गावित मास्तर

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
24 May 2008 - 8:59 am

"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते...
"होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं"
"आणि तुझं संपादकीय?"
"ते सुद्धा पुरं होत आलंय"
"बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?"
"गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी
"तुला वाटतं तो चित्र काढून देईल?"
"विचारायला तर काय हरकत आहे"
"असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो साक्षात!!"

मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले,

"तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग! मी विचारायला सांगितलं होतं म्हणुन सांग"

मी मान डोलावली. आता गावित मास्तरांशी कसं आणि काय बोलायचं याचा मनाशीच विचार करू लागलो...

माझ्या शालेय जीवनात मला अनेक शिक्षक मिळाले. काही चांगले काही वाईट! गावित मास्तर त्यातीलच एक! ते काही गणित, विज्ञान, इतिहास वा भूगोल शिकवणारे मास्तर नव्हते. किंबहुना आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी व्यवस्थित न येणारे ते एकमात्र शिक्षक असावेत. त्यांचा मुख्य विषय चित्रकला! जोडीला ते आमच्या पीटीच्या शिक्षकांनाही मदत करीत. कदाचित नुसती चित्रकला शिकवून त्यांचे कामाचे तास पूर्ण भरत नसावेत म्हणून त्यांच्यावर आणखी पीटी शिकवण्याची सक्ती असावी. आमची शाळा दोन सत्रात होती तेंव्हा एका सत्राला गावित मास्तर आणि दुसर्‍या सत्राला घाटगे नांवाच्या एक मॅडम होत्या. होय, मॅडमच!! त्यांना शिक्षिका म्हटलेले मुळीच आवडायचे नाही. त्या नोकरी तरी कशासाठी करत होत्या देव जाणे. त्यांचे पती गावातील अत्यंत यशस्वी डॉक्टर होते. स्वत:ची गाडी सोडायला आणि न्यायला येणार्‍या आमच्या शाळेतील या एकमेव व्यक्ती!! एरवी आमचे प्रिन्सिपलसुद्धा रेल्वे स्टेशनवर उतरले की वन्-टू, वन्-टू करत चालत यायचे आणि जायचे!!

गावित मास्तर मात्र पीटी शिकवत असले तरी त्यांचा जीव त्यात रमत नसे. त्यांची आवड म्हणजे चित्रकला. ते चित्रे फारच सफाईने काढत. पण भलतेच कडक!त्यांना डोक्यात राख घालून घ्यायला वेळ लागत नसे. एकदा मला चांगले आठवते. कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या. आता सातवीतली मुलं आम्ही, त्यातही मुंबईतच जन्मलेली आणि वाढलेली! आम्हाला अजिंठा-वेरूळला लेणी आहेत हे ऐकून माहित होते पण कुठे नक्की काय आहे ते कुठे आठवत होते? माझी तर त्याकाळी समजूत मराठवाडा म्हणजे शिवाजीचा कुठलातरी बंगला असावा अशीच होती!! शिवाजीमुळेच मराठे या शब्दाचा परिचय होता आणि वाडा म्हणजे मोठा बंगला हे माहिती होतं!! जसा लालमहाल, तसा मराठवाडा!!! आता वाटतं की नशीब माझं की मी हे त्यावेळी कुठे बोलून दाखवलं नाही. नाहीतर साफ पिटला गेलो असतो.....

मी आता दहावीत असलो तरी हा पूर्वीचा प्रसंग आठवून जरा काळजीतच होतो. हळूच टिचर्स-रूममध्ये गेलो. गावित मास्तर एका कोपर्‍यात बसले होते, पेपर वाचत होते. पाच सव्वापाच फूट उंची, काळा वर्ण, आणि अत्यंत किडकिडीत शरिरयष्टी! मुलांना मारायला इतका जोर त्यांच्या अंगात कुठून यायचा देव जाणे!! डोक्यावर केसांची चहासाखर झालेली! बारीक कोरलेली अणकुचीदार मिशी, रमेश देव स्टाईल!! अंगात मळखाऊ रंगाची, कॉटनचीच, शर्ट आणि पॅन्ट! नाकावर जस्ती काड्यांचा चश्मा!!

मी त्यांच्याजवळ जाउन हळूच हाक मारली.

"सर"
"काय आहे?" वाचनात व्यत्यय आल्याने वैतागलेला स्वर...
"नाही सर, आम्ही ते शाळेचं हस्तलिखित तयार करतोय, सगळं होत आलंय, तेंव्हा जरा मुखपृष्ठासाठी तुम्ही काढलेलं एखादं चित्र जर वापरता आलं तर....."
"हस्तलिखित? म्हणजे मराठीत दिसतंय!"
"होय सर, तुम्ही कसं ओळखलंत?"
"त्यात काय कठीन आहे? अरे इंग्रजी असतं तर शाळेनं छापलं नसतं का? मराठी आहे म्हणुनच हस्तालिखित! मराठीवर कशाला पैसा खर्च करतील हे लोक!"

मी काहीच बोललो नाही. मग मास्तरच म्हणाले,

"ठीक आहे, आनून टाक तुझं हस्तलिखित इथे"
"सर आम्हाला फक्त चित्र हवंय, हस्तलिखित कशाला आणून टाकू?"
"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...

मी मनांत म्ह्टलं की मास्तर जर खरंच हेमामालिनीचं चित्र काढून देतील तर काय बहार येईल! आपलं वार्षिक सॉलिड पॉप्युलर होईल!! फार काय, शाळा मॅनेजमेंट मग ते छापेलसुद्धा!! पण तसं बोललो असतो तर तिथेच मुस्काटीत खावी लागली असती...

मी दुसर्‍या दिवशी सकाळी ते हस्तलिखित मास्तरांना नेऊन दिलं. शाळा सुटायच्या आधी मास्तरांनी माझ्यासाठी वर्गात निरोप धाडला की मला बोलावलंय! मी घाबरतच टिचर्स रूममध्ये गेलो. मास्तर टेबलाशी हस्तलिखित पसरून बसले होते. मला बघताच म्हणाले,

"काय हो अतिशहाने, यांत तुम्ही काय लिहिलंय?"
"सर ती एक कथा लिहिली आहे..."
"अरे पण संपादक ना तू? मग तुझं संपादकीय कुठंय?"
"सर, ते मी अजून लिहीतोय, पूर्ण नाही झालं..."
"मग लवकर लिहून आनून दे. त्याच्याशिवाय मी हात लावणार नाही कशाला..."

मी त्या रात्री बसून माझं संपादकीय पूर्ण केलं. विषय मला वाटतं की "मराठी संस्कृतीमध्ये लोककलांचे स्थान" असा काहीतरी होता. मी रात्री जागून अभ्यास करतोय असा समज होऊन आईवडिलही खूष झाले....

दुसर्‍या दिवशी जाऊन मी ते संपादकीय गावित सरांना नेऊन दिलं. त्यांनी माझ्यासमोरच ते वाचलं...

"सर कसं आहे?"
"ते मला काय ठाऊक? मी काय मराठीचा मास्तर आहे? आता पुढल्या सोमवारी साडेदहा वाजता मला भेट इथेच!"
"म्हणजे सर तुम्ही नक्की चित्र काढणार ना!"
"अरे नायतर काय शेन्या थापायला बोलवून र्‍ह्यायलोय का तुला? चल फूट आता, हकाल गाडी!"

मला अतिशय आनंद झाला. त्या आनंदात तिथून "फुटायला" ही मला काही वाटलं नाही...

पुढल्या सोमवार पर्यंत मला नुसता धीर निघत नव्हता. कसाबसा साडेदहा वाजेपर्यंत थांबलो आणि गावित मास्तरांना भेटायला टीचर्स रूम कडे धाव घेतली....

मास्तर टेबलाशी बसले होते. मला पाहताच उठले आणि म्हणाले,

"चल माझ्याबरोबर"

आमच्या शाळेत ड्रॉइंगच्या तासासाठी निराळी खोली होती. तिथे निरनिराळी चित्रं लावली होती, तिथली बाकंसुद्धा जास्त लांबरूंद वगैरे.... आम्ही तिथे गेलो.

"सर चित्र झालं तयार?"
"नाय, मनाजोगतं झालं नाय म्हनून फाडून टाकलं" मला प्रथमच एक सरळ उत्तर मिळालं. पण असं उत्तर, की माझी त्यामुळे खूप निराशा झाली...
"मग आता काय?" मी
"आता काय! चल बस हितं! मास्तर एका पांढराशुभ्र कागद लावलेल्या फलकाशी बसले. मला त्यांनी समोर बसवलं. माझ्या हातात एक कागद दिला. स्वतःच्या हातात एक कोळसा घेतला आणि मला म्हणाले,
"हे घ्ये तुझं ते संपादकीय आनि वाच मोठ्यानं"

मी भारावल्यागत त्यांच्याकडून तो कागद घेतला आणि मोठयाने सावकाश ते संपादकीय वाचायला सुरवात केली. त्याबरोबर गावितमास्तरांनी कागदावर कोळसा ओढायला सुरवात केली...

मला ते काय काढतायत ते बघायची अतीव इच्छा होती. मी वाचन थांबवून त्यांच्या फलकाकडे नजर टाकायचा प्रयत्न केला.....

"हात् भोस*च्या! थांबू नगंस!" मास्तर कडाडले......

ते जरी कडक असले तरी त्यांचा हा आवाज मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. मी घाबरून पुढे वाचत राहिलो....

संपादकीय वाचून संपलं....

मास्तर समाधीत बुडालेले! हाताने फराफर रेघोट्या मारत होते!!! हाताला जरा विश्रांती नव्हती.....

मी थोडा वेळ तेच नुसता पहात राहिलो...

नंतर केवळ उत्सुकतेपोटी उठलो आणि त्यांच्या माराच्या टप्प्यात येणार नाही असं बघून त्याच्या पाठीशी जाऊन त्यांनी काय रेखाटलंय ते पाहू लागलो.....

पाह्तो तर काय!!!!

गावित सरांनी नुसत्या कोळश्याने समोरच्या फलकावर दोन रेखाकृती रेखाटल्या होत्या....

एक होती पवाडा गाण्यार्‍या शाहिराची!! अगदी मर्‍हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्‍यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा आवेश!!!

दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!

"सर काय मस्त आहे हो!!" माराची पर्वा न करता माझ्या नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले...
"तुझ्या संपादकीयाशी जुळतंय का नाय!"
"ते तर आहेच सर! पण नुसतं चित्र म्हणुनही किती सुंदर आहे!!!"
"मला वाटलंच!" सर समाधानाने म्हणाले, " तुला हवं असेल तर यात रंग भरून देईन!"
"नको, नको! रंग नको!!! तपशील नुसता कोळश्यानेच भरा....."
"आनि तुझ्या त्या देशमुख मास्तराच्या मनाला नाही आलं तर?" सर मिश्किलपणे म्हणाले....
"नाही आलं तर नाही आलं!! त्यांना सांगीन की मला आधी संपादक म्हणून काढून टाका आणि नंतर हिंमत असेल तर स्वतः या चित्रात साजेसे रंग भरा!!!"

"शाबास! पोरा, शाबास!!" सरांच्या तोंडून कधी नव्हे हे ती मी प्रशंसा ऐकली...

"अरे म्हनून तर मी तुझं संपादकीय वाचायला मागितलं! तू बरं लिवतोस!! विचार करुन शब्द निवडतोस!! अरे लेखन ही पन एक कलाच नाय का? आनि कुठल्याही कलेचं असंच असतंय!! जिथे सुरवात पाहिजे तिथे सुरवात आनि जिथं शेवट पाहिजे तिथे शेवट!! अरे उगाच आलं मनात आनि काढलं कागदावर उतरवून, त्याला काय अर्थ आहे? सगळ्या कलाकृतींना, मग ते लेखन असो की चित्र की शिल्प की संगीत, एक स्थापत्य असतंय!! तू ते तुझ्या लेखात सांभाळलंय! म्हनून तर मी चित्र द्यायाला तयार झालो..."

"थँक्यू सर!" मी भारावून गेलो होतो.
" ते ठीक! पन मला एक सांग!" सरांचा चेहरा पुन्हा मिश्किल झाला होता....
"तू माझ्याकडे चित्रासाठी का आला? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!" त्यांचा घाटगे मॅडमच्या विषयीचा उपरोध माझ्या लक्षांत आला....
"हो सर मिळालं असतं! पण हे भाव कसे मिळाले असते? काय कला ठेवलीय देवानं तुमच्या बोटांत!"

मला वाटलं सर प्रसन्न होतील, पण ते उदास झाले....

"आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!'
"असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?"

सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले....

"अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....."

मला काय बोलावं ते सुचेना! मग त्यांनीच स्वतःला सावरलं!!

" आसो! देवाला समजतंय! तुम्हाला पोरांना समजतंय!! आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!"

सर डोळे पुशीत समाधानाने म्हणाले.......

मला पण खूप खूप आनंद झाला असता हो......

जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर.........

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

24 May 2008 - 9:02 am | बेसनलाडू

अतिशय जिवंत मास्तर. व्वा पिडांकाका. फार जिवंत व्यक्तिचित्रण. मास्तर साक्षात डोळ्यांसमोर उभे ठाकले आणि आम्हीही तुमच्याबरोबर त्यांच्यासंगे शाळेत वावरलो मिनिट-दोनमिनिट. दूरदर्शनवरील माझ्या लाडक्या 'संस्कार' मालिकेतल्या देव सरांची आठवण झाली पुसटशी.
(स्मरणशील वाचक)बेसनलाडू

शैलेन्द्र's picture

24 May 2008 - 9:24 am | शैलेन्द्र

खरच खुप छान लिहिलय, अतिशय भिड्णार...

मदनबाण's picture

24 May 2008 - 9:25 am | मदनबाण

काका, लई जबराट लिवता तुम्ही.....
एकदम शाळेत जाऊन आलो बघा.....
मनात तासाची घंटा देखील वाजली.....
जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर.........
तर आपल्या या हरामखोर राजकारण्यांना जाती-पाती चे राजकारण करता आले नसते.....

(मास्तरांनी फेकुन मारलेले डस्टर बर्‍याच वेळा चुकवण्यात यशस्वी झालेला)
मदनबाण>>>>>

सन्जोप राव's picture

24 May 2008 - 10:03 am | सन्जोप राव

देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?
सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले....
"अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....."
आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!"
कधी गावंढळ तर अचानकच मध्ये शहरी भाषेत बोलणारे मास्तर - त्यांचे त्यातल्या त्यात घेतलेले कलंदर बेअरिंग - चुटकीसरशी डोळ्यात पाणीबिणी आणि शेवटी निरगाठ - उकल या तंत्राबरहुकूम 'जाळुनि टाका या भिंती' असा एक फडके खांडेकर संदेश - तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा...

सन्जोप राव

सहज's picture

24 May 2008 - 10:47 am | सहज

कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!!
हेच जर अत्यंत सकस लिखाण असेल तर हा लेख निव्वळ "मसाला मिक्स" कसा काय?

असो आपापले मत, ज्याची त्याची आवड!!

मला लेख आवडला. व्यक्तीचित्र, भेदभाव, आठवणी सगळे छान गुंफले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2008 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित एक-दोन वेगळ्या नावाने तंतोतंत हाच लेख लिहला असता तर बिनाशर्त किंवा बहुतेक निदान लेखी/तोंडदेखली प्रशंसा मिळाली असती एका माणसाची!!

कोणत्या लेखकाने हेच लेखन केले असते म्हणजे या पेक्षा सरस लेखन किंवा दर्जेदार कथा होऊच शकत नाही, असे कोणी कोणास म्हटले असते ? ;)

अवांतर : सहजराव, उत्तम निरिक्षण !!! चालू दे, चालू दे !!! कधी कधी आपले विचार काय जूळतात राव !!! :)

सन्जोप राव's picture

24 May 2008 - 4:08 pm | सन्जोप राव

कुणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे हे बघून त्यावर मत देणे असे वस्तुनिष्ठ रहाणे कठीण आहे. ते जमले नाही, तर त्यात शल्य मानून घेऊ नये. ज्याची त्याची आवड हे तर आहेच.
सन्जोप राव

सहज's picture

24 May 2008 - 4:46 pm | सहज

असेच लेखन [आय मीन प्रतिसाद] वाचुन तर कळले हे असे वस्तुनिष्ठ रहाणे खरचं कठीण आहे. अगदी भले भले देखील भ्रमात असतात व गंमत ही की आपण फसलो गेलो हे देखील त्यांना कळत नाही. :-)

ऋषिकेश's picture

24 May 2008 - 5:48 pm | ऋषिकेश

तू माझ्याकडे चित्रासाठी का आला? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!"

संजोपराव आपली प्रतिक्रिया वाचून हे वाक्य उद्धृत करावसं वाटलं :)

अर्थात हे चलनी नाणे आहे

कोणतेही नाणे उगाच चलनी होऊ शकते पण ते हमखास चालण्यासाठी त्यात काहितरी खास असावेच लागते.

बाकी,
डांबिसराव,
मला हा लेख फार फार आवडला. मास्तर आणि शाळा डोळ्यासमोर अतिशय ताकदिने जिवंत उभे केलेत

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विकेड बनी's picture

24 May 2008 - 11:15 pm | विकेड बनी

अहो प्रत्येकाची आपली निष्ठा असते. दैवतं असतात. त्यांना आपापल्या चष्म्याबाहेरचं काहीच दिसत नसतं. त्यांना माफ करा. दोष त्यांचा नाही, नजरेचा आहे.

लेख आवडला. शैली सुरेख आहे. पु.ले.शु

तुमचा
न चालणारा
(खोटा पैसा) तेज

बकुळफुले's picture

24 May 2008 - 10:32 am | बकुळफुले

डोक्यावर केसांची चहासाखर झालेली............मस्त शब्द निवडलेत हो काका.:)
तंतोतंत व.पुं. चा लार्ज पेग साने गुरुजींच्या सोड्याने पातळ केल्यासारखा. अर्थात हे चलनी नाणे आहे म्हणा... :(
सन्जोप काका तुम्ही भडकमकर मास्तरांच्या वर्गातुन बाहेर पडलेले समिक्षक आहत का हो.? बाकी म्हणा तुम्हाला तिथे प्राचार्यशिपच असेल.
आमच्या डाम्बीस काकाचा लेख उगाच त्या चश्म्यातून पाहु नका. "सोड्याने पातळ" वगैरे असली फडकी त्या ला गुंडाळु नका.
हे म्हणजे उगाच आमरस चाखत असताना त्यात हिंगाचे खडे आल्यासारखे वाटते.
:::::::डाम्बीस काकांचा लेख वाचुन आनन्दीत झालेली बकुळफुले

सन्जोप राव's picture

24 May 2008 - 4:13 pm | सन्जोप राव

आमरस कुठला आणि हिंगाचे खडे कुठले हाच प्रश्न आहे. 'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?"
हा उलगडा जोवर होत नाही तोवर आपण सुहास शिरवळकर जरुर वाचत रहा. आमची काहीही हरकत नाही...
सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 5:17 pm | विसोबा खेचर

'आपली करडी नजर रोखून माधवराव गरजले, "आता एकच सांगा बापू, की महादेव कोण आणि नंदी कोण?"

एक लहानशी सुधारणा..!

वरील वाक्य हे माधवरावांनी बापूंना उद्देशून म्हटलेले नसून रामशास्त्र्यांनी गंगोबातात्यांना उद्देशून म्हटले होते असे आठवते!

बाकी चालू द्या! :)

आपला,
तात्या देसाई.

विकेड बनी's picture

24 May 2008 - 11:17 pm | विकेड बनी

संजोपराव बापू म्हणजे गारंबीचा बापू किंवा "हमारे प्रिय बापूजी" असे म्हणत असावेत. ;-)

मुक्तसुनीत's picture

24 May 2008 - 11:11 am | मुक्तसुनीत

डांबिसखान हे व्यक्तिचित्रे लिहीण्यात खरोखरच चँपियन आहेत हे वाचताना पटले. एखाद्या व्यक्तिचे काने-कंगोरे टिपणे , त्याचे चित्रदर्शी वर्णन करणे , आणि या सार्‍याला एका कथानकाच्या एका धाग्यात बांधणे याचे १०० गुण सुलेशबाबूना द्यायलाच हवे. उस्ताद डांबिसखां ,
आप यूंही अगर ऐसे लिखते रहें, देखिये एक दिन दिवान्-ए-डांबिस बन जायेगा ! :)

अवांतर : संजोपरावांच्या मताचा एक वाचक म्हणून मला आदर वाटतो. प्रस्तुत लेखाला प्रतिक्रिया देताना त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेतला आहे ही गोष्ट खरी. माझी सदर लेखकाला अशी विनंती राहील की त्यांनी या उक्तीमधले काटे बाजूला काढून त्यातील वर्माकडे लक्ष द्यावे. माझी खात्री आहे की डांबिसखानाना त्यात स्वत:च्या गुणवत्ता असणार्‍या लिखाणाला अजून कलादृष्ट्या चांगले बनविण्याबद्दलशी सूचना दिसेल.

मनिष's picture

24 May 2008 - 11:14 am | मनिष

छान झाला आहे पिडा काका! :)

फटू's picture

24 May 2008 - 11:16 am | फटू

गावित मास्तरान्चा आणि तुमचा संवाद अगदी नजरेसमोर घडतोय असंच वाटतं...

आपल्याला अगदी शाळेच्या दिवसांची आठवण झाली...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु's picture

26 May 2008 - 6:14 pm | प्राजु

गावित मास्तर डोळ्यांपुढे उभे राहिले.
चांगला झाला आहे लेख. मला खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राजे's picture

24 May 2008 - 12:12 pm | राजे (not verified)

वा ! छान व्यक्तीचित्रण !
आवडले !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती दिनेश's picture

24 May 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश

व्यक्तिचित्रण आवडले, सुलेशबाबू.. असेच लिहित रहा, आम्ही वाचत राहू,:)
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2008 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबिसराव,
व्यक्तिचित्र सुंदर झाले आहे, आवडले !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरुबाबा's picture

24 May 2008 - 1:27 pm | शरुबाबा

व्यक्तिचित्र सुंदर झाले आहे, आवडले !!!

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2008 - 3:27 pm | प्रभाकर पेठकर

फार सुंदर लिहीले आहे. आवडले. अभिनंदन.

"आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!'
"असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?"

हृदयाला भिडणारे शब्द आहेत.

कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या.

शेवटी खरे उत्तर देण्याचे शिताफीने टाळलेत. ते दिले असतेत तर निदान आमच्या ज्ञानात तरी भर पडली असती. ह्हा:.... ह्हा:...ह्हा:..

भडकमकर मास्तर's picture

24 May 2008 - 4:30 pm | भडकमकर मास्तर

आवडलं व्यक्तिचित्र ...
आमचे शाळेतले चित्रकलेचे मास्तर आठवले...
... मात्र शेवटचा सोसल मेसेज थोडा अपेक्षित / पठडीतला वाटला...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

झकासराव's picture

24 May 2008 - 4:41 pm | झकासराव

माझी तर त्याकाळी समजूत मराठवाडा म्हणजे शिवाजीचा कुठलातरी बंगला असावा अशीच होती>>>> =))
चांगल जमलय व्यक्तीचित्रण. :)

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 5:11 pm | विसोबा खेचर

गावित मास्तरांचं व्यक्तिचित्रं ठीक वाटलं रे डांबिसा. परंतु फारशी पकड घेतली नाही असं माझं व्यक्तिगत मत...

कोई बात नही, औरभी जरूर लिख्खो...

पुलेशु..

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

चित्रा's picture

24 May 2008 - 9:51 pm | चित्रा

लेख चांगला जमला आहे.
लेखन आवडले.

सुधीर कांदळकर's picture

25 May 2008 - 9:20 pm | सुधीर कांदळकर

मराठवाडा, चहासाखर, हेमामालिनी, वगैरे छानच.

मजा आली.

सुधीर कांदळकर.

चर्चा करायची संधी मिळेल अशा अपेक्षेत

श्री राव
आपला रोख नेमका कुठल्या मुद्द्यावर आहे ते स्पष्ट झालेले नाही. आपण आपल्या प्रतिसादात 'एक फॉर्म्युला' दिला आहे तो बर्‍याच प्रमाणात ह्या लेखनाला लागू पडू शकतो पण तेवढाच जर आक्षेप असेल तर बहुतेक सर्व लेखन हे ह्याच गटात मोडते असे आपल्याला आढळून येइल. वेगळी वाट चोखाळणारेही अर्थातच आहेतच पण अल्पसंख्य आणि 'चलनी' असतीलच असेही नाही. मग नेमका आक्षेप कशावर ?

ह्याच बरोबर जर आपण काही 'सकारात्मक मार्गदर्शन' केले असतेत तर आमच्याही ज्ञानात थोडी भर पडली असती. शिवाय मला असेही वाटते की 'पिडा' नेही ती 'टीका' 'विधायक सवरुपातच स्वीकारली असती. आपल्या लेखांचा मी चाहता आहे आणि ते विविध ठिकाणी वाचून त्यांचा आनंदही मिळवला आहे पण ह्या ठिकाणी थोड्या अधिक खुलाशाच्या अपेक्षेत...

आणि जाता जाता - सु. शि बद्दल आपले मत काहीही असो - आम्हाला तो आवडतो - आवडत राहील. अहो 'क्लासेस' आणि 'मासेस' मधे तेवढातरी फरक शिल्लक राहू द्या की. :)

पिवळा डांबिस's picture

26 May 2008 - 6:54 am | पिवळा डांबिस

आपल्या प्रतिक्रियांबद्द्ल सर्व मिपा वाचकांचे अत्यंत आभार!
-पिवळा डांबिस

सन्जोप राव's picture

26 May 2008 - 7:15 am | सन्जोप राव

गावित मास्तरांवर मी लिहिलेली प्रतिक्रिया हे माझे वैयक्तिक मत आहे. मास्तरांचा शीघ्रकोपीपणा, त्यांचे इतर सहकार्‍यांविषयीचे मत (मॅडम, देशमुख मास्तर) यावरुन हे पात्र मला मुद्दाम चितारलेले - उबवलेले वाटले. त्यांच्या भाषेत सलगता नाही. लेखकाने 'कठीन, आनुन, शेन्या' वगैरे शब्द जाणीवपूर्वक मास्तरांच्या तोंडी - त्यांचा ग्राम्यपणा अधोरेखित करण्यासाठी घातले आहेत. पण हेच गावठी मास्तर मधूनच खांडेकरांच्या पात्रांच्या तोंडी शोभावी अशी भाषा बोलून जातात, हे खटकण्यासारखे आहे. शेवटचा जातीयवादाचा उल्लेख तर अगदी प्लॅस्टीकसारखा आहे. या व्यक्तीचित्राचा शेवट कसा करावा याबाबत खुद्द लेखकच गोंधळल्यासारखा वाटतो. पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे - म्हणून तो चलनी नाण्याचा उल्लेख.
व्यक्तिचित्रे ही प्रत्यक्षातली माणसे असलीच पाहिजेत असे नाही. पण ती प्रत्यक्षातल्या माणसांसारखी वाटली पाहिजेत. 'व्यक्ती आणि वल्ली' मधील पात्रे जर तुम्हाला प्रत्यक्षात भेटली तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न पु.लंना विचारला तेंव्हा ते म्हणाले की 'मी त्यांना कडकडून भेटेन!' (यावर 'कुठे पु.लं आणि कुठे आम्ही सामान्य लेखक... कशाला चिकित्सा करताय दादा..आम्हाला चार घटका इथे मजा करु द्या की राव... का डोकं पिकवताय ...असे म्हणणार्‍यांनी खुशाल म्हणत रहावे) 'नंदा प्रधान' पासून 'रावसाहेब' पर्यंत प्रत्येक व्यक्तिचित्रात पु.लंनी आपला मसाला घातला आहेच, पण तो त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ' बांगड्याचा आब राखून तिरफळाने झणझणावे' असा. गाबित मास्तरांच्या बाबतीत मला मसाला फार आणि आत बांगडाच नाही- दाढी हातभर आणि आत बुवाच नाही - असे वाटले.
हेच सगळे मी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत - थोड्याशा सांकेतिक भाषेत लिहिले होते. ( मला जे म्हणायचे होते, ते फक्त मुक्तसुनीतांना समजल्यासारखे वाटते) सुहास शिरवळकरांचा उल्लेखही असाच होता. इथे 'क्लासेस-मासेस' असे वर्गीकरण करण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न असा आहे, की हे सगळे का लिहावे? किंवा इतका विचार तरी का करावा? तर यात लेखकाच्या लेखनकष्टाला मान देण्याचा भाग आहे. लेखक ज्या गंभीरपणे लिहितो, त्याच गंभीरपणे वाचकाने ते वाचले पाहिजे. आणि आपल्याला जे वाटते, ते स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे. एकंदरीत संकेतस्थळांवरील लिखाणाचा शब्दढाळ पहाता प्रत्येक लेखकाच्या बाबतीत हे शक्य आहे असे नाही, पण 'पिडां' सारख्या लेखकाचे लेख, अगदी त्यांच्या प्रतिक्रिया, मुद्दाम वाचण्यासारख्या असतात - आवडणे , न आवडणे हा वेगळा भाग झाला - म्हणून इतका खटाटोप. नाहीतर उथळ व्यक्तीचित्रांची आणि त्यांना फेटे, रुमाल उडवत 'माशाल्ला, सुभानल्ला' म्हणणार्‍यांची वानवा नाही. त्यांनी - शिरवळकर वाचणार्‍यांप्रमाणे - तसे करत रहावे. ते तसे करत असतातच.
सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 11:01 am | विसोबा खेचर

पण व्यक्तीचित्रे, त्यातले डोळ्यात पाण्याबिण्याचे उल्लेख आणि एकंदरीतच सानेगुरुजी स्टाईल नोस्टाल्जिया हे वरवरच्या वाचकाला आवडणारे प्रकरण आहे -

वरवरचा वाचक? हा काय नवीन प्रकार आहे हो राव साहेब? :)

आपला,
(खालखालचा वाचक) तात्या साने.

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:19 am | कोलबेर

नविन प्रकार नाही तात्या. मागे कधीतरी सर्किट काकांनी ह्यावर संशोधन केलेले होते बघा.. लेख प्रकाशित झाल्यावर अर्ध्या मिनिटाच्या आत लेंड्यासारखे वा!वा! प्रतिसाद टाकणारे म्हणजेच 'वरवरचे वाचक' बहुदा!

-कोलबेर वरकरणी :)

आजानुकर्ण's picture

27 May 2008 - 8:46 am | आजानुकर्ण

=)) =)) =)) =))

(:P) आजानुकर्ण

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 10:43 am | विजुभाऊ

शिरवळकर वाचणार्‍यांप्रमाणे =))
जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे.
कोणी चांगल्याला चांगले म्हंटले तर त्यात वाईट काय. सौंदर्य हे सौंदर्य असते . त्यात जात पात आणु नये क्लासेस आणि मासेस या जाती निदान मासेसच्या तरी डोक्यात नाहीत
मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज.
सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात.

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:23 am | कोलबेर

खरं आहे.. डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे. सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय?

डेव्हिड धवनचे चित्रपट पाहणारे म्हणजे मागासलेले आणि सत्यजित रे ह्यांचे चित्रपट बघणारे म्हणजे पुढारलेले असला एक दांभिक समज देखिल आहे.

वरील वाक्य वाचून एक विचार मनात आला तो इथे मांडत आहे -

मी पुढारलेला की मागासलेला, तसेच क्लासेस मधला की मासेस मधला हे मला माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची गरजही नाही, परंतु सत्यजित रे चे एकापेक्षा एक बोअर अन् कंटाळवाणे सिनेमे पाहण्यापेक्षा डेव्हिड धवनचे सिनेमे कितीतरी चांगले वाटतात आणि छान टाईमपास करणारे असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे!

सरकायलो खटीया बघताना जो लगेच आनंद मिळतो त्याचे काय?

त्या उत्तान गाण्यातील करिश्माच्या कामूक हालचाली पाहून साली वासना अंमळ चाळवते एवढं मात्र खरं! उगीच खोटं कशाला बोला?! अर्थात, हेही माझं व्यक्तिगत मत! :)

आपला,
तात्या धवन..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2008 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाउ द्या ना पाटील, कशाला मनावर घेऊन राह्यले, चालायचच. :)
कोणाला एखांदा लेखक लै भारी वाटतो, अन् एखांदा लेखक लै फालतू लिव्हतो अस्स बी वाटू शकतं.
खरं म्हण्जी काही लोकायले वाटते, आपून जे वाचतो ते सा-यात भारी वाचतो, अशा भ्रमामधी फिरत राहत्यात ती लोकं . खरं म्हण्जी अशाच समीक्षकायनी मराठीत काही लिहू पाहण्या-या, लिव्हणा-या लेखकाची पीढीच बर्बाद केली, अस्स वाटून जातं. नवं काही लिव्हण्याची हिम्मत गमावून बसलेत लेकाचे.

खरं म्हण्जी इथं हाटेल म्हणल्यावर लै येगयेगळ्या गुणाचं लोक येत राहतीन, काही लोकांमधी गूण जसे राहतेत तसे दोष बी अस्तेन का नाय. खरं म्हणजी तुम्ही लोकं अस्सं दांगडू घालतेत म्हुन मिसळपाववरुन माणसाचं मन उडून जातं अशी तक्रार दुस-या गावात वाचाला मिळते ना भो !!!

मिसळपाव खेडूत
(रोहिण्या बरसल्या नै म्हणुन नाराज मिसळगावचा शेतकरी )

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:57 am | कोलबेर

खरं म्हण्जी अशाच समीक्षकायनी मराठीत काही लिहू पाहण्या-या, लिव्हणा-या लेखकाची पीढीच बर्बाद केली, अस्स वाटून जातं. नवं काही लिव्हण्याची हिम्मत गमावून बसलेत लेकाचे

.

डागदर सायेब असल्या समीसक्षकांच्या समीक्षा वाचुन शान हिम्मत गमावुन बसलेली पुचाट पीढी बरबाद झालेलीच बरी की राव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2008 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डागदर सायेब असल्या समीसक्षकांच्या समीक्षा वाचुन शान हिम्मत गमावुन बसलेली पुचाट पीढी बरबाद झालेलीच बरी की राव!

काही का इशय असेना पण लिव्हणा-याची पीढी बर्बाद झाली तर चालते, पण समिक्षा जीवंत राह्यला पाहिजे, असे म्हणाचे का आपल्याला.

मंग काय बोलु भौ आता !!!

-पुचाट लेखक
डागदर बिरुटे

कोलबेर's picture

26 May 2008 - 7:55 pm | कोलबेर

व्ह्यय! असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्‍यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल..

समीक्षा जिवंत राहीलीच पाहिजे...पण प्रसंगी मुक्तसुनित ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे त्यातले वक्रोक्तीचे काटे बाजुला करुन आपले वर्म ओळखुन पुढे जाता आले पाहिजे..
बरबाद होणे सोपे आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2008 - 8:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असलं पन्नास समीक्षक आन त्यांची समीक्षा पचवायची हिंमत असेल तरच लिवनार्‍यांची पीढी बरबाद न होता फुडं जाईल..

हा, हे बाकी खरच बोलला की राव, पण अशी हिम्मत किती लोकामधी हाये हे आधी सांगा !!!
साहेब, तुम्ही इशय काढला म्हुन सांगतो, आमच्या गावाकडं ग्रामीण साहित्यातला एक लै मोठा लेखक त्याचं नाव 'बंकट पाटील' त्याची दहा, बारा पुस्तकं प्रसिद्ध हायेत. एकापेक्षा एक जोमदार लिव्हले. पण तुमच्या या समिक्षकायनी त्यायच्या लेखनाकडे पार डोळेझाक केली. आता कुठं कुठं ऐकतो आम्ही त्यायचे नाव ग्रामीण साहित्याचा आढावा घेतांना. पर ते जीवंत असतांना अस्स सूख नाय मिळालं तेन्ला. तरी बी ते लिव्हीत गेलेच, लोकायनी तेन्ला मोठं केलं !!!

जाउ द्या, आधीच ह्यो इषय लै पांगला बोला दुसरं काही तरी !!! :)

सन्जोप राव's picture

26 May 2008 - 10:58 am | सन्जोप राव

जी ए चा जसा वाचक वर्ग आहे तसाचह तो सु शीं चा ही आहे. जी ए वाचणारे हे सु शी वाचणारांपेक्षा जास्त साहित्यीक पुढारलेले आणि सु शी वाचणारे मागासलेले अस लोकंचा एक दांभीक समज आहे.
इथे जी.एं. चा उल्लेख करण्याचे प्रयोजन स्पष्ट आहे. पण हे 'पुढारलेले' व 'मागासलेले' हे वर्गीकरण कुणी केले हे स्पष्ट झाले तर बरे होईल. हा दांभिक समज असणारे 'अस लोकं'- पक्षी असे लोक - कोण हेही कळाल्यास बरे.
'क्लासेस आणि मासेस' हा मुद्दा श्री. वाचक यांनी उपस्थित केला आहे, त्यामुळे तेच त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील, असे वाटते.
मासेस ना जे आवडते ते क्लासिक नसते हा आणखी एक प्रचलीत समज.
असहमत. मराठी साहित्यात ढीगभर उदाहरणे आहेत. इंग्रजीत ताबडतोब आठवणारा वुडहाऊस आहे. हिंदीत प्रेमचंद, बच्चन, महादेवी वर्मा, हरीशंकर परसाई आहेत. अमोल पालेकर, जब्बार पटेलांचे सिनेमे आहेत, वळू आहे, टिंग्या आहे, बिमल रॉय, गुलजार, हृषीदा आहेत... ही न संपणारी यादी. त्यामुळे हा असलाच तर गैरसमज आहे.
सु शी वाचणारे निदान त्या वाचनाचा आनन्द लगेच घेऊ शकतात.
खरे आहे. सु.शि. सोडून इतर वाचणारेही त्या त्या वाचनाचा लगेच - लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक- आनंद घेऊ शकतातच.
सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 11:08 am | विसोबा खेचर

लगेच म्हणजे काय कुणास ठाऊक

अहो राव साहेब, लगेच म्हणजे शब्दश: लगेच!

जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं! ;)

बाय द वे, सुशी आणि चंका या नावांची निदान मला तरी ऍलर्जी आहे हे या निमित्ताने नमूद करू इच्छितो. बाकी चालू द्या... :)

आपला,
तात्या कुलकर्णी.

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:15 am | कोलबेर

जी ए वाचून समजायला, आनंद व्हायला जसा बराच वेळ लागतो तसा न लागता लगेच आनंद मिळतो अश्या अर्थाने बहुधा विजूभाऊंना 'लगेच' असं म्हणायचं असावं!

हे कुणी सांगीतलं? जी एं च्या कथांमधील काही काही वाक्य इतका आनंद देऊन जातात की अक्षरशः पुस्तक बंद करुन सावकाश पणे मनात ती वाक्ये घोळवुन पुढे जावेसे वाटते.

आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात?
अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 11:30 am | विसोबा खेचर

कोलबेरराव,

हे कुणी सांगीतलं?

कुणीच नाही! कदाचित विजूभाऊंना तसं वाटत असावं असा आपला माझा अंदाज! तेव्हा चूभूदेघे! :)

आणि तात्या, तसेही असल्या इन्सटंट आनंदाचे तुम्ही कधी पासुन पुरस्कर्ते झालात?

इन्सटंट आनंदाचा मी पुरस्कर्ता झालोय असं मी कुठे म्हटलंय? मी फक्त विजूभाऊंना काय वाटत असावं याचा अंदाज बांधून रावसाहेबांना उत्तर दिलं आहे. कदाचित, विजूभाऊंना तसं वाटत नसेलही! तेव्हा पुन्हा चूभूदेघे! :)

अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!

मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद! :)

तात्या.

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:46 am | कोलबेर

मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद!

अर्थातच!! तुमचेच वाक्य आहे ते :) (लिखाणातही?) ही फक्त माझी ऍडीशन.. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2008 - 11:01 pm | llपुण्याचे पेशवेll

<:P अहो गाण्यात आणि खाण्यात (लिखाणातही?) काहीही इन्स्टंट नसते हो!

मला याची पूर्ण कल्पना आहे, तरीही माहितीबद्दल धन्यवाद!

खाण्यात तर इंस्टंट आनंद असतोच की. :)
आता बघा तिखटजाळ सँपलमधे नुसता पावाचा तुकडा बुडवून नुसता बघा. त्या पावावर अशी काही लाली चढलेली असते, आहाहाहा. अगदी गालावरच्या गुलाबी लालीएवढीच ही पण लाली आकर्षक असते. इंस्टंट आनंद आहे की त्यात. कदाचित रस्सा आणि मिसळ बनवण्यात कष्ट असतील पण खाण्यातला आनंद किंवा दु:ख आहे की इंस्टंट.
राहीला गाण्यातला इंस्टंट आनंद. 'इंद्रायणी काठी', 'रम्य ही स्वर्गाहून लंका', 'बगळ्यांची माळ' ,गीत रामायणातील हरएक गाणे. आहेत की इंस्टंट आनंद देणारी.
(गाण्यातले काही न कळणारा खादाड)
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 11:09 am | विजुभाऊ

लगेच म्हणजे वाचत असतानाच. त्यावर नन्तर उगाच गहन अगम्य शब्दात चर्चा चर्वण करत बसत नाहीत.

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:29 am | कोलबेर

व्यक्तिचित्र आवडले. खास शैलीत कथेतील इतर पात्रं आणि सुत्रधार रंगवायची हातोटी वखाणण्याजोगी. पण शेवट मात्र थोडास ऍब्रप्ट आणि कृत्रिम वाटला. तरीही दुरावा पेक्षा हे कथानक जास्त आवडले हे नक्की. अब्दुल खान > गावित मास्तर > दुरावा.

अवांतर : उद्गारवाचक चिन्हांचा थोडासा अतिरेक झाल्यासाराखा वाटतो!!!!!

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 12:08 pm | विजुभाऊ

मला लेख आणि त्यासंदर्भात नसलेली वरील चर्चा वाचुन अधुनमधुन लगेच आनन्द मिळाला

सुमीत's picture

26 May 2008 - 4:10 pm | सुमीत

गावित मास्तर आवडले,
जर हा लेखाचा काळ मागील १५ ते २० वर्षे गृहित धरला तरी आता सुद्धा समाजातील जातीं मधला उच्च आणि नीच वर्गीकरण बदललेले नाही.

वाचक's picture

26 May 2008 - 5:51 pm | वाचक

सर्व साधारण पणे साहित्यिक क्षेत्रात एकमेकांच्या साहित्यावर स्तुती / टीका होताना दिसते. ते साहजिकच आणि अपेक्षितही आहे. पण 'रहस्य कथा' लिहिणार्‍यांकडे तसे उपेक्षेनेच बघितले जाते ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्याला बर्‍याच प्रमाणात रहस्य्कथा लेखकच कारणिभूत आहेतच पण ओल्याबरोबर 'सुकेही' जळते ह्या न्यायाने ' त्या उडिदात जे काही गोरे' होते त्यांच्या कडे दुर्लक्ष झाले (किंवा मुद्दाम केले गेले).
सर्व सामान्य वाचकाचे मागणे लई नसते. थोडी फार करमणू़क, विरंगुळा एवढाच माफक हेतू असतो. आणि 'रहस्य कथेत' ही मागणी अगदी चोख पुरवायचा प्रयत्न केलेला दिसतो (अगदी ढापून सुद्धा). त्यामुळे 'समिक्षकही' ह्या साहित्याची दखल घेण्याच्या सुद्धा भानगडीत पडत नाहीत. पण त्याच्यातच जर कोणी धाडस दाखवून वेगळे प्रयोग जर केले असतील तर त्याची मात्र उपेक्षा (क्वचित टिंगलच) होते. सु. शि. ने अनेक वेगळे प्रयोग केले आहेत - बरेच फसले - काही जमले - पण जेव्हा जमले तेव्हा त्याच्या पाठीवर कुठलीही कौतुकाची थाप पडली नाही - कारण का - तर तो सर्व सामान्यांना आवडेल असे 'रहस्य कथा लेखन' करतो.
कितिही नाकारले तरी कुठल्याही प्रस्थापित साहित्यिकाने 'ह्या प्रकारच्या' लेखकांबद्दल कुठलीही आपुलकी, (साधा उल्लेख) केल्याचेही आढळात नाही. नाही म्हणायला पु. लं नी बाबुराव अर्नाळकरांवर एक लेख लिहिला होता.
मी म्हणतो तो क्लासेस आणि मासेस मधला तथाकथित फरक तो हाच - बहुसंख्य जनतेला आवडते ना - मग करा त्याची उपेक्षा - अपवाद आहेतच वरती दिल्या प्रमाणे - पण जे अपवाद वरती नोंदवले गेले आहेत त्यांच्या समिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या काळात त्यांना झोडपलेच होते - नंतर त्यांचे विचार बदलले असतीलही - आणि जनतेने सु. शि ल कधीच स्वीकारले आहे, समिक्षक किंवा तथाकथित साहित्यिक कधी स्वीकारणार का हाच प्रश्न आहे.

धमाल मुलगा's picture

26 May 2008 - 6:10 pm | धमाल मुलगा

वाचकराव,

जियो!
अगदी खरं बोललात.

रहस्यकथा लेखकांबद्द्ल..पर्यायाने आमच्या सु.शि.बद्द्ल इतकं छान पहिल्यांदाच वाचलं. बरं वाटलं :)

धमाल मुलगा's picture

26 May 2008 - 6:07 pm | धमाल मुलगा

गावित मास्तर भारीच हो !

"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...

:))

एक होती पवाडा गाण्यार्‍या शाहिराची!! अगदी मर्‍हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्‍यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा आवेश!!!

दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!

आय हाय!!!!! दोन पुर्णतः वेगवेगळ्या भावमुद्रा श्रवणभक्तिच्या धुंदीत एकाच वेळी साकारणारे गावित मास्तर भारीच की.
आणि चित्राचं वर्णनही अप्रतिम. :) आवडल बॉ आपल्याला.

अवांतरः काही क्षण विचार केला, वरची चर्चा वाचून भांबावून गेलो. लेख तर आवडलाय. प्रतिक्रिया काय द्यावी कळेना.
लेखाला 'नाही आवडला' म्हणून विद्वानांच्या पंक्तित बसावं (स्वत:ची ती काडीमात्र लायकी आणि अभ्यास नसताना) की मनमोकळेपणानं दाद द्यावी? .......शेवटी आमच्या सर्वसामान्यपणानं उचल खाल्ली आणि मनाच्या गाभ्यानं दिलेला कौल आम्ही आचरणात आणला. :)
अति अवांतरः सु.शि. आमचा आवडता लेखक. लाख त्यानं इंग्रजी कथांची भाषांतरं केली असतील, पण त्याच्याइतक्या ताकदीनं मराठीत रहस्यकथा सादर करणं अजुनतरी कोणाला जमलं असेल असं वाटत नाही. असल्यास मला माहित नाही.
हे आपलं स्वतःचं वैयक्तिक मत. कोणाला पटावं असा अट्टाहास मुळीच नाही :)

रहस्य कथा लेखकांत पेरी मॅसन , आर्थर कोनन डॉइल. यांचेलेखन खरेच चांगले आहेत.
गुरुनाथ नाईक ष्टाईल बाज आहेत. सु शी ची दुनियादारी ज्याने वाचली त्याला त्यंचे वेगळेपण जाणवते.
जी ए चा एक विवक्षीत वाचक वर्ग आहे. तो वर्ग जी एंच्या गाभुळलेल्या लेखन शैलीतुन कधी बाहेरच येत नाही.
जी ए नी जर एखादी श्रुंगारीक कथा लिहिली तरी ते
तिचा शेवाळी हिरवा स्पर्ष आणि आणि रीकाम्या गडग्यात किणकिणार्‍या खडयांसारख्या वाजणार्‍या बांगड्या त्याला एक वेगळीच जाणीव करुन देत होत्या . त्याच्यातील श्वापद हळुहळु जागे होऊ लागले. त्याने जड हातानेच तिचा हात हातात घेतला.
तिच्या सर्वांगातुन कसलीशी शहारलेली जाणीव धावत गेली. मणामणाचे ओझे उचलावे तसा तिचा श्वास तिलाच जड झाला. घशातुन कसलासा खरवडलेला आवज उमटवुन तिने त्याच्या कडे पाहीले. मांजर फिस्कारावे तसा तो तोंडभर हसला
असे लिहितील
ही त्यांची ष्टाइल चाहत्याना आवडुन जाते.
मला पिंजरा चित्रपतातील एक वाक्य आठवते "मास्तर तुमी ज्याला यौवन म्हणता त्याला आमी ज्वानी म्हणतो "
आणि कुठल्याशा हिंदी पिक्चर मधले हे वाक्य ही " तुम्हारे बडे होने से मै छोता नही हो जाता"
प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका

कोलबेर's picture

26 May 2008 - 7:59 pm | कोलबेर

प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका

धन्यवाद!
हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते. असो लेखाशी संबधीत नसलेल्या ह्या चर्चेने तुम्हाला 'लगेच आनंद' तरी मिळाला...तसा आम्हीही घेतला;) )

विकेड बनी's picture

26 May 2008 - 9:47 pm | विकेड बनी

हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते

आरं माज्या! येकाद्याची बाजू घिऊन ब्वालायला हरकत नस्ती रं पन आपन बरुबर ब्वालतोय का त्ये तरी पगावं. आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं. काय हाय की काई लोकांना सवय जाली हाय... दिसली जागा की काड वपु भायीर, दिसली जागा की काड साने गुर्जी भायीर मग लोक पन जीए भायीर काडतात.

कोलबेर's picture

26 May 2008 - 9:54 pm | कोलबेर

आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं.

त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं?
तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच दिसतोस!! :)

आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं....आणि शेवटी सगळंच अंगावर आलं, म्हणून पेढा आणि सुपारी पण आले हा हा हा!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2008 - 9:09 pm | llपुण्याचे पेशवेll

आता असे बघा. ही भरकटलेली चर्चा सुरू झाली ती वरील लेखावर समिक्षकी पद्धतीने टिका करून चलनी नाणे वगैरे म्हणल्यामुळे, पुढे ती भरकटली. जशी काही समिक्षकाना ती आवडली नाही तशी काहीना ती आवडली. त्यामुळे टिकेला प्रत्युत्तर आणि प्रतुत्तराला प्रत्युत्तर अशा प्रवासातून चर्चा भरकटली. कदाचित प्रत्येकाची असते आवड निरनिराळी. एखाद्याला पेढ्यापेक्षा असेल सुपारी जास्त आवडत पण एखादे मत जाहीर व्यक्त झाले की चर्चा सुरू होणारच.
आता तुम्ही म्हणता
त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं?
तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच

त्याऐवजी पेढा आणि सुपारीत तुलना न करता जर समिक्षकी मत जर प्रस्तुत लेखकाला पोष्टकार्ड पाठवून सांगता आले असते. आता मी या डांबिसकाकाच्या लेखनाचा पंखा आहे ,त्यामुळे जर कोणी जाहीर टीका केली डांबिसकाकाच्या लेखनावर तर त्याला माझ्या परीने मी उत्तर देईनच ना! मग हा पेढा आणि सुपारीतला फरक प्रस्तुत टिकाकार स्वतः जाणत नव्हते का? आणि तो त्याना आणि त्यांच्या बाजूने चर्चा करणार्‍याना नव्हता का कळत? असाल तुम्ही पेढेवाले. सोडूने द्यायचे होते हे लेखन सुपारीवाल्याचे आहे म्हणून.
दुसर्‍याला नुसते डोस पाजायचे, अगदी उच्च अभिरुचिचे रसिक म्हणून मिरवायचे, आचरणात आणा ना आधी एखादी गोष्ट.

पुण्याचे पेशवे

यशोधरा's picture

27 May 2008 - 9:03 am | यशोधरा

मस्त जमलय, आवडलं व्यक्तीचित्रण :)

शितल's picture

27 May 2008 - 6:24 pm | शितल

गवीत मास्तर छान उतरवले आहेत, आणि त्याच्या मनातील भावना ही छान मा॑डली आहे.

धनंजय's picture

27 May 2008 - 6:29 pm | धनंजय

कथेचा आशय आवडला.

काही प्रमाणात साचेबद्ध होती, हे वरील काही प्रतिसादांतले मत पटते. चित्रकलेच्या बाई अनावश्यकपणे एकसुरी भडक वाटल्या, पण लघुकथेत कधीकधी असे सुलभीकरण चालायचेच.

कोणाच्याही विशेष बोलीची ढब (म्हणजे त्या बोलीतली शुद्धताच ती!) काटेकोरपणे पाळण्यात कसब महत्त्वाचे. नाहीतर सत्याचा आभास भंगतो, हे म्हणणे खरेच आहे. पण या कथेत अशी उदाहरणे थोडीच दिसतात. असले बारीकसारीक दोष पुढच्या आवृत्तीत सहज सुधारण्यासारखे आहेत.

सारांश : कथेचा आशय मला आवडण्यासारखा आहे.

वरदा's picture

27 May 2008 - 6:55 pm | वरदा

आवडला हा लेख काका..मस्त लिहिलाय्...दोन वेगळी रुपं एकाच माणसाची..सुरेख वर्णन केलयत....

चतुरंग's picture

27 May 2008 - 7:57 pm | चतुरंग

मतमतांतरांचा उडालेला धुरळा डोळ्यात जाऊन सुरुवातीला मूळ कथा नीट दिसेना त्यामुळे आज निवांत वाचून प्रतिक्रिया देतोय. :)

कथा चांगली आहे. पात्र रंगवण्याची हातोटी तुम्हाला साधली आहे. कथेचा गाभा चंगला असला तरी बांधणी थोडी विसविशीत वाटली कारण कथेची सुरुवात करताना शेवट कसा करणार हे नक्की नसावे असे एकूण लिखाणावरुन वाटले. शेवट काही वेगळा, अधिक नाट्यपूर्ण, करता आला असता तर कथा ठरीव साचाच्या बाहेर पाऊल ठेवणारी आणि अधिक कसदार होऊ शकली असती असे वाटते.
थोडी अधिक मेहनत तुमच्यातला उत्तम लघुकथा लेखक आकाराला आणेल असे वाटते. पु.ले.शु.

(स्वगत - असं भडकमकर मास्तरांच्या क्लासमधून शिकून आल्यासारखं परीक्षण कधीपासून लिहायला लागलास रे तू रंगा? ;) )

चतुरंग

मी-सौरभ's picture

6 Apr 2012 - 9:57 am | मी-सौरभ

पिडां काकांच एक सुरेख व्यक्तिचित्र नविन वाचकांसाठी वर काढतोय :)