परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ३

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 May 2024 - 3:37 pm

२१ मे २०२४: ध्यानाचा दुसरा दिवस.

पहाटे ५:३०ला कोणताही अलार्म न लावता आपोआप जाग आली. खरेतर थंडगार हवेच्या झुळुकेने , समोरून येणाऱ्या उगवत्या सूर्याच्या किरणांनी , पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगेच किचन मध्ये येऊन गरम पाणी पिले. इथे चहा नाही , साखरही नाही, तस्मात मला प्रातःआवेगाची चिंता लागुन होती. पोट रिकामे असणे ही ध्यानासाठीची मुलभुत आवश्यकता आहे ! अर्थात योग्य वेळेस जेवण , योग्य वेळेस झोप अन योग्य वेळेस जाग असे केल्यास सर्वच शरीर नियमीतपणे यंत्रवत चालु लागते ह्याचा पुढील काही दिवसात अनुभव आला.

नित्यनेम आटोपले , त्यानंतर लगेच ध्यानाला पळालो.

योग-ध्यान गृहातुन घेतलेले डोंगर उताराचे एक चित्र :
1
आज दिवसभर आभाळ भरुन आलेलं होतं , एकदम आल्हाददायक वातावरण !

बाकी इथे दिनचर्या स्वामीजींनी मुद्दामच खुप जास्त व्यस्त ठेवलेली .

७-८ : योगासने आणि ध्यान
८ - ८:५० : ध्यानावरील चिंतन
८:५० - ९:३० : न्याहरी
९ :३०- १२ : गुरुदेवांची रेकॉर्डेड प्रवचने आणि त्यावरील चिंतन
१२ -१३:३० : दुपारचे जेवण
१३:३० - १५:४५ : प्रधान आयुर्वेदाचार्यांसोबत आयुर्वेदावरील चिंतन
१५:४५- १७ - प्रधान आचार्यांसोबत ज्योतिषशास्त्रावरील चिंतन
१७ -१९ : सायंकालचे योगासने आणि आणि ध्यान
१९ - २० : रात्रीचे भोजन
२०- २२ आजच्या काळातील घटना प्रसंगांवरील, सद्यस्थितीतील आव्हाने आणि समस्यांवरील चिंतन खुद्द स्वामींसोबत.
२२:३० - लाईट्स ऑफ्फ.

हे इतकी व्यस्त दिनचर्या. आणि त्यात आश्रम म्हणजे हिमालयाच्या उतारावर वसलेला, किमान अजिंक्यतार्‍यायेवढा उतार . सहा एकराचा आश्रम. किमान ५-६ वेळा चढ उतार व्यायचा . १६६ पायर्‍या . माझे स्मार्ट वॅच नित्यनेमाने १०,००० ते १२,००० स्टेप काऊंट आणि ७००-८०० कॅलरी बर्न असे दाखवत होते. त्यामुळे इतकी झोप यायची की गादीवर पाठ टेकवायचा अवकाश अन एकदम गूडुप . निव्वळ सुख !
माझ्या रूम कडे जाणारी आश्रमातील एक वाट :
2

बाकी आश्रम सनातनी वैदिक असला तरी जुनाट परंपरांना धरुन चिकटुन बसलेला नव्हता. जमेल तिथं जमेल तितके आधुनिकीकरण करण्यात आलेले होते.
एका इमारतीचे संपुर्ण छत सोलर पॅनेल ने अच्छादित केलेले होते. (अर्थात सोलर, विंड आणि तत्स्मम रीन्युएबल उर्जेच्या स्त्रोतातील सुप्त समस्यां स्वामीजींनी नंतर सविस्तरपणे विशद केल्या त्यावर पुढे लिहिनच.)

3
ह्याला म्हणतात खरी वुमन इंपॉवरमेंट. सगळ्या फेमीनाझींना हे असे काम लावले पाहिजे =))))

ध्यान - काही चिंतने :
ध्यान करताना अनेकांचा असा अनुभव असतो कि पहिले काही क्षण मन एकाग्र होते अन नंतर स्वैर भरकटायला लागते. मनात काहीबाही विचार यायला लागतात, बहुतांश वेळा त्यातील अनेक विचार हे सुखद नसतात. असे का होत असावे?
- कल्पना करा की आपलं मन हे समुद्रासारखं आहे. त्याच्या वरील स्तरावर अनेक विचात उमटत असतात , जे की लाटांच्या सारखे आहेत. पण तुम्ही जसे जसे खाली उतरत जाता तसे तसे समुद्र शांत होत जातो. मन हळुहळु चित्तामध्ये उतरायला लागतं . तेव्हा तिथं खोलवर असलेले स्ट्रेस पॉकेट unwinding व्हायला सुरुवात होते. म्हणुन आपल्याला स्ट्रेसफुल आठवणी येतात आणि मन विचलीत होते . तुमच्या मनात जर काहीबाही रँडम विचार येत असतील तर तुम्ही अजुन वरच्या स्तरावरच आहात. तुम्ही जसे जसे खाली उतराल तसे तसे गहिरे विचार मनात डोकावायला लागतील, पण त्याने घाबरुन जाण्याचे कारण नाही, उलट हे ध्यानातील उन्नतीच्या मोजमापाचे एक परिमाण आहे. शिवाय हे स्ट्रेस पॉकेट्स ह्याच जन्मातील असतील असं काही नाही. आपण कर्मांची ३ भागात विभागणी केलेली आहे. प्रारब्ध, संचित आणि क्रियामाण. क्रियामाण कर्मात दैनंदिन जीवनात स्ट्रेस असतोच सर्वांना. पण त्याच्याही खोलवर असतो तो संचित कर्मातील स्ट्रेस. पण चित्ताच्या अजुन खालील स्तरावर, प्रारब्ध्दाच्या स्तरावर तुमच्या पुर्वजन्मातील आठवणी ही असतील. तेंव्हा ध्यान करताना ह्या सार्‍या समुद्राचे मंथन होणार आहे, त्यातुन अमृतही बाहेर येणार आहे आणि हलाहल देखील. दोन्हीसाठी तयार रहा.

आणि ह्याच कारणासाठी ध्यान हे जाणत्या गुरुंच्या सहवासतच केले पहिजे, किमान हे स्टेस पॉकेट्स रिकामे होईपर्यंत तरी.

बलाच्या चार पायर्‍या आहेत : क्षात्रबल, ब्राह्मबल , मनोबल आणि आत्मबल.
क्षात्रबल म्हणजे मसल पॉवर ज्याच्या जोरावर आपण भौतिक जगतातील गोष्टी घडवुन आणु शकतो. पण फक्त तितकेच पुरेसे नाही, त्याच्या पुढे आहे ब्राह्मबल अर्थात बुध्दीचे बल. बुध्दीच्या जोरावर आपण माणसांनी हत्ती घोडा अशा आपल्या पेक्षा मोठ्ठ्या प्राण्यांना आपल्या नियंत्रणात आणलं आहे, इतकेच काय तर आपण वाघ , सिंहादिकांनानी आपल्या तालावर नाचवु शकतो. क्षात्रबल आणि ब्राह्मबल असेल तर भौतिक जगतातील बर्‍याचशा समस्या आपण सहज सोडवु शकतो. पण त्याच्याही पुढे जाऊन महत्वाचे आहे ते मनोबल. बुध्दीच्यापेक्षा मन सुक्ष्म आहे. मनाच्या शक्तीच्या आधारावर आपण क्षात्रबल आणि ब्राह्मबल दोन्हीही प्राप्त करु शकतो, पण उलटे शक्य नाही. शरीराने सुदृढ आणि बुध्दीने हुशार माणुस जर मनाने कमकुवत असला तर तो नुसता दगडासारखा पडुन राहील त्याच्या हातुन काहीही होणे अशक्य आहे.
पण ह्याच्याही पुढे जाऊन आत्मबल सर्वश्रेष्ठ आहे. आत्मबल म्हणजे आत्म्याचे बल.

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।३.४२।।

आत्मा हा इंद्रिय , बुध्दी , मन ह्यांच्याही परे आहे. आत्मा म्हणजे परमात्माच आहे पण आपल्या ते आकलनात येत नाही तोवर आपण द्वैतात आहोत. ते द्वैत जोवर आहे तोवर त्या आत्म्याचे बल हेच सर्वश्रेष्ठ. आपल्याला वसिष्ठ- विश्वामित्र ह्यांची गोष्ट माहित आहेच. आत्मबलाने सर्वकाही साध्य आहे.
तस्मात आत्मबल वाढवणे, सत्त्वगुण वाढवणे हाच सर्व समास्यांवरील सुप्त पण प्रधान उपाय ठरतो, आत्मबल वाढले की आपोआप सर्व उत्तरे सापडत जातील, म्हणून आपण आत्मबल वाढवले पाहिजे. ते कसे वाढेल तर ध्यानाने.

तुम्ही मनाचा समुद्रात खोल खाली खाली उतरुन, एकेक स्त्रेस पॉकेट्स मोकळे करुन अंतर्बाह्य शांत होत होत, शांतगंभीर चित्ताच्या स्तरावर आलात की त्याच्याही सर्वात खाली जो तळ लागेल तो आत्म्याचा विभाग आहे, तिथे आत्मबलाच्या वृध्दीची सुरुवात होईल.

हे असे केवल आत्मवृध्दी करिता ध्यान समाजातील केवल १% लोक जरी करत असतील तर त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. असं कसं ?? तर जसे की
आपण समजा आपल्या घरात आपल्यासाठी दिवा लावला तर आपला त्याचा प्रकाश तर मिळतोच पण तो आपल्यापुरता मर्यादित न राहता बाहेरच्या अन्य लोकांनाही लाभतो. तसे काहीसे. ब्राह्मणो वर्णानम् गुरुः || म्हणुन तर सुरुवात आधी ब्राह्मणांनीच करायला हवी. स्वामीजींनी कधीही ब्राह्मण हा शब्द जाती किंव्वा वर्णवाचक म्हणुन वापरला नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण हे स्वामी वरंवार अधोरेखित करीत होते.

हे सगळं कळायला अवघड वाटतं ना म्हणुन अजुन एक सोप्पे उदाहरण : awareness x thoughts matrix जाणीव आणि विचार ह्यांची २ * २ मॅट्रिक्स कल्पना करा. पहिल्या कप्प्यात जाणीव आहे आणि विचारही आहेत , ही जागृतीची अवस्था आहे. दुसर्‍या कप्प्यात जाणीव नाही पण विचार आहेत, ही स्वप्नाची अवस्था आहे , तिसर्‍या कप्प्यात जाणीव नाही आणि विचारही नाहीत ही सुषुप्त अर्थात नेणीव अर्थात गाढ झोपेची अवस्था आहे, आणि आता चौथ्या कप्प्यात पहा तिथे जाणीव आहे पण विचार नाहीत ही तूर्या अवस्था आहे. ध्यान आपल्याला इथे ह्या अवस्थेत घेऊन जात आहे . ही साक्षी अवस्था आहे, जिथे आपण सर्वसाक्षी भावाने अलिप्तपणे पहात आहोत. ही गंभीर प्रशांत ध्यानाची अवस्था आहे.
पण ह्याच्याही पलिकडे तूर्यातीत अवस्था आहे जिथे तुम्ही तुर्यावस्थेशीही सल्लग्न नाही, तिचेही तुम्ही जाणते आहात.
आपल्या माऊलींच्या शब्दात :

जाणीव नेणीव भगवंती नाही ।हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥ २ ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।ते जीव जंतूसी केवि कळे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ ४ ॥

किंव्वा समर्थांच्या शब्दात म्हणायचे झाले तरे -

कळे आकळे रुप ते ज्ञान होता।तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥

सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ॥ म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥१९॥
आपणासी तूं जाणसी । तरी ही नव्हेसी ॥ तूंपणाची कायेसी । मात स्वरूपीं ॥२०॥
जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्या उर्वरीतु ॥ तूंपणाची मातु । सहजचि वाव ॥२१॥

म्हणुनच ध्यानाच्याही प्रगाढ अवस्थेत - Don't chase the experiences , be the observer of whatever experience you are having.

आता कसं सगळं जुळुन येईल आणि आचार्यांची, माऊलींची , समर्थांची अन् आपली भेट होईल - अन उमगेल माऊली चांगदेवपासष्टी मध्ये जे चांगदेवांना उद्देशुन म्हणाले ते :

आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥

पांडुरंग पांडुरंग.

ध्यानानंतर रात्री शांत काहीही न बोलता , केवळ चिंतन करत एकट्याने जेवण आटोपले. अगदी हळु हळु चालत रूमम्कडे निघालो तेंव्हा माझ्या डॉर्मेटरी मागुन चंद्र उगवला होता !

4

-
क्रमशः

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 May 2024 - 6:52 pm | कंजूस

वाचतो आहे.
फोटो पाहूनच आनंद झाला.
या वाटेचा चढ उतार पाच सहा वेळा करायचा तर दिवसाला चार वाट्या गोड शिरा ढोसावा लागेल.

(ध्यान, मनावर विचारांवर संयम वगैरे आमच्या डोक्याच्या आणि हाताबाहेरच्या गोष्टी त्यामुळे सोडून दिल्या. )

बाकी वाचायला मजा येतेय.

प्रचेतस's picture

31 May 2024 - 2:20 pm | प्रचेतस

लिहित राहा, वाचत आहेच.

वामन देशमुख's picture

31 May 2024 - 4:57 pm | वामन देशमुख

प्रसाद गोडबोले,

लेखमाला वाचतो आहे. लिखाण व फोटो छान वाटताहेत. भावना पोहोचताहेत.

स्थानगुप्ततेबद्धलची तुमची एकंदर भूमिका आवडली. पुढे कधी तिथे जायला वेळ मिळाला तर माहितीसाठी व्यनि करीन.

अहिरावण's picture

1 Jun 2024 - 1:26 pm | अहिरावण

वाचत आहे... :)

किसन शिंदे's picture

3 Jun 2024 - 11:25 pm | किसन शिंदे

तीनही लेख वाचले. पण फोटो एकही पाहायला मिळाला नाही.

अहिरावण's picture

4 Jun 2024 - 7:27 pm | अहिरावण

नशीब लागतं हो... =))

क्रोम वापरा !!