----
माचीवरला बुधा -- गो. नी. दांडेकर यांची कादंबरी.
बुधा नावाचा एक पन्नाशीतला सामान्य माणूस. शहरी जीवनशैली मागे ठेवून निसर्गाचं प्रेम आणि एकांताच्या ओढीने निर्मनुष्य अशा स्वतःच्या मातृभूमीत जाऊन, माणूस आणि निसर्ग यातलं अद्वैताचं नातं जगतो, अनुभवतो.
----
२०१७ मधे या कादंबरीवर आधारित, त्याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट विजयदत्त यांनी दिग्दर्शित केला. त्यांनी चित्रपटाचे संगीतकार धनंजय धुमाळ यांना, केवळ पक्ष्यांच्या कुजनातून तयार होणारी, एखादी संगीतरचना तयार करायला सांगितली. धनंजय धुमाळांनी लोणावळा, अर्नाळा, त्र्यंबकेश्वर, सातारा परिसरातील जंगलात हजारो किमी भटकंती करून, अंदाजे शंभर तासापेक्षाही जास्त लांबीचं ध्वनिमुद्रण (रिकॉर्डिंग) एकत्र केलं, आणि मग त्याचं संकलन (एडिटिंग) करून, अनेक पक्ष्यांचं कुजन असलेलं संगीत/गाणं तयार केलं, ज्यात सुतारपक्ष्याच्या सुतारकामाचा आवाज आहे, अन् शेपटीच्या टोकाला चमच्याची आकाराची, रॅकेटसारखी दिसणारी, दोन पिसे असणाऱ्या कोतवाल पक्ष्याची, झेपही!
----
ते पक्ष्यांचं गाणं इथे ऐकता येईल:
https://youtu.be/NkO5a7LlE7E?si=mQp7e6T2gV2DTpSy
आणि माचीवरला बुधा या चित्रपटाचा ट्रेलर इथे पाहता येईल:
https://youtu.be/41FwtA-as6Y?si=gLKYDbMsOs_S3ZnO
----
गोनिदांची कन्या डॉ. वीणा देव, माचीवरला बुधा चित्रपट संगीत प्रकाशनावेळी म्हणाल्या होत्या:
"माचीवरला बुधा, हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे, असे ते नेहमी म्हणत. खरंतर, बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे, आप्पा स्वत:च होते!"
----
प्रतिक्रिया
8 Aug 2024 - 12:22 pm | कंजूस
हे पुस्तक आणि खडकावरला अंकूर शालेय अभ्यासक्रमात अधिक वाचनासाठी होती.
14 Aug 2024 - 10:15 am | प्रचेतस
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.