नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला.
माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात तेव्हाच्या प्राधान्यक्रमानुसार त्या बदलत गेल्या. उदा० एकेकाळी मी एखाद्या व्यक्तीचे वाचन, स्मरणशक्ती यावर त्या व्यक्तीचे "मोठेपण" ठरवत असे. नंतर माणसांनी केलेला जीवनसंघर्ष मला भारावून टाकू लागला. पन्नाशीनंतर मात्र माझा माणसे जोखायचा निकष मात्र वेगळा आणि एकच आहे. तो असा-
० वैयक्तिक सीमारेषांचा आदर
माझी बायको आणि माझी मुलगी अधूनमधून "पर्सनल बाऊण्ड्री" या विषयावर माझी "शाळा" घेत असतात. मन:स्वास्थ्य टिकविण्यासाठी आपल्या अवतीभवतीचा समाज आपल्या वैयक्तिक सीमारेषांचा किती आदर ठेवतो हे फार महत्त्वाचे ठरते.
माझे सामाजिक वर्तूळ आणि माझ्या बायकोचे आणि मुलीचे सामाजिक वर्तूळ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या वर्तूळातली माणसे त्या दोघीनी आखलेल्या बाऊण्ड्रीचा आदर ठेवतात. माझ्या वर्तूळातले बरेच लोक मला वैयक्तीक सीमारेषांचा आदर राहू दे, पण अक्कल शिकवायला, मनस्ताप द्यायला मागेपुढे कमी करत नाहीत.
एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक सीमारेषांचा अनादर करणे हे टप्प्याटप्प्याने सुरु होते. ’अहो-जाहो’ ऐवजी परवानगी न घेता ’अरे-तुरे’ करणे ही त्याची १ली पायरी. हे मला वैयक्तिक सीमारेषेचे उल्लंघन वाटते.
आमच्या भागात एक गृहोपयोगी वस्तूंचे दुकान आहे. या दुकानाच्या मालकांना अचानक काय हुक्की आली माहित नाही. अचानक ते दुकानात आलेल्या स्त्री आणि पुरूष ग्राहकांना ’अरे-तुरे’ किंवा ’अगं-तुगं’ ने संबोधू लागले. अनेक लोकांना वि० वयस्कर स्त्रियांना ही ’सलगी’ आवडत नसे. पण अचानक हे अरे-तुरे थांबले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
कुणाच्याही घरी जाताना पूर्वसूचना न देता, वेळीअवेळी जाणे, हे एक प्रकारे वैयक्तिक सीमारेषेचे उल्लंघन असते. आपल्यामुळे दूसर्या व्यक्तीची गैरसोय होणार असेल तर त्याकडे दूर्लक्ष करून आपले अस्तित्व (आणि महत्त्व) लादण्याचा तो प्रयत्न असतो.
वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
नार्सिसिस्टीक व्यक्ती दुसर्याला व्यक्तीला गृहित धरते तेव्हा ती त्या व्यक्तीवर आपले नियंत्रण निर्माण करते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याचा ताबा घेते. स्त्रिला गृहित धरणे हे सर्व धर्म आणि संस्कृतीमध्ये शतकानुशतके होत आले आहे.
वैयक्तिक सीमारेषांचा आदर ठेवणे यात अनेक लोकांना औपचारिकता आणि कृत्रिमता वाटते. पण नातेसंबंध निर्माण होण्या अगोदरच एखाद्याला गृहित धरणे हे अयोग्य आहे, हेच बर्याच लोकांना मान्य नसते. एकमेकांबरोबर राहून विश्वास निर्माण झाल्यावर मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये गृहित धरणे समजून घेता येते.
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. यामुळे नार्सिसिस्ट व्यक्ती आपले जाळे टाकायच्या अगोदरच ओळखता येतात आणि त्यांच्या पासून लांब राहता येते.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो. उदा० नुकत्याच एका माजी मित्राशी बर्याच काळानंतर संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. या माणसाने त्याकडे सपशेल दूर्लक्ष केले. सर्वसाधारणपणे बहुतेक सामान्य माणसे एकमेकांच्या मुलांच्या प्रगतीत आनंदाने सहभागी होतात. त्यासाठी खिशातले काहीही खर्च करावे लागत नाही. फुकटच्या कौतूकाला जर तुम्ही महाग होत असाल तर अर्थातच थारा करण्यास योग्य नसता!
ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात.
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
माझ्या मते भारतीय समाजात या विकृतीने सध्या परमोच्चबिंदू गाठला आहे...
प्रतिक्रिया
14 Jan 2025 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
14 Jan 2025 - 11:54 am | आंद्रे वडापाव
सहमत आहे.
14 Jan 2025 - 1:15 pm | Bhakti
अगदी मीपण हाच उपाय करते.तसेच कोणालाच मला गृहित धरू देत नाही, म्हणजे फक्त एकच चूक माफ करते मग दुरूनच डोंगर साजरे..टाटा..बाय ..बाय..खतम्
तसेच स्वतः बाबतही ही निरीक्षण करते . म्हणजे दुसऱ्यांची प्रगती ऐकून/कळल्यावर माझी काय प्रतिक्रिया आहे ;)
अगदी ,आता काय कधी गुड न्यूज देणार? हे नव्या लग्न झालेल्या किंवा एक चार-पाच वर्षांचं लेकरू असणाऱ्या दांपत्याला कोणीही सतत विचारावे? पर्सनल बाॅन्ड्री आहे की नाही काही??
14 Jan 2025 - 1:50 pm | रात्रीचे चांदणे
एखादा आपल्या आनंदात सहभागी आहे की नाही हे तपासण्याची खर तर गरजच काय?
एखाद्याने व्हॉट्सॲप वरती रिप्लाय नाही केला म्हणजे ती व्यक्ती खरंच आनंदात सहभागी नाही अस समजणं योग्य आहे का? कदाचित कामात असेल तो.
माझा एक मित्र महिनोन्महिने व्हॉट्सॲप बघतच नाही, आत्ताच बघितल तर त्याने माझा नवीन वर्षाच्या शुभेछा चां मेसेज अजून बघितलाही नाही. पण ज्या ज्या वेळी त्याला मदत मागितली त्याने केली. तसंही परफेक्ट कोणीच नसते. लहान सहान कारणांमुळे माणसे खड्यासारखी बाजूला करायला लागली तर कोणीच जवळ राहणार नाही.
14 Jan 2025 - 7:03 pm | चामुंडराय
+1
14 Jan 2025 - 8:22 pm | मुक्त विहारि
मनोगत आवडले...
14 Jan 2025 - 9:44 pm | धर्मराजमुटके
ही पद्धत बरीचशी कुचकामी आहे. तुमची प्रगती तुम्ही समोरच्या माणसाला समोर समोर भेटून ऐकवता की फोनवर, व्हॉटसप वर याने बराच फरक पडतो.
वैयक्तिक रित्या मला कोणी समोरासमोर सांगीतले, खास त्या बातमीसाठी फोन केला तर आनंद होतो. पण व्हॉटसप वरची प्रगती मला आवडत नाही. बर्याचदा मी महत्त्वाचे संभाषण व्हॉटसपवर करणे टाळतो कारण एकाच वेळी आपण आणि समोरचा व्यक्ती वेगवेगळ्या ग्रहांवर, वेगवेगळ्या मनस्थितीत असण्याची शक्यता बरीच असते.
बरेच जण हगल्या पादल्या आपली प्रगती, आपले स्टेटस टाकत असतात त्यामुळे मोठ्या बातमीचे गांभीर्य निघून जाते. शिवाय तु माझी लाल कर, मी तुझी लाल करतो अशा खेळाचा मला बर्यापैकी तिटकारा आहे. एक प्रकारे मी माणुसघाणा आहे असे म्हणायला वाव आहे.
आताशा लोक फोन कॉल करायचे विसरुन गेले आहेत. सरळ व्हॉटसप मेसेज किंवा व्हॉटसप कॉल करतात ते मला बिलकूल आवडत नाही. मला माझी वैयक्तिक सीमारेषा फार प्रिय आहे आणि इतरांच्या वैयक्तिक सीमारेषेचा देखील मला तितकाच आदर आहे.
पण हल्ली दुसर्यांच्या वैयक्तिक सीमारेषेचा आदर करणारे आयुष्यात पुढे जात नाहीत असे आढळून येते.
पुढे म्हणजे कुठे ते विचारु नका :)
15 Jan 2025 - 11:49 am | सुबोध खरे
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे.
त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता.
त्या माणसाच्या दृष्टीने आपण आपलीच टिमकी वाजवणारा नार्सिसिस्ट असू शकता हा विचार आपण केला आहे का?
तेंव्हा नार्सिसिस्ट ओळखण्याची आपली हि पद्धत अत्यंत कुचकामी आहे.
मुळात एवढ्या त्रोटक गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्ट आहे हे लेबल लावणे अतिशय चूक आहे.
नार्सिसिस्ट पर्सोनालिटी डिसऑर्डर हा एक मनोविकार आहे आणि इतक्या कमी काळात नीट निरीक्षण न करता एखाद्या व्यक्तीला मनोविकार आहे असा शिक्का मारणे हे कितपत योग्य आहे?
याचे निदान करण्यासाठी अनुभवी मनोविकार तज्ज्ञ सुद्धा बरेच दिवस निरीक्षण आणि बरीच चर्चा केल्याशिवाय अशा निष्कर्षाशी येणार नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/Narcissistic_personality_disorder
ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात.
एवढ्या त्रोटक गोष्टीवर जर आपण माणसांची पारख करत असाल तर माणसांबरोबर आपले नाते जोडणे फार कठीण होईल.
आणि याचा वैयक्तिक सीमारेषेशी जोडणे हे तर बाजीरावाला अब्दालीची शेंडी चिकटवण्यासारखे आहे.
या दोन विभिन्न गोष्टींची पार गल्लत झालेली आहे.
15 Jan 2025 - 2:01 pm | कर्नलतपस्वी
हा हा हा......
हासून खपलो.
बाकी लेख सोडा पण खरे सर आपल्या प्रतीसादातून माझ्या म्हणी, वाक्प्रचार च्या संग्रहालयात एक अनमोल भर पडली.
धन्यवाद.
15 Jan 2025 - 2:26 pm | अमरेंद्र बाहुबली
ते सगळं ठिकाय! पण
या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले.
पण सिनेमाचे नाव काय?15 Jan 2025 - 6:33 pm | मुक्त विहारि
विषय कुठला आणि प्रतिसाद कुठला?
15 Jan 2025 - 3:14 pm | विजुभाऊ
आंतरजालावर तर गोष्टी आणखीनच अवघड होतात. एक तर इंग्रजी अक्षरात टाईप केलेल्या शब्दांत उच्चारांचा घोळ असतो. "आज मी जोरात पडलो" हे वाक्य स्पेलिंग मधे लिहिले तर वाचणारासाठी काही वेळा अनर्थ निघू शकतो.
हत्ती आणि हट्टी हे असेच एक उदाहरण
पण आंतरजालावर बरेचदा लोक एकेमकाना जोखत असतात. आणि ते थेट अरे तुरे वर येतात. इंग्रजी भाषा असेल तर विचारायचे नाही.
त्या शिवाय डुप्लिकेट आयडी मधूनही मजा घ्यायला लोक हे असे करीत रहातात.
मेसेज मधून जे१ झाले का किंवा कल्जी घेने वगैरे मेसेज पाठवतात.
माझ्या ओळखीतले एक ग्रुहस्थ आहेत. ते नेहमी कोठल्यातरी बाबाची प्रवचने फोरवर्ड करत बसतात.
ते माझा नात्यातले असल्यामुळे त्याना ब्लॉक ही करता येत नाही.
बँक / लोन घ्या असे फोन करुन सांगणारे तर ही हद्द ओलांडूनच व्यवसाय करतात.
15 Jan 2025 - 4:29 pm | Bhakti
माझे ओळखीचे लोक भेटल्यावर, अग तू हा फोटो तेव्हा टाकला छान होता,माझा अमका मेसेज वाचला का?तमकी गोष्ट तू खूप भारी केली...असं काहीतरी बोलत राहतात.हे काय भेटलो तरी आंतरजालाच्याच पोस्टची चौकशी?काही नात्यातला ओलावा आहे की नाही?कशाला पाहिजे लोक?
(We have to earn people )लोक मिळवायला पाहिजेत,जमा कशाला करायची?
15 Jan 2025 - 8:11 pm | चक्कर_बंडा
हे सर्व वाचल्यावर मी स्वतः पराकोटीचा "नार्सिसिस्ट" असल्याचा साक्षात्कार मला झालाय, मला पाठवण्यात येणाऱ्या व्हाट्स-ऍपच्या संदेशांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करणे हा माझा "चॉईस" नसुन तो मला झालेला एक "मनोविकार" आहे हे समजल्यावर तर मी अक्षरक्ष: हादरून गेलोय.
तसेंच, आलापानंतर बंदिश असणारचं (मंचकावरचीही(!)) त्याला कसला आलाय डोंबलाच "कंसेन्ट" अशी माझी धारणा म्हणजे फक्त माझ्या "नार्सिसिस्ट" असण्याचाचं नाही तर असंस्कृत किंबहुना रानटीपणाचाही सज्जड पुरावा ठरेल की काय अशी मला शंका आहे...
एकुणात काय तर मी कुणाच्याही "वैयक्तिक सीमारेषांचा आदर" न करणारा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होणारा एक "विकृत" मनोविकारग्रस्त व्यक्ती असण्याची शक्यता फारचं आहे हे या लेखाद्वारे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.. उपचार घ्यावे म्हणतो..
असो.. युयुत्सु सर, धन्यवाद आणि पुलेशु..
23 Jan 2025 - 1:25 pm | वामन देशमुख
बाकी समदं जावु द्या, त्ये न्येटफिलिक्सवरचा इस्प्यानिश शेणिमा कोंचा त्येव्हडं सान्गा.
26 Jan 2025 - 10:14 pm | साबु
हे सर्वात महत्वाचे. :)
25 Jan 2025 - 9:18 am | युयुत्सु
Through my window
25 Jan 2025 - 7:07 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद! २ पार्ट दिसताहेत. विशेष म्हणजे हिंदीतही आहेत.
25 Jan 2025 - 11:14 am | nutanm
पण सवताची परगती सानगताना आपण पैसे कमावले शिकलौ हे केले ते केले हे लोकाना करतुतवाचया गोषटी खोटया वाटतात, फकत घर पैसे याबददल जळायला होते किवा अनगावर चागले कपडे थोडेसे दागिने दिसलयावर जळकुटेपणा ऊफाळतो व ते अडसर घालणे तसे विचार करणे वागणे हे पण करतात, हा माझा अनुभव आहे. ( माझा मराठी कीबोर्ड बरोबर नसलायाने बरेच अशुदध व विचितर लेखन होते. प्लीज समजून घेणे. माझा चानगला कीबोर्ड डाउनलोड होत नाहीये.
25 Jan 2025 - 12:46 pm | मारवा
नायक नालायक आहे.
कारण आलाप नंतर जोड, झाला,तसेच ताना मारताना सुद्धा त्याने consent घेतलेली दिसत नाहीये. खरा नायक असता तर प्रत्येक वेळी समेवर आल्यानंतर consent घेतली असती. हा नालायक नायक तर जणू एकाच wholesale consent किंवा ठोक परवानगी मध्ये पुढील सर्व पायऱ्या गृहीत धरत आहे.
यावर कुणी असंवेदनशील व्यक्ती असेही म्हणू शकते की सतत परवानगी प्रत्येक पायरीवर घेत बसल्याने ताल बिघडेल.पण खरा सात्विक नायक या भूलथापांना बळी पडू शकत नाही. तो सूर मारण्यापेक्षा सूर निरागस हो णे महत्वाचे मानेल.
तुम्हाला बडसम ही जीवनशैली माहीत आहे का ? यात ते सरळ एक करार करून घेतात शिवाय त्यात एक सुरक्षा शब्द ही ठरवून घेतात. पण ती अर्थातच पापमय असात्विक अशा प्रकारची जीवनशैली आहे.
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली. शिवाय narcissm किंवा इतर हे संपूर्ण प्रवाही व्यक्तित्व define करण्यासाठी नसतात. त्यातले traits highlight करून उपचार पद्धतीच्या निश्चीतिकरणासाठी त्याचा वापर एक convenient logical tool sarkha होतो. त्याचा वापर उपचार साठी करणे इतपतच ते योग्य आहे. ते उचलून एकदम जजमेंट व label मारणे योग्य नव्हे. मानसशास्त्र स्वतः रोज उत्क्रांत होते त्याला वापरून label मारू नये. Ekon musk किंवा अनेक जागतिक नेते अत्यंत positive अर्थाने narcissit आहेत. तुम्ही जो पर्यंत सेल्फ मध्ये खोलवर बुडी मारत नाहीत ती पर्यंत ग्रँड creation संभवत नाही
असो
25 Jan 2025 - 4:14 pm | युयुत्सु
बाकी शीर्षकात personal boundry असलेल्या लेखात माझी मुलगी अमुक अमुक इतका व्यक्तिगत उल्लेख वाचून अमळ मौज वाटली.
पर्सनल उल्लेख असला तरी त्यात लपविण्यासारखे काय आहे? तुम्हाला मौज वाटली दुसर्या व्यक्तीला 'टिमक्या' वाटतील. समोरची व्यक्ती माझ्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते, या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले आहे.