खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
27 Aug 2010 - 7:22 pm


प्रांतांना कलेक्टरांनी एक ऍडिशनल जबाबदारी दिली होती. त्यांच्या सबडिव्हिजनच्या अखत्यारीत नसलेल्या पळसपंगा ब्लॉकच्या विकासकामांचा नोडल ऑफिसर बनवले होते. हा ब्लॉक हळूहळू नक्षलग्रस्त होत होता, आणि ब्लॉक ऑफिस भ्रष्टाचारग्रस्त झालेले होते. हरिविलासपूर पोलीस ठाण्यातल्या एका एएसआय ला नक्षलवाद्यांनी पकडून नेऊन ओलीस ठेवल्यापासून कलेक्टर आणि एस्पींची झोप उडाली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पुनर्रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात नव्हती, पण अनौपचारिकरीत्या त्यांनी वेगवेगळ्या विभागांतील वीस चांगले अधिकारी निवडून त्यांना जिल्ह्यातील वीस ब्लॉक्सचे नोडल अधिकारी बनवले होते. आपल्या हुकुमी एक्क्याचे पान म्हणजे नवीनच जॉइन झालेला, आणि इमेज आणि करियर बनवायला उत्सुक असलेला आय ए एस प्रांत कलेक्टरांनी पळसपंग्याशी पंगा घ्यायला पाठवला होता.

प्रांतांची स्ट्रॅटेजी होती भरपूर फिल्ड व्हिजिट्स. सरकारातला एक महत्त्वाचा अधिकारी गावांगावांतून फिरतो ही एकच गोष्ट नक्षलवादाच्या सुरुवातीच्या उसवणीला टाका घालायला बऱ्यापैकी पुरेशी होती. त्यानंतर ब्लॉक ऑफिसची झडती. पण पळसपंगा ब्लॉक होता प्रांतांच्या ठाकूरगढ हेडक्वार्टरपासून दोन तास लांब. हे वेळेचे गणित जमवण्यासाठी प्रांतांनी सुरुवातीला आपल्या अखत्यारीतल्या भागातल्या भेटी कमी केल्या.

असे दोन महिने गेले. एक दिवस संध्याकाळी प्रांत सेन्ससचे काम बघत रेस ऑफिसमध्ये बसले असता प्रधानबाबूंचा फोन आला. “सर आहात का? भेटायचं होतं जरा.” प्रधानबाबू म्हणजे दैनिक समाजचे वार्ताहर. संयमित बोलणारा आणि प्रांतांना आवडणारा सुसंस्कृत माणूस. प्रांतांनी लगेच होकार दिला. दहा मिनिटांत चार पाच वार्ताहर आले. त्यात सितारा टीव्ही चॅनेलचे मोहंतीबाबू पण होते. हे स्थानिक आमदारांचे भाऊ होते. या मंडळींविषयी सबडिव्हिजनमधले काही अधिकारी फारसे चांगले मत बाळगून नव्हती. ही मंडळी काही अधिकाऱ्यांकडे ‘खंडणी’ मागतात असं प्रांतांच्या कानावर आलं होतं. खरं खोटं माहित नव्हतं.पण प्रांतांना मात्र त्यांनी आपल्या सुसंस्कृत वागण्याने जिंकले होते. एक दोन वेळा प्रांत त्यांच्याच गाडीत बसून जलशुद्धीकरण प्लॅंटचा खोललेला कच्चा चिट्ठा ऑंखो देखा बघायला गेलेही होते. लॉ ऍण्ड ऑर्डर समस्येतही एक दोन वेळा या मंडळींची प्रांतांना साथ मिळाली होती. दुसऱ्या बाजूने, पत्रकारांनादेखील प्रांतांच्या गुड बुक मध्ये राहण्यात मजा येत होती. तक्रार केली की लगेच दखल आणि हालचाल होत होती. प्रांतांच्या कानाजवळ असल्यामुळे खालच्या ऑफिसांमध्ये शब्द रहात होता. असे एकूण सिम्बायोसिस होते.

मंडळी जरा सिरीयस होती. प्रधानबाबू म्हणाले, “सर आपल्याला माहीत आहे का, आपल्या सबडिव्हिजनमध्ये एक गाव असे आहे, जिथे गेली सोळा वर्षे एकही सरकारी योजना पोचलेली नाही. एवढंच नाही, तर आपल्या गाडीने तिथंपर्यंत आपण जाऊसुद्धा शकणार नाही!”

प्रांतांना आश्चर्य वाटले. “प्रधानबाबू, आपली सबडिव्हिजन इतकी पण दुर्गम नाही, इथे आल्यापासून मागच्या चार महिन्यांत मला एवढे तरी समजले आहे. अन्यथा मी अशा गावात पहिल्यांदा आल्या आल्या गेलो असतो. असो. कोणते आहे हे गाव?” आपल्या इथे कमी केलेल्या भेटींकडे तर या मंडळींचा रोख नसावा, प्रांतांना वाटून गेलं. शक्य नव्हतं. इन एनी केस इतका भटका अधिकारी ठाकूरगढने पाहिलाच नव्हता आजपर्यंत.

“सर पारुडीपोसी नावाचे हे गाव आहे. एन एच २१५ पासून आत पाच किमी. बाळीबंधपासून. बाळीबंध म्हणजे ते बघा तुम्ही त्या शहीद आयटीबीपी जवानाच्या अंत्यसंस्काराला गेला होतात, ते गाव.”

“हो, मला माहीत आहे बाळीबंध. मी दोन वेळा गेलोय तिथं. असं एखादं गाव तिथून हाकेच्या अंतरावर आहे यावर माझा विश्वास बसत नाही.”

“व्हिडीओच बघा ना सर,” मोहंतीबाबू आपला कॅमेरा बंदुकीसारखा बाहेर काढत म्हणाले.

प्रांतांना हसू आले. “विकासच नाही म्हणताय मोहंतीबाबू तर चित्रं कशाची दाखवणार आहात?”

“बाइट आणलेत ना सर, लोकांचे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे.”

“बरं. सांगा. पण त्याअगोदर मला एक सांगा – हे दुर्गम गाव तुम्हाला कसं काय सापडलं, आणि तेही आत्ता. गेली सोळा वर्षे हे गाव हायवेपासून एवढं जवळ असूनही सरकारपासून आणि तुमच्यापासून लपून कसं काय राहू शकलं? आज अचानक असं
काय घडलं की तुम्हाला याचा शोध लागला, हं?”

“सर आजचीच गोष्ट आहे. आम्ही कोर्टात बातम्यांसाठी गेलो होतो. रुगुडी ठाणेदारांनी वीसेकजण पकडून आणले होते. आम्ही विचारलं काय झालं म्हणून तर समजलं की पारुडीपोसीमध्ये एक चर्च बांधायचं चाललंय. त्यावरुन हाणामारी झाली. मग आम्ही ताबडतोब गाडी काढली आणि गेलो त्या गावात. आम्ही बीडीओंना फोन लावला आणि भेटायला येऊ का म्हणून विचारलं. त्यांनी टाळाटाळ केली. मी इथे नाही, तिथे आहे, टूरवर आहे. आम्ही म्हणालो, आम्ही ’तिथे’ येतो, तर म्हणाले मी ’तिथून’ अजून कुठे चाललोय. आणि फार तुसडेपणाने बोलले.” मोहंतीबाबूंची शेवटची वाक्यं तक्रारीच्या सुरात होती.
प्रधानबाबू म्हणाले, “सर, आम्ही योग्य आदर ठेऊन बोललो असता असं तोडून बोलणं शोभतं का बीडीओंना? तुम्ही त्यांना समज द्यायला हवी.”

“शांत व्हा. कदाचित त्यांना कलेक्टर नुकतेच बोलले असतील, मूड खराब असेल, किंवा खरंच भेटता येणं शक्य नसेल. शिवाय, तुम्ही म्हणता तसं त्यांचं बिंग बाहेर पडणार असेल, तर ते तुम्हाला टाळणारच ना? का या आणि करा माझी हजामत असं म्हणणार?” प्रांत समजावणीच्या सुरात बोलले. मंडळींच्या गालावर हसू उमटले आणि आठ्या कमी झाल्या.

मोहंतीबाबू खुर्चीत पुढे सरकले आणि म्हणाले, “सर, या गावात जायला धड रस्ता नाही. आम्हाला गाडीतून उतरून चालत जावं लागलं.”
“तुमची गाडी तर जाऊच शकणार नाही सर,” साहूजींनी भर घातली.
मोहंतीबाबू पुढे बोलले, “या गावात ना रस्ते आहेत, ना वीज. गावाच्या सभोवार घनदाट जंगल आहे. दोन तीन महिन्यांतून एकदा केंव्हातरी बारीपदाहून काही मिशनरी रात्रीच्या वेळी लपत छपत गावात येतात आणि धर्मांतरं करतात. आता परिस्थिती अशी झालेली आहे, की गावातला एकजिनसीपणा कमी होऊन ख्रिश्चन आणि हिंदू असे तट पडलेत. आपली संस्कृती डोळ्यांसमोर नष्ट होताना काही लोक नाही बघू शकत. अशात एक चर्च या लोकांनी बांधायला काढलं. ते सरकारी जमिनीवर येतंय म्हणून लोकांनी त्याला विरोध केला आणि पोलीसांनापण सांगितलं. त्यातूनच भांडण वाढलं आणि आजची केस झाली.”

प्रांत ‘अम्यूझ’ झाले. त्यांना हे सगळं रंजीत वाटलं. पण काही बोलले नाहीत.

“आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही.”

“झालं तुमचं?” प्रांत म्हणाले, “आता जरा मला तो व्हिडीओ दाखवा बघू.”

प्रांतांनी दहा मिनिटे फास्ट फॉरवर्ड करुन तो व्हिडीओ पाहिला. काही लोकांच्या मुलाखती आणि एका अर्धवट बांधकामाचे चित्रण होते.

मोहंतीबाबू म्हणाले, “सर आम्ही एक स्टोरी बनवलीय. तुमच्या बाइटशिवाय पूर्ण होणार नाही!”
प्रांत म्हणाले, “मोहंतीबाबू, तुम्हाला माहीत आहे, मी ओल्ड फॅशन्ड बाबू आहे. माझ्या बातम्या न आलेल्या बऱ्या! माझ्या बऱ्या वाईट कामाविषयी जरुर आणा, पण माझं नाव, आणि चेहेरा आणू नका!”
“नाही नाही सर. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बोललंच पाहिजे.”
“बरं बोलतो. पण धर्मांतरावर माझ्या नो कॉमेंट्स. आणि नक्षलवादावर पण मी काहीही बोलणार नाही. कबूल?”
“सर नुस्तं कॅमेऱ्यात दिसलात तरी बास आहे आम्हाला!”

मग बाइट द्यायच्या आधी प्रांतांनी त्यांना नक्षलवादावर आणि कंधमाळ प्रकरणावर एक छोटंसं लेक्चर दिलं, जेणेकरुन
बाइटचा हट्टाग्रह जरा शांत होईल!

(क्रमशः)
************

प्रांतांच्या गोष्टी -

पहिली
दुसरी
तिसरी -१
तिसरी-२

कथा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

27 Aug 2010 - 7:28 pm | प्रभो

वाचतोय...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2010 - 7:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे?
पुढचा भाग लवकर टाका. प्रांतांच्या समजुतदारपणाच्या चार गोष्टी मिपावरही येण्याची गरज आहेच; शिवाय आम्हालाही त्यातून शिकता येईल.

म्हाराजं चांगली चालवली आहे ही मालिका..
पुढिल भागाची वाट पाहात आहे.

यशोधरा's picture

27 Aug 2010 - 7:31 pm | यशोधरा

आवडलं.

श्रावण मोडक's picture

27 Aug 2010 - 7:37 pm | श्रावण मोडक

लगेच पुढचा भाग टाका. अन्यथा या प्रांतांची बदली करावी लागेल. बदली कुठं? त्याला दुर्गम भागात काम करणं आवडतं असं दिसतंय, म्हणून ही बदली अत्यंत सुगम भागात करावी लागेल. किंवा साईड पोस्ट द्यावी लागेल. तीच शिक्षा!!!
बाकी प्रांत-पत्रकार नातं भारी रेखाटलंय. जुने दिवस आठवले. त्या गावाची कहाणीही एका जुन्या घडामोडीची आठवण देणारी आहे. हे असेच एक गाव महाराष्ट्रातील दोन महामार्गांवर वसलेल्या एका जिल्हा केंद्रापासून फार तर दहा-बारा मैलावरचं. तिथंही हीच स्थिती. एका आमदारानं आपल्या वाढदिवशी ते गाव दत्तक घेतलं, पुढे वर्षभरात गावाचा रस्ता झाला, पाणी आलं वगैरे. अर्थात, ते नंतर कोलमडलं हा भाग वेगळा.

जुने दिवस आठवले. त्या गावाची कहाणीही एका जुन्या घडामोडीची आठवण देणारी आहे.

वाचायला नक्कीच आवडेल.

स्वप्निल..'s picture

27 Aug 2010 - 10:35 pm | स्वप्निल..

वाचतोय .. लवकर लवकर लिहा :)

विलासराव's picture

27 Aug 2010 - 10:39 pm | विलासराव

वाचतोय.
अर्थातच आवडतय.

स्वाती२'s picture

27 Aug 2010 - 10:42 pm | स्वाती२

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे....

भडकमकर मास्तर's picture

28 Aug 2010 - 1:04 am | भडकमकर मास्तर

हा भाग छोटा झाला काय?
पुढचा लवकर येऊदे

राजेश घासकडवी's picture

28 Aug 2010 - 1:18 am | राजेश घासकडवी

आता मागचे सगळे भाग वाचायला लागणार...आयच्यान् मी हे प्रांत वगैरे काहीतरी भौगोलिक असेल म्हणून नंतर वाचू म्हटलं होतं.

अधिकार्‍यां च्या काम करण्याच्या पद्धतीचं वास्तववादी चित्रण वाटतं. सत्य परिस्थितीवर, प्रत्यक्ष आतल्या अनुभवावरून लिहिलं असावं अशी दाट शंका येते आहे. सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल.

छान लेखन आहे, घटनांचा वेग योग्य वाटतो. अजून लवकर येऊ द्यात.

प्राजक्ता पवार's picture

28 Aug 2010 - 11:43 am | प्राजक्ता पवार

वाचतेय.पुढील भाग लवकर येवु देत.

विसुनाना's picture

28 Aug 2010 - 11:53 am | विसुनाना

नेहमीप्रमाणेच ताकदीचे लिखाण.
पुढचे भाग लवकर यावेत.

सहज's picture

28 Aug 2010 - 2:04 pm | सहज

हेच. वाचतोय.

तुमच लिखाण आवडत आहे आधीपासुन, पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.

--टुकुल

बहुगुणी's picture

28 Aug 2010 - 4:44 pm | बहुगुणी

...चांगल्या लेखनाचा छान शिडकावा फारा दिवसांनी मिपावर, बरं वाटलं.

राजा साहेबः तुमचं लिखाण आवडतंच, थोडा विस्तृत लिहा प्रत्येक भाग, म्हणजे रसभंग होणार नाही. तुमच्याकडे लिहायला मटेरियल कमी नाही हे स्पष्टच आहे. येऊ द्या पुढचा भाग लवकर, फार वाट पहायला लावू नका.

बॉसी !! आधी का नाही वाचले असे वाटुन गेले ......

फॅन झालो आजपासुन..

"आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही "

हेच आणी अगदी असेच , ईर्शाळ्यापासुन ते पितळखोर्‍यापर्यंत....

आळश्यांचा राजा's picture

28 Aug 2010 - 11:15 pm | आळश्यांचा राजा

उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांचेचे मनापासून आभार. (त्यामुळे पुढचं लिहायला थोडं टेन्शन येतं हा भाग वेगळा, पण वाढलेला उत्साह त्या टेन्शनवर मात करतो!)

@गुरुजी
प्रांत म्हणजे काहीतरी भौगोलिक असं खुद्द प्रांतांनाही ते प्रांत होईपर्यंत वाटत असे असं (विश्वसनीय वगैरे सूत्रांकडून) समजतं ;-)

सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल

असा ठाम विश्वास बनायला काय कारणं असावीत तेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

@टुकुल

वेगळा धागा टाकतोय.

@श्रामो

पाप आमचं आणि शिक्षा प्रांतांना? सुगम भागात/ साइड पोस्टिंगला गेल्यावर आम्ही गोष्टी कुणाच्या सांगायच्या? त्या वेताळा (अवलिया फेम) सारखं कायम बिचार्‍यांना दुर्गम आदिवासी भागात रहावं लागणार, प्रांत याच पोस्टवर, प्रमोशन/ डिमोशन इ. न होता! त्यांचं वयही वाढणार नाही हे वे सां न ल! ;-) आणि काय हो, तुमच्या नोंदी दिसत नाहीत आजकाल. तुमचीच बदली करायची वेळ आलेली दिसते!

विद्याधर३१'s picture

2 Oct 2010 - 5:54 pm | विद्याधर३१

आळ्शांचा राजा कुठे आहात?

पुढ्चा भाग लवकर टाका .

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 6:02 pm | गुंडोपंत

जबरी लेखन. फार आवडले आहे. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

diggi12's picture

22 May 2024 - 10:25 pm | diggi12

पुढील भाग?

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2024 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

लेख सुरू होण्यापूर्वी अनुक्रमणिका आहे. या लेखमालिकेतल्या पुढच्या ५ भागांसह या लेखमालिकेच्या सर्व भागांचे दुवे अनुक्रमणिकेत ड्रॉप डाऊन प्रकारे उपलब्ध आहेत.

diggi12's picture

2 Jul 2024 - 3:54 pm | diggi12

सर
या लेखाचा पुढचा भाग नाही आहे त्यात