश्वासक आकृती दिसते. काही तरी बोलत असते मी कानात प्राण आणुन ऐकतो. शब्द बासरी सारखे मधुर निनाद करत कानातुन हृदयापर्यंत जातात. समोर बसलेले शांत पणे पहात असतात. त्यांच्या डोळ्यातुन अखंड अश्रु धावत असतात. मला समजत नाही. मी शांतपणे पहात बसतो. हळुच तो उठतो. उठुन एकवार सर्व लोकांकडे पाहुन मान लववुन नमस्कार करतो आणि शांतपणे मागे न पहाता चालु लागतो. सगळे पाषाणासारखे स्तब्ध होत त्याच्या कडे पहात असतात. दोघं चौघं त्याच्या मागोमाग चालु लागतात. तो पुढे जातो. एका विवरापाशी येतो. शांतपणे आत पाउल टाकतो. मागे आलेले चारजण बाजुचा मोठा दगड शांतपणे त्या विवराच्या तोंडाशी ठेवतात. आणि मागे फिरतात. सर्वजण स्वतःशीच विचार करत डोळ्यातल्या पाण्याला वाट देत हळुवार स्वरात आक्रंदत असतात.

माझ्या डोळ्यातले पाणी सरकन गालावर येते. खोल श्वास घेत मी फक्र एक उसासा टाकतो आणि हलक्या स्वरात विठ्ठल विठ्ठल नाम घ्यायला लागतो. हळु हळु मनातल्या भावना स्थिर होतात. हलकेच डोळे पुसुन मी हातातले पुस्तक मिटतो. समोर नजर टाकतो विठ्ठलाच्या फोटोशेजारी तीच आश्वासक मुर्ती दिसते.

आई ज्या मायेने आपल्या लेकराला हात धरुन अ आ इ ई शिकवते, चुकले तरी संभाळुन घेते, मायेचा पदर देते त्याच मायेने आर्त मनाला निवारा देणारा, आश्वासक शब्दांत मर्म उलगडुन सांगणारा तो तत्वज्ञ.

पुरुष असुनही सारं जग त्याला माउली असंच म्हणते.

ज्ञानेश्वर माउली !

मी उभा राहतो. हातात टाळ घेतो आणि विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणत ताल धरुन नाचायला लागतो. मन अगदी प्रसन्न होतं. सगळ्या विवंचना, काळज्या कुठे जातात ते कळत नाही. कुणी माझ्याबरोबर ताल धरत नाचु लागतं तर कुणी खि खि करुन खिल्ली उडवत बाजुने निघुन जातं. खिल्ली उडवली तरी मला फरक पडत नाही. कारण मला ते अडवु शकत नाहीत. तेच काय, प्रत्यक्ष सत् चित् आनंदाचे सगुण रुप असलेला, कमरेवर हात ठेवुन उभा असलेला तो विठ्ठल, त्याच्यात सुद्धा मला अडवण्याची ताकद नाही. रहा उभा मुकाट्याने माझं भजन संपेस्तोवर.

सर्व प्राणिमात्रांच्या, मनुष्यांच्या रुपाने एक चिद्रुपाने असलेला मी अनंत काळ होतो आणि अनंत काळ असेल. माझं भजन इतक्या सहजा सहजी आणि इतक्या लवकर संपणार नाही. वेगवेगळ्या रुपाने मीच भजन करत राहिल आणि तो पर्यंत तो विठ्ठ्ल तसाच उभा राहिल.. युगानुयुगे!

*
कार्तिक वद्य त्रयोदशी ३ डिसेंबर ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधि दिवस. आज पासुन आळंदी येथे तीन दिवस उत्सव असतो.

ज्ञानेश्वर माउलींना शतशः प्रणाम.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2010 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुंदर नानबा :)
ओघवत्या शैलीत लिहिलेले संपुर्ण लेखन काळजापासुन आल्याचे जाणवते. सुरेख !

ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर ।।

गांधीवादी's picture

1 Dec 2010 - 12:18 pm | गांधीवादी

>>प्रत्यक्ष सत् चित् आनंदाचे सगुण रुप असलेला, कमरेवर हात ठेवुन उभा असलेला तो विठ्ठल, त्याच्यात सुद्धा मला अडवण्याची ताकद नाही. रहा उभा मुकाट्याने माझं भजन संपेस्तोवर.
भक्ताने भक्तीची परिसीमा गाठल्यावर देव सुद्धा त्या भक्तीत न्हाऊन निघायला आतुर होतो. आणि त्यानंतर देवावर अधिकार राहतो तो केवळ भक्ताचाच !

प्रथम (शरीर रुपात असलेल्या) भक्तांना प्रणाम.

ज्ञानेश्वर माउलींना शतशः प्रणाम.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!

आळश्यांचा राजा's picture

1 Dec 2010 - 12:18 pm | आळश्यांचा राजा

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!

छोटा डॉन's picture

1 Dec 2010 - 12:20 pm | छोटा डॉन

नेहमीप्रमाणे क्लासिक रे नाना.
ऊत्तम लेख एवढेच म्हणु शकतो, बाकी भाष्य करण्याइतका अधिकार नाही

- छोटा डॉन

अरुपाचे रुप दाखवणार्‍या बापकवीला वंदन.
आणि विठोबा तर काय , तो जो काय या मराठी वंशवृक्षाच्या पारंबीला चिकटला आहे , तो काय सोडायचं नाव घेत नाही.

अवलियासाहेब , धन्यवाद.

नगरीनिरंजन's picture

1 Dec 2010 - 12:26 pm | नगरीनिरंजन

अत्यंत भावुक आणि रोमांचक असं लिहीलं आहेत!
ज्ञानेश्वर माउलींना शतशः प्रणाम हेच म्हणतो आणि त्यांना यथोचित आदरांजली वाहणार्‍या तुमच्या भावाकुल शब्दांनाही सादर धन्यवाद!

धमाल मुलगा's picture

1 Dec 2010 - 6:47 pm | धमाल मुलगा

ज्ञानेश्वर माऊली....ज्ञानराज माऊली.....

स्पंदना's picture

1 Dec 2010 - 12:49 pm | स्पंदना

ज्ञानोबा माउली तुकाराम ! ज्ञानोबा माउली तुकाराम !
ज्ञानोबा माउली तुकाराम ! ज्ञानोबा माउली तुकाराम !

धन्य धन्य अवलियाजी !! अस लिहिल आहे तुम्ही , अन पारम्पारिक भावनेचा अधिकार वापरुन 'माझ भजन होइतो उभा रहा गप विटेवर ' तर काटा आणुन गेल अंगावर.

कवितानागेश's picture

1 Dec 2010 - 1:13 pm | कवितानागेश

माऊलीचे 'माऊलीपण' त्यांच्या प्रत्येक ओवीतून जाणवते.

यशोधरा's picture

1 Dec 2010 - 1:41 pm | यशोधरा

सुरेख!

sneharani's picture

1 Dec 2010 - 2:36 pm | sneharani

अप्रतिम लिहलं आहे.
सुरेख!!

Dhananjay Borgaonkar's picture

1 Dec 2010 - 2:53 pm | Dhananjay Borgaonkar

नानबा...साष्टांग नमस्कार :)
केवळ अप्रतिम :)
काहीच बोलवत नाही पुढे.

मेघवेडा's picture

1 Dec 2010 - 2:56 pm | मेघवेडा

सुरेख लिहिलंयस रे नानबा!

यकु's picture

1 Dec 2010 - 3:41 pm | यकु

अवलियांच्या या सुंदर प्रकटनाबद्दल
बाबामहाराज सातारकर यांच्या आवाजातील हा
हरिपाठ सप्रेम भेट!

गणपा's picture

1 Dec 2010 - 4:17 pm | गणपा

नेहमी प्रमाणेच उत्तम अवलियाशेठ.
(नाना/नानबा संबोधुन उगाच सलगी करण्याचा प्रयत्न मुद्दाम टाळला आहे हे चाणाक्ष नानाच्या चुकलं अवलियाच्या नजरेत आलं असेलच.) ;)

अविनाशकुलकर्णी's picture

1 Dec 2010 - 5:03 pm | अविनाशकुलकर्णी

अप्रतिम लेखन...ओघवती व रसाळ शैली..

मूकवाचक's picture

1 Dec 2010 - 5:11 pm | मूकवाचक

एक प्रश्नः
"ईश्वराला स्वेच्छेने शरीर धारण करता येते तर तसे मानता येणार नाही"
मग "सम्भवामी युगे युगे" चा अर्थ काय लावाल?

अमोल केळकर's picture

1 Dec 2010 - 5:35 pm | अमोल केळकर

खुप छान

अमोल केळकर

शुचि's picture

1 Dec 2010 - 6:38 pm | शुचि

सुंदर

पैसा's picture

1 Dec 2010 - 7:26 pm | पैसा

अवलिया, एखाद्या अवलियासारखं रसाळ आणि ओघवतं लिखाण. विषयच इतका सुंदर आहे, आणि त्यात तुम्ही "एकदम जमके" लिहिलंय! खूप आवडलं.

सर्रकन काटा आला अंगावर! अतिशय सुरेख !
काय बोलू कळत नाहीये...

जो जे वांछील तो ते लाहो.. प्राणिजात!!

आमोद शिंदे's picture

1 Dec 2010 - 8:39 pm | आमोद शिंदे

कधी कधी रिकामा वेळ सापडतो. सर्व कामं आटोपलेली असतात. पुढली कामं अवकाशाने केली तरी चालणार असतात. मस्त निवांत वेळ असतो. अशा वेळेस बसल्या बसल्या कधी एखादे गाणे गुणगुणतो, रेडीओ, सीडीप्लेअर लावतो अथवा टिव्ही लावतो. पण कधी कधी त्याचा कंटाळा येतो. मग उगाच टिवल्या बावल्या >>

अरे नाना मग आंतरजालावरील काड्या सारणे हा उद्योग कधि करतोस?

लवंगी's picture

2 Dec 2010 - 1:30 am | लवंगी

रिकाम्या वेळी पुस्तकातल्या एखाद्या वाक्यावर विचार करत बसण्याचा उद्योग चालू ठेव नाना.. एका वाक्यातून चालू झालेली तुझी विचारांची साखळी आम्हाला इतक सुरेख वाचायला देतेय ... आणी प्रत्येक वाचकाच्या मनात अश्याच अनंत साखळ्या गुंफल्या गेल्या असतील हा लेख वाचताना. नानाला नेहेमी असाच रिकामा वेळ दे रे देवा..

गोनिदांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथेतली ईश्वराच्या शोधासाठी चित्तशुदधीची धडपड आठवली हे वाचताना.. ज्ञानेश्वरांवर अजून वाचायला आवडेल.. लेखमालेची वाट पहातेय..

नाना,
रिकाम्या वेळात हे इतके उद्योग? वाचन, चिंतन वगैरे? तुझे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणे आहेत ही सगळी!
(तंदुरुस्त)बेसनलाडू

असो. छान लिहिलंयस. ओघवते झाले आहे.
(वाचक)बेसनलाडू

नंदू's picture

2 Dec 2010 - 5:50 am | नंदू

अप्रतिम...
शब्द संपले....

असुर's picture

2 Dec 2010 - 4:00 pm | असुर

केवळ सुरेख!

दासबोधात एक श्लोक आहे -
मुख्य उपासनालक्षण| नाना कवित्वलक्षण|
नाना चातुर्यलक्षण| बोलिले असे||

यातल्या 'नाना' या शब्दाचा श्लेष करुनही या ओळी खर्‍या वाटाव्यात इतके रसाळ लिहीले आहे.

आजवर पहिल्यांदाच क्रमश: नसल्याचं वाईट वाटलंय!
नाना, यातूनच एक वाचनमाला करून ती क्रमश: करावी ही विनंती!

--असुर

यशोधरा's picture

2 Dec 2010 - 4:08 pm | यशोधरा

सहमत आहे

राघव's picture

2 Dec 2010 - 6:47 pm | राघव

खूप सुंदर लिहिलंय रे नानबा!
मस्त! येऊ देत अजून!! :)

नंदन's picture

2 Dec 2010 - 5:58 pm | नंदन

छान लेख. अजून एक सभासद 'माळिये जेउते नेले। तेउते निवांतचि गेले। तया पाणिया ऐसे केले। होआवे गा' बद्दल लिहिणार होते, त्याची वाट पाहतो आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2010 - 3:27 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे वा!! वाट बघतोय मी पण. ;)

विलासराव's picture

2 Dec 2010 - 11:07 pm | विलासराव

छान प्रकटन.
बरेच जण म्हणताहेत तसं मलाही वाटतय की आपण माउलींवर लेखमाला लिहावीच.

रामदास's picture

2 Dec 2010 - 11:15 pm | रामदास

काय तारा जुळून आल्यात आज.

श्रावण मोडक's picture

2 Dec 2010 - 11:25 pm | श्रावण मोडक

हे असे लिहित रहा. आवर्जून वाचेन. ­आ­णि इतर काही उद्योगांना क्षम्य ठरवणे सोपे जाईल.

वारकरि रशियात's picture

3 Dec 2010 - 2:37 pm | वारकरि रशियात

खूप छान, ओघवते, प्रासादिक !
प्रसन्न वाटले. धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2010 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर!

श्रामो --> +१

स्वानन्द's picture

3 Dec 2010 - 4:26 pm | स्वानन्द

वा! अतीशय ओघवत्या शैलीत लिहीलं आहे. मस्तच.

उपास's picture

3 Dec 2010 - 7:52 pm | उपास

अजि मी ब्रह्म पाहिले.. नाना खूप गोड लिहिलेयस रे.. सुखावलो आतून!

स्वाती२'s picture

3 Dec 2010 - 7:54 pm | स्वाती२

सुरेख!

दिपक's picture

4 Dec 2010 - 4:31 pm | दिपक

ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!!!

अवलिया's picture

6 Dec 2010 - 7:10 pm | अवलिया

सर्व मायबाप वाचक, प्रतिसादकांचा आभारी आहे.

विंजिनेर's picture

6 Dec 2010 - 7:48 pm | विंजिनेर

सुंदर निरूपण. कधी कधी असे ओघवते शब्द नुसतेच अंगावरून वाहू देण्यात आनंद असतो. नंतर सावकाश त्या आनंदाचं विश्लेषण करता येतं :)
बाकी उगीचच गोनीदांच्या शैलीची आठवण झाली.