२२ मे २०२४
आज ध्यानाचा तिसरा दिवस.
आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात!
आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच !
ध्यानगृहातुन दिसणारा नजारा : (इथे समोर जे छत दिसत आहे त्या इमारतीचे नाव होते रामकुटीर. सर्वात अफलातुन व्यु होता त्या तिथुन, पण मला तिथे रहायचा योग आला नाही. )
सुरुवातीला मला फक्त सकाळाचे ध्यान आवडायचे, खुप निवांत शांत वाटायचं , पण तेच संध्याकाळाच्या ध्यानाच्यावेळेस मन सैरभैर व्हायचं. मध्येच झोप यायची, परत उठावेसे वाटायचे नाही. पण नंतर मात्र मला सकाळ पेक्षा संध्याकाळचे ध्यान जास्त आवडायला लागले. संध्याकाळाच्या ध्यानानंतर मी संपुर्ण मौन पाळुन ध्यानात जे काही अनुभवलं ते अगदी आतवर खोलवर झिरपुन देण्याचा पुर्ण प्रयत्न करायचो. (अर्थात रात्रीच्या एका कंटाळवाण्या सेशन मुळे त्यात खंड पडायचा, पण शेवटी शेवटी त्या सेशन मध्ये देखील अलिप्त रहाण्याची कला मला जमली :) )
हां तर सकाळी स्वामीजींनी ध्यानानंतरच्या प्रवचनात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सर्वात महत्वाचे अन सर्वांचा कॉमन प्रश्न म्हणजे -
ध्यानात मन एकाग्र होत नाही, मन भरकटातं, मंत्रावर स्थिर रहात नाही, कधी कधी खुप वाईट, निराशाजनक विचार मनात येत राहतात. मग काय करायचं ?
त्यावर स्वामीजींनी खुप सुंदर उत्तर दिले. स्वामीजी स्वतः वेल ट्रेन्ड केमिकल इंजिनियर होते त्यांच्या पुर्वायुष्यात त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सहज मॅथेमॅटिकल / अॅनालिटिकल टर्मिनॉलो़जी येत असे. (ते इतरांना किती कळत असावे ह्याबद्दल मी साशंक आहे.)
कल्पना करा की आपलं मन एका समुद्रासारखं आहे. समुद्राच्या वरच्या स्तरावर असतात तशा त्यात विचारांचा अनेक लाटा उमटर आहेत, कधी तुम्हाला आनंदी वाटतं आहे, कधी दु:खी निराश. पण हे सगळं वरच्या स्तरावर चाललं आहे. तुम्ही जसे जसे समुद्रात खोल खोल उतरत जाता तसे तसे लाटा संथ होत जातात , शांत होत जातात, आणि थोडेसे अंतर खोल उतरलयावर तिथे समुद्र इतका सघन, प्रशांत आणि गंभीर असतो की वर स्तरावर प्रचंड मोठ्ठ्या लाटा उमटात आहेत ह्याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. तसेच जेव्हा आपण ध्यानाला बसत आहोत तेव्हा आपण आपल्या मनात खोलवर उतरत आहोत. हळु हळु . आणि जसे काहीवेळ लाटांचे अस्तित्व जाणावते तसेच हे आपले ध्यानात मनाचे भरकटणे आहे. ठीक आहे. काही लोकांना निराशाजनक किंवा वाईट चिचार येतात ध्यानात , हेही ठीक आहे, हे आपल्या मनातील स्ट्रेस पॉकेट्स, तणावाची गाठोडी आहेत जे एकेक करुन सुटत आहेत. आपले शहरी दैनंदिन जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की घडानारी प्रत्येक घटना , प्रसंग, अनुभव प्रोसेस करायाला आपल्याकडे वेळच नाही. मग अशा प्रसंगांचे स्ट्रेस पॉकेट्स मनात खाली खोलवर जातात. अन धानाच्या अवस्थेत तुम्ही ती एकेक करुन रिकामे करत आहात, मग वाईट तर वाटणारच ना. पण हेही ठीक आहे. कारण हे तुमच्या ध्यानातील प्रगतीचे लक्षण आहे. तुम्हाला ध्यानात झोप येत आहे तर हे तर तुम्ही सरळ सरळ पुरेशी झोप घेत नसल्याचे, स्लीप डिप्राईव्हेशनचे , तुम्ही मनाला आराम देत नसल्याचे लक्षण आहे. झोप आली तर बिनधास्त झोपा. काही हरकत नाही.
तुम्हाला रडु येत आहे, तर हे लक्षण आहे की कोणतातरी क्षण असा होता की जेव्हा तुम्हाला रडायचं होतं पण वेळ काळ प्रसंग पाहुन तुम्ही ते टाळलं आहे, मनाला मोकळ होऊ द्या. काही हरकत नाही. Let it all go. इथे तुम्हाला कोणीही जज करायला बसले नाहीये. रिलॅक्स. जेव्हा हे स्ट्रेस पॉकेट्स मोकळे होतील तेव्हा परत मन मंत्राकडे आणा अन मनात अजुन खोल उतरा. :)
आपल्या तत्वज्ञाना नुसार मनाच्या, चेतनेच्या मुलभुत अशा ५ अवस्था सांगितल्या आहेत.
कल्पना करा की awareness x Thoughts अशी २*२ मॅट्रिक्स आहे. ह्यात पहिल्या कप्प्यात जाणीव आहे आणि विचारही आहे, ही जागृती अर्थात जागेपणाची स्थिती झाली.
दुसर्या कप्प्यात जाणीव नाहीये , पण विचार आहेत , ही स्वप्नाची स्थिती झाली .
तिसर्या कप्प्यात जाणीवही नाही आणि विचारही नाही, ही अवस्था झाली गाढ झोपेची. ह्याला आपल्या तत्वज्ञात सुषुप्ती असे म्हणले आहे. (ह्याला बहुतेक आधुनिक विज्ञानाच्या भाषेत स्लो वेव्ह स्लीप / डेल्टा वेव असे म्हणतात. )
पण आता चौथ्या कप्प्यात पहा - इथे जाणीव आहे पण विचार नाही !! ह्याला म्हणतात तुर्या अवस्था ! इथे केवळ साक्षी भाव आहे , बाकी काही विचार नाही. ही झाली ध्यानाची अवस्था. ध्यानात तुम्ही मनात खोल उतरत आहात तेव्हा तुम्हाला एकेक करुन ह्या अवस्था अनुभवायला मिळतील. :)
पाचवी अवस्था म्हणजे तुर्यातीत. तुर्यावस्थेत साक्षीभाव तरी जागृत आहे, जाणीव आहे. तिचाही विलय झाली की बस "मी आहे." इतकेच राहते. ही अवस्था म्हणजे तुम्ही मनाच्या समुद्रात खोल खोल उतरत अगदी तळाशी पोहचलात की तिथे काहीच नाही , कोणत्याच लाटा वगैरे नाहीत , संपुर्ण शांतता आहे. बस्स तसे काहीसे.
आहा! इतके सोप्पे स्पष्टीकरण दिले स्वामीजींनी. मजा आली . ध्यानगृहात काही लोकं मात्र मस्त सुषुप्त अवस्थेत गेलेले होते अन एकेकाच्या मजेशीर सुरात घोरण्याच्या तर्हा पाहुन हसु येत होते. पण झोपलेल्या माणसाला उठवायचे नाही हा स्वामीजींचा आदेश असल्याने हसु कंट्रोल करत कसे बसे जमेल तितके लक्षात ठेवले.
ध्यानगृहातुन दिसणारा - भोकनकक्षाचा नजारा :
ह्या फोटोत भोजनकक्ष किती उंचावर होता ह्याची कल्पना येत नाही म्हणुन अजुन एक फोटो जोडत आहे.
आणि हो, माझी रुम ह्याच्या ही वर अजुन ६६ पायर्या चढुन वर गेल्यावर होती !!
__________________________________________
दुपारच्या क्लासमध्ये आयुर्वेदातील प्रकृती गुणधर्म हा टॉपिक कव्हर झाला तर नंतर संध्याकाळी ज्योतिषमध्ये राशी हा टॉपिक. आणि रात्री स्वामीजींनी सीबीडीसी Central Bank Digital Currency (CBDC) आणि AI चे रिस्क बद्दल काही व्हिडिओ दाखवले. ह्या तीन दिशांना तीन तोडं असलेल्या गोष्टी एकाच शिबिरात का घातल्यात हा प्रश्न मला प्रथमतः पडला होता. अनेकांनी मला नंतर विचारले देखील ! पण स्वामीजींनी शेवटच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी कनेक्ट केल्या. त्यावर नंतर सविस्तर लिहितोच.
बाकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सीबीडीसी हे माझे आवडते विषय असल्याने माझे मन रमले बाकी क्लास चे काय झाले असावे देव जाणे =))))
बाकी स्वामीजी ह्यात ७ दिवसांच्या शिबिरात अनेक विषयांवर बोलले . परिणामवाद, विवर्तवाद,निमित्तकारण, उपादानकारण वगैरे वगैरे.
पण माझ्या मते हे सारं सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. जे एखाद्याला समजणारच नाही ते त्याला सांगुच नये असे माझे आपलं एक वैयक्तिक मत असल्याने स्वामीजींनी सांगितले तरी मी मात्र इथे सविस्तर लिहिण्याचे टाळत आहे.
__________________________________________
बाकी आज संध्याकाळचे ध्यानाचे सेशन खूप जास्त अफलातून होते.
सुरुवातीला योगआसने करायला लागतात. हलासन, सर्वांगासन करताना छातीवर दाब येतो अन् श्वास घ्यायला त्रास होतो, पण भुजंगासन कटी आसन केल्यावर बरे वाटते.
लहानपणी किती सहज जमायचं हे सगळं , आता अशक्यप्राय वाटतं , पण हा सगळा सवयींचा भाग आहे. आपण इतके दिवस , वर्षे आरबट चरबट खाऊन शरीरावर नको तिथं , नको तितकी चरबी वाढवली आहे, स्नायुंची ताकात त्यामानाने ढासळली आहे. शिवाय शहरी जीवनात फुफुसांचे नुकसान तर कसे होत आहे ह्याची आपल्याला कल्पनाच नाहीये. असो. हे सगळे हळुहळु साधनेच्या सहाय्यनेच नियंत्रणात आणता येईल . योगाच्या ट्रेनरने किमान ही इतकी आसने/प्राणायाम करा असे सुचवले:
__________________________________________
नंतर संध्याकाळी मात्र ध्यान करताना इतके सुंदर विचार आले की बाकी सगळं विसरलं.
तुम्हाला येत असलेले सगळे अनुभव , मग ते चांगले असो की वाईट, ते आहेत ह्याच्याच अर्थ ते परफेक्ट आहेत कारण तसे नसते तर ते आलेच नसते.
(This is deep, it will take time to sink in.)
All is perfect.
All is perfect. :)
-
क्रमशः
प्रतिक्रिया
4 Jun 2024 - 7:49 am | Bhakti
आसन यादीसाठी धन्यवाद!
पावसाळ्यात रनिंग करता येत नाही,तेव्हा योगासनांचा वर्गाला जाण्याचा विचार करीत आहे.बाकी रोज ३०+ सूर्यनमस्कार हा देखील body strength workout चा प्रकार आहे.ध्यानाचा महिमा तर समजलाच आहे.
4 Jun 2024 - 7:28 pm | अहिरावण
वाचत आहे...
4 Jun 2024 - 8:41 pm | कंजूस
जेवणात काय काय देतात?
4 Jun 2024 - 8:50 pm | प्रसाद गोडबोले
सकाळी नाश्त्या मध्ये - केळी, पपई, कलिंगड , बेलफळ ह्यापैकी दोन फळं आणि दुसरा कोणतातरी पदार्थ जसे गुळाचा शिरा, आलु छोले , (कांदेरहित) पोहे वगैरे.
दुपारच्या जेवणास - गहु, बाजरी, रागी आणि अन्य कोणते तरी मिलेट मिक्स करुन बनवलेल्या पिठाच्या रोट्या. आणि कांदा लसुण विरहीत अशी भाजी , मग त्यात बहुतांश वेळा पडवळ, तोंडली, भेंडी , दुधी भोपळा वगैरे होते, दाल मात्र आलटुन पालटुन होत्या.
रात्रीच्या जेवणास - साधरण पणे दुपारच्या जेवणाचाच मेनु फक्त जेवणानंतर १ ग्लास गरमागरम गायीचे दुध विदाऊट साखर.
जेवण बेचन नव्हते पण खास आवर्जुन चवीने जेवावे असेही नव्हते. मला काही खास आवडले नाही पण अनेकांना प्रचंड आवडले.
माझ्या करिता उदरंभरणं हा उद्देश सार्थ व्हायचा अन त्या निमित्ताने रोज "उदरभरण नोहे , जाणिजे यज्ञकर्म" हा श्लोक प्रकर्षाने आठवायचा.
थोडक्यात काय तर साधकाने साधना काळात जसे जेवायला हवे तसे जेवण होते.
अवांतर : शिबिराच्या अखेरीस माझे वजन ३.५ किलोने कमी झाले !
5 Jun 2024 - 1:08 pm | सौंदाळा
वाचतोय.