"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
ही मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या (Decadent) पाश्चात्य वृत्तसंस्थेवरील मुलाखत नसून "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत असून ती कालच (२१ जून ०९ला) अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झाली.
अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्या क्रमांकाचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढे पहाणार नाहींत.
पकिस्तानी सैन्य एप्रिल महिन्यापासून वायव्य पाकिस्तानातील स्वात खोर्यात व इतर आदिवासी विभागात तालीबान व अल्-कायदा यांच्याबरोबरच्या लढाईत गुंतलेले आहे. वाचकांना माहीत असेलच कीं त्याआधी तालीबान्यांनी रावळपिंडीपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बुनेरच्या आसपासच्या विभागावर ताबा मिळविण्याचा (जवळ-जवळ यशस्वी) प्रयत्न केला होता.
"ईश्वरेच्छा असेल तर - "इन्शाल्ला" - पाकिस्तानातील "मुस्लिम" अण्वस्त्रे अमेरिकेच्या हाती पडणार नाहींत आणि आमची हीच प्रार्थना आहे कीं ही अण्वस्त्रे मुसलमानांच्याकडेच रहातील व व ती अमेरिकेविरुद्ध वापरली जातील" असेही अल्-कायदाचे अफगाणिस्तानमधील नेते अबुल-याझीद यांनी रविवारी सांगितले.
ते पुढे असेही म्हणाले कीं अल्-कायदा संघटना मुजाहिदीन लढवय्यांना मदत करत आहे, तालीबानशी मजबूत संबंध ठेवून आहे व त्या संघटनेला अशी आशा आहे कीं स्वात खोर्यातील लढाईत पाकिस्तान सरकारचा पराभव होईल.
अल्-कायदा संघटनेचे मुख्य नेते ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी सध्या कुठे आहेत या प्रश्नाला उत्तर देताना अबुल-याझीद म्हणाले की देवाच्या दयेने दोघेही शत्रूंपासून सुरक्षित आहेत, पण त्यांच्या ठावठिकाणाबद्दल त्यांना स्वत:लाही माहिती नाहीं त्यामुळे ते या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहींत पण त्यांना सर्व लढायांबद्दल व इतर गोष्टींबद्दल पूर्ण माहिती आहे.
तालीबानचे स्वागत
अफगानिस्तानला येण्यापूर्वी अबुल-याझीद अल्-कायदाचे मुख्य आर्थिक अधिकारी होते आणि त्यांनी ९/११ च्या हल्ल्यासाठीही पैसा पुरवला होता.
१९८०च्या सुरुवातीला ते अल्-जवाहिरीबरोबर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांच्या हत्येमध्ये हात असल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते.
त्यांनी या मुलाखतीत "अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालीबान व आदिवासींच्या विभागात (FATA*) आमचे नेहमीच स्वागत झाले आहे व तिथल्या लोकांनीही आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला" असे सांगत पकिस्तानातील स्थितीबद्दल खूप समाधान व्यक्त केले. आमचे (अल्-कायदाचे)संरक्षण करताना पाकिस्तानी फौजेने त्यांच्यावर (FATAमधील लोकांवर) हल्ला केला, पण आम्ही नेहमीच एकमेकांना मदत केली आहे व एकमेकांचे संरक्षण केले आहे असेही ते म्हणाले.
"जिहाद, धर्म व एकनिष्ठता या विषयांवर आमची मते तंतोतंत जुळतात. परिस्थितीत सुधारणा झाल्यावर आम्हाला अफगाणिस्तानात परत जाऊ दिले, पण कांहीं लोक गेले तर कांहीं इथेच आदिवसींच्या भागांत राहिले. आजही त्यांचे तिथे संरक्षण होतेय्."
अबुल-याझीद यांच्या भाष्यावर बोलताना अल् कायदाबद्दलचे विशेषज्ञ मायकेल ग्रिफिन अल् जझीराला म्हणाले कीं त्यांची (याझीद यांची) विधाने म्हणजे वल्गना व उग्र प्रतिकार यांचे "गमतीदार मिश्रण" आहे पण ती विधाने अल् कायदाच्या कांहीं त्रुटींवरही प्रकाश पाडतात.
त्यांना जर स्वात खोर्यात इतके संरक्षण मिळत आहे असे मानले, तर त्या मानाने त्यांच्या (स्वातच्या) तीस लाख लोकसंख्येबरोबर त्यांच्यातही खूप प्राणहानी झालेली आहे. गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी त्यांची ताकत खूपच कमी झालेली आहे असेही ग्रिफिन म्हणाले.
"ताकत कमी झालेली नाहीं"
याउलट अल् कायदाची ताकत अजीबात कमी झालेली नाहीं असे ठासून प्रतिपादन करीत अबुल-याझीद यांनी त्यांच्या संघटनेचा विस्तार व प्रसार झपाट्याने होत असल्याचा व येथे नवीन-नवीन आघड्याही (fronts) उघडत असल्याचा दावा केला. या नवीन आघड्यांद्वारे आम्ही आमच्या शत्रूबरोबर एक मोठ्या मोहिमेऐवजी अनेक छोट्या-छोट्या मोहिमा राबवून आमची उद्दीष्टें पूर्ण करीत आहोत व आम्हाला त्यात यशही मिळत आहे. आम्ही मोठ्या मोहिमा पूर्णपणे बंद केलेल्या नाहींत, त्या आम्ही योजिलेल्याही आहेत, पण सध्याच्या विशिष्ट परिस्थितीत त्या आम्ही पुढे ढकलल्या आहेत इतकेच असेही ते म्हणाले.
पाकिस्तानातील अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी रीत्या पार पाडण्यात "पाकिस्तानी तालीबान"ला "अल् कायदा"चे सहकार्य जरी घ्यावे लागले असले तरी ग्रिफिन यांच्या मते "अफगाणी तालेबान"ने पार पाडलेल्या मोहिमांत अल् कायदाचा फारसा हात नाहीं व अफगाणी तालेबनी तिथे स्वतंत्रपणे मोहिमा राबवत आहेत.
’सरेना’ हॉटेलवरील हल्ला किंवा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंच्या हत्येचा प्रयत्न अशा मोठ्या मोहिमा सोडल्यास "अफगाणी तालेबान"चे हल्ले त्यांच्या स्थानीय अधिकार्यांद्वारा अल् कायदाच्या जुजबी सहकार्यातून केले गेलेले आहेत.
पाकिस्तानी सैन्य जेंव्हा "पाकिस्तानी तालीबान"बरोबर शांतीचे करार करत होते त्यावेळेला ते खरे तर अल् कायदाबरोबर करार करत होते. पण आता त्यांची ("पाकिस्तानी तालीबान"ची) पीछेहाट झाली आहे त्यामुळे अल् कायदा संघटना त्यांची माणसे आता वझीरिस्तानमधून बाहेर काढून सोमालिया आणि येमेनसारख्या देशात पाठवायची योजना आखत आहे.
तालीबानच्या समर्थनात
या मुलाखतीत अबुल-याझीद यांनी पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानसारखा मुस्लिम देश चालविण्यासाठी इस्लाम धर्मावर आधारित शारिया कायदा न वापरता इंग्रजी कायदा वापरल्याबद्दल टीका केली व वझीरिस्तान व इतर आदिवासीविभागात "पाकिस्तानी तालीबान" योध्यांबरोबर लढाई सुरू केल्याबद्दलही दोषी ठरविले.
आमचे योद्धे फक्त स्वतःचे संरक्षण करत होते, त्यांनी पाकिस्तानी सेनेबरोबर युद्ध सुरू केले नाहीं. पाकिस्तानी सैन्य किंवा पाकिस्तानी सरकार यांच्यावर हल्ला करण्याचा आमचा अजीबात इरादा नव्हता. जेंव्हा त्यानी आमच्यावर पुन:पुन्हा हल्ले केले व पाकिस्तानी जनतेवर व मुजाहिदीन संघटनेच्या योद्ध्यांवर अत्याचार केले तेंव्हांच आम्ही त्यांच्याशी लढलो असेही ते म्हणाले.
अबुल-याझीद यांच्या पाकिस्तानी अण्वस्त्रे काबीज करून ती अमेरिकेविरुद्ध वापरण्याच्या विधानाबद्दल विचारले असता ग्रिफिन म्हणाले कीं एक वेळ अशी आली होती कीं ही शक्यता खूपच दाट वाटत होती, विशेषत: जेंव्हा अल् कायदाने इस्लामाबादच्या पश्चिमेला असलेल्या ’वाह’ गावावर परिणामकारक आत्मघाती हल्ला चढविला तेंव्हा. (’वाह’मध्ये अण्वस्त्रांचे सुटे भाग ठेवण्याची गुदामे आहेत व आण्वस्त्रांची तिथे जोडणीही केली जाते.) पण आता ही भीती खूप कमी झाली आहे.
त्या हल्ल्याने पाकिस्तानच्या शहरी वस्त्या - आदिवासी वस्त्या नव्हे - कशा धोक्यात आहेत याची जाणीव करून दिली असेही ग्रिफिन म्हणाले. पण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पाकिस्तानची "एक अपयशी राष्ट्र" या निकषावर परिस्थिती सुधारली आहे.
*FATA stands for Federally Administered Tribal Area
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 12:53 am | आकाशस्थ
आपल्या लेखातून अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झालेलं वृत्तं समजलं.
परंतु,
(असेही अल्-कायदाचे अफगाणिस्तानमधील नेते अबुल-याझीद यांनी रविवारी सांगितले. अफगानिस्तानला येण्यापूर्वी अबुल-याझीद अल्-कायदाचे मुख्य आर्थिक अधिकारी होते आणि त्यांनी ९/११ च्या हल्ल्यासाठीही पैसा पुरवला होता.
१९८०च्या सुरुवातीला ते अल्-जवाहिरीबरोबर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांच्या हत्येमध्ये हात असल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते)
लेख वाचताना एक गोष्टं खूप खटकली. अनावधानाने असेन कदाचित, पण "अल् कायदा" या कुपप्रसिद्ध संघटनेच्या या लेखात उल्लेखित "म्होरक्या"विषयी तुम्हाला नितांत आदर आहे असा वाचकांचा ग्रह होऊ शकतो...
बाकी लेख उत्तमच.....
24 Jun 2009 - 7:19 am | विसोबा खेचर
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
उत्तम होईल! अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा दुश्मन आहे. अण्वस्त्रांमुळे तो देश नामशेष झाला तर फारच छान होईल.
फक्त नामशेष होण्याआधी आमचे सर्व भारतीय बांधव सुखरूप भारतात परतले पाहिजेत..! :)
आपला,
(अमेरिकाद्वेष्टा) तात्या.
24 Jun 2009 - 7:48 am | सुधीर काळे
"आकाशस्थ" नांव घेतले असले तरी आपले पाय जमीनीवर आहेत याचा आनंद झाला व सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे कौतुकही वाटले.
तुम्ही म्हणालात तसे नाहीं. पहिल्या 'ड्राफ्ट' मध्ये मी याझीदचा उल्लेख "अरे-जारे"तच केला होत. पण नंतर हा 'ड्राफ्ट' वाचताना माझ्या असे लक्षात आले कीं मी ग्रिफिन यांचा उल्लेख, अनवधानाने कां होई ना पण, "अहो-जाहो"त केला होता. एकाला गोरा म्हणून अहो-जाहो करायचे व दुसर्याला तो अरब आहे म्हणून अरे-जारे करायचे ही वागणूक माझी मलाच वर्णद्वेषी अशी वाटून खटकली म्हणून मी संबोधन बदलले.
याझीदी धर्मवेडा आहे व नजीकच्या भविष्यकाळात तो आपल्या देशाला धोका होऊ शकतो म्हणून हा मनुष्य आपल्याला (मलाही) आवडत नाहीं. पण त्यांच्या संघटनेने आज बलाढ्य पकिस्तानी फौज व सुपरपॉवर अमेरिका व तिचे शस्त्रबळ व मनुष्यबळ यांच्या नाकातले पाणी पळविले आहे. म्हणून आपण या व्यक्तीला अरे-जारे केल्याने त्याच्या संघटनेचा कस कमी होत नाहीं. उलट उद्या आपली गाठ याच संघटनेबरोबर आहे व आपलेही दोन हात या संघटनेशी होणार आहेत असा दूरदर्शी विचार करून आपण शत्रूला नीट समजून घेतले पाहिजे. त्याला शिव्या दिल्याने ना आपली ताकत वाढते ना त्या संघटनेची कमी होते. येत्या पाच-ते दहा वर्षांत हिदुस्तानाला या संघटनेला चेचून काढायचे आहे हे लक्षात ठेवणे हेच फक्त महत्वाचे!
सुधीर काळे (अनुवादाक)
25 Jun 2009 - 7:11 am | आकाशस्थ
माझ्या "घेतलेल्या नावाचं" मार्मिक पण उपरोधिक विश्लेषण आणि यानंतरच्या प्रतिसादा मधील "साहेब" हे विशेषनाम अफलातून आहे. धन्यवाद.
" एकाला गोरा म्हणून अहो-जाहो करायचे व दुसर्याला तो अरब आहे म्हणून अरे-जारे करायचे ही वागणूक माझी मलाच वर्णद्वेषी अशी वाटून खटकली म्हणून मी संबोधन बदलले." हा आपला युक्तिवाद सुद्धा अफलातून आहे !!
आपण आपला "पहिला ड्राफ्ट" येथे प्रकाशित केला असता तर सुक्ष्मातिसूक्ष्म निरिक्षणांतूनही हा "वर्णभेद" कदाचित उलगडला नसता!
अखंड मानवजातीला काळिमा फासणारी कृत्ये करणारी ही संघटना आणि त्यांचे म्होरके आदरार्थी संबोधनास निश्चितच पात्र नाहीत. त्यांना एकेरी संबोधल्याने त्यांच्या ताकदीला कमी लेखलं जातं असंही नाही. परंतु, कुकर्म करणारी व्यक्ति वा संघटना कितीही सामर्थ्यवान असली तरीही ती समाज व मानवजातीच्या आदरास यत्किंचीतही पात्र नसते, असा एक मार्मिक इशारा यातून दिला जातो. किंबहुना लेखनातील हा एक संकेतच आहे. कुठलेही "दर्जेदार" मराठी वृत्तपत्रं आपण चाळलंत तर बहुतांश मोठ मोठे पत्रकार आणि संरक्षण सल्लागार हा संकेत पाळताना दिसतात.
आपल्या लेखात तो दिसला नाही ही आपल्या लेखनातील एक "तांत्रिक कमी" मी दाखवून दिली.
आपला अनुवादात्मक लेख माहितीपूर्ण होता असाच माझा अंतिम निष्कर्ष होता.
धन्यवाद.
24 Jun 2009 - 8:05 am | सुधीर काळे
तात्यासाहेब व कर्कसाहेब,
(खरं तर या न्यायाने आकाशस्थ यांना पण आकाशस्थसाहेब म्हणायला हवे होते, क्षमस्व)
२०१४ पर्यंत भारतीय फौजा तालीबानच्या फौजांबरोबर भिडणार यात मला तरी शंका वाटत नाहीं. तेंव्हा शत्रूचा शत्रू तो आपला (तात्पुरता कां होई ना) मित्र हे लक्षात ठेवलेले बरे. येत्या पाच-दहा वर्षांत सध्याच्या मुस्लिम जगात खूप उलथा-पालथ होणार आहे. त्यावर लिहिलेला माझा लेख उपलब्ध आहे पण लिप्यंतरातील अडचणी पहाता मी तो इथे देऊ शकत नाहीं. वैयक्तिक ई-मेल पत्त्यांवर पाठवू शकतो. येत्या कांहीं वर्षांत पाकिस्तान हा देश कराची व रावळपिंडी यांना जोडणारी गाझासारखी पट्टी रहाणार आहे, बलिचिस्तान व कुर्डिस्तान स्वतंत्र देश होणार आहेत, अफगाणिस्तान दक्षिणेला व इराण पूर्वेला सरकणार आहे, सौदी अरेबिया असणार नाहींय्, त्या ऐवजी मक्का-मदीना ही शहरे "पवित्र नगरी-होली लॅंड्स्" म्हणुन असतील असे खूप होरे आहेत. पाकिस्तान ही एक गाझासदृष पट्टी राहिली तर तालीबानी आपल्या नको तितके जवळ येणार आहेत व काश्मीरसारखी खुसपटे काढून आपल्याला त्रास देणार आहेत. अशा वेळी अमेरिका व इतर पाश्चात्य राष्ट्रेच फक्त (त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी का होई ना) आपल्या बाजूने उभी राहातील. तरी इकडे दुरदर्शीपणाने पहाणे अवश्य आहे.
सुधीर काळे (अनुवादाक)
24 Jun 2009 - 8:06 am | सुधीर काळे
तात्यासाहेब,
हा तालीबानवरचा अनुवादात्मक लेखही मिपावरच फक्त प्रसिद्ध झाला आहे, इतरत्र नाही!
सुधीर काळे
25 Jun 2009 - 8:03 am | सुधीर काळे
पाकिस्तानला अण्वस्त्रे पुरविण्याचे "पाप" रेगन, बुश-१ व बुश-२ या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत घडले अशी माहिती नुकतीच वाचण्यात आली. आधीची जी कल्पना होती कीं हे पाप चीनने केले ते खरे नाहीं असे दिसते. यावर माझे संशोधन सुरू आहे. पाहू हे संशोधन मला कुठे घेऊन जाते ते!
त्या दृष्टीने तालीबानने ही अस्त्रे उद्या जर अमेरिकेवरच उलट डागली तर एका तर्हेने "चांगली अद्दल घडली" किंवा "poetic justice" असे म्हणता येईल!
25 Jun 2009 - 5:26 pm | एकलव्य
तालिबान्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर सर्वात मोठा धोका भारताला आहे. सॉफ्ट अॅन्ड टेक्टिकली/लॉजिस्टिकली सोपे टारगेट म्हणून पहिला हल्ला भारतावर होण्याचीच शक्यता अधिक.
25 Jun 2009 - 5:44 pm | सूहास (not verified)
<< मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या >>
सत्य आहे.
<<<अबुल-याझीद यांच्या भाष्यावर बोलताना अल् कायदाबद्दलचे विशेषज्ञ मायकेल ग्रिफिन अल् जझीराला म्हणाले कीं त्यांची (याझीद यांची) विधाने म्हणजे वल्गना व उग्र प्रतिकार यांचे "गमतीदार मिश्रण" आहे पण ती विधाने अल् कायदाच्या कांहीं त्रुटींवरही प्रकाश पाडतात.>>>
मायकेल ग्रिफिन ह्या॑च्याशी सहमत...
अमेरिकेनेच तालिबान सारखा भस्मासुर बनविला आता पाकिस्तानला पोसताहेत....अमेरिकेची जगाची "पोलीसी" केल्याने त्या॑च्याच अ॑गलट आली आहे..येत्या पाच्-दहा वर्षात भारताला ह्या॑च्या(अमेरिका+पाकिस्तान्+तालिबान+अल-कायदा आणी बा॑गलादेश पासुन तर धोका आहेच) लढा द्यावा लागेल....ईथे दोन फाश्या अजुन "पेन्डी॑ग" आहेत्..तो गोळ्या घालणारा फिदी-फिदी हसतो काय...मृत माणसे बघून रडतो काय्..असो..विषया॑तर नको....
सुहास