गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 6:46 pm | भाऊ पाटील
मजेदार लेख आणि लेखनशैली. :)
12 Aug 2010 - 6:57 pm | दत्ता काळे
माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
. . . लढ. हे बाकी आवडलं.
दिव्य स्मरणशक्तीमुळे , नेलेली चुकीची किल्ली घरी परत आणायच्याऐवजी, देखणी बाई घरी आणली नाही नशीब.
12 Aug 2010 - 9:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःलाच चिमटे काढायची तुझी शैली आवडते.
मस्तच लिहीलं आहेस ... नेहेमीप्रमाणे!
12 Aug 2010 - 11:13 pm | आपला अभिजित
स्वतःलाच चिमटे काढायची तुझी शैली आवडते.
...मग कुणाला काढणार?
असो.
धन्यवाद!
12 Aug 2010 - 7:07 pm | इन्द्र्राज पवार
छान आहे लेखनशैली. अगदी व.पु.काळे यांच्या सहजसुंदर लेखनाची आठवण झाली.
मात्र आता एक करा. जरी "मणिकांचन योग" जुळून आला असला तरी सोने खरेदी करायला सौभाग्यवती यानाच पाठवा. तुम्हीच जातो म्हणाला आणि पेढीवरून सोन्याऐवजी सोनाराची एखादी सोनपरीच घेऊन आला तर भलत्याच योगाला सामोरे जाण्याचा प्रसंग यायचा.
(सहज ~~ लॉकरच्या प्रसंगावरून मॅट डेमॉनचा "बोर्न आयडेंटीटी" हा रोमांचक सिनेमा आठवला. यातला नायकदेखील लॉकरची किल्ली घेऊनच "मी कोण आहे?" याचा तलाश घेत असतो.)
12 Aug 2010 - 11:15 pm | आपला अभिजित
छान आहे लेखनशैली. अगदी व.पु.काळे यांच्या सहजसुंदर लेखनाची आठवण झाली.
का त्यांच्या आत्म्याचे तळतळाट घेताय?
असो.
पुन्हा धन्यवाद.
12 Aug 2010 - 7:09 pm | अनामिक
मजेशीर अनुभव. आवडला,
सुधीर काकांचा लेख वाचल्यामुळे असेले की काय, पण लेखाचं शिर्षक वाचताना "माणिकचंद योग..." असं वाचलं :)
12 Aug 2010 - 7:26 pm | रेवती
चांगले अनुभव कथन!
13 Aug 2010 - 1:14 am | शिल्पा ब
मस्त...खुमासदार (म्हणजे कसा नेमका?) लेख.
13 Aug 2010 - 1:51 am | घाटावरचे भट
सोने खरेदी करायचे विच्छा असताना हातात पैसे असण्याचा 'money-कांचन' योग सगळ्यांच्याच नशीबात नसतो. असो, लेख आवडला...
13 Aug 2010 - 10:08 am | आपला अभिजित
'money-कांचन' योग
- हे बेश्ट!
13 Aug 2010 - 3:01 am | संदीप चित्रे
>> गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला
अरे मित्रा ! इथल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीमुळे दर महिन्याला शिलकीत पैसे असणं हाच 'मणिकांचन योग' आहे सध्या :)
बाकी लेख आवडला कारण विसरभोळेपणाबाबत आपण 'जुडवा भाई' म्हणायला हरकत नाही !
13 Aug 2010 - 3:03 am | धनंजय
खुमासदार.
13 Aug 2010 - 3:10 am | चतुरंग
सोने खरेदीचा मार्ग स्वीकारल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;) नेहेमीप्रमाणेच एकदम चटपटीत, खमंग लेखन!
कितीही महागाई, भाववाढ झाली तरी गुरुपुष्याला पीएनजींच्या दुकानातली गर्दी त्याच पटीत उत्तरोत्तर वाढत गेलेलीच बघितली आहे, हे एक रोचक निरीक्षण! :) पैसा पाण्यासारखा वाहणे म्हणजे काय ते अशा दुकानात बघायला मिळते.
बाकी गुरुपुष्य वगैरे भारतात असताना कधीतरी का होईना बघितले जायचे आता विदेशात कसला गुरु आणि कसला पुष्य?
(कांचनमृगजळ)चतुरंग
13 Aug 2010 - 10:16 am | आपला अभिजित
कितीही महागाई, भाववाढ झाली तरी गुरुपुष्याला पीएनजींच्या दुकानातली गर्दी त्याच पटीत उत्तरोत्तर वाढत गेलेलीच बघितली आहे
हे बाकी खराय!
मला तर सणासुदीला ते (फर्स्ट कम फर्स्ट तत्वावर) फुकटात सोनं वाटतात की काय, अशीच शंका येते!
13 Aug 2010 - 10:36 am | सहज
सोन्याचे जबरदस्त आकर्षण. माझ्या लहानपणी 'आमच्यावेळी अमुक किमतीला सोने होते' (जुना काळ असल्याने फारशी 'ऐकायला'मोठी रक्कम नाही ) असे आजीच्या तोंडून ऐकल्यावर अग मग तेव्हाच पोत्या-पोत्यानी खरेदी का नाही केले, चांगला चान्स घालवला असा बालसुलभ विचार डोक्यात आला होता.
गेल्या दहा वर्षातले सोन्याचे भाव पहाता मी केवढा अविचार केला आहे हे कबूल करतो. :-)
गेल्या १० वर्षात सोने व जमीनी यांनी जबरदस्त परतावा दिला आहे.
13 Aug 2010 - 10:51 am | सुप्रिया
नेहमीप्रमाणे खुसखुशीत वर्णन!