श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या. आधी कुंजरगड करुन नंतर पाचनईच्या जवळच असलेला कलाड्गड करु जमलं तर त्याच दिवशी भैरवगडाच्या गुहेत जाऊन झोपु आणि दुस-या दिवशी थोडं आरामात पाबरगडकरुन संध्याकाळपर्यंत घरी असा भारी प्लान ठरला (आमच्या नाक्याच्या भाषेत फ़रफ़ट किंवा वेड.... प्लान).
२ तारखेला पहाटे ५.३० ला निघालो, गिरीष गाडी चालवत होता, ७.०० ला मुरबाडजवळ एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. पुढे टोकावड्याला पुन्हा चहाज, वडा-ऊसळ्स, भजीज वगैरे खायला थांबलो. आता मी गाडी चालवायला घेतली. माळ्शेजघाट पार करुन ओतुरला आलो तेव्हा साधारण १०.०० वाजत आले होते. आमच्या अंदाजानुसार ५.३० ला निघुन साधारण १०.००-१०.३० पर्यंत कुंजरगडाच्या पायथ्याशी पोहोचायला हवे होते पण १०.०० वाजले तरी आम्ही ओतुरलाच होतो. इथपासनच आमचं शेड्युल चुकायला लागलं. पुढे ओतुर संगमनेर रस्त्यावर असलेल्या बोटा फ़ाट्याला आलो आता गिरीष गाडी चालवत होता. बोटा फ़ाट्याला कुंजरगडाच्या पायथ्याशी असलेल्या विहीर गावचा रस्ता विचारुन घेतला. पत्ता सांगणा-याने कुठुन आलात विचारलं. ईथंपर्यंत ठिक होत पुढे त्यानी आमची नाव आड्नाव पण विचारली हे जरा चमत्कारीकच वाट्ले. पण पत्ता सांगणा-या माणसाची काहीतरी गडबड झाली असावी कारण त्या रस्त्याने साधारण १५-२० मिनिटे गेल्यावर हा रस्ता विहीर गावात जात नसुन विरगावात जातो असा साक्षात्कार आम्हाला झाला. पुन्हा बाईकचे तोंड वळवले पुन्हा बोटा फ़ाट्याला आलो आणि आता मात्र खरोखरच्या विहीर गावाच्या रस्त्याला लागलो. पण या गडबडीत पाऊण तास फ़ुकट गेला. आता अकरा वाजत आले होते. बोटा फ़ाट्यापासुन विहीर गाव जवळजवळ एक तास.
विहीर गावातुन कुंजरगड
साधारण १२.०० च्या सुमारास विहीर गावात आलो. एका घरापाशी बाईक लावली. त्या घरातल्या लोकांनी एकदम आमच स्वागतच केलं. कुठुन आलात काय नाव आड्नाव वगैरे चौकशी केली (च्यायला ईथल्या लोकांना आपली आडनाव काय करायची पुन्हा चमत्कारीक वाटले). त्यात आम्ही दोघेही जानवेधारी आहोत आणि मी तर गुरुजीगीरी करतो कळल्यावर त्यांनी आम्हाला जेवायचा आग्रह केला. अहो आमच्या घरात आज पितरांचे श्राध्द आहे आणि त्या निमित्ताने "दोन बामण जेवले तर आमाला पुण्य मिळेल" वगैरे वगैरे कॆसेट. ईथे हसावे का रडावे अशी आमची अवस्था झाली कारण आम्ही ऒलरेडी शेड्युलच्या दोन तास लेट होतो. शेवटी एका पिशवीत जेवण पार्सल घेऊन ते कुंजरगडावर जाऊन खाणे असा एक सर्वमान्य तोडगा निघाला. त्या मामाने माझा मोबाईल नंबरसुध्दा घेतला (पुन्हा चमत्कारीक). मला वाटलं एखाद्या सत्यनारायण पुजेसाठी बोलावतात कि काय आता. असो शेवटी साधारण १२.३० च्या रणरणत्या ऊन्हात आम्ही कुंजरगडाच्या वाटेला लागलो.
गावातन बाहेर पडताच १०.-१५ मिनीटात एक छोट देऊळ लागलं, या देवळाच्या मागुनच रस्ता जातो.
मुक्ताई माता मंदिर - विहीर गाव - कुंजरगड
वाटेत कुठे-कुठे पिवळ्या फ़ुलांचे गालीचे होते तर कुठे हिरवीगार भाताची शेत डोलत होती. क्लीकत क्लीकत चाललो होतो.
हिरवी शेते
पहील्या टेकाडावरुन - विहीर गाव
नेहमीप्रमाणे माननीय श्री. आनंद पाळंदे यांचे "डोंगरयात्रा" पुस्तक बरोबर होतेच. त्यात म्ह्टल्याप्रमाणे विहीर गावातुन कुंजरगडावर दिड तासात पोहोचता येते. पण प्रत्यक्षात आम्हाला पावणे तीन तास लागले. मी म्ह्टलं त्यांनी कुंजरगडावरुन विहीर गावात ऊतरायला दिड तास म्ह्ट्लं असेल आपल्याला चढुन जायचं असल्याने थोडा जास्त वेळ लागला. पण तरीही एवढा फ़रक पडत नाही कधी आनंद पाळंदे यांनी दिलेल्या वेळेमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये. काहीही असो पण पुन्हा एकदा वेळेचा अंदाज चुकला होता एवढ मात्र खरं.
दुस-या टेकाडावर
दुस-या टेकाडावरुन विहीर गाव
वाटेतील हनुमान मंदिर
दाट झाडीतुन जाणारी वाट
साधारण ३.०० च्या सुमारास कुंजरगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर विशेष काहीही नाही. पुस्तकात म्हट्लं आहे "माथ्याच्या डावीकडे गेल्यावर एकमेव टाके आहे" पण प्रत्यक्षात आम्हाला तीन टाकी दिसली ("डोंगरयात्रा"चा आणखी एक धक्का) असो.
कणीस ?
कणसाचे दाणे (झुम)
गवत
शेवट्चा चढ
कुंजरगड टॉप
"गडाच्या उत्तर टोकाजवळ एक खोदीव बोगदा आहे, यातुन रांगत आत गेल्यावर कड्यावर उघडणारे दुसरे तोंड आढळते" (इती "डोंगरयात्रा"). जाऊन पाहिले खरच एक खोदीव बोगदा आहे पण रांगत जाणे कठीण वाट्ले शिवाय आतमध्ये पाणी साठ्ले होते आणि पुढे वाकुन पाहिले तर बुजवल्यासारखे वाटले त्यामुळे रांगत जाऊन कड्यावर उघडणारे दुसरे तोंड बघायचा मोह आम्ही आवरला.
बोगदा
मी आणि गिरीष
तिथेच एका टाक्यापाशी खाऊन घेतलं टाक्यातल गार पाणी पिऊन त्रुप्त झालो आणि निघालो. ऊतरत असताना वाटेत पुन्हा त्या मामाचा फ़ोन आला बराच वेळ झाला कुठे आहात? म्हटलं येतोच अर्ध्या तासात. साधारण साडेपाच वाजता पुन्हा विहीर गावात आलो. येतानाच आज आपला कलाडगड काही होणार नाही तेव्हा ऊद्या तीन गड करण्यापेक्षा कलाडगड ड्रॊप करुन आज भैरवगडावर जाऊन राहु असं ठरलं.
मामाकडे चहा घेतला. भैरवगडाच्या पायथ्याशी असणा-या शिरपुंजे गावचा रस्ता विचारुन घेतला. मामाच्या म्हणण्याप्रमाणे शिरपुंजे गाव २०-२५ कि.मी. म्हणजे अगदी खराब रस्ता धरला तरी एक तास. म्ह्टलं ६.३० पर्यंत पोहोचू पण कसलं काय विहीर गावातुन राजुरला यायलाच पाऊण तास गेला. त्यात गाडीच्या पेट्रोलच्या ईंडीकेटरचा काटा एकदम रिझर्वच्या खाली गेला. शिरपुंजे गाव पुढे वीस कि.मी. होतच. म्ह्ट्ल पेट्रोलच लफ़ड व्हायला नको म्हणुन राजुरला पेट्रोल भरायला गेलो तर ४५० च पेट्रोल भरुन होतय तर टाकी ओव्हरफ़्लो. म्हणजे पेट्रोलच्या काट्यात काहीतरी गडबड झाली होती (नवा साक्षात्कार). राजुरला चहा-वडापाव खाऊन शिरपुंजे गावात पोहोचायला ८.०० वाजले. गावातल्या लोकांनी आता ईतक्या ऊशिरा तुम्हाला गडावर घेऊन जायला कोणी माणुस मिळणार नाही तेव्हा जवळच एक आश्रमशाळा आहे तिथे तुमची झोपायची सोय होईल तिथे जा मग सकाळीच ऊठुन गडावर जा म्हणुन सांगितले. आम्हीसुध्दा मग जास्त अघोरीपणा न करता आश्रमशाळेत गेलो कारण नाही म्हट्ल तरी सकाळपासुन जवळ जवळ ९-१० तास बाईक चालवुन आणि कुंजरगड सर करुन तंगड्या गळ्यात यायला लागल्या होत्या.
आश्रमशाळेत मात्र आमची खरोखरच चांगली सोय झाली. आश्रमशाळेतील प्रबंधक आणि हेडमास्तर यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केलं आणि तुमची झोपायची सोय होईल म्हणुन सांगितलं. कधी नव्हे ते ट्रेकला गादी-ऊशी मिळाली हो झोपायला.
पहाटे ६.३० ला ऊठलो, आश्रमशाळेतील प्रबंधकांनी आमच्यासाठी चहा करुन ठेवला होता. चहा पिऊन, आवरुन ७.०० वा. निघालो.
शिरपुंजे आश्रमशाळा
भैरवगड
भैरवगडावरील मंदिर
आश्रमशाळेतील ५-६ मुलं देखील आमच्या बरोबर यायला तयार झाली, त्यामुळे वाट शोधायचा प्रश्ण नव्हता.
खेकडा
भैरवच्या वाटेवर
१ तासात भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचलो. वाटेत काही ठिकाणी खडकात खोदलेल्या पाय-य़ा आहेत.
पाण्याची टाकी
माझ्या हातातील कॉमेरा पहाताच याने अशी छान पोझ दिली.
त्यावरुन येत असताना ठिकठिकाणी दुर्वांच्या जुड्या पडलेल्या दिसल्या. माथ्यावर एका कड्याच्या टोकावर भैरवनाथांची गुहा आहे. त्यात भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा आहे.
कड्याच्या टोकावरील भैरवनाथांचे मंदिर
कड्यावरुन दिसणारी आश्रमशाळा
भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा
दर्शन घेऊन बाहेर आलो तर एक अवघी दीड महिन्याची चिमुरडी आपल्या आईबरोबर तिथे आली होती. एवढ्या लहान मुलीला वरती कशाला घेऊन आलात म्हणुन विचारले तर नवस फ़ेडायला आलो आहोत असे त्या माऊलीने सांगितले. आपल्या मनातील नवस बोलायचा आणि जवळची दुर्वांची जुडी भैरवनाथांच्या डोक्यावर ठेवायची, जुडी खाली पडली तर नवस पुर्ण होणार. आणि नवस पुर्ण करण्यासाठी अश्वारुढ पुतळयाच्या दोन पायांच्या मधुन मुलाला किंवा मुलीला पलीकडे द्यायचे अशी काहीतरी प्रथा आहे म्हणे. म्हणजे आपण बारश्याच्या वेळेला पाळ्ण्याखालुन बाळांना देतो त्याच टाईपचं काहितरी. माऊलीची परमीशन घेऊन त्या चिमुरडीचा फ़ोटो काढला.
विरगळ किंवा सतीचे दगड
आजुबाजुचा आसमंत न्याहाळला आणि निघालो.
साधारण ९.१५ च्या सुमारास पुन्हा आश्रमशाळेत आलो. प्रबंधक आणि हेडमास्तर यांचा निरोप घेतला आणि बाईकला किक मारली. पुन्हा १० च्या सुमारास राजुरला आलो. तिथे एका टपरीवर वडा-पाव, चहा घेतला आणि पाबरगडावर जाण्यासाठी घोटी रस्त्यावर असलेल्या गुहिरे गावात आलो.
गुहिरे गावातुन पाबरगड
बाईक एका घरापाशी लावली, वाट विचारुन घेतली आणि ११.०० ला निघालो. १२.३० ला पाबरगडाच्या माथ्यावर पोहोचलो.
वरती विशेष काही नाही पाण्याच टांक आणि माजलेलं रान बस्स. ऊन मात्र चांगलच भाजुन काढत होतं.
माथ्यावरुन रतनगड आणि भंडारदरा परिसर
कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन परिसर
१.३० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली आणि ३.०० वा. पुन्हा गुहिरे गावात आलो. चहा प्यायला आणि ठाण्याला यायला निघालो. घोटी-ईगतपुरी-कसारा-शहापुर-ठाणे असा प्रवास करत ६.४० ला ठाण्याला ट्च. विशेष म्हणजे आदल्या दिवशी पेट्रोलचा काटा फुल दाखवत होता तो आम्ही ठाण्याला आलो तरी फुलच. आहे ना आश्चर्य. असो.
अशारितिने दोन दिवसात जवळ जवळ ४५० किमी. बाईक रनींग आणि कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असे तिन किल्ले सर झाले.
बज्जु गुरुजी
प्रतिक्रिया
19 Oct 2010 - 5:38 pm | मेघवेडा
लै भारी हो बज्जुगुरूजी! मस्त वर्णन व फोटो! :)
19 Oct 2010 - 5:41 pm | सहज
मस्त
19 Oct 2010 - 5:46 pm | यशोधरा
कुंजरगड टॉप ह्या फोटोच्या खाली जे पाणीसाठ्याचे फोटो आहेत ते, बकरूंचा आणि जांभळ्या फुलांचे फोटो खूप आवडले.
वर्णन झकास!
19 Oct 2010 - 5:52 pm | सुहास..
त्या मामाने माझा मोबाईल नंबरसुध्दा घेतला (पुन्हा चमत्कारीक). मला वाटलं एखाद्या सत्यनारायण पुजेसाठी बोलावतात कि काय आता. >>>
![](http://l.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/24.gif )
![](http://l.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/24.gif )
मस्तच ओ बज्जु गुरुजी !! दोन दिवसात जवळ जवळ ४५० किमी. बाईक रनींग आणी चालणे झालेच की पण स्वर्ग बघुन आलात राव !!
त्या चिमुरडीचा आणी माऊलीचा फोटो भावुक करून गेला !!
बाकीच्या फोटोजने कोळसा केला माझा !!
19 Oct 2010 - 6:10 pm | गणपा
प्रवासाच वर्णन आणि फोटु सुद्धा.
19 Oct 2010 - 6:47 pm | प्रभो
मस्त!!
19 Oct 2010 - 7:17 pm | अरुंधती
सर्वच फोटो आवडले. माकडाची पोझ मस्त आहे.... मला क्षणभर तो पुतळाच वाटला! :-)
19 Oct 2010 - 11:03 pm | उपेन्द्र
आणि फोटो पण...
19 Oct 2010 - 11:58 pm | सुनील
मस्त फोटो!
20 Oct 2010 - 4:29 am | चित्रा
पण अशी भैरवाची मूर्ती प्रथमच पाहिली.
एवढ्या उंचावर सतीचा दगड कसा असे वाटले.
आई-बाळाचा फोटो फार सुरेख आला आहे.
20 Oct 2010 - 5:38 am | गांधीवादी
छान वर्णन आणि छान फोटो
(खेकड्याचे फोटो बघून एक आठवण झाली.
आमच्या वस्तीतली पोरं दरवर्षी पावसाळ्यात सिंहगडला जाऊन पिशवीत भरभरून खेकडे पकडून आणतात, आणि एक आठवडा ..................)
20 Oct 2010 - 9:05 am | प्रचेतस
बज्जुगुरुजी, एकदम दमदार ट्रेक केलात. आणि तो सतीचा दगड नाही तो वीरगळच आहे. त्यावर लढाईची दृश्ये स्पष्टपणे कोरलेली दिसत आहेत. तर सती दगडावर सतीचा हात कोरलेला आढळतो. आश्रमशाळा तर अतिशय रमणीय ठिकाणीच आहे.
थोडा अजून ५/६ तास वेळ काढला असतात तर रतनगडाजवळील सांदण दरी बघता आली असती.
29 Oct 2010 - 10:44 pm | Mohan Vaidya
फारच सुरेख
30 Oct 2010 - 12:16 am | हेम
फोटो झक्कास. वेळेसकट दिलेली माहिती झक्कास!
१) वल्लीशी सहमत! वीरगळ आहे.
२) भैरवगडावरील गुहेत अश्वारुढ खंडोबाची मुर्ती आहे तरी तीला भैरवाची गुहा कां म्हणतात कळत नाही.
३) गुहिरे गांव पाबरच्या पायथ्याला असलं तरी गुहिर्यातून पाबर दिसत नाही. तुम्ही नक्की पाबरचा माथा गाठलांत नां? खालून ४ थ्या फोटोमध्ये सगळ्यांत उजवीकडे त्रिकोणी डोंगर दिसतोय तो पाबर. वर जायला काही कोरलेल्या पायर्या, मध्यावर गुहा, पुन्हा खोदीव पायर्या, माथ्यावर भैरोबाचा तांदळा, गणेशमुर्ती असलेलं विनाछप्पर+पडक्या भिंतींचं मंदिर, आणखी वर उघड्यावर देवाचं ठाणं, गडावर जवळपास १४ खोदीव टाकी ! इ. अवशेष आहेत. पैकी कोणताच फोटो डकवलेला नाही म्हणून आपली शंका..!!!!
भैरवनाथाच्या/खंडोबाच्या नवसाची नविन माहिती. धन्यवाद.
3 Nov 2010 - 7:59 pm | कोकणप्रेमी
फोटो झक्कास. आपण दिलेली माहितीही झक्कास, जायलाच पाहिजे एकदा
3 Nov 2010 - 11:18 pm | चिंतामणी
दोन्हिही छान.