कृष्णाच्या गोष्टी-४

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
26 Jun 2024 - 11:28 am

*रासलीला
अ
कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात. महाभारतात जेव्हा द्रौपदीला वेणी खेचून सभागृहात दु:शासन आणत होता.तिचा भरसभेत अपमान करत होता. तेव्हा लाचार झालेल्या आपल्या पतींना पाहून त्या पतीव्रतेने मदतीकरता हाक मारली ती कृष्णाला!

"गोपीजन प्रिया कृष्णा धाव रे धाव"

गोपीजन प्रिय हा कृष्ण जीवनावरील कलंक असता तर कठीण प्रसंगी त्याला मदतीला बोलवतांना द्रौपदीला कृष्णाची आठवण झाली नसती. लहान व किशोर वयातील कृष्णावर सर्वच लहान थोर वृद्ध अशा गोपींचे विलक्षण प्रेम होते. तो अतिशय सुंदर व गुटगुटीत मुलगा सर्वांना खूप खूप आवडत असे. महाभारतात वरील द्रौपदीद्वारे केलेला उल्लेख सोडता वज्र गोपीकृष्ण संबंध आढळत नाही. पुढे विष्णुपुराणात गोपी कृष्णाचा प्रेममूल्य प्रतिव्रता दृष्टीने आहे. तर भागवत पुराणात याला शृंगार साज चढतो. ब्रह्मवैवर्तात संपूर्ण विषयिकतेचे स्वरूप प्राप्त होते.

*व्रज गोपी- विष्णुपुराण

आ
पंचम अंशाच्या तेराव्या अध्यायात ५८ श्लोकात असे लिहिले आहे ,

कृष्णं गोपांगना रात्रौ रमयन्ति रतिप्रिया:||

हा रमयन्ति आणि रतिप्रिय यातील 'रम्' धातूचा खरा अर्थ क्रीडा करणे असा आहे .खरे तर रास ही एक प्रकारची क्रीडा आहे,ज्यामध्ये स्त्री पुरुष एकमेकांचे हात धरून गाणी गातात ,गोलाकार नाचत असतात. प्राचीन काळात स्त्रियांच्या वेद अध्ययनावर बंदी तर कर्ममार्ग कष्ट साध्य होते आणि योग साधना देखील अवघडत होती. म्हणून ज्यातून चित्तरंजनही होईल आणि परमेश्वर चरणी मन ,बुद्धि गुंतुन पडेल असा भक्ती मार्ग रास क्रीडेच्याद्वारे कृष्णाने स्त्री वर्गाला दाखवला असे काही विद्वानांचे मत आहे. पाश्चात्य बोलडान्स मात्र आपण मोठ्या उत्सुकतेने पाहतो कारण पाश्चात्य समाजात याला कलंक मानत नाही किंवा नींद्य ही मानत नाही. खरे तर कृष्णाच्या काळात हे यमुना तीरावरच्या गोप गोपिकांचे असे नाच सामाजिक दृष्टीने निंद्य मानले जात नसत. पावसाळा संपल्यानंतर सुगीच्या दिवसात यमुनेच्या तीरी चांदण्यात असे नाच होत असे. याला सुगीचा आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत असे म्हटले जाते .

*व्रज गोपी- हरिवंश

यमुना तीरावरच्या चालणाऱ्या या नृत्यांना हरिवंशात रास ही संज्ञा नाही त्यांना इथे नाव आहे 'हल्लीस' आणि विष्णू पर्वाच्या त्या ७० व्या अध्यायाचे नाव आहे हल्लीसक्रीडा.हल्लीस म्हणजेच स्त्री-पुरुषांनी हातात हात घालून गोलाकार नाचत गाणी म्हणण्याचा प्रकार ,मंडल करून नृत्य करणे.

विष्णुपुराणातील गोपींचा कृष्णभक्ती योग हरीवंशकर्त्याला समजलाच नाही. हरिवंशात अनेक ठिकाणी विलासप्रियतेचे चित्रण आले आहे.

*व्रज गोपी भागवत
हरिवंशापेक्षा गोपींचा अधिक विलासी भाव येथे वर्णिला आहे .पण त्या साऱ्याला भागवतकारांनी एक आध्यात्मिक डूब दिली आहे.
*गोपीवस्त्रहरण
इ
भागवतातील रास नृत्याचा विचार करण्याआधी दशांस्कंदाच्या बाराव्या अध्यायातील गोपी वस्त्रहरण प्रसंगाचे विवेचन करणे योग्य ठरेल. ही कथा महाभारत विष्णुपुराण किंवा हरिवंशात नाही. गोपींच्या कृष्णावरील अतिप्रेमामुळे त्यांना कृष्णाला पती रूपात प्राप्त व्हावे असे वाटले आणि त्यासाठी त्यांनी 'कात्यायनी' नावाचे व्रत एका महिन्यात केले. नदीत स्नान करायचे .तीरावर वस्त्र उतरून ठेवायचे आणि डुबकी घ्यायची. याप्रकारे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी व्रत पूर्ण होणार होते त्या दिवशी त्या यमुनेत स्नान करत होत्या. तेव्हा कृष्ण तेथे आला त्यांनी सर्व गोपींची वस्त्रे उचलली आणि जवळच्या कदंब वृक्षावर जाऊन तो चढून बसला. त्या त्याला वस्त्रे परत देण्याची याचना करू लागल्या.भागवतकरांच्या म्हणण्याप्रमाणे गोपींना त्यांचे कर्मफल देण्याकरता तेथे आलेल्या कृष्णाने त्यांची वस्त्रे परत करण्याचे नाकारले.म्हणाला, बाहेर या आणि तुमचे हात जोडून मला विनंती करा मग मी वस्त्रे परत देईन. ईश्वराला कोणीही भक्तीने सर्वस्व अर्पण केल्यापासून त्याची प्राप्ती होत नाही.गोपींनीही कृष्णाला प्राप्त करण्यासाठी त्याला सर्वस्व अर्पण केले. स्त्रीला धन कर्म धर्म भाग्य या सगळ्यांपेक्षा लज्जेचा त्याग करता येत नाही. कृष्णाने गोपींना तो लज्जात्याग करायला लावला .गोपींचे सर्व समर्पण कामवासनाजन्य नसून ते भक्तीजन्य होते, हा भागवतकरांचा दावा आहे.

परंतु वस्त्रहरणाच्या प्रसंगात कृष्णावर परस्त्री गमनाचा कलंक येतो आणि तो कुठलाही आध्यात्मिक रूपकाने पुसता येत नाही याचा भागवतकरांना विसर पडलेला दिसतो. पण कृष्णाला जितेंद्रिय म्हणून दोष देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व प्रकरण बघता कृष्णचरित्रावर हा डाग मानला जाऊ नये असे दिसते. कारण वृंदावन सोडून मथुरेत आल्यानंतर कृष्ण कधीही परत गोकुळात आला नाही. गोपींच्या प्रेमात तो तसा अडकलेला असता.तर हे घडले नसते. कृष्णाचे दैविकरण झाल्यानंतर कृष्ण जीवनात हे प्रसंग प्रक्षिप्त झाले असावेत. कारण देवाच्या बाबतीत काही होत नाही ,पाप पुण्याच्या संकल्पना आपल्या सामान्यांसाठी!

*व्रजगोपी ब्रह्मवैवर्त पुराण -"राधा"
उ
ब्रह्मवैवर्त पुराण आणि कवी जयदेवाचे प्रख्यात दीर्घ काव्य 'गीतगोविंद' याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्राचीन ग्रंथात राधेचा उल्लेख सापडत नाही. रासपंचाध्यायातच काय संपूर्ण भागवतात ही राधा नाही, विष्णुपुराणात ,हरीवंशात किंवा महाभारतात ही कुठे राधा नाही. पण नव्या ब्रह्मवैवर्त पुराणात कृष्णाची एक नवी प्रतिमा उभी केली गेली आहे. या पुराणात कृष्ण हा विष्णूचा अवतार नाही. तर कृष्ण हेच मुलतत्व आहे. विष्णू वैकुंठात राहत असला पण कृष्ण गोलोक त्यापेक्षा कितीतरी उंचावर आहे आणि त्याच्या रास मंडळामध्ये कृष्ण राहतो असे सांगितले आहे.या गोलकाची अधिष्ठाती देवता कृष्ण विलासधरिणी आहे .रास मंडळाला धारण करणारी ती राधा आहे. वृंदावनातील बाळकृष्ण आणि राधा एक विवाहित तरुणी आहे. परंतु पौराणिक कथेनुसार राधा कोणा एका श्रीदामाच्या शापामुळे पृथ्वीवर मानवी रूपात राहिली.गोपी पत्नी आणि तरीही कृष्णप्रिया म्हणून कलंकिनी ठरली.तसा तिला शापच होता राधे मागून कृष्ण पृथ्वीवर जन्मला म्हणून वृंदावनात तो बाल रुपात होता तरीही राधेचा प्रियकर होता कारण तो देव होता. ब्रह्मवैवर्त पुराणातील राधाकृष्ण संबंधावर नवा वैष्णव धर्म आधारलेला आहे. विष्णुपुराण, भागवत पुराण कुठल्याही इतर पुराणात या वैष्णव धर्माचे नाव सुद्धा सापडत नाही. वैष्णवधर्माचे राधा हे केंद्र आहे आणि त्याच्या आधारे जय देवाने आपल्या गीत गोविंद नामक दीर्घ काव्याची रचना केली आहे. आणि त्याचाच आधार घेत अनेक ठिकाणी कृष्ण संगीताची इमारत उभी झाली आहे.

* प्राथमिक वैष्णव धर्माचा आधार वेदांतील ईश्वरवाद आहे. वेदांता द्वैतवाद आणि अद्वैतवाद यांची चर्चा आहे. प्राचीन काळी अद्वैतवादात अशी भिन्नता नव्हती. ईश्वर जगातील संपूर्ण चेतन आणि अचेतन सृष्टीत भरला आहे पण तो सर्वात भरूनही उरला आहे ही वैष्णवी धर्माची धारणा आहे. तांत्रिक धर्मातील वैशिष्ट्ये वैष्णव धर्मात संलग्न करून वैष्णव धर्माचे नव्याने रचना करण्याचे कार्य ब्रह्मवैवर्तकाराने केले आहे. यातील राधा ही सांख्यांची मूळ प्रकृती आहे आणि कृष्ण म्हणजे वेदांत त्यांचा परमात्मा! ब्रह्मवैवर्तातील श्रीकृष्ण जन्मखंडात कृष्ण पुन्हा पुन्हा राधेला तू मूल प्रकृती आहेस असे सांगतो. परंतु या अभिनव वैष्णव सांप्रदायातील मूल प्रकृती राधा सांख्यातील जशीच्या तशी प्रकृती नाही. सांख्यांची प्रकृती तांत्रिक शक्ती असते.प्रकृती वाद व शक्तिवाद यामध्ये अंतर आहे. प्रकृती पुरुषापासून संपूर्ण तया भिन्न असते. परंतु परमात्मा शक्तीचा आधार आहे .त्यामुळे आत्मा आणि शक्ती भिन्न असू शकत नाही. हा शक्तीवाद फक्त तंत्रापुरता मर्यादित राहिला नाही वैष्णवांनी सांख्यांच्या प्रकृतीला वैष्णव शक्तीचे रूप दिले आहे.ते लिहितात कृष्ण राधेला म्हणतो "राधे तुझ्याशिवाय मी फक्त कृष्ण आहे पण तुझ्याबरोबर राहिल्याने मी' श्री 'कृष्ण झालेला आहे." विष्णुपुराणाच्या प्रथम अध्यायाच्या आठव्या अंशमत 'श्री' चा महिमा वर्णिला आहे. आणि तिच्याविषयी जे जे सांगितले आहे ते ते ब्रह्मवैवर्तकरांनी राधेच्या बाबतीत सांगून राधा हीच 'श्री' आहे आणि ईश्वराची शक्ती आहे दोघांचा विधी पूर्वक परिणय म्हणजेच शक्तिमानाच्या शक्तीचा स्फुरण आहे शक्तीचा विकास म्हणजे दोघांचा विहार आहे असे सांगितले आहे. पण भागवताच्या दशांश भागतील तिसऱ्या अध्यायातील २८ व्या श्लोकात 'अनयाराधीतो नूनम' असा संदर्भ आला आहे म्हणजे यात अनयचा आणि राधेचा उल्लेख केला आहे .पण यात राधा धातू चा अर्थ आहे आराधना किंवा पूजा करणारी कृष्णाची आराधिका राधा .तर अमरकोश मध्ये कृतिका नक्षत्रापासून राधा विशाखा नक्षत्र १४ वे .पूर्वी गणना कृतिका नक्षत्रापासून होत असे कृतिका नक्षत्रापासून राशी गणना सुरू केली तर विशाखा नक्षत्र वर्षा मध्यावर येते म्हणून राधा रास मंडळात मध्यवर्ती असो नसो राशी मंडळात ती मध्यवर्तीच होती. गोपीकृष्ण राधाकृष्ण संबंध हरिवंशकारांनी आणि भागवत ब्रह्मवैवर्ततादी पुराणांनी किती विलासी पद्धतीने रंगवले असले ,सकृत दर्शनी वैश्विक दाखवले असले तरी कृष्ण एक महापुरुष या दृष्टीने त्याच्या या किशोरावस्थातील चरित्राकडे चारित्र्य राखण्याच्या दृष्टीने या प्रसंगाकडे बोट दाखवणे मुळीच रास्त नाही.

धर्म संरक्षणार्थ अवतरण झालेल्या कृष्णाच्या जीवनातील रास क्रीडेला चंद्रावरच्या काळाप्रमाणे कलंक असे कसे म्हणता येईल ?
गुरु सांदिपनींने व्यभिचारिक कृष्णाला आपला शिष्य म्हणून मान्यता दिली असती का ? कंसवधानंतर वृंदावनात जाऊन परतलेल्या बलरामाजवळ कृष्ण वृंदावनातील एखाद्या गोपी मध्ये अडकलेला असता तर तिची खास चौकशी त्याने केली नसती का? कृष्णाच्या पराक्रमावर भाळून रुक्मिणीने कृष्णावर प्रेम केले होते कृष्णाच्या वृंदावनातील अवैध्य प्रेमाच्या भानगडी तिच्या कानावर गेल्याशिवाय राहिल्या असत्या का? गेली हजारो वर्ष भारतवर्ष या महापुरुषावर विलक्षण प्रेम करत आला आहे का बरे ?या साऱ्यांच्या प्रश्नांची नकारार्थात उत्तरच सारे गवसते असे म्हणायला हवी.

संदर्भ -शोध कृष्णाचा -प्रवसी पूर्णत्वाचा

लेखक- प्रा.डॉ.राम बिवलकर

कथाआस्वादसंदर्भ

प्रतिक्रिया

Bhakti's picture

26 Jun 2024 - 11:40 am | Bhakti

पण राधाकृष्ण प्रेमाचे दाखले कालही दिले जात होते..आजही दिले जातात...आणि उद्याही दिले जातील.सामान्य माणसांचा जीवन मूलाधार प्रेम आहे,तो राधाकृष्ण समर्पण भावनेने पूर्ण होतो.

प्यार में डूबी, प्यार में खोई
प्यार की धुन में जागी ना सोई
प्यार में डूबी, प्यार में खोई
प्यार की धुन में जागी ना सोई
दुनिया से है वो अंजानी
सब कहते हैं प्रेम दीवानी
किसना से मिलती है भूल के हर बंधन
हो, किसना की ही माला जपती है वो जोगन
नैनों में, साँसों में, मन में किसना
हर पल है जीवन में जिसके किसना
वो राधा है
https://youtu.be/awciNTUNY3w?si=4qhTn27ymL9mtZI5

आणि आपल्या कृष्णाने इतर गोपींकडे पाहिल्यावर ह्या राधेचा जळफळाट होतच राहणार ना..
कान्हा जी का जो सदा इधर उधर ध्यान रहे
राधा बेचारी को फिर अपने पे क्या मान रहे
बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले
राधा कैसे न जले राधा कैसे न जले
आग तनमन में लगे
राधा कैसे न जले राधा कैसे न जले
https://youtu.be/qNnvL0ztJhA?si=opzSF-hIy4-E1bFo

अर्धवटराव's picture

29 Jun 2024 - 1:00 am | अर्धवटराव

कुरुंदकरांनी राधेबद्दल एक फार छान विचार मांडलाय. त्यांच्या मते राधा हि साहित्यविश्वात प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक आहे.

नशीबाने/वडीलांनी पदरात पाडलेल्या नवर्‍यावर प्रेम करणारी पण त्याला इतर कोणाबरोबर शेअर करायला तयार नसलेली सत्यभामा हे सामान्य प्रेमाचं प्रतिक.

आपल्याला आवडणारा जोडीदार स्वतः प्रयत्न पूर्वक मिळवणारी, त्याचं देखील आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे हे जाणुन त्याच्याशी आनंदाने संसार करताना बाहेर त्याचे काय उपद्व्याप चालले आहेत याच्याशी घेणंदेणं नसणारी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्शा एक पातळी उच्च असं प्रेमाचं प्रतीक.

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सहवासाची देखील अपेक्शा न करणारी राधा हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक.

राधा हे पात्र इतक्या उशीराने का पुढे आलं याचं एक कारण म्हणजे श्रुंगारभक्ती/व्रजभक्तीच मुळी उशीराने रुजली हे आहे.

महाभारत युद्ध हि एक वास्तव घटना आहे असं मान्य केलं काय, किंवा तो एक कल्पनाविलासातुन निर्माण झालेला नितीग्रंथ आहे असं म्हटलं काय... पाच एक हजार वर्षापूर्वी समाजाची लौकीक आणि पारलौकीक जीवनाबद्दल काय धारणा होती याचं यथार्थ चित्रण महाभारतात नक्कीच आहे. धनशक्ती, राजसत्तेचा धुमाकुळ चाललेला तो काळ. सगळच समाजजीवन घुसळुन निघालेलं. आध्यात्माची प्रेरणा असणारे समाज घटक अशावेळी योगसाधना करणार, वनवास पत्करुन ध्यानधारणा करणार, पूजाअर्चा करणार.
पुढे बुद्धमार्गाचा प्रभाव असण्याच्या काळात सनातनी आध्यात्म हे ज्ञान आणि भक्तीच्या कोंबीनेशन मार्गाने जाणार.
त्यानंतर भक्तीमार्ग स्वाभावीकपणे जास्त लोकसंमत होणार व भक्तीमार्गातुन ज्ञानाचे डोज पाजण्यात येणार.

योगेश्वर श्रीकृष्ण, गीताशास्त्रात सारं ज्ञान ओतणारा श्रीकृष्ण, आणि प्रेमभक्तीने प्राप्त करता येणारा श्रीकृष्ण. हा सिक्वेन्स त्या त्या काळाचं समाजस्थितीचं प्रतिबींब आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील पात्रं याच टाईम स्केलवर दृगोच्चर होणार. म्हणुन राधेला कृष्णसाहित्यात फार उशीराने स्थान मिळालं.. ति अ‍ॅक्चुअल इतिहासातील व्यक्ती असेलही, पण पूर्वी तिची दखल घ्यावीशी कोणाला वाटलच नाहि. शामकुंड, राधाकुंड, व इतर अनेक तीर्थक्शेत्र देखील फार उशीराने पुढे आलीत. याचंही कारण हेच.

२१व्या शतकातील वैज्ञानीक प्रगती बघता ३०वं शतकात समाज जीवन किती भिन्न असेल याची कल्पना करा. आजच्या दृष्टीने केवळ चमत्कार म्हणाव्या अशा गोष्टी तेंव्हा अगदी सामान्य झालेल्या असतील. तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, व घोर अंगीरसांसारखे पात्रं प्रामुख्याने चर्चीले जातील.

Bhakti's picture

29 Jun 2024 - 12:40 pm | Bhakti

छान विवेचन केलंय!
तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल,
अगदी आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कधीच विसरली जाऊ शकत नाही.

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2024 - 7:40 pm | कर्नलतपस्वी

खुपच माहितीपुर्ण, सुंदर लिखाण. पुस्तक मागवायला हवे.

पु भा प्र

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2024 - 8:28 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर लेखन !

मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो. मुळ महाभारतातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेत शॄंगार नाही असे माझे म्हणणे नाही, मुळ महाभारतात एक दोन ठिकाणी कृष्णाचा शृंगारिक , रसिक जीवनाचे दर्शन करवणारे श्लोक आहेत , पण हे रासलीला वगैरे प्रकार वाढीव वाटतात. अर्थात कृष्णासारखा आकर्षित करणारा तरुणवयात मुलींना , स्त्रीयांना आकर्षित करत असणार ह्यात शंकाच नाही, पण एकुणच त्याचे चित्रण मनास पटत नाही.
शिवाय इस्कॉनी दहशतवादी त्यातील रोमान्स अन् शृंगार काढुन त्याला भक्तीरसाची पुटं चढवायचा प्रयत्न करतात ते तर फारच हास्यास्पद वाटतं मला.

गीतगोविंद हे एक वेगळे प्रकरण आहे. ह्याला पौराणिक आधार नसला तरीही हे असं झालेलं असु शकतं असं मला वाटतं . त्यातील शृंगार उच्चकोटीचा आहे . त्यातील एक दोन श्लोक ऐकुन भोळ्याभाबड्या इस्कॉनी भक्तांना फेफरं येईल .

परिहर कृतातङ्के शङ्कां त्वया सततं घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि ।
विशति वितनोरन्यो धन्यो न कोऽपि ममान्तरं स्तनभरपरीरम्भारम्भे विधेहि विधेयताम् ॥ ५४ ॥

हे कुपिते, माझ्या हृदयात दुसरी कोणीतरी स्त्री लपली आहे ही शंकाच तु सोड, विचार कर- तुझे हे भरीव स्तन आणि ताशीव नितंब माझ्या एवल्याश्या हृदयात दाटीवाटीने घुसलेले असल्यावर तिथे दुसर्‍या कोणाला तरी जायला जागा उरेल का ! मदनाची गोष्ट वेगळी आहे, त्याला देहच नाही म्हणुन तो मात्र सहज माझ्या हृदयात तुझ्या सहवासाने धन्य होत आहे, राग सोड , तुझ्या ह्या भारदार स्तनांचे ओझे वाहण्यासाठी माझ्या छातीवर ठेव, मी नुसता तुझा आज्ञांकित 'भारवाहक' आहे ह्याची तु मला घट्ट आलिंगन देऊन खात्री करुन घे !

मारङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् ।
निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥

शृंगाराचा 'प्रीतियुध्दाला' जेव्हा आरंभ झाला तेव्हा राधेला सुचले की आपण कृष्णावर विजय मिळवावा, ती कृष्णाच्या डाव्याबाजुला होती ती अचानक वर आली , वुमन ऑन द टॉप ! मात्र तिचा हा आवेश लगेचच संपला, हातात जोर उरला नाही , जघन शिथिल पडले, स्तन थरथर कांपु लागले आणि दमुन गेल्यामुळे तिने डोळे मिटले, शेवटी बायका त्या बायकाच. कितीही सोंग आणले तरी त्यांना पुरुषांचा पराक्रम, हा "पौरुषरस" कसा बरें साधेल !!

___/\___

अहाहा. अहाहा . क्या बात है ! हे कृष्णाचे स्वरुप ज्या पुरुषाने पौरुषरसाचा परिपुर्ण अनुभव घेतलेला आहे त्यालाच समजु शकते.
टकलाच्यापुढं पर्यंत लांबसडक नाम ओढुन , माळा ओढत, ढोलताशाच्या गोंगाटात कीर्तनाच्या नावाखाली दंगा करणार्‍या अन अन त्यातही कडक ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अन कामोपभोग हे नरकाचे द्वार मानणार्‍या थातुरमातुर लोकांना हा कृष्ण समजणारच नाही !

असो.

राधेच्या पीनपयोधरांचे स्मरण करुन कृष्णाशी अद्वैत साधायचा प्रयत्न करत इथेच थांबतो. :)
r
-
इत्यलम.

Bhakti's picture

26 Jun 2024 - 10:26 pm | Bhakti

वाह! अप्रतिम!!
खरंच..का नाकारावे ते अद्वैत? पुरुषाने आपल्या राधेसाठी कृष्ण , स्त्रीने आपल्या कृष्णासाठी राधा अद्वैत साधायला ही राधाकृष्ण लीला अजरामरच आहे!

राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.

पब्लिकजनास शिरेसपणापेक्षा बाष्कळपणाच जास्त आवडतो, काय करणार ? असे 'हिचे' म्हणणे.
-- भाईसाहेब फुरसुंगीकर.

गीतगोविंदावरील अत्यंत सुंदर कांगडा चित्रे बघितलेली आहेत, पण ते काव्य इतके भारी आहे हे ठाऊक नव्हते. कवी-चित्रकार मडळींना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णापेक्षा 'घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि' असा, 'गोळा करून वस्त्रं सारी, बसला चढून कदंबावरी' वाला कान्हा जास्त रोचक वाटतो, हे स्वाभाविकच.
तिकडे युरोपात बिचार्या जुन्या चित्रकारांना 'वधस्थंभावरून खाली आणला जाणारा, सुळावर चढवलेला, पापी लोकांना नरकात आणि पुण्यवंतांना स्वर्गात जागा देणारा येशूच चित्रावा लागायचा. फार तर फार येशूची आई मेरी 'वर्जिन' म्हणुन सुंदर मॉडेलवरून चित्रित करणे, किंवा मेरी माग्देलेन / मॅदेलीन रंगवणे हाच काय तो दिलासा. म्हणूनच जणू पुढील काळात ग्रीक, रोमन पुराणातले प्रसंग रंगवणे सुरू झाले, तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला बहर आला.
.

.

The Feast of Venus - painting by Peter Paul Rubens

नठ्यारा's picture

27 Jun 2024 - 1:31 am | नठ्यारा

प्रगो,

मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.

याबाबत सहमत आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीस शारदामातेस कोण्या भक्ताने प्रश्न विचारला की, जगाचं रहस्य काय आहे म्हणून. यावर माताजी अतिशय मृदू आवाजांत विचारमग्न चेहऱ्याने उद्गारल्या. त्या म्हणाल्या की, नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते. हे या सृष्टीचं रहस्य आहे.

हा मुद्दा ध्यानांत ठेऊन रासलीला वगैरे प्रकरणे वाचावीत ( असं आपलं माझं मत ).

-नाठाळ नठ्या

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2024 - 9:14 am | प्रसाद गोडबोले

नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते

हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .

हेच अद्वैतवेदांती असं म्हणेल -

मानवी रुपात , नर रुपात , लीला अर्थात प्रापंचिक सांसारिक सव्यापसव्य करत करत, शनै:शनै:, त्यातील वैयर्थता लक्षात येऊन , "आपण ह्यात कोठेच नाही" ही जाणीव ठाम होते तेंव्हा नराचा नारायण होऊन जातो. रादर, नराला त्याचे मुळ नारायण स्वरुप लक्षात येते ! हे या सृष्टीचं रहस्य आहे.

:)

बाकी रासलीला बद्दल बोलताना - गोपी कृष्णाच्या अर्धांगिनी नव्हत्या, राधाही कृष्णाची पत्नी नव्हती , दुसर्‍याच कोणाची तरी पत्नी होती. दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात, आणि दुर्दैवाने, मुळात गमक तिथेच आहे. मी मी माझे माझे हे जे मोहाचे पाश नश्वर गोष्टींना जोडलेले आहेत ते सोडुन मी फक्त कृष्णाची आहे हे जाणणे हे रासलीलेचे खरे उद्देश्य आहे! आणि ह्यातही पुढे जाऊन मी कृष्णाची आहे असे म्हणताना मी आणि कृष्ण भिन्नभिन्न आहोत असा अर्थ निर्माण होतो , तोही नको, मीच साक्षात श्रीकृष्ण आहे हे जाणणे हा रासलीलेचा परमोच्च बिंदु आहे ( असं आपलं माझं मत ).

अवांतर : बाकी काहीही म्हणा पण मला ह्या बंगाली अन उत्तरभारतीय लोकांच्या कृष्णाच्या इंटर्प्रिटेशनबद्दल आदर नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या इथं ज्ञानेश्वर माऊलींनी कसलं लिहुन ठेवलं आहे बघा ना -

दर्पणी पाहता। रुप न दिसे वो आपुले। बापरखुमादेविवर विठ्ठले। मज ऐसे केले॥

काय अद्वैताची अवस्था आहे ही !

किंवा असेच तुकोबा काय म्हणातात पहा-

आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥

रातले अनंता ... रातले अनंता .... क्या बात है . अहाहा !!

बाकी अवांतराबद्दल क्षमस्व . आवडीचा विषय निघाला म्हणुन बोलत आहे सुचेल ते.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !
पुढे कृष्णाच्या गोष्टीत - जरासंधवध, खांडवदाहपर्व , रुक्मीणीस्वयंवर , सुभद्राहरण वगैरे वाचायला मजा येईल !

दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात,

सुमारे दहा वर्षांपूर्वी एक बॉलिवूडी गाणे जिथे नाचगाणे होत असे अशा सर्व ठिकाणी हुकमी वाजत असे. त्याची आठवण झाली. :-))

अवांतर :

हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .

द्वैतवाद म्हणजे काय, असं माताजींनी विचारलं असतं. त्या निरनिराळ्या विचारधारांशी बऱ्यापैकी अपरिचित होत्या.

बाकी काही असो, तुमचं अवांतर आवडलं. बिनधास्त घुसा अवांतरात.

-नाठाळ नठ्या

टर्मीनेटर's picture

27 Jun 2024 - 2:41 pm | टर्मीनेटर

मस्त! मजा येत आहे (आता 😀) वाचायला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...