लैंगिक वर्तन

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
8 Dec 2025 - 8:22 am

लैंगिक वर्तन
========

पूर्वी अधून-मधून वृत्तपत्रातून झळकणार्‍या काही बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत - त्यात "तरूण जोडप्याचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन" ही बातमी वारंवार झळकते.

वेगवेगळ्या कारणांनी होणार्‍या भावनिक कोंडीमुळे अनावर झालेल्या लैंगिक उर्जेच्या निचर्‍याला "अश्लील" संबोधल्याने समाज निरंतर चुकीच्या कल्पना गोंजारत राहतो.

मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते. दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-

१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज"

"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे अपवाद (आऊटलायर्स) यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच...

"सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो. शिवाय संप्रेरकांच्या प्रभावा खाली विवेक नष्ट होऊ शकतो. हे गैरसोईचे सत्य स्वीकारले जात नाही. वैज्ञानिक सत्ये फक्त चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जातात.

आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो. सर्वांनी असे नियंत्रण मिळवलेच पाहिजे असा आग्रह पण धरला जातो. पण हा भोज्जा पकडणार्‍यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना विज्ञाना ऐवजी धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते. एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो.

इथे मला एक प्रश्न पडतो - अघोरी उपायांनी जीवसृष्टीच्या चक्रातून स्वत:ला बाद करणारे श्रद्धाळु (पक्षी - विकारांवर विजय मिळवणारे) श्रेष्ठ की न्युड बीचेसवर कोणत्याही अघोरी उपायांचा अवलंब न करता उद्दीपित न होणारे आनंदाचे उपासक श्रेष्ठ? प्रश्न अनेकांना बोचरा वाटेल याची मला खात्री आहे...

२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र

हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्‍यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते.

आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्‍या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्‍या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्‍या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.

सध्याचा भारतीय समाज एकंदर या विषयात प्रचंड गंडलेला आहे आणि ते अतिशय चिंताजनक आहे, असे मला वाटते.

राजीव उपाध्ये

मांडणीविचार

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2025 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला विषय... वाचतोय.

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

8 Dec 2025 - 9:04 am | युयुत्सु

तुमची दाद सहस्र लाईक्सचे बळ देणारी आहे! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2025 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना..

देव, धर्म आणि लैंगिक गोष्टीचीही जाहीर चर्चा चिकित्सा केली की ते सगळं पापात येत असल्यामुळे च्यायला, निखळ आंनदायी गोष्टींचीही कुचंबना झाली.

एका दृष्टीने सार्वजनिक हिताचे विषय असल्यामुळे आपला अशा 'विषयांना' पाठिंबा आहे. :)

-दिलीप बिरुटे

अतिशय अचूक, मार्मिक, योग्य आणि खणखणीत.

काय बोलावे ? दांभिकता सर्वत्र ठासून भरलेली आहे.

युयुत्सु's picture

8 Dec 2025 - 9:57 am | युयुत्सु

श्री० गवि

मनःपूर्वक धन्यवाद!

आणि तुमच्या पुस्तकांसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्राणी रस्त्यावर संभोग करतात म्हणुन माणसानेही करावा काय?

संप्रेरके सारखीच असली तरी कोणाची विवेकबुद्धी जास्त विकसित झाली आहे? माकडाची की माणसाची? त्याचा वापर करु नये काय?

माणसे पृथ्वीतलावर उघड्यावर समागम करत होती आणि अनेक ठिकाणी अजुनही करतात. कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नसल्याने पुरावे देता येणार नाहीत. इतकंच काय तर अजुनही दक्षिण अमेरिकेत एका समाजात लग्ना अगोदर गाढवाशी संभोग करायची प्रथा आहे.

संप्रेरकांच्या प्रभावा खाली विवेक नष्ट होऊ शकतो. या वाक्याचा अर्थ आपल्याला कळला नाही की आपण जाणूनबुजुन दुर्लक्ष केलेत? आपण थोडी मानववंश शास्त्राशी जवळीक वाढवावी. म्हणजे आपली संस्कृती श्रेष्ठ हा दुरभिमान आणि झापडे गळून पडतील.