# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
__________________________________________
"प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?"
"भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !"
"ख्या ख्या ख्या "
"ख्या ख्या ख्या "
गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा !
तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच ! ( बाकी संवाद हिंदी इंग्रजी मध्ये झाला , तो मराठीत अनुवादित करुन लिहित बसण्याऐवजी तदनुषंगाने झालेले चिंतन लिहुन काढत आहे.)
नेहमी प्रमाणेच स्वान्तःसुखाय !
__________________________________________________________
ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम
एकदा का तुम्ही शांतपणे चिंतन करायला लागलात की वैदिक औपनिषदिक तत्वज्ञान , अध्यात्म , समाजव्यवस्था , धर्मशास्त्र , ह्यातील धागे आपोआप जुळत जातात अन एकामागुन एकेक गोष्टी उलगडत जातात . हा सगळा प्रवास म्हणजे एखादे रहस्यमय पुस्तक वाचण्यासरखा असतो कि ज्यात प्रत्येक पानांवर "ओह्ह , असा अर्थ , असा विचार होता होय ह्याच्यामागे ! " असे voila क्षण मिळत जातात !
सनातन धर्मानुसार प्रत्येक द्विज हा जन्मतःच तीन ऋणां मध्ये बांधलेला असतो. द्विज म्हणजे द्वि + ज अर्थात ज्याचा दोनदा जन्म झाला आहे तो . मौजिबंधन अर्थात मुंज हा सोळा संस्कारातील एक मुख्य संस्कार . त्याचे महत्व इतके आहे की त्याला दुसरा जन्म मानलेले आहे. द्विज अर्थात ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ज्यांचा ज्यांचा मौजिबंधन संस्कार झालेला आहे तो प्रत्येक जण !
आता ही तीन ऋण कोणती आणि ती कशी फेडायची ?
१. पितृ ऋण
२. ऋषी ऋण
३. देव ऋण
१. पितृ ऋण अर्थात आपल्या पिता आणि पितरांप्रती असलेले ऋण . त्यांच्या मुळे आपल्याला ह्या कुळात ह्या गोत्र प्रवरात जन्म मिळाला म्हणुन आपण त्यांचे ऋणी आहोत. मग त्यांचे हे ऋण फेडायचे कसे ? तर ह्या प्रश्नाचे उत्तर सोप्पे आहे, ते गोत्र प्रवर, बोली भाषेत आपले आडनाव पुढे चालु ठेऊन . पुत्रप्राप्ती करुन . पुत्र ह्या शब्दाची व्युतप्त्ती पु: नाम त्रायते इति पुत्रः अर्थात ज्यांना पुत्र होत नाही ते निपुत्रिक लोकं पु: नामक नरकात पडतात अशी धारणा आहे , अशा नरकात पडण्यापासुन जो वाचवतो , तारतो तो म्हणजे पुत्र . पण नुसतेच पुत्र प्राप्ती झाली म्हणजे कर्ज फिटले असे नाही. त्या पुत्राचे देखील मौजिबंधन व्हायला हवे , त्यालाही ही ३ ऋणे कळायला हवीत , आणि त्याला जेव्हा पुत्र प्राप्ती होईल अन त्याच्या पुत्राची अर्थात आपल्या पौत्राची मुंज , मौजिबंधन आपण पाहु तेव्हा आपण आपल्या वडीलांच्या , पितरांच्या पितृऋणातुन मुक्त होऊ.
२. ऋषी ऋण अर्थात ऋषी आणि गुरुंप्रती असलेले ऋण. हे कसे फेडायचे तर आपण स्वतः गुरुंकडुन जे अध्ययन करु , ते ज्ञान , व्यवस्थितपणे पुढील पिढीला सोपावणे आणि त्यांच्याकडुन त्या ज्ञानाचे सात्यत्य राखले जाईल ह्याची शाश्वती करुन ऋषी ऋण फेडले जाईल !
३. देव ऋण अर्थात देवां प्रति असलेले ऋण . सनातन धर्मातील देव ही संकल्पना ही वाळवंटी विचारधारांमधील देव ह्या संकल्पनांपेक्षा पुर्ण भिन्न आहे हेच बहुतांश हिंदुंना , द्विजांना ठाऊक नाही. ज्यांना ज्यांना आपण देव म्हणतो ते ते शिव , शक्ती , गणेश , विष्णु , सुर्य , इंद्र , अग्नि , यम , निऋती ,वरुण , वायु , चंद्र , ईशान हे सर्व च अव्यक्त निर्गुण परब्रह्माची आपण आपल्या आकलना करिता केलेली अभिव्यक्ती आहे. मुळ उद्देश हा अव्यक्त परब्रह्मात विलीन होऊन जाणे , तादात्म्य पावणे हे आहे . ते झाले की देवऋण फिटले !
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! विवाहसंस्कारात भटजी नक्की काय मंत्र हणतोय हेच कित्येकांना माहीती नसते . नवरा मुलगा मुलगी चार बोटे हवेत तरंगत असतात , त्यांचे आई वडील, इतर नातेवाईक ह्यांचे संगीत मानापमान चालु असतात . इतरांचा फॅशन शो चालु असतो आणि काही लोकांची मंगलाष्टके म्हणताना भटजी च्या तोंडात अक्षता कशा टाकता येतील ह्यावर गहन चिंतन चालु असते . त्यामुळे मुळे मुळ संस्कारातील अर्थच लोप पावत चाललाय . रादर लोप पावलाय .
सनातन संस्कृतीत विवाह हा इतका अन ब्रेकेबल बॉन्ड आहे कि द्विजांसाठी डायव्होर्स ही संकल्पनाच नव्हती सनातन धर्मात. मुळात मराठी शब्द जो आहे तो आहे - घटस्फोट ! घट अर्थात मातीचा घडा स्फोट अर्थात फोडणे . माणुस मयत झाल्यावर त्याच्या शवाला चितेवर चढवुन अग्नि द्यायच्या आधी करतात तसा विधी . घट स्फोट . इतका भयंकर शब्द वापरला आहे ! असो ह्या विषयावर नंतर लिहु सविस्तर .
"ओह. ठीक आहे. पण ऋषी ऋण , देव ऋण समजु शकतो ,, पितृ ऋण फेडलेच पाहिजे असं का ? मला नाय लग्न करायची इच्छा . काय फरक पडतो माझा वंश चालला काय कि न चालला काय ! मोक्ष प्राप्त झाल्यावर हे सगळं निरर्थकच नव्हे का ? " ( हा प्रश्न मित्राने खरेच विचारला. एकुणच अशी चांगली माणसे लग्न करण्यापासुन परावृत्त होत आहेत हे फार निराशाजनक आहे :( )
"भाई , सिरियसली , तू नक्की काय वाचत आहेस ? अष्टावक्रगीता ? योगवसिष्ठ ? " मी सखेदाश्चर्याने विचारले .
असो . फरक काय पडतो ते सांग .
तुम्हा सारखे असा विचार करणारे लोकं जर पुत्रप्राप्ति न करता मेले तर हा विचार , ही संस्कृतीच नष्ट होऊन जाईल. म्हणुन आपल्या पुर्वजांनी करुन ठेवलेली रीतसर व्यवस्था करुन ठेवली आहे ती म्हणजे आश्रमव्यवस्था - तुम्ही आधी ब्रह्मचर्य आश्रम करा, ज्ञान प्राप्ति करा, नंतर गृहस्थ आश्रम करा , रितसर उपभोग ह्या सर्व प्रापंचिक सुखांचा . मग कन्यापुत्र झाले की हळु हळु मन काढुन घेत वानप्रस्थ आश्रमाकडे प्रयाण करा . आणि एकदा नातवाची मुंज पाहिली की विधीवत संन्यास घेऊन ह्यातुन बाहेर पडा . तुम्हाला संसार नसेल करायचा तर तुम्ही थेट ब्रह्मचर्यातुन थेट संन्यास घेऊ शकता . पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच , रादर ती जी व्हॉईड ची अवस्था आहे त्यालाच पु: नाम नरक म्हणले आहे. निपुत्रिक अज्ञानाच्या अवस्थेत अविवाहित मेला तर त्याला मुंज्या म्हणातात , ज्ञान असलेल्या अवस्थेत मेला तर ब्रह्मपिशाच्च ! लोकांना ही भुतं वाटतात पण भुत बित काही नसतं ही बस त्या व्हॉईड अवस्थेला दिलेली दुसरी नामाभिधाने आहेत .
"आणि समजा एखाद्याला लग्न परुन पुत्र झालाच नाही तर ? "
का नाही , पुत्राचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ - ८ - प्रकार सांगितले आहेत सनातन धर्माने ह्यातील एक तरी नक्कीच होऊ शकतो . व्ह्यायला हवा ! पण हाही विषय नंतर बोलु कारण त्या आठ चे वर्णन करत बसलो तर तासभर लागेल. कन्या ह्या शब्दाचा अर्थच अविवाहित मुलगी असा आहे , एकदा का तिचे कन्यादान केले कि तिच्या पतीसोबत त्यांच्या परस्परांच्या मोक्षाप्रत जाणार आहेत. तुमचा काय संबंध ? तुम्ही चित्रांगदाने अर्जुनाकडुन चित्रांगदे पासुन उत्पन्न झालेला बभ्रुवाहन स्वतःचा पुत्र मागुन घेतला तसे तुम्ही तिचा पुत्र मागुन घेणार असला तर विषय वेगळा . अन्यथा कन्येचा काहीच संबंध नाही . (बाप मेल्यावर त्याच्या विवाहित मुलीला सुतक तरी लागतं का हाच मुळात प्रश्ण आहे, शोधुन पहावे लागेल ! )
" बरं . पण मग सगळेच असे देव ऋण ऋषीऋण फेडण्यासाठी अध्यात्माचा मार्गाला लागले तर समाज व्यवस्थाच कोलमडुन पडेल ना ! समाजाचं रहाटागाडगं चालणार कसं ? "
एक्झॅक्टली ! आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
आणि कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः अर्थात कर्मानेही नैष्कर्म्य सिध्दी प्राप्त होते जशी की जनकादिकांनी प्राप्त केली होती असे स्पष्ट आश्वासनही दिलेले आहे !
व्यवस्था केली म्हणजे कोणी केली ? मनू ने ? मनू तर नुसतं सांगतोय , तो फक्त नॅरेटर आहे . निर्माता नव्हे .
"चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। ४.१३ ।।"
आतां याचिपरी जाण । चाऱ्ही हे वर्ण ।
सृजिलें म्यां गुण- । कर्मविभागें ॥७७॥
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥७९॥
आहेत सर्वजण चारी वर्ण , चारी आश्रमातील लोकं , मुळात एकच ! फक्त स्वभावधर्माच्या आणि गुणांच्या मुळे ही केवळ वरवर केलेली विभागणी आहे बस.
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥
जो आपापली वर्णाश्रम धर्मानुसार आलेली कर्तव्य कर्मे , विहितकर्मे रीतसर करेल त्याला ज्ञान प्राप्ती अणि तदनुषंगाने मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. मग तो कोणीही का असेना . एकनाथ असो कि नामदेव असो कि गोरा कुंभार असो कि सावतामाळी असो, चोखामेळा असो कि तुकाराम असो !
अरे पण हे ज्ञान जर ब्राह्मणांच्यापुरते सीमीत असेल तर अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे , त्यांची ऋणे फिटणार तरी कशी ? त्यांना वर्णाश्र्रम व्यवस्थेचा काय उपयोग अन् त्यांना साधन तरी काय ?
आणि ह्याचेही उत्तर आधीच देऊन ठेवले आहे तुकोबांनी !
नामस्मरण !
ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि रीती सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥
इतकं सोप्पं आहे हे !! ?? मग ह्या वर्णाश्रम व्यवस्थेची गरजच काय ?
हा हा हा . ह्याला ही उत्तर देऊन ठेवलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी .
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥
अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥
स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥
म्हणोनियां संती अवश्य आचरावे । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥
कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥
प्रत्यवाय आहे अशास्त्री चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥
अगदी जीवनमुक्त पावन अवस्था प्राप्त झाली तरीही कुळीचा कुळधर्म आचार पाळावाच , अनाचार करु नयेच !
असो. ज्याला कळलं तो नामस्मरणात मार्ग शोधेल ! आणि जमेल तितके वर्णाश्रमधर्माचे आचरण करीत आपल्या ऋणत्रयातुन मुक्त होईल !
चरैवति चरैवति ||
||राम कृष्ण हरि||
||श्रीराम जय राम जय जय राम ||
______________________________________________
संदर्भ :
१. https://www.santsahitya.in/namdev/shridyaneshwaranchi-samadhi/
२. https://satsangdhara.net/dn/A04.htm
राम
प्रतिक्रिया
14 Aug 2025 - 9:37 am | युयुत्सु
श्री० गोडबोले,
'जन्मना जायते शूद्रः' हे स्मृतीवचन तुम्हाला ठाऊक असेलच. याचा अर्थ असा की मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो शूद्र असतो. मग त्याचे उपनयन होते तेव्हा तो पित्याच्या गोत्रात प्रवेश करतो (पहा- 'शूद्र पूर्वी कोण होते', बाबासाहेब आंबेडकर). मग तो ब्राह्मण-वैश्यादि वर्ण धारण करतो.
आता माझी समस्या अशी की माझी मुंज झाली नाही, त्यामुळे मी टेक्नीकली शूद्रच आहे! त्यात आता गोत्र वगैरे गोष्टीची निरर्थकता पुरेशी सिद्ध केलेली असल्यामुळे त्याची आता त्याच्यावाचून उर्वरित आयुष्यात काहीही अडणार नाही. म्हणजे तुम्ही जसे सर्टीफाईड मनुवादी तसा मी सर्टीफाईड लिब्राण्डू!
पण माझ्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता नाही, तिथेच सगळी गोची आहे. तेव्हा या संदर्भात काय करता येईल?
14 Aug 2025 - 10:12 am | प्रसाद गोडबोले
म्हणजे ?
तुमच्या शूद्रत्वाला कायद्याची मान्यता कशी मिळवून देता येईल असे विचारत आहात का ? तर माफ करा मी कायदे तज्ज्ञ नाही. ह्याबाबत मी काहीही मदत करू शकत नाही.
14 Aug 2025 - 11:39 am | चंद्रसूर्यकुमार
माझी समस्या आणखी वेगळी आहे. माझी मुंज झाली आहे पण सोडमुंज म्हणून एक प्रकार असतो तो झालेला नाही. सोडमुंज लग्नाच्या आदल्या दिवशी करतात म्हणे. माझ्या लग्नाच्या वेळेला सोडमुंज असे काही असते हे तर मी विसरूनच गेलो होतो. माझ्या आईच्या लक्षात होते (ते मला नंतर कळले) पण अशा गोष्टींवर माझा आणि आईचाही विश्वास नसल्याने तो विषय परत निघालाच नाही.
दुसरे म्हणजे मुंज झाल्यापासून लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याश्रम. त्या काळात शिकून आपल्याला कमावायला आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सक्षम करायचे आणि मग लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. म्हणजेच काय की गृहस्थाश्रमात असताना शिकणे अपेक्षित नसावे. आता माझ्या बाबतीत झाले असे की मी लग्न झाल्यानंतरही शिकतच होतो. इतकेच नाही तर बायको पण शिकत होती. आम्ही दोघे त्या दोन वर्षात वेगळ्या ठिकाणी राहायचो. म्हणजे आम्ही त्या आश्रम पध्दतीच्या नियमांचा भंग केला ना? बापरे... कुठे फेडायची ही पापं?
मी सर्टिफाईड उजवा (पण सनातनी नक्कीच नाही) आणि लिब्राण्डू तर नक्कीच नाही :)
14 Aug 2025 - 11:59 am | युयुत्सु
बापरे... कुठे फेडायची ही पापं?
तुम्ही पुरुष म्हणून मोक्षाच्या रांगेत लवकर नंबर लागायची शक्यता जास्त! तुमच्या पत्नीने, शिक्षणाच्या ओढीने आश्रम व्यवस्थेचे पालन केलेले नसल्याने मोक्षप्राप्तीची शक्यता कमी वाटते.
14 Aug 2025 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले
मला खरेच उत्सुकता आहे की तुमचे हे असे आकलन कोणत्या वाचनाने झालेले आहे !
कृपया संदर्भ द्यावा.
14 Aug 2025 - 12:05 pm | प्रसाद गोडबोले
1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह बाजूला सारून शांत चित्ताने विचार करू शकता ?
2.तुम्ही ज्याला सोड मुंज म्हणता त्याचे संस्कृत नाव समावर्तन आहे, त्याचा अर्थ "परत येणे" असा आहे. पूर्वी मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात , तेथून ते परत येत तेव्हा करत हा विधी.
हा संस्कार नाही. आणि हा विधी आईने करायचा नसून लग्न लावणाऱ्या गुरुजींनी करायचा असतो. आणि तसेही ते संस्कार नसल्यामुळे नाही केला तरी काही फरक पडत नाही.
3.गृहस्थाश्रमात शिकणे अपेक्षित नसावे हे तुम्ही कोठे वाचले ? कृपया संदर्भ द्यावा.
4.तुम्हाला पाप म्हणजे काय माहिती आहे का ? तुमची पापा पुण्य इत्यादी व्याख्या कोणत्या वाचनावर आधारित आहे ? गृहस्थाश्रमात शिकणे हे पाप आहे असे तुम्ही कोठे वाचले ? तुम्हाला कोणी सांगितले ?
5. तुम्हाला खरेच जाणून घेण्यात रस आहे का निव्वळ विषयांतर करायचे आहे अन्य लोकांच्याप्रमाणे ?
तुम्ही मनापासून प्रश्न विचारत असल्यास मी मनापासून अगदी प्रांजळपणे माझ्या आकलनानुसार उत्तर देईन. शिवाय माझी मते कोणालाही पटली पाहिजेत असा माझा अभिनिवेशही नाही.
हां, निव्वळ टाइमपास करायचा असल्यास, आमचा पास.
त्यापेक्षा आम्ही आम्ही आमचा लाँग वीकेंड वेगळ्या चिंतनात सार्थकी लाऊ.
14 Aug 2025 - 12:24 pm | चंद्रसूर्यकुमार
आपण असे करू शकतो असे प्रत्येकाला थोड्याबहुत प्रमाणात वाटत असावे. मात्र दुसर्या बाजूच्या व्यक्तीला मात्र समोरचा आपले पूर्वग्रह बाजूला करायला तयार नाही असे वाटत असावे. हे तुम्हाला किंवा अन्य कोणाला उद्देशून नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे.
मी कधी म्हटले तो विधी आईने करायचा असतो? सोडमुंज हा प्रकार माझ्या लक्षात नव्हता पण माझ्या आईच्या लक्षात होता. मुळात माझ्या लक्षातच नसल्याने तो करावा असे मी म्हणायचा प्रश्नच नाही. आईच्या लक्षात होते पण तिचा पण अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने तिने पण तो विषय काढला नाही. पण समजा तो विषय काढला गेला असता आणि माझी सोडमुंज झाली असती तर ती आईने केली असती असे मला वाटते असे कुठे लिहिले आहे?
तो केला नाही केला तरी इतर कोणाला काही फरक पडतो की नाही हा प्रश्नच माझ्यासाठी गैरलागू आहे. कारण मलाच मुळात फरक पडत नाही.
तसे नसेल तर उत्तम. मला वाटत होते की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार 'नॉन ओव्हरलॅपिंग' आश्रम आहेत.
बाकी मला असल्या गोष्टींमध्ये यापलीकडे रस नाही. इंटरेस्ट वाटून त्यात झोकून द्यावे असे कित्येक विषय जगात आहेत. माझ्यासाठी असले विषय त्यातील नक्कीच नाहीत. कदाचित मी खूप खालच्या पायरीवर असेन ही शक्यता आहे पण सो बी इट :)
14 Aug 2025 - 12:33 pm | प्रसाद गोडबोले
प्रांजळ प्रत्युत्तराबद्दल धन्यवाद !
इतकं सरळ साधं स्पष्ट बोलणं किती सोपं असतं ना . बघा आपल्या दोघांचाही वेळ वाचला.
मला काय तुमच्या किंवा कोणाच्याच मानगुटीवर बसून "शिकच आता" असे सक्तीचे करायचे नाही.
ज्याला हौस आहे तो करेल, हौस नाही तो करणार नाही.
ह्याही प्रतिसादात तुम्ही गडबड केली आहेच खालची पायरी वरची पायरी वगैरे ज्याला संदर्भ कोणते ग्रंथ आहेत अन् कोणते वाचन आहे की नुसतेच ऐकीव पूर्वग्रह आहेत देव जाणे !
पण सोडा . अध्यात्म ही गती नसून स्थिती आहे त्यामुळे तिथे वर खाली अशा पायऱ्याच नाहीत. ज्याला कळायचं त्याला कळतं. बाकीचे उगाच विषयांतर करत राहतात.
असो. दोघांचाही वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद.
14 Aug 2025 - 12:59 pm | प्रसाद गोडबोले
चुकीची दुरुस्ती
वरील प्रतिसादात " समावर्तन हा संस्कार नाही." असे मी लिहिण्याच्या ओघात लिहून गेलो आहे.
ह्यात काहीतरी गडबड होत आहे असे वाटल्याने काही शोधाशोध करून पाहिल्यावर लक्षात आले की समावर्तन हा 16 संस्कारांपैकी 1 संस्कार आहे.
मात्र ह्या संस्काराचा लोप झाल्याने काही पाप लागते अशा अर्थाचे मला काहीही सापडले नाही. (अजूनतरी.)
आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे तुम्ही हे काही मनातच नसल्याने तुम्हाला फरक पडत नाहीच.
तरीही लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
14 Aug 2025 - 7:41 pm | सुबोध खरे
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं !
परोपकार : पुण्य: पापाय: परपीडनं !
इतकं साधं स्वच्छ आहे
15 Aug 2025 - 10:33 am | चंद्रसूर्यकुमार
चुकीचे सांगितले तरी फार टेन्शन घेऊ नका.
मला झुमरीतलय्यामध्ये फारसा रस नाही त्यामुळे झुमरीतलय्याचे महापौर बबनराव झुंझारखाडे आहेत असे तुम्ही चुकून सांगितलेत आणि प्रत्यक्षात झुमरीतलय्याचे महापौर गुलाबराव काटेवाले आहेत असे सांगितलेत तरी तुम्ही मुळात चुकीचे सांगितले आहे हे मला कळायचेच नाही आणि कळले नाही किंवा झुमरीतलय्याचे महापौर कोण हे मला माहित नाही याचे फारसे वैषम्य मला नसावे :)
14 Aug 2025 - 9:53 am | युयुत्सु
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे !
स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग कोणता हे स्त्रियांनी शोधायचे की पुरुष सांगतील त्या मार्गावरून चालायचे, या वर थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.
14 Aug 2025 - 10:23 am | प्रसाद गोडबोले
मार्ग अनेक आहेत, मार्ग महत्वाचे नाही, गंतव्य प्राप्त झाल्याशी मतलब.
बाकी साधुसंतात समाजात लोक जाती पाती वरून भेदभाव करतात, तुम्ही स्त्री पुरुष असा भेदभाव करत आहात, दोन्ही वृत्ती समानच.
तरीही तुकोबांनी सरळ साधा सोपा मार्ग सांगितला आहे वरच . "नामस्मरण". नामस्मरणाचा अधिकार सर्वांना.
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार ।
बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
नामस्मरणाला दुषणे देऊन अन्य काही साधने करीन असे म्हणणाऱ्या व्यक्तीचा मार्ग अशक्यप्राय खडतर आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो मत स्त्री असो की पुरुष, शूद्र असो की ब्राह्मण. नामस्मरणाला दुषणे देणाऱ्या , थट्टा मस्करी करणाऱ्या माणसाचे तोंड देखील पाहू नये असे खुद्द तुकोबांनी सांगून ठेवले आहे.
बाकी जनाबाई, बहिणाबाई, अक्का स्वामी , वेण्णास्वामी ह्यांचे अभंग , मार्गदर्शन पाहू शकता.
मी ज्या अर्थाने स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्ष म्हणालो आहे त्या अर्थाचा एक बहिणाबाई ह्यांचा अभंग आहे तो हा पहा.
भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी ।
जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥
वत्सा साठीं देह अचेतन पडे ।
हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥
भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी ।
अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥
भ्रताराचें शेष न सांपडे तरी ।
पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥
चित्त हें भ्रताराविण जरी जाये ।
तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥
भ्रतारदर्शनाविण जाय दीस ।
तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥
बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण ।
ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥
14 Aug 2025 - 10:22 am | युयुत्सु
युवाल रॉबिचेक या व्यंगचित्रकाराची चित्रे मला खूप आवडतात-
14 Aug 2025 - 10:29 am | प्रसाद गोडबोले
मस्तच !
जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l
तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling हे असे वाचन कधीही उत्तम !
आजचा सुविचार : वाचेल ते वाचेल.
14 Aug 2025 - 10:30 am | प्रसाद गोडबोले
मस्तच !
जे ग्रंथीं जो विचार l वृत्ती होय तदाकार l
तरीही instagram सारख्या सोशल मिडियावरील doom scrolling पेक्षा हे असे वाचन कधीही उत्तम !
आजचा सुविचार : वाचेल तो वाचेल.
14 Aug 2025 - 10:34 am | विजुभाऊ
आम्हा अतीसामान्य जनांस समजेल असे लिवा की कायतरी.
पितॄ ऋण , देव रूण , ऋषी ऋण हे समजले.
पण यात शूद्र , वगैरे कुठे आले ते समजले नाही
14 Aug 2025 - 10:38 am | युयुत्सु
हे पहा - "आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत ."
14 Aug 2025 - 3:35 pm | सोत्रि
गंमत म्हणजे, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी साक्ष कोणाची तर तुकोबारायांची, ज्यांची गाथा सनातन धर्मविरोधी ठरवून बुडवायला लावली होती. त्या तुकोबारायांची, ज्यांनी त्यांच्या अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती.
- (अधर्मी) सोकाजी
14 Aug 2025 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले
पुरावा काय पुरावा काय पुरावा काय ???
मी फार पुर्वी २०२० मध्ये तुकोबांचे निवडक अभंग https://www.misalpav.com/node/47002 असा लेखनाचा एक धागा सुरु केला आहे . तुम्ही वरील विधानाला समरथन देणारे तुकोबांचे अभंग तिथे पुराव्यादाखल टाकावेत ही कळकळीची विनंती आहे.
तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार कित्येकवर्षे चालु आहे त्याला पुराव्यादाखल असा घाणेरडा अपप्रचार करणार्यांनी किमान काही तरी तुकोबांचे अभंग सादर करावेत .
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥
तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥
तुकोबा अतिषय स्पष्टपणे वर्णाश्रम धर्माचे आचरण करा , विधीनिषेध पाळा असे म्हणत आहेत . तुम्ही लोकं जाणीवपुर्वक तुकोबांच्या नावावर काहीही खपवता हे फार वेदनादायक आहे .
माझे लेखन, आणि त्यावर येणारे तुमचे हे असले प्रतिसाद. ह्या असल्या तुमच्या अपप्रचारला मी निमित्तमात्र व्हायला नको.
बास झालं .
14 Aug 2025 - 6:29 pm | सोत्रि
सदर धागा
# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
असल्याने प्रतिसादही स्वान्तःसुखाय आहे, सबब पुराव्याच्या उत्तरदायित्वास नकार लागू!
- (स्वान्तःसुखी) सोकाजी
15 Aug 2025 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुकोबा विद्रोही होते त्यांनी धर्मावर टीका केली असा जो अपप्रचार =))
'सनातनी' लेंड्या टाकणा-यांना सगळं जग सनातनी दिसतं. संत तुकाराम हे 'सनातनी' होते अशा अपप्रचाला कोणीही बळी पडू नये म्हणून वाचकांना विनंती की, थेट तुकोबांची गाथा वाचावी. आजच्या काळात कोणासही बदनामी करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. संत श्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाच्या वाचनाने तुकोबा कोण होते हे, वाचकांच्या लक्षात येईल. वाचकांनी आ.ह.साळुंके यांचे 'विद्रोही तुकाराम' ही वाचून काढावे. संत तुकारामांना विद्रोही का म्हटल्या जाते तेही लक्षात येईल. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरापासून पासून ते संत तुकारामापर्यंत मोठा वारकरी संप्रदाय आणि थोर संत होऊन गेले. संत तुकाराम वेगळे आणि विद्रोही का वाटतात ते आजही तीनशे वर्षानंतर लक्षात येईल. समतेचा पुरस्कार करणे हा तत्कालीन व्यवस्थेने गुन्हा माणून त्यांच्या वह्या सनातन्यांनी इंद्रायनीत बुडवायला लावल्या. नशीब आपलं की त्यांच्या वह्या लोकगंगेने तारल्या. बाय द वे, 'गोबरयुगात' सनातनी सगळंच कसं श्रेष्ठ होतं, श्रेष्ठ ते आपलं म्हणनारे 'पोटूशी पुरुष' आंतरजालावर जागोजागी दिसतील त्यावर विश्वास ठेवू नका. 'बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणनिया' श्रेष्ठ संत तुकाराम आधुनिक विचारांचे श्रेष्ठ संत होते. मोठा विषय.
'चिरगुटे घालुनि वाढविले पोट, ग-हवार बोभाट जनामधे
लटिके चि डोहळे दाखवी प्रकार, दुध स्तनी पोर पोटी नाही
तुका म्हणे अंती वांज चि ते खरी, फजिती दुसरी जनामधे'
प्रतिसाद स्वातंसुखाय आहे, 'सनातनी' लोकांनी उपप्रतिसादाच्या लेंड्या टाकू नयेत. बाय द वे, अशा 'सनातनी आणि वांज पोटूशी पुरुषां' पासून वाचकांनी दूर राहावे, एवढीच विनंती. =))
-दिलीप बिरुट
15 Aug 2025 - 7:21 pm | Bhakti
मी गाथा मंदिर दोन महिन्यांपूर्वी पाहिले...नाही वाचूनच काढले.तब्बल १/२ तास शांतपणे पाहत होते (एकटीच गेली असते तर कदाचित २ तास तरी अजून निवांत वाचले असते.)
तुकारामांनी तत्कालीन कित्येक ढोंगी,अघोरी प्रथांवर घणाघाती वार केले हे लगेच समजले.खरचं ते विद्रोही होते.
पण सर्वच संतांमध्ये जो गुण ठासून भरलेला असतो तो म्हणजे अव्यक्ताशी एकरूप तोही त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता तोहि वेदांचा अभ्यास न करता.
माऊलीही तसेच,कल्पद्रुमाचिये तळी हे ढेरे यांचे माऊलींवरचे सुंदर पुस्तक वाचत आहे.माऊली स्वतः कौलमता परंपरेतील,त्यातही काही अघोरी प्रथा असायच्या पण माऊलींनी नीरक्षीरविवेकाने यांना दूर ठेवत शुद्धीकरण केले आणि भागवत धर्म सर्वांना खुला केला.
या संतांच्या बदलानेच आजचा महाराष्ट्र घडला आहे,शुद्ध हेतू असल्यास माणसाने बदलाला ,बदल घडवायला घाबरू नये.
14 Aug 2025 - 7:32 pm | मूकवाचक
तुकोबारायांनी अभंगांत समाजातील अन्याय, ढोंगीपणा, जातीभेद आणि धार्मिक आडंबरावर, कर्मकांडावर कठोर टीका होती - _/\_
त्यांची साक्ष याच हेतूने कुणी काढत असेल, तर रास्त आहे. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी, जातीय द्वेष पसरवण्यासाठी करण्यासाठी किंवा झुंडशाही बळकट करण्यासाठी तुकोबारायांची साक्ष काढली जाणे दुर्दैवी आहे. एरवी तर्क, बुद्धीप्रामाण्य वगैरेचा धोशा लावणारे आणि 'सिलेक्टिव रिडींगचा" निषेध करणारे या बाबतीत चिडीचूप बसतात हे अधिकच दुर्दैवी आहे. असो.
15 Aug 2025 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू । अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ।
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती.
-संत तुकाराम.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2025 - 10:57 pm | भृशुंडी
हे परस्पर ठरवून मोकळं झाल्यावर स्त्रियांनी काय करायचं?
हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल?
मोक्ष नको म्हणून बाजूला होईल.
15 Aug 2025 - 7:11 am | युयुत्सु
चपखल!
15 Aug 2025 - 2:45 pm | स्वधर्म
>> हे असलं माहिती असेल तर कुठलीही स्त्री कशाला सनातन धर्माच्या वाटेला जाईल?
नुकत्याच दुसर्या धाग्यावर आलेल्या अनुभवानुसार हे असं नाही, एवढेच म्हणतो.
15 Aug 2025 - 11:28 pm | भृशुंडी
१. "पूर्वजांनी क्षयज्ञ व्यवस्था केली आहे, म्हणून ती खरी आणि योग्य आहे."/ बाबा वाक्यं प्रमाणं - आता पुरे.
हे प्रकरण थांबवा. पूर्वजांनी तेव्हाच्या काळी शक्याशक्यतेची काही बांधणी करून एक व्यवस्था निर्माण केली (करण्याचा प्रयत्न केला).
तो आता १०००-२००० वर्षं किंवा आणखी जास्त कालावधीनंतर योग्य आहे - हे "पटवून" घेण्याचा आग्रहाभिनिवेश कशाला?
२. संस्कृती प्रवाही असते, किंबहुना असावी. अशा प्रवाहाला पुन्हा मूळ जागी नेण्याचा उपद्व्याप कशासाठी?
तेही मूळ काय- हेच ठाऊक नसताना. १०० ग्रंथ लिहिल्याने मूळ संस्कृतीचं साकल्य जपलं जाऊ शकत नाही. त्याचे थोडेफार अंश आपल्याला त्या शाब्दिक रचनेत दिसतात आणि त्यालाच प्रमाण मानून पुढे जाणं हे फारच ढोबळ आहे.
३. अध्यात्म आणि व्यवहार/कायदे ह्यातला फरक -
एक तर हे अध्यात्म -म्हणजे मोक्षप्राप्ति इत्यादीपुरतं सीमित असू दे किंवा मग सरळ कायद्याची भाषा असू दे- कलम/अॅक्ट अशा तपशीलात बोला.
दोहोंची सरमिसळ नको.
अध्यात्मप्राप्तीसाठी जनांनी (विषेश करून ज्यांना नियम बनवण्याचा हक्क नाहे अशांनी) कसं वागावं आणि काय करावं हे सांगणं ढोंगी आहे.
असो.
प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, स्वांतसुखायची "आमची कुठेही शाखा नाही"वाली पाटी अगोदरच वर लावली आहे.
15 Aug 2025 - 11:45 pm | कॉमी
परफेक्ट.
एकाच वेळी म्हणतात मटेरियलीस्ट जीवनात मुक्ती नाही.
त्याग करा.
पण स्त्रियांचा मोक्ष कशात म्हणे तर लगीन करण्यात.
ख्या ख्या ख्या.
16 Aug 2025 - 10:24 am | चंद्रसूर्यकुमार
मागे मी मिपावरच एके ठिकाणी लिहिले होते की माझा भारतीय लेखकांविषयी एक आक्षेप असतो आणि तो म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे हे स्पष्टपणे कधीच न लिहिता ते गोलमटोल लिहितात. मोक्ष म्हणजे एखादी जागा आहे का की जिथे एकदा गेले की आपले सगळे काही झाले? आणि तिथे जायला संन्यास घेतलाच पाहिजे, संन्यास घेतला नसेल तर मुलगाच (मुलगी पण चालणार नाही) नसेल तर तुम्हाला नो एन्ट्री. ते काय दिल्लीतले रेस्टॉरंट आहे का भारतीय वेशभूषा असेल तर प्रवेश नाकारणारे?
मोक्ष ही एक अवस्था आहे असे तुम्हीच लिहिले आहे ते अधिक लॉजिकल वाटते. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी इतक्या पन्नाशसे साठ अटीशर्ती असतील तर जल्ला नको तो मोक्ष असेच अनेक सामान्यांना वाटायची शक्यता आहे. निदान मला तरी वाटते. त्यापेक्षा मग परदेशी तत्वज्ञ वेन डायर म्हणतात ते अधिक पटते-
आणि कोणते चॉईस करायचे? तर एकहार्ट टोलींनी म्हटल्याप्रमाणे वर्तमानात राहा

आणि मनात उठणार्या विचारांच्या कल्लोळापासून आपल्याला मुक्त करणे.

कदाचित तुम्ही ज्याला संन्यास म्हणत असाल ते यापेक्षा वेगळे नसेलही. वेन डायर, एकहार्ट टोली वगैरे परदेशी तत्वज्ञांचे लेखन वाचताना असे जाणवते की कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याच तत्वज्ञानात सांगितलेल्या आहेत- त्या गोष्टी कुठेतरी रिलेटेबल वाटतात पण कितीतरी अधिक सोप्या आणि अशा अटीशर्ती न लादता.
तुम्ही हे सगळे लिहिले आहे- अमुक केले नाही तर मोक्ष मिळायचा नाही, मोक्ष मिळायला संन्यास घेतला पाहिजेच पण तुम्हाला मोक्ष म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय अभिप्रेत आहे हे लिहायला नको का? इथे परदेशी तत्वज्ञ अधिक भावतात. कोणतेही जडजंबाल शब्द न वापरता आपण काय करायचे ते ते लोक बरोबर सांगतात. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या तत्वज्ञानात ते सांगितलेले नाही असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा या अशा लेखांविषयी आहे.
16 Aug 2025 - 12:34 pm | युयुत्सु
श्री० गोडबोले आणि भगव्या गॅंगमधील यच्चयावत् सनातनी यांचा गोग्गोड वैचारिक गैरसमज झालेला असतो, तो समजाऊन सांगण्यासाठी एका प्रसंगाची आठवण सांगणे आवश्यक आहे.
छद्मविज्ञानभूषण, फेकाफेकचूडामणी डॉ० प० वि० वर्तक यांच्या अनुयायांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि सत्कार आयोजित केला होता. त्यांच्या सत्काराला करवीरपीठाचे शंकराचार्य मुख्य पाहूणे म्हणून बोलवले होते.
मला त्या दिवशी प्रचंड कंटाळा आला होता, कशातही मन रमत नव्हते म्हणून जरा ऑफ-बीट करमणूक करून घेण्य़ासाठी मी वर्तकांच्या सत्काराला हजेरी लावण्य़ाचे ठरवले.
मी बालगंधर्ववर पोचलो तेव्हा मला काही धक्के बसले. मला वाटले की फार गर्दी नसेल, पण अमाप गर्दी लोटली होती. माझ्या "आउटलायरत्वाची जाणीव" होऊन मी शरमिंदा झालो आणि शेवटच्या रांगेत कशीबशी जागा मिळवली आणि करमणुकी ऐवजी सहनशीलतेची परिक्षा दिली.
त्या कार्यक्रमात शंकराचार्यांनी बोलता-बोलता एक वाक्य टाकले. ते म्हणाले,
"परंपरेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत."
माझ्या दृष्टीने यच्चयावत सनातनी लोकांच्या भाबड्या श्रद्धांना बळकटी देणारे हे वाक्य आहे. साहजिकच अशा श्रद्धांच्या मशागतीने समाजाची दोन अभेद्य गटात विभागणी होऊन एका कटु संघर्षाला तोंड फुटते, ज्याने सध्या परमोच्च बिंदू गाठला आहे.
गोडबोल्यांसारखे लोक उतरंडप्रधान कुटुंब/समाजव्यवस्थेत जो त्याग सदस्यांवर लादला जातो त्याचे केवळ समर्थन करून थांबत नाहीत तर उदात्तीकरण करण्यात आपले सर्वस्व पणाला लावतात आणि हे करताना एक अक्षम्य चूक करतात. ती अशी,
आपण सकाळी उठतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपले मन प्रसन्न होते. पण प्रत्यक्षात तो किलबिलाट पक्ष्यांच्या भीषण जीवनसंघर्षाची सुरुवात असते. सर्व सनातन्यांची छाती इतिहासातील सोन्याच्या पानांनी भरून येते, तेव्हा लादलेल्या त्यांगांचे (पक्षी-शोषणांचे) आक्रोश (किलबिलाट?) त्यांना कधीच ऐकू येत नाही. मग त्यांना जे परंपरा-पुरस्कृत उतरंड, तसेच परंपरेने शोधलेली उत्तरे स्वीकारू शकत नाहीत, ते धोकादायक वाटायला लागतात.
मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी अनेक ठिकाणी आवश्यक असतात. पण उतरंड लादणे मला मान्य नाही. कोणती उत॒रंड स्वीकारायची (माझ्या डोक्यावर कुणी बसायचे) हा माझा चॉईस असला पाहिजे. कुणा सोम्या-गोम्या स्वयंसेवकाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नाही...
16 Aug 2025 - 7:22 pm | सोत्रि
तंतोतंत!
- (आउटलायर) सोकाजी
16 Aug 2025 - 8:41 pm | चंद्रसूर्यकुमार
म्हणजे काय? तर थोडक्यात मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय करायचे हे दुसरा कोणीतरी सांगणार. मला काय करावेसे वाटते, माझी इच्छा काय आहे, माझी आवडनिवड कशात आहे या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारायच्या. आणि परत दुसर्या तोंडाने हिंदू धर्म कसा सहिष्णू आणि व्यक्तीस्वातंत्र्य जपणारा म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची.
बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य. सगळ्यांना न्युक्लिअर फ्युजन आणि फिशन वगैरे गोष्टी कळायची गरज नाही हे नक्कीच. एखाद्याला त्या क्षेत्रात गती आहे की नाही हे तपासायचे परीक्षा वगैरे मार्ग आहेत. ते सगळे फाट्यावर मारून कोणाला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही हे दुसरा कोणीतरी सांगणार आणि सगळ्यांनी त्याप्रमाणेच वागायचे या रचनेला.
16 Aug 2025 - 9:00 pm | कॉमी
.
17 Aug 2025 - 4:21 pm | स्वधर्म
>> बरं त्यावेळी जी कोणती कारणे असतील त्यासाठी अशी रचना केली असेल पण आताच्या काळात ती रचना अगदी पूर्ण कालबाह्य आहे हे समोर दिसतच आहे. तरीही त्याचे समर्थन करत राहिल्याने तुमच्यासारखे लोकच हिंदू धर्माला शिव्या घालायला डापु लोकांच्या हातात आयते कोलित देत असतात असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
हिंदू धर्मग्रंथ लोकांना चार वर्णाचे मानून मग कोणी काय करावे याचे नियम घालून देत असतील तर त्यात तुंम्हाला नक्की काय खटकण्यासारखे आहे? तुंम्ही पण लोकांना डापु नावाच्या एका वर्णातच टाकले आहे ना? ते कसे असतात, काय विचार करतात याचे तुमच्याही मनाचे श्लोक तयार आहेतच. मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.
19 Aug 2025 - 6:16 pm | स्वधर्म
वरील प्रतिसादात 'मूळ स्वभाव तोच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.' या वाक्यात माझी चूक झाली आहे. स्वभाव म्हटल्यामुळे तो प्रतिसाद व्यक्तीशी जोडला जातो. चंद्रसूर्यकुमार यांच्या स्वभावाविषयी काहीच म्हणायचे नव्हते.
योग्य वाक्यरचना अशी हवी होती:
'मूळ विचारसरणी तीच आहे, फक्त वर्णांची नांवे दुसरी आहेत.'
तसेच प्रतिसादाचे शीर्षक 'मूळ विचारसरणी' असेच हवे होते. त्याबद्दल दिलगिरी.
19 Aug 2025 - 9:17 pm | चंद्रसूर्यकुमार
यात एक मोठा फरक म्हणजे डापु हा वर्ण जन्माने येत नाही आणि त्या विचारांमुळे किती नुकसान झाले आहे हे समजल्यावर माणूस त्या तथाकथित वर्णातून बाहेर पडू शकतो. म्हणजे डापु हा स्टॅटिक प्रकार नाही तर डायनॅमिक आहे तर जन्माने मिळणारे वर्ण हे स्टॅटिक आहेत.
हे बरोबर उलटे आहे. म्हणजे एखाद्याला आधी डापु ठरवून मग ते कसे असतात, काय विचार करतात हे मनाचे श्लोक तयार करत नाही तर मला अभिप्रेत असलेली डापुपणाची लक्षणे एखाद्यात दिसली तर त्याला डापु म्हणतो. त्यातूनही वर म्हटल्याप्रमाणे काही लोक आयुष्यभर डापु असतात तर काही त्यातून बाहेर पडतातही.
बाहेर पडलेल्यांमध्ये काही अंशी मी स्वतः पण आहे. म्हणजे मीच माझे पूर्वीचे विचार तपासून बघतो तेव्हा पूर्ण डापु होते असे म्हणणार नाही पण डापुपणाकडे काही अंशी झुकणारे नक्की होते. माझ्या जवळच्या अती जास्त प्रमाणावर हिंदू-हिंदू करणार्या नातेवाईकांविरूध्दची ती प्रतिक्रिया होती असे आता मला जाणवते. पण नंतर तटस्थपणे विचार केल्यावर इतर कोणी काही केले म्हणून त्याविरूध्द प्रतिक्रिया येणे योग्य नाही हे मला पण जाणवले. आजही- अगदी याच लेखावरील प्रतिक्रियेत लिहिले आहे की मला भारतीय लेखकांपेक्षा परदेशी लेखक अधिक आवडतात कारण भारतीय लेखक अनेकदा नक्की काय करायचे हे न सांगता गोलमटोल काहीतरी सांगतात. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या लेखकांना आमचा धर्म किती महान, आमची संस्कृती किती महान या वेदकालीन जंगलात भटकायचा इन्सेन्टिव्ह असतो आणि अनेकदा ते तसे करतातही. त्यात मुळातला मेसेज बाजूला पडतो. त्या तुलनेत मी वाचतो त्या परदेशी लेखकांना भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्म किती महान याच्या चिपळ्या वाजवत राहायचे काहीही कारण नसते. त्यामुळे ते लेखन अधिक प्रभावी वाटते (मला तरी). हे वेदकालीन जंगलात भटकणार्यांना मान्य होईल का?
मी असे काही लिहिले की डापुवाले मला त्यांच्यातला समजतात आणि त्यांच्यावर टिका केली की एकदम सनातनी लोक मला त्यांच्यातला मानतात. पण असो. सो बी इट.
17 Aug 2025 - 10:48 am | युयुत्सु
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही हे अगदी मान्य.
या विधानाचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो. आपली ज्ञानाची भूक जशी असेल तशी ज्ञानोपासना कुणीही करावी. ती योग्य्/अयोग्य हे तिर्हाईताने ठरवणे चुकीचे आहे.
एका तरूण डॉकटरशी गप्पा नुकताच मारायचा योग आला. मग मी माझे निरीक्षण सांगितले (की डॉ०ना सजग आणि हुशार रूग्ण आवडत नाहीत). सदर डॉ०ने सांगितले की, "नव्या पिढीतले डॉ० बरेच वेगळे आहेत. त्यांना पेशंट वाचून आला असेल तर फारसे वावडे नसते. ही काळाची अपरिहार्यता आहे आणि डॉ०नी स्वीकारणे आवश्यक आहे. काय वाचायचे ते वाचा आणि विचारायचे ते विचारून घ्या. काही प्रॉब्लेम नाही".
हे ऐकल्या क्षणी माझ्या मानगुटीवरचा वेताळ "उल्लसित" मनाने झाडावर जाऊन लोंबकळू लागला...
17 Aug 2025 - 12:34 pm | चंद्रसूर्यकुमार
तेच तर म्हणत आहे. हे तिर्हाईताने ठरवू नये. पण त्या बरोबरच ज्ञानोपासना करायची फार इच्छा आहे पण त्या विषयात गती नसेल तर अशा व्यक्तींचे काय करायचे? मला समजा न्युक्लिअर फिशन आणि फ्युजनमध्ये सखोल ज्ञान घ्यायची इच्छा फार आहे पण १२ वी च्या बेसिक कॅल्क्युलसमध्येच मी अडखळत असेन तर त्यापेक्षा कितीतरी जास्त क्लिष्ट गणिते कशी समजणार आहेत?तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. सगळे सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत कारण तितके पुढे जाण्यासाठी मुळात त्या विषयात गती असावी लागते. ती गती आहे की नाही हे कसे जोखायचे? तर प्रवेश परीक्षा किंवा अन्य जो काही मार्ग असेल तो. आता समजा एखादा सचिन तेंडुलकर बनू शकत नसेल पण रामानुजन बनू शकत असेल तर त्याला क्रिकेटऐवजी गणितात ज्ञानोपासना करायचा मार्ग मोकळा असला पाहिजे. तू रामानुजन बनू नकोस तर तू अमुक एक म्हणून जन्मलास किंवा आयुष्याच्या अमुक एक टप्प्यावर तू आहेस म्हणून कुमार सानू बन असे इतरांनी मला सांगायचे नाही. मुख्य आक्षेप त्याला आहे.
बाकी वर उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे न्युक्लिअर फिशन आणि फ्युजन वगैरे विविध क्षेत्रातील क्लिष्ट संकल्पनांचा ९९.९९% लोकांना त्यांच्या त्यांच्या कामात काहीही उपयोग नसतो. त्या संकल्पना नाही समजल्या तरी हरकत नाही. मात्र एखाद्याला त्या विषयात गती असेल आणि आवड असेल तर त्याला अडवायचा अधिकार इतरांना नाही हे पण तितकेच खरे.
17 Aug 2025 - 4:14 pm | युयुत्सु
मुख्य आक्षेप त्याला आहे.
मुद्दा समजला आहे. चिंता नसावी.
19 Aug 2025 - 11:23 am | अप्पा जोगळेकर
कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीची पीछेहाट होत असताना उगाच रामशास्त्री बाणा दाखवून उजव्या,सनातनी विचारवाल्या लोकांचे दोष काढत बसने आणि डाव्या लोकांना आयते मुद्दे मिळवून देणे ही विज्ञाननिष्ठ हिंदूंची खोडच आहे. तुम्हाला पटत नाही तर शांत राहू शकता.
मुद्दा चूक कि बरोबर हा प्रश्न इथे गैरलागू आहे narrative तयार होणे हा मुख्य मुद्दा आहे.
सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना.
एका मोठ्या पुरोगामी नेत्याच्या घरात तंत्रमंत्र वाले इंद्रजालचा फोटो काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता आव्हाड साहेबांच्या घरी शंकर महाराजांचा फोटो एका पत्रकाराने फोटोत पकडला होता विश्वंभर चौधरींच्या घरी सत्यनारायण की मुंज तत्सम कोणतातरी विधी बहुधा लपून झाला होता आणि हे त्यानी स्वतः मान्य केले.
प्रभू श्रीराम काल्पनिक पात्र आहे, वारकरी वैष्णव नसतात म्हणणारे लोक वारीत चिपळ्या घेऊन राम कृष्ण हरी म्हणतात. त्यांना हे सगळे विसंगत वर्तन चालते
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
19 Aug 2025 - 11:45 am | आग्या१९९०
बरोबर आहे. वैचारिक दिवाळखोरीने श्रीमंत असल्यास परवडू शकते.
19 Aug 2025 - 3:25 pm | युयुत्सु
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना मात्र कर्मकांडावर टीका करण्याची, चुका शोधण्याची किंवा आपण चालीरीतींपासून कसे फटकून असतो हे दाखवण्याची खोड का आहे कळत नाही. यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
विज्ञाननिष्ठ म्हटल्यावर चिकित्सा ही अपरिहार्य ठरते. तीची जर अॅलर्जी असेल तर तो तुमचा पराभव आहे.
सनातनी धर्मातले अमुक मत पटले नाही किंवा तमुक आश्रम पाळला नाही म्हणून सर तन से जुदा तर होत नाहीये ना.
हे जरी नसले तरी तितकेच प्रतिगामी घातक विचार परत समाजात रूजवले जात आहेत आणि ते घातक आहे. २०२४ निवड्णूकीच्या आधी हा उन्माद पराकोटीला पोचला होता. मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून मुलींना शिकवू नका (शिकलेल्या मुलींशी कसं वागायचे याबद्दल चकार शब्द कुणी काढलेला आठवत नाही. मुलीने माहेरचे पाश तोडायचे पण मुलाने आईचा पदर सोडायचा नाही!), "कन्यादाना" सारख्या टाकाऊ आणि अपमानकारक विधींचे उदात्तीकरण, पश्चिमेकदून आलेल्या ज्ञानाबद्दल विष भिनविणे, पेटंट इकॉनॉमी ऐवजी टेंपल इकॉनॉमीला उत्तेजन, विश्वगुरु सारख्या भ्रामक कल्पना, तसेच मुक्त कलाविष्कार आणि चर्चा यावर अर्धवट डोक्याच्या लोकांकडून नियंत्रण ठेवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न केला गेला. आणि इतकं करून ही एका प्रश्नाचं उत्तर मिळालच नाही ते नाहीच - सनातन धर्माची कोर्टात/संसदेत टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही.
गंमतीचा भाग असा की मंदबुद्धी लोकांचा लोकाचार जितका सनातन आहे, तितकीच विज्ञाननिष्ठांची चिकित्सकबुद्धी सनातन आहे.
यापेक्षा धर्मभोळे, उठल्यासुटल्या देवाला नवस बोलणारे ,संकटात देव पाण्यात बुडवून ठेवणारे लोक कधीही परवडले.
कारण साधे आहे - असे लोक नियंत्रणात ठेवायला सोपे असतात.
19 Aug 2025 - 9:27 pm | चंद्रसूर्यकुमार
हे नक्की का? वोक लोक किती प्रमाणावर आहेत हे माहित आहे ना?
मी उलट म्हणतो. डापुंना ठोकायला इतर कितीतरी जास्त व्हॅलिड मुद्दे आहेत. त्यावर त्यांना होईल तितके मी पण ठोकत असतो. पण तसे करताना उगीच काही असमर्थनीय गोष्टींचे समर्थन करायला गेल्यास आपणच उलट त्यांना हिंदूंना ठोकायची संधी देत असतो.
मान्य. तसे असेल तर नरेटिव्ह तयार करताना आपल्या बळकट आणि डापुंच्या कमकुवत मुद्द्यावर नरेटिव्ह बनवायला हवा. ते न करता आपण आपल्याच कमकुवत बाजूचे समर्थन करत राहिलो तर आपल्याच बाजूचे नुकसान होते.
नाहीच. पण म्हणून तमुक आश्रम पाळणे २०२५ मध्ये कसे योग्य हे पण बोलायची गरज नाही ना?
असो.
17 Aug 2025 - 4:06 pm | स्वधर्म
गोडबोले यांनी हा लेख लिहून फारच उपकार केले आहेत. आणखी असे लेख लिहून प्रबोधन करावे अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आमच्या सांगलीचे प्रा. जगदीश काबरे म्हणतात की आपल्या मुलांना, खास करून मुलींना आपले धर्मग्रंथ वाचायला जरूर प्रोत्साहन दिले पाहिजे. मग त्यांना कळेल की ते किती विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर आहेत. अशा लेखाने गोडबोले यांनी ते साध्य केले आहे.
25 Aug 2025 - 12:19 pm | प्रसाद गोडबोले
नक्की लिहित राहीन.
मला जे जसे समजते तसे मनापासून मी लिहितो. कोणाला पटो अथवा न पटो.
धर्मग्रंथात जसे लिहिलं आहे तसे मी लिहितो, चुका झाल्यास प्रांजळपणे कबूलही करतो.
ज्यांना माझे निष्कर्ष चुकीचे वाटतात ते मला अधिक माहिती संदर्भासहित देतात तेव्हा ते वाचून मी माझे आकलन बदलतो किंवा सुदृढ करतो.
ज्यांना धर्मग्रंथ विषमतामूलक, अन्यायकारक आणि भयंकर वाटतात त्यांना हिंदू धर्माचा त्याग करायची संपूर्ण मुभा, स्वातंत्र्य आहेच ! त्यांना प्रोत्साहनच आहे माझे. सुखाने निश्चिंत होऊन धर्मांतर करा ! खुश राहा.
सनातन धर्म व्यवस्था ... आहे हे असे आहे ... Take it or leave it.
मी नक्की लिहित राहीन !!
धन्यवाद
18 Aug 2025 - 11:56 pm | अर्धवटराव
एक उणीव जाणवली..
धर्मशास्त्राची उकल करताना नाममार्गाचा उहापोह सुरु झाला त्यावेळी हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीट ला घातल्या सारखी वाटली.. अपघाताची शक्यता…
19 Aug 2025 - 1:58 pm | सोत्रि
अर्धवटराव,
खरतर इथून हाय वे वरुन गाडी इण्डीकेटर न देता सरळ एक्सीटला गेली आणि खाचखळग्यांचा प्रवास सुरु झाला. नाममार्गाचा उहापोह झाला तेव्हा गाडी पंक्चर झाली होती.
- (खाचखळग्यांचा प्रवास आवडणारा) सोकाजी
19 Aug 2025 - 8:29 pm | अर्धवटराव
गाडी बहुतेक इन्डी़केटर वापरतच नाहिए :)
स्वान्तसुखाय लेखन असल्यामुळे लेखकाला ति लिबर्टी आहे म्हणा. उपोत्घाताशिवाय कादन्बरी प्रकाशीत व्हावी तसे काहिसे झाले आहे.