इन्स्पेक्टर रणदिवे आपला अवाढव्य देह लाकडी खुर्चीत कोंबून आणि पाय टेबलाखाली पसरून जमेल तेवढं आरामशीर बसले होते. त्यांच्या गरगरीत पोटावर ताणल्या गेलेल्या शर्टाचं बटण त्यांच्या प्रत्येक श्वासाबरोबर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत होतं. समोर टेबलावर एक फाईल, भरपूर कागद आणि काही फोटो अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यातच एका बाजूला त्यांची कॅप आणि एका बाजूला भाजलेल्या शेंगांचा ढीग पडलेला होता. शेंगा खात खात ते केतन वीरकरच्या खुनाचा विचार करत होते. खून होऊन आता २ आठवडे झाले होते पण तपासात अजून काहीच प्रगती नव्हती. साधा सरळ बँकेत काम करणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता तो. खून करु शकतील असे त्याला कोणी शत्रू असण्याचं काहीच कारण नव्हतं आणि तसे ते नव्हतेही. त्याच्या मित्रमंडळींत, ऑफिसमध्ये,नातेवाईकांमध्ये, गल्लीत असं सगळीकडे नीट तपास करुन झाला होता. सगळ्यांच्या मते तो एक सालस आणि सरळमार्गी माणूस होता. बरं, पंचनाम्यातही फार काही धागेदोरे सापडले नव्हते. घराच्या दारात उमटलेला एक बुटाचा ठसा सोडला तर खुन्याने सगळं व्यवस्थित साफ केलं होतं. झटापटीच्याही काही खुणा नव्हत्या. काय होतंय हे कळण्याएवढाही अवसर खुन्याने दिला नव्हता आणि पावसामुळे अगदी शेजारच्या घरातही काहीच आवाज गेला नव्हता. चोरीचा उद्देश नव्हता हे ही अगदी स्पष्ट होतं. सगळ्या शक्यता तपासून झाल्यावर आता एकच कच्चा दुवा उरला होता आणि तो म्हणजे त्याची वाग्दत्त वधू प्रिया. तिचा इतिहास आणि वर्तमान तपासण्यासाठी भोसलेला त्यांनी दोन दिवसापुर्वीच कामाला लावलं होतं. भोसले बुद्धीमान नसला तरी काटेकोर काम करण्यात पटाईत होता. त्यांनी घड्याळाकडे नजर टाकायला आणि दारातून भोसले आत यायला एकच गाठ पडली. भोसलेने सॅल्यूट मारल्यामुळे थरथरणार्या त्याच्या पोटाकडे रणदिवे गमतीने पाहत असताना भोसले ने टेबलावर काही कागद ठेवले.
"प्रिया बागडेचं चरित्र सायेब".
"हं, काय म्हण्तायत प्रियाबाई? काही जुनी नवी भानगड?"
"नाय सायेब. तसं काय सापडलं नाय. पोरगी एकदम सरळ वाटती बघा. कोणाशी सलगी नाय का मैत्री नाय."
"हं, तिच्या गल्लीतल्या, ऑफिसातल्या वगैरे सगळ्या बाप्यांची यादी केली का मी सांगितली तशी? आजकाल एकतर्फी पण असतंय."
"हां सायेब. ती बी हाये त्यात."
एकतर्फी प्रेमातून पार खून बिन करण्याची शक्यता तशी नगण्य होती त्यामुळे रणदिवे थोडे निराशल्यासारखे झाले. तरी उगीचच पाहायचं म्हणून एकदा त्यांनी प्रियाची माहिती नजरेखालून घालायला सुरुवात केली. सगळं जिथल्या तिथे होतं. लक्षवेधी काही वाटलं नाही. मग भोसलेने केलेल्या यादीवरुन त्यांनी एक नजर झरकन फिरवली आणि ते कागद परत टेबलावर टाकले. भोसलेने आणलेले दोन चार फोटोही पाहिले. प्रिया तिच्या घरच्यांबरोबर, एका फोटोत कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर, एकात ऑफिसच्या पार्टीचा ग्रुप फोटो असे ते फोटो होते. सगळे फोटो नीट पाहताना रणदिवेंची अनुभवी नजर ऑफिसच्या फोटोवर थबकली. पुढच्या रांगेत उभ्या असणार्या प्रियाकडे तिच्या मागच्या रांगेत तिच्या डावीकडे दोन घरं सोडून उभा असणारा एक उंचापुरा, सावळा तरुण टक लावून पाहत होता. कॅमेर्याकडे त्याचं बिल्कुल लक्ष नव्हतं.
"भोसले, हा पोरगा कोण आहे?"
भोसले टेबलाला वळसा घालून आले आणि त्यांनी फोटोत डोकं घालून रणदिव्यांनी जिथे बोट टेकवलं होतं तिथे पाहिलं.
"तो... अमित जीजीभॉय सायेब. मी बोल्लो त्याच्याशी. जरा लाजाळू हाये पण कोनाच्या अध्यातमध्यात नसतो म्हने."
"याची सगळी माहिती मला पाहिजे भोसले."
"सांगतो ना. बाप मोठा डॉक्टर होता याचा आन आई समाजसेविका. बांद्र्याला र्हातो सायेब. मोठा फ्लॅट हाये. लंडनला शिकायला होता. सध्या एकटाच र्हातो. लाजाळू हाये. कार चालवायची भीती वाटती म्हणून बसनी येतो ऑफिसला सायेब. सहा फूट उंच असंल, अंगापिंडानं मजबूत आणि काळासावळा."
"भोसले मला याच्या जन्मवेळेपासूनची सगळी कुंडली पाहिजे.", त्याला हातानं थांबवत रणदिवे म्हणाले.
"ती कशाला सायेब?"
"भोSSSसले", भो लांबवला म्हणजे साहेब तडकला हे भोसलेला कळालं,"धू म्हटलं की धुवायचं, लोंबतंय काय ते विचारायचं नाही."
"हे हे हे..", ओशाळं हसत भोसले म्हणाला,"आपलं उगीच उत्सुकता म्हणून विचारलं सायेब. लहानपणीची माहिती मिळवून काय होनार?"
"भोसले नुसतं टोपी ठेवायला डोकं वापरु नको. जरा विचार कर. एवढे काळेसावळे पारशी किती पाहिलेत तू?"
**************************************************************
अमित जीजीभॉयच्या इमारतीसमोर ढाकणे साध्या वेशात उभा होता. सोमवारपासून चार-पाच दिवस सकाळ संध्याकाळ तो तिथे उभा असे. अमितला तो रोज येता जाता पाहत होता. एका हातात ब्रीफकेस घेऊन, खांदे पाडून, पाय घासत, खाली मान घालून उगीचच भराभरा चालणारं त्याचं ध्यान ढाकणेला चांगलंच परिचित झालं होतं. पण हाती काहीच लागत नव्हतं. रोज साडेसात-आठला घराबाहेर पडून तो थेट ऑफिसध्ये जात होता आणि संध्याकाळी बरोबर सहा साडेसहाला ऑफिसमधून निघून घरी येत होता. ढाकणे त्याच्या मागं मागं फिरुन थकला होता. उगीच आपण इथं हेलपाटे घालतोय असा विचार करून तो पचकन थुंकला आणि खिशातून सिग्रेट काढून त्याने तोंडात धरली. काडेपेटी खिशातून काढता काढता त्याने अमितच्या इमारतीतून बाहेर आलेल्या एक तरुणाकडे पाहिले आणि मग सिग्रेट पेटवली.
"बोरुडे आता येईलच अर्ध्या एक तासात. मग सुटलो. च्यायला रात्रपाळी नाय तेवढं तरी बरंय", असा विचार करून त्याने एक झुरका मारला. मघाचा तो तरुण आता बसस्टॉपवर येऊन उभा राहिला. रस्त्यावरच्या प्रकाशात काळा वाटणारा शर्ट, तशीच पँट आणि काळे बूट त्याने घातले होते. एक पाय सरळ ठेवून आणि एक पाय जरा बाजूला लांबवून तो ऐटीत उभा राहिला आणि खिशातून मोबाईल काढून कोणाला तरी त्याने फोन लावला. फोनवर बोलता बोलता त्याने समोरच्या इमारतीकडे पाहून हात हलवला. आपोआपच ढाकणेची नजर तिकडे गेली. समोरच्या इमारतीतल्या एका फ्लॅटच्या बाल्कनीत एक मुलगी उभी राहून हात हलवत होती. तिच्याही कानाला मोबाईल होता. मग ती आत गेली आणि त्या तरुणाने फोन खिशात ठेवून दिला. दोन्ही हात पँटच्या खिशात घालून तो मजेत शीळ घालू लागला. आता ढाकणे त्याचं निरीक्षण करु लागला. उंचापुरा, रुंद खांदे, जेल लावून सगळे केस मागं वळवलेले, रुंद कपाळ, गुळगुळीत दाढी केलेला चेहरा, रुबाबदार आणि बेफिकीर. मग ढाकणेने एकवार अमितच्या खिडकीकडे नजर टाकली. लाईट बंद झाला होता. तो परत त्या तरुणाकडे पाहू लागला तितक्यात एक कार त्या तरुणाच्या पुढ्यात येऊन थांबली. दार उघडून एक तरुणी बाहेर आली आणि कारला वळसा घालून त्याच्याकडे गेली. तीची आकृती मघाशी दिसलेल्या समोरच्या इमारतीतल्या तरुणीशी मिळती जुळती होती. दोघांनी एकमेकाना अलिंगन दिले, गालावर पुसटसे चुंबन घेतले आणि त्या तरुणाने कारचे दार उघडून धरले आणि ती ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली. दार लावून तो तरुण पुन्हा कारला वळसा घालून आला. दार उघडण्याआधी त्याने एकदा इकडेतिकडे पाहिलं आणि ढाकणेच्या तोंडातून सिग्रेट गळून पडली. कार भन्नाट वेगाने निघून जाताना ढाकणेच्या मेंदूत प्रकाश पडत गेला की तो अमित होता....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 9:09 am | कवितानागेश
'पिच्चर' पाहील्यासारखे वाटतय..
येउद्या...........
7 Aug 2010 - 9:13 am | utkarsh shah
छान जमतय, चालु राहुदे..........
7 Aug 2010 - 9:22 am | रेवती
हे शाबास!
उत्कंठावर्धक कथा!
7 Aug 2010 - 11:07 am | सविता शिरगावकर
पुढच्या भागाची वाट पाहते आहे.
7 Aug 2010 - 11:10 am | भारतीय
छान.. पुढील भागाची वाट बघत आहे..
7 Aug 2010 - 12:18 pm | ईन्टरफेल
छान जमलय! कथा वाचनिय आहे पुढिल भाग लवकर येउ धा!
7 Aug 2010 - 4:52 pm | सूर्यपुत्र
एक हिंदी पिक्चर येऊन गेला होता.... "अपरिचित" नावाचा... त्याची आठवण झाली.....
7 Aug 2010 - 4:57 pm | नाना बेरके
कथा आवडली. एकदम उत्कंठावर्धक.
7 Aug 2010 - 6:26 pm | अनिल हटेला
स्सह्ही जा रेला मामू!!
पू भा प्र....
:)
7 Aug 2010 - 7:27 pm | चतुरंग
चतुरंग