१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो. अतिषय प्रेमळ शब्दात विनवणी करतो अन मग भगवान चतुर्भुज रुपात धाऊन येतात अन गजेंद्राला मोक्ष मिळवुन देतात !
गजेंदु महासंकटी वास पाहे। तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥
उडी घातली जाहला जीवदानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥ मनाचे श्लोक ११८॥
मोमा मधील गजेंद्रमोक्षाचे एक सुंदर रेखाटन . ह्यामध्ये मकर रुपातुन मुक्त झालेला गंधर्व दिसुन येतोय !
२. पण तुम्ही जर सूक्ष्मपणे , चिकित्सकपणे विचार केलात, एखाद्या खऱ्या वेदांती प्रमाणे विचार केलात तर.... गजेंद्रमोक्ष हा एक विनोद आहे, मेलोड्रामा / नाटक आहे. नाही का !
कारण -
विद्या विनय सम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी | शुनि चैव श्वपाके च पंडिता : समदर्शिन :||
एका वेदान्ति मनुष्याकरिता - विद्याविनय संपन्न ब्राह्मण , गाय, हत्ती, कुत्री , कुत्री खाणारा चांडाल , सर्वांभूती एकच ब्रह्मतत्व दिसत असते. तो सर्वांप्रति समबुध्दीनेच पहात असतो . हत्तीचा पाय पकडणारी मगर, देवाचा धावा करणारा हत्ती, अन् मदतीला धाऊन येणार देव... तिघेही एकच ब्रह्म. मग काय धावा करणे अन् काय मदतीला धाऊन येणे , सगळाच मेलोड्रामा.
३. मग आता त्याच नजरेने पाहिलं तर मग प्रल्हाद , नृसिंह , त्रिविक्रम, परशुराम, राम , कृष्ण सगळेच मेलोड्रामा.
४. गौडपादपाचार्य, गोविंदयति, , शंकराचार्य....
..... गुरु दत्तात्रय ,गोरखनाथ, निवृत्तीनाथ...
.....माऊली, एकनाथ , समर्थ , गोंदवलेकर महाराज,
....बाजीराव पेशवा, माधवराव, नानासाहेब फडणवीस , लोकमान्य टिळक ....सर्वांचीच जीवने... एक मेलोड्रामा.
५. लोकमान्य टिळक, सावरकर , योगी अरविंद , विवेकानंद , त्यांचे समकालीन असलेले आपले पणजोबा, मग आजोबा, आपले आईवडील,
.... खुद्द आपण...
.......आणि तेवढं नव्हे तर आपली पोरं, त्यांची पोरं
... हा सर्वच्या सर्व एक निवांतपणे आपल्या स्वतःच्या गतीने उलगडत जाणारा मेलोड्रामा !
Are you enjoying the show ?
६. मग ह्या सर्व अनादि काळापासुन चालु असलेल्या मेलोड्रामाचा उद्देश तरी काय ? तर एका वेदांतीला त्याच्या मुळरुपाविषयी जागे करणे !
हे सर्व चराचर हे एक ब्रह्म आहे बस्स. मगर , हत्ती , गरुड, विष्णू राम, कृष्ण , आचार्य , समर्थ, आणि आपणही... हे सर्वच विष्णु आहेत. आता मग काय बंध अन् काय मोक्ष . हा अख्खा मेलोड्रामा काय अन तो अलिप्तपणे पाहणारा वेदांती काय ! हे लिहिणारा काय , वाचणारा काय , कळणारा काय अन न कळणारा काय . सर्वच केवल एक . १
अवघेचि वैकुंठ चतुर्भूज !!
एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूतान्यनेकश:।
त्रीँल्लोकान्व्याप्य भूतात्मा भुङ्क्ते विश्वभुगव्यय:।।
सर्वं खलविदं ब्रह्म. :)
आणि तत्वमसि . तो तूच आहेस !!
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥
Good morning!
श्रीकृष्णार्पणमस्तु !
_________________________________________________________
प्रतिक्रिया
15 Jul 2024 - 4:02 am | चित्रगुप्त
थोडक्यात लिहिलेला नेटका लेख आणि सुंदर चपखल चित्रे. अतिशय आवडले.
-- गजेंद्रमोक्षाची कथा जर मोरोपंत, रघुनाथ पंडित, वामन पंडित इत्यादिकांपैकी कुणी काव्यबद्ध केली असेल तर अगदी अवश्य इथे द्यावी.
मोमा मधील रेखाटन हे कांगडा शैलीचे वाटते. (MOMA म्हणजे Museum of Modern Art, New York ना?)
अनेक आभार.
16 Jul 2024 - 11:41 pm | प्रसाद गोडबोले
मला वामन पंडीत ह्यांनी रचलेले काव्य सापडले :
https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/gajendra-moksha-st...
Museum of Modern Art, New York मधील चित्राच्या रेखाटनावरुन शैली कळली नाही , तिसरे चित्र मात्र नक्की कांगडा असावे.
:)
17 Jul 2024 - 4:21 pm | चित्रगुप्त
मोमा मधील चित्र कांगडा/गुलेर आणि तिसरे चित्र (बहुतेक) कोटा शैली.
15 Jul 2024 - 11:46 am | Bhakti
निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते ।
सोऽश्नुते सकरान्कामान् क्रमेणैवसकरान्कामान् क्रमेणैव द्विजोत्तमः ॥ ४॥
अर्थ - तो द्विजोत्तम म्हणजे,म्हणजेविद्वानांतील , महाविद्वान - हा त्या परमव्योमामधील अदृश्य अश्या
ब्रह्मतत्त्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्त्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो . ॥ ४॥
ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम्-ममुक्षुसख:|
16 Jul 2024 - 11:44 pm | प्रसाद गोडबोले
हे चक्क आमच्या श्रीधरस्वामींनी रचलेले स्त्रोत्र आहे असे थोडेफार शोधाशोध केल्यावर कळले!
मला माहीतच नव्हते . नक्की वाचतो !
मनःपुर्वक धन्यवाद :)
15 Jul 2024 - 3:30 pm | प्रचेतस
जर देवे नाही आणिक | तर पापपुण्यमोचक |
कर्मबंध सुखदु:खतारक | ज्ञान कोणाशी बोले ||
बाकी पट्टदकलमधलं अप्रतिम गजेन्द्रमोक्ष शिल्प खास तुमच्यासाठी
16 Jul 2024 - 11:51 pm | प्रसाद गोडबोले
अहाहा,
कसलं अफलातुन शिल्प आहे हे !!
धन्यवाद वल्ली सर !
15 Jul 2024 - 7:52 pm | कर्नलतपस्वी
गजेंद्र मोक्ष, लकुलीश मंदिर,पावगढ, गुजरात. संभवता:सातव-आठवे शतक.
तकनीकी सहाय्य श्री प्रचेतस. धन्यवाद.
16 Jul 2024 - 11:53 pm | प्रसाद गोडबोले
मस्तच !
धन्यवाद !
17 Jul 2024 - 6:49 pm | मुक्त विहारि
आमचे बाबा महाराज डोंबिवलीकर म्हणतात की, ही कहाणी खूप ठिकाणी लागू पडते... अगदी मिपाच्या बाबतीत देखील...
मगर म्हणजे डूआयडी आणि गज म्हणजे मिपा... आता, ह्या डूआयडींच्या तावडीतून ज्या दिवशी मिपा सुटेल तो सुदिन....