आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
8 Aug 2025 - 6:37 pm

नमस्कार मंडळी
हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच.

तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता. सॅम पित्रोदांच्या कृपेने १९९२ मध्येच टेलीकॉम क्रांती झाली होती त्यामुळे निदान जागोजागी एस टी डी बूथ असायचे. त्यामुळे मुंबई चेन्नई किंवा मुंबई दिल्ली कॉल सर्रास झाले होते. पण त्याला पैसेही तसेच लागत . शिवाय त्यावेळेस बऱ्याच कंपन्या बी एस एन एल च्या लीज लाईन घेऊन वाईड एरिया नेटवर्कने आपापल्या ब्रॅंचेस जोडत चालल्या होत्या. (एक गमतीशीर आठवण म्हणजे त्यावेळेस मुंबई चेन्नई सारख्या ६४ के बी पी एस लीज लाईनला जवळपास १.५ लाख रुपये १ वर्षाचे भाडे होते.). तर आमची कंपनी हे वाईड एरिया नेटवर्क करून द्यायचीच पण त्यावर "व्हॉइस ओव्हर आय पी " चे प्रोग्रामिंग करून द्यायची जेणेकरून कंपनीला लॉन्ग डिस्टन्स कॉलिंग (जास्त करून बँक हेड ऑफिस आणि ब्रॅंचेस वगैरे) फुकटात करता येई. हे नेटवर्क बी एस एन एल च्या टेलिफोन नेटवर्क पासून वेगळे ठेवावे लागे कारण नाहीतर त्यांचा महसूल बुडेल. असे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हाही दाखल करायची सोय होती. आता हे कसे होई? तर बी एस एन एलची लाईन वापरून मुंबई चेन्नई थेट कॉल करायला समजा १०० रुपये लागत असतील, आणि माझे एक ऑफिस मुंबई आणि दुसरे कोईमतूरमध्ये आहे. जर कोईमतूर ऑफिसात मी एकाच राउटर वर लीज लाईन आणि बी एस एन एल ची लाईन एकत्र आणली तर "टोल बायपास " होऊन मला फक्त कोईमतूर ते चेन्नई बिल लागेल. हा गुन्हा आहे. तरीही काही लोक अशी अनधिकृत एक्सचेंज चालवायचे ज्याला "खाचे का फोन" म्हणत. आणि ती पकडलीही जात.

तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. तोवर रिलायन्स देशभर आपले फायबरचे जाळे विणत होती. ते विणून होत गेले आणि सध्या जशी धूम ए आय ने माजली आहे तसेच काहीसे झाले. एकतर त्यांना परवाने मिळण्यात आणि तांत्रिक गोष्टीत वेळ लागत असल्याने त्यांनी पर्यायी डब्लू एल एल (वायरलेस इन लोकल लूप ) हे तंत्र वापरून आपले सी डी एम ए आधारित मोबाईल बाजारात आणले. ते ज्यांनी वापरले आहेत त्यांना ते कसे गरम व्हायचे , कॉल कट व्हायचे वगैरे आठवतच असेल. पण जे काही असेल ते, त्यांनी मोबाईल सामान्य माणसाच्या हातात पोचवला हे मानायलाच हवे. त्यामुळे व्होडाफोन (त्यावेळचे हचिसन मॅक्स किंवा हच किंवा ऑरेंज किंवा आताचे व्होडाफोन किवां व्ही ), बी पी एल वगैरे कंपनीची तंतरली. तसेच एस टी डी /आय एस डी ची ही मृत्युघंटा वाजली. मोबाईल कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाले आणि सामान्य माणसाला त्याचा फायदा होत गेला. घरटी एक लॅण्डलाइन पासून ते माणशी एक मोबाइलपर्यंत प्रवास होत गेला. पुढे त्याच्यात आयडिया, एअरटेल, एअरसेल, टेलिनॉर, युनिनॉर ,डोकोमो वगैरे अनेक स्पर्धक आले आणि टिकले किंवा गेले.

मात्र अजूनही कॉर्पोरेट कंपन्यात लॅण्डलाइनचा वापर बराच होता. म्हणजे टेबलावर असताना फोन आणि बाहेर असताना मोबाईल असा दुहेरी वापर. कारण किंमत अजूनही आवाक्यात अली नव्हती. समोरच्याला कॉल करून कट करणे, म्हणजे पैसे वाचतील असे प्रकार (विशेषतः: मुलीने मुलाला कॉल करून कट करणे :) चालायचे. हळूहळू किमती कमी होता गेल्या तसे १५-१६ रुपये इनकमिंग /आऊटगोइंग पासून १ रुपयांपर्यंत किमती उतरल्या.

हे साधारण वर्ष २०१० होते. अजूनही लोक बटणाचा नोकिया फोन वापरात होते आणि बाजारात स्मार्ट फोन या प्रकरणाचा प्रवेश झाला. बटनवाले फोन वापरण्यापेक्षा हे भारी होते, किमतीही आवाक्यात होत्या त्यामुळे मागणी वाढत गेली. पण या फोनचे करायचे काय ? हे कोणालाच माहित नव्हते. बहुतेक लोक अजूनही मेल बघायला कॉम्प्युटर आणि कॉल करायला स्मार्ट फोन वापरत होते. फारतर गाणी ऐकायला.

मोबाईल वापरले तरीही परदेशी कॉल करणे कठीण आणि महागच होते त्यामुळे व्होनेज,स्पिंट वगैरे सारख्या इंटरनेट आधारित टेलिफोन सेवा जोरात होत्या . यामध्ये एकदाच महिन्याचे पैसे भरा आणि २४ तास बोला अशी सोय होती. त्यामुळे अमेरिकेत राहून मुली आईला फोन लावून आणि तो कानाला लावून सूचनेबरहुकूम भाजी फोडणीला टाकू की नको, मीठ किती, कांदा हवा की नको वगैरे बिनधास्त बोलू लागल्या. तोवर गुगल याहूनही व्हॉइस सेवा सुरु करून धमाल उडवली पण त्यावरून फक्त देशांतर्गत कॉल करता येत.

मात्र काहीच वर्षात २०११/१२ च्या सुमारास कधीतरी व्हॉट्स अप सुरु झाले आणि तोवर केवळ एस एम एस माहित असलेल्या लोकांना एक नवीनच खजिना सापडला. फोनवर लोक चित्र संदेश पाठवू लागले. तोवर २ जी ३ जी वगैरे क्रांती येऊ घातली होती त्यामुळे दिवसेंदिवस स्मार्ट फोन जास्त जास्त स्मार्ट होऊ लागले आणि त्यावरची ऍप हा एक नावाचं प्रकार उदयास आला. लोक तासंतास ती वापरून आपले बँकिंग, बिले भरणे वगैरे करू लागलेच पण पुढे व्हॉट्स एप वरून जगात कुठेही कॉल करणे सोपे होऊन गेले. नंतर तशीही अनेक एप आली आणि त्यामुळे व्होनेज ची मृत्यूघन्टा वाजली.

मात्र अजूनही कॉर्पोरेट ऑफिसात प्रत्येकी टेबलवर एक फोन असेच. लोकल कॉल किंवा दूरच्या ऑफिसातील कॉल किंवा काही मीटिंग/ ब्रिजेस जॉईन करायला हेच फोन वापरले जात. शिवाय स्मार्ट फोन होतेच. ऑफिसात बॉस लोकांकडे लॅपटॉप आणि बाकीच्यांना डेस्कटॉप अशी पद्धत रूढ होती. आणि मग ......................................

२०२० मध्ये कोविड आला आणि एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. कामाचे मॉडेल पूर्णपणे बदलले आणि आयटीवाले सगळे लोक घरून काम करायला लागले. सगळेच रिमोट म्हणजे सतत बोलणे आले त्याशिवाय काम कसे होणार? आणि सतत मोबाईल वापरून त्याचे बिल कोण भरणार? मग तोवर गपचूप असलेल्या पण तंत्राधारित सेवा देणाऱ्या झूम, वेबेक्स ,टीम्स वगैरे कंपन्या पुढे आल्या. आता तुम्हाला फक्त बोलणेच नव्हे तर व्हिडीओ कॉलही लॅपटॉपवरूनच करता येऊ लागला. देशादेशातला फरकच मिटला. एकाच मीटिंग मध्ये (काळ वेळ जमत असेल तर) एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस अशी कामे सर्रास सुरु झाली. लॅण्डलाइन तर इतिहास जमा झालेच पण आता मोबाईलही इतिहास जमा होतील की कायसे वाटू लागले आहे.

पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? किंवा डी एन ए मध्ये बदल करून ऐकायची सोय वगैरे? माहित नाही. पण माणूस आहे तोवर बोलायची हौस राहणार आणि बोलायची सोयही लागणार. तर मग सांगा आव्वाज कुणाचा?(समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

8 Aug 2025 - 8:00 pm | कर्नलतपस्वी

संपूर्ण इतीहास थोडक्यात मांडलाय. खरेतर याला संवादिनी ची बखर म्हणतत येईल .

१९८७ मधे महू ,म प्र मधे होतो. दहा नंतर एस टि डी स्वस्त म्हणून शनिवारी लाईन लावायचो.

जेवढा फोन(screen) लहान तेवढं नुकसान.
Satellite फोन परवडणारे होतील तेव्हा टोपीवर लावायची अँटेनावाले रस्त्यावर दिसतील.

अतिशय उत्तम आढावा.. हा काळ, त्या काळातले सर्वकाही आणि त्यापूर्वीचे आणि आजपर्यंतचे सर्वकाही नुसतेच वापरणे नव्हे तर त्यात काही ना काही योगदान देत आलेली एकमेवाद्वितीय पिढी म्हणजे Gen X.. आमची.. एकाच पिढीत आणि एकाच आयुष्यात सर्वाधिक जास्त बदल पाहिलेली.

तूर्त पोच. आणखी बरेच काही आठवले या निमित्ताने.

अभ्या..'s picture

8 Aug 2025 - 10:47 pm | अभ्या..

तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले.
थोडा ग्याप पडला सर. म्हणजे एक पायरी राहिल्यासरखी वाटली. १९९८ ला रात्री एस्टीडी बुथवर मीटर बघत बोलाय्यचे लोक तेंव्हा काहीजण घरात अँटेना लावून ते ५ कीमी च्या अंतरात चालणारे कॉर्डलेस बाळगायचे. आणि त्याच वर्षी मुंबईच्या पेपरात "कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत(स्टार उद्योग) ह्यांचा मोबाईल फोन (पोलिसांच्या वीऑकीटॉकीसारखा दिसणारा, मोटोरोला कंपनी) हरवला आहे, आणून देणार्‍यास योग्य बक्षीस" अशी जाहिरात वाचल्याचे स्मरते.
नंतर एटीअँडटी (जो नंतर बिर्ला टाटा अ‍ॅन्ड एटीअ‍ॅन्ड टी झाला, नामकरण आयडीया चिटचॅट झाले. आणि एअरटेल आणि मग बीपीएल( नंतर हच , मग व्होडाफोन, आता व्ही आय मधली व्ही) ह्या कंपन्यांचे कार्डस आणि त्यांचे पेपर व्हावचर्स चालले. इनकमिंगला पैसे घेणारा हा काळ होता. हॅन्डसेट हे सिमेन्स, सोनी एरिकसन, मोटोरोला, पॅनासॉनिक आणि नंतर नोकीयाचे आले. काही पोस्टपेड प्लान्स नी इनकमिंग फ्री दिले मात्र रिम (रिलायन्स इंडीया मोबाईल) आल्यानंतर इनकमिंग सगळ्यांचेच फ्री झाले. मधला काही काळ टाटा आणि रिलायन्सच्या वॉकी सारख्या वायरलेस डब्बा फोनने पण गाजवला. व्हर्जिन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल अशा सर्व्हिस पण येऊन गेल्या. बहुतांशी सगळ्या जीएसएम होत्या. हा काळ २००५ पर्यंत चालला. सिंगल कलर डिस्प्ले पासून कलर डिस्प्ले पर्यंत मोबाईल प्रवास होताना सॅमसंगचे बाडा ओएस वर आधारित टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग ऑडिओ, व्हिडीओ, इमेज, रिंगटोन असे ट्रान्सफर ब्ल्युटूथ किंवा आयआर ने केले जाई किंवा दुकानात जाउन डायरेक्ट केबल जोडून भरले जाई. ज्यावेळी स्मार्टफोन आणि व्हाटसप आले २०१०/११ ला तेंव्हापासून कनेक्टिव्हीटी आणि डेटा ह्याचा धबधबा सुरु झाला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Aug 2025 - 2:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

ही माहितीची भर घातल्याबद्दल धन्यवाद!!

माझ्यामते स्थळ काळानुसार हे तपशील बदलत असतात. म्हणजे एखादा शहरी माणुस आणि गावाकडचा माणुस यांच्या अनुभवात फरक पडु शकतो. काही ट्रेंड्स ईथे असतात, तिथे नाही वगैरे.

शिवाय मी साधारण २००१ पासुनचा काळ घेतला आहे, तोही एक फरक. पुन्हा धन्यवाद

सोत्रि's picture

9 Aug 2025 - 4:14 am | सोत्रि

पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय?

इलॅान मस्कची न्युरालिंक कंपनी अशा चीपवर काम करत आहे. टेलीपथी हा ट्रेडमार्क रजिस्टर करून त्या नावाने चीप इंन्प्लांट करण्याचे प्रॅाडक्ट कंपनी विकते आहे.

<डिसक्लेमर>जाहिरात

VoIP वरून माझा एक जुना लेख आठवला!

- (तंत्रज) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Aug 2025 - 2:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी ही हा लेख लिहिताना नायक्विस्ट नियम वगैरे तांत्रिक बाजु लिहावी का या विचारात होतो, पण आळस केला आणि फक्त स्मरण रंजनापुरते लिहिले. पण आता वाटतेय बरेच केले.

आता या लेखासाठी एआइ चित्रे टाकून लेख रंगीत करा

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Aug 2025 - 1:58 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

चित्रगुप्त's picture

10 Aug 2025 - 8:02 am | चित्रगुप्त

रंजक आहे हा सगळा इतिहास. आता यापुढे आणखी काय काय होणार देवास ठाऊक.

माझा मोबल्या मला दिवसातून तीनचार वेळा तरी हुडकावा लागतो, कारण तो मी खिशात कधीच ठेवत नाही. बाहेर जाताना ब्यागेत आणि घरी असताना इकडेतिकडे कुठेतरी. कायप्पासकट सगळे मला लॅपटॉपवर करायला बरे वाटते. मोठा पडदा आणि कीबोर्ड, प्रकाश सहजपणे कमीजास्त करत लेखन-वाचन, विडियो बघणे, बँकेचे काम, वगैरे निवांत करता येते. एका वेळी अनेक टॅब- मुख्यतः यूट्यूब, चॅटजीपीटी, पिंटरेस्ट, मिपा, गूगल ड्राईव्ह वगैरे उघडून ठेऊन मधुनच हे तर मधुनच ते असे सहज करता येते. आवडलेली चित्रे, फोटो गूगल ड्राईव्हवर साठवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे (विशेषतः मॅकबुकवर) अनेक तास बसले तरी डोळे शिणावत नाहीत.... वगैरे.
मोबल्याचा उपयोग फोन करायला, ओटीपीसाठी आणि फोटो काढायला चांगला होतो.
-- माझ्यासारखे आणखी आहेत का कोणी लॅपटॉप प्रेमी ?

श्वेता व्यास's picture

11 Aug 2025 - 1:34 pm | श्वेता व्यास

+१ लॅपटॉप प्रेमी

कुमार१'s picture

11 Aug 2025 - 12:26 pm | कुमार१

रंजक आहे व आव्वाज छान घुमला आहे !

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2025 - 1:42 pm | प्रसाद गोडबोले

काय सुंदर लिहिलं आहे !

ह्या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती सोबत आपल्या आयुष्याचा प्रवास ही डोळ्यासमोर तरळून गेला.

दीड रुपये पर मिनिट कॉलिंग होतं त्या दिवसात एकेक रुपया साठवून प्रेयसी सोबत केलेले संवाद स्मरले.
नंतर whatsapp वर केलेले तासनतास व्हिडिओ कॉल आठवले.
कोव्हिडच्या काळात फॅमिली सोबत गप्पा टप्पा करत एकामेकाला आधार देणारे ग्रुप कॉल आठवले.

नॉस्टॅल्जिक केले राव तुम्ही.

एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस>>

इथून पुढे १-२ वर्षात रीयल टाईम ओन्लाइन भाषांतर होईल .. हव्या त्या भाषेतून अप्ल्याला हव्या त्या भाषेत होइल

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Aug 2025 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

"पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? " ईथे "पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कानातच एखादी चिप बसवतील काय? असा बदल करायचा आहे.