मिसळपावच्या सदस्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
(ईश्वराची प्रचिती जीवाला अधिभौतिक, अध्यात्मिक, अधिदैविक पातळीवर येते. ही अनुभूती एकरस, एकसंध असली तरी वैचारिक मांडणीसाठी हे वर्गीकरण केले आहे. भाग १ मध्ये ईश्वराचे अध्यात्मिक स्वरूप आणि ज्ञानमार्ग यांचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आधिदैविक स्वरूप आणि भक्तीमार्ग/ नित्योपासना यांचा थोडक्यात आढावा घेऊ.)
भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून या भागाची सुरुवात करतो. भगवान दत्तात्रेयांचे त्रिमुखी रूप परमेश्वराचे समग्र आकलन होण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. ब्रह्मदेव (उत्पत्ती, सृजन), विष्णू (स्थिती, प्रतिपालक शक्ती) आणि महेश (लय, कल्पांत) असे हे स्वरूप आहे. परमेश्वराचे परमकारुणिक स्वरूप असलेले विष्णूतत्व हा अधिदैविक प्रान्त. अध्यात्मिक आणि अधिभौतिक याना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. 'संभवामी युगे युगे' असे वचनच श्रीहरीने दिले आहे आणि ते सार्थही केले आहे. अनन्य भावाने शरण आलेल्याला 'योगक्षेमं वहाम्यहम' अशी ग्वाहीच भगवंत देतात. प्रामाणिकपणे अध्यात्मिक उन्नती व्हावी असा प्रयत्न करणाऱ्या साधक, उपासकांना मदत करण्यासाठी हे 'गुरुतत्त्व' अखंड, अथक कार्यरत असते. हे गुरुतत्त्व ईश्वरी अवतार या रूपात प्रकटते, तसेच साधना/ उपासना करत वेगवेगळ्या मार्गाने विभूतीमत्वाला पोचलेल्या संतांच्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या संतधर्माच्या माध्यमातून अनुभवास येते. हेच तत्व प्रत्येक जीवाच्या हृदयातही असते. या आतल्या गुरूला जागे करण्याचे काम बाह्य गुरुतत्त्व करते आणि मग पुढची वाटचाल सुरू होते.
परमेश्वराचे राम, कृष्ण, श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी समर्थ यांच्यासारखे अवतार होतात. अजन्मा जन्माला येतो. चैतन्य देह धारण करते. सर्वसामान्य व्यक्तीचा जन्म 'जन्म घ्यावा लागे वासनांचे संगे' अशा प्रकारे होतो, तसे ईश्वरी अवतारांचे नसते. विशिष्ट हेतूने हे अवतार होतात. त्यांना आपले जीवितकार्य काय आहे याची सुस्पष्ट जाणिव उपजतच असते अथवा काही ईश्वरी संकेतानुसार घडलेल्या घटना सहाय्यभूत ठरून ती अल्पवयातच होते. सर्वसामान्य व्यक्तीला चमत्कार वाटतील अशा काही घटना यांच्या आयुष्यात घडून येतात. गर्दी गोळा करण्यासाठी हातचलाखीचे प्रयोग करावेत असा तो प्रकार नसतो. हे कार्य ठराविक स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या ओघाने येणार्या काही मर्यादा पाळत करावे लागते. प्रारब्धाचे फारसे बंधन नसताना आणि सिद्धी प्राप्त असूनही हे अवतार मर्यादाभंग करत नाहीत. समाजाची निकोप धारणा व्हावी या दृष्टीने काही संकेत नेहेमीच पाळले जातात, ते अहंभावाने झुगारून देत नाहीत. उलट कमालीच्या हालअपेष्टा सोसत काही आदर्श प्रस्थापित करतात, काळाच्या ओघात झाकोळल्या गेलेल्या काही मूल्यांचे पुनरुज्जीवन करतात . नैतिकतेला उजाळा देतात. यासाठीच स्वत: ज्ञानदेव पैठणच्या पुस्तकी विद्वानांकडून 'शुद्धीपत्र' आणतात. वासुदेवानंद सरस्वती आपल्या प्रत्येक चुकीबद्दल कठोर प्रायश्चित्त घेतात. मारून मुटकून या अवताराना दोन हात, दोन पाय आहेत म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य ठरवणे चुकीचे आहे. या भ्रांत गृहीतकाच्या पायावर तत्कालीन वास्तवाकडे डोळेझाक करून यांचे एखादे वाक्य, कृती कुतर्काच्या कचाट्यात पकडून बुद्धिभेद करणारे साहित्यिक प्रलाप काढणे हे बुद्धीप्रामाण्य नाही. ते पाखंडच!
ईश्वराचे जसे अवतार होतात, तसेच तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य, प्रापंचिक आयुष्य जगणारे काहीजण आपल्या साधना, उपासनेच्या जोरावर विभूतीमत्वाला पोचतात. सद्गुरूपदच काय तर जगद्गुरूपद मिळवण्यास पात्र होतात. सुपात्र, श्रद्धावान आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील असणाऱ्या शिष्याला त्याच पातळीवर पोचवून ही परंपरा अखंड चालू राहते. यात उभयपक्षी काही पात्रता असणे अनिवार्य असते. त्या जोडीनेच ईश्वरी संकेत आणि त्याची कृपा दोन्ही कार्य करतात. साधना/ उपासनेचे बरेच मार्ग 'गुरूपदिष्ट' आहेत. मोठमोठ्या प्रकल्पावर काम करणारे अभियंते विद्यापीठात पाहुणे परीक्षक म्हणून जातात, मुलाखती घेतात. सुपात्र व्यक्ती हाती आली तर आपल्या संस्थेत तिला पद देऊ करतात आणि तिच्या हातून एखादे महत्कार्य करून घेतात. साक्षात्कारी सद्गुरू आणि शिष्य यांचे संबंध याच स्वरूपाचे असतात. त्या विषयी विवेचन स्वतंत्र लेखात करेन. मिसळपावचे होमपेज या दृष्टीने समर्पक आहे. सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंशावतार आहेत आणि मुक्ताई ही चित्कला, आदिशक्तीचा अंश आहे. तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखेच लौकिक जीवन जगत, सगळ्या शिव्या ओव्या पचवत, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असा अविरत संघर्ष करत आपल्या निस्सीम भक्तीच्या जोरावर जगद्गुरूपदी पोचले. तात्पर्य हेच की निर्गुण, निराकार, अचल, अविकारी असे परमेश्वराचे शिवतत्त्व आणि जडतत्वाने बनलेले भौतिक जग या व्यतिरिक्त अध्यात्मिक साधना उपासना करणार्यांना, आपला 'स्वधर्म' ओळखून त्यानुसार जीवितकार्य करण्यासाठी सक्रीय साहाय्य करायला तत्पर असलेले विष्णूतत्व अस्तित्वात आहे.
आता मागच्या भागात एकांगी ज्ञानमार्गाचा केला, तसा थोडक्यात एकांगी भक्तीचा विचार करू. सर्वस्व पणाला लाऊन केलेल्या ईश्वरभक्तीचे वर्णन भावार्थ गीतेत अत्यंत समर्पकपणे केले आहे.
तुझी श्रीहरी सगुण साजिरी मूर्ती अंतरी ठसली, वृत्ती जयांची तवपदी सदा भाव-भक्तीने रतली|
रात्रंदिन ती सर्व इंद्रिये तुझे ची निरुपम रूप, सुखे भोगिती तन्मय होती तो आनंद अमूप|
सर्वसंगपरित्याग करणाऱ्या रमण महर्षी आणि आदय शंकराचार्य यांच्याइतकेच सर्वस्व समर्पित करणारे मीराबाई, चैतन्य महाप्रभू आणि जगदगुरू तुकोबाराय विरळे असतात. सर्वस्व पणाला लाऊन भक्ती साधणे, स्वात्मदान करणे हे तर हटयोगापेक्षाही अवघड आहे. अशी अमला भक्ती ज्याने साधली त्या भक्तासाठी फक्त अधिदैविक हेच वास्तव होते. निस्सीम भक्ताची भावदशा इतकी अलौकिक असते की त्याला अमूर्त अध्यात्मिक संकल्पना चक्क निरर्थक वाटतात. अधिभौतिक जगातल्या मोहमयी विकारवासनाही त्याला भुरळ घालत नाहीत. रमण महर्षी असोत की चैतन्य महाप्रभू यांचे चरित्र वाचून सहज लक्षात येईल की महर्षीना सहज साधलेले प्रखर वैराग्य असेल किंवा चैतन्य महाप्रभूना सहज साधलेली निस्सीम भक्ती असेल दोन्हीमागे प्राग्जन्मी केलेली साधना, उपासना फळाला आलेली असते. सर्वस्व पणाला लाऊन 'स्वेष्णा' धरावी, सर्वस्व झोकून देऊन कृष्णभक्ती करावी हे वैचारिक निर्णय नसतात, ती तार्किक निष्पत्ती नसते. अत्यंत प्रबळ अशी अंतप्रेरणा अशा अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी घडवून घेते. या वरून सहज लक्षात येईल की एकांगी सांख्य/ ज्ञाननिष्ठेइतकीच एकांगी भक्ती सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाची अवस्था कशी असते हे पुढच्या भागात बघू या.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
18 Oct 2010 - 12:22 am | शुचि
मूकवाचक, आपल्यालाही विजयादशमीच्या शुभेच्छा. आपले लेख मला फार म्हणजे खूप आवडतात. आपण या भागात गुरु आणि भक्तीमार्ग हे दोन्ही विषय फार समर्थपणे हाताळले आहेत. गुरु या विषयावर अजून येऊ द्यात :) साक्षात चिंतामणी , कामधेनु, कल्पतरू म्हणजे गुरु जितकं लिहाल तितकी आमची तहान वाढेलच
_______
माझ्याकडे वासुदेवानंद सरस्वतींचे अर्थात टेंबेस्वामींचे एक पुस्तक आहे त्यातून पुढील उतारा घेतला आहे ज्यात भक्तांची देखील श्रेणी दाखविली आहे -
अर्थार्थी भक्त- उपासक परमेश्वराला भजत असतो आणि त्याच्या कृपेने आपला संसार सुखाचा होत आहे असे मानतो त्यालाही अर्थात प्ररब्धानुसार दु:खप्राप्ती होणारच.छोटेमोठे दु:खाचे प्रसंग सर्वांच्या आयुष्यात येतच असतात व भक्त-अभक्त त्या सर्वांना आपापल्या कुवतीनुसार तोंड देतातच. पण एखादा प्रसंग असा येतो ज्यायोगे परमेश्वर हा माझा सुखकर्ता आहे या भक्ताच्या श्रद्धेलाच धक्का देऊन जातो. दु:खाच्या या तडाख्याने व्हिव्हल, व्याकुळ, दीन आणि हताश झालेला हा भक्त त्यावेळी आर्त होतो. त्याची भक्ती पुन्हा त्याला परमेश्वराकडे (किंवा संतांकडे) नेते. त्याच्याशिवाय दुसरा कुणी त्राता नाही या विश्वासाने तो पुन्हा परमेश्वरालाच शरण जातो. ही भक्तीची २ री पायरी समजायला हरकत नाही. या आर्त भक्ताला मानवी जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता तसेच वैषयिक सुखाची भ्रामकता कळू लागते. म्हणजे विवेक जागा होतो हे सत्संगाचे प्रमुख फळ आहे. जीवनातील या आपत्तीच परमेश्वरकृपा असेल तर वैराग्याला कारण होतात. वैराग्य म्हणजे नैराश्य नव्हे. संसाराचे सगळे रंग फिकट होणे म्हणजे वैराग्य. राग आणि द्वेष या दोन्हीची तीव्रता कमी होणे.वैराग्य हे दु:खाची तीव्रता कमी करते आणि विषयाची ओढ ढीली करते. नैराश्य मनाची उभारीच काढून टाकते. वैराग्य हे विवेकाचे म्हणजे विचाराचे फळ आहे. नैराश्य हे अविचाराचे मोहाचे फळ आहे.थोडक्यात ज्या दु:खांमुळे सर्वसाधारण माणूस निराश होतो त्यांतच साधकाला प्रगतीची बीजे गवसतात. असो.
अशा रीतीने सुखदु:खाचे आघात झेलीत जाणारा हा आर्त भक्त ह्या द्वद्वातून पूर्णपणे सुटण्याची म्हणजे मोक्षाची इच्छा करू लागतो. पापपुण्य भोगून त्यांचा जसा क्षय होतो, तसतशी चित्तशुद्धी होते व मुमुक्षा प्रकट होते. चित्तशुद्धीच्या प्रमाणात ही मुमुक्षा तीव्र होत जाते हा भक्त जिज्ञासू या संज्ञेला प्राप्त होतो. अशा परीपक्व भक्ताला मग परमेश्वर सद्गुरुंची भेट घडवून देतो.
18 Oct 2010 - 2:26 am | शुचि
मूकवाचक, आपण इतक्या छान रीतीने पुढील प्रकरणाची पार्श्वभूमी तयार केली आहेत :) मी जितक्या वेळा हा लेख वाचते आहे नवीन गोष्टी समोर येत आहेत. आत्ताच जालावर जाऊन पाहीलं की आपण का म्हणता की >> एकांगी सांख्य/ ज्ञाननिष्ठेइतकीच एकांगी भक्ती सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.>> आणि पुढील मुद्दे लक्षात आले.
(१) ज्ञान मार्ग हा सामान्यांकरता नाही कारण त्यामधील धोका आहे "अहंकार वृद्धी". हा निसरडा मार्ग आहे. पूर्ण ज्ञान प्राप्त होऊन देखील केवळ गर्व/अहंम यामुळे सगळं मुसळ केरात जाऊ शकतं.
(२) भक्ती मार्ग हा सामान्यांकरता नाही कारण "कामवासना वृद्धी" हा त्यामधील धोका. अनिष्ट वळण लागलेली मधुरा भक्ती हे उदाहरण माहीत आहेच.
(३) हठयोग अर्थातच शाररीक अति श्रमाचा आणि कष्टप्रद
मग उरतो कर्मयोग.
आजवर इतक्या खोलवर या मार्गांचा विचार केला नव्हता. आपले शतशः धन्यवाद.
18 Oct 2010 - 11:54 am | राघव
शुचितै,
मला वाटतं थोडं चुकतंय. सगळ्या संतांनी भक्तीलाच प्राधान्य दिलेलं आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तोच मार्ग सोपा आहे. बुद्धी असो वा नसो, शरीर सुयोग्य असो वा नसो, प्रेम सगळ्यांना करता येते. अन् भक्तीमधे हे प्रेमच तर हवे ना. म्हणून तोच सामान्य लोकांसाठीचा मार्ग होय.
तुम्ही जे मधुराभक्तीबद्दल म्हणताय तो महाभावातला एक भाव - सखीभाव (श्रीराधिका, श्रीमीराबाई) आहे. ऐकिवात आहे की असे एकूण सोळा भाव आहेत ज्यापैकी कोणत्याही एका भावाने भक्ती साधता येते. जसे दास्यभाव (श्रीहनुमान, श्रीसमर्थ), संतानभाव(श्रीरामकृष्ण परमहंस - त्यांनी महाभाव धारण केलेला होता पण मुख्य भाव हा संतानभाव). जर सोळाही भावांनी भक्ती साधली तर त्याला महाभाव म्हणतात. तसे करणारे केवळ तीन साधक होऊन गेलेत त्यातले दोन मला माहिती आहेत ते म्हणजे श्रीगौरांग म्हणजे श्रीचैतन्य महाप्रभू आणि दुसरे श्रीठाकूर म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस. आपण या भावांचा विचार करून साधना करायला बसलो तर ते कधी होणे नाही. भक्ती मधे भगवंताचे प्रेम महत्त्वाचे. त्यात १००% साधले की बाकी गोष्टी आपोआपच साधल्या जातात.
राहिला प्रश्न कर्मयोगाचा, तर तो साधण्यासाठी गुरुला अनन्यभावे शरणागत होणेच महत्त्वाचे.ते झाले की कर्मयोग आपोआपच साधतो.
मूकवाचक,
चांगलं लिहिताय. काही शंका आहेत त्या नंतर एकत्रच विचारेन.
18 Oct 2010 - 2:13 pm | शुचि
असू शकेल. अधिकृत माहीती नाही जे जालावर उपलब्ध आहे त्या तोकड्या ज्ञानावर मी निष्कर्ष काढलेले आहेत. संतांनी देखील भक्तीमार्गच स्वीकारा असं कुठेच म्हटलं नाहीये. ज्याची जशी प्रकृती तो तसा मार्ग स्वीकारू शकतो. भक्तीमार्ग हा सर्वसामान्यांना चटकन अपील होत असावा इतकच.
बाकी राहीले १६ भाव. मला जालावर ५ सापडले - शांत, दास्य, वात्सल्य, सख्य, माधुर्य. तुमचं बरोबर आहे वात्सल्य, दास्य आदि भावनेने एकरूप होता कामवासना शिवत देखील नाही.
__________________________________
पण भक्तीमार्गदेखील वाटतो तितका सोपा नाही -
शुचिता हा भक्तीमार्गाच्या इमारतीचा पाया धरता येईल. बाह्य शुचिता आणि अन्नाची शिवाशिव हे दोन्ही त्यामानानी सोपे आहे, पण आचार विचारांची शुद्धी ही फार महत्त्वाची . या शुद्धीप्रक्रियेमध्ये, सत्य, आर्जव, दया, अभिद्य म्हणजे इतरांच्या वस्तू न घेणे, गर्व न करणे, इतरांनी दुखावले तरी मोठ्या मनाने क्षमा करणे आदिंचा समावेश होतो. (साभार - http://en.wikisource.org/wiki/The_Complete_Works_of_Swami_Vivekananda/Vo...)
18 Oct 2010 - 6:14 pm | राघव
असू शकेल. अधिकृत माहीती नाही जे जालावर उपलब्ध आहे त्या तोकड्या ज्ञानावर मी निष्कर्ष काढलेले आहेत. संतांनी देखील भक्तीमार्गच स्वीकारा असं कुठेच म्हटलं नाहीये. ज्याची जशी प्रकृती तो तसा मार्ग स्वीकारू शकतो. भक्तीमार्ग हा सर्वसामान्यांना चटकन अपील होत असावा इतकच.
खरंय. श्रीठाकूरच म्हणतात - (भगवत्प्राप्तीसाठी) जतो मत ततो पथ.
श्रीगोंदवलेकर महाराजांनी भक्तीमार्ग सर्वसामान्यांना सोपा आहे असे स्पष्टपणे सांगीतलेले आढळते. असो.
बाकी राहीले १६ भाव. मला जालावर ५ सापडले - शांत, दास्य, वात्सल्य, सख्य, माधुर्य. तुमचं बरोबर आहे वात्सल्य, दास्य आदि भावनेने एकरूप होता कामवासना शिवत देखील नाही.
:)
पण भक्तीमार्गदेखील वाटतो तितका सोपा नाही -
शुचिता हा भक्तीमार्गाच्या इमारतीचा पाया धरता येईल. बाह्य शुचिता आणि अन्नाची शिवाशिव हे दोन्ही त्यामानानी सोपे आहे, पण आचार विचारांची शुद्धी ही फार महत्त्वाची . या शुद्धीप्रक्रियेमध्ये, सत्य, आर्जव, दया, अभिद्य म्हणजे इतरांच्या वस्तू न घेणे, गर्व न करणे, इतरांनी दुखावले तरी मोठ्या मनाने क्षमा करणे आदिंचा समावेश होतो. (साभार - http://en.wikisource.org/wiki/The_Complete_Works_of_Swami_Vivekananda/Vo...)
सोपा म्हणजे इतर मार्गांच्या तुलनेत सोपा. साधन-शुचिता काया-वाचा-मने सांभाळणे भल्याभल्यांना जमत नाही. तेथे आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा? पुन्हा त्यात कर्मकांडाधीन होऊन कर्मठ होण्याचा धोका आहेच.
भगवंताचे नाम कोणीही, कोणत्याही काळी, कोणत्याही अवस्थेत घेणे योग्य मानले गेलेले आहे. भगवंतच कर्ता ही भावना मनात सतत बाळगण्याची, रुजण्याची ती सुरुवात आहे. ही भावना पूर्णपणे साधल्या गेली की त्याची परिणती शरणागतीमधे होते. आणि त्यासाठी बंधन हे भगवंताच्या प्रेमाचे असल्यामुळे कर्मठ बनण्याचा भाग आपोआपच नाहीसा होतो. मनात भगवंताबद्दल अन् पर्यायाने सर्वांबद्दल फक्त प्रेम हवे एवढी एकच संतांची सगळ्यांजवळ विनवणी आहे. संतांच्या सांगण्यानुसार भगवंताचे नाम प्रेमाने सतत घेत असणार्यास हे हळूहळू आपोआप साधते. वेगळे प्रयत्न करण्याची गरज उरत नाही. स्व. ती. बेलसरेबाबा हे याचे अलिकडच्या काळातले मूर्तीमंत उदाहरण आहे.
जे तुम्ही शुद्दीप्रक्रीये मधे सांगत आहात ते सर्व मनात प्रेम उत्पन्न झाले की आपोआपच हळूहळू साधल्या जाईल. शेवटी हा एक मार्ग आहे. तो पूर्ण होईतोवर कुणीही परिपूर्ण नाही. :)
18 Oct 2010 - 7:19 pm | शुचि
गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट सांगीतलं आहे याची कल्पना नव्हती. माहीतीबद्दल धन्यवाद. नामस्मरणाबद्दल खूप छान सांगीतलत राघव.
18 Oct 2010 - 2:42 pm | यशोधरा
पहिला भाग कुठे?
18 Oct 2010 - 3:04 pm | मितभाषी
आतापर्यंत मिठाइचे फक्त वर्णन वाचले/ऐकले होते. तुमच्या लेखमालेचा प्रवास पहाता तुम्ही मिठाइ खिलवणार असे वाटतेय.
शुचितै आणि राघव यांचे प्रतिसादही आवडले.
18 Oct 2010 - 9:25 pm | अर्धवटराव
तसा हा विषय गहन आहे. तुम्ही फार छान सोपा करुन कथन करताय.
(श्रवणभक्त) अर्धवटराव
19 Oct 2010 - 3:54 am | मूकवाचक
या लेखाला प्रतिसाद देणार्या सर्वान्चा आभारी आहे. तुमचे योगदान मूळ लेखापेक्षाही मोलाचे आहे.
25 Feb 2012 - 11:06 am | रणजित चितळे
आनंद झाला.
वाचून खूप छान वाटले.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
25 Feb 2012 - 3:29 pm | चौकटराजा
मुकवाचक ,
आपला लेख वाचून मी दिपून गेलो. गहिवरून आले. डोळ्यातून आनंदाच्या अश्रूधारा वाहू लागल्या.
आपल्या लेखाबद्दल माझ्याकडे प्रचंड मतभेदाशिवाय काहीही नाही.
उदा अध्यात्म व भक्तिमार्ग हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत असे मी मानतो .
पुण्यातले असाल तर प्रत्यक्श चर्चा करू.
27 Feb 2012 - 12:18 pm | प्यारे१
>>>आपल्या लेखाबद्दल माझ्याकडे प्रचंड मतभेदाशिवाय काहीही नाही.
उदा अध्यात्म व भक्तिमार्ग हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत असे मी मानतो . <<<
आम्हा पामरांना ज्ञानाचे अमृत पाजा माऊली...
28 Feb 2012 - 11:06 am | मूकवाचक
आपला लेख वाचून मी दिपून गेलो. गहिवरून आले. डोळ्यातून आनंदाच्या अश्रूधारा वाहू लागल्या.
आपल्या लेखाबद्दल माझ्याकडे प्रचंड मतभेदाशिवाय काहीही नाही.
- 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' असे असतेच.
अध्यात्म व भक्तिमार्ग हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत असे मी मानतो .
- असे मानणार्या विचारधारा होत्या, आहेत आणि असतील. 'जतो मत ततो पथ'.
पुण्यातले असाल तर प्रत्यक्श चर्चा करू.
- या बाबतीत काही व्यक्तिगत मर्यादा (लिमीटेशन्स) आडव्या येतात. क्षमस्व.
27 Feb 2012 - 11:47 am | शशिकांत ओक
विचारवंत अजून प्रकटले कसे नाहीत ? असो.
मुक वाचक,
आपल्या माहितीपुर्ण लेखाने सुविचार वाचनाचा आनंद मिळाला.
धन्यवाद..
असेच अधिक वाचायला आवडेल.