बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात. आणि ग्रेस यांच्याच सुरेल गीताचे स्वर कानी पडतात...
प्रकाश गळतो हळूहळू
चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती
अंधूक अंधूक दिवे ...
दूर सनातन वृक्षांनाही
हिरवट गंध मूका
दुःख सुरांचा क्षितिजापाशी
मेघ दिसे परका...
बस... एका अनवट प्रकाशातून ग्रेसांचे स्मरण सुरु होते. बेसरबिंदीतील सादर झालेल्या कवितांचे,ललितबंधांचे,गीतांचे विषेशत्व जाणवले की, ग्रेस यांच्या नेहमीच्याच प्रसिद्ध कवितांपेक्षा वेगळ्या कवितांचा,लेखांचा यात मागोवा आहे.
कार्यक्रमाच्या संहितेमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या सृजनाचे अनेक पैलू स्पर्शित केले गेले. ग्रेसांना प्रिय असलेली भगवी संध्या, आईची गुढ माया, पावसाची निरव रिमझिम, दुःखाची कातरवेळ आणि अजून बरेच काही..
ग्रेसांनी लिहिलेले अनेक ललितलेखन कार्यक्रमात सुंदररीत्या गुंफले आहेत. सुरुवातीलाच 'तोडाचा डोह'' काळजाला पिळवटून टाकतो. सादरकर्त्याच्या आवाजाची धीर-गंभीरता त्या डोहाच्या वातावरणाचा आभास तंतोतंत उभा करतो.
तांदूळ मोजणाऱ्या मुलींची कथा व्यथा खोल शिरते. एलिझाबेथच्या शेवंतीच्या रोपांनी कशी मानवातील अहंकाराच्या मूळापाशी कधी नेले कळलेच नाही... प्रश्न शेवतींचा नाही एलिझाचा आहे.
नको मोजू माझ्या
मुक्तीच्या अंतरे
ब्रम्हांडाची दारे
बंद झाली ..
माझ्या आसवांना
फूटे हिमगंध
मागे-पुढे बंध
पापण्यांचेstrong>..
ग्रेसांची दग्ध मुलींचे संध्यागीत यात संध्याकाळचे हिरवट दुःखाचे तरंग उमटत राहतात.
पक्षी पक्षी व्याकूळ व्याकूळ
रुतवून काटा उर अभंग
दग्धमुलींचे विरक्त हसणे
संध्येपाशी एक तरंग
..
...
....
मी स्मरणाने गंध अचंबित
संध्यामायेचा कल्लोळ|
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.
मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल -
ग्रेस
अशा या प्रिय ग्रेस यांच्या स्मरणाची संध्या मी अनुभवली ABAA(आबा) 'अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोशिअसन यांच्या अभूतपूर्व सुंदर बेसरबिंदी यां कार्यक्रमामधून!
विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या पण २०-२२ वर्ष कलेच्या अनेक रंगी तंतूने जोडलेल्या या गुणी प्रतिभावंत कलाकारांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बेसरबिंदीचा पहिला कार्यक्रम एफ.टी.आय(FTII) ओल्ड मेन थिअटर ,पुणे येथे सादर झाला. यातील सादरीकरण केवळ गीत, लेख यानेच सजलेले नाही तर प्रकाश योजना, नेप्यथ्य याच्या परीपूर्ण साथीने चमकले आहे.
प्राचीताईच्या आंतरजालावरच्या मैत्रीने मी या कार्यक्रमाच्या संगतीत आले. काल प्राचीताई आणि सर्व कलाकारांच्या या 'बेसरबिंदीने' ग्रेस यांच्या स्मरणाचे चांदणं मनभरून स्पर्शून आले.
हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.नक्की पहा!
-भक्ती
प्रतिक्रिया
24 Aug 2025 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता.
आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली.
तहे दिलसे शुक्रीया.
भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2025 - 3:24 pm | श्वेता२४
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.
अत्यंत समर्पक...
यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...
24 Aug 2025 - 5:29 pm | Bhakti
संपादकजी
Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.
हा शब्द 'परीसस्पर्श' असा करा _/\_
24 Aug 2025 - 4:09 pm | कंजूस
जरा गंभीरच वाटते आहे.
....दग्धमुलींचे विरक्त हसणे.. म्हणजे काय?
24 Aug 2025 - 5:27 pm | Bhakti
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे.
दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.
25 Aug 2025 - 6:02 am | कर्नलतपस्वी
ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात.
उदा. कवी म्हणतात ,
क्षितिज जसे दिसते
तशीच म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी
गाय जशी हंबरते,
तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात.
ती गेली तेंव्हा
ती आई होती म्हणुनी,
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध,
पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला,
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा,
कंदील एकटा होता
_____________
उंबर्यावर सांजसमयी
मन माझे रडते आई
पाणावलेली आर्त रांगोळी
तुझेच स्मरणगीत गाई
सूर्यबिंबावीन क्षितिजी
किरणांचा मखर ओस
जीवनदेव्हार्यात आई
देवत्वाची जागाच रिक्त
____________
नयनांच्या ओंजळीत
ओला सागर गहिरा
स्पंदनांच्या ठोक्यावर
आसवांच्या अधिर धारा
आठवांच्या वाटेवर
दु:ख पारावर घट्ट
सुनसान विराण शांततेत
सुन्न भयरात काळीकुट्ट
आशेने नभाकडे पाहता
चेहरा दिसतो आई
सुर ही येता एकू
वारा गातो अंगाई
____________
आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो.
त्याहीनंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर.....
आई माझी झुळझुळतांना
किणकिणतीही तारा
तिच्याच पदराखाली होतो..
शालीन, शिंदाळ वारा...
माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा
अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो.
म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.
25 Aug 2025 - 11:27 am | Bhakti
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
25 Aug 2025 - 5:45 pm | कर्नलतपस्वी
Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल.
आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'
उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे.
खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा.
माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल.....
माझी आई भिरभिर संध्या
सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा....
आई माझी अरण्यसरिता
चंद्र झुलविते पाणी
रामासाठी त्यावर लिहिते
शिळा अहिल्या गाणी...
आई माझी गाव निरंतर
पारावरती भरवी
संध्याकाळी भगवी होते
तिच्या तनूतील ओवी....
आई माझी काजळभरला रे!
मायेचा नखरा
वेणीमधली नागीण खुडते
जसा हिऱ्यांचा गजरा...
आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरजवेळी वाटत फिरतो
जोगी कुठला वेध ?
संध्येसाठी माझी आई
जपून उजळे वात
अश्वत्थाम्यापरी हिंडतो
जिथे भयंकर घात...
हे माझे आकलन आहे.
25 Aug 2025 - 6:04 pm | कर्नलतपस्वी
ग्रेस यांच्या कवीते मधली आईची प्रतिमा.
हे वाचल्यानंतर मला थोडेफार समजले.
26 Aug 2025 - 5:49 pm | सुधीर कांदळकर
आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले.
हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना?
अनेक अनेक धन्यवाद.
26 Aug 2025 - 7:42 pm | राजेंद्र मेहेंदळे
या काही कविता--ज्यांची गाणी झाली
https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace
घर थकलेले संन्यासी आणि वार्याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"