पिसि जेसि चा पुढला भाग.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 May 2008 - 12:35 am

काही वर्षापूर्वी इब्राहिम मुल्ला या सॉलीसिटर फर्म ने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे एस्क्रो अकाउंटचे पैसे सुमारे साठ लाख अफरातफर होउन गहाळ झाले आहेत.नेहेमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पैसे बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले होते.त्याच्याकडे ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.तो खरा होता. पण चेक तर जमा झाला होता.
तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले.बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले.
पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.जोशी, मेहेता , मिश्रा याना अटक करण्यात आली .
तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे गहीरे होत गेले .
त्या तपासाची ही कहाणी.

===============================================================
हसून घे .आजचा शेवटचा दिवस. आज ऍरेस्ट पक्की.
उद्या सकाळी पंधरा दिवसाचा रीमांड घेतो. नंतर तू आणि मी. कसा कुटतो बघंच.विरकर फुस्कारला.
तो पर्यन्त थोरात नी एक मेहेतर खाली जाउन आणला होता.
क्या साब अभ्भी न्हाया था. असं पुटपुटत पण काही न बोलता कामाला लागला.
थोड्या वेळाने रुम परत साफ झाली. सगळे आयो आपापल्या जागी येउन बसले. एकीकडे मिश्रा आणि मेहेताच्या ऍरेस्टचे पेपर तयार झाले होते.मिश्रा चे खिसे मोकळे करण्यात आले. पट्टा काढून घेतला.पैशाचं पाकीट ,रुमाल ,शूज काढून घेतले. अंगझडती घेतली.
लॉक अप चा फॉर्म भरला. मेमोची कॉपी बनवली.
मेहेताची झडती घेण्याचा प्रश्न नव्हताच.पण विरकरला मेहेताची काळजी वाटत होती.
याला फिरदोसच्या रुम मध्ये टाक रे.बाबा लोकाबरोबर नको. स्साला सकाळी जिंदा राहणार नाही.
(छोट्या मुलांना वेगळा लॉक अप देतात . पण डेंजरस. ब्लेडच्या पात्यानी रात्री मारामारी करतात.)
मला सारखा एकच धसका . हा मला आत्ता लगेच आत का टाकत नाहीये.
मग डोक्यात प्रकाश पडला. सेशन कोर्टाचा शिपाई अजून आला नव्हता.संदीप बहल आणि अनील सिंग दोघही अँटीसिपेटरी बेल चा अर्ज टाकून बाहेर होते. म्हणजे, कोर्टात टाईट फील्डींग लावून शिपाई वाट बघत बसले असणार. समजा बेल रीजेक्ट झाला तर दोघांना घेउन आज रात्री आमने-सामने.कनफ्रंटेशन शिवाय याची लिंक लागणार नाही. रात्र भारी पडणार.
एव्हाना मिश्रा अणि मेहेता जमा झाले होते.
त्या मेहेताच्या भैणीला बोलाव रे. ती बाहेर गॅलरीतंच उभी असावी.
तेरे भाई को नाश्टा दिया.
हा सर .
मैने भी दिया. कलसे पेटभर खाना देता मै उसको.
तिनं डोळ्याला रुमाल लावला.
माधुरी दिसायला बरीच होती पण आता रडताना आणखी लाल लाल झाली होती.
विरकर आता वेगवेगळ्या अँगलमधून तीचा अंदाज घेत होता.
पैसा किधर रखा है तेरे भाईने?
बाईने आता गळा काढला.
मेरा भाई बेकसूर है साब .
इसको पैचानती क्या तू? माझ्याकडे बोट दाखवलं. हि गूगली होती . हि हो म्हणाली तर माझा आणि मेहेताचा संबंध आहे.
मान हलवून ती नाही म्हणाली.
गूड . पण तेरी भाभी क्युं नही आयी.
वो डिलीवरी मे गयी है साब.
अभी तेरा भाईका डिलीवरी कौन करेगा रे?
आता विरकर ला माधुरी मध्ये .जास्तच इंटरेस्ट आला.
तेरी शादी हो गयी क्या?
डायवोस हो गया.
पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली विरकरचं लक्ष विच्यलीत झालंय.
माधुरीकडे बघून तो म्हणाला मेरी वएफ भी गयी डिलीवरी मे.
माधुरी काहीच बोलली नही.
साहेब सि आर ल्याहा की आता.(सि आर म्हणजे क्राईम रीपोर्ट.)
प्रधान साहेब चिवचिवले.
विरकर कान खाजवत माधुरी कडे टक लावून बघत होता. एकदम दचकून त्यानी प्रधान कडे पाहीलं.
मी जरा दूरच उभा होतो.
ए भटा इकडे ये.
हा रिपोर्ट मी लिहीला आहे तो टाइप कर.
ठिक आहे साहेब.
आयला हे मला नव्हतं माहिती . साला दुपारपासून इथेच होता. माझं मॅटर तरी टाइप केलं असतं.प्रधान परत चिवचिवला.
आज प्रधान काही तरी गडबड करणार.माझ्या मनात एक पाल चुकचुकली.काहीतरी करून सात वाजेपर्यंत हा घरी गेला पाह्यजे.
तुमचे पण ठेवा ना साहेब पेपर . अर्ध्या तासात उडवतो.
इब्राहिम मुल्ला मधून चेक उडवले तसे का?.
विरकर मोठ्याने हसला.
प्रधान साहेब , तुम्ही घ्या ना इंटरोगेशन. तोपर्यंत मी जरा ....
एक तरुण वकील आत आला .सर , मी ऍडवोकेट वागळे.
बोला. संदीप बहल आणि अनिल सिंग च्या मॅटर मध्ये..
काय झालं ..एबी मिळाला का?
नाही साहेब .
तारीख पडली.पण नो ऍरेस्ट ची ऑर्डर आहे.
हे पहा वागळे, मला चौकशी साठी दोघही उद्या पाहीजेत.
उद्या नाही , परवा येतील साहेब . वागळे हसला.
विरकर चा पेशंस संपला .
मला उद्या पाहिजेत. सकाळी .
जसा आदेश साहेब.वागळे जवळजवळ पळालाच.
माधुरी चुळबुळत तशीच बसली होती.
प्रधान पेन तोंडात धरून तिच्याकडे बघत बसला होता. विरकर कंटाळला.
मनासारखं काहीच होत नव्हतं बहुतेक.
साडेचार वाजले असावेत. व्हिजीटर यायला लागले होते. लॉकअप ला पाठवलेले शिपाई परत आले.चहावाला आला .
तुम चाय प्येगी?.
नही साब .साब मेरा भाई...
वो ऍरेस्ट मै है. मै चान्स दिया था उसको.कल घर के तलाशी का ऑर्डर लायेगा. किधर रहेता है तुम
वडाळा सर.
घरमे कौन है और?
कोई नही सर.
विरकरने ओठावरून जिभ फिरवली.
तुम जाव अभी. घरमेच रहेना . तुमारा भै को भी लायेगा.
ठिक है साब.
===============================================================
सहा वाजायला आले होते.प्रधान ने फायली गोळा करायला सुरुवात केली होती.त्याचे पेपर मी संपवले होते.
साहेब मी चलू का?
तुम्ही निघा साहेब.
आता सुरुवात. मी मनात म्हटले.
भटा इथे बस .
मी खुर्चीवर बसलो.विरकर नी पट्टा हातात घेतला.
पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा .
फटका जोरात बसतो.अट्टल खिलाडी पण तीन फटक्यात संपतात.
महाडीक पाठीकडून पुढे आला. माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं.
विरकर नी पट्टा जोरात हाणला.डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं.
बोल , तुझ्या खात्यात चेक वटला कसा?
तळहात बधीर झाला होता.
दुसरा फटका. परत तोच प्रश्न.
महाडीक नी खुर्चीला लाथ मारली.
मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर .दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली.
मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात आंबट चव गोळा झाली.
पाठीवर एक जोरात रट्टा.
पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला.
हातातून विजेचे लोळ जायला लागले. डोळ्यातलं खारं पाणी, रक्त तोंडात जाउन मळमळायला लागलं.
मा****द,चेक आला कुठून ?
मनोरमा शेट्टी च्या खात्यातून .कर्ज घेतलं होत.
त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला.
मला माहीती नाही.
एक फायनल ऍसाल्ट.
अंदाज चुकला.
पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला.
वरचा श्वास वरचं राह्यला.
डोळ्यापुढे अंधारलं.
लाल लाल चांदण्या दिसल्या.
पुढे काही कळलंच नाही.
===============================================================
परत डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा दिसला.
परत लाल चांदण्या.कपडे गच्च ओले.
हात बर्फामध्ये.महाडीक चा चेहेरा दिसला.
विरकरचा आवाज येत होता.
नाही साहेब . फटका चुकून बसला.
नाही साहेब.ऍरेस्ट मेमो नाही लिहीला. परत शांतता.
हो सर.
जयहिंद .
किती वेळ गेला माहिती नाही.
अचानक सगळं काही फोकस मध्ये आलं.
साहेब ,जागा झाला.इकडे या.
कोणीतरी पाठीखाली हात घालून उठवलं.
विरकर समोर उभा होता.
चेहेरा घामानी थबथबला होता.
पाण्याचा पेला घेउन पुढे आला.
पाणी.....
नको...
पाठीतली कळ थांबतच नव्हती.
हातातली बर्फाची पिशवी गळून पडली.
दुसरा शिपाई पुढे आला.
मी ओळखलं. जनरल ब्रँचचा शिर्के.
मसाज वाला.
त्यानी माझा शर्ट वर केला.
बेंबीच्या वर काहीतरी चोळायला सुरुवात केली.
परत मोबाईल वाजला.
सर, होय सर, शुद्धीवर आला सर .
नाही सर.
उलटी नाही सर .
होय सर. बघतो सर.
ऍरेस्ट करावं लागेल सर.
होम मधून फोन होता सर.
ठीक आहे सर.
जयहिंद.
खालून मानेला पण बोलाव रे.विरकरचा आवाज कापत होता.
साडेआठ वाजले होते.
कष्टाने मी उठून बसलो.
महाडीक गप्प उभा होता.
मी टेबलवरून उतरलो.
खुर्चीत बसलो.
विरकर पुढे आला. काय बोलायचं हे त्याला सुचेना.
मी मंद हसलो.
त्याचा चेहेरा उजळला.
भटा, आज नोकरी घालवली असती माझी.
मी काय ख्वाजा युनुस वाटलो का?
(मार जनरल ब्रँचचा पडला होता एकदा.)
खोलीतलं वातावरण थोडं मोकळं झालं.
चहा ?
नको.
मी महाडीकला खूण केली.
माझ्या बॅगेतून हायफिनॅकची गोळी काढली.
एका घोटात खाली घातली.
थोड्या वेळानी स्पॅझम कमी झाले.
मी उठून लादीवर आडवा झालो.
नउ चे ठोके वाजले.
===============================================================
दहाच्या ठोक्याला मी परत उठून बसलो.
विरकर समोर जाउन बसलो.
करा ऍरेस्ट साहेब.ठीक आहे आता.
क्षणभर विरकर गलबलला.
सॉरी , भटा फटका चूकून बसला.
आज हवं तर लॉकअप मध्ये टाकत नाही.
आता त्याचा चेहेरा मला लहान मुलासारखा दिसायला लागला.
मी मंद हसलो.
चलता है.आटपा लवकर.
मला मेहेताची आठवण झाली.साला आत रडत असेल.मिश्रा घोरत असेल.
मेमो लिहून तयार होताच.
साडेदहा वाजता दोन शिपायांबरोबर मी लॉकअप कडे चालायला लागलो.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

रामदास's picture

10 May 2008 - 9:34 am | रामदास

+

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 10:49 am | प्रभाकर पेठकर

वाचताना अंगावर काटा येतो.
क्षणाक्षणातले विचार आणि घटना मांडण्याची घाटणी मस्त आहे. आवडली. क्वचित, कोण, कोणाला बोलतय ह्याचा गोंधळ होतो. बाकी लेखन प्रभावशाली झाले आहे. अभिनंदन.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. (असेल तर. कारण 'क्रमशः' लिहीलेले नाही.)

रामदास's picture

10 May 2008 - 11:04 am | रामदास

गोंधळ की बोर्ड वर हात बसला नाही म्हणून आणि लिहीलेले एडीट झाले नाही म्हणूनही.

अभिज्ञ's picture

10 May 2008 - 11:20 am | अभिज्ञ

अभिनंदन.लेखन छान झालेय.कुठली तरी कादंबरि वाचतोय असाच भास होतो.
लिखाणाची शैली आवडली.वाचताना "पुढे काय ?"अशी सतत उत्सुकता लागून रहाते.
मागचा भागहि छानच झाला आहे.
असेच लेखन येउद्यात. ....

अबब

राजे's picture

10 May 2008 - 12:20 pm | राजे (not verified)

अबब शी सहमत.

खरोखरचा अनुभव आहे की कल्पनाविलास ? हा एक प्रश्न मनी राहीला आहे ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन's picture

10 May 2008 - 3:03 pm | मन

आता थोड थोडं कळु लागलं आहे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

भडकमकर मास्तर's picture

10 May 2008 - 3:18 pm | भडकमकर मास्तर

ओहो, रामदास साहेब, मस्त झालंय...
लिहा अजून लिहा....
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...( आणि नक्की अपहार कसा झालाय हे समजून घ्यायच्या प्रतीक्षेत)
.... ( प्रथम पुरुषी लिहिल्यामुळे ही कथा भलतीच अंगावर येते.. असे आमचे निरीक्षण आहे)

रामदास's picture

10 May 2008 - 5:40 pm | रामदास

अपहार झाला होता. सत्य घटनेचा आधार आहे.
पुढच्या भागात कसा झाला ते कळेलंच.
आभारी आहे.

झकासराव's picture

10 May 2008 - 5:27 pm | झकासराव

आता उत्कंठा वाढली आहे. :)
पहिल्या भागात वाचताना अस वाटल होत कथा सांगणार्‍याच पोलिसाबरोबर सेटिंग आहे म्हणून तो टेन्शन फ्री आहे पण ह्या भागात तर त्याला पण घेतला की.
हाणामारीच वर्णन डेंजर हाय राव. नुसत वाचुन भ्या वाटल.
पुढचा भाग येवु दे.
अवांतर :चेक फोर्जरीच्या सत्यकथांवर ह्या आधी (बरेच वर्ष झाले म्हणा) एक पुस्तकच वाचल होतं. अर्थात आता सारखं नेटबॅन्किंग वै नव्हत. तरिही लोक लोच्या करायचे. त्या कथा लेखकाच नाव आता आठवत नाहिये पण पोलिसी कथा लिहायचे ते. त्यांच नाव प्रकाश होत की काय आठवत नाहिये
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामदास's picture

10 May 2008 - 5:33 pm | रामदास

आपण म्हणता ते लेखक श्रीकांत सिनकर असावेत.
सध्या पोलीस टाईम्सची चलती आहे.
पो.टा. फारच बीभत्स वर्णन असते.

झकासराव's picture

10 May 2008 - 7:05 pm | झकासराव

श्रीकांत सीनकरच :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुमीत's picture

10 May 2008 - 5:43 pm | सुमीत

आता कुठे समजत आहे हा "मॅटर", बाकी लेखन तर छान झाले आहे.

गणपा's picture

10 May 2008 - 6:02 pm | गणपा

रामदासबुवा,
पिसि जेसि चे दोन्ही भाग आवडले.
या भागा खाली क्रमशः लिहायच राहुन गेलय अशी अपेक्षा करतोय.
-(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....)गणपा

विद्याधर३१'s picture

10 May 2008 - 6:14 pm | विद्याधर३१

पण पहिला भाग मिळाला नाहि.
त्याचा दुवा देता येणार नाही का?
एकंदरीत कथा छान पकड घेणारी वाटली....

विद्याधर

रामदास's picture

10 May 2008 - 9:41 pm | रामदास
विजुभाऊ's picture

10 May 2008 - 6:56 pm | विजुभाऊ

प्र वा जोशीं सारखी स्टाइल आहे. दक्षता मासिकात लिहायचे ते.
छान स्टाईल

रामदास's picture

10 May 2008 - 9:29 pm | रामदास

होय. मी वाचायचो ते .
आजही सायबर गुन्ह्याचा तपास सोडला तर तपास कामाची दिशा तशीच असते.
नंतर दक्षताचा फक्त दिवाळी अंक मिळायचा.

स्वाती दिनेश's picture

10 May 2008 - 7:08 pm | स्वाती दिनेश

पहिला भागही वेगळाच होता,हा भाग सुरुवातीला दिलेल्या स्पष्टीकरणामुळे क्लिअर होतो आहे आणि कथेतील "पुढे काय?"ची उत्सुकता वाढली आहे,
गोष्ट आवडते आहे,पुढचा भाग लवकर येऊ दे..
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

11 May 2008 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

मस्तच आहे.... आता हळू हळू समजतंय.... 'सुशि' (सुहास शिरवळकर) ची आठवण येते आहे.

गोष्ट तर उत्कंठावर्धक आहेच आणि तुमची शैली पण झकास, पण घोटाळा कसा झाला हे तुम्ही लिहिले आहे ते नीटसे समजले नाही.

बिपिन.

चतुरंग's picture

11 May 2008 - 10:46 pm | चतुरंग

बँकेत सगळं आलबेल चालतं, इतक्या प्रकारचे सिक्योरिटी चेक्स आहेत आपला पैसा जाईल कुठे असं वाटतानाच एवढाले फ्रॉड्स होताना बघून मन बधिरलं!
पोलीसी खक्याची आणि माराची वर्णनं एकदम कडक! माझा अगदी जवळचा नातेवाईक आय्.पी.एस. आहे त्याने सांगितलेले काही अनुभव असेच होते. अंगावर काटा येतो.
पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागली आहे.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 8:25 am | विसोबा खेचर

रामदासकाका, सुंदर व उत्कंठावर्धक लिहिलं आहे. वरील सर्वांशी सहमत....

तात्या.

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 11:55 am | धमाल मुलगा

रामदास काका,
खरंच चांगलं लिहिलंय.

मास्तर म्हणाले तसं, प्रथम पुरुषी लेखन असल्यामुळे जास्तचं अंगावर येतंय. सॉलीड टरकतेय नजरेसमोर चित्र उभं केल्यावर!

बाकी, खास पोलिसी भाषा अगदी जशीच्या तशी पकडलीये. 'डिपारम्येंटला' बरेच मित्र दिसताहेत :))

छोट्याशाच लेखात असे झरझर सीन्स बदलण्याची शैली आवडली. एकदम 'कॅमेरा आऊट' - 'कॅमेरा इन' इफेक्ट दिलाय. बढिया!

आणि वीरकरचा एक पोलीस, एक पुरुष आणि एक माणूस असा भावनांचा बदलता प्रवास छान जाणवतोय.

मिपाचे 'पॉल एर्डमन', आता घोटाळ्यात शिरु द्या कथा....उत्सुकता लागून राहिलिये भटानं, मेहतानं, मिश्रानं कसे पैसे हडप केले...काय खेळ्या केल्या....
(तेव्हढंच ज्ञानात मौलिक भर की हो आमच्या!!!!)

पु.ले.शु.

-ध मा ल.

अनिल हटेला's picture

28 May 2008 - 12:22 pm | अनिल हटेला

मस्त जमलीये कथा!!

कादम्बरी म्हनू हव तर....

पूढील भागाच्या प्रतीक्षेत...........

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 May 2008 - 5:21 pm | डॉ.प्रसाद दाढे

अ॑गावर काटा उभा राहतोय माराचे वर्णन वाचून..मास्तर मागे म्हणाले तस॑ पोलीस आपल्याला मारणार ह्या कल्पनेनेच टरकते. (अवा॑तरः पूर्वी मला आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा होती पण हे वाचून बर॑ वाटत॑य त्या लायनीला न गेल्याबद्दल :) त्याला काळीज पत्थर हव॑.. हे आपले काम नाही.. डॉक्टरकी बरी :)
बाकी आर्थिक गुन्हे हा एक सर्वस्वी वेगळाच प्रकार आहे.. नेहमीच्या घरफोडी, खून-दरोडा वगैरे प्रकरणात जी नावे सहसा दिसत नाहीत अशी नावे त्यात दिसतात.. त्या॑च्या तो॑डून कबूलीजवाब घ्यायला पोलीसा॑ना फारसा वेळ लागत नसावा.. पण गुन्ह्याची पद्धत शोधायला अवघड जात असेल. पुण्यातील काही पोलीस अधिकारी असे गुन्हे शोधण्यात तरबेज आहेत (पो. निरिक्षक राजेन्द्र जोशी, भानूप्रताप बर्गे ही नावे ह्या स॑दर्भात खूप वेळा ऐकली आहेत.) असे गुन्हे शोधणार्‍या पोलीसा॑ना सलाम!
'कॅच मी इफ यू कॅन' हा लिओ कॅप्रियोचा मस्त चित्रपट अशाच एका सराईत आर्थिक गुन्हेगारावर आहे.. शेवटी त्या गुन्हेगारालाच असले इतर गुन्हे शोधण्यासाठी पोलीसात नेमतात !

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 May 2008 - 10:47 pm | डॉ.प्रसाद दाढे

आणखी एक किस्सा आठवला.. एका पेश॑ट बॅ॑क अधिकार्‍याने सा॑गितलेला. एका गृहस्था॑चे खात्यातले पैसे आपोआप कमी होत असत. एटीएम कार्ड तर त्या॑च्याच कपाटात सुरक्षित होते, चोरीला गेले नव्हते. तरीही कार्डच्या माध्यमातूनच पैसे काढल्याचे स॑गणक दाखवित होता. असे थोडे-थोडे करीत ऐ॑शी हजार काढले गेले होते. सगळेच बुचकळ्यात पडले. अखेर बॅ॑केच्या लोका॑नी एटीएम के॑द्रातील कॅमेर्‍यावरील त्या विवक्षित वेळेचे चित्रण पाहिले तर एक व्यक्ती कार्ड वापरता॑ना दिसली. त्या गृहस्था॑ना बोलावून चित्रफीत दाखविली असता त्या॑ना आश्चर्याचा प्रच॑ड धक्का बसला..कारण ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून त्या॑ची 'सूनच' होती! ती सासर्‍या॑चे कार्ड चोरून वापरून झाले की गुपचूप होते तिथे ठेवीत असे म्हणे..!!

रामदास's picture

29 May 2008 - 12:05 pm | रामदास

असे बरेच किस्से एकत्र कुटुंबात घडलेले दिसतात.
घरातल्या बायकांची उपेक्षा हे एकच कारण.
कर्मठ मारवाडी कुटुंबात असे कायम घडत राहते.
एका अधीकार्‍याने मला सांगीतलेले कारण मला पटले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अशा कुटुंबामध्ये सासू आणि सून यांच्या वयात अंतर कमी असते. सासूची आसक्ती संपलेली नसते आणि सुनेची वाढत असते.
पोलीस अशा मॅटरमध्ये चांगले समपुदेशन करतात.