अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
12 Aug 2023 - 9:05 pm

21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसणारे कॉरिडाॅर्स आणि प्रत्येक मजल्यावर 2-4-6-8 जणांसाठी बसायची सोय असणारी व्यवस्था. सगळीकडे टेबल, खुर्च्या कोच ठेवलेले. आपापले लॅपटॉप घेऊन तुम्ही कुठेही बसा..काम करा. स्वतःच्या टेबलावर माणूस नाही म्हणून दंगा कुठेही नाही.. आरडाओरड नाही. काहीजण तर घरातूनच ऑफिसचं काम इमाने इतबारे करत असतात.

ऑफिसला येताना परीट घडीचे - इस्त्रीचे - भारी कपडेच हवेत याचेही बंधन नाही. कोणी झग्यात, कोणी ट्रॅक पॅन्ट मध्ये तर कोणी हाफ चड्डीत ऑफिसमध्ये दिसतात. साहेब कोण.. सफाईवाला कोण, कळणार पण नाही..सगळ्यांना आदर सारखाच ! प्रत्येकाची वर्क स्पेस ओपन.. बंद दाराआड चर्चा करायची असेल तर काचेच्या भिंती असणारी स्वतंत्र खोली असते. ती सुद्धा इतरांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ही काळजी बरं ! 'बंद दाराआड चर्चा' आपल्याकडची 'कारणे आणि परिणाम' अधिक रंजक असतात. इथे कोणीही 'खूप वेळा किंवा खूप वेळ' एका बरोबर बोलत असेल/ काम करत असेल तर 'पाणी मुरतंय!' ही भानगड नाही. भानगड करणारेही खुलेआम सर्व व्यवहार सर्वांच्या साक्षीनं करतात. जवळ घेणे, मिठी मारणे म्हणजे 'हग', चुंबन घेणे म्हणजे 'किस' तर हलकीशी पप्पी घेणे म्हणजे 'पेक' म्हणे ! हे सर्व सार्वजनिक ठिकाणी करणे, होणे, घेणे सर्वमान्य आहे..पण त्यांच्याकडे पाहणे-पहातच राहणे हे मात्र ते कृत्य करणाऱ्यांना अवमान जनक असू शकते. म्हणजे चार चौघात नव्हे 50-100 जणांसमोर पापी घेणं पाप नाही, पण त्यांची 'पापी पाहणं' मात्र तुमची 'पापी' नजर दाखवतं. असेच खुलेआम पाय (नव्हे.. खरंतर तंगड्या!) कसेही-कुठेही ठेवून तुम्ही काम करू शकता, लेक्चर ऐकू शकता, सूर्यास्त पाहू शकता, कार मधून आणलेल्या खुर्च्यांवर बैठक मांडू शकता. इथे कुणीच् कुणाला टोकत नाही.. आणि कुणाला तुम्ही टोचत पण नाही.

कंपनीत चहा-कॉफी मशीन जवळ ठेवलेली चहा-कॉफी-दूध-साखर इतकच काय मधाची पॅकेट्स कोणीही ढापून, पळवून घरी नेत नाही. स्वच्छतागृह खरोखरच कमालीची स्वच्छ असतात. 'स्वच्छता राखा' असे सल्ले न लिहिता ते स्वच्छ ठेवतात. काही ठिकाणी हल्ली सेन्सर बसवले असल्याने तुम्ही आत जाताच स्वच्छ कमोडमध्ये तुमच्या डोळ्यांदेखत जोरात आवाज करत पाणी पडून पुर्नस्वच्छ होतं. विधी उरकून उठला रे उठला की पुन्हा एकदा मोठ्ठा आवाज... पुन्हा पुन्हा पुर्नस्वच्छ ! आपल्या इतक्याशा 'शू' साठी केवढं पाणी खर्चलं जातंय असा विचार येऊन आणि क्षणभर तुम्ही रेंगाळला तर पुन्हा त्रिवार स्वच्छता होते..मला तो सेंसर नक्की कुठे आहे ते पाहायचं होतं...पण काय घ्या, आपण पाहिलं म्हणून सेंसरला पण आंघोळ घडायची. योगदिनाला सेन्सॉर दर्शन झालं पण सेन्सर दर्शनाचा योग नव्हता..

सगळ्याच कंपन्यांची ऑफिस इतकी मोठी किंवा सोयी सुविधांची नसतात. त्यामुळे काही वेळा इतर कंपनीतले सुद्धा इथल्या कुणाची मैत्री असेल तर पोटपूजेला इथं येतात. आम्ही दोघं त्यादिवशी 'कंपनी कामात' निरुपयोगी होतो, त्यामुळे आमचे आमचे उद्योग घेऊन गेलो होतो.. उदाहरणार्थ: चित्र काढणे-लिहिणे-विणकाम करणे इत्यादी. त्यामुळे काहीं ना कळेना हे कोण कर्मचारी बिना लॅपटॉपचे दिवसभर फक्त टाईमपास करत आहेत. पण इथल्या सभ्यतेपोटी कोणीही विचारलं नाही 'काय विणताय' किंवा हटकलं नाही. 'लिखाण काय... हॅऽ..हॅ..ऽ' म्हणून कुणी डिस्टर्ब केलं नाही. कसलं चित्र काढताय ? म्हणून चित्रकारामागे उभे राहून कुणी डोकावलं पण नाही. सभ्यतेचे आणि प्रायव्हसीचे अदृश्य पडदे पाहण्याचा योग मात्र योगदिनी आला.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Aug 2023 - 5:18 am | कंजूस

अगदी ग्राफिक ओळख!

निमी's picture

13 Aug 2023 - 6:32 am | निमी

धन्यवाद

निमी's picture

13 Aug 2023 - 6:32 am | निमी

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2023 - 9:07 am | धर्मराजमुटके

छान चालली आहे अमेरिका वारी . सगळे भाग वाचतो आहे.
एक प्रश्न : तुम्हाला उद्देशून नाही पण एकंदरीतच अमेरीका / इंग्लंड / युरोपात फिरणार्‍यांसाठी आहे.
आतापर्यंत जितकी प्रवासवर्णने वाचली आहेत तितक्या सगळ्या पालकांचे मुले / मुली चांगल्या कंपन्यांत कामाला आहेत.
एखाद्या साफसफाई वाल्या मुला /मुलीचे, हॉटेलात वेटर म्हणुन काम करणार्‍यांच्या पालकांचे , टॅक्सी / ट्रक चालविणार्‍या मुलांच्या पालकांचे मनोगत कधी ही वाचावयास मिळाले नाही. कोणी असे काही वाचले असेल तर कृपया लिखाणाचा दुवा द्यावा. (इंग्रजी असेल तरी चालवून घेऊ. मराठी असेल तर सोन्याहून पिवळे)
गावखाते टाईप (लघूउद्योग) उद्योगांची ऑफीसे / कार्यशाळांची काय परिस्थिती असते याचा कुणाला अनुभव आहे काय ? तिथे कशा सुखसुविधा असतात ? या विषयावर वाचायला आवडेल.

ह्या उद्योगांमध्ये मराठी लोक शक्यतो पडत नाहीत. गेल्या १५ वर्षात मी एकही मराठी माणूस अमेरिकेत असली कामे करताना पाहिलेला नाही. पंजाबी हिंदू, शीख, गुजराती पटेल इत्यादी मात्र पुष्कळ आहेत. पाकिस्तानी माणसे आहेत, त्यातल्या काहींशी पुष्कळ बोलणे झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर काम कष्टाचे असते, परंतु विजेवर चालणारी साधने, यंत्रे असतात, त्यामुळे भारतात असते तशी ढोर मेहनत करावी लागत नाही. आपल्याकडे ज्या कामाला १५-२० लोक ठेवतात त्यासाठी इकडे १-२ लोक पुरतात, कारण मदतीला असलेली यंत्रे. शहरात घरे महाग पडतात, त्यामुळे कष्टकरी लोक रोज तीन-चार तास दुरून गाडी चालवत येतात. अधिकृत कामगारांचे शोषण वगैरे होत नाही. मेक्सिकोतून आलेल्या अनधिकृत कामगारांची मात्र एक वेगळीच भीषण दुनिया आहे, ती फार वाईट आहे, त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.

बे एरियामध्ये अनेक भारतीय लोक असे काम करतात.. त्याचप्रमाणे अस्सल मराठमोळी म्हणावं असं स्वराज्य नावाचं किंवा पुरणपोळी नावाचं हॉटेल आहे. स्वराज्याचा मालक तर विदर्भातील आहे, छान मराठी बोलतो.अनेक महाराष्ट्रीयन तिथे आहेत..आम्ही गेलो त्या काळात तर बऱ्यापैकी मोठी दिंडीही निघाली होती.

धन्यवाद..आपण विचारल्याप्रमाणे ड्रायव्हिंग किंवा वेटर नाही पण माझ्या माहितीतही काही जण घरातून टिफिन करून देणे अथवा छोटे मोठे काम करणे करतात. त्याबद्दल ही लेखमाला झाल्यावर अवश्य लिहीन..चांगल्या पगाराची नोकरी असल्याशिवाय पालकांना तिथे बोलावणे शक्यही होत नाही, त्यामुळे कदाचित त्याबद्दल लिखाण कमी झाले असेल. माझी मैत्रीण चांगली शिकलेली असून आर्थिक आवश्यकता नसताना केवळ स्वतः अर्थार्जन करायचे म्हणून रोजंदारीवर एका दुकानात पुड्या बांधायलाही जात होती.

एखाद्या साफसफाई वाल्या मुला /मुलीचे, हॉटेलात वेटर म्हणुन काम करणार्‍यांच्या पालकांचे , टॅक्सी / ट्रक चालविणार्‍या मुलांच्या पालकांचे मनोगत
बहुतेक परदेशात ( पाश्चिमात्य ) शिकायला आलेलया भारतीय मुलांना किंवा कॅनडा ऑस्ट्रेल्या न्यू झीलंड सारखया देशात जिथे नोकरी नसताना पण कायम राहण्याचा परवाना मिळतो ( स्किल मायग्रेशन ) तिथे सुरवातीला आपले शिक्षण आणि अनुभवाशी निगडातील नसलेले काम करावि लागतात, उपहारगृहात भांडी घासण्यापासून ते माल मध्ये सफाई कामगार म्हणून ... कधी कधी त्यात माणूस अडकूनही पडतो... पण फार थोडे... आणि मराठी भागातील माणूस त्यामामाने सरासरी चांगलं शिकलेलला असल्यामुळे असे कमी दिसतील त्यामानाने "कूछ भी करके लेकिन हमे उथें जाना हि है " ( पंजाबी उच्चार ) आणि इतर प्रातांतील लोक दिसतात आणि असे होऊ शकते ... अर्थात असे असले तरी हि लोक कष्ट मात्र भरपूर करतात आणि पुढे जातात
ऑस्ट्रेल्यात शिक्षण हा "धंदा "जेव्हा वाढलला तेवहा वाटेल त्या टिनपाट ४ खोल्यातील "कॉलेज" मधील कोर्स करणाऱ्यांना व्हिसा मिळू लागला किंवा न्यू झीलंड मध्ये पण, तेव्हा अश्या लोकांचे प्रमाण वाढले
पण कष्टाला मान असल्यामुळे पुढे हा फरक आर्थिक दृष्टया दिसत नाही
गावखाते टाईप (लघूउद्योग) उद्योगांची ऑफीसे / कार्यशाळांची काय परिस्थिती असते याचा कुणाला अनुभव आहे काय ?
होय आहे .. लेखिकेने जे वर्णन केले आहे ते एका अंतर्राष्ट्रीय उद्योगाचे आहे
छोट्या उद्योगात, चहा कोफी देणे येथे असते पण जास्तीत जास्त बिस्कीट आणि ख्रिसमस ला एखादी मेजवानी मालकांतर्फे .. + अर्थात सर्वसाधारण स्वच्छता इत्यादी अस्ते ...बाकी फार काही विशेष नाही .. आणि अर्थात त्या त्या उद्योगवार अवलंबून आहे थोडे, कारखाने उत्पादन अश्या उद्योगात एवढे "पॉश "नसते ...
थोडयाफार फरकाने उत्तर अमेरिकेत हे असेच असावे . जर्मनीत पण साधारण असेच दिसले

रामचंद्र's picture

22 Aug 2023 - 9:55 pm | रामचंद्र

आपण म्हणता अगदी तसं नाही पण रमेश मंत्र्यांचे चिरंजीव राजेंद्र मंत्री यांचे 'अमेरिका! अमेरिका!' हे प्रवासवर्णन नेहमीपेक्षा वेगळं आहे. यात प्रामुख्याने बुद्धी, कष्ट, शिक्षण, चटपटीतपणा, तडफ यांचा अभाव असलेल्या आणि त्यामुळेच बेताच्या परिस्थितीत राहणाऱ्या अमेरिकी लोकांचं वर्णन आहे.
पॉल थऱ्यू (Paul Theroux) चं Deep South हे प्रामुख्याने अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या काळ्या (आणि अर्थातच) बेताच्या परिस्थितीत राहणाऱ्या, त्यांचे प्रश्न, अडचणी यांच्या कहाण्या असलेलं पुस्तक आहे.
अजून एक पुस्तक आहे, मला नाव आठवत नाही, त्यात एक एमई झालेला सिव्हिल इंजिनिअर आपली पत्नी, पंधरासोळा वर्षांचा मुलगा, असं कुटुंब घेऊन अमेरिकेला जातो, तिथं आपण जेमतेम साक्षर आहोत असं भासवत अंगमेहनतीच्या नोकऱ्या करतो. मुलगाही मॅकडी इ. ठिकाणी काम करतो. अशी सुरुवात करत मग त्या माणसाला पुढे आपल्या क्षेत्रात शिक्षणाच्या योग्यतेनुसार नोकऱ्या मिळतात असे साधारण कथानक आहे. जरी ते पुस्तक कादंबरी म्हणून प्रसिद्ध झाले आहे तरी एकंदरीत अनुभवांची सत्यता पाहता ते खरेखुरे अनुभवकथनच मला वाटते. बहुतेक भागवत नावाचे लेखक असावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2023 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकही भाग चुकवला नाही. सलग वाचत जावे असे खुसखुशीत शैली. वाचतोय. पुलेशु.

>>>जवळ घेणे, मिठी मारणे म्हणजे 'हग', चुंबन घेणे म्हणजे 'किस' तर हलकीशी पप्पी घेणे म्हणजे 'पेक' म्हणे ! हे सर्व सार्वजनिक ठिकाणी करणे, होणे, घेणे सर्वमान्य आहे.

माहितीपूर्ण. पेक माहिती नव्हतं. च्यायला, आपल्याकडे हे कधी सर्वसामान्य होईल देवास ठाऊक. आपण नुस्तं रस्त्यावर बोलत राहिलो तरी लोक टकाटका बघत राहतात. काम धंदे सोडून सर्व फोकस आपल्यावर. सुधरा रे...!

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2023 - 1:28 pm | धर्मराजमुटके

माहितीपूर्ण. पेक माहिती नव्हतं. च्यायला, आपल्याकडे हे कधी सर्वसामान्य होईल देवास ठाऊक. आपण नुस्तं रस्त्यावर बोलत राहिलो तरी लोक टकाटका बघत राहतात. काम धंदे सोडून सर्व फोकस आपल्यावर. सुधरा रे...!
होईल ! वेळ जाऊ द्यावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे असे करणार्‍यांची क्वांटिटी वाढली म्हणजे नजर मरत जाईल. काल परवाच म. प्र. मधील एका ज्युनियर नेवी कॅडेट म्हणत होता की "यार आपके मुंबई मे लडकिया एक तो टांगे दिखाती है या तो कमर" हमारे यहा ऐसा नही होता. मनात म्हणालो याने तर अजून मुंबई पाहिलीच नाही. असो.

उगाचच "तुमचा काय जीव ? यांचा काय जीवलीया ?" हे चक्रधर स्वामींचे वचन आठवले.

निमी's picture

13 Aug 2023 - 3:43 pm | निमी

धन्यवाद सर..पुलेशु म्हटल्यामुळे आता न चुकता पुढील भाग नक्की पाठवत राहणार.

पेक इथे सर्रास सुरू झालंय म्हणत मुके घेऊ लागले तर काही महिला "पेक नको"चा रुमाल बांधून फिरतील.

चौकस२१२'s picture

14 Aug 2023 - 5:08 am | चौकस२१२

पेक वरून आठवलं
पहिल्यांदाच परदेशाची आल्यावर एका भारतीय कुटुंबा बरोबर विकांताला जंगल भ्रमंतीला गेलो होतो ...
हे काका काकू ५०+ असावेत .. थोड्यवेळाने त्यांचे एक स्थानिक मीत्र त्यांना भेटले... तो माणूस पण धिप्पाड आणि मोठा घोगरा आवाज असलेला जोराने हि मोठी "सु ..... म्हणून आरोळी ठोकत तो जो आला तो सु म्हणे अर्थात सुनीता काकूंना मिठी मारून त्याने पेक घेतला ... माझ्य कोवळ्या मनाला भोवळ आली ...

आता एक तांत्रिक प्रश्न ( कि जो मला अनेक काळ पडलेला आहे )

पेक मध्य प्रकार असतात का? म्हणजे युरोपिअन वेगळा अमेरिकन वेगळा वगैरे ? कारण हे कळत नाही कि १) नुसता गाला जवळ गाल नेऊन ना चिकटवता हवेत माफक असा चूक आवाज करयाचा कि २) गालाचे हलकेसे चुंबन घ्य्याचे ?
वाजवुन तरी कधी चप्पल खाल्लेली नाही तेवहा दोन्ही प्रकार बरोबर असावेत बहुतेक

यूरोपात/ अरब देहत तर म्हणे पुरुष पुरुषांना पण पेक करतात पद्धत क्रमांक १ ) ! आणि हो याचा अर्थ ते समलिंगी असतात असे नाही
असो .. अनुभवी लोकानी मार्गदर्शन करावे हि विनन्ती

विंजिनेर's picture

14 Aug 2023 - 9:27 pm | विंजिनेर

छान!
एनव्हिडीयाचं ऑफिस एकदम भारीये. लेदर जॅकेट घातलेला घाईघाईत कुठेतरी चाललेला जेन्सन व्हाँग दिसला का नाही?

पुरणपोळी जेवण छान असतं. आता गाडीवरचा वडापाव खायला जा (स्वराज) - तोही मुंबईचाच आहे.

धन्यवाद स्वराज पुरणपोळी कॅफे मदुराई या व्यतिरिक्त अन्य भारतीय फूड ट्रक वर हजेरी लावली.
मुलीच्या ऑफिसला गेलो असताना चक्क जेन्सन यांची भेट झाली..थोडे बोलणेही झाले.. आमच्या मुलीसह त्यांनीच आमच्या बरोबर फोटो काढला.. आणि इतक्या मोठ्या पदावरचा माणूस त्याच्या अत्यंत साध्या सोप्या वर्तनाने जास्त आवडला.

मित्रहो's picture

20 Aug 2023 - 9:38 pm | मित्रहो

काही भाग वाचले काही नाही. छान आहे
पूर्वी कधी मी या कंपनीत बंगलोरला होतो त्यानिमित्ताने ते एचक्यू बघायचा योग सुद्धा आला होता. त्या आठवणी जाग्या झाल्यात.

सौन्दर्य's picture

21 Aug 2023 - 9:06 am | सौन्दर्य

मी देखील अमेरिकेतच आहे, ह्युस्टनमध्ये.

मी तुमचे आधीचे चार भाग वाचले नाहीत पण आता ते वाचीन. माझी एक भाची nvidia कंपनीत बे एरियातच कामाला होती, तिने अनेकवेळा बोलावले होते पण जायचा योग कधी आला नाही, आता तर तिने फेसबुकमध्ये जॉब घेतला आहे.

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 5:06 pm | मुक्त विहारि

मस्तच

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 5:07 pm | मुक्त विहारि

मस्तच

पॉपकॉर्न's picture

7 Oct 2023 - 7:31 pm | पॉपकॉर्न

असेच खुलेआम पाय (नव्हे.. खरंतर तंगड्या!) कसेही-कुठेही ठेवून तुम्ही काम करू शकता, लेक्चर ऐकू शकता, सूर्यास्त पाहू शकता, कार मधून आणलेल्या खुर्च्यांवर बैठक मांडू शकता. इथे कुणीच् कुणाला टोकत नाही.. आणि कुणाला तुम्ही टोचत पण नाही.
या देशातील लोकांचा "सु"शिक्षितपणा म्हणजे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही असे वागणे. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना हे फार जाणवते. आपल्याकडे असलेले उच्चविभुषित सर्वजनिक ठिकाणी जे वगतात ते पाहून यांना खरेच सुशिक्षित म्हणावे का हा प्रश्न पडतो. गळ्यात अर्ध्याकिलो ची जाड चेन घातलेल्यांबद्दल तर न बोललेच बरे.