डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या. अजूनही रुग्णालयानुसार काही प्रमाणात हस्तलिखित नोंदी असतात. रुग्ण बरा झाल्यावर घरी पाठवून दिल्यानंतर असे सर्व केस पेपर्स नोंद विभागात ठेवावे लागतात. त्यामुळे अशा खोल्या कागदांच्या ढीगभर थप्प्यांनी ओसंडून वाहत असतात.
एकदा अशाच एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने एक वेगळाच ‘संकलन प्रकल्प’ हाती घेतला. त्यांनी नोंद विभागावर चक्क धाड घालून अनेक वर्षांपूर्वीच्या काही ठराविक फायली बाजूला काढल्या. त्या निवडक जुन्या नोंदीमधून त्यांना काही गमतीशीर वाक्ये सापडली. काही वाक्यांमध्ये ठराविक शब्द भलत्याच प्रकारचे होते तर काही ठिकाणी वाक्यरचना गंडलेली होती. परिणामी अर्थाचा अनर्थ झाला होता. नोंदीमधील काही चुकांची खाडाखोड केलेली देखील आढळली. तर अन्य काही चुकांच्या भोवती वरिष्ठ डॉक्टरांनी लाल शाईने गोल काढलेले होते. सहसा अशा चुका अनवधानातून होतात. पण काही वेळेस अशा चुकांतून त्या व्यक्तीचे भाषिक अज्ञान उघड होते.
संबंधित चुका ज्यांच्या हातून झाल्या त्या डॉक्टरांची कदाचित वरिष्ठ डॉक्टरांनी कानउघडणी केली असेल किंवा अन्य काही प्रसंगी त्या वाक्यातून निर्माण झालेल्या विनोदाचा आनंद संबंधित डॉक्टरांनी एकत्रित लुटला असावा. तिकडे जे काय झालं असेल ते असो. अशा गमतीजमतींचे जे संकलन त्या संकलक चमूने प्रसिद्ध केलेय त्यात आज आपण थोडीशी डुबकी मारणार आहोत. त्यातून शाब्दिक विनोदाचा आस्वाद घेता येईल. अशा काही निवडक गमतीजमतींचे स्पष्टीकरणासह केलेले हे छोटे संकलन वाचकांना रोचक वाटावे.
. . .
पहिली केस आहे ताप आलेल्या प्रौढ महिलेची. डॉक्टरांनी तापासंबंधी सर्व विचारपूस केली. तापाबरोबर येणाऱ्या अन्य लक्षणांची पण दखल घेतली. पण नोंद करताना ते लिहून गेलेत :
She has no rigors or shaking chills, but her husband states she was
very hot in bed last night.
बाईच्या नवरोबांनी सांगितलं असेल की रात्रभर ती खूप तापली होती; ठीक आहे. पण डॉक्टरांनी नोंद करताना मात्र hot ऐवजी febrile हा शब्द लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी करून टाकले शब्दशः भाषांतर !
. .
हा बघा गुप्तरोगाच्या डॉक्टरांचा प्रताप. रुग्णाने वेश्यागमनाची कबुली दिलेली आणि काय त्रास होतो ते सांगितलेय. आता डॉक्टर त्याच्या जननेंद्रियाची तपासणी करतात. तिथे प्रथमदर्शनी त्यांना काहीतरी महत्त्वाचे दिसले आणि मग ते लिहून गेलेत :
Examination of genitalia reveals that he is circus sized.
रुग्णाने सुंता केल्याची (circumcised) नोंद करताना त्यांनी शब्दस्पेलिंग तर चुकवलेच आणि शब्दही उगाचच तोडला !
. .
कर्करोगाच्या कक्षातली ही घटना. एका रुग्णाबाबत त्या रोगाचा संशय होता आणि आता खात्रीशीर निदान करण्यासाठी त्याच्यावर biopsy ची तपासणी करायची होती. या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात.
या प्रकरणातला रुग्ण जरा हट्टी होता. डॉक्टरांनी त्याला सगळे समजून सांगितल्यावरही त्याने ती तपासणी करण्यास ठाम नकार दिला. ही महत्त्वाची बाब डॉक्टरांना लिहून ठेवणे आवश्यक होते. पण लिहिता लिहिता biopsyच्या जागी ते लिहून बसले एक साधर्म्य दाखवणारा भलताच शब्द :
The patient refused autopsy.
Autopsyचा अर्थ मरणोत्तर शवविच्छेदन. (कायदेशीर प्रकरणांमध्ये असे विच्छेदन सक्तीचे असते आणि त्याला पोस्टमार्टम म्हटले जाते). मात्र नैसर्गिक मृत्यू झालेल्या अन्य सामान्य प्रकरणांमध्ये एखाद्याच्या मृत्यूचे नक्की कारण जाणून घेण्यासाठी करायचे शवविच्छेदन मृताच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच केले जाते.
इथे मात्र जिवंत व्यक्तीच्या बाबतीत autopsy अशी नोंद झाली आणि अनर्थ झाला !
. .
चला, आता एक चक्कर अस्थिरोग विभागात. . .
गुडघेदुखीचा रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता आलेले डॉक्टर त्याची विचारपूस करतात. त्याने आपल्या गुडघ्याबद्दलची प्रगती डॉक्टरांना सांगितली अन त्याची नोंद करताना डॉक्टर लिहून गेले :
On the second day the knee was better, and on the third day it
disappeared.
. .
सर्जन मंडळींना शरीरातील विविध ग्रंथींची (glands) तपासणी करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड, स्तन आणि प्रोस्टेट यांचा समावेश असतो. एखाद्या खूप गर्दीच्या दिवशी या तिन्ही प्रकारचे अनेक रुग्ण जर हाताळले असतील तर डोक्यात आजारांची अगदी सरमिसळ होऊ शकते.
प्रोस्टेटच्या तपासणीसाठी संबंधित पुरुषाला कुशीवर झोपवून त्याच्या गुदद्वारात डॉक्टरांनी बोट घालून त्या ग्रंथीचा अंदाज घ्यायचा असतो. एक मूलभूत तपासणी म्हणून तिचे महत्त्व आहे. एकदा प्रोस्टेटसाठी म्हणून अशी तपासणी केल्यानंतर एक सर्जन बघा काय लिहून गेलेत :
Rectal examination revealed a normal sized thyroid !!
कुठे प्रॉस्टेट, कुठे ती दूरवरची थायरॉईड, पण गफलत झाली आहे खरी. हे वाचल्यानंतर एकाने आणि त्यावर विनोद केला,
“अरे बापरे ! या डॉक्टरांचे बोट एवढे लांब आहे काय” !!
. . .
रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेचा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. तिथे असंख्य प्रकारचे वेदनाग्रस्त रुग्ण येतात. त्यांच्या शारीरिक तपासणीबरोबर काही मूलभूत चाचण्यांची सोय तिथे केलेली असते. अशाच एका महिला रुग्णाला x-ray वगैरे तपासण्या करून काही विशेष न निघाल्याने घरी पाठवून देण्यात आले होते. त्याची डॉक्टरांनी केलेली ही नोंद :
While in the Emergency room, she was examined, x-rated and sent home.
..
बद्धकोष्ठाची समस्या तर अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते. या विकारावर निरनिराळे उपचार करून रुग्ण देखील कंटाळलेले असतात. अशाच एक बाई डॉक्टरांकडे नियमित यायच्या. त्यातून परिचय वाढल्याने डॉक्टरनी त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पा देखील मारल्या होत्या. एकदा त्या उपचारासाठी येऊन गेल्यानंतर डॉक्टर अवचितपणे लिहून गेले :
She stated that she had been constipated for most of her life,until
she got a divorce.
. .
मनोरुग्णांच्या नोंदींमध्ये तर अनेक उलटीपालटी वाक्ये बऱ्याचदा आढळतात. अनेक रुग्णांवर दीर्घकालीन उपचार चालू असतात. एका डॉक्टरांनी नैराश्याच्या रुग्णाबाबत केलेली ही टिपणी :
The patient has been depressed since she began seeing me in 1993.
वाक्यरचना गंडलेली .
….
रुग्णालयातील बहुतेक रुग्णांच्या भरपूर प्रयोगशाळा तपासण्या होतातच. लॅबमधून वॉर्डात रिपोर्ट आले की ज्या त्या रुग्णानुसार त्या रिपोर्टचा गोषवारा मुख्य केसपेपरमध्ये लिहिणे हा एक वेळखाऊ उद्योग असतो. एका रुग्णाच्या यकृताच्या आरोग्यासंबंधीचा टेस्ट रिपोर्ट लिहिताना हे डॉक्टर काय लिहून गेलेत बघा :
The lab test indicated abnormal lover function.
एका महत्त्वाच्या शब्दाच्या एकाच अक्षराने चुकलेल्या स्पेलिंगमुळे छानपैकी विनोद होऊन गेला खरा !
..
आणि आता शेवटी शारीरिक तंदुरुस्ती विभागात एक फेरफटका. अनेक संस्थांमधून विशिष्ट कामासाठी नेमणूक करताना शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला अधिकृत रुग्णालयाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच निरोगी लोकांचा भरणा जास्त असतो. त्यांच्या काही तपासण्या करून काही सुप्त दोष निघतोय का ते पाहणे हे डॉक्टरांचे काम. सर्व तपासण्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा एकंदरीत आढावा घेणारा गोषवारा शेवटी लिहितात. एका मध्यमवयीन व्यक्तीच्या बाबतीत अशी नोंद केली गेली :
Patient has two teenage children, but no other abnormalities.
..
असं आहे हे गमतीदार संकलन. डॉक्टरांच्या सहकारी असलेल्या नर्सेस आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या टिपणांमध्येही अशी 'वेचक रत्ने' सापडतात - त्यांची जातकुळी थोडीफार वेगळी. कळत नकळत अशा चुका हातून होणे हा मानवी गुणधर्म आहे. इंग्लिशमधील नोंदींच्या बाबतीत वरवर पाहता असं वाटू शकेल की ती मातृभाषा नसलेल्या लोकांकडून अशा चुका होतात. परंतु असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या चुकांची व्याप्ती पाश्चात्य जगतासह अगदी जागतिक आहे ! जालावर त्याचे असंख्य नमुने वाचायला मिळतात.
संपूर्ण संगणकीकरण झालेल्या रुग्णालयांमध्ये देखील अशा नोंदींची अचूकता दाद द्यावी इतकी नाही. हस्तलेखन असो अथवा संगणक टंकन, या दोन्ही कृती करणारा शेवटी माणूसच असतो. स्पीच टायपिंगच्या वाढत्या वापरानंतर तर काही नव्या प्रकारच्या चुका आढळू लागल्यात (बोलायला गेलो एक. . .). जोपर्यंत अशा चुकांनी कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम झालेला नसेल तोपर्यंत काळजीचे कारण नाही. अनवधानातून अकस्मात झालेले मनोरंजन अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहता येईल.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते. सातत्याने होणाऱ्या काही भाषिक गफलती आणि विनोदांमधून कधीकधी बोलीभाषेला नवे वाक्प्रचारही मिळून जातात. अनेक अभ्यासक्रमांच्या लेखी व तोंडी परीक्षांदरम्यान कधीकधी भले भले विद्यार्थी सुद्धा एखादी गफलत किंवा घोडचूक करून बसतात आणि त्यानंतर दुसऱ्याच क्षणी सावरून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. तणावपूर्ण वातावरणाचा तो परिणाम असतो.
वैद्यकीय वगळता अन्य कार्यक्षेत्रांमध्ये देखील या प्रकारच्या मौजमजा होत असणार. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले अनुभव प्रतिसादातून लिहिल्यास लेखातून झालेले मनोरंजन द्विगुणीत होईल.
**********************************************************************
प्रतिक्रिया
18 Aug 2025 - 10:49 am | Bhakti
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार :) आणि घाई वा कामाच्या ताणामुळे अशी गंमत होतं राहते.
होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते.
एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;)
आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.
18 Aug 2025 - 11:31 am | कुमार१
>> ओ हो !
एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.
18 Aug 2025 - 10:55 am | गवि
गमतीदार.. हसू आले.
या सर्व चुका विनोदी या पातळीवर आहेत. गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल अशा चुकांचे काय होते कोण जाणे.
18 Aug 2025 - 11:33 am | कुमार१
>>
महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते.
एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.
18 Aug 2025 - 12:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
मजा आली वाचताना!!
लहानपनी अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद की असे कायतरी सदर असायचे त्याची आठवण झाली.
आठवणारे असेच काही --एका बाईचा जावई बी.एड. पास झाल्यावर तिला आलेली तार--सन इन लॉ सक्सीडेड इन बेड
18 Aug 2025 - 4:14 pm | गवि
हो हो..
तू उगीच चहात पाय गाळतोस.
बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना..
माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले.
इत्यादि.
18 Aug 2025 - 2:54 pm | चौथा कोनाडा
मस्त खुसखुषीत लेख ! हे किस्से वाचून धमाल मजा आली !
शी जिनपिंगचा (xi jinping) चा उच्चार एकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला नोलंबित केले गेले हा किस्सा आठवला !
18 Aug 2025 - 5:18 pm | स्वधर्म
धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती शेअर केल्याबद्दल.
पूर्वी जेंव्हा खूप खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती, तेंव्हा... आमचे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत जुने (स्थापना १९४७) व सरकारचे कॉलेज. अर्थात सर्व मुले मेरीटची आणि घासू. पण सगळे वातावरण व प्राध्यापकही मराठी. एक दिवस आमचे एक शिक्षक वर्गावर तास घेत असताना आमच्या वर्गातील एक मुलगा वर्गाबाहेर घुटमळत होता. सगळ्यांचे लक्ष त्यामुळे विचलित होत होते. हे लक्षात आल्यावर सरांनी त्याला हटकले. त्यांनी विचारले: 'What is work?' बहुधा त्यांना 'काय काम आहे?' असे विचारायचे होते. त्या बावचळलेल्या मुलाने ताबडतोब उत्तर दिले: 'Sir, Force into Displacement!'
अख्खा वर्ग हसून फुटल्याचे आठवते. मराठीतून इंग्रजी बोलण्याने अशा खूप गमती होत असतात.
18 Aug 2025 - 6:20 pm | कुमार१
छान लिहिताय सर्वजण.
शाळा कॉलेजच्या वर्गात शिकवताना घडलेल्या अशा गमतीजमती तर चिक्कार असतात. वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात घडलेला हा किस्सा. त्या काळी शिकवताना ओव्हर हेड प्रोजेक्टर वर प्लास्टिक स्लाईड्स ठेवून शिकवले जाई. आमचे एक प्राध्यापक फार रटाळ होते व त्यांच्या तासाला कायमच दंगा ठरलेला असायचा.
एकदा ते स्लाईड्स दाखवत असताना काही मुलांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यावर ते चिडून म्हणाले,
“ गाढवानो, दिसत नाही का, I am sliding on the wall आणि तुम्ही खुशाल दंगा करताय !”
18 Aug 2025 - 6:26 pm | गवि
एक ऐकीव प्रसंग. स्रोत लक्षात नाही.
गावी कॉलेजात एक अध्यापक लेक्चर घेत असताना पोरे गोंगाट करत असतात. मग ते अध्यापक फळ्यावर लिहू लागतात. तेवढ्यात पोरे एकदम शांत होतात. अगदी गप्प.
सर वळून विचारतात, why are you silent now?
एक मुलगा खिडकीतून बाहेर पॅसेजकडे बघत म्हणतो, because the principal sir just passed away.
18 Aug 2025 - 6:42 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्त लेख आणि प्रतिसाद.
मुंबईतील एका कॉलेजातील एका प्रोफेसरविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. नंतरच्या काळात त्याच गोष्टी इतर कोणत्या कोणत्या प्रोफेसरविषयीही तेच ऐकले. किती खरे किती खोटे माहित नाही आणि खरोखर ते प्रोफेसर असे काहीतरी बोलले होते की नाही हे पण माहित नाही. अगदी काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपविल्या असल्या तरी आहेत मनोरंजक.
तर या प्रोफेसरांची त्यांच्या अचाट इंग्लिशमुळे विद्यार्थी टर उडवत असत. त्यांनी पुढील काही गोष्टी बोलल्या होत्या असे ऐकले होते. खखोदेजा.
१. morning morning don't rotate my head - म्हणजे सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका.
२. एकदा एक विद्यार्थी कॉलेजच्या व्हरांड्यात वर्गांच्या पुढे येरझार्या घालत होता. त्याला उद्देशून- Why are you vibrating here?
३. दुसर्या एका प्रोफेसरांना मुख्याध्यापकांना भेटायचे होते. ते कॉलेजात अमुक एका ठिकाणी आहेत असे त्या प्रोफेसरांना कळले होते. त्यामुळे ते तिथे मुख्याध्यापकांना भेटायला म्हणून गेले पण ते तिथे नव्हते. तेवढ्यात हे प्रोफेसर त्यांना दिसले. त्या दुसर्या प्रोफेसरांनी यांना मुख्याध्यापकांना बघितलेत का असे विचारले. त्यावर यांचे उत्तर- Yes I saw him. He just passed away.
या तीन गोष्टी ऐकलेल्या कदाचित काल्पनिक असतील. मात्र मी स्वतः एक गोष्ट बघितली आहे कारण आमचेच एक प्रोफेसर ते वर्गात म्हणाले होते. Our college has a very good library. You should visit it to get rid of books.
हिरव्या देशात सगळे विद्यार्थी असाईनमेंट वगैरेंसाठी पेनाऐवजी पेन्सिलचा वापर करतात. एक भारतीय विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच आला होता. वर्गात प्रोफेसरनी एक गणित सोडवायला दिले होते. तो विद्यार्थी माझ्या मित्राशेजारी बसला होता. गणित सोडविताना त्याच्याकडचे रबर खाली पडले आणि बाजूला एक गोरी मुलगी होती तिच्या पायापाशी जाऊन पडले. तेव्हा त्या रबराकडे बोट दाखवत तो सरळ म्हणाला- "could you please pass on my rubber?". तिच्या चेहर्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. खरं इतर दोघांमध्ये संवाद चालू असताना आपण विनाकारण मधे बोलायला जाऊ नये हा सामाजिक संकेत आहे. पण त्या गोरीने चप्पल काढली असती तर या बिचार्याला आपण का मार खात आहोत ते पण कळले नसते म्हणून माझ्या मित्राने तिला सांगितले- he means eraser :) अमेरिकेत रबरचा अर्थ वेगळा होतो हे त्याला माहित नव्हते :) :)
18 Aug 2025 - 7:29 pm | स्वधर्म
सांगलीत लिमये सरांचे ८ वी ते १० वीचे नवगणिताचे वर्ग प्रसिध्द होते. ते खूप रंजक पध्दतीने गणित शिकवायचे आणि मला गणित आवडू लागण्याबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्याच वेळी गणित चुकलेल्या मुलांचा अत्यंत सृजनशील पध्दतीने अपमान करण्याबद्दल ते प्रसिध्द होते. कित्येकांच्या वडीलांना त्यांनीच गणित शिकवले होते व आमचे मित्र ते कोणत्या प्रकरणात कोणते विनोद करतील हे आधीच सांगत असत, इतके त्यांचे विनोद सांगलीत प्रसिध्द होते. त्यांनी भूमितीच्या तासाला प्रचंड खाडाखोड करणार्या मित्रास खोडरबर ऐवजी उद्यापासून ट्रॅक्टरचे टायर घेऊन येत जा, असे सुनावले होते.
गणित सोडवायला वेळ मोजून द्यायचे व वेळ संपली की ज्यांचं झालंय त्यांनी जागेवर उभे रहावे असे सांगत. अर्थात सगळ्यांचेच उत्तर बरोबर येत नसे. ज्यांचे उत्तर चुकीचे आले त्यांना तुझे गणित चुकले असे ते कधीही म्हणाल्याचे आठवत नाही. उलट खालीलप्रमाणे खास शाब्बासकी द्यायचे:
वाट्टोळं
बोंबाबों..ब
उध्वस्त
सत्त्यानाश
महान शोध (अपेक्षेपेक्षा अगदी वेगळे उत्तर आलेले असेल तर)
स्वयंपाकघरापर्यंत डांबरी रस्ता (खाडाखोड)
मला सगळं येतं (अतिआत्मविश्वास दाखवून चूक झाले असेल तर)
दीड फूट पाण्यात बुडून मेलात आपण (सोडवताना उदाहरणात सांगितलेल्या पेक्षा वेगळीच किंमत घेतली असेल तर)
इ.इ.
सरांचे खास गुण होते जे आत्ताच्या गुळगुळीत झालेल्या महानगरी व्यक्तीमत्वांमध्ये क्वचितच आढळतात. विनोदी पण अतिशय आदरणीय व्यक्तीमत्व होते.
18 Aug 2025 - 7:58 pm | कुमार१
‘रबर’च्या अन्य टोपणनावांची उजळणी इथे झालेली आहे.
passed away चा भारतातील गोंधळ नित्याचा आहे.
pass out = बेशुद्ध पडणे, चक्कर येणे हा मूळ अर्थ आहे आणि अमेरिकेत तोच समजला जातो.
इंग्लंडमध्ये मात्र त्या अर्थाव्यतिरिक्त फक्त लष्करी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर passed out असे म्हणायची पद्धत आहे; पण सामान्य कॉलेजमधून झाले असता मात्र नाही.
भारतीय इंग्लिशमध्ये आपण तो वाक्प्रचार सर्रास कुठल्याही कॉलेजातून पदवीधर झाल्यावर वापरतो.
19 Aug 2025 - 11:04 am | चंद्रसूर्यकुमार
माझा चुलतभाऊ काही वर्षे पंजाबमध्ये वास्तव्याला होता. त्याचे लग्न लुधियानात झाले होते. माझी वहिनी तिकडचीच. त्या लग्नाला मी तिथे गेलो होतो. लग्नाच्या काही दिवस आधी काही गोष्टींची खरेदी करायला आणि इतर काही कामे करायला दिवसभरासाठी गाडी केली होती. त्यावेळेस माझी काकू (नवर्या मुलाची आई) आणि चुलतबहिण (नवर्या मुलाची बहिण) आणि सोबत म्हणून तसेच सामान उचलायलाही मी असे तिघे त्यावेळेस बाजारात गेलो होतो. एके ठिकाणी बाजारात गेल्यावर ड्रायव्हरने विचारले की बाजारात तुम्हाला किती वेळ लागेल- मधल्या वेळेत मी थोडा वेळ झोपून घेईन. माझ्या काकूने त्या ड्रायव्हरला सांगितले की एक तास लागेल. त्यापुढचे वाक्य मात्र अगदी सिक्सर होते. काकू म्हणाली- "आपको उतना टाईम सोना है तो सो लेना. कोई बात नही. हम वापस आने के बाद आपको उठाके ले जायेंगे". ड्रायव्हर अवाक झाला. कारण उत्तर भारतात उठाके ले जायेंगे चा अर्थ उचलून घेऊन जाऊ. मग चुलतबहिणीला झालेला गोंधळ लक्षात आला. मग तिने सांगितले- आपको जगाके ले जायेंगे :)
19 Aug 2025 - 2:11 pm | सुधीर कांदळकर
टॉकिंग वॉकिंग शिवाजी फेल किंग. हू कुड स्पीक इन फ्रन्ट ऑफ हिम? - बोलून चालून शिवाजी पडला राजा .....
वॉकिंग वॉकिंग रिव्हर केम. - चालता चालता नदी आली.
डोन्ट पुल सिगरेट इन कॉलेज.
व्हाय आर यू टॉकिंग बिटवीन बिटवीन?
छान गंमत सुरू आहे. थोडी माझीही भर.
धन्यवाद.
19 Aug 2025 - 2:26 pm | चंद्रसूर्यकुमार
कॉलेजात इंजिनिअरींग ड्रॉईंग (ज्याला आमच्या विद्यापीठात इंजिनिअरींग ग्राफिक्स असे म्हणायचे) म्हणून एक विषय पहिल्या वर्षी होता. तो मला जाम झेपला नव्हता. त्यात Perspective म्हणून एक माझ्यासाठी अगम्य प्रकार होता. तो शिकविताना आमचे प्रोफेसर म्हणाले होते- as the object moves away from the picture plane, its image goes on reducing reducing (लहान लहान होत जाते).
हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद आहे त्यामुळे थोडेफार मनोरंजन (झालेच तर) इतकाच या प्रतिसादाचा उद्द्देश आहे.संबंधित प्रोफेसरांचा अनादर करायचा अजिबात हेतू नाही. त्यातही मला अजिबात न झेपलेल्या विषयांच्या प्रोफेसरांचा तर नक्कीच नाही.
19 Aug 2025 - 2:47 pm | स्वधर्म
मराठीत निर्जीव वस्तूंना लिंग असते. उदा. छिन्नी ही स्त्रीलिंगी असते तर हातोडा हा तो हतोडा असतो. कानडीत आणि इंग्रजीतही असे निर्जीव वस्तूंना लिंग नसते, त्यामुळे क्रियापद तसे चालवावे लागत नाही. आमचे एक प्राध्यापक चक्क इंग्रजीत पण Shaft चा उल्लेख he तर Key चा उल्लेख she असा करायचे, पण शिकवायचे असे छान की सगळे एकदम क्लिअर होऊन जायचे.
अजून एक शिक्षक हायड्रॉलिक्सचे प्रॅक्टीकल घ्यायचे, ते संपूर्ण मराठीतून. त्यांचे इंग्रजी अगदी चांगले असूनही.
19 Aug 2025 - 10:55 pm | कानडाऊ योगेशु
ओके. कानडी लोक मराठी बोलताना हमखास नपुसकलिंगी सर्वनामे का वापरतात ह्याची आता लिन्क लागली.
20 Aug 2025 - 3:09 am | स्वधर्म
जुन्या मराठी सिनेमात राघवेंद्र कडकोळ असे हुकमी कानडी माणसाचे मराठी बोलताना असे नपुंसकलिंग वापरायचे. आंम्ही सीमा भागाजवळचे, त्यामुळे कानडीचा काय परिणाम होतो ते नीट कळायचे.
किंवा पुलं च्या रावसाहेबांचं मराठी इथे ऐका: ''तुमचं बाप लावलवतं काय वो चा...ल?''पु.ल.देशपांडे - रावसाहेब
19 Aug 2025 - 4:36 pm | कुमार१
सर्व झकास !
. . . . . . . . .
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. त्याचे एक उदा.:
मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते :
Both pupils are equal in size and reactive to light.
एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !!
. . .
शरीरात ज्या गोष्टी डाव्या उजव्या अशा जोडीने असतात त्यांच्या बाबतीत असा घोटाळा होणे शक्य असते. म्हणून आपण लिहिलेली टिपणे पुन्हा एकदा नजरे करून घातली तर बरे असते.
20 Aug 2025 - 8:39 am | कुमार१
नजरेखालून
असे वाचावे.
19 Aug 2025 - 10:52 pm | कानडाऊ योगेशु
मध्यंतरी लिन्क्ड इन वरचा जॉब ओपनिंग संबंधित असलेला एक स्क्रीन्शॉट व्हाट्सपवर वा असाच कुठेतरी वाचला होता.
त्यात जॉब डिटेल्स टाकताना तत्सम कंपनीच्या एच.आर प्रतिनिधीने स्पेलिंग मिस्टेक केली होती.
Job details are as below ह्याऐवजी चुकुन
Job details are as blow
असे लिहिले होते. :)
19 Aug 2025 - 10:56 pm | सौन्दर्य
माझ्या एका मित्राचे हिंदी अगदी अगाध होते, बाजारात कांदे घ्यायला एका भैयाकडे गेल्यावरच त्याचे हे वाक्य मला नेहेमीच हसवते .
"भैया, ये कांदा कितने मी गिरेंगा ?"
हे ऐकल्यावर भैयाच कोलमडला असेल.
20 Aug 2025 - 7:47 am | कुमार१
मराठी-हिंदी, कन्नड-मराठी या भाषकांच्या संदर्भातील लिंगांचा घोळ बऱ्यापैकी ऐकलेला आहे.
. . .
अनेकांच्या रजेच्या अर्जातील भाषा हा देखील भारी विषय आहे.
प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव :
ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात,
“There is fracture to my right hand leg”
असे वाक्य लिहिले होते
आणि
तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !
20 Aug 2025 - 10:13 am | नचिकेत जवखेडकर
माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा. जपानी भाषेमध्ये यासुमी असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुट्टी असा होतो आणि यासुई असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वस्त असा आहे. साधारणपणे, व्याकरणाचा काही भाग शिकवला की शिक्षक उदाहरण तयार करायला सांगायचे. तेव्हा त्यांच्या वर्गात असंच एक वाक्य तयार करताना एका मुलीला म्हणायचं होतं, मला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यात बिचारीनी यासुमीच्या ऐवजी यासुई म्हटलं आणि अर्थाचा अनर्थ झाला!
मुळात जपानी भाषेमध्ये मला,मी असा फरक नाहीये. त्यामुळे मला शनिवार रविवार सुट्टी असते हे वाक्य मी शनिवार रविवार सुट्टी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वरील गोंधळ झाला असावा :)
21 Aug 2025 - 3:01 am | कुमार जावडेकर
छान लेख, आवडला.
अशाच गमती आपल्या रोजच्या वापरात झालेल्याही दिसून येतात.
(१) 'बॅकसाइड' हा शब्द आपला पश्चभाग / पृष्ठभाग या अर्थी इंग्रजीत वापरतात. त्यामुळे मला 'बॅकसाइड'ला भेट म्हणणं मजेशीर होतं.
(२) झूम किंवा टीम्स मीटिंग मध्ये 'फ्रॉम दि अदर साइड' (उदा. 'एनी कॉमेंट्स फ्रॉम द अदर साइड') असं विचारलं तर त्याचा अर्थ मृत व्यक्तींकडून ('एनी कॉमेंट्स फ्रॉम दोज हू आर डेड') असा होतो.
(३) इतकंच काय तर 'प्रीपोन' हा शब्दही इंग्रजीत नव्हता. भारतानं तो (पोस्टपोन च्या विरुद्धार्थी) बहाल करून कामं लवकर करून द्यायची सोय केली.
- कुमार
21 Aug 2025 - 7:51 am | कुमार१
बरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा.
मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच.
आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !
21 Aug 2025 - 6:00 am | कांदा लिंबू
करियरच्या सुरुवातीच्या काळात हैदराबादला माझ्या ऑफिसात अनेक तेलुगु, मराठी, इतर असे मुले-मुली सहकारी होते. त्यांपैकी एक अपर्णा नावाची एक तेलुगु मुलगी होती. तिला आम्ही सर्वजण अपू म्हणायचो.
आम्ही सर्वच फ्रेशर्स होतो. फार कुणाचे इंग्लिश काही खूप चांगले नव्हते आणि एकमेकांच्या मातृभाषाही फार काही कुणाला अवगत नव्हत्या. मीही त्या काळात रॅपिडेक्स नावाच्या पुस्तकांतून तेलुगु, इंग्लिश वगैरे शिकायचो. भाषिक फरकांमुळे मोकळ्या वेळांत गप्पा मारताना अनेकदा गंमतीजमती व्हायायच्या.
तेलुगु लिपीत व आणि प या दोन अक्षरांमध्ये, देवनागरी लिपीतील प आणि ष या दोन अक्षरांसारखा अगदी किरकोळ, नवीन शिकणाऱ्याला पटकन न कळणारा असा फरक आहे.
"गाय आपल्याला दूध देते" हे तेलुगुत "आवू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणतात. पुस्तकात पाहून मी "गाय आपल्याला दूध देते" हे "अपू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणालो.
त्यावर तेलुगु समजणाऱ्यांत एकाच हशा पिकला. ती अपू अगदीच गोरीमोरी झाली. काय झाले हे कळल्यावर मीही काहीसा ओशाळलो.
अजूनही ते वाक्य आठवून हसायला येतं.
21 Aug 2025 - 7:57 am | कुमार१
परभाषा आणि आणि परकीय भाषांमधले किस्से छान आहेत.
***************************************************
इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला ४० पानी सारांश नजरेखालून घातला .
त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे :
१ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली.
२. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत.
३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात.
४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही.
५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.
६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.
24 Aug 2025 - 6:23 pm | चंद्रसूर्यकुमार
आपण मराठी लोक हिंदी बोलतानाही अनेकदा विचित्र चुका करत असतो.
मराठीत आपण 'कशावरून' असे नेहमी विचारतो. तसे हिंदीत बोलताना 'किसके उपरसे' असा प्रश्न मी एकाला विचारला होता. त्याला काहीच समजले नाही हे वेगळे सांगायलाच नको :)
दुसरे म्हणजे मराठीत आपण 'हो का' असेही विचारतो. तसे मी 'हा क्या' असे विचारले होते. ते पण त्याला कळले नव्हते :)
24 Aug 2025 - 7:20 pm | कंजूस
वाक्ये बनवणे किंवा वाक्यात उपयोग करणे हा एक भाषा शिकवण्याचा चुकीचा उद्योग आहे. चुकीची पद्धत आहे.
24 Aug 2025 - 10:03 pm | श्वेता२४
मस्त खुसखुशीत लेख व त्यावरील प्रतिसाद ही तितकेच मजेशीर...!! खूप हसले..
25 Aug 2025 - 11:18 am | कंजूस
घसा लाल झाला आहे तर 'sour throat'.
25 Aug 2025 - 11:19 am | कंजूस
इंग्रजी भाषेचे विनोद असतात बरेच.
25 Aug 2025 - 11:46 am | कुमार१
अनवधान ते अज्ञान या टप्प्यात . . .
राजकारणी तर आपल्या सर्वांचे बाप म्हणावे लागतील ! स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा घोळ केल्याचा किस्सा अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे.
हा एक जुना प्रसंग नटवर्य केशवराव दाते यांच्या मुंबईतील सत्कार प्रसंगीचा. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यात त्यांना एक चांदीची सुरेख फुलदाणी दिली जाणार होती. प्रत्यक्ष सत्कार करताना तत्कालीन मंत्रीमहोदय म्हणाले,
दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले?
( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )
25 Aug 2025 - 7:26 pm | गामा पैलवान
कुमारेक,
यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं.
आ.न.,
-गा.पै.
25 Aug 2025 - 7:52 pm | कुमार१
पूर्वी एका धाग्यावर शॉ यांच्या अन्य पण नोंदी केल्या आहेत वाटतं. पण ghoti च्या बाबतीत एक गंमत आहे बघा. हे विनोदी स्पेलिंग शॉनी प्रचारात आणले असे आत्तापर्यंत आपण समजत होतो. परंतु भाषापंडितांच्या संशोधनानुसार शॉ यांच्या जन्मापूर्वी देखील या स्पेलिंगचा उल्लेख झालेला आहे आणि आता त्याचे श्रेय Matthew Gordon यांना दिले जाते.
‘राईट बेटर, स्पीक बेटर’ या पुस्तकात शॉ यांचे किस्से देऊन शेवटी समारोप अशा मजेदार स्पेलिंगने केलेला आहे :
Enuf sed ?
(for enough said !)
. . .
असं एक निरीक्षण आहे की, आपल्याकडे बरेच मराठी मध्यमवर्गीय विनोद अत्रे किंवा पु.ल. यांच्या नावाने सांगितले जातात (जरी त्यातले काही त्यांचे नसले तरी). तोच प्रकारे इंग्लंडमध्ये शॉ यांच्या बाबतीत आहे असे दिसते.
26 Aug 2025 - 5:44 pm | नपा
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची आठवण झाली. मस्त लेख.
इंजिनीरिंगला असतांना मराठमोळ्या प्राध्यापकांना मराठीचे शब्दशः भाषांतर करतानाची वाक्ये :
वर्गात फळ्यावर काही लिहीत असतांना मुलं बडबड करत असली तर हे वाक्य यायचं - Do not talk in front of my back.
मुलांचा वर्गातील गोंधळाला थांबवण्यासाठी म्हणत - Principal is rotating around the collage.
कदाचित आमच्या कॉलेजमध्ये बरेच परप्रांतीय विद्यार्थी होते म्हणून इंग्रजीचा अट्टाहास असावा.
दुबईला असताना आलेला एक मजेशीर अनुभव -
ऑफीस मधील दोन डिपार्टमेंट हेड - एक अरब आणि दुसरा मूळचा अरब पण युरोपात वाढलेला ज्याला अरबी भाषा येत नव्हती.
एकदा Dubai Municipality ने एक अरबीत लिहिलेले लेटर पाठवले, पहिल्या अरबाने 'for action' शेरा लिहून दुसऱ्याला पाठवलं.
दुसर्याने 'translate in English' असा शेरा टाकून पुन्हा पहिल्याकडे लेटर परत पाठवले.
पहिला पण मुरलेला होता - 'learn Arabic' असा शेरा मारून पुन्हा दुसऱ्याला पाठवलं.
26 Aug 2025 - 6:44 pm | कुमार१
होय, अगदी भारी असायचे.
अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात.
काही उदाहरणे :
१. fruit bat = फळ फलंदाजी
२. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".
27 Aug 2025 - 1:06 pm | नीळा
रूग्णालयात हेच ट्रान्सट्रिपशन चे काम केलय...खुप रिलेटिव लेख