भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट - २१ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
21 Dec 2024 - 10:15 am

संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आज रोजी Winter/December Solstice म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ होत असलेला २१ डिसेम्बर हा दिवस "आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस" म्हणून साजरा करायला मान्यता दिली आहे. २१ जूनच्या "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ह्या यशानंतर भारताने आणखी एक यश मिळवले आहे. योगानंतर "ध्यान" हि भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट (cultural export gift) आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे. UN च्या न्यूयॉर्क येथील कार्यालयात हा सोहळा होणार असला तरी लक्षावधी लोकं ऑन-लाइन सहभागी होणार आहेत, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ध्यानधारणेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जनजागृती करून अधिकाधिक लोकांना माहिती देऊन ध्यानासाठी प्रवृत्त करून सराव करण्याचे प्रयोजन आहे.

सध्या सर्वत्र शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने मानसिक आरोग्याचे देखील महत्व आणि जागरूकता वाढत आहे. पौष्टिक आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती ह्या त्रिसूत्रीने शारीरिक आरोग्य मिळवण्याचे प्रयत्न करताना मानसिक आरोग्यासाठी चिंता आणि ताण-तणाव कमी करणे, जप-जाप्य, ध्यान-धारणा, छंद जोपासना, नेहमीच्या, रोजच्या कामातून नियमित ब्रेक घेणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो आहे. भारतामध्ये ध्यान हि प्रक्रिया हजारो वर्षांपासून प्रचलित असून वेदांमध्ये देखील ध्यानाच्या नोंदी आढळतात. भारतातून जगभर ध्यानाचा प्रसार झाला आहे. जर तुम्ही नियमितपणे ध्यान करत असाल तर आजच्या ध्यान सोहळ्यात सामील व्हा आणि जर ध्यान करण्याची इच्छा असेल तर आजपासून सुरवात करा.

सध्या जगभर योगाचा प्रसार झाला आहे आणि असंख्य लोक योग साधना करत आहेत. योगसाधनेतील आसने, प्राणायाम ह्यांद्वारे शारीरिक तंदुरुस्ती (fitness) लाभून आणि ध्यानधारणा केल्यामुळे स्वयंनियमन (self-regulation), जाणीव व जागरूकता (awareness), अध्यात्म (spirituality) अशा बाबींमध्ये सुधारणा होऊन मानवी कार्यक्षमतेमध्ये (global human functionality) सर्वांगीण सकारात्मक बदल होतो आणि त्यामुळे जीवनाची गुणवत्ता (quality of life) उंचावते असे दिसून आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, संशोधक ध्यान कसे कार्य करते व लोकांना कशी मदत करते ह्यावर संशोधन करत आहेत. Electroencephalogram (EEG) आणि Functional magnetic resonance imaging (FMRI) स्कॅन सारख्या आधुनिक निदान आणि इमेजिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे सिद्ध झाले आहे कि ध्यान तुमच्या मेंदूच्या आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. ताण-तणाव, चिंता, काळजी, जुनाट व दीर्घकालीन तीव्र (chronic) वेदना, रक्तदाब इत्यादी कमी होणे, हृदयाच्या आरोग्यात (risk of heart attack) आणि चयापचय क्रियेत सुधारणा इत्यादी फायदे होतात. इतकेच नव्हे तर healthier gut microbiome चा लाभ होतो असे निरीक्षण आहे. ध्यानामुळे मेंदूला चालना मिळून संज्ञानात्मक कार्य (cognitive function) सुधारते. हा एक प्रकारे मेंदूचा व्यायाम आहे आणि ह्या व्यायामामुळे मेंदूमध्ये शारीरिक बदल होतात, उदाहरणार्थ cortisol ह्या stress hormone चे अतिरिक्त प्रमाण कमी होते, ताण-तणाव कमी झाल्याने मेंदूची लवचिकता (neuroplasticity) वाढते. त्यामुळे आजकालच्या कॉम्बो आणि पॅकेजेस् च्या जगात बऱ्याच ठिकाणी Yoga&Meditation चे एकत्रित वर्ग उपलब्ध आहेत.

ध्यान आरोग्यपूर्ण जीवनाचा सोपा, बिन खर्चाचा आणि सहजसाध्य मार्ग असला तरी ध्यानासाठी संयमाची नितांत आवश्यकता असते. मंद श्वास, बंद डोळे आणि स्थिर शरीर ह्या त्रिसूत्रीचा मदतीने ध्यानाची पायरी चढता येते परंतु सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात विचलित झालेल्या phone addicted attention deficit मनाला अधिक काळ स्थिर ठेवणे अवघड आहे आणि त्यामुळे मन ध्यानापासून परावृत्त करायला बघते. ह्यावर मात करण्यासाठी तुमच्या विचारांकडे तटस्थपणे बघा, त्यांचा स्वीकार करा परंतु त्यांत गुंतू नका आणि पुनश्च्य ध्यानावर लक्ष केंद्रित करा. सुरवातीला अगदी थोड्या वेळासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा असा तज्ञ सल्ला देतात. अगदी दोन मिनिटांच्या ध्यानाने देखील फायदा होतो असे संशोधकांना आढळून आले आहे.

प्राचीन तत्त्वज्ञान आणि अनेक जागतिक धर्मांमध्ये ध्यानाचा उल्लेख आहे, परंतु ध्यान करण्यासाठी तुम्ही धार्मिक असणे आवश्यक नाही. ध्यानाचे विविध प्रकार असून तुम्हाला आवडेल आणि सहजसाध्य असेल ती पद्धत तुम्ही निवडू शकता. सोशल मीडिया, आंतरजाल, यू -ट्यूब, स्मार्ट फोनचे Apps इत्यादींवर ध्यानाची माहिती उपलब्ध आहे. वेळ काढा. दिवसातील ठराविक वेळ ध्यानासाठी ठेवा आणि तो तुमच्या दिनक्रमाचा एक भाग बनवा. या सरावातून जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी नियमित ध्यान करणे ही गुरुकिल्ली आहे.

योग आणि ध्यान ही भारताने जगाला मोफत दिलेली Open Source Bio-Technology आहे. ज्या प्रमाणे योगाचा McYoga पासून सुरू झालेला प्रवास RxYoga पर्यंत येऊन पोहोचला आहे तद्वत ध्यानाचा देखील प्रवास होवो आणि ह्या साधनेद्वारे लोकांना स्वास्थ्यपूर्ण व आरोग्यदायी जीवन लाभो हीच प्रार्थना.

सर्वे सन्तु निरामयः ।
Meditation

आरोग्यलेख

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

21 Dec 2024 - 3:49 pm | अथांग आकाश

लेख आवडला!

मुक्त विहारि's picture

21 Dec 2024 - 5:21 pm | मुक्त विहारि

सर्वे सन्तु निरामयः|