यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल. तसेच पुढील चार महिन्यात ज्यांची पन्नाशी पूर्ण होईल अशा प्रसंगांचीही नंतर भर घालता येईल.
कला-संस्कृती मंच
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या महत्त्वाच्या, जनमनावर ठसा उमटवणाऱ्या आणि कालौघात आख्यायिका बनलेल्या तीन चित्रपटांची दखल घेऊ - मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषांतील प्रत्येकी एक चित्रपट.
‘सामना’
राजकीय भ्रष्टाचार आणि सामाजिक शोषणाचे धाडसी चित्रीकरण करणारा हा मराठी चित्रपट.
रामदास फुटाणे निर्मित या चित्रपटाच्या पन्नाशी निमित्ताने ‘सामना 50’ हा विशेष कार्यक्रम पुण्यात साजरा झाला. तेव्हा झालेल्या फुटाणे यांच्या मुलाखतीतून बऱ्याच रोचक गोष्टी समजल्या. हा चित्रपट तयार करताना सर्वप्रथम त्यांनी लेखक म्हणून विजय तेंडुलकरांची निवड केली. तेंडुलकरांचे स्वतंत्रपणे केलेले हे पहिले पटकथालेखन. ते करताना त्यांनी श्रीराम लागू आणि निळू फुले यांना समोर ठेवले. दिग्दर्शक जब्बार पटेल तेव्हा चित्रपटात नवखे होते. परंतु फुटाणे यांना पटेल यांच्या कौशल्याबद्दल खात्री होती. सामनातील काही संवाद अजरामर झालेले आहेत.
हा चित्रपट प्रथम बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. पुढे भारतात त्याला तीन राष्ट्रीय आणि अन्य अनेक पुरस्कार मिळाले. या लेखनासाठी तेंडुलकरांनीअनेक साखर कारखान्यांना भेटी दिल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शालिनीताई पाटील यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
सामनासंबंधी माझी एक व्यक्तिगत आठवण. 1975 च्या दरम्यान मी काही कारणास्तव चित्रपट बघणे सोडून दिले होते. सामना चांगला चालल्यानंतर हळूहळू थेटरातून गेला आणि साधारण दीड वर्षाने आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनात दाखवला जाणार होता. तेव्हा माझ्या एका मित्राने मला खोलीवर येऊन सांगितले की तुझे चित्रपट न बघण्याचे ‘व्रत’ सामना पुरते तरी तू मोड आणि निदान आपल्या कॉलेजात तरी तो बघच !” त्याचे मी ऐकले आणि सामना बघण्याचा आनंद घेतला. चित्रपटातले दोन कलावंत डॉ. लागू आणि जब्बार पटेल हे आमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याने आमच्याकडे तर या चित्रपटाचे विशेष अप्रूप होते.
. .
शोले
तेव्हाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15/8/1975 रोजी हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चांगलाच आपटला होता !
कालांतराने मात्र त्याने अनेक विक्रमांचा इतिहास घडवला . . .
ही जादू झाली तेव्हाचा किस्सा तर भन्नाट आहे.
सुरवातीस तो थेटरात फारसा चालत नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक रमेश सिप्पी निराश झाले होते. त्या काळी केलेली (अंदाजे) तीन कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे काही चेष्टा नव्हती. पण काही महिन्यांनी एका थेटर मालकाने त्यांना प्रत्यक्ष खेळाचे वेळी बोलावले. त्यावर ते मालकांना म्हणाले, " अहो, मला तुम्ही काय रिकामं थेटर दाखवायला बोलावता आहात काय ?"
मालक हसून म्हणाले, या तर खरं !
मग सिप्पी तेथे पोचले.
चित्रपटाचा खेळ चालू झालेला होता. मालकांनी त्यांना आधी गप्पांमध्ये रंगवून ठेवले. चित्रपटाचे मध्यांतर झाले. आता मालक म्हणाले, चला माझ्याबरोबर.
मग त्यांना खाद्य खाद्य-पेय विक्री विभागात घेऊन गेले. बघतात तर काय, तिथे नुसते खाद्यपदार्थ तयार होते परंतु ते विकत घ्यायला चिटपाखरू सुद्धा नव्हते !
सिप्पींना तरीही कळेना, "हे मला काय दाखवताहेत ?"
मग मालकांनी खुलासा केला. "अहो, या खेळाची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. आता मध्यांतर झालेले आहे. तरीसुद्धा एकही प्रेक्षक आतून बाहेर येऊन खाण्यापिण्यासाठी उत्सुक नाही. सर्वजण चित्रपटात खूपच रंगून गेलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्याचा उत्तरार्ध अजिबात काहीही न चुकता पाहण्याची जाम उत्सुकता आहे. हेच तुमचे यश समजा !!"
हे ऐकल्यावर सिप्पी धन्य झाले !
नंतर काही वर्षांनी शोलेबद्दल बोलताना अभिनेते ए के हनगल म्हणाले होते की या चित्रपटाचे खेळ कधी संपतच नाहीत. त्याचा शेवटचा खेळ कधी होईल हे आपण सांगू शकणार नाही !
आज पन्नास वर्षानंतरही त्यांचे उद्गार खरे मानावे लागतील कारण लवकरच शोले नव्या रंगरंगोटीसह चित्रपटगृहात येणार आहे . . .
‘Jaws’
यंदाच्या 20 जून रोजी Steven Spielberg यांच्या जॉज या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. एका शार्क माशाने पाच माणसांवर हल्ला केल्याच्या सत्यघटनेवर आधारित कादंबरी Peter Benchley यांनी लिहिलेली होती. तिच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
त्याचे दिग्दर्शक म्हणून स्टीव्हन स्पिलबर्ग या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणाची निवड झाली. स्पिलबर्ग यांच्यावर हिचकॉकचा चांगल्यापैकी प्रभाव होता आणि त्याचे प्रतिबिंब जॉजमध्ये पडलेले दिसते. चित्रपटात वैशिष्ट्यपूर्ण संगीताचा वापर केलेला आहे. पाश्चात्त्य संगीतातील E आणि F या दोन साध्या नोट्सचा वापर करून संपूर्ण चित्रपटभर मानसिक ताण आणि आत्यंतिक भीतीचे वातावरण उभे केलेले आहे.
हा चित्रपट भारतात उशिराने आला आणि तेव्हाच्या ‘70 mm’ चित्रपटगृहात मी पाहिला होता. चित्रपटाच्या 81व्या मिनिटाला जेव्हा पडद्यावर शार्क समुद्रातून डोके वर काढतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृह जोरात दचकलेले अजूनही आठवते. परदेशात एका 17 वर्षीय तरुणीला हा चित्रपट पाहिल्यानंतर cinematic neurosis हा मनोविकार जडला. तिला त्याचे झटके येत तेव्हा ती "Sharks! Sharks!" असे किंचाळायची आणि तिला फिट्स देखील यायच्या. या अभूतपूर्व केसचा ‘न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसिन’ या विज्ञानपत्रिकेत समावेश झाला होता. हा चित्रपट तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी झाल्यामुळे स्पिलबर्ग यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण
१. भारतात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती , जी सुमारे २१ महिने चालली. आणीबाणी लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक छापील वृत्तपत्रांमधून अग्रलेखाची जागा मजकूर नसलेल्या कोऱ्या चौकटीने सोडून देण्यात आली होती. या काळात अनेक राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली आणि नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये रद्द करण्यात आली होती. हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील क्लेशदायक काळ होता. हा विषय बहुचर्चित असल्याने त्यावर अधिक लिहीत नाही.
२. त्याच वर्षी आपल्या स्वातंत्र्यदिनीच आपल्या शेजारी देशात घडलेली घटना तर भयानकच. ती म्हणजे, बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजिबूर रहमान यांची काही कुटुंबियांसह झालेली हत्या. त्या दिवशी ते त्यांच्या खाजगी निवासस्थानातच राहत होते. लष्करातील काही अधिकारी बंड करून त्यांच्या घरात घुसले आणि जिन्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
तेव्हा त्याच्या सविस्तर बातम्या वाचलेल्या आठवतात. जेव्हा खुन्याने त्यांच्यावर बंदूक रोखली तेव्हा ते त्याला म्हणाले होते की, "अरे मी तुम्हाला हा देश मिळवून दिला आणि तू हे काय करतो आहेस?"
त्यावर त्याने फक्त बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या.
रेहमान यांच्या दोन कन्या त्या वेळी जर्मनीत असल्यामुळे बचावल्या.
३. आंतरराष्ट्रीय घडामोडींत व्हिएतनाम युद्धसमाप्तीची पन्नाशी महत्वपूर्ण.
उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम यांच्यात झालेल्या आणि वीस वर्षे चाललेल्या या जगप्रसिद्ध युद्धाची समाप्ती 30 एप्रिल 1975ला झाली. माझ्या शालेय जीवनात त्यासंबंधीच्या बातम्या सातत्याने वाचायला व ऐकायला मिळत.
वरील युद्धात उत्तर व्हिएतनामला रशिया व चीनचा पाठिंबा होता तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिका आणि तिच्या समविचारी साथीदारांचा.हे युद्ध कोणी “जिंकले” याबद्दल संदिग्धता असून दुमत आढळते. युद्धात अमेरिकेची मानहानी झाली. व्हिएतनाम मोठे नुकसान सोसूनही सावरला.
या दीर्घकालीन युद्धासंदर्भात सत्यजित रे यांच्या १९७०मधल्या प्रतिद्वंदी या चित्रपटातील एक प्रसंग अतिशय बोलका व प्रभावी आहे.
त्या चित्रपटात धृतीमान चटर्जीनी नायकाची भूमिका केली आहे. तो नायक नोकरीच्या एका मुलाखतीसाठी जातो तिथे त्याला विचारतात, “मागच्या दशकातली सर्वात महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी घटना कोणती?”
त्यावर नायक म्हणतो व्हिएतनाम युद्ध.
पुढील प्रश्नोत्तरे अशी होतात :
“मानव चंद्रावर उतरला यापेक्षा ती घटना महत्त्वाची वाटते?”
“होय” तो म्हणतो. अवकाश तंत्रज्ञान-प्रगती बघता चंद्रावर जाणे हे अपेक्षित होते. या उलट वरील युद्धामध्ये व्हिएतनामी लोकांचे अतुलनीय धैर्य दिसून आले. तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा मला प्रचंड अशा मानवी धाडसाचे अधिक कौतुक वाटते”.
भीषण दुर्घटना
बिहारमधील चासनाला येथील खाणीत झालेला भीषण अपघात हा भारतातील खाणींच्या इतिहासातील हा एक भयंकर अपघात होता. त्यात 375 कामगारांचा मृत्यू झाला. तेव्हा ही घटना वृत्तपत्रातून बऱ्यापैकी वाचल्याचे आठवते. ती खाण IISCO या स्टील उद्योगाची होती.
त्या घटनेवरील खटला 37 वर्ष न्यायालयात चालला आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा खाणीच्या संचालकांना दोषी ठरवण्यात आले होते परंतु त्यापैकी दोघांचा त्यापूर्वीच मृत्यू झालेला होता.
पुढे या दुर्घटनेचा विषय काही कलाकृतींनी हाताळलेला आहे. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा काला पत्थर हा चित्रपट आणि अनिल बर्वे यांचे ‘11 कोटी गॅलन पाणी’ हे मराठी पुस्तक ही याची काही उदाहरणे. हे पुस्तक मी वाचलेले असून त्यातील काही प्रसंग हृदयद्रावक आहेत.
शैक्षणिक बदल
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
. .
असा हा पन्नाशीच्या निवडक आठवणींचा देश-विदेशातील फेरफटका !
*************************************************************************************
प्रतिक्रिया
25 Aug 2025 - 8:52 am | कर्नलतपस्वी
जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला.
प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला....
नाश्ता....लंच....डिनर...
25 Aug 2025 - 11:49 am | कुमार१
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . .
?
25 Aug 2025 - 12:50 pm | कर्नलतपस्वी
सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.
25 Aug 2025 - 2:01 pm | कंजूस
कुमारांचं वाचन निरिक्षण दांडगं आहे.
25 Aug 2025 - 2:13 pm | कुमार१
पुस्तक वाचनात तर तुम्ही माझे "बाप" आहात !
निरीक्षणाबाबत तुम्ही म्हणता आहात तर असेल बुवा कदाचित
:)
25 Aug 2025 - 2:24 pm | श्वेता२४
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.
25 Aug 2025 - 3:27 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्त लेख
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे.
असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.
25 Aug 2025 - 4:13 pm | कुमार१
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो.
नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते.
अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे.
मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.
25 Aug 2025 - 5:16 pm | कर्नलतपस्वी
1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले.
हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.
25 Aug 2025 - 5:54 pm | कंजूस
दहावी / अकरावी/ बारावी जो काय घोळ घातला त्यात फक्त नावे बदलली.
अभ्यास तोच राहिला. अजुनही किती वयाला काय शिकवायचे हा घोळ कायम आहे.
25 Aug 2025 - 6:58 pm | कुमार१
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी.
1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज.
दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते.
मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
असे गमतीने जाहीर केले.
आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !
26 Aug 2025 - 10:15 pm | रामचंद्र
ही कोणती शाळा असावी बरं?
27 Aug 2025 - 8:16 am | कुमार१
ओळखा तुम्हीच!
:))
26 Aug 2025 - 4:53 pm | सुधीर कांदळकर
हे वाचून गंमत वाटली. एकंदरीतच छान लेख. धन्यवाद.
30 Aug 2025 - 2:44 pm | कुमार१
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा.
चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
30 Aug 2025 - 5:03 pm | सुधीर कांदळकर
ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे.
अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो.
आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.
30 Aug 2025 - 7:06 pm | कुमार१
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो.
तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे.
त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.
30 Aug 2025 - 10:48 pm | अमरेंद्र बाहुबली
छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली!
बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
31 Aug 2025 - 7:59 am | कुमार१
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.