नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते! १९५१ चं "ठण्डी हवाएँ लहरा के आए" ह्या अल्लड प्रेमगीताला संगीत सचिन देव बर्मनांचं होतं. त्यांची चाल संगीतकार रोशन ह्यांना इतकी आवडली की त्यांनी १९६६ च्या "रहें ना रहें हम महका करेंगे" ह्या अर्थपूर्ण गाण्यामध्ये वापरली! पण गंमत म्हणजे १९६६ च्याही आधी त्यांनी १९५४ मध्येच ती चाल एस. डींची अनुमती घेऊन चांदनी चौक चित्रपटात "तेरा दिल कहाँ है" (आशा भोसले) वापरली होती. "तेरा दिल कहाँ है" हे गीत ऐकताना अगदी "रहें ना रहें हम महका करेंगे" ऐकल्याचा भास होतो! पुढे मग आर. डी. बर्मननीही ही चाल- त्या गाण्यातला मीटर किंवा छंद वापरून "हमें और जीने की चाहत ना होती" आणि "सागर किनारे" ही गाणी दिली! त्याही शिवाय त्याच छंदातील गाणी तमिळ व मल्याळमध्येही रचली गेली! इतरही काही विशेष प्रसिद्ध नसलेली ७०- ८० च्या दशकातली हिंदी गाणी त्याच सुरावटीवर आधारित आहेत. अशी एकूण किमान १० गाणी त्याच छंदातली किंवा सुरावटीतली आहेत. लक्ष देऊन ती ऐकली तर त्यातलं साम्य लगेच कळतं! अगदी १९९३ मध्ये लतानेच गायलेलं व राम- लक्ष्मण ह्यांचं संगीत असलेलं "कहा था जो तुमने" हेही गाणं तशाच चालीचं आहे!
"ठण्डी हवाएँ" गाण्यावर आधारित गाण्यांची ही गंमत मला माझे मित्र भूषण मंडपमाळवींनी सांगितली. खुद्द आर डी बर्मननी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. आणि "ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं. पण असं जरी असलं तरी त्या चालीला पुढे वाढवून साकार रूप देणं ही त्या त्या संगीतकाराची कमालच आहे. त्यांचं सूत्र समान असलं तरी प्रतिबिंबं ही स्वतंत्र अभिव्यक्तीही आहेत.
काही गाण्यांमध्ये अशी क्षमता असते की, ते आपल्याला स्वत:शी जोडून देतात. आपल्यामध्ये खोलवर असलेले भाव व्यक्त करतात. असं म्हणतात की, संगीत हे मन आणि ध्यान ह्यांच्यामधला टप्पा आहे. कधी कधी ते आपल्याला मनाच्या पलीकडचा अनुभव देऊन जातं. काही गाणी तर आपले विचारसुद्धा थांबवतात आणि आपल्याला अवाक् करतात. आपल्याला खिळवून ठेवतात. मन शांत करतात व खूप खोलवरची प्रसन्नताही देतात. रहे ना रहे हम हे गाणं असंच! अतिशय विलक्षण अर्थ भरलेला आहे! एक प्रकारे व्यक्ती, अभिव्यक्ती व त्यांच्या प्रतिबिंबांची स्पष्ट सूचना आहे.
रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम
मौसम कोई हो, इस चमन में
रंग बनके रहेंगे हम फ़िज़ा में
चाहत की ख़ुशबू यूँ ही ज़ुल्फ़ों से
उड़ेगी ख़िज़ाँ हो या बहारें
यूँ ही झूमते
यूँ ही झूमते और खिलते रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
खोए हम ऐसे, क्या है मिलना
क्या बिछड़ना, नहीं है याद हमको
कूचे में दिल के जब से आए
सिर्फ़ दिल की ज़मीं है याद हमको
इसी सरज़मीं पे हम तो रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक: 4 ऑगस्ट 2025.
प्रतिक्रिया
5 Aug 2025 - 11:35 am | श्वेता व्यास
लेख आवडला. वरील सर्वच गाणी आवडीची आहेत, पण असं साम्य लक्षात आलं नव्हतं.
5 Aug 2025 - 1:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लेख आवडला. आर डी बर्मनने रेडियोवरील एका मुलाखतीत ह्या गाण्यांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली.
6 Aug 2025 - 11:30 pm | कुमार जावडेकर
फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.
5 Aug 2025 - 9:48 pm | चौथा कोनाडा
छान लेखन !
आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात.
धन्यवाद !
5 Aug 2025 - 10:53 pm | सौन्दर्य
लवकरच सर्व गाणी युट्युबवर ऐकीन.
6 Aug 2025 - 9:58 am | कानडाऊ योगेशु
परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे.
पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.
6 Aug 2025 - 10:15 am | सुबोध खरे
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं
बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते.
आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते.
मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात.
तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही.
अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी.
नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे.
फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.
6 Aug 2025 - 10:24 am | सुबोध खरे
उदा मालकंस या रागावर आधारित
मन तडपत हरी दर्शन को आज
आधा है चंद्रमा
छम छम घुंगरू बोले
अशी अनेक गाणी आहेत
किंवा केदार रागावर आधारित
आज मी आळविते केदार
गा कोकिळा गा
जिवलगा कधी रे येशील तू
प्रभूपदास नमिता दास
हि कुणी छेडिली तार
वाली वध ना खल निर्दालन
सत्यम शिवम सुंदरा
अशी अनेक गाणी आहेत.
6 Aug 2025 - 3:51 pm | अभ्या..
वा डॉ़क्टर.
हा चांगला छंद आणि तोही व्यासंगासह जोपासलायत की तुम्ही.
वा
7 Aug 2025 - 8:11 am | गवि
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं.
जाने कहाँ गये वो दिन
कहीं दीप जले कहीं दिल
बहारों फूल बरसाओ
ओ मेरे सनम ओ मेरे सनम
मेरे नैना सावनभादो
दिल के झरोके में तुझको बिठाकर
क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके
ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे)
तूने प्रीत जो मुझसे जोडी..
तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन
अगदी धक धक करने लगा पण..
आणखीही अनेक आठवतील.
ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.
7 Aug 2025 - 10:24 am | सुबोध खरे
दिसला ग बाई दिसला
मोहुनीया तुजसंगे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रानात सांग कानात
वारा फोफावला
सावळाच रंग तुझा
हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत.
अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.
7 Aug 2025 - 3:24 pm | हणमंतअण्णा शंकर...
ओ मेरे सनम ओ मेरे सनम
अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.
7 Aug 2025 - 3:28 pm | हणमंतअण्णा शंकर...
या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे.
शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते
7 Aug 2025 - 5:09 pm | गवि
अगदी अगदी..
आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.
6 Aug 2025 - 10:53 am | विजुभाऊ
याच चालीवरचे आणखी एक गाणे
हमे रासतो की जरुरत नही है
https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_rad...
1
नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे
6 Aug 2025 - 11:20 am | युयुत्सु
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये?
https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_rad...
8 Aug 2025 - 9:48 am | चौथा कोनाडा
मकासूर...... हा.. हा हा.....!
9 Aug 2025 - 5:27 pm | युयुत्सु
मकासूर... एक्दम भारी नाव आहे! जाम आवडले...
6 Aug 2025 - 3:46 pm | मार्गी
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद!
ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.
7 Aug 2025 - 8:17 am | गवि
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते.
काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.
7 Aug 2025 - 11:20 am | श्वेता व्यास
या धाग्यातील आणि प्रतिसादांमधील मान्यवरांनी नमूद केलेली गाणी एकत्र केल्यास एक छान प्लेलिस्ट तयार होईल :)
7 Aug 2025 - 3:15 pm | हणमंतअण्णा शंकर...
अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात.
हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.
7 Aug 2025 - 10:54 pm | रामचंद्र
याच विषयावर मागं राजू भारतन यांचा लेख चंदेरीत वाचल्याचं आठवतंय.
7 Aug 2025 - 10:58 pm | रामचंद्र
'मार्गारिटा' आणि 'कौन है जो सपनों में आया'. पण यात संगीतकारापेक्षा गीतकाराचं विशेष म्हटलं पाहिजे.