हातात भरपूर कागदांचा गठ्ठा घेऊन आपला अवाढव्य देह जमेल तेवढ्या वेगाने ढकलत भोसले घाईघाईत स्टेशनमध्ये घुसला. इन्स्पेक्टर रणदिवेंच्या खोलीत जाताना दारात त्याची ढाकणेशी टक्कर होता होता वाचली. ढाकणेने घातलेल्या रामरामाकडे दुर्लक्ष करुन तो रणदिवेंच्या कक्षात गेला. नेहमीप्रमाणे रणदिवे आपल्या लाकडी खुर्चीत रुतुन बसलेले होते. हातात गरम चहाचा कप घेऊन शून्यात नजर लावून ते विचारात गढून गेलेले दिसत होते.
"सायेब, ही घ्या त्या अमित जीजीभॉयची माहिती", धपापलेल्या इंजिनासारखे सुस्कारे सोडत भोसले म्हणाला, "तुमचा सौंशय बरोबर होता. हा पोरगा डॉक्टर जीजीभॉयचा सख्खा पोरगा नाय."
रणदिवे झटकन तंद्रीतून बाहेर आले. त्यांचा चेहरा उजळला आणि त्यांनी उगीचच खुर्चीत सावरुन बसल्यासारखं करायचा प्रयत्न केला.
"शाब्बास, आण, आण ते इकडं. मला वाटलंच होतं काही तरी गडबड नक्की आहे", ते म्हणाले.
भोसलेने सगळे कागद त्यांच्याकडे दिले. तो चांगलाच उत्तेजित झालेला होता. रणदिवे कागद पाहत आहेत हे दिसत असूनही डोळे मोठे करुन आणि तोंडाचा थोडा चंबू करुन तो पुढे सांगू लागला,
"डॉक्टर जीजीभॉय आन त्यांची बायको जेनिफर, इंग्रज बाई बघा, तर त्यांनी याला दत्तक घेतलेला. नऊ वर्षाचा असताना. माटुंग्याच्या रिमांडहोममधी होता हा, सायेब. सात वर्षाचा असताना त्याला तिथं टाकलेला सायेब. त्या बाईला समाजसेवेची लई आवड. स्वतःचं काही मूलबाळ नाही म्हनून रस्त्यावरच्या, अनाथ आन रिमांडहोममधल्या पोरांसाठी कायबाय करायची. माटुंग्याच्या रिमांडहोममधी नेहमीच जायची बघा. दोन वर्षात ह्या पोरानं काय जादू टाकली बाईवर कोन जाने. नवर्याचा विरोध मोडून बाईनं याला दत्तक घेतला. तिच्या मते हे पोरगं म्हने लई सालस आन कलाकार टाईप होतं म्हने. पोराला दत्तक घेतला. भारी शाळाकालेजात शिकवला आन कालेज संपल्यावर दिला धाडून लंडनला फुडं शिकायला."
"हम्म्म्म्म, चांगलाच चायटू दिसतोय गडी", रणदिवे कागद पाहत पाहत म्हणाले. रिमांडहोमच्या रजिस्टरची प्रत, दत्तकविधानाची प्रत वगैरे सगळं भोसलेनं नीट गोळा करुन आणलं होतं. रणदिवे पुढं वाचू लागले आणि भोसले पुन्हा सांगू लागला,
"रिमांडहोममधी टाकायच्या आधी कामाठीपुर्यात र्हायचा सायेब. त्याची सख्खी आई धंदा करायची. सहन होत नव्हतं वाटतं त्याला ते. सातव्या वर्षी येका मानसाला भोसकला त्यानं गजानी. मरता मरता वाचला. त्या केसचे कागद बी हायेत बघा त्यात."
ही माहिती ऐकल्यावर मात्र रणदिवे खरच चपळाईनं उठून उभे राहिले. त्यांचे डोळे चमकत होते आणि चेहरा फुलला होता.
"भोसले, मला वाटतं आपण या एकाच नाही तर किमान दहा-बारा केसेसचा निकाल लावणार. चल", एवढं म्हणून त्यांनी कॅप डोक्यात घातली आणि खुर्ची लाथेने मागं उडवून ते ताडताड चालू लागले. भोसलेला काही कळालं नाही पण साहेब निघाला म्हटल्यावर तो पण त्यांच्या मागे धावला.
**************************************************************
पोलीस स्टेशनच्या त्या अंधार्या कोठडीत छताला टांगलेला एकमेव बल्ब खाली ठेवलेल्या टेबलापुरता पिवळा गढूळ प्रकाश टाकत होता. कोठडी उजळण्यापेक्षा अंधार आणखीच गडद आणि भयानक करण्याएवढाच त्या प्रकाशाचा उपयोग होत होता. टेबलाच्या एका बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर तो बसलेला होता. अमित जीजीभॉय. खांदे गळालेले, केस विस्कटलेले आणि मान खाली घातलेली. टेबलाच्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर भोसले हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघत बसलेला होता आणि समोर पिंजर्यात वाघ फिरावा तसे इन्स्पेक्टर रणदिवे इकडून तिकडे फेर्या घालत होते.
अचानक ते वेगाने टेबलकडे आले आणि त्यांनी टेबलवर इतक्या जोरात हात आपटले की अमितच काय भोसलेसुद्धा एकदम दचकला.
"हे बघ भो**च्या, कितीही वकील लावले ना तरी तुझी मान सुटणार नाहीये आता. तुझ्या बुटाचे ठसे, रक्ताचे डाग असलेला तुझा रेनकोट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुनाचं हत्यार, म्हणजे तुझ्या बॅगेत सापडलेला तो सुरा, एवढा पुरावा असल्यावर प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचा बाप जरी काळा डगला घालून आला ना तरी तुला सोडवू शकणार नाहीये. बर्या बोलानं कबुलीजबाब लिहून दे नाही तर असे हाल करीन ना की सुराच काय चमचा धरायच्या पण लायकीचा राहणार नाहीस."
"नाही हो साहेब, तुम्ही माझं ऐकून का घेत नाही? मी कोणाचाही खून केलेला नाही...", अमित अतिशय रडवेल्या आवाजात बोलू लागला.
"ए गप भें**", त्याचं बोलणं मध्येच तोडत रणदिवे ओरडले. आता त्यांच्या डोळ्यात रक्ताच्या लाल रेषा दिसू लागल्या होत्या. अमितचे केस धरुन त्यांनी त्याचा चेहरा वर केला आणि त्याच्या चेहर्याच्या अगदी जवळ तोंड नेत ते दबक्या आवाजात दात रगडत म्हणाले, "माझा अंत पाहू नकोस ए सु**च्या, माझं डोस्कं फिरलं ना तर इथंच गाडून टाकीन कोणाला पत्ता पण लागणार नाही. समजलं का?". अमितच्या डोळ्यात मरणभय दाटून आलेलं त्यांना दिसलं आणि थोड्याश्या समधानानेच त्यांनी त्याचं डोकं पुन्हा हिसका देऊन इतक्या जोरात खाली दाबलं की त्याची हनुवटी त्याच्या छातीवर आदळली. तो बसल्या जागी खाली मान घालून गदगदू लागला. रणदिव्यांनी समाधानाने भोसलेकडे पाहिले. भोसलेने स्मितहास्य केले आणि पुन्हा अमितकडे पाहू लागला. अमितचा गदगदण्याचा वेग हळूहळू वाढत चालला होता. काही सेकंदांतच तो "ह ह ह ह" असा आवाज करीत अनियंत्रितपणे हलू लागला. तो रडतोय की हसतोय अशी शंका रणदिव्यांना आली त्याच क्षणी "हा हा हा हा" असं मोठमोठ्याने हसत अमित ने मान मागे टाकली. रणदिवे आणि भोसले बावचळून पाहत असताना तो जोरजोरात टाळ्या वाजवत हसू लागला. एक-दोन मिनिटं अशीच गेल्यावर न राहवून त्याला झापड मारायला रणदिवे पुढे पाऊल टाकणार तोच तो अचानक थांबला आणि रोखून त्यांच्याकडे पाहू लागला.
"इन्स्पेक्टर, तुम्ही त्याला घाबरवू शकता, मला नाही. खून त्यानं नाही मी केलेत मी. कबुलीजबाबच काय तुम्ही म्हणत असाल तर आणखी एक खून करुन दाखवतो मी तुम्हाला", एवढं म्हणून पुन्हा तो मोठमोठ्याने हसला. हसत हसतच तिसर्या रिकाम्या खुर्चीकडे हात दाखवून तो कसंबसं "बसा बसा" म्हणाला. बावचळलेले रणदिवे आपसूकच बसले. भोसलेकडून एक सिग्रेट त्याने मागून घेतली आणि ती पेटवून एक जोरदार झुरका मारला. मग आपले दोन्ही पाय टेबलावर टाकून ओठांवर स्मित खेळवत तो बोलू लागला, "मी सुमीत. अमितचा जुळा भाऊ. आमची दोघांची आई एकच. एसपीडी."
"एसपीडी?", अभावितपणे रणदिवे उद्गारले.
"हो, स्प्लिट पर्सनॅलिटी डिसॉर्डर", एवढं म्हणून तो पुन्हा खदा खदा हसू लागला. रणदिवे आणि भोसले हतबुद्धपणे त्याच्याकडे पाहत राहिले.
**************************************************************
न्यायालयात बरेच दिवस खटला चालला. सगळे पुरावे भक्कम असूनही त्याला शिक्षा होईल याची रणदिवेंना खात्री नव्हती. त्याच्या वकीलांनी त्याचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा बचाव केला आणि न्यायालयाने तो मान्य करीत त्याला मानसिक उपचार घेण्यासाठी इस्पितळात दाखल करावे आणि पूर्ण बरा झाला तरी कमीतकमी दोन वर्षे तिथून त्याला सोडू नये असे आदेश दिले. कोठडीतून हॉस्पिटलकडे नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स आल्यावर रणदिवेंनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्याला बाहेर घेऊन यायला सांगितलं खांदे पाडून, पाय घासत तो अॅम्ब्युलन्सकडे चालताना रणदिवेंनी त्याला अडवलं आणि म्हणाले, "हे बघ, अमित का सुमीत, तू हॉस्पिटलातून सुटला तरी माझं तुझ्याकडे नेहमीच लक्ष राहील हे लक्षात असू दे."
सशाच्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत त्याने मान डोलावली आणि पुढे चालू लागला.
(नंतर तीन-चार वर्षांनी तो सुटला असे रणदिवेंना कळाले. त्याची वर्तणूक म्हणे फारच चांगली होती. हॉस्पिटलात सगळ्यांशी त्याने अतिशय सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले होते हे ही त्याना कळाले. पण तो सुटल्यावर थेट लंडनला निघून गेला हे कळाल्यावर मात्र त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.)
**************************************************************
लंडनमधली एक ढगाळ सकाळ. घड्याळात आठ वाजले म्हणून तिला सकाळ म्हणायचं. सूर्याचा पत्ता नव्हता आणि भुरुभुरु पाऊस सतत पडत होता. जेनी आळस देत उठली आणि बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं. रात्रीच्या दारुड्या गिर्हाईकाच्या नावाचा उद्धार करत कॉफी प्यायला म्हणून ती बाहेर पडली. दार उघडून अंधार्या गल्लीत तिने पाय ठेवला आणि काखेत हात घालून चालू लागली. दहा-बारा पावलं चालली असेल नसेल तोच तिला भिंतीच्या कडेला कोणीतरी झोपलेलं दिसलं. जवळून जाताना तिला त्या व्यक्तीचा चेहरा कालच्या त्या दारुड्यासारखा वाटला म्हणून ती थांबली. थोडं आणखी निरखून पाहिल्यावर मात्र तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. तो माणूस पालथा खाली पडलेला होता आणि त्याच्या पोटाखालून एक काळपट लाल असा रक्ताचा ओघळ रस्त्यावर वाहत होता......
(समाप्त)
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 7:58 pm | अनिल हटेला
वातावरण निर्मीती ,कथेचा वेग ह्या बाबतीत मानलं साहेब तुम्हाला!!
'अपरीचीत ' ची आठवण झाली ..
अजुनही अशाच आगळ्या वेगळ्या कथा वाचायला आवडतील...
लिहीत रहा ....:)
10 Aug 2010 - 9:11 pm | ईन्टरफेल
निरंजनजन राव लै लवकर कथा संपवलि आस वाटत थोडि ऑर दो ना.........बाकि कथा लै भारि ........
10 Aug 2010 - 10:47 pm | विलासराव
निरंजनराव.......लिहिन्याची शैली आवड्ली.....
द्वैत - ३........मग आधिच्या भागाच्या लिंक का नाही दिल्या?
10 Aug 2010 - 11:43 pm | रेवती
कथेचा चांगला शेवट केला आहे.
आपण अजून लिहावे अशी विनंती.
11 Aug 2010 - 5:46 am | अरुण मनोहर
वर्णन शैली सुंदर. शेवट प्रेडिक्टेबल वाटला.
11 Aug 2010 - 6:00 am | स्मृती
स्प्लिट पर्सनालिटी अजून रंगवायला हवी होती... कथेने छान पकड घेतली आहे... मात्र मनोहरांनी म्हटल्याप्रमाणे प्रेडिक्टेबिलिटी टाळायला हवी...
गुढकथा तर छान लिहीता हे दिसलंच... वैज्ञानिक कथेचाही प्रयत्न करून पहा.. पु ले शु! :)
11 Aug 2010 - 8:43 am | नगरीनिरंजन
वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद. शेवट प्रेडिक्टेबल आहे हे अगदी खरं आहे. मला स्वतःला नंतरचे दोन भाग लिहून तेवढी मजा नाही आली. खरं म्हणजे फक्त पहिल्या भागाचीच कथा लिहिणार होतो. असो. यातूनच नवीन शिकायला मिळत आहे.
प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.
मी आधीच्या भागाचा दुवा टाकण्याचा प्रयत्न केला दुसर्या भागात पण प्रकाशित केल्यावर तो दिसत नाही. काय कारण असावे?
12 Aug 2010 - 6:45 pm | मी-सौरभ
आधी वाचली आहे कुठेतरी....
12 Aug 2010 - 9:27 pm | ईन्टरफेल
काही गोष्टी आपल्या हातात नसतात..........................राव ) .............. ;-)
13 Aug 2010 - 6:24 am | शिल्पा ब
आधीच्या भागांची लिंक टाकत चला...संदर्भ लागायला मदत होते.
कथा छान.
13 Aug 2010 - 7:17 am | Pain
दीवानगी पण असाच आहे.
13 Aug 2010 - 3:11 pm | utkarsh shah
शेवट थोडा वेगळ्याच दिशेला गेला? जेनी कोण? दारूडा कोण?