शापित डबल धमाका: थोर स्वातंत्र्यसैनिक-वैज्ञानिक - पांडुरंग सदाशिव खानखोजे

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
16 Feb 2024 - 7:35 pm

पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल. ना इतिहास विषयात ना भूगोलात. राजकीय व्यक्तींना काही विशिष्ट विचारांचे वावडे असते वा काही विचारधारा त्यांना अडचणीच्या वाटतात. शालेय पाठ्यपुस्तकात काही थोर व्यक्तींना हेतुपुरस्सर वगळलेले आढळून येते तर काही व्यक्तींचे अवाजवी उदात्तीकरण केलेले दिसून येते. काही काल्पनिक पात्रे पण इतिहासात हेतूपूर्वक घुसविल्याची पण उदाहरणे आहेत. तसेच शिक्षणतज्ञांना देखील असे काही विचारधारांचे वावडे असावे. इतिहासकारांनी देखील असेच काही व्यक्तींवर अघोषित गौरव/प्रसिद्धी-बहिष्कार टाकलेला आढळून येतो. तर काही थोर व्यक्ती थोड्याबहुत विक्षिप्त असतात मग त्यांना राजकीय नेते, पत्रकार इ. लोक टाळतात आणि त्या व्यक्ती प्रसिद्धीआड राहतात. लेखविषय पांडुरंग सदाशिव खानखोजे हे व्यक्तिमत्त्व जरी उत्तुंग असले तरी असेच काही ना काही कारणाने प्रसिद्धीआडच राहिले असावे.

पां. स. खानखोजे ऊर्फ भाऊंचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ वर्धा येथला. तेव्हा वर्ध्याचे नाव पालकवाडी असे असावे वा पालकवाडी नावाचे गाव वर्ध्याजवळ असावे. सन १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या स्मृती ताज्या असतांनाच्या काळातले त्यांचे बालपण. घरातील वातावरण परस्परविरोधी अशा दोन टोकांच्या विचारधारांच्या कात्रीत सापडलेले. तंट्याजी भिल्ल हा एक प्रखर देशाभिमानाने भारलेला स्वातंत्र्यसेनानी. आजोबा तात्यांचा या तंट्याजी भिल्लाशी संपर्क होता. तात्यांची मालगुजारी होती. पण इंग्रज सरकार ती रद्द करून मालमत्ता सरकारजमा करेल म्हणून त्यांनी व्यवहारचातुर्य दाखवून ती विकून टाकली. लेखविषय पांडुरंग यांना बालपणी भाऊ म्हणत. तात्याआजोबांकडून तंट्याजी भिल्लाच्या आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या, स्वातंत्र्यसेनानींच्या देशप्रेमाने भारलेल्या शौर्यकथा ऐकतच भाऊचे बालपण गेले.

बरोब्बर विरोद्ध टोकाची विचारधारा भाऊच्या तीर्थरूपांची. भाऊचे वडील सदाशिवराव हे इंग्रज सरकारात ‘अर्जीनवीस’ या पदावर काम करीत होते. भाऊचे वडील सदाशिवराव यांना पांडुरंग, शंकर आणि राम असे तीन मुलगे तसेच सुंदरी नावाची कन्या अशी चार अपत्ये होती. बहुतेक मराठी घरात त्या काळी असे त्याप्रमाणे तापट वडील आणि प्रेमळ आई असे वातावरण याही घरात. आईला ही भावंडे माई म्हणत. भाऊ स्वतःसारखाच प्रखर देशप्रेमाने भारलेला म्हणून तात्याआजोबांचा फारच लाडका. दहा वर्षांचा असतांना भाऊ ब्रिटीशांविरूद्ध लढा द्यायला भिल्ल मुलांचे सैन्य उभारायला घरातून पळाला पण पोलीसांनी संशयाने पकडल्यावर सरकारी अर्जीनवीसाच्या या चलाख, चतुर पुत्ररत्नाने रस्ता चुकून हरवल्याचा बहाणा केला. मग पोलीसांनी त्याला घरी आणून सोडले.

शाळेत असतांना बाल समाज, आर्य बांधव, श्री समर्थ शिवाजी समाज, इ. संघटनांचे कार्यसंस्कार, टिळक आणि इतर लहानमोठ्या देशभक्तांची भारून टाकणारी विचारप्रवर्तक भाषणे, इ.स. १८९९च्या दुष्काळातले अनुभव यांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या काळी व्यायाम इ. उपायांनी शरीर कसणे हे फक्त गुंडांचे काम आहे असा समज सर्वसाधारण जनतेत होता. श्री. समर्थ शिवाजी समाजाने शरीर कसण्याला प्रतिष्ठा दिली. बळकट शरीराशिवाय स्वातंत्र्याचे लढे देणे शक्य नाही हा विचार समाजात रुजविला. इंग्रजांनी पकडून हाल केलेच तर उपासमारीची सवय असावी म्हणून अन्नाऐवजी फक्त झाडपाला वगैरे खाऊन राहायचे म्हणून फक्त कडूनिंबाच्या पाल्यावर दिवस काढायचे असे लोकविलक्षण प्रयोग या देशभक्त क्रांतिकारकांनी केले.

देशप्रेमी तात्याआजोबांचा भाऊच्या स्वातंत्र्यचळवळीतल्या कार्याला जरी पाठिंबा असला तरी वडील अर्जीनविसांचा पात्र पूर्ण विरोध होता. भाऊने हे नसते उपद्व्याप त्वरित थांबवावेत म्हणून त्यांनी साम आणि दंड असे दोन्ही उपाय वापरून पाहिले. काही उपयोग होत नाही असे पाहून कुटुंबाची जबाबदारी शिरावर पडली की हे नाठाळ कारटे ताळ्यावर येईल अशा अपेक्षेने भाऊच्या लग्नाचा घाट घातला. बालविवाह तेव्हा सरसकट होत हे आपल्याला ठाऊक आहेच. पण इथे भाऊने समर्थ रामदासी पवित्रा आपलासा केला.

शाहीरांनी त्यांच्या कलेतून स्वातंत्र्याचा संदेश सामान्य जनतेत रुजवण्याचे काम केले तसेच देशभक्तांतर्फे निरोप पोहोचवण्याचे काम करून अमोल देशसेवा बजावली. तमासगीरांनी देखील अशीच कामगिरी बजावल्याचे आपण कथाकादंबर्‍यांतून तसेच ‘केला इशारा जाता जाता’, ‘सुगंधी कट्टा’अशासारख्या चित्रपटातून पाहिले. स्वातंत्र्याचा संदेश रुजविणे आणि निरोप पोहोचविणे याबरोबर त्याइतकेच किंबहुना जास्त महत्त्वाचे आणि जोखमीचे काम श्री समर्थ शिवाजी समाजाने केले. या दोन कामांबरोबरच स्वसंरक्षणार्थ कवायत, कसरती करणे, लाठी, बंदूक चालवणे, नेमबाजी करणे इ. गोष्टी देशभक्तांना शिकविणे हे काम देखील स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीने आवश्यक पण जोखमीचे काम. यासाठी भाऊ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक अभिनव कल्पना राबवली. ही जोखमीची कामे त्यांनी सर्कस काढून केली. कोणत्याही साहित्यकृतीतून, कलाकृतीतून वा पाठ्यपुस्तकातून सर्कशीच्या या अजोड कार्याचा कोठे उल्लेख वा कौतुक केल्याचे मी अद्याप कुठे वाचले नाही. धिप्पाड शरीरयष्टीचे रामलाल वाजपेयी हे श्री समर्थ शिवाजी समाजात येत. ते इंग्रज सरकारात अबकारी खात्यात नोकरीला होते. त्यांची या नोकरीत सहा वर्षे झाल्यावर स्वदेशी चळवळीतल्या त्यांच्या सहभागामुळे सरकारने त्यांना नारळ दिला होता. या सर्कशीत देशभक्त कलाकारांना कुस्ती, लाठी फिरवणे इ.चे प्रशिक्षण त्यांनी दिले. लढण्याचे प्रशिक्षण देतांना कायद्यातून पळवाट काढणारी ही सर्कस काढायची अभिनव कल्पना मला तरी लोकविलक्षण, एकमेकाद्वितीय वाटते. अफलातून अशी ‘हॅट्स ऑफ’ कामगिरी!

वासूकाका जोशी, लो. टिळक इत्यादी नेत्यांशीं खानखोजेंनी संपर्क साधला. ते टिळकांच्या घरी काही दिवस राहिले होते. स्वतंत्र्यसैनिकांनी लष्करी शिक्षण घ्यावे असे खानखोजेंचे मत होते. टिळकांनी या मताला पाठींबा दिला. परंतु भारतातील संस्थानातील लष्करे तांत्रिकदृष्ट्या मागासलेली असल्यामुळे प्रगत लष्करी शिक्षण परदेशी जाऊन लष्करीदृष्ट्या पुढारलेल्या देशात जाऊन घ्यावे असे टिळकांनी मत दिले. त्यामुळे खानखोजेंनी अमेरिकेला जाऊन लष्करी शिक्षण घेण्याचे ठरवले. स्वामी रामतीर्थ नुकतेच अमेरिकेहून परतले होते. खानखोजे त्यांना भेटले. अमेरिकेतील ‘आर्म्स इन्स्टीट्यूट ऑफ अमेरिका’ या संस्थेतून लष्करी शिक्षण घेण्याचा त्यांनी सल्ला दिला.

चळवळीतील विविध उपद्व्यापामुळे नाव ब्रिटीश सरकारच्या काळ्या यादीत. त्यामुळे पासपोर्ट मिळण्याची पंचाईत. हाती पैसा नसतांना प्रथम मुंबईला कसे जावे आणि तिथून अमेरिकेला कसे जावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. इच्छा आहे तेथे मार्ग आहे या उक्तीनुसार खानखोजेंनी अमेरिकेला जाण्यासाठी अपार कष्ट घेतले आणि कल्पक मार्ग अवलंबले. त्यांच्या मुंबईला जाण्याचा खर्च एका थोर व्यक्तीने उचलला. एका नाट्यपूर्ण प्रसंगात स्वामी रामतीर्थांनी खानखोजेंना शिफारसपत्र दिले. सोबत पारपत्र अर्थात पासपोर्ट नसेल आणि तिकीटाला तसेच पुढे अमेरिकेत पोहोचल्यावर खर्चाला कोणत्याही चलनातले पैसेच नसतील तर आपण अमेरिकेत जाण्याचा विचारही करू शकत नाही. (आता तर बॅंक बचत खात्यावर रोख रक्कम आणि वर आर्थिक सक्षमतेचे प्रमाणपत्रच लागते.) परंतु आपल्या अमर्याद जिद्दीला अपार कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, असाधारण कल्पकता आणि तत्कालीन विशिष्ट परिस्थितीची जोड दिली, निसर्गदत्त कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच; त्यामुळे खानखोजेंनी ते साधले.

अमेरिकेत पोहोचल्यावर अपेक्षेनुसार अनेक समस्यांनी डोकी वर काढली. खानखोजेंची ५ फूट २ इंच अशी तोकडी उंची असतांना लष्करी शिक्षणसंस्थेत प्रवेश कसा घ्यायचा? लटपटी करून प्रवेश मिळाला की शिक्षणशुल्क भरायला पैसे कुठून आणायचे आणि सर्वात आधी रोजच्या खाणेपिणे आणि राहणे यासाठी पैसा कुठून आणायचा? या सर्व प्रश्नांवर उत्तरे वरील परिच्छेदातलीच.

खानखोजेंच्या चौकस नजरेला कॅनडामधील स्वातंत्र्ययुद्ध तसेच मेक्सिकोतील क्रांती देखील दिसली. मेक्सिकोने १८२४ मध्ये स्पॅनिशांपासून कसे स्वातंत्र्य मिळवले याचा त्यांनी अभ्यास केला. स्वातंत्र्यचळवळ आणि क्रांती यातला गुणात्मक फरक त्यांनी जाणला होता. तिथल्या क्रांतिकारकांचे आपल्या स्वातंत्र्ययुद्धाला कसे काय साहाय्य होऊ शकेल याचा देखील ते सतत मागोवा घेत होते. नवराष्ट्रउभारणी करतांना कायकाय अडचणी येतात, येणार्‍या अडचणींचे, समस्यांचे निवारण कसे करावे, समस्यानिवारणाच्या उपायांचे कायकाय परिणाम होतात इथे त्यांचे सतत लक्ष असे. लष्करी शिक्षण लगेच घेता येत नसेल तर स्वतंत्र भारताला उपयोगी पडेल असे काहीतरी उच्च शिक्षण घेऊ असा विचार त्यांनी केला. १८९९ च्या दुष्काळाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. मागासलेले शेतीतंत्र हे एक प्रमुख कारण अन्नधान्याच्या तुटवड्याला आहे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी ऑगस्ट १९०७ मध्ये कॅलिफोर्नियातल्या शेती महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॅनडातला स्वातंत्र्यलढा, आफ्रिकेतील देशांचे स्वातंत्र्यलढे इ. कडेही त्यांचे लक्ष होते.

कृषी पदवीची चार सत्रे झाल्यानंतर पाचवे सत्र सुरू असतांना त्यांना लष्करी शिक्षण घ्यायची संधी प्राप्त झाली. मग शेती शिक्षण तात्पुरते स्थगित. जीवनातले अग्रक्रम अगदी स्पष्ट. कुठेही वैचारिक गोंधळ नाही. मे १९१० मध्ये त्यांना सान राफाएल इथल्या ‘टमाल पेस मिलिटरी ऍकॅडमी’ मध्ये पदविकेसठी प्रवेश मिळाला. प्रचंड कष्ट घेऊन अखेर त्यांनी इप्सित साध्य केलेच. पण इंग्रजांच्या काळ्या यादीत असल्यामुळे थेट भारतात पण येता येत नव्हते. शिवाय किमान आवश्यक युद्धसाहित्याशिवाय ब्रिटीशांपासून मुक्त होणे कठीण आहे. आधुनिक कृषीतंत्र वापरून अन्नतुटवडा नष्ट केला, आधुनिक शेतीला जोडधंद्यांची साथ देऊन शेतकर्‍यांनी उन्नती साधली आणि जर शेतकरी, शेतमजूर आणि उद्योगतले कामगार एकत्र झाले तर इंग्रजांना हाकलणे सोपे जाईल असा त्यांनी विचार केलेला दिसून येतो. लष्करी शिक्षणातली पदविका मिळाल्यावर मग त्यांनी अर्धवट राहिलेले शेती शिक्षण पुरे करायचे ठरविले. पण ते सत्र ऑगस्ट मध्ये सुरू होणार. मग तीन महिने करायचे काय? तर त्यांनी पोर्टलॅंडमध्ये जाऊन फळप्रक्रिया उद्योगात मजुरी केली आणि अर्थार्जनाबरोबरच फळे डबाबंद करणे इ. प्रक्रियांची कौशल्ये देखील आत्मसात केली. शेवटी त्यांनी ऑरेगॉन कृषी शिक्षणसंस्थेतून अभ्यासक्रम यश्स्वीरीत्या पूर्ण करून सन १९११ मध्ये बी.एस. ही पदवी मिळवली. राष्ट्रोन्नतीसाठी ज्ञानार्जन करण्याचा केवढा हा प्रचंड ध्यास!

हे सारे जिवापाड मेहनत करून केले. स्वावलंबन हा मंत्र त्यांनी कसोशीने, काटेकोरपणे जपला. अनेकांनी त्यांना शिक्षणासाठी आणि शिक्षणकालीन उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत देऊ केली होती. परंतु त्यांनी ती नम्र्पणे नाकारली आणि कष्टप्रद मजुरी करूनच हे सारे साधले. या सर्वावर कळस म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी लढे देण्यासाठी कॅनडा आणि अमेरिका येथील भारतीयांच्या संघटना बांधणे अविरत सुरू होते. गदर या सुप्रसिद्ध संघटनेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात गदरचे नाव आवर्जून घेतले जाते परंतु गदरच्या प्रमुख संस्थांपकांपैकी एक असलेल्या खानखोजे यांचा उल्लेखही टाळला जातो.

सन १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. मग त्यांनी तुर्कस्तान इराण अफगणिस्तानमार्गे भारतात परतण्याचे ठरविले. इंग्रजांशी लढणार्‍या इराणी भटक्या टोळ्यांकडून त्यांना बरीच मदत मिळाली. या टोळ्यांच्या मदतीने, अफगणिस्तानच्या मदतीने आणि जेथून मदत मिळेल तेथून त्यांनी इराण अफगणिस्तानमार्गे भारतातील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करून भारत स्वतंत्र करण्याचा अफलातून बेत केला. परंतु हा प्रयत्न सिद्धीस गेला नाही. परदेशी भारतीयांच्या मदतीने त्यांनी आणि इतर गदर सदस्यांनी ब्रिटीशांच्या शत्रुराष्ट्रांमधून दोन बोटी भरून शस्त्रास्त्रे, दारूगोळा वगैरे भारतातील सशस्त्र उठावासाठी पाठवले. परंतु या अचाट कामाला अपयश आले. दक्ष ब्रिटीशांनी सर्व माल पकडून जप्त केला.

सन १९१७ मध्ये रशियात क्रांती होऊन साम्यवाद्यांचे सरकार आल्यावर बर्लीन, मॉस्को इ. ठिकाणाहून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे प्रयत्न केले.

बी. एस. झाल्यावर त्यांनी मेक्सिकोमधील कृषी क्रांतीचा जवळून अभ्यास करायचे ठरवले. स्वातंत्र्यानंतर भारतात त्याचा उपयोग होईल म्हणून. परंतु तिथली अस्थिर परिस्थिती निवळेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार होती. मग त्यांनी कृषी शास्त्रातलीच एम. एस. ही पदवी घेण्याचे ठरवले. तुटपुंज्या पावसाच्या प्रदेशातील शेती हा विषय त्यांनी एम. एस. साठी निवडून पुलमन येथील वॉशिन्ग्टन स्टॆट कृषी महाविद्यापीठातून एम. एस. पदवी मिळवली. अमेरिकेतल्या नेवाडा, उटाह, आयडाहो, पूर्व ऑरेगॉन इ. राज्यातील ८ इंच प्रतिवर्षी अशा अत्यल्प पावसाच्या प्रदेशातील समृद्ध शेतीचा त्यांनी अभ्यास केला. कमी पावसात भरपूर पीक देणारी तसेच अति उंचावरील प्रदेशात तग धरू शकणारी गव्हाची वाणें त्यांनी विकसित केली.

महायुद्ध संपल्यावर खानखोजे वेषांतर करून बसराहून बोटीने मुंबईला आले. परंतु भारतातील ब्रिटीश शासनाविरोधात भारतातून तसेच भारताबाहेरून असंख्य कारवायांत त्यांचा प्रमुख सहभाग असल्यामुळे त्यांच्या पाळतीवर ब्रिटीशांचे हेर होते. त्यामुळे ते घरी जाऊ शकले नाही. तेव्हाचे त्यांचे मुंबईतले वास्तव्य केवळ थरारक म्हणता येईल अशा प्रसंगांनी भरलेले आहे. संपूर्ण काळ ते इथे वेषांतर करून इराणी व्यक्तीच्या स्वरूपात वावरले. फक्त भारतीय स्वातंत्र्याचा लढा देणार्‍या नेत्यांना भेटले आणि घरच्यांना दर्शनही न देता त्यांना पुन्हा एकदा देशाबाहेर पळावे लागले.

मेक्सिकोत त्यांनी वनस्पतीशास्त्रातील प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. आपले भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी यापूर्वीच लग्न लागलेले आहे आणि आपले पूर्णपणे अस्थिर आहे त्यामुळे आपण विवाह करणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते. हे सर्व स्वीकारूनही ‘जान अलेक्झान्ड्राईन सिन्डीक’ या बेल्जियन मुलीने करीन तर त्यांच्याशीच लग्न करीन असे जाहीर केले. मग दोघांनी लग्न केले. जान सिन्डीकची जानकी खानखोजे झाली. त्यांना दोन कन्यारत्ने झाली. मेक्सिको सरकारने खानखोजे यांना त्यांच्या कृषी खात्यात विविध पदे देऊन सन्मानित केले. नंतर ते मेक्सिकन कृषी खात्याचे संचालक देखील झाले. इथे त्यांनी कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले. आता त्यांच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाले असे त्यांना वाटले होते.

स्वतंत्र भारतात परतण्याचे त्यांचे स्वप्न आता पुरे होणार होते. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी तत्कालीन ‘मध्य प्रांता’तील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले.

एप्रिल १९४९ मध्ये ते मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. ब्रिटिशकालिन यादी अद्ययावत करण्याचे कष्ट तत्कालीन भारतीय नोकरशाहीने घेतले नव्हते हे उघड आहे. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले. पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. सन १९५५ च्या सुमारास त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते मेक्सिकोतले चबूगवाळे आवरून भारतात कायम राहण्याचे ठरवून नागपूरला आले. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले.

पण भारतातील वास्तव्यात त्यांना आर्थिक गणित काही जमले नाही. आयुष्यभर वणवण फिरून अपार कष्ट सोसले तरी निवृत्त होऊन आराम करण्याच्या वयात त्यांना अर्थार्जनासाठी काम करावे लागले. ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन भाषा शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. परंतु तेवढ्याने भागेना म्हणून त्यांच्या पत्नीला देखील अर्थार्जन करावे लागले. अर्थार्जनासाठी तिने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले तसेच फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. भारत सरकारने १९६३ पासून श्री. खानखोजे यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. खानखोजे यांचा मृत्यू १८ जानेवारी १९६७ ला झाला. श्रीमती खानखोजे यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.

टीना मोदोत्ती आणि खानखोजे त्यांची कन्या सावित्री सोहोनी यांनी कृष्णधवल चित्रे आणि त्यासोबत येणारे वर्णन आणि माहिती यांच्या माध्यमातून खानखोजे यांच्या क्रांतिकारी कार्याचे रंगतदार चित्रण ठळकपणे केलेले आहे ते महाजालावर
https://www.documenta14.de/en/south/903_revolutionary_work_pandurang_kha...

इथे उपलब्ध आहे.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

16 Feb 2024 - 8:01 pm | कुमार१

अफाट गुणवत्ता असूनही काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय आवडला.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन !

सौंदाळा's picture

16 Feb 2024 - 8:31 pm | सौंदाळा

खानखोजे यांचे नाव कृषी संबंधीत आहे इतकी त्रोटक माहिती होती.
पण लेख वाचूनच छाती दडपली. किती कठोर परीश्रम, चिकाटी, त्याग.
उत्तम लेख आणि ओळख. खूप दिवसांनी चांगले वाचल्याचे समाधान मिळाले.

सुधीर कांदळकर's picture

16 Feb 2024 - 8:44 pm | सुधीर कांदळकर

डॉक्टरसाहेब आणि सौंदाळासाहेब.

टर्मीनेटर's picture

16 Feb 2024 - 9:19 pm | टर्मीनेटर

पहिल्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत!
मला तर खानखोजेंचे नावंही कधी ऐकल्याचे आठवत नाही, अशी अजून किती नररत्ने तत्कालीन इतिहासात अप्रसिद्ध / अप्रकाशित राहिली असतील कोण जाणे...

असो, आता "दे दि हमे आजादी बिना खडग बिना ढाल" हे भजन ऐकायचा मूड झाला आहे, त्यामुळे रजा घेतो 😀

मुक्त विहारि's picture

16 Feb 2024 - 9:23 pm | मुक्त विहारि

एका अचाट माणसाची ओळख करून दिलीत..

मनापासून धन्यवाद...

Bhakti's picture

16 Feb 2024 - 9:55 pm | Bhakti

छान ओळख करून दिली.

स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तो मोठ्या उमेदीने मायदेशी परतला. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाट्याला आली
ना चिरा ..... ना पणती ....
- वीणा गवाणकर

इतका चढता आलेख आणि शेवट वाचताना..हृदय पिळवटलं.किती खडतर वाट मिळाली एका देशभक्ताला....
मी 'एक होता कार्व्हर 'पुस्तक परिचय लिहिला तेव्हा वीणा गवाणकर यांचेच डॉ.खानखोजे यांचे पुस्तक वाचा असे सांगितले होते.आता नक्कीच वाचेन.

नठ्यारा's picture

16 Feb 2024 - 11:33 pm | नठ्यारा

नमस्कार सुधीर कांदळकर!

खानखोजे यांच्या परिचयाबद्दल आभार. त्यांचं आयुष्य सावरकरांसारखं तलवारीच्या धारेवर गेलं. जर गदरपंथीयांचा उठाव यशस्वी झाला असता तर आज खानखोजे हे भारताचे पहिले पंतप्रधान असते. निदान कृषिमंत्री तरी नक्कीच असते. या योजनेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. ती यशस्वी करण्यासाठी संस्थानिकांचा पाठिंबाही घेतला गेला होता, असं ऐकलंय.

असो.

राजकीय क्रांती अयाश्वी ठरली तरी खचून न जाता या पठ्ठ्याने कृषीक्रांतीत स्वत:स झोकून दिलं. मेक्सिकोच्या हरितक्रांतीत त्यांचं अमूल्य योगदान आहे. त्या हरितक्रांतीतून नॉर्मन बोरलॉग हे मेक्सिकन कृषीतत्ज्ञ पुढे आले. त्यांनी भारतात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. पण भारतात त्या संदर्भात खानखोज्यांचं नावही ऐकू येत नाही. खरंतर खानखोजे हे भारताचे कृषीमंत्री व्हायला हवेत. पण ते झालं नाही. म्हणतात ना सिंहाच्या नेतृत्वाखाली सशांची फौजही जिंकते, पण सशाच्या हाताखालचे सिंहही शेपूट घालतात.

नेहरूंना भीती होती की खानखोजे ( व / वा त्यांचे क्रांतिकारक वर्तुळातले लोकं ) नेहरूंची सत्ता उलथून तर टाकणार नाहीत. ही भीती अगदीच अनाठायी नव्हती. असे प्रकार १९५१ व १९६१ साली घडले होते, असं ऐकून आहे. स्वतंत्र भारतात खानखोज्यांना मिळालेल्या तुसड्या वागणुकीची अशी संगती लागू शकते. बाकी, खानखोज्यांच्या राजकीय व कृषी या दोन्ही क्रांत्यांवर अधिक माहिती उजेडात येणे अत्यावश्यक आहे.

-नाठाळ नठ्या

निमिष ध.'s picture

17 Feb 2024 - 12:53 am | निमिष ध.

पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात कधी वाचायला मिळाले नसेल >>> शाळेत असताना इतिहास न वाचण्याने असे लिहिले असेल. मला तरी अजूनही आठवते की भारतीय क्रांतिकारकांच्या धड्यामध्ये मदनलाल धिंग्रा यांच्या बरोबर खानखोजे यांचे ही नाव होते. बहुतेक सुभाषबाबूंच्या संदर्भातही आलेले होते.

बाकी पुढची ओळख झालेली नव्हती त्यामुळे ती करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मला बरेच दिवस हे सलते की आमच्या वेळेस जो इतिहास शिकवला गेला तो १९४७ पर्यंतचाच. आता खरे म्हणजे पुढचा इतिहास सुद्धा शिकवावा.

अहिरावण's picture

19 Feb 2024 - 3:57 pm | अहिरावण

आत ४७च्या पुढचाच इतिहास शिकवावा....

जुइ's picture

17 Feb 2024 - 7:23 pm | जुइ

नुकतेच भारतातून येताना वीणा गवाणकर लिखित "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचायला आणले आहे.

कंजूस's picture

17 Feb 2024 - 10:42 pm | कंजूस

अचाट अफाट व्यक्ती. परिचय आवडला.

सुधीर कांदळकर's picture

18 Feb 2024 - 6:08 pm | सुधीर कांदळकर

टर्मिनेटर, मुवि, भक्तीताई, कंजूसराव, नठ्यारा प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. माझे वैयक्तिक मत असे की एखाद्या व्यक्तीच्या कार्यामुळे इतिहासावर ठसा उमटला की त्या व्यक्तीची इतिहासात ठळक नोंद होते. अन्यथा कार्य कितीही थोर असले तरी इतिहासातली नोंद तशी ठळक होत नाही. संशोधकांपैकी डेव्हिड हूक आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस या शास्त्रज्ञांबद्दल असे म्हणता येईल.

न्यूटनने शोधून काढलेले गतिविषयक नियम हूकने अगोदरच शोधून काढले होते. परंतु प्रसिद्ध केले नव्हते. न्यूटनने अगोदर प्रसिद्ध केले. त्यामुळे ते न्यूटनच्या नावे नोंदले गेले.

आल्फ्रेड रसेल वॉलेसने उत्क्रांतीचे तत्व स्वतंत्रपणे शोधले होते. परंतु ते डार्विनच्या नावावर प्रसिद्ध आहे. आल्फ्रेड रसेल वॉलेस फारसा कुणाला ठाऊकही नाही.

मुद्दाम शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. राजकीय व्यक्तींची दिली तर मला शिव्या पडतील. असो. हे माझे मत आहे. इतरांची मते वेगळी असूं शकतात.

सुधीर कांदळकर's picture

18 Feb 2024 - 6:55 pm | सुधीर कांदळकर

प्रतिसादाबद्दल ध्न्यवाद.

श्वेता व्यास's picture

19 Feb 2024 - 10:47 am | श्वेता व्यास

थोर स्वातंत्र्यसैनिक श्री खानखोजे यांच्या परिचयाबद्दल धन्यवाद.
आधी पुसटसे नाव वाचल्यासारखे वाटतेय, आता नक्कीच अधिक माहिती वाचायला आवडेल.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

खुप सुंदर लेख ! तुमच्या ओघवत्या लेखनशैलीला सलाम !

वीणा गवाणकर यांचे "नाही चिरा" हे डॉ खानखोजे यांच्यावरचे पुस्तक वाचले आहे.
माझ्या एका मित्राने या पुस्तकावर इंटरनेट रेडिओ साठी ऑडियो प्रोजेक्ट केला होता तेव्हा साक्षात वीणा गवाणकर यांना भेटण्याचा योग आला होता.. ही रोमांचक आठवण !

धन्यवाद.

अशाच पुढील प्रेरणादायी लेखाच्या प्रतिक्षेत.

सुधीर कांदळकर's picture

19 Feb 2024 - 7:01 pm | सुधीर कांदळकर

श्वेताताई आणि चौथा कोनाडासाहेब प्रतिसादाबद्दल धन्यवाद.