आम्ही मुलीकडे ज्या भागात राहतोय तिथं खरोखरच केवळ अठरापगड जातीच्या नाही तर अनेक विविध देशांमधून लोक रहायला येतात. इथल्या काही राज्यात तर मूळ अमेरिकन फारच कमी आणि बाहेर देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे आणि आता इथेच स्थायिक होऊन इथलेच झालेले रहिवासी नागरिक जास्त आहेत. मेक्सिको - एशिया मधून हे प्रमाण अधिक आहे. त्यातही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू जर्सी ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की भारतातून येणाऱ्यांचे प्रमाण 6% आहे, तर मेक्सिकन लोकांचे 24% आहे. मात्र अनेक मेक्सिकन हे कामगार वर्गात भरती असतात, तर अनेक एशियन (यामध्ये भारतीय, चीन, कोरियन, फिलिपिन्स, तैवान असे सर्व) हे टेक्नॉलॉजी आणि व्यापार, वैद्यकीय अशा क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. उच्चशिक्षित भारतीय 27% इथे येतात. त्यामुळेच इथल्या मूळ अमेरिकन माणसापेक्षा मुख्यतः भारतीय आणि अन्य आशियाई देशातील लोक जास्त अर्थाजन करतात. अर्थाजन जास्त करतात तसा मूळ अमेरिकनपेक्षा टॅक्सही खूप जास्त भरतात..त्यामुळेच इथल्या भारतीयांशी बोलले असता.. इथल्या इकॉनॉमीला, टेक्नॉलॉजीला, लॉजिकला आणि त्यामुळेच इथल्या जनतेसह देशाला 'आम्ही जगवतो' असा सार्थ अभिमान कॅलिफोर्नियात तरी जाणवतो.
भारतीय लोकांशिवाय इथल्या अनेक कंपन्या काम करू शकणार नाहीत. इथल्या राजकारण्यांनाही त्याची चांगलीच जाण झालेली आहे. त्यामुळेच अमेरिकन धोरणांमध्ये त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे सर्व भारतीय एका परीने दोन्ही देशांसाठी काम करत आहेत. प्रत्यक्ष भारतात न राहताही भारताला मदत होते. हे मी इथं राहणाऱ्यांचं अंध समर्थन करत नाहीये तर केवळ याकडे आपलं लक्ष वेधून, आपल्याच भारतीय विद्यार्थ्यांसह इथे राहू इच्छिणाऱ्यांच्या भावना मांडत आहे. इथल्या अभारतीय लोकांशी बोलताना असेही जाणवले की भारतीय सहकारी, कर्मचारी, मित्र-मैत्रिणी त्यांना जास्त सुरक्षित आणि सुहृद वाटतात. इथे जन्मलेल्या पुढल्या पिढीला अमेरिकन आणि मूळ देशातील संस्कृतीशी जमवून घेणं अवघड असलं तरी अशक्य नाही.
खरंतर प्रत्येक देशाच्या संस्कृतीमधील काही भाग आज इथे दिसतो. त्यामुळेच खरंतर मूळ संस्कृतीत अनेक संस्कृतींचा मिलाफ होऊन एक जास्त उन्नत - प्रगत आणि सक्षम - कणखर राष्ट्रसंस्कृती तयार झाली आहे. एखाद्या धातूच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अन्य धातूंशी संयोग करून, मिश्रण करून, तप्त रस तयार करून त्या धातूचे मूल्य, उपयुक्तता वाढवली जाते ही प्रक्रिया 'मेल्टिंग पॉट'मध्ये होते. म्हणूनच अमेरिकेला 'मेल्टिंग पॉट' हे नाव सार्थ, यथार्थ वाटते.
इथे अनेक विविध संस्कृतींची उत्तम भेळ आणि मेळ दिसतो. भारतीय, थाई, मेक्सिकन, चायनीज, जपानी अशासह अमेरिकन रेस्टॉरंट मध्ये सर्व वर्णीय-वर्गीय- वयीन आणि देशीय लोक दिसतात. आनंदाने एकमेकांचे पदार्थ टेस्ट करतात...वेस्ट करतात! चायनीज रेस्टॉरंट मधील व्हेज स्प्रिंग रोल आणि आपल्याकडे भारतीय चायनीज रेस्टॉरंट मधील व्हेज स्प्रिंग रोल यात खरोखर जमीन अस्मानाचे अंतर आहे. इथे मिळणाऱ्या इडली सांबारला आम्ही 'लय भारी' रेटिंग दिले असले तरी, पक्के सांबारप्रेमी साउथ इंडियन त्याला 'नॉट गुड - नॉट बॅड' मोडवर ठेवतात.
इथे काळे- गोरे इतकेच वर्ण नाहीत तर वेगवेगळ्या संकरातून जन्मलेली मूलं दिसतात. मुल होणे हे इथल्या सुखी संसाराचं सार नाही. लग्न झालंच पाहिजे असे बंधनही नाही. त्याचप्रमाणे लग्न हे स्त्री-पुरुष असंच असेल असेही बंधन नाही. इथं LGBT किंवा LSBTअर्थात समलिंगी, उभयलिंगी लग्न सुद्धा थाटामाटात होतात. आम्ही आलो तो जून महिना तिथे त्यांच्या सन्मानार्थ 'Pride Month' म्हणून सहा रंगी झेंडे, फलक लावून साजरा होत होता. काही व्यक्ती अत्यंत मुक्तपणे तसे दर्शवणारे कपडे, हातात बॅण्ड घालून रॅली काढतात. केवळ संख्येने कमी आहोत आणि बहुजनांसारख्या त्यांना भिन्नलिंगी कामभावना होत नाहीत यामध्ये इथे त्यांची गळचेपी होताना दिसत नाही. खरंतर जगभरात बहुसंख्यांना भिन्नलिंगी आकर्षण वाटते यात त्यांचे 'स्वकर्तृत्व' काहीच नसते. यामध्ये या समलिंगी संबंधांना, आकर्षणाला बिभत्स, किळसवाणे म्हणून इथे कोणीही हेटाळणी करत नाही. तसेच या कामभावने व्यतिरिक्त अन्य सर्व भावभावना त्यांनाही असतात, त्याची कदरही इथे अधिक जाणवते. गे अथवा लेस्बियन कपल्सही या मेल्टिंग पॉटमध्ये समृद्धपणे नांदत असतात. आपण भारतात मात्र अनेकदा लैंगिकतेसह प्रांताचे, वर्णाचे, वंशाचे, पक्षाचे, झेंडे मिरवत संकुचित बेटं तयार करत माणुसकीलाच मेल्ट करतो..
प्रतिक्रिया
20 Aug 2023 - 10:55 am | भागो
सगळे चूप बसले आहेत ना?
पण मला हा भाग आवडला.
20 Aug 2023 - 3:13 pm | निमी
धन्यवाद.. मनःपूर्वक धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल.. मला स्वतःला लिहिल्यानंतर हा भाग आवडला होता/आहे. मी स्वांत सुखाय लिहिते.. या विषयातील काही भाग पटला तरी पचायला थोडा जड, अवघड आहे याचीही मला कल्पना आहे. या विषयावर अधिक सविस्तर लेख लिहिण्याचा विचार आहे.
प्रतिक्रिया नाही, वाचन होणे आणि त्या विचाराची बी पडणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे..सर्व वाचकांचेही मनःपूर्वक आभार.
20 Aug 2023 - 3:20 pm | गवि
जरा थांबा. लगेच पुष्पगुच्छ देऊ नका. मिपावर शनिवार रविवारी जरा कमीच माणसे असतात हॉटेलात. सोमवारी खूप गर्दी होईल. (हापिसची ब्यांडविडथ वापरून मिपा वाचण्यात जे सुख आहे ते घरून नाही).. ;-))
20 Aug 2023 - 3:44 pm | भागो
हापिसची ब्यांडविडथ वापरून मिपा वाचण्यात जे सुख आहे ते घरून नाही).. ;-))>>> गवि!
20 Aug 2023 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय. हाही भाग छान झालाय.
येऊ द्या पुढचा भाग.
-दिलीप बिरुटे
21 Aug 2023 - 3:37 pm | निमी
धन्यवाद..
21 Aug 2023 - 12:08 pm | साहना
अत्यंत सुरेख लेखन. अमेरिकन समाज खरोखर मेल्टिंग पोट आहे. जितकी आत्मीयता अमेरिकन लोक दाखवतात क्वचित कुणी दाखवतात. युरोपिअन अजिबात नाही. मी अमेरिकेत आले तेंव्हा पहिल्याच आठवड्यात कुणी तरी "आम्ही अमेरिकन लोक" असे संबोधित केले. मला थोडे आश्चर्य वाटले. अर्थांत उडदा माजी काळे गोरे, इतर बाजू ह्या सर्व गोष्टी असतातच पण बहुतांशी अमेरिकन लोक खूप चांगले आहेत.
कॅलिफोर्निया ची एक विशेष बाजू म्हणजे इथे अनेक हरहुन्नरी लोक आहेत. असंख्य भारतीय आणि गोरे साधू, संन्यासी, बौद्ध भिक्षु आहेत. खूप वर्षे आधी मी रात्रीची एका पार्क मध्ये होते आणि माझ्या सोबत तेंव्हा माझी एक गोरी रूममेट होती, तिथे मला एक तरुण दिसला तो साधारण २१ वर्षांचा होता. गोरा. आणि त्याच्या पेहेरावावरून तो हिंदू किंवा हिप्पी असावा असा कयास वाटला म्हणून मी त्याच्याशी संवाद साधला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुलगा स्वतःला संन्यासी म्हणत होता आणि चक्क LA पासून काहीही नसताना चालत आला होता. बरोबर फक्त एक झोळी आणि आणखीन एक कपड्याची जोडी. फोन, पैसे काहीही नाही. LA - पालो अल्टो म्हणजे साधारण ५०० किलोमीटर. त्यातील साधारण १५० किलोमीटर त्याला एका अग्नीबंबाने लिफ्ट दिली होती. त्याला मी विचारले कि अन्नाचे काय ? तर त्याच्या सन्यास धर्माप्रमाणे तो इतरांची जेवणे झाल्यावर फक्त तीन ठिकाणी जाऊन शाकाहारी अन्नाची भिक्षा मागतो आणि मिळाले तर खातो. आणि हे सर्व काही तो शेखी मिरवल्याप्रमाणे सांगत नव्हता तर अगदी "मॅटर ऑफ फ़ेक्ट" प्रमाणे. देव कसे तरी अरेंज करतो. असे त्याचे म्हणणे होते.
इथे कशाला आलास असे विचारले तर तेंव्हा सांता क्रूझ डोंगरांत एक आश्रम होता तिथे काही दिवस राहून वेद अध्ययन करण्यासाठी आलो आहे असे त्याने सांगितले. मग आम्ही त्याला आमच्या घरी नेले, शॉवर वगैरे करून त्याने मग आमचे जेवण झाल्या नंतरच काही थोडे अन्न घेतले आणि मग तो सकाळी ४ वाजता उठून संध्या वगैरे काही तरी कर्मकांड करून आम्हाला आशीर्वाद देऊन गेला. आमच्या घरांत त्या वेळी ४ मुली आणि २ मुले होती त्यामुळे तसा धोका काहीही नव्हता. त्याच्या तोंडावरच एक प्रकारचे विशेष तेज होते. अन्न जास्त खात नसल्याने थोडा कृश वाटत असला तरी त्याचे डोळे तेजपुंज होते.
21 Aug 2023 - 3:38 pm | निमी
तुमचा प्रतिसाद छान नवीन माहिती देतो आणि वेगळे लिहायला उद्युक्तही करतो.
21 Aug 2023 - 12:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
अमेरिका आहेच मेल्टिंग पॉट, पण भारतातल्या भारतातही सगळी शहरे म्हणजे मेल्टींग पॉटच झाली आहेत आताशा.
लेख आवडला, आणि शेवटचा परीच्छेद विचारप्रवर्तक वाटला. भारतात व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने अजुनही बोंबच आहे. तुमच्या घरावर शेजार पाजार्यांचे लक्ष असते. कोण कधी येते जाते, कुठे सासू/सुनेचे पटत नाही. कोणाचा मुलगा मुलगी नापास झाले, कोणाचे कोणाशी लफडे आहे वगैरे बातम्या यथास्थित चघळल्या जातात(किवा मोलकरणींद्वारे पोचतात). लिव्ह ईन मध्ये राहणे वगैरे तर दूरच. त्यामुळे कटकट होते खरी.
पण त्याचबरोबर सणासुदीला एकमेकांच्या घरी एखादी वाटी पक्वान्न दिले जाते. कुरियर आल्यास ठेवुन घेतले जाते, एक्मेकांच्या घराच्या किल्ल्या ठेवल्या जातात, कोविड काळात आमचे जेवण खाण आठवडाभर शेजार पाजारहुनच येत होते. त्यामुळे वरच्या सगळ्या कटकटींकडे दुर्लक्ष करुन राहतोय आपले गुण्यागोविंदाने भारतातच.
23 Aug 2023 - 8:23 am | चौकस२१२
भारतातही सगळी शहरे म्हणजे मेल्टींग पॉटच झाली आहेत आताशा.....
ह......म.... स्थानिक / देश पातळीवर म्हणत येईल पण जागतिक पातळीवर ते होणे अवघड आहे ... साधे उदहारण घ्या , टोरांटो किंवा मेलबर्न मध्ये ग्रीस पासून इंडोनेशियातील मुळ लोक येऊन "कायमची " वास्त्यवयं करून आहेत आणि त्यांनी स्वतःची उपहारगृहे उभारली आहेत .. यातील "कायमचे" हे महत्वाचे
मुबंईत पंचतारांकित उपहारगृहात जगभरचे तात्पुरते आचारी येतात हे ठीक आणि मुंबई ची मज्जा हि आहेच पण जागतिक मेल्टिंग पॉट मी अजून तरी म्हणणार नाही
23 Aug 2023 - 11:45 am | राजेंद्र मेहेंदळे
राष्ट्रीय मेल्टिंग पॉट म्हणुया भारतातील शहरांना. हाकानाका
23 Aug 2023 - 2:05 pm | साहना
मुंबई अत्यंत छान मेल्टिंग पोट आहे. काही नतद्रष्ट राजकीय "कार्यकर्ते" सोडल्यास संपूर्ण समाज अत्यंत सहिष्णू आणि आत्ममग्न आहे, लोकांच्या गोष्टींत नाक खुपसत नाही. पुणेरी लोक जास्त आगाऊ आणि नाक खुपसणारे असले तरी ते बहुतांशी बुमर अंकील छाप आहेत त्यामुळे काही वर्षांत त्यांचा कळप कमी होईल.
गोवा आणि केरळ बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय मेल्टिंग पॉट वाटला. गोव्यांत इंग्लंड,जर्मनी, स्पेन आणि रशियन लोक स्थायिक झालेले दिसतात. केरळ मध्ये सुद्धा अनेक लोक दिसतात.
भारतीय लोक बऱ्यापैकी सहिष्णू आहेत.
25 Aug 2023 - 5:09 am | चौकस२१२
बुमर अंकील छाप ...हाय्ला ह्यो काय ?
25 Aug 2023 - 6:40 am | गवि
बेबी बूमर्स जनरेशन असे म्हणायचे असावे.
25 Aug 2023 - 6:57 am | तुषार काळभोर
ज्येष्ठ नागरिक
काका लोक्स
आमच्या वेळी असं नव्हतं बुवा, आम्ही किती खस्ता खाल्ल्या, आम्ही चार चार किलोमीटर पायी शाळेत जायचो, असे उमाळे आणणारी पिढी
व्युत्पत्ती कदाचित बेबी बुमर्स मध्येच असेल.
अवांतर: दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात बुमर्सची लाट होती का?
23 Aug 2023 - 8:38 am | निमी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे..इथली मजा इथे एन्जॉय करायची, तिथली तिथे.
23 Aug 2023 - 8:40 am | निमी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे, इथली मजा इथे एन्जॉय करायची..तिथली तिथेच.
21 Aug 2023 - 3:42 pm | निमी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. दखल घेणं, लक्ष घालणं ही चांगली बाबही ठरू शकते.. ही लेखमाला झाल्यावर यावर लिहिलेलं लिखाण आहे ते नक्की पाठवेन :-)
23 Aug 2023 - 7:56 am | चौकस२१२
" मेल्टिंग पॉट" चे काही भावलेले फायदे ( यात खालील देश गृहीत : कानडा / युनाइटेड स्टेट्स / ऑस्ट्रेल्या / न्यू झीलंड / इंग्लंड आणि सिंगापोर आणि काही प्रमाणात युयेई )
- विविधी खाद्यसंस्कृती ( नुसती भारतीय लोणची बघितलंय तर कळेल कि भारतात अगदी मुंबई सारखया शहरात सुद्धा एवढ्या प्रकारची लोणची एका ठिकाणी मिळणार नाहीत ) सुक्या माशाचे किती तरी प्रकार
- हवेत सुकवलेले मांस
- चीज चे असंखय प्रकार
खावे त्यांच्या देशात
- कलेतील विविध गुणदर्शन ... ग्रीक पानीयरीं जत्रा / चिनी नववर्ष इत्यादी ....
23 Aug 2023 - 8:36 am | निमी
मेल्टिंग पॉट कुठलाही असू दे त्यात काही वेळा तरी मेल्ट होऊन एन्जॉय करता येणे खरंच छान असते, मुंबईची मजा काही वेगळी होती/आहे.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
23 Aug 2023 - 5:15 pm | सुनील
मेल्टिंग पॉट हा शब्द लेखात आणि कित्येक प्रतिसादात अगदी सढळपणे वापलेला दिसतो. अमेरिका हा मेल्टिंग पॉट आहे हे वाक्य बरेचदा ऐकण्यात वा वाचनात येते. पण त्याचा खरा अर्थ काय हे बघायचे झाल्यास बिस्मार्कचे वाक्य तपासावे लागेल.
जर्मनीचा पोलादी पुरुष म्हणून ओळखला जाणारा बिस्मार्क याला एकदा विचारण्यात आले होते की, जगावर प्रभाव टाकणारी २० व्या शतकातील सर्वात मह्त्त्वाची बाब कोणती?
त्याचे उत्तर त्याने एका वाक्यात दिले - अमेरिकन लोक इंग्रजी बोलतात! (North Americans speak English).
इ.स. १६२० साली इंग्लंडहून सुमारे १०० प्रवासी घेऊन मेफ्लॉवर नावाची बोट अमेरिकेच्या किनार्याला लागली आणि त्यानंतर केवळ इंग्लंडमधूनच नव्हे तर युरोपातील अनेक देशांतून अमेरिकेत स्थायिक होणार्यांची रीघ लागली.हे लोक जर आपापल्या भाषा आणि संस्कृती सांभाळत पृथक राहिले असते तर अमेरिका ही युरोपचीच एक प्रतिकृती बनली असती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्यात आपापसात रोटी-बेटी व्यवहार झाले आणि त्या सर्वामधून एक इंग्रजी भाषी गोरा अमेरिकन निर्माण झाला. बिस्मार्कच्या म्हणण्याचा मथितार्थ हा होता!
तसे अमेरिका हे दोन मेल्टिंग पॉट्स आहेत - एक गोरा आणि दुसरा काळा. बाकी अन्य सगळे एका मोठ्या सॅलड बोलचे घटक आहेत. म्हणजे म्हटले तर पदार्थ एक आहे पण त्याचे घटक वेगवेगळे काढता येतात!
तद्वत, अमेरिकेत स्थायिक भारतीय हे सॅलड बोलचे घटक आहेत, मेल्टिंग पॉट्चे नव्हेत!
24 Aug 2023 - 3:30 am | चामुंडराय
अगदी अगदी , हेच लिहिणार होतो.
मेल्टिंग पॉटच्या ऐवजी सॅलड बोल म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
सॅलड मधले सगळे घटक एकत्र तर असतात परंतु बोल मध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व देखील राखून असतात.
तद्वत लोकं आपापली संस्कृती, भाषा, अन्न, सणवार इत्यादी कवटाळून बेटांवर राहतात.
बाकी लेखमालिका छान आहे. घरबसल्या अमेरिकेचे दर्शन होत आहे.
24 Aug 2023 - 6:44 am | निमी
धन्यवाद..अशी काही दुरूस्ती असेल तर नक्की कळवा.
24 Aug 2023 - 6:41 am | निमी
मेल्टिंग पॉट बद्दल अधिक योग्य माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. आता सॅलड बोल बद्दलही लिहायचा नक्की विचार करेन..आणि आवश्यक तेथे दुरुस्ती पण करेन.
24 Aug 2023 - 8:58 am | सुनील
धन्यवाद
24 Aug 2023 - 4:42 pm | मुक्त विहारि
मस्तच लिहिले आहे