संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.
महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे :
योगश्चित्तवृत्तिनिरोध:
('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे).
अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध:
( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय)
आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते. माझा संयमित आहाराचा प्रयोग म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे 'वैराग्य' आणि 'अभ्यास' यांचाच प्रयत्न आहे.
पार्श्वभूमी :
सुमारे १० वर्षांपूर्वी. या लेखात लिहिल्याप्रमाणे रसाहारातून मी व्याधीमुक्त झालो होतो. त्यानंतरच्या काळात भाज्या-फळांचा ताजा रस अधून मधून घेत असलो, तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले आणि पोट सुटणे, गुडघे दुखू लागणे, अशक्तपणा वगैरे जाणवू लागले. गेले काही महिने पाय दुखत होते आणि जिने चढणे-उतरणे कठीण वाटू लागले होते.
त्यातच ८ जुलैला रात्री छातीत भयंकर कळा येऊ लागल्या. त्यापूर्वीचे चार-पाच दिवस प्रवासामुळे पोट बिघडले असल्याने गॅसेसमुळे कळा येत असाव्यात असे वाटून सहन करत राहिलो. सकाळी कळा थांबल्या पण खोल श्वास घेतला की छातीत कळ उठत होती.
दुपारी इथल्या (अमेरिकेतल्या ) दवाखान्यात इमर्जन्सी मध्ये गेल्यावर तिथे ताबडतोब ईसीजी, सिटीस्कॅन, अल्ट्रासाउंड वगैरे केले गेले आणि दोन्ही फुफ्फुसातलया रक्तवाहिन्यांत गुठळ्या (blood clots) झालेल्या असल्याचे समजले. मग चोवीस तास रक्तात Heparin नामक द्रावण चढवण्यात आल्यावर कळा आणि श्वासाचा त्रास थांबला. दुसरे दिवशी संध्याकाळी इस्पितळातून सुट्टी मिळाली आणि पुढले सहा महिने Eliquis (5 mg) या गोळ्या घ्यायला सांगितले गेले. याशिवाय अल्ट्रासाऊंडमधून मला 'फॅटी लिव्हर' देखील असल्याचे उघड झाले.
एक वेगळाच नवीन अनुभव : दवाखान्यात एक वेगळीच गोष्ट घडली. ती म्हणजे मला औषध चढवत असताना पूर्ण वेळ रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण (९३ - ९८ टक्के होते) नाडी (५७ - ६४ होती) समोर स्क्रीनवर दिसत होते. याशिवाय मशीनच्या स्क्रीनवर कसलातरी एक ग्राफ सतत खाली-वर होत होता (तो कसला हे मला समजले नाही, नर्सला पण ठाऊक नव्हते) त्यावेळी मला एकदम आठवले की १९९७ साली माझ्यावर काही संकट आलेले असताना एका ज्ञानी व्यक्तीने "ओम नम:शिवाय" मनातल्या मनात उच्चारात रहा, असे सांगितले होते, त्याप्रमाणे मी फार क्वचितच केले असेल, पण आता इतक्या वर्षांनंतर अचानक आठवण येऊन मी मनातल्या मनात ते सुरु करताच तो ग्राफ खूप खाली-वर न जाता अगदी शिस्तशीरपणे एकसारखा, एका विशिष्ट आकृतिबंधात येऊ लागला. मी अजिबात उच्चार करत नसून फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते. असो.
मोठा धक्का आणि विमनस्क अवस्था : आजवरच्या ७३ वर्षाच्या आयुष्यात प्रथमच इस्पितळाची पायरी चढावी लागणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. शिवाय बराच काळ औषधही घ्यावे लागणार होते. मला रक्तशर्करा, रक्तदाब वगैरे काहीही नसल्याने आपल्याला अगदी शेवटपर्यंत काही होणार नाही ही माझी समजूत खोटी ठरली होती. (कोविडची लस घेतल्याच्या परिणामी रक्तात गुठळ्या होतात, असेही एक मत प्रचलित आहे. इथली नर्स म्हणाली की पूर्वी बहुशः पासष्ठीच्या वरचे लोक इथे यासाठी यायचे, पण आता अगदी तरूणही येतात, आणि काही दगावतात सुद्धा)
– मग त्यानंतरचा एक - दीड महिना काहीश्या विमनस्क अवस्थेतच मी होतो. शारीरिक शक्ती आणि उत्साह खूप कमी झाल्याचे जाणवत होते. पेंटिंग, लेखन - वाचन यातला उत्साह मावळला होता. अमेरिकेतून भारतात परत जाण्याला आता एक महिनाच उरलेला असल्याने आपल्याला तो प्रवास झेपेल का याची शंका वाटत होती. मग मुलगा म्हणाला की पूर्वी केला होता तसा रसाहाराचा प्रयोग पुन्हा एकदा करून निघण्यापूर्वी ठणठणीत तब्ब्येत करून घा.
संयमित आहाराचा प्रयोग :
मग मुलाने सुचवल्याप्रमाणे आहाराविषयक प्रयोग करण्याचे ठरवून २७ जुलै पासून सुरुवात केली. काय करावे हे मी आपल्याच मनाने ठरवले.
कोणते पदार्थ घेणे बंद केले:
चहा - कॉफी - दूध, फोडणीचे आणि तळकट पदार्थ, पोळी आणि भात, मैद्याचे घरगुती आणि बाजारचे पदार्थ, पॅकबंद पदार्थ, साखर आणि गोड पदार्थ - मिठाई, आईसक्रीम वगैरे सगळे बंद केले.
कोणकोणते पदार्थ घेणे चालू केले:
१. सकाळी गरम काढा ( आले, दालचिनी + अर्जुनसाल + शोपेची पूड, चिमूटभर हळद, चिमूटभर मिरपूड, गूळ वगैरे पाण्यात उकळून केलेला. (दहाव्या ते बाराव्या दिवशी थोडेसे दूध पण घातले)
२. भाज्या आणि फळे यांचा ताजा काढलेला रस (हिरवा आणि लाल)
( हिरवा रस: कोहळा, काकडी, सेलरी, हिरवे सफरचंद, आले, लिंबू.)
( लाल रस: चुकंदर (बीटरूट), सफरचंद, संत्रे, गाजर, आले, लिंबू)
३. पौष्टिक लस्सी : दही, केळे, खजूर - आणि अन्य पदार्थ मिसळून केलेली लस्सी.
(अन्य पदार्थ म्हणजे हिरवी भाजी, फळे, सुखामेवा, चियाबिया - Chia seeds)
४. पौष्टिक भेळ : फुटाणे, भाजलेले शेंगदाणे, मनुका, भिजवलेले बदाम, आक्रोड, काजू, लसणाची एक पाकळी, काळे मीठ आणि गूळ/खजूर. (यातले सर्व किंवा काही पदार्थ)
५. दही घालून केलेली कोशिंबीर किंवा नुसती फळे.
६. घरी झालेल्या स्वयंपाकापैकी थोडेसे वरण किंवा भाजी. (क्वचित कधीतरी)
परिणाम:
१. शरीराची शक्ती आणि उत्साह वाढून खूप छान वाटू लागले.
२. जिना उतरताना कठडा धरून एक एक पाऊल टाकत उतरण्याऐवजी सरळ ताठ उतरू - चालू लागलो.
३. खाली वाकून उभे राहिल्यावर भोवळ येणे बंद झाले.
४. हाताला सुटणारी खाज बंद झाली.
५ वजन पाच पौंड कमी झाले.
६. पोटाचा घेर जरा कमी झाला.
७. लांब पायी फिरणे पुन्हा सुरु करता आले.
बारा दिवस आज पूर्ण होत आहेत. आणखी काही दिवस हा उपक्रम चालू ठेवणार आहे. त्याबद्दल पुन्हा लिहीन.
—---------------------------------------------
– खरेतर हा लेख इथे संपतो आहे. तरी जिज्ञासूंसाठी या बारा दिवसातील आहाराचे तपशील खाली देतो आहे.
१. पहिला दिवस. – वजन 156 पौंड.
07:30 – रस: कोथिंबीर, कोहळा आणि गाजर.
09:30 – रस : सेलरी, कोथिंबीर, काकडी, हिरवे सफरचंद, आले लिंबू.
11: 40 – Apple cider Vinegar एक कप पाण्यातून)
12: 40 – ताक (+ आले, जिरपूड, काळे मीठ)
13 : 40 – जूस : 3 संत्री, 1 पीच, 2 लहान सफरचंदे, 1 गाजर.
(संध्याकाळी मित्राकडे गेल्यामुळे तिथे ढोकळा, शंकरपाळी खाणे झाले).
-—------------------
२. दुसरा दिवस.
05:30 – काढा
07: 20 – हिरवा रस.
09:30 – हिरवा रस आणि सुखामेवा.
11.30 – लाल रस
13.30 – लस्सी (केळे - खजूर- दही- स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, पाणी)
19.30.-- लस्सी. (केळे + दही)
--------------------
३. तिसरा दिवस. — वजन १५२ पौंड.
07.30 – हिरवा रस.
10.20 – लस्सी, केळीचे चिप्स.
13.30. – लाल रस.
16.00 – सुखामेवा पूड + तूप + मध + काकवी.
19.00 – लस्सी : (दही, केळे, प्लम, द्राक्षे, खजूर).
--------------------
४. चवथा दिवस.
04.30 – गरम काढा
07. 30 – हिरवा रस.
09.30 – लस्सी, केळीचे चिप्स.
11.00 – सुखा मेवा, काकवी, फुटाणे, लसणाची 1 कळी.
—-- (यानंतरचे लिहून ठेवायचे राहिले)
—------------------
५. पाचवा दिवस.
05.30 – काढा.
10.00 – लस्सी (दही, आवोकाडो, खजूर, केळे, प्लम).
10.20 – फुटाणे. शेंगदाणे. सुखामेवा पूड, गूळ, काकवी.
14.00 – संत्र्याचा रस 300 ml.
14.40 – काजू, पीकॅन, ५ खजूर
17.30 – लस्सी.
18 50. लाल रस (बीट, केल, सेलरी, गाजर).
20.00 लस्सी.
—--------------------
६. सहावा दिवस.
07.30 – काढा.
08.30 – फुटाणे, दाणे, काजू, काळी मनुका, गूळ.
11.30 – फुटाणे गूळ. लसूण पाकळी. मनुका.
13.15 – मिश्र रस (सेलरी, काकडी, बीटरुट, आले, लिंबू. हिरवे सफरचंद).
संध्याकाळी लस्सी, आमटी, कांद्याच्या पातीची थोडी भाजी.
----------------------
७. सातवा दिवस.
04 :00 – काढा
09: 30 – फळे दही. फुटाणे दाणे चियाबिया.
14: 30 – लाल रस ( बीट, काकडी, सेलरी, आले, लिंबू)
15.15 – फुटाणे. काजू. गूळ. मनुका, लसूण पाकळी.
19:30 – लस्सी (दही, केळे, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, खजूर, फुटाणे, काजू, चियाबिया, मीठ -मसाला).
—-----------------------
८. आठवा दिवस.
(कित्येक महिन्यानंतर पूर्ण झोप लागली: 22 : 30 ते 05.20. शौच्य 5.30 वाजता.
07.30 – लस्सी. (आव्हाकाडो, केळे. सुखामेवा पूड. पाणी)
10.15 – लाल जूस.... फुटाणे दाणे. मनुका. काजू.
12.30 – 1 केळे. 1पीच. 3 खजूर. भाजलेले शेंगदाणे.
15:30 – Apple cider Vinegar एक कप पाण्यातून)
19:00 – लाल भोपळ्याचा गुळातला शिरा. फुटाणे + लसूण. अमूल चीज 1/2 लहान तुकडा.
—---------------------------
९. नववा दिवस.
07:30 – स्मूदी. (दही, केळे, आव्हाकाडो, द्राक्षे, सुखामेवा पूड)
09:30 – फुटाणे, शेंगदाणे, खजूर, काजू.
12:00 – स्मूदी. दोडक्याची भाजी.
16:00 – एक केळे, थोडे फुटाणे.
19: 45 गरम सूप (टमाटो, सेलरी, रताळे, मीठ, मिरे)
—------------------------------
१०. दहावा दिवस.
07:30 - - काढा.
10:30 - - हिरवा रस. फुटाणे.
11:15 - - 1 अंड्याचे आम्लेट.
13:45 - - उसळ, कोशिंबीर, 3 खजूर.
19:00 - - 1 पोळी आणि चहा.
20: 00 - - सूप.
—-----------------------------
11 अकरावा दिवस
05:30 - - काढा
07:30 - - लस्सी. मूदी.
10:00 - - लस्सी स्मूदी.
11:15 -- एक बिस्कुट. तूप-मध.
16:45 -- केळे द्राक्षे पीच.
—-------------------------------
12. बारावा दिवस. ............... वजन १५१ पौंड.
07: 30 – काढा
10: 30 – हिरवा रस + एक मोदक.
13: 30 – अर्धा पराठा + लस्सी
17: 30 – हिरवा रस. (+Apple cider Vinegar)
21: 00 – लस्सी.
याप्रमाणे बारा दिवस मजेत पार पडले. जे खाणे सोडले आहे, त्याविषयी इच्छा निर्माण झाली नाही. काहीही त्रास झाला नाही. अशक्तपणा नाहीसा झाला आहे.
--- आता यापुढे अजून किती दिवस हा उपक्रम चालवायचा, यात काही बदल करायचे का, वगैरे अजून ठरवले नाही.
(क्रमशः)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह ! उत्तम लेखन !
छान.
अनुभव छान लिहिला आहे, सर्व
संतुलित...
@ कर्नल साहेब, 'वैश्विक स्तर', योगी - भोगी - रोगी' वगैरे ...
बायोलॉजिकल घड्याळ व्यवस्थित...
लेख आवडला.
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
जबराव जबराव जबराव
बिघडली वाटते
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद
हे सर्व SIP सदृश्य...
तरी आहाराविषयक इतर खबरदारी
@गवीभौ बरोबर सहमतच
+++ अगदी.
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो.
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी
@ गवि, आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचा शोध घेणे
+१
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
सतत प्रतिसाद उडत असल्यामुळे
डाळिंब, केळे, दही .... सायकल चालवणे
असा प्रयोग आणखी कुणी करून बघितला का ?
शुभेच्छा !
रक्तात वाढलेले होमोसिस्टीन....
आहार विषयक प्रयोगांवरील
चला, कर्मणुकीसाठी का होईना, पब्लिक वाचतंय.