ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल
लेखक: अजय भागवत. १२ जुन २००९ , पुणे ajaybhagwat@marathishabda.com
हया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे . त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :
१ . ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत
२ . ज्ञानाचे स्वरुप मांडले आहे , त्यातील कक्षा स्पष्ट केल्या आहेत
३ . ज्ञान आत्मसात करण्याच्या विवीध पातळ्यांचा विचार मांडला आहे ( ब्लूम्स टॅक्सॉनमीच्या आधारे )
४ . शेवटी , वरील विचारांचा वापर करुन काही सुचना मांडल्या आहेत . त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करुन शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे .
ज्ञानाची व्याख्या
ज्ञानाची व्याख्या करणे तितकेसे सोपे नसले तरी आपल्याला प्रयत्न करता येईल व ह्यालेखाचा आशय समजण्यासाठी त्या व्याख्येचा वापर करता येईल ह्या उद्देशाने पुढील व्याख्या केली आहे .
मानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष , वास , दृष्टी , चव , ध्वनी , अशा इंद्रियांनी मिळवतो . हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने , अनुषंगाने , बरोबरीने करतो .
प्राथमिक स्वरुपात साठवलेल्या ज्ञानाचा क्रमाक्रमाने विकास होतो . व ते अधिकचे , वाढीव ज्ञान आधिच्या ज्ञानाच्या बरोबरीने साठवले जाते . ह्या अशा ज्ञानाचे विश्लेषण केले असता , त्यात आपल्याला वेगवेगळे परिमाणं ( मापं / प्रकार ) दिसतात - हे ज्ञानाचे स्वरुप एखादी उतरंड नव्हे . एकाच वेळी आपण अनेक स्वरुपाचे ( परिमाणाचे ) ज्ञान उघड करु शकतो .
१ . तथ्य ( फॅक्ट ), उदा . एव्हरेस्टची उंची ८८६८ मी . आहे
२ . संकल्पना ( कॉन्सेप्ट ), उदा . व्याख्या , वेगवेगळ्या कल्पनातील साम्ये अथवा फरक , एखादा नियमही ( सिद्धांत ) कल्पना असतो . ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे , मिटींगला " शोभतील " असे कपडे घालावेत आणि ही कल्पना कालानुसार , स्थळानुसार बदलते . ( एव्हरेस्टची उंची अशी संकल्पनेने बदलत नाही , म्हणून ते तथ्य !)
३ . पद्धत ( प्रोसीजर ) उदा . गणित सोडवण्याची , गाडी सुरु करण्याची . पद्धत ही अनेक पायऱ्यांनी बनते , ती पुन्हा - पुन्हा त्याच क्रमाने करता येते .
४ . संरचना ( मॉडेल ) उदा . परिक्षा कशी घ्यावी , उत्तरपत्रिका कशा तपासाव्यात . संरचना आपल्याला मार्ग दाखवते .
५ . अभिसंरचना ( मेटामॉडेल ) उदा . संरचना कधी व कशी तयार केली म्हणजे ती अडचण सोपी करु / सोडवू शकेल , संरचनेचे घटक काय असावेत हे समजणे
६ . कौशल्य उदा . मी " अशा " रितीने उत्तम चित्र काढू शकते . अशा - इतरांपेक्षा वेगळ्या व अधिक परिणामकारकतेने - ते कसे हे माहित असणे
७ . निवडकौशल्य ( व त्यावर असलेला आत्मविश्वास ) उदा . मी आजपर्यंत तोरण्यावर गेलो नाहीए पण मला गडावर जाण्याचे अनेक मार्ग ऐकिव अथवा पुर्वानुभवाने माहिती आहेत , मी ह्याच वाटेचा वापर करेन
८ . विचारसंरचना ( ह्याला अनुभव असेही म्हणता येईल पण ते तितकेसे सुसंगत वाटत नाही ) ( मेटाकॉग्निशन ) उदा . मी ह्यावर कसा आणि काय विचार केला पाहिजे ?- की जेणेकरुन समोरील प्रश्नाची उकल होईल ? तोरणावर जायचे मला १० मार्ग माहिती आहेत , त्यातील योग्य तो कसा निवडावा ?
वरील ज्ञानपरिमाणं एखादी व्यक्ति कशी वापरते ते पाहूया . एक कॅप्टन हा विचार करतो आहे असे समजा -
" शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत . माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत . रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते . मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन . अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का . मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय ; वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते . चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे . ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए ."
वरील आठही ज्ञानपरिमाणं तुम्हाला ह्या विचारात स्पष्टपणे दिसतील . हे ज्ञानाचे स्वरुप लहान मुलातही दिसते फक्त त्यांच्या स्वरुपाची कक्षा वयस्कर व्यक्तिच्या कक्षेच्या तुलनेने बरीच लहान असते . परंतू ते स्वरुप आकारायला सुरुवात केव्हाच झालेली असते . ( काय केले म्हणजे बाबा मला नवे खेळणे आणून देतील ? मी मोठ्यापणी पायलट होणार .. वगैरे ).
ज्ञान कशाला म्हणता येईल ह्याची कल्पना आल्यावर आपण पुढील मुद्द्याकडे वळू शकतो . पुढचा मुद्दा आहे तो पंचेन्द्रीयांनी प्राथमिक स्वरुपात मिळवलेल्या ज्ञानाचे परिमाण कसे वाढवायचे ह्याचा . ह्यालाच आपण " शिक्षणपद्धत " म्हणू शकतो .
ज्ञान संपादनाच्या पायऱ्या ( पातळ्या )
असे म्हणले जाते की , आपण तासभर एखादी कृती ऐकली , पाहिली की , ती कृती संपायच्या आत त्यातील ४० % ज्ञान आपण विसरलेलो असतो . दुसऱ्या दिवशी , पुढील आठवड्यात , महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व कृती विस्मरणात जाऊ शकते . ( मला ह्या क्षणी हे आठवतेय , ""Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand." Confucius, circa 450 BC")
ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात ठेवण्यासाठी ते ज्ञान ह्या टप्प्यातून जावे लागते :
१ . आठवणे : एखादी गोष्ट ( तथ्य ) स्मरणात राहण्यासाठी ती समजणे आवश्यक नसते . ( उदा . बालवाडीतील मुलांनी घोकलेल्या नर्सरी ऱ्हाइम ).
२ . समजणे : एखादी गोष्ट समजली की , ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते . त्याची उदाहरणे देता येतात , त्याचे सुपरिणाम / दुष्परिणाम सांगता येतात
३ . वापर : वापर केला तर समज अधिक भक्कम होते तसेच समजले तरच बाहेरील जगात त्या ज्ञानाचा वापर करता येतो . नुसत्या " सांगता " येण्यापेक्षाच्या वरच्या पातळीत जाता येते .
४ . चिकित्सा ( उहापोह , पडताळणी , कसोटी ): चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने विभागून / छेदून , प्रत्येक भागाचा स्वतंत्रपणे विचार करुन त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येतो .
५ . तुलना : फायदे / तोटे , चांगल्या / वाईट बाजू , त्या गोष्टीच्या स्वरुपाशी तुलना अथवा इतर पण संबंधीत गोष्टीशी तुलना करता येते
६ . नवनिर्माण : जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो .
आठवता येणे ह्या स्थितीपासुन नवनिर्माणाच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काही सर्वमान्य पायऱ्या वापराव्या लागतात , वेळ द्यावा लागतो . ह्या लेखाच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळण्याआधी , ज्ञानाचे स्वरुप व ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या ह्यावर क्षणभर घुटमळून पुढे जाऊ . त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो -
अ ) एखादे मुल हुषार किंवा ढ कसे ठरते ? ( आयएम्पी : ज्ञानाची कक्षा , स्वरुप , अस्तित्वातच नसणे व असणे )
ब ) मानवाला शिकवता येते का ? की तो सतत स्व - शिक्षण करतो ? ( आयएम्पी : पंचेंद्रिये )
क ) तुमच्या पाठ्यपुस्तकांची ( शाळा , महाविद्यालयातील ) तुम्हाला आठवण येत असल्यास त्यात ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या का ? उदाहरणे देऊ शकाल ?
ड ) थेअरी म्हणजे काय ? ती कोणी तयार केली ? ती तयार करणाऱ्यांनी कोणते शिक्षण घेतले होते ? कोणती पुस्तके वापरली होती ?
शिक्षणसंस्थेतील शिक्षण व ज्ञान संपादनाच्या पातळ्या
शेवटच्या प्रश्नातील पुस्तकांचा धागा पकडून पुढील मुद्द्याकडे वळुया . शिक्षणसंस्थेत आपण बालवाडी , प्राथमिक .. अशा टप्प्यांनी शिकत पुढे जातो . शिक्षणसंस्थेतील शिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट्य मानवाचे ज्ञानाचे स्वरुप निर्माण ( ज्ञानकक्षा ) करणे हे आहे असे गृहीत धरले तर ते स्वरुप घडवण्यासाठी आपण शिक्षणसंस्थेत जातो . पण शिक्षणसंस्थेत घडल्या जाणाऱ्या ज्ञानकक्षा ठराविक विषयांच्या असतात - गणित , भाषा , शास्त्र , संस्कार ( इतिहास ). हा पुढील शिक्षणाचा पाया असतो जो वापरुन आपण महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या इमारती रचणार असतो . शिक्षणसंस्थेव्यतिरीक्त आपण घरी , समाजात , प्रवासात , ई वेगवेगळ्या ज्ञानकक्षा मनाप्रमाणे स्वीकारतो , नाकारतो . त्यामुळेच प्रत्येकाचे ज्ञानाचे स्वरुप वेगवेगळे असते .
दहावी पर्यंत सगळ्यांना समान विषय असल्यामुळे ह्या लेखासाठी पुढील चर्चेत हाच काळ संदर्भलेला आहे .
ज्ञानकक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया परिणामकारक असावी लागते . वरील ६ पैकी पहिल्या ३ टप्प्यांतून ज्ञान गेले नाही तर ते लक्षातही राहणार नसते . बऱ्याचशा शिक्षणसंस्थेत ३ ऱ्या टप्प्याच्याही वर मुलांना जाता यावे म्हणून वादविवाद स्पर्धा , नाटयकला इ कला , खेळ , सहली , गॅदरींग , व्यवसाय , विज्ञानप्रयोग , प्रदर्शने , असे अनेक उपक्रम आखते . त्यातील काही उपक्रमांतील सहभाग ऐच्छीक असतो व काही वेळा मर्यादीत ठेवावा लागतो . त्यामुळे सगळ्यांनाच " तो " टप्पा पार पाडता येत नाही . काही उपक्रमात त्या - त्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित ज्ञानकक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो तर काही वेळा कोणताही संबंध नसु शकतो .
अशा क्रियेतून मुलांना नेतांना ज्ञान आत्मसात करण्याची पहिल्या ३ टप्प्यातील क्रिया अतिशय परिणामकारक व्हावी असे वाटते . कारण ते टप्पे पाठ्यपुस्तकातून घडवून आणायचे असतात व त्या क्रियेत सगळ्यां विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असतो . त्या पलिकडील टप्पे शाळातील विविध उपक्रमाद्वारे व शाळेतर माध्यमातून मिळवायचे असतात . पण ते मिळवतांना त्यात सगळ्यांचा समान सहभाग नसतो आणि म्हणूनच पहिले ३ टप्पे मी पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानतो
पाठ्यपुस्तके , ३ टप्पे आणि शिक्षक
पाठ्यपुस्तके व ३ टप्पे ह्यांचा संबंध आपण पाहिला . ह्या ३ टप्प्या्तून ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणखी एक दुवा असतो तो म्हणजे शिक्षक ! शिक्षकाला पाठयपुस्तकाच्यानुसार शिकवणे नियमानुसार क्रमप्राप्तच असते . ते पुस्तक शिकवण्याकरता व शिकवणे परिणामकारक आहे की नाही हे पाहण्याकरता किती " तास " प्रत्येक शिक्षकाला दर महिन्यात मिळतात हे पहाणे फार महत्वाचे आहे . खरे म्हणजे असलेला वेळ पुरतो की नाही व त्या वेळेत परिणामकारक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते की नाही ह्या विषयावर मी भाष्य करु शकणार नाही . पण असलेल्या वेळाचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी शिक्षकासाठी त्याच विषयांची खास पाठ्यपुस्तके असावीत .
शिक्षकाकडून प्रत्येक विषयाचे लेसन प्लॅन बनवणे अपेक्षिले जाते . पाठ्यपुस्तक जर सगळ्या शाळांना समान असेल तर प्रत्येक शाळातील शिक्षक आपापल्या पद्धतीने प्लॅन बनवतांना त्यांना असे मॉडेल द्यावे की , त्यांना त्यांचा वेळ त्यात खर्च करण्यापेक्षा शिकवण्याच्या प्रक्रियेवर देता येईल . प्लॅनमधील व्हेरिअशन कमी होईल . हे मॉडेल करतांना खालील सुचना द्याव्याशा वाटतात .
१ . कोणत्याही एका विषयाचे ( गणित सोडून ) उदाहरण घेऊ . एका पुस्तकात उदा . १० धडे आहेत व त्यात सगळे मिळून १०० तथ्ये ( फॅक्ट ), पद्धती , संरचना आहेत . ह्यांना आपण १०० उद्दीष्ट्ये म्हणू . अर्थातच ह्यातील काही उद्दीष्ट्ये फक्त आठवणे ( उदा . कुप्रसिद्ध सनावळ्या ) तर काही समजणे तर काही वापर करणे अशा वेगवेगळ्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीवर नेणे आवशक आहे . त्यासाठी ते शिक्षकाला कळण्यासाठी ती १०० उद्दीष्ट्ये ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला संलग्न करावीत व पाठ्यपुस्तकात नमुद करावीत . ( उदा . उद्दीष्ट्य १ : समजणे , उद्दीष्ट्य २ : आठवणे , उद्दीष्ट्य ३ : वापर , ई ). लेसन प्लॅनला ह्याचा फायदा होईल . व शिक्षकाने काय प्रश्न विचारले पाहिजेत ते ही ठरवता येईल ( हे आपण पुढे पाहूच ).
जर एखादे उद्दीष्ट्य " आठवणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते " वापर " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे . त्याच प्रमाणे एखादे उद्दीष्ट्य " समजणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते फक्त " आठवण " लाच शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे .
ही सुविधा पाठ्यपुस्तकातून शिक्षकांना मिळाली तर त्यांना लेसन प्लॅन बनवणे तर सोपे जाईलच (किंबहुना तो तर शिक्षकांसाठीच्या) पाठ्यपुस्तकातच दिलेला असावा. शिक्षकाला आपली कल्पनाशक्ती वापरता यावी ह्यासाठी त्यांनी त्यांचा लेसन प्लॅन खालील प्रमाणे बनवावा. ह्यात त्यांना कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीवर न्यायचे आहे हे डावीकडे लिहावे. ज्ञानपातळी प्रमाणे प्रश्न तयार करावे. हे प्रश्न त्यांनी वर्गात धडा शिकवतांना विचारावेत अथवा परिक्षेत वापरावेत. येथे शिक्षकांचा वेळ लेसन प्लॅन बनवण्यात न जाता , चांगले प्रश्न निर्माण करण्याकडे दिल्यामुळे शाळेची एक अशी प्रश्नपेढी तयार होईलच व शिक्षकांच्या वेळेची अधिकाधिक बचत होईल. अशा प्रश्नांच्या माध्यमातून शिकवण्यातही काही प्रयोग करुन पहाता येतील- उदा. ओपन बूक लर्निंग.
[“We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction.” Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005]
खालील तक्त्यातील धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01 हे चांगले आत्मसात केले गेले आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षक काही प्रश्न तयार करतील ते प्रश्न निरसन झाले की , ते उद्दीष्ट्य गाठले असे समजता येईल. एखादे उद्दीष्ट्य तपासतांना योग्य त्या ज्ञानपातळीचेच प्रश्न तयार करतांना कोणतीही शंका राहणार नाही. प्रत्येक शाळांमधील प्रत्येक शिक्षकातील शिकवण्याच्या पद्धतीत एक प्रकारची लय येईल. ते एकमेकांशी संवाद साधू शकतील (उदा. मराठीशब्द.कॉम सारख्या माध्यमातून प्रश्नांची देवाण-घेवाण , ई). विद्यार्थ्यांना शंका राहणार नाही की आपला पाया मजबूत राहण्यासाठी मी कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीपर्यंत शिकायचे आहे. त्यामुळे त्यांच्यातील भ्रम नाहिसा होऊन त्यांच्यातही एक लय येऊ शकेल. वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या वर्गात शिकवू शकतील/प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील (की ज्याने त्यांचा पाया आणखी मजबूत होउ शकेल.).
ज्ञानपातळी : माहिती आठवता येणे
कोणते प्रश्न असावेत ?
कोणी , काय , कधी , कुठे , कसे , सांगा
( उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा )
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?
क्रियापदे: सांग , यादी बनव , समजाव , नातं सांग , शोध , लिही , नाव दे (काय म्हणतात ते सांग) , व्याख्या सांग
... किती आहेत ?
हे..कोणी केले ?
ह्याला काय म्हणतात ?
... तेथे काय घटना घडली ते सांग
कोण कोणास म्हणाले ?
हे का झाले ते सांग
ह्याचा अर्थ काय ते सांग
हे काय आहे ?
हे कधी घडले ?
खरे की खोटे ?
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 09
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 99
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
ज्ञानपातळी: माहिती समजणे
कोणते प्रश्न असावेत ?
स्वतःच्या शब्दांत सांगता येणे , माहितीच्या स्रोतातून हवे त्याची अचूक निवड करता येणे
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?
क्रियापदे: समजावून सांग , व्याख्या विस्तृत कर , सारांश तयार कर , चर्चा कर , फरक सांग , अंदाज कर , भाषांतर कर , तुलना कर , विस्तार करुन सांग
तुझ्या शब्दात सांग , ह्या माहितीचा सारांश तयार कर
.. ह्याच्या पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांध
... तुझे विचार सांग ?
.... ह्यातील मध्यावर्ती कल्पना काय आहे ?
ह्या घटनेतील मुख्य दुवा कोण होता/आहे ?
ह्यातील फरक सांगू शकशील का ?
ह्याचे एखादे उदाहरण देऊ शकशील का ?
ह्याची व्याख्या करु शकशील का ?
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 22
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 56
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 72
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
ज्ञानपातळी: माहितीचा वापर
कोणते प्रश्न असावेत ?
सौरौउर्जेचा वापर ...ह्यासाठी केला जाऊ शकतो का ? तसेच आणखी काय उदाहरणे देता येतील ?
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?
क्रियापदे: ( गणित) सोडव , ( सिद्ध करुन) दाखव , वापर , दाखले दे , तयार कर , पुर्ण कर , चालव , परिक्षा घे , गट तयार कर
... ह्याचा आणखी एखादा दाखला देता येईल का ?
हे (वेगळ्या परिस्थितीत) घडू शकते का ?
ह्यांचे ...असे वेगवेगळे गुणात्मक गट तयार कर
ह्यात काय बदल तुला करावे लागतील जर...
ही पद्धत तुला इतर कोणत्या (तुझ्या स्वतःच्या बाबत) ठिकाणी वापरता येईल ?
तु कोणते प्रश्न विचारशील ?
ह्या माहितीच्या आधारे तू एखादी रीत तयार करु शकशील का ?
ही माहिती उपयोगाची आहे का जर...
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 25
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
धडा १: उद्दीष्ट्य क्र. 48
प्रश्न:
प्रश्न:
प्रश्न:
प्रतिक्रिया
20 Jun 2009 - 10:17 pm | लिखाळ
नमस्कार,
लेख वाचला. थोडाफार समजला. नक्की लेख कुणाला उद्देशून आहे आणि प्रश्नांची उत्तरे कुणी देणे आपेक्षित आहे ते मला उमजले नाही. लेख शिक्षकांसाठी लिहिला आहे आणि इतरांनी फक्त वाचायचा आहे की त्यातील काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ते मला समजले नाही. तरी...
हा प्रश्न विचारात टाकणारा आहे. विचार करुन उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
ज्ञानकक्षा रुंदावणे, माहिती-ज्ञान स्विकारण्यासाठी माणसाला प्रवृत्त करणे आणि सक्षम करणे वगैरे हेतू प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचे असतात. पण जन्माला आलो आहोत त्यामुळे यापुढे नक्की काय करावे, जीवनाचा उद्देश काय असावा, त्यासाठी नक्की काय करावे या बाबत कोणतेच मार्गदर्शन अथवा विचार उद्युक्त करणारे शिक्षण मला मिळाले नाही असे मला वाटते आहे. ते मिळण्याची फार गरज आहे/होती.
(चर्चेला उगीच तात्विक वळण लावणारे किंवा विषयांतर करणारे हे मत नाही. प्रामाणिक मत आहे आणि शिक्षणक्षेत्रात काम करणार्यांकडून याबाबत काही विचार ऐकण्याची उत्सुकता आहे.)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
20 Jun 2009 - 10:48 pm | अजय भागवत
नक्की लेख कुणाला उद्देशून आहे आणि प्रश्नांची उत्तरे कुणी देणे आपेक्षित आहे ते मला उमजले नाही. लेख शिक्षकांसाठी लिहिला आहे आणि इतरांनी फक्त वाचायचा आहे की त्यातील काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ते मला समजले नाही. तरी...
लेख सर्वांना उद्देशून आहे. ह्यातील अनेक गोष्टी आपण स्वतः शालेतर जीवनात वापरु शकतो. उदा. कंपनीत काम करत असाल आणि तुमच्यावर इतरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल तर.
आभार!
20 Jun 2009 - 10:36 pm | मिहिर
चांगला लेख. मात्र पुढील वाक्य पटले नाही.
जर एखादे उद्दीष्ट्य " आठवणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते " वापर " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे .
असे का बरे असावे? असे असू शकत नाही का की मी एखाद्या गोष्टीबद्दल अधिक शिकलो तर अपेक्षित ते मला लवकर येईल.
मला तर माझ्या शालेय जीवनात असे शिक्षक आवडले जे मुलांनी शिकणे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक शिकवण्याचा प्रयत्न करायचे.
मी शाळेत आणि अजुनही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी पटकन नाही समजल्या तरी पुन्हा वाचल्यावर समजतात. एकदा डोक्यात बसल्यावर काही प्रॉब्लेम नाही. काही गोष्टी आपोपाप माझ्या लक्षात राहतात. उदा. सनावळ्या.
20 Jun 2009 - 10:40 pm | अजय भागवत
तुम्ही ती त्रुटी बरोबर पकडली आहे. ते विधान आणखी थोडे विस्तारावे असे मी लिहून घेतले आहे.
असे लिहिण्यात हेतू इतकाच आहे की, अनावश्यक गोष्टीवरचा भर कमी करुन वेळेची योग्य आखणी करण्यासाठी योग्य ते वर्गात केले जावे.
आभार!
21 Jun 2009 - 12:24 am | विकास
लेखाची कल्पना आवडली. कदाचीत अशाप्रकारचा लेख एकापेक्षा अधिक भागात विभागून क्रमशः लिहीला असता (लेखमालेसारखा) तर त्यावर अधिक "फोकस" चर्चा होऊ शकेल असे वाटते.
आपण ज्ञानाची जी व्याख्या करत आहात ती "ज्ञान" या शब्दाच्या आणि त्याच्या वापरासंदर्भात पटली नाही.
इंग्रजीतील नॉलेज हा ज्ञानाच्या जवळ जाणारा शब्द आहे तर इन्फॉर्मेशन हा माहीतीच्या जवळ जाणारा शब्द आहे. तसेच सेन्सेस ला जवळ जाणारा नक्की शब्द माहीत नाही पण विविध (पंचे)इंद्रियांनी होणारी जाणिव असा काहीसा त्याचा अर्थ आहे.
आपण दिलेली उदाहरणे ही माझ्यालेखी माहीतीत मोडतात. त्या माहीतीचा योग्य वेळेस योग्य वापर करण्याची (थोड्याफार प्रमाणात "इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग" करून) क्षमता आणि साधना असणे म्हणजे "ज्ञान" असे वाटते.
उ.दा.: शेअरबाजारातील उदाहरण घेऊया. जर गेल्या वर्षाच्या आणि क्वार्टरच्या माहीतीवर आधारीत एखाद्या कंपनीचे भांडवल माहीत आहे, वार्षिक उलाढाल माहीत आहे, प्राईस टू अर्निंग माहीत आहे, प्रति शेअरची किंमत माहीत आहे, इत्यादी इत्यादी, पण त्याच संबंध सध्याच्या जागतिक घडामोडींशी, बाजारात बदलत असलेल्या मागणीशी त्याचा संबंध लावता आला नाही (उ.दा. जनरल मोटर्सला हायब्रिड गाड्या करायची अक्कल आलीच नाही , पण ती मोठी कंपनी आहे...), तर त्या माहीतीचा काय उपयोग? थोडक्यात "व्यावहारीक ज्ञान" हे संदर्भातील माहीती आणि स्थलकालानुरूप वापरणे याला म्हणावे लागते. नाहीतर ती नुसती पुस्तकी विद्या ठरू शकेल.
अजून सुचल्यास पुढे परत लिहीन.
पु.ले.शु.
धन्यवाद.
21 Jun 2009 - 9:24 am | अजय भागवत
लेखाची कल्पना आवडली. कदाचीत अशाप्रकारचा लेख एकापेक्षा अधिक भागात विभागून क्रमशः लिहीला असता (लेखमालेसारखा) तर त्यावर अधिक "फोकस" चर्चा होऊ शकेल असे वाटते.
आपण ज्ञानाची जी व्याख्या करत आहात ती "ज्ञान" या शब्दाच्या आणि त्याच्या वापरासंदर्भात पटली नाही.
आपल्या सुचनेनुसार, एक नवा धागा तयार केला आहे: व त्यात ह्या लेखातील व्याख्या माझा प्रतिसाद म्हणुन दिली आहे. ज्ञान म्हणजे काय ह्याबाबतीत मतभेद असणे स्वाभाविक आहे. ते मतभेद होऊन माझ्या लेखातील मुळ आशयाला धक्का लागू नये म्हणूनच मी माझ्या लेखापुरती ज्ञानाची व्याख्या केली. ती त्या लेखात वापरुन त्यातील संदेश पोहोचविण्याचे काम त्या व्याख्येने केले की तिचे काम संपते. असे अनेक टेक्निकल पेपर मध्ये केले जाते हे आपणास माहिती आहेच.
तसे पाहता ज्ञान ह्या विषयावरच एक पुस्तक विद्यार्थ्यांना असायला हवे- कदाचित माध्यमिक शाळेतील.
इंग्रजीतील नॉलेज हा ज्ञानाच्या जवळ जाणारा शब्द आहे तर इन्फॉर्मेशन हा माहीतीच्या जवळ जाणारा शब्द आहे. तसेच सेन्सेस ला जवळ जाणारा नक्की शब्द माहीत नाही पण विविध (पंचे)इंद्रियांनी होणारी जाणिव असा काहीसा त्याचा अर्थ आहे.
त्यास ज्ञानेंद्रिये असे म्हणता येईल. ज्ञानेंद्रियांनी आपण विदा (डेटा) गोळा करतो. त्यावर क्रिया करतो (इंन्फॉर्मेशन), वगैरे.
"know" ledge ह्या शब्दाची व्युत्पती फ़ार रंजक आहे. Information ह्या ही शब्दाची व्याख्या पाहिली की, ती डेटा पासुन विस्डम पर्यंत काहीही केलेली आहे. knowledge ह्या शब्दाचे समानर्थी शब्द शोधल्यास आणखी गोंधळ वाढतो.
आपण दिलेली उदाहरणे ही माझ्यालेखी माहीतीत मोडतात. त्या माहीतीचा योग्य वेळेस योग्य वापर करण्याची (थोड्याफार प्रमाणात "इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग" करून) क्षमता आणि साधना असणे म्हणजे "ज्ञान" असे वाटते.
वर आणि खाली दिलेले संदर्भ व प्रतिसाद पहावेत. ज्ञानपातळ्या हायरार्कीकल आहेत जसजशी आपण (डेटा) माहितीचा वापर, करत राहतो तसतशी आपल्यात सफाई, येत राहते हे आपण पाहतोच, त्यातून नवनिर्मिती करतो, मग हळूच आपण त्याला IP म्हणायला लागतो.
उ.दा.: शेअरबाजारातील उदाहरण घेऊया.......
वरील उदाहरण ज्ञानपातळीच्या "चिकित्सा-नवनिर्माण" चे आहे.
ज्ञानाच्या व्याख्या अनेक आहेत, मला आंतर्जालावरुन ज्या देत्या आल्या त्या खालील प्रमाणे- [ ह्या लेखावरील चर्चा भरकटू नये अशी नम्र विनंती.]
Sanskrit
http://en.wiktionary.org/wiki/ज्ञान#Sanskrit
Noun
ज्ञान (jñāna) n: knowing, becoming acquainted with, knowledge, (esp.) the higher knowledge (derived from meditation on the one Universal Spirit)
"knowledge about anything cognizance" (cf. ज्ञानतस् (jñānatas) and अज्ञान (ajñāna))
jñānād a-jñānād vā — knowingly or ignorantly
conscience
= ज्ञानेन्द्रिय (jñāne*ndriya)
engaging in (+ genitive, e.g. सर्पिषस् (sarpiṣas), "in sacrifice with clarified butter")
name of a shakti
http://dictionary.reference.com/browse/knowledge:
1. acquaintance with facts, truths, or principles, as from study or investigation; general erudition: knowledge of many things.
2. familiarity or conversance, as with a particular subject or branch of learning: A knowledge of accounting was necessary for the job.
3. acquaintance or familiarity gained by sight, experience, or report: a knowledge of human nature.
4. the fact or state of knowing; the perception of fact or truth; clear and certain mental apprehension.
5. awareness, as of a fact or circumstance: He had knowledge of her good fortune.
6. something that is or may be known; information: He sought knowledge of her activities.
7. the body of truths or facts accumulated in the course of time.
8. the sum of what is known: Knowledge of the true situation is limited.
http://en.wikipedia.org/wiki/Knowledge:
Knowledge is defined by the Oxford English Dictionary as (i) expertise, and skills acquired by a person through experience or education; the theoretical or practical understanding of a subject, (ii) what is known in a particular field or in total; facts and information or (iii) awareness or familiarity gained by experience of a fact or situation. Philosophical debates in general start with Plato's formulation of knowledge as "justified true belief". There is however no single agreed definition of knowledge presently, nor any prospect of one, and there remain numerous competing theories.
Synonyms: information, lore, wisdom, erudition, instruction, learning, scholarship, science, data, fact, intelligence, ability
22 Jun 2009 - 8:57 am | अजय भागवत
वरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:
१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची "चाचणी" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.
२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती "आठवणे" पातळीपेक्षा "समजणे" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.
३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील "ज्ञानाची व्याख्या" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे?- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.
तसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.
४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी
वरच्या ज्ञानपातळीचा तक्ता निवडल्यास त्या खालील ज्ञानपातळीचासुद्धा वापरणे आवश्यक असते. म्हणजेच "समजणे" साठी "आठवणे" तक्ता हवाच.
आता एक उदाहरण घेऊन आपण ही पायरी पुर्ण झाल्याची खूण प्रत्यक्षात पाहू. मी वरील लेखाचेच उदाहरण घेऊन त्यातील ज्ञानांश घेतला आहे. त्याला काही अंदाज लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे-
१. ज्ञानांश: ज्ञानाची व्याख्या
२. ज्ञान संपादन पातळी: समजणे
३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर: माध्यमिक (तुम्ही हा कठीणस्तरतक्ता तुमच्या गरजेनुसार/अनुभवानुसार बनवा).
ह्यानुसार मी ज्ञानाची व्याख्याच शिक्षण उद्दीष्ट मानतोय. खालील स्तरावर मी व्याख्येतील प्रत्येक घटक एक वेगळे शिक्षण उद्दीष्ट मानले असते.
४. तक्ता: ज्ञान संपादन पातळी: आठवणे
ज्ञानपातळी: माहिती आठवता येणे
कोणते प्रश्न असावेत? कोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा (उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा)
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत? क्रियापदे: सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग
उद्दीष्ट्य क्र. 01: ज्ञानाची व्याख्या
प्रश्न:
१. ज्ञानाची व्याख्या सांगा
२. ज्ञानाचे स्वरुप किती घटकांनी ओळखता येते? ते घटक कोणते ह्याची यादी बनवा?
३. ज्ञानाची प्रचलित व्याख्या कोणी लिहिली?
४. पुढील वाक्य पूर्ण करा: "चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने ..
५. एखाद्या माहितीचे फायदे/तोटे, चांगल्या/वाईट बाजू सांगता येणे ह्या ज्ञानस्वरुपाला काय म्हणतात?
६. "जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो", ह्यातील आधीच्या ज्ञानस्वरुपाच्या पायऱ्या कोणत्या?
७. "एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते", खरे की खोटे?
८. आठवणे आणि समजणे ह्यातील फरक सांगा
९. नवनिर्माण म्हणजे काय?
वरील प्रत्येक प्रश्नाचे उद्दीष्ट ज्ञानाची व्याख्या आठवणे ह्या पातळीवर तपासली जाते. एव्हढ्या स्कॅफोल्डींगने पुढील प्रश्नतक्ता कसा तयार करता येईल हे समजेल. एकदाका वरील ज्ञानपातळीचे प्रश्न विचारुन झाले की, समजणे ज्ञानपातळीचे प्रश्न विकास करता येतील. त्याचे एकच उदाहरण देऊन मी हा प्रतिसाद संपवतो.
१. ज्ञानाच्या आणखी कोणत्या व्याख्या प्रचलित आहेत?- त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात लिहा.
२. ज्ञानाची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा.
३. ""शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत" ह्या परिच्छेदातील ज्ञानस्वरुपाच्या पातळ्या ओळखून दाखवा.
जाताजाता, वरील पद्ध्तीने प्रश्न तयार करणे हे सांगणे हा ह्या लेखाचा एकमेव हेतू नसुन मी शेवटी लिहिल्यानुसार, "पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक" हा संपुर्ण भागही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकालाच कल्पकतेने किंवा अननुभवी असण्यामुळे, प्रशिक्षीत नसल्यामुळे प्रश्नविकास करता येईलच असे नाही. ते एक कौशल्य आहे. ह्या लेखाचा वरील सर्व बाबींवर प्रकाश टाकणे हा हेतू होता. शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तिंना ही पद्धत आधीच माहिती असेल व ते असे कामही करत असतील अशी माझी खात्री आहे कारण मी हे मुलभूत किंवा नवे संशोधन आहे असे मानत नाही. अनेक ज्ञात गोष्टींपासुन एक पद्धत सुचविण्याचा फक्त हेतू आहे.