मिपावर लिहिण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. सर्व जुन्या जाणत्यांनी चुका सांभाळून घ्याव्या ही विनंती.
हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट
साधारणपणे ऑगस्ट एन्डचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस.
'कुमार विद्यामंदीर,हुपरी-शाळा नं. 1' मधील तिसरी-ब चा वर्ग. मुलांना "प्रश्नोत्तरे लिहा रे", असं सांगून अलाटकर गुरुजी निवांत पान खात बसले होते. त्याच वर्गात एका कोप-यात अस्मादिक मित्रांबरोबर 'चिंचोके' खेळण्यात गुंतले होते. B)
इतक्यात वर्गात 'ऊSSSSSSS' अशी आरोळी उठली. पाहातो तर शिपाईमामा नोटीस घेऊन आल्याचा तो आनंद होता. त्या काळात नोटीस येणे म्हणजे 'शाळेला सुट्टी' <:P एवढंच माहिती होतं. पण, ही नोटीस जरा वेगळी होती. गुरुजींनी नोटीस वाचून दाखविली - "सालाबादप्रमाणे यंदाही चांदी असोसिएशन, हुपरी यांच्यातर्फे दिनांक 5 सप्टेबर रोजी 'गुरुपौर्णिमे'निमित्त खुल्या वक्तॄत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, इच्छुकांनी आपली नावे वर्गशिक्षकांकडे उद्या संध्याकाळपर्यंत द्यावी."
पूर्ण वर्ग शांत. हा बाऊन्सर होता. मराठी भाषेमध्ये 'वक्तॄत्व' असा काही शब्द आहे,याची कुणालाही कल्पना असणं शक्य नव्हतं. शिपाईमामा निघून गेले. गुरुजींनी सगळ्या वर्गावरून एक नजर फिरवली. खिडकीतून बाहेर एक पिचकारी मारली आणि अचानक -
"चिर्कुट, उभा रहा!!!"
इकडे-तिकडे बघत, चिंचोके खिशात लपवत मी उभा राहिलो. :S
"स्पर्धेला तुझं नाव देतो." - गुरुजी
मी अजून बावचळलेलोच होतो. मी विचारलं,
"क्..कसल्या स्पर्धेला, गुरुजी??"
"अरे 'वक्तॄत्व' स्पर्धेला. 'आई माझा गुरु' या विषयावर भाषण करायचं." - गुरुजी.
आत्ता माझी ट्यूब पेटली. 'वक्तॄत्व' म्हणजे भाषण!! याबद्दल मी ऐकलं होतं. त्याचबरोबर 'मलाच का घेतलं' याचा पण उलगडा झाला. तेव्हां वर्गात सगळ्यात हुशार(?? B) ) आणि उपद्व्यापी कारटा मीच होतो. :-)
त्या उत्साहात मी स्पर्धेत भाग घ्यायचं कबूल केलं खरं, पण संभाव्य धोक्याची कल्पनाही मला आली नाही.
त्यानंतर मोठ्या उत्साहाने सुरु झाली भाषणाची तयारी!! घरी आल्या आल्या मी भाषण करणार असल्याचं जाहीर केलं. यावर सर्वांनी 'आणखी एक नवीन खूळ' असा लूक दिला. पण एवढ्याशा गोष्टीनं मी डगमगणार नव्हतो. त्या दिवशी पप्पांना रात्रभर बसून भाषण लिहायला लावलं आणि दुस-या दिवसापासून पाठांतर सुरु केलं. दोन-तीन दिवसांतच मी ते भाषण घडाघडा 'म्हणून दाखवू' लागलो. घरी येणा-या प्रत्येकाला 'मी भाषण करणार असल्या'ची बातमी कळाली आणि सर्वांनी 'पहिलं बक्षीस तुलाच मिळणार' अशी सहानुभूती सुद्धा दर्शविली. (ती सहानुभूती प्रेक्षक व परीक्षक यांच्यासाठी होती, हे मला नंतर कळलं. असो.) =((
अखेर 'तो' दिवस उजाडला. सर्व शाळांना सुट्टी होती. मी, माझे आई-वडील, आजी, दोन-तीन शेजारी आणि काही मित्रांना घेऊन (की ते मला घेऊन??) स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो. स्पर्धा सुरु झाली. माझं नाव बरंच उशीरा होतं. जशी जशी इतरांची भाषणं ऐकत होतो, तसा तसा माझा आत्मविश्वास ढासळू लागला. आणखी एक गोष्ट, जी आधी लक्षात आली नव्हती, ती म्हणजे ही खुल्या गटाची स्पर्धा होती. सगळे स्पर्धक सातवीच्या पुढचे होते. मी सर्वात लहान स्पर्धक होतो.
अखेर माझं नाव पुकारलं गेलं. पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि गांधी टोपी अशा अवतारात घाबरत घाबरत मी स्टेजवर गेलो. समोर 100 -150 लोक पाहूनच मी गार झालो. पाय लटपटू लागले. डोळ्यांसमोर अंधारी आली. काहीजण हसू लागले. पण मला पहिली ओळ पक्की पाठ होती. मी सुरुवात केली –
"अध्यक्ष महोदय, (कुंईंSSSSSSSSS - माईकने दगा दिला.)" सर्वजण हसले. मी जास्तच घाबरलो. माईक पूर्ववत करण्यात आला. मी पुन्हा सुरुवात केली –
"अध्यक्ष महोदय (खर्रर्रर्र), पूज्य गुरुजन वर्ग (खर्रर्रर्र) आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो (खर्रर्रर्र),मी आज तुम्हाला (खर्रर्रर्र)'आई माझा गुरु' (खर्रर्रर्र) या विषयावर चार शब्द (खर्रर्रर्र)ऐकवणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने (खर्रर्रर्र) ऐकून घ्यावे ही नम्र विनंती."
"अरे तो माईक सोड!!" परीक्षक महोदय मागून म्हणाले.
टी.व्ही. वर 'मिले सूर मेरा तुम्हारा' मध्ये अन्नू कपूर यांना माईक हातात पकडून बोलताना मी पाहिलं होतं. अगदी हुबेहूब तसाच माईक मी पकडला होता. पण त्यामुळे तो "खर्रर्रर्र" असा आवाज काढत होता, हे काही अस्मादिकांच्या लक्षात येईना. परीक्षकांची सूचना आणि माझी भीती, या गोंधळात माझी लिंक तुटली आणि पाठ केलेलं भाषण मी साफ विसरलो. त्यानंतर मी जे भाषण केलं, ते खरोखर संस्मरणीय होतं. मी खरंच ते आजही विसरु शकत नाही. ते असं होतं -
(मध्ये मध्ये खर्रर्रर्र आवाज चालूच आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.)
" माझ्या आईचे नाव स्मिता असे आहे. मी तिला 'मम्मी' म्हणतो. माझी आई मला खूप आवडते. (अंSSSS) पण कधी कधी आवडतही नाही.
ती मला रोज सकाळी सहा वाजता उठवते. दात घासायला लावते (दात घासल्याचा अभिनय). (अंSSSS) त्यानंतर आंघोळ घालते. मग नाश्ता देते आणि अभ्यासाला बसवते(अभ्यासाचा अभिनय). (अंSSSS) साडे अकरा वाजता ती मला जेवायला देते आणि मग शाळेत पाठवते. शाळेतून घरी आल्यावर ती मला हात-पाय धुवायला लावते. नंतर दूध प्यायला लावते (दूध पिण्याचा आणि तोंड वाकडं करण्याचा अभिनय) आणि परत अभ्यासाला बसवते. मग आठ वाजता जेवायला देते आणि नंतर झोपवते.(अंSSSSSSSSS) परत सकाळी सहा वाजता उठवते. "
आधीच इतकं सुंदर भाषण आणि त्यात माईकची खरखर त्यामुळे एवढं होईपर्यंत प्रेक्षक आणि परीक्षकच नव्हे तर मी स्वतः सुद्धा कंटाळलो होतो. शेवटी मलाच इतरांची दया आली आणि मी भाषण आवरतं घेतलं.
“ म्हणून 'आई माझा गुरु' आहे. माझी आई मला खूप खूप आवडते. कारण कुणीतरी म्हटलेलंच आहे, ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी '.. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद!! जय महाराष्ट्र !! " :<
यानंतर तेथे अभूतपूर्व असा हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मला मात्र भाषण 'एकदाचं संपलं' याचा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यासारखा आनंद झाला होता.
बक्षीस समारंभात मला 'सर्वात लहान स्पर्धक' म्हणून 'पारले-जी' चाँकलेट देण्यात आलं. पण मला खात्री आहे, की ते 'सर्वात करमणूकप्रधान भाषणा' बद्दल मिळालं होतं.
त्यानंतरच्या शालेय जीवनात मी अनेक वक्तॄत्व स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळवली, अगदी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा!!! पण, तो हशा, त्या टाळ्या आणि ते चार आण्याचं लाल 'पारले-जी' मी आजही विसरू शकलो नाही..
प्रतिक्रिया
17 Feb 2010 - 6:22 pm | योगी९००
पहिलाच प्रयत्न असला तरी चांगले लिहीले आहे..
वाचून मजा आली.
खादाडमाऊ
17 Feb 2010 - 6:34 pm | मदनबाण
मस्त लिहलय... मी सुद्धा असचं एक भाषण आमच्या सोसाटीत ठोकल होत... ;) ते आठवलं. ;)
भाषण करताना समोर बसलेले लोक दगड आहेत् अस समजावे,असं कोणीतरी सांगितल्याच आठवतयं... ;) ( आपले नेते लोक बहुधा हीच ट्रीक वापरत असावेत... ;) )
बक्षिस म्हणुन एक डिक्शनरी मिळाली होती,ती अजुन आहे माझ्याकडे. :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
18 Feb 2010 - 10:54 am | विजुभाऊ
भाषण करताना समोर बसलेले लोक दगड आहेत् अस समजावे,
बरोब्बर ...आणि भाषण आवडले नाही तर ते त्याच रूपात स्टेजवर येतात ;)
21 Mar 2013 - 12:11 pm | यसवायजी
मी ७ वर्षांचा असताना, तिसर्या किंवा चौथ्या भाषणावेळी, मध्येच प्रेक्षकानी 'दाद' दिली.. भाषण संपलं की मगच टाळ्या वाजतात असा आधीचा अनुभव असल्याने, 'जय हिंद जय भारत' म्हणुन स्टेज वरुन पळुन आलो होतो.. :D
17 Feb 2010 - 6:38 pm | अनामिक
अजून येऊद्यात असेच अनुभव. वाचून मजा आली.
-अनामिक
17 Feb 2010 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त अनुभव, मस्त लेखन.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
17 Feb 2010 - 7:01 pm | विसोबा खेचर
सहमत..!
तात्या.
18 Feb 2010 - 6:13 pm | जे.पी.मॉर्गन
पु ले शु
17 Feb 2010 - 6:46 pm | शुचि
मस्त लिहीलय. मजा आली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 7:28 pm | संग्राम
अरे वा ! छान ....
>> अध्यक्ष महोदय , पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो ...
लोकमान्य टिळक , गांधीजी यांच्यावर शाळेत केलेले भाषण आठवले ....
... तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा !!!
17 Feb 2010 - 7:34 pm | गणपा
पहिलाच प्रयत्न स्तुत्य आहे.
पुलेशु.
17 Feb 2010 - 11:45 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
18 Feb 2010 - 12:25 am | टारझन
ह्म्म्म .. :) अंमळ मजेशिर आहे :)
18 Feb 2010 - 2:49 am | मीनल
लेखाने खरोखरच हसवलं.
(कुंईंSSSSSSSSS - माईकने दगा दिला.)" :)) :D
मीनल.
18 Feb 2010 - 8:11 am | प्रमोद देव
चिर्कुटा,मस्तच लिहिलं आहेस.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
18 Feb 2010 - 9:00 am | चिर्कुट
या स्वागताने भारावून गेलो आहे.. >:D<
बरेच दिवस मिपावर फक्त वाचक होतो. वाईट लेखनास येथे मिळणारे 'खतरनाक' प्रतिसाद वाचून लेख टाकायला घाबरत होतो.
सर्वांना धन्यू. लोभ कायम असावा.
|| चिर्कुटेश्वर बाबा की जय || B)
18 Feb 2010 - 9:43 am | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त लिहीले आहे.:)
18 Feb 2010 - 10:23 am | वरुणराजे
यावरून मला माझे पहिले भाषण आठवले. इ. ४ थी असताना मी दिवाळीच्या सुट्टीच्या आधी मी दिवाळी सणावर भाषण केले होते.
त्यावेळी "नवीन कपडे घालायचे व फटाके उडवायचे असे एक वाक्य होते." पण मी चुकून "नवीन फटाके घालायचे व कपडे उडवायचे" असे म्हणालो होतो . >:P
त्यामुळे संपुर्ण शाळेत मी कपड्यांवजी फटाके घालणारा म्हणून प्रसिद्ध झालो होतो पुढे त्या फटाक्याचे फाटके कपडे झाले. आणि दिवाळीत फाटके कपडे घालणारा म्हणून प्रसिद्ध झालो. :''( :''(
18 Feb 2010 - 8:16 pm | संताजी धनाजी
=))
- संताजी धनाजी
18 Feb 2010 - 8:39 pm | सुमीत भातखंडे
प्रयत्न मस्तच.
पु.ले.शु.
19 Feb 2010 - 11:04 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्तच लिहिलंय...
बिपिन कार्यकर्ते
22 Feb 2010 - 7:37 am | अश्विनीका
मजेशीर अनुभव आहे. आणि पहिलाच प्रयत्न असला तरी छान मांडला आहे.
- अश्विनी
20 Mar 2013 - 6:08 am | शुचि
धागा वर आणते आहे.
20 Mar 2013 - 8:02 pm | चिर्कुट
:)
20 Mar 2013 - 11:54 am | भटक्य आणि उनाड
छान पन 'पारले-जी' चाँकलेट असे काहि होते का?
21 Mar 2013 - 12:35 am | अभ्या..
हिहिहि. भारीच.
पण पारले जी हे पारलेचे ग्लुकोज बिस्कीट असतेय.
त्या फेमस चॉकलेटचे नाव पारले किस मी (स्पेलिंग मात्र kismi) ;)
परत एकदा तुम्हाला बक्षीस
21 Mar 2013 - 11:10 am | चिर्कुट
हेच ते... :)
20 Mar 2013 - 12:02 pm | बॅटमॅन
हा हा हा सहीच!
मिपावरच एक मिपाच्या इतिहाससंशोधनपर विभाग उघडावा काय?