जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
आयुष्य सरतं याच धडपडीत
असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत
वाट तीच... आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं
आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं...
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात...
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बोनसाय बनायचं
मिरवायचं दिवाणखान्यात एक शोपीस बनून...
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी..
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश...
स्वत:साठी आणि इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
25 Apr 2008 - 12:28 pm | विसुनाना
वा! वा! कविता आवडली.
25 Apr 2008 - 12:36 pm | प्रमोद देव
नेहेमीप्रमाणेच छान आणि अतिशय वास्तववादी कविता.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
25 Apr 2008 - 12:42 pm | विसोबा खेचर
वा जयू,
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! जियो....
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी..
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश...
स्वत:साठी आणि इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
कदाचित म्हणूनच मिपाचा जन्म झाला असावा... :)
तात्या.
25 Apr 2008 - 4:53 pm | स्वाती राजेश
कविता खूपच आवडली.
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं
आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं...
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात...
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
या ओळी खासच...
25 Apr 2008 - 6:57 pm | शितल
तुमच्या कविता अतिउत्तम असतात. मला त्या खुपच आवडतात.
25 Apr 2008 - 7:02 pm | मुक्तसुनीत
कवितेमधला आशावाद , मानवी कर्तृत्वावरील , निर्मितीक्षमता आणि जिद्द या गुणांवरील विश्वास या गोष्टी आवडल्या. आणि मला आवडलेला भाग म्हणजे , तलवार ही "पुरोगामित्वाची" आहे ! या पुरोगामित्वाच्या मूल्यामुळे , ही कविता केवळ एका व्यक्तिगत पातळीवर रहात नाही. कविता खूप आवडली.
25 Apr 2008 - 8:27 pm | मदनबाण
जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
मस्तच
(कुठे आहे तो पायथागोरस) असे म्हणणारा.....
मदनबाण
25 Apr 2008 - 11:28 pm | वरदा
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं
आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं...
ह्म्म खरय्...
सुंदर कविता....
28 Apr 2008 - 6:02 pm | जयवी
विसुनाना, देवकाका, तात्या, स्वाती राजेश, शितल, मुक्तसुनीत, मदनबाण, वरदा....... तहे दिल से शुक्रिया ;;)