मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती.
मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है)
मुळात गुजराती मंडळात का गेलो? तर दक्षिण अमेरिकेत उतरल्या उतरल्या ज्या हॉटेलात मी थांबलो ते सुपर 8 हॉटेल गुजरत्याचे होते, त्याला कळले की मी एकटाच आहे मग तो त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मला बोलावू लागला. तिकडे सर्व सुपर 8 आणि सुपर सिक्स अशी जी काही मोटेल्स असतात ती झाडून गुजरात्याची असतात,
जसा आपल्याकडे पानवाला म्हटला की भैय्या!
दूधवाला म्हटलं की भैय्या!
टायर पंचर वाला म्हटला की केरळी!
चहावाला म्हटला की राजस्थानी भट!
तसा तिकडे मोटेलवाला म्हटला की पटेल!
इंडियन ग्रोसरी म्हटले की पटेल!
एक टॅक्सी ड्रायव्हरने तर विचारले की पटेल चा अर्थ दुकान होतो का?
मी म्हणालो, "नाही"
मग तो म्हणाला की, प्रत्येक दुकानावर पटेल का लिहितात?
मग सांगितले त्याला सर्व, की बहुतेक दुकानदार पटेल असतात.
एखादा नोकरीवाला गुजराती असेलही पण तोही नाईलाजास्तव नोकरी करत असणार आणि संध्याकाळी कुठेतरी दुकानात जाऊन धंदा शिकत असणार. (आपल्याकडे नाही का मोहम्मद शमी नाईलाज जास्त बॅटिंगला जातो तसे. पुर्वी मणिंदर जाते असे, जाताना जनरीत म्हणून बॅट घेउन जात असे)
आपले लोक काही पैशात कमी नाहीत पण ते सर्व डॉक्टर आणि इंजिनियर अशा एलिट वर्गात मोडतात, त्यामुळे पेट्रोल पंप, मोटेल, किराणामाल यात मराठी माणूस नाही.
( तसाही कुठल्याच धंद्यात नाहीम्हणा)
शिवाजी महाराज जसे म्हणाले, की असती आमची आई सुंदर तर झालो असतो आम्ही सुंदर.
तसे मी मनात म्हणालो "असती आमची आई गुजराती झालो असतो आम्ही व्यापारी"
एखादा पुणेकर तिकडे भुसार सामानाचे दुकान टाकून बसला आणि दुपारी झोपायला दुकान बंद करून लागला तर धंदा चौपट होईल, असो पुरे झाला मराठी लोकांचा उपमर्द,
तर गुजराती मंडळ म्हणजे आव जावं घर तुम्हारा, (याच्यात कितना भी खाव हे पण येते.)
शेवटी माझे फुकट ते पौष्टिक ब्रीदवाक्य मी जगाच्या पाठीवर कुठेही सोडत नाही.
बेकर्सफिल्ड मध्ये मी माझ्या पंजाबी सरदार मित्रासोबत अनेकदा गुरुद्वारात गेलोय. तो जाताना डाळ तांदूळ घेऊन जायचा. मी मात्र त्याच्या बाजूला त्याची बायको उभी तसा राहून मम म्हणेल तसे त्याच्या हाताला हात लावायचो. त्याने दिले काय मी दिले काय? एकच ना? तर गुरुद्वारात का जायचे? तर फुकट लंगर!
मला ताकाला जाऊन भांडे लपवायला आवडत नाही. जातो फुकट खायला तर जातो! खाण्याबरोबर अन्य फायदेही असतात, म्हणजे घरी काही बनवायला लागत नाही, भांडी घासावी लागत नाही, असो,
तर गुजराती मंडळ,
मुळात हे लोक त्यांच्या मंडळाला गुजराती मंडळ असे नाव कधीच देताना दिसले नाहीत. सगळीकडे इंडियन कम्युनिटी, सर्वांना सामावून घेणारे. आपल्याकडे नाही का शिवसेना नावाचा अखिल भारतीय पक्ष आहे. आहे महाराष्ट्र पुरताच, पण अखिल भारतीय! (नावात कशाला कद्रूपणा?) (यात दोन्ही गट आले, शिंदे आणि उबाठा)
तर इंडियन कम्युनिटी नावाची गुजराती मंडळे.
मी पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या ओळखीचे कोणीच नव्हते, मग त्यातल्या त्यात वयस्कर आणि गरीब दिसणाऱ्या दोघांच्या बाजूला जाऊन बसलो. तसे दिसायला सर्वच गरीब होते कपड्यावरून. बोलता बोलता एका म्हाताऱ्याने मला विचारले, तुमचा काय बिजनेस? मी म्हणालो, नोकरी करतो!
त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, तुच्छता, करुणा सर्व आलं, मी निर्लज्जासारखा गप्प!
मग म्हणतो "खाना खाया?"
मी हो म्हणालो!
"कैसा था?"
मी म्हणालो, "अच्छा था" आता फुकटचे सर्वच चांगलं लागतं!
त्यानंतर त्यांनी बोलता बोलता सांगितले की त्यांचे पाच पेट्रोल पंप आहेत. आणि दुसरा जो गरीब दिसणारा होता त्याची पाच हॉटेलस होती.
कशाला वर्गणी काढतील?
त्यानंतर कळले की सर्वच तिथे व्यावसायिक होते, अगदी पुस्तकांचा स्टॉल किंवा अगदी कन्वेनियन्स स्टोअर का असेना पण प्रत्येकाचा व्यवसाय होता, आणि तो व्यवसाय धो धो चालत होता, सर्वांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य समाधान होते, माझ्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने ऑफिसला जायचे दडपण होते, हे सर्वच मराठी मंडळात लोकांच्या चेहऱ्यावर असते,
गरब्याचा कार्यक्रम असल्याने अचानक मस्तपैकी साडी घातलेल्या बायका पोरी फेर धरून गरबा नाचू लागल्या, माझे इकडे गप्पा मारणे आणि खाणे चालू होते, अचानक काय झाले माहित नाही त्यांच्यात काहीतरी गेम चालू होते, त्या गेम चा एक भाग म्हणून एक मोठा बॉल माझ्या अंगावर येऊन आदळला, लगेच एक पोर सवदा मुलगी आली आणि माझा हात धरून मला खेचू लागली, थोडक्यात माझा गेम झाला होता,
मला खेचून ती त्या फेऱ्यात घेऊन गेली आणि मला नाचायला सांगू लागली,
मी माझ्या आयुष्यात नाचणे सोडा कधी ह्रिदम मध्ये चाललेला आठवत नाही,
तिने माझे दोन्ही हात धरून मला रिदम मध्ये हलवण्याचा प्रयत्न केला,
पण एखाद्या ठोकळ्याला किती नाचवणार? मी कठपुतली सारखे हात हलवले,
शेवटी तिला लगेच कळले की आपण गेंड्याला नाचवायचा प्रयत्न करतोय,
तिने प्रयत्न सोडून दिले मी गप्प परत येऊन खुर्चीवर बसून गेंड्याप्रमाणे रवंथ चालू केला, ज्या कामासाठी आलोय ते का सोडा? आणि ती भवानी खेचून घेऊन गेली तेव्हा ताटात अन्न होतं!
अन्नाचा अपमान का करायचा ?
तरी बाजूला एक वयस्कर म्हातारा म्हणाला काहीतरी,
सरस् करयु!
मनात म्हणालो - डोंबलाचे सरस !
आयुष्य जगावं तर गुजरात्यांनी असं तेव्हा वाटलं,
धंद्यात झोकून द्यावं, अपयशी झाल्यास पुन्हा उठावं, परत झोकून द्यावे, यश मिळवावं ,
आलेल्या पैशात जग फिरावे, फिरताना जगाची पर्वा न करता मोठ्याने ओरडावं, "दुनिया गई भाड मे"
जिसने धंदे मे की शरम, उसके फुटे करम,
बरं हे सर्व गुजराती कायदेशीर मार्गे आलेले असतात असेही नाही, येण केण प्रकारेण, ते हुल झपट करून अमेरिकेच्या धरतीवर अवतरतात, कित्येक लोक आपल्या गावचा जमीन जुमला विकून इकडे आलेले आहेत,
दुर्दम्य इच्छाशक्ती, अपयशाची भीती नाही, अपार कष्ट करण्याची तयारी, भाऊबंदांना साथ देण्याची वृत्ती यामुळे ही कम्युनिटी अमेरिकेतील एक पावरफुल कम्युनिटी बनली आहे, पण पाय जमिनीवर.
माझा हॉटेलवाला मित्र मल्टी मिलेनियर आहे, त्याच्या हाताखाली त्याने गोऱ्या पुरुषांना व बायकांना कामाला ठेवले आहे, त्याची एवढी मोटेल्स आहेत पण कधी शर्ट इन केलेला पाहिला नाही, मुंबईच्या रस्त्यावर चालताना कोणी म्हणेल की, आत्ताच गाड्या धुवून घरी चाललाय असं ध्यान!
पण एवढे ऐश्वर्य असून मला जेवायला बोलवण्याची एकही संधी तो सोडत नाही, काय पाहिलं माझ्यात ? माहित नाही.
कदाचित माझा गरीब स्वभाव पाहिला असेल.
कधीही फोन केला की लगेच बोलावून घेणार आणि घरी पोटभर जेवू घालणार.
अशी ही दिलदार माणसे मला इंडियन कम्युनिटी च्या कार्यक्रमात कशाला वर्गणी बद्दल विचारतील? असो
प्रतिक्रिया
10 Dec 2025 - 10:29 pm | अमरेंद्र बाहुबली
खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला आहे लेख, हसून हसून वाट लागली मध्ये. सध्या मिपावर मस्त धागे येत आहेत, घाटपांडे सरांच्या धाग्यानंतर हा धागा. मराठी मंडळ नी मराठी कम्युमिटीवर एवढं वाचलं आहे की बाहेरच्या देशात दुसऱ्या राज्यातील लोकांचे गट असतील हे विसरूनच गेलो होतो. बाकी ह्या गुजरात्यांचे कार्यक्रम फार करमणूक असतात. एकदा मी आणी माझा दक्षिण भारतीय मॅनेजर भर नवरात्रीत अहमदाबादला गेलो होतो. मॅनेजर ट्रेनिंग द्यायला आला होता, उत्तम ट्रॅनिंग मिळाली म्हणून त्याच्या गुजराती शिष्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाचे दोन पास दिले. आता तो एकटा दोन पास घेऊन काय करणार? उरलेला एक छातीला लावून तर फिरणार नाही, जेवता जेवता तो मला बोलला चल बाहुबली हे काय आहे ते पाहून येऊ. नंतर कळाल की त्याला गरबा हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हत, आम्ही गरबा केंद्राच्या दिशेने शिष्यांनी दिलेल्या एका बाईकवर निघालो, रस्त्यात खूपच सुंदर सजलेल्या मोकळे केस सोडलेल्या, घागरा चुनारिवाल्या सुंदर सुंदर मुली पाहून फार खुश झालो, त्यांच्या सोबतचे मुल अतिशय फालतू कुर्ते घालून होते. गरबा केंद्रात गेल्यावर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. मला महाराष्ट्रात १०० गरबा खेळणारे नि त्याना पाहायला १००० जमलेले अशी गर्दी पाहायची सवय होती पण इथे उलट कार्यक्रम होता गरबा खेळणारे हजार तर पहायला १० देखील नव्हते. आम्ही दोघेच गरबा पाहत उभे होते, शिष्यांच्या विनंतीवरून मॅनेजरही गरब्यात घुसला, पहिले दोन चार वेळा चुकला नंतर मस्त गरबा खेळू लागला, त्याची वाकडी तिकडी वाढलेली दाढी नी मळकट टी शर्ट नसता तर कुणाला कळालही नसतं की हा गुजराती नाही, त्याच्या मागे मी देखील गरब्यात घुसलो नि खेळू लागलो, थोड्या वेळाने मलाच आश्चर्य वाटले की मी इतका चांगला गरबा खेळतोय. महत्वाचं म्हणजे तिथे कुणी मला ऑब्सर्व करणार नव्हत समोरून मुलींची रांग टिपरीवर टिपरी हाणत मुलांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने जात होती, एक एक सुंदर मुलगी पास व्हायची. मज्जा आली होती. :)
10 Dec 2025 - 10:49 pm | खटपट्या
धन्यवाद,
मुंबैत बहुतेक जण गरबा खेळणार्या मुलींना बघायला जातात हे खरे आहे. आता तर खूप अनैतिक प्रकार देखील चालतात असे ऐकले आहे.
11 Dec 2025 - 1:49 am | रामचंद्र
मस्त, खुसखुशीत लेख!
11 Dec 2025 - 5:44 am | कंजूस
आवडला लेख.
धंद्यात साहसी वृत्ती ठेवणारे असतात गुजराती लोक. काही लोक त्यांना शत्रू मानतात पण ते कुणाला शत्रू मानत नाहीत.
मराठी लोकांचं बोलायचं तर काही जण धंदा काढतात वाढवतात पण त्यांची मुलं तो धंदा चालू ठेवत नाहीत. शिक्षण घेऊन नोकऱ्याच करतात. शनिवार रविवार सुट्टी, इतर सुट्ट्या. हीच मजा. तर धंध्यामध्ये लोकांचे सण उत्सव तेव्हा यांची कमाई हा हिशोब असतो.जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा मजा करतात. ही पद्धत बऱ्याच मराठी लोकांना पटत नाही. तर असो.
11 Dec 2025 - 11:46 am | मदनबाण
खटपट्या सेठ, सुरेख लेखन !
गरबा म्हणजे अनेक पक्षी जीव एकाच ठिकाणी पाहण्याची संधी! अर्थात गरबा खेळणाचा आनंद देखील तितकाच धमाल असतो.
व्यापार हाच त्यांचा डीएनए असल्याने सगळं केम छो मजा मा असंच अनेक वेळी दिसते.
[ खाखरा थेपला प्रेमी ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar
11 Dec 2025 - 1:58 pm | कानडाऊ योगेशु
गुजराती लोक एकमेकांना पकडुन असतात असे पाहिले आहे.
शिक्षणानिमित्त मुंबईत व नंतर कामानिमित्त बेंगलोरमध्ये असताना सुरवातीच्या दिवसात राहण्याची सोय पाहण्यासाठी कॉटबेसिस्,पी.जी वगैरे शोधत होतो तेव्हा गुजरात्यांच्या बर्याच धर्मशाळा दिसल्या.मुंबई मध्ये व बेंगलोरमध्येही.बेंगलोरमध्ये एक महाराष्ट्र मंडळ सोडले तर दुसरी काहीच व्यवस्था नव्हती.
11 Dec 2025 - 4:18 pm | कंजूस
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, ते माथेरान महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी राहण्याची स्वस्तातली सोय सुद्धा असते.
11 Dec 2025 - 7:34 pm | खटपट्या
परदेशात जैन लोकांचे खायचे वांदे होतात कारण ते होटेल मधले खाउ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ची साइट बनवली आहे. ज्या शहरात जायचे असेल त्या शहरातील जैन लोक येणार्या माणसाची जेवणाची आणि राहण्याची सोय करतात. त्यात दोघांचाही फायदा होतो आणि त्यांचा धर्म ही अबाधीत राहतो.
11 Dec 2025 - 2:48 pm | टर्मीनेटर
चोक्कस निरिक्षणे... लेख आवडला 👍
11 Dec 2025 - 4:50 pm | कांदा लिंबू
मनमोकळं खुसखुशीत लिखाण आवडलं.
11 Dec 2025 - 7:23 pm | गामा पैलवान
आमचे गुजरातेत अनेक मराठी भाषिक नातेवाईक आहेत. त्यांची मनोधारणा स्थानिक गुजरात्यांशी मिळतीजुळती आहे. अनेकांचा व्यवसाय आहे. अगदी नोकरदार माणूस असला तरी भागभांडवल बाजारात काहीतरी व्यवहार करणारच. किंवा छोटंसं दुकान वा टपरी चालवणार. वा भाड्याने तरी देणार. फावल्या वेळांत चकाट्या पिटतांना कधी दिसणार नाही. हा मातीचा गुण म्हणावा का?
-गा.पै.
12 Dec 2025 - 4:06 pm | विजुभाऊ
माझ्या ओळखीचे काही गुजराथी पुणे लोक्स , ठाणे सातारा कोल्हापुर येथे आहेत. पण त्या पैकी कोणीही कोणत्याही पुढार्याच्या मागे दादा बापू महाराज अप्पा असे म्हणत फिरत नाहीत, कोणीही गप्पा मारतानाही राजकारण या विषयावर बोलत नाही. कोणीच सेना उबाठासेना मनसे या बाबत चर्चा करत नाही. कोणीही संजय राउतांचे भाषण ऐकत नाही. कोणीही समोरचा माणूस गुजराथी / मराठी आहे हे माहीत असूनही हिंदीत बोलत नाही.
त्यामुळे हा मातीचा गुण नसावा असे वाटते
12 Dec 2025 - 5:11 pm | अमरेंद्र बाहुबली
+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे अनेक गुजराती आहेत, पण स्वत गुजराती असूनही ते कधीही मोदी मोदी, भाजप भाजप करत नाहीत, बाटचे जास्त मोठी बांग देतात त्याप्रमाणे अनेक मराठी लोक मोदी मोदी भाजप भाजप करत छाती पिटताना पाहिले आहेत.
12 Dec 2025 - 7:36 pm | कंजूस
संस्कार होत असतात परिस्थितीचे.
13 Dec 2025 - 8:56 pm | जुइ
जबरी निरीक्षण! लेख आवडला!
14 Dec 2025 - 3:57 pm | चावटमेला
चांगला लेख. युके मध्ये मला गुजराती लोकांचे दोन ठळक गट आढळून आले. पहिला म्हणजे भारतातून आलेले गुजराती, आणि दुसरा म्हणजे इदी अमिन सत्तेत आल्यानंतर निर्वासित म्हणून आलेले अफ्रिकन गुजराती. ह्या दोन गटांच्या चालीरीती, विचारसरणी ह्यांत मोठा फरक दिसतो. आफ्रिकन गुजराती जास्त इंग्रजाळलेले, बर्याच अंशी सर्रास मांसाहार करणारे, दारू पिणारे दिसून येतात, शिवाय भारतीय म्हणवून घेणे त्यांना आवडत नाही, ईस्ट आफ्रिकन अशी ओळख सांगतात. ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत. भारतीय गुजराथ्यांच्या पिढ्या जास्त करून व्यवसायांत आहेत, तर आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणांत नोकर्यांमध्ये आहेत. ह्या आफ्रिकन गुजराथ्यांची वस्ती बव्हंशी लंडन मधील हॅरो उपनगर, किंवा लेस्टर शहरात आहे. भारतीय गुजराती संपूर्ण युकेभर पसरलेले आहेत.
14 Dec 2025 - 4:43 pm | रामचंद्र
वेगळी आणि चांगली माहिती! तुमच्या निरीक्षणाला दाद द्यायलाच हवी.
15 Dec 2025 - 1:47 pm | टर्मीनेटर
अगदी असेच म्हणतो...👍
15 Dec 2025 - 5:54 pm | कानडाऊ योगेशु
गुजराथ्यांमध्ये जात पात प्रकार कितपत पाळला जातो ह्याबाबत काही माहिती आहे का?
पटेल,शहा (बहुदा गांधी) ह्या व्यतिरिक्त अन्य आडनावाची गुजराथी व्यक्तीच सर्रास गुजराथबाहेर दिसत नाहीत.
15 Dec 2025 - 10:24 pm | असा मी असामी
गुजरातमध्ये आजही जात‑पात अस्तित्वात आहे. शहरांमध्ये तिचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो, पण ग्रामीण भागात तो अधिक ठळकपणे दिसतो. राजपूत समाजात ते काही प्रमाणात जास्त आढळतं. जैन आणि वैष्णव समुदायातही जातीतलेच विवाह पसंत केले जातात. तरीही, बदल होत आहेत—आधुनिक शिक्षण, नोकरी, परदेशात जाणं, शहरी जीवन अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोकळेपणा येत आहे.
मेहता, गांधी, शाह ही आडनावे जैन आणि वैष्णव—दोन्ही समाजांमध्ये आढळतात. जैन, मेहता, गांधी, शाह आणि जोशी ही आडनावे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळेच त्या लोकांची संख्या बाहेर जास्त असल्यासारखी वाटते. पण इतर गुजराती—उदा. बटलिवाला, ***वाला, कोठारी, कोळी—हे विविध ठिकाणी आणि विविध व्यवसायांत दिसतात.
--- फक्त नावाने गुजराती असलेला एक मराठी ;)
15 Dec 2025 - 10:48 pm | चावटमेला
लोहाणा समाजाचे लोकही परदेशांत बर्यापैकी दिसतात, उदा. रूपाणि, कनानी, ठक्कर इ.
16 Dec 2025 - 12:11 am | रामचंद्र
हे सर्व बहुतेक कच्छी असावेत. कच्छी लोकही अतिशय उद्यमशील असतात.
16 Dec 2025 - 12:11 am | सौन्दर्य
येथे अमेरिकेत या, पैशाला पासरी 'पटेल' दिसतील. पटेल अशीच माहिती दिली आहे.
16 Dec 2025 - 12:56 am | कानडाऊ योगेशु
तेच म्हणायचे होते मला. गुजराथ्यांमधल्या एका समुदायाचेच लोक इतरत्र (म्हणजे गुजरात बाहेर) जास्त आढळतात.
15 Dec 2025 - 7:16 pm | गामा पैलवान
चावटमेला,
मी अनेक वर्षं इंग्लंडात असूनही ही निरीक्षणे मला जाणवली नाहीत. तुमच्या मर्मभेदी दृष्टीस मन:पूर्वक दाद देतो.
आ.न.,
-गा.पै.
15 Dec 2025 - 10:46 pm | चावटमेला
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे काही नाही हो, बर्याच ईस्ट आफ्रिकन गुजराथ्यांशी नोकरीच्या ठिकाणी संपर्क येतो, त्यांच्याशी होणार्या संवादांतून समजलेली माहिती.
15 Dec 2025 - 1:20 pm | जव्हेरगंज
मस्त, खुसखुशीत लेख!
17 Dec 2025 - 1:43 am | खटपट्या
सर्व प्रतिसादकांचे आभार्स
17 Dec 2025 - 11:02 am | अभ्या..
मला अमेरिकेतील नाही पण जर्मनीतील दोन गुजरात्यांचा आलेला अनुभव नमूद करतो.
पहिला गुजराती टिपिकल पटेल जो आम्ही जे घर भाड्याने घेतले त्याचा आधिचा भाडेकरु. मालक अर्थात जर्मन. पटेलाला ते घर सोडताना त्याचे सगळे फर्निचर नव्या भाडेकरुच्या गळ्यात घालायचे होते कारण त्याअने नवीन घेतेलेले घर फुल्ली फर्निश्ड होते. आणि त्याची मार्केट व्हॅल्यु अगदी नव्या प्रमाणे पटेलिणीला अपेक्षित होती. त्यामागचा तिचा युक्तीवाद की तुम्हाला नवीन फर्निचर ऑर्डर केले तरी असेंबल वगैरे करावे लागेल म्हणून ते नव्याच्या किमतीत घ्या. त्यासाठी तिने इतका प्रचंड आणि चिकाटीने युक्तीवाद केला की बस्स. आणि तिचे म्हणणे मान्य करण्यातच शहाणपण आहे हे ती वारंवार पटवून देत होती. त्यासाठी दोन कारणे की एकतर ते १० वर्षे सिनिअर आहेत जर्मनीत आणि दुसरे म्हणजे लहानश्या ह्या गावात आमची कम्युनिटी इंडीयाप्रमाणेच स्ट्रॉन्ग आहे, कुठेतरी वास्ता पडेलच.
सगळे धुडकावले पण तरीही जाता जाता बर्याच निरुपयोगी वस्तू, काचा आमच्या गळ्यात मारुन पळाय्चा प्लान होता (कारण वस्तूंचे दिस्पोजल अवघड) पण तिला घेऊन जायला भाग पाडले. त्यासाठी तिने फोनवरुन जी हॅरेस्मेंट आणि ताबा देताना जी अडवाअडवी केली त्याला तोड नाही.
दुसरा एक गुजराती फर्निचर असेंबल करणारा अनाधिकृत पणे कारण तो स्टुडंट होता आणी त्याला त्याची प्रॅक्टीस होती म्हणे. एकतर प्रचंड आकडा कोट करुन तो प्रिंटेड बिल देणार नव्हता. आणि हे काम गुपचूप करावे असा अग्रह होता कारण आपल्या माथाडी कामगाराप्रमाणे जर्मन अधिकृत असेंब्लर त्याचे पैसे पुन्हा वसूल करु श्कतात शिवाय त्याने तो गुजराती अडचणीत आला असता. त्याच्या एकतृतिआंश पैश्यात हंगेरीच्या एका असेंब्लरने २ तासात काम करुन दिले तेही अधिकृत बिलासह. हंगेरीचीही आर्थिक स्थिती फारच नाजूक आणि बेरोजगारी आहे असे त्याच्याशी बोलण्यातून कळले पण ह्या कामासाठी गुजरात्याने जी तंत्रे आणि बोलबच्च्न लावले ती अस्सल गुजरात्याला शोभणारीच होती.
17 Dec 2025 - 3:15 pm | हणमंतअण्णा शंकर...
अभ्याजी, आपणास व्य नि केला आहे.
17 Dec 2025 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुसखुशीत लेखन. आवडले.
-दिलीप बिरुटे