काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ...
"ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो. कुठे जायचे ते ठरले नव्हतेच. मग पनवेलला एका पेट्रोलपंपावर टाकी फुल्ल केली (बाईकची : आमची टाकी आम्ही संध्याकाळी ६.०० च्या दरम्यान भरली त्यादिवशी.) आणि तिथेच त्या पंपावरच्या एका माणसाला विचारले...
"भाऊ, खोपोली किती अंतर आहे इथून?"
उत्तर चक्क मराठीतच मिळालं..."आसंल की ४० किलोमीटर!"
आत्तापर्यंत रिमझिम सुरू झाली होती. सौ.चे उत्तर आले, ठिक आहे. निघुया आपण खोपोलीच्या दिशेने. कंटाळा आला की परत फिरू. बाईकवर बसलेला होतो म्हणुन टुणकन वगैरे उडी नाही मारता आली. पण लगेच पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. म्हणलं पुन्हा मॅडमचा विचार बदलायच्या आत निघा. पनवेल ओलांडून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. मध्येच एका धाब्यावर गरमा गरम भजी आणि कडक चहा मारला. (फक्त दोन कप प्रत्येकी)
पाऊस वाढला होता, पण आजुबाजुला पसरलेली हिरवाई बघुन चित्तवृत्ती बहरून आल्या होत्या. आम्ही दोघेही माझ्या होवून गेलेल्या आजारपणाबद्दल विसरायला लागलो होतो. मी विचारलं तिला, रेनकोट काढू का बाहेर? तर म्हणाली..जावुदे...श्री स्वामी समर्थ म्हणूया आणि निघू. माऊली घेतील काळजी!
तिचा पुढचा प्रश्न होता, खोपोलीपासुन खंडाळा जवळच आहे ना रे? जायचं.....?
मी खुशीतच गाडी चालु केली आणि सुसाट निघालो.... मिशन खंडाळा !
पाऊस, हळू हळू गात्रां-गात्रांतून झिरपायला लागला होता. रंध्रा-रंध्रातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन द्यायला लागला होता. आजुबाजुला पसरलेले हिरवेकच्च डोंगर आणि पावसाने भिजलेला, नुकतेच केस धुवून वाळवायला बसलेल्या, पण पावसाच्या ओढीने पुन्हा पुन्हा भिजवणार्या एखाद्या रमणीच्या लांब केसांसारखा, ओलेता लांबवर पसरलेला रस्ता मोहून टाकत होता. त्यात नेहमी केस मोकळे सोड म्हटले तर 'नको, गुंता होतो' म्हणून डोळे वटारणारी सहधर्मचारिणी मस्त केस मोकळे सोडून मागे बसलेली. तिचे खोडकर केस अधुन मधुन वार्याबरोबर माझ्या मानेशी चाळा (चाळे नव्हे!) करत होते. हाय्य जालीम, स्वर्ग्..स्वर्ग म्हणतात तो हाच असावा!
वेड लावणारा रस्ता....
साधारण १५ किमीच्या आसपास क्रॉस केल्यानंतर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजुला एक मोठा धबधबा दिसला. मी बाईक थांबवली, सौं.ना म्हणालो...'उतरा!' तीने धबधब्याकडे बोट दाखवले, "बघ तिथे सगळे जेंटस दिसताहेत, एकही मुलगी दिसत नाही. उगाचच रिस्क घेण्यात अर्थ नाही. काही दिवसांपुर्वीच माळशेजघाटात एका डोंबिवलीकर कुटूंबाच्या बाबतीत घडलेली घटना वाचली होती. धबधब्यावर आलेल्या दारुड्यांनी त्यांना विरोध केला म्हणून एका सदगृहस्थाला खुप मारहाण केली होती. त्यामुळे आमच्या सौ.ने तिथे जायला सरळ सरळ नकार दिला.
ठिकै बाबा, इथुनच फोटो काढू, म्हणत मी कॅमेरा सावरला आणि दोन तीन स्नॅप्स मारले.
मग आम्ही पुन्हा गाडी पुढे काढली आणि तिथून साधारण पाच्-सहा किमीवर डोंगरात आणखी एक छोटासा धबधबा दिसला. हा धबधबा मुख्य रस्त्यापासुन खुप आत होता पण तिथे फारशी गर्दीही दिसत नव्हती. एक दोन जणच होते. इथे मात्र कुलकर्णीबाई लगेच तयार झाल्या आणि आम्ही त्या धबधब्यावर दाखल झालो. छोटे छोटे ओहोळ होते पाण्याचे, पण खळखळत्या पाण्याचा तो आवाज वेड लावत होता. पायातली खेटरं काढून गाडीच्या हँडलला लटकवली आणि तसेच अनवाणी पायांनी धबधब्याच्या पाण्यात उतरलो.
पायाला होणारा पाण्याचा स्पर्श खुपच सुखावणारा होता. पण तेवढ्यात वरून पावसाचा वेग वाढला, आत्तापर्यंत संथपणे रिमझिमत येणारा पाऊस धो धो करत कोसळायला लागला. पण आता ठरवलं होतं...., आता माघार नाही. थोडा वेळ तसाच पावसात भिजत त्या धबधब्यावर मस्ती केली आणि पुढच्या टप्प्याकडे निघालो.
खोपोलीच्या थोडं अलिकडे आपलं वविचं ठिकाण "युके'ज रिसोर्ट" दिसलं आणि गाडी थांबवली. बायकोला ते दाखवलं, म्हणलं येताना जेवू इथेच. तेवढ्यात तिथेच थोडं अलिकडे रोडवर अष्टविनायकापैकी महडचे देवस्थान अवघ्या दिड किलोमीटरवर असल्याचा बोर्ड दिसला आणि मग तिकडे वळलो. काल गुरूपोर्णिमा होती, म्हणलं त्या निमीत्ताने श्रींचे दर्शनतरी घेवू. वरद विनायकासारखे दुसरे सदगुरू कोण असू शकेल? गाडी मागे वळवली आणि महडच्या दिशेने आत शिरलो. छोटासा नागमोडी रस्ता होता. दोन्ही बाजुला लांबवर पसरलेली हिरवीगार शेते आणि लांबवर दिसणार्या धुकाळलेल्या किं ढगाळलेल्या डोंगररांगा वेड लावत होत्या.
मंदीरात जावून दर्शन घेतले. सुटीचा दिवस असुनही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात श्रींचे व्यवस्थीत दर्शन झाले. अष्टविनायकांपैकी वरदविनायक हा बहुदा चौथा गणपती. नक्की माहिती नाही, पण तिथेच लिहीलेल्या एका स्तोत्रावरुन मी हा अंदाज बांधला...
"स्वस्ति श्री गणनायको गजमुखं मोरेश्वर सिद्धीदहः l बल्लाळस्तु मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम् l लेण्याद्री गिरीजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरे l ग्रामे रांजण सस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम ll"
श्री वरद विनायकाचे मंदीर...
अतिशय प्रसन्न असा मंदीराचा परिसर, मागच्या बाजुला असलेला पाण्याचा तलाव. आता तो तितकासा स्वच्छ उरलेला नाहीये.
श्रींच्या मंदीराच्या मागे बांबुच्या बेटावर असलेले दत्तगुरूंचे मंदीर दिसले आणि धन्य झालो. म्हणलं चला गुरूपोर्णिमेच्या दिवशी श्री दत्तात्रेयांचे दर्शन यासारखे भाग्य कुठले. धडपडत तिथे जावून पोहोचलो. तर दार बंद. काय तर म्हणे दुपारी १२.३० ते दोन च्या दरम्यान मंदीर बंद राहील. म्हणलं इतर दिवशी ठिक आहे, पण आज गुरूपोर्णिमेच्या दिवशी तरी असल्या नियमांना अपवाद करायला काय हरकत आहे? शेवटी आपणच निर्माण केलेल्या यकश्चित मानवांच्या नियमांना बळी पडलेल्या श्री. दत्तगुरुंचे बाहेरुन दर्शन घेवून परत फिरलो.
मंडपाच्या शेवटच्या टोकाला श्री दत्तगुरूंचे मंदीर आहे...
दर्शन घेतले, प्रसाद घेतला. थोडा वेळ तिथे विसावुन परत पुढे निघालो. खोपोलीमधुन खळखळत जाणार्या पाताळगंगेचे लहानखुरे पात्र बघायला मिळाले. पाताळगंगेचे पाणी बघितल्यावर आठवण झाली की आपण खुप भिजलोय आणि आता अंगातली थंडी घालवण्यासाठी आपल्याला गरमागरम चहाची प्रचंड गरज आहे.
चहा घेतला, खोपोली ओलांडली आणि पावसाने परत हजेरी लावली. पण आता पावसाकडे बघायला फुरसतच नव्हती. आजुबाजुच्या डोंगरांना इतके पान्हे फुटले होते की कुठे पाहू आणि कुठे नको असे झाले होते.
घाटातला ओलावलेला देखणा, नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता मनाला भुरळ पाडीत होता.
गाडी सुरू केली आणि थेट अमृतांजन पॉईंटच्या रोखाने वाटचाल सुरु केली. आता मध्ये कुठे थांबायचे नाही असे ठरवले होते. तरी अमृतांजन पॉईंट ओलांडल्यावर तिथे थोडा वेळ थांबुन फोटो काढायचा मोह नाही आवरला.
यावेळी मात्र मी थोडासा चालुपणा केला होता. नेहमीचा जुना महामार्ग सोडून मध्येच एक्सप्रेस वे ला घुसलो होतो. त्यामुळे राजमाची पॉईंटखालचा तो बोगदा ओलांडला आणि गाडी रोड साईडला घेतली. तोपर्यंत मला भीती वाटत होती, कुणी अडवलं तर काय सांगायचं? कारण एकतर एक्सप्रेस वे वर बाईक अलाऊड नाहीये आणि काल जर कोणी अडवले असते तर माझ्याकडे गाडीचे कागदपत्रदेखील नव्हते. पुन्हा एकदा स्वामी समर्थांवर हवाला टाकून ( ) तसेच घुसलो, तर तिथे आमच्यासारखे बरेचसे बायकर्स गाड्या कडेला लावून उल्हास व्हॅलीच्या त्या रांगड्या पण देखण्या निसर्गपुरुषाचे फोटो काढण्यात मग्न झाले होते.
आजुबाजुला बरेच लहन मोठे धबधबे होते. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. इतके धबधबे एक साथ बघण्याची ही पहिलीच वेळ होती. आम्ही दोघेही त्यांच्यात सामील झालो. बाईक एका बाजुला लावली आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखे एका मागुन एक फोटो काढत सुटलो. तेवढ्यात सौभाग्यवतींचे लक्ष गेले..
"विशल्या, तिकडे बघ, तो 'संतोष जुवेकरच' आहे ना?"
मी तिकडे बघितलं, तर खरोखरच संतोष जुवेकरच होता तो. आपली सँट्रो बाजुला पार्क करून एकटाच हातातल्या मोबाईलने समोरच्या धबधब्याचे फोटो काढण्यात मग्न झाला होता. माझ्या डोळ्यासमोर क्षणार्धात त्याच्या 'पिकनिक'पासुन 'झेंडा'पर्यंतच्या त्याच्या अतिशय समर्थपणे साकारलेल्या भुमिका तरळून गेल्या. तोपर्यंत कुलकर्णीबाई त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्याशी गप्पादेखील मारायला लागल्या होत्या. मीही त्यांना जॉइन झालो. विशेष म्हणजे तोही कुठलाही बडेजाव वा फुकटचा अविर्भाव न बाळगता अगदी मोकळेपणाने बोलत होता. थोडावेळ गप्पा मारून त्याने आपली गाडी पुण्याच्या दिशेने पुढे काढली, अर्थात जायच्या आधी आम्ही त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्याची संधी दवडली नाही.
धबधब्यांचे फोटो....
चार वाजुन गेले होते. अजुन जेवण व्हायचे होते. त्यामुळे गाडी काढली आणि पुढे निघालो. लोनावळा बायपासपाशी गाडी पुन्हा जुन्या महामार्गावर घेतली आणि तिथुनच मागे फिरायचे ठरवले. तेवढ्यात तिथेच बाजुला एका गल्लीत काही लोक आत जाताना दिसले म्हणुन विचारपुस केली तर कळाले की तिथे कुठलातरी पॉइंट आहे आणि तिथुन धबधबा अजुन जवळून पाहता येतो. लगेचच आम्ही तिथे पोचलो. दुर्दैव म्हणजे मुख्य धबधबा इथुन अजिबात दिसत नव्हता पण आजुबाजुचे लहानमोठे असंख्य धबधबे आणि खास म्हणजे या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेली हिरवीगार उल्हास व्हॅली पुर्णपणे दिसत होती. साहजिकच मी कॅमेरा पुन्हा एकदा सरसावला...! अस्मादिकांनी आपले वैयक्तिक फोटो सेशनही उरकून घेतले.
उल्हास व्हॅली...
धबधबा
तिथुन अगदी जड वगैरे म्हणतात तशा अंतःकरणाने परत फिरताना शेवटचा एक स्नॅप मारलाच.
काही फोटो टाकायचे राहीले होते ते इथे टाकतोय
हो नाही, हो नाही करत एकदाचे परत निघालो. येताना मात्र गाडी राजमाची पॉईंटवरून घेतली. वरून दिसणारा घाटातील वाहतुकीचा मनोरम नजारा आणि खोपोली.
राजमाची पॉइंटवर आणखी एक दोन स्वतःचे फोटो काढून घेतले.
परतीच्या मार्गावर पुन्हा हिरव्यागार झाडीतून, नागमोडी वळणे घेत आजुबाजुचे धबधबे पाहात परत निघालो. परत फिरायची इच्छा होत नव्हती, पण परतणे भाग होते.
येताना स्व. दादा कोंडकेंच्या 'बागेश्री'ला जेवलो. कुलकर्णीबाई युकेज नको म्हणाल्या. जेवण करून परतीचा रस्ता पकडला....
उद्यापासुन पुन्हा आठवडाभर रुटीन चालु. पुढचा शनीवार - रवीवार बहुदा भीमाशंकर......! बघू कसे जमते ते !
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
6 Sep 2010 - 6:09 pm | विशाल कुलकर्णी
नमस्कार, खुप दिवसानंतर मिपावर येतोय. सद्ध्या आमच्या हापिसात मिपा बंद आहे. घरचे नेटवर्क कालच सुरू झालेय त्यामुळे आज इथे हे पोस्टवतोय.
6 Sep 2010 - 6:18 pm | मेघवेडा
अरे वा! कुलकर्ण्यांनी टॉप गियर टाकलेला दिसतोय! इथंही आणि मिपाच्या बोर्डावरही! ;)
6 Sep 2010 - 6:26 pm | सहज
मस्त हिरवागार पावसाळी निसर्ग!
6 Sep 2010 - 6:35 pm | चिंतामणी
वर्णन आणि फोटु दोन्हिही छान.
भीमाशंकर लौकर येउ द्यात.
लौकर जमव.
6 Sep 2010 - 6:43 pm | शुचि
खूपच छान
6 Sep 2010 - 7:27 pm | विलासराव
फोटो आवड्ले. आटोपशीर वर्णन मस्तच.
6 Sep 2010 - 8:31 pm | हेम
...एक्क्क नंबर!!
तुमची जोडी..फोटो..युनिकॉर्न...खंडाळा...पाऊस्स्स्स्स!!!
6 Sep 2010 - 8:51 pm | आप्पा
आमच्या श्रीमतीजी एवढ्या हौशी नाहीत बुवा.
6 Sep 2010 - 9:04 pm | अनामिक
हेवा वाटावा असे आहेत सगळे फोटू.
6 Sep 2010 - 9:32 pm | चतुरंग
मस्तच सहल आणि नजारे!! :)
(पहिला फोटू भजी आणि मिरचीचा टाकायचा अस्सल दुष्टपणा मात्र बरा नव्हे हो! ;) )
(भजीप्रेमी)चतुरंग
11 Sep 2010 - 12:46 am | Pain
पहिला फोटू भजी आणि मिरचीचा टाकायचा अस्सल दुष्टपणा मात्र बरा नव्हे हो!
सहमत. हेवा वाटला.
7 Sep 2010 - 2:38 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी :)
रंगासेठ ते रक्तातच आहे हो... त्याला पर्याय नाही ;)
11 Sep 2010 - 12:22 am | माजगावकर
यकच नंबर फोटु... :)
फार काही ठरवाठरव न करता झालेल्या अशा सहलींमध्येच खूप मजा येते राव..!
11 Sep 2010 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो वर्णन आवडले. विशालसेठ, मागे सहा एक महिन्यापूर्वी मीही खोपोलीला बाईकवर गेलो होतो. पनवेलच्या पूलाखालून वळसा घालून जाणार्या खोपोलीकडे जाणार्या रस्त्याने मजा आली होती. 'झेनीथ' की असे काही तरी असलेल्या स्थळावर धबधबे खूप आहेत असे सांगितल्यामुळे गेलो होतो. अर्थात अपेक्षाभंग झाला तो भाग वेगळा. पुढे महाडच्या वरद विनायकाचे दर्शन घेऊन परत फिरलो होतो. मधेच कोणत्या तरी एका महापुरुषाची यात्रा भरणारे ठिकाण होते. आता नाव विसरलो पण, तिथेही जाऊन आलो होतो. चला,तुमच्या सफरीने आमच्या सफरीच्या आठवणी दरवळल्या...!
नेहमी केस मोकळे सोड म्हटले तर 'नको, गुंता होतो' म्हणून डोळे वटारणारी सहधर्मचारिणी मस्त केस मोकळे सोडून मागे बसलेली. तिचे खोडकर केस अधुन मधुन वार्याबरोबर माझ्या मानेशी चाळा (चाळे नव्हे!) करत होते. हाय्य जालीम, स्वर्ग्..स्वर्ग म्हणतात तो हाच असावा!
बरं चाल्लंय चालू दे.....!!!! :)
-दिलीप बिरुटे
11 Sep 2010 - 11:30 am | विंजिनेर
फंडू... पहिल्या फटूने एकदम माहोल सेट झालाय. लिखाण भारीच - रसिक.