वाट बघतोय रिक्षावाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
6 Aug 2010 - 7:00 am

शालिमारे का भौ?
चला सिबीएस, शालिमार...
लगेच निघेल...
शालिमार?
चला बसा...
शालिमार... शालिमार...
ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?

ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?

विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.

आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.

चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?

हो शालिमार.

किती दोन का?

हो. किती पैसे?

बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सिबीएस?

अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण.

पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा

ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय.

बंदच करतो. ठिक.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?

हो.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

शालिमार आलं का?

हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.

चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?

हो.

बसा.

पवननगर म्हणजे सिडको ना?

हो. तुमाला कुठे जायचे आहे?

पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात.

त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.

कधी निघणार.

हे काय लगेच. शिट तर भरू द्या.

हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना.

हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.

पट्टा म्हणजे.

नविन आहे का तुम्ही.

हो.

पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार नविन सिडकोचा आहे.

दररोज किती पट्टे मारतात?

सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्‍या दिवशी लेवल करावी लागते.

किती कमाई होते दिवसभरात?

कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्‍हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.

पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

चला लवकर. किती वेळ?

अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?

नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?

नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.

चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

पुडी देवू का? हिराये.

नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता?

जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.

माळी म्हणजे?

१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.

अरे बापरे एवढ्या पुड्या.

अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.

पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....

गाडीत टेप लागतो का?

हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.

पवननगर का?

चला बसा.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

प्रवासजीवनमानमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

6 Aug 2010 - 7:25 am | स्पंदना

पा. भे. एकदम फॉर्मात!!
मस्त लिखाण जराही कंटाळवाण नाही वाटल.
परवाचा एस. टी . नंतर वाचल्यान प्रतिक्रिया नाही दिली. तो लेख पण असाच, झकास.

राजेश घासकडवी's picture

6 Aug 2010 - 8:01 am | राजेश घासकडवी

नुसत्या संवादांतूनच खूप चित्रं उभी राहिली.

त्या रिक्षावाल्याच्या एकदोन गोष्टी लिहिल्या तर उत्तम व्यक्तिचित्रण होईल. ब्याकग्राउंड मस्त झालीये, आता फक्त रंग भरायचे.

असंच लिहीत राहा.

प्रभो's picture

6 Aug 2010 - 8:02 am | प्रभो

मस्त!!

मदनबाण's picture

6 Aug 2010 - 8:03 am | मदनबाण

दफोराव वाचतोय !!! :)

शिल्पा ब's picture

6 Aug 2010 - 11:12 am | शिल्पा ब

लै भारी पाभे... डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

मी-सौरभ's picture

6 Aug 2010 - 11:38 am | मी-सौरभ

>>ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं..

:)

गोगोल's picture

6 Aug 2010 - 12:07 pm | गोगोल

असच चालू ठेवा.

दिपक's picture

6 Aug 2010 - 12:22 pm | दिपक

वाह रं भावड्या !

बाकी १२ ऑगष्टच्या मिटर जॅम बद्दल काय विचार आहे? :-)

अर्धवट's picture

6 Aug 2010 - 1:20 pm | अर्धवट

पाभे,

मस्त जमलंय, वेगवान,

बाकी हा फॉर्म कुठला म्हणायचा हो.

मराठमोळा's picture

6 Aug 2010 - 2:08 pm | मराठमोळा

एकदम मस्त. :)

नशिकला चार वर्ष राहिलोय, आठवणी ताज्या झाल्या. पण लेखात अस्सल नाशिकची मराठी वापरली असती तर आणखी खमंग झाला असता. नाशिकची मराठी म्हणजे खान्देशी + कसमादे पट्टा मराठी

( काय करु राहिला, कधी कधी येडगां* रिक्षावाले लै माज करता ब्वॉ, पाह्य ते रताळ्या. काय गनमन करु राहिलाय भंजाळला का, पुडी दे ना भो. ही नाशिकची मराठी ) ;)

समंजस's picture

6 Aug 2010 - 2:15 pm | समंजस

वा! मस्त!!
असेच लेख आणखी येउ द्या..

ईन्टरफेल's picture

6 Aug 2010 - 5:38 pm | ईन्टरफेल

मस्त आख्ख नाशिक फिरवल कि राव तुमि ............. डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

क्रेमर's picture

6 Aug 2010 - 5:59 pm | क्रेमर

संवादातून वातावरण उभे करण्याचा प्रयत्न आवडला. नाशिकचाच असल्याने तिथल्या रिक्षाचालकांची व प्रवाशांची कुत्तरओढ ठाऊक आहे. पाषाणभेद यांनी संवादातून उभे केलेले चित्र त्या माहितीच्या जवळ जाणारे आहे.