“साहेबांचा ताजमहाल”

rahul ghate's picture
rahul ghate in जनातलं, मनातलं
6 Jul 2024 - 12:46 pm

ऑफिस चे किस्से

उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते .
अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे. सादर आहे त्या पैकी पहिला “साहेबांचा ताजमहाल”

एके दिवशी भल्या पहाटे हेड ऑफिस मधून E-पत्र धडकलं , त्या पत्रा नुसार बरोब्बर १ महिन्या ने आमच्या प्लांट मध्ये जपानी लोकांनी ऑडिट घेण्यासाठी २ दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता ( सिस्टिम ऑडिट , आर्थिक नव्हे). झालं त्या पत्रा मध्ये खळबळ उडाली , कारण आपला प्लांट काय लायकी चा आहे हे सगळ्यांना च ठाऊक होते , प्लांट व ऑफिस वेगवेगळे जागी होते ऑफिस सर्वाना सोईस्कर अश्या शहरातल्या मुख्य जागी तर प्लांट ३०-४० किमी लांब गावाबाहेर .
लगेच आमच्या GM ( श्री सर्वाधिकारी ) साहेबानी सर्व संबंधितांची १ तातडीची बैठक बोलावली व त्यात प्लांट हेड ( श्री कार्याधिकारी) ह्यांच्या अध्यक्षतेत १ CFT (कार्यकारी समिती) स्थापन केली व रोज बैठका घेऊन काम ठरवली व त्या त्या वर संबंधित जवाबदार अधिकारी नियुक्त करण्यात आले व दुरुस्ती , रंगरंगोटी आदी कामांना जोरात प्रारंभ झाला .
एक दिवस बैठकीत मुद्दा चर्चेला आला कि, प्लांट मध्ये प्रसाधनगृह आहे ते फारच जुने व सामायिक असल्यामुळे फारच वाईट अवस्थेमध्ये आहे , तर जपानी लोकांना तिथे विधी साठी नेता येणार नाही व काही तरी पर्यायी व्यवस्था करणे जरुरी आहे . विचारांती एक नवीन सुसज्ज असे प्रसाधनगृह बांधायचे असे ठरले . त्या साठी चे बजेट पण ऑडिट च्या खर्च मधून तातडीने मंजूर करून घेण्यात आला . इतर सर्व अधिकारी आप आपल्या नियोजित कामात व्यस्त असल्या मुळे ही जवाबदारी स्वतः कार्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली.
रात्र थोडी सोंगें फार असल्या मुळे काम फार जोरात सुरु झाले, परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी सगळ्या कार्यकारी समिती ने २-३ वेळा पाहणी दौरा पण केला , असा पाहणी दौरा शक्यतो शुक्रवारी घडवून आणला जातो , त्या मागे काही तर्कशास्त्र नसून , प्लांट च्या आजू बाजूला हायवे वर असलेले ढाबे कारणीभूत आहेत . म्हणजे दौरा आटपून संध्याकाळी तिकडेच खाण्या पिण्या चा व्यवस्थित कार्यक्रम करूनच येता येत. ऑन ड्युटी असल्यामुळे ह्या कार्यक्रमाचा खर्च पण सरकारी खात्यातून वसूल केला जातो.
असे करता करता ऑडिट च्या आधी चा दिवस उजाडला, उद्या पासून ऑडिट सुरु होत असल्या मुळे आज सगळ्या तयारी चा शेवटचा आढावा घेण्यात आला . प्रसाधनगृहाचे काम शेवटच्या टप्प्यात असून अजून रंगरंगोटी व दरवाजा लावायचा बाकी होता. पेंटर व कार्पेंटर ला बैठकीतूनच फोन लावून दम दिल्या गेला, त्यांनी पण आज रात्री काहीही करून काम पूर्ण करूनच जाऊ अशी ग्वाही देऊन आश्वस्त केले .
अखेर तो ऑडिटचा (सोनियाचा) दिन उगवला , सर्व अधिकारी पांढरे शुभ्र शर्ट घालून प्लांट मध्ये सकाळी ०७ लाच हजर झाली व आपापल्या पॉवर पॉईंट स्लाईड्स वर शेवटचा हात देऊ लागली. बघता बघता ०९ वाजले व ठरल्या प्रमाणे सर्वाधिकारी व कार्याधिकारी साहेब २ जपानी ऑडिटर (परीक्षक) घेऊन कार्यालयात हजर झाले . रीती रिवाजाप्रमाणे परीक्षकांचे स्वागत व सर्व अधिकाऱ्यांची ओळख परेड संपन्न झाली, नंतर पुढील २ दिवसाचा आराखडा ठरवून सभा चहा नाष्ट्या साठी स्थगित झाली.
सुरवात अपेक्षे परिमाणे झाल्या मुळे सर्वाधिकारी साहेब खुश होते. तेवढ्यात एका परीक्षकाने प्रसाधनगृह कुठे आहे अशी विचारणा केली. लगेच सर्वाधिकारी व कार्याधिकरी साहेबाच्या चेहऱ्यावर एक पुसटशी विजयी रेषा उमटली ती इतर सर्व अधिकाऱ्यांनी सवयीने बरोब्बर टिपली. त्या सरशी ४-५ अधिकारी एकदम उभे झाले व परीक्षकांना मार्ग दाखवायची तयारी दर्शवली. सर्वाधिकाऱ्यानी सर्वांना नजरेने दटावले आणि स्वतः परीक्षकांना नवीन प्रसाधना कडे घेऊन गेले. उभे झालेले अधिकारी पण मग पाय मोकळे करण्याच्या बहाण्याने नूतन प्रसाधनगृहा कडे किंवा प्रसाधनगृह दिसेल अश्या जागे कडे जाऊन उभे झाले.
नवीन प्रसाधनगृह चे काम रात्री कधी तरी पूर्ण करून विश्वकर्मा मंडळी निघून गेली होती व सकाळ पासुंन गडबडी मध्ये कुणाला तिकडे जाऊन बघायला सवड मिळाली नव्हती. ते प्रसाधनगृह बाहेरून दाराची काडी लावून बंद केले होते. सर्वाधिकारी जपानी परीक्षकानं घेऊन तिकडे गेले तेव्हा जपान्याने पण नवीन प्रसाधन गृह बघून बारीक डोळे अजून च बारीक करून व स्मित करून खुश झाल्याचे कळवले. सर्वाधिकारी आता अजून च आत्मविश्वासमग्न झाले व त्यानीं दारा ची काडी सरकवली आणि दार मध्ये लोटले पण ......
दार जागचे हलले च नाही, आता साहेबानी आधीपेक्षा अजून जास्त जोर लावून दार लोटले, परंतु परिणाम शून्य. हाताने ढकलून दार उघडं नाही हे बघून साहेबान्नी जोरात लाथ घातली तरी पण दार ढिम्म हलेल तर शपथ. जपान्यां चा चेहरा आता कसनुसा झाला, व तो बोलला कि राहूदे मला आता दुसरं एखाद प्रसाधन गृह दाखवा . पण सर्वाधिकाऱ्यानी त्याला साफ मना केलं आणि कार्याधिकार्यांना फोने करून त्वरित तिकडे यायला फर्मावले.
कार्याधिकारी पण हातातला चहा व दुसरा परीक्षक तिकडे च सोडून पळत च घटनास्थळी हजर झाले. त्यांना साहेबांचा चेहरा पाहून लगेच परिस्थिती चा अंदाज आला ( जर मोठा अधिकारी व्हायचं असेल तर साहेबांचा चेहरा वाचता येणे व त्या नुसार बोलणे, कृती करणे हे एक अत्यावश्यक कौशल्य आहे ) . त्यांनी पण जोर लावून बघितला पण दारा ने न उघडण्याची जणू शपथ च घेतली होती. त्यांनी मेंटेनन्स अधिकाऱ्याला दोन लोक घेऊन तिकडे पाचारण केले. तोवर जपान्यांनी अवस्था अजून च अवघडली व त्याने परत एकवेळ पर्यायी जागे साठी विचारणा केली पण साहेबानी त्याची विनंती ह्या वेळी पण धुडकावली, आणि तिथेच कार्याधिकाऱ्यांची झाडाझडती सुरु केली, कार्याधिकारी पण ह्या अनपेक्षित परिस्थिती मुळे बिथरले व दोघं मध्य शाब्दिक वाद सुरु झाला ( एवढ्या पगारात असेच काम होतात ) . एव्हाना इतर मंडळ पण घटनास्थळी जमले व मजा पाहू लागले होते. मेंटेनंस अधिकारी त्याचे दोन लोक घेऊन दरवाजा उघडायचा प्रयन्त करत होता. ह्या सगळ्या गडबडीत बिचारा जपानी परीक्षक मात्र रडवेला होऊन बघत होता.

शेवटी दुसरा एक अधिकारी जपानी परीक्षकाला जुन्या सार्वजनिक प्रसाधनगृहात घेऊन गेला व त्याला मोकळा केला त्याने जागेवर जाऊन त्याचा सहकार्याला जपानी मध्ये झालेला संपूर्ण प्रसंग वर्णन केला व त्या नंतर दोघांनी संपूर्ण दोन दिवसात लघु किंवा दीर्घ कुठलीच शंकाच काढली नाही.

वास्तविक दारा वरील रंग ओला असताना कडी लावून पेंटर निघून गेले होते व त्यामुळे दार चौकटी ला घट्ट चिटकून बसले होते यथावकाश ते दार उघडण्यात यश आले व ऑडिट संपल्या वर ते प्रसाधगृह अधिकाऱ्यां साठी राखीव करण्यात आले. त्याचे खाजगीत "साहेबांचा ताजमहाल" असे नामकरण झाले.
कालांतराने सर्वाधिकारी साहेब निवृत्त झाले , कार्याधिकारी साहेब पण कंपनी सोडून गेले पण ते प्रसाधनगृह आज पण सेवेत आहे आणि तिकडे गेलो कि हमखास साहेबांची व ह्या किस्स्या ची आठवण येतेच....

कथाविचार

प्रतिक्रिया

त्या नंतर दोघांनी संपूर्ण दोन दिवसात लघु किंवा दीर्घ कुठलीच शंकाच काढली नाही.>>>हे एकदम जमलय भारी!

rahul ghate's picture

13 Jul 2024 - 9:19 am | rahul ghate

धन्यवाद

खेडूत's picture

6 Jul 2024 - 1:52 pm | खेडूत

मस्त!
पण जपानी लोकांबरोबर काम करणे आनंदाचे असते. शिकायला मिळते.

आमच्याकडेही पूर्वी कमिटी यायची ते आठवलं!

Bhakti's picture

6 Jul 2024 - 4:30 pm | Bhakti

कमिटी एक सोच!!(किसकी) 😀

rahul ghate's picture

13 Jul 2024 - 9:20 am | rahul ghate

कमिटी पन भारी आहे .

कंजूस's picture

6 Jul 2024 - 3:34 pm | कंजूस

हाहाहा

Bhakti's picture

6 Jul 2024 - 4:29 pm | Bhakti

हा हा!!

rahul ghate's picture

13 Jul 2024 - 9:21 am | rahul ghate

हा हा!!

मुक्त विहारि's picture

6 Jul 2024 - 4:38 pm | मुक्त विहारि

एकदम खुसखुशीत ....

सौंदाळा's picture

9 Jul 2024 - 1:10 pm | सौंदाळा

खल्लास किस्सा
मजा आली. लिहिण्याची स्टाईल पण भारीच

चौकस२१२'s picture

9 Jul 2024 - 3:00 pm | चौकस२१२

ह्या सगळ्या गडबडीत बिचारा जपानी परीक्षक मात्र रडवेला होऊन बघत होता.
या यावरून "येड्यांची जत्रा " चित्रपटातील "शे(ण ) गोळे पाटलांनी केलेले सार्वजनिक संडासाच्या उद्घटनाचा प्रसंग आठवला .. सतीश तारे यांचा अप्रतिम हजरजबाबी अभिनय ....

असंका's picture

14 Jul 2024 - 12:41 pm | असंका

कहर जमून आलंय....!!
'ऑडिट च्या खर्चातून मंजूर' हे तर निव्वळ अप्रतिम....!!!

धन्यवाद!!

नठ्यारा's picture

31 Jul 2024 - 11:31 pm | नठ्यारा

मस्त खुसखुशीत किस्सा. हीथ्रो तर्फतल ( टर्मिनल ) ५ च्या उद्घाटनाची आठवण झाली ( इंग्रजी दुवा ) : http://news.bbc.co.uk/1/hi/uk/7322453.stm

-नाठाळ नठ्या