आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
भारतातील पहिली माध्यमिक शाळा स्तरावरील अंतराळ तंत्रज्ञान एकेडमी
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी कल्पना चावला स्पेस एकेडमी, एडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा येथे एका कार्यशाळेमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. तिथला अभ्यासक्रम आखण्यामध्येही सहभाग घेता आला. विज्ञान, शिक्षण, संशोधन अशा क्षेत्रातील दिग्गजांना ऐकण्याचा व त्यांच्यासोबत संवाद करण्याचा अनुभव मिळाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कल्पना चावलाबद्दल फार माहित नसलेल्या अनेक विशेष गोष्टी कळाल्या. तिच्या वडिलांसोबतचा व्हिडिओ कॉल तर आयुष्यभराची आठवण ठरेल. हे अनुभव ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे.
✪ श्री संजय पुजारी- “विज्ञान प्रबोधनाचा ध्यास असलेला माणूस”
✪ दिग्गज मंडळी- परंतु विज्ञानापुढे सर्व समान असतात
✪ अनुभवी तरुणांकडून मिळालेले नवनीत!
✪ सिनियर चावलाजींसोबत प्रेरणादायी भेट
✪ “संपूर्ण विश्व माझं घर आहे”
✪ कल्पना चावलाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
कराडमधील कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संस्थापक व विज्ञानाला लोकांपर्यंत नेण्यासाठी सतत धडपड करणा-या श्री. संजय पुजारी सरांनी मला सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्राच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा करायला सांगितली होती. त्यांना मी खगोलशास्त्रातील निरीक्षणाविषयक बाबींची रूपरेषा बनवू शकतो असं सांगितलं व त्यांनी ते मान्य केलं. आकाशातल्या ह्या गमती कशा शिकता येतील, असं लोक अनेकदा मला आकाश दर्शन सत्र घेताना विचारायचे. त्यामुळे मनामध्ये काही कल्पना होत्या व त्यानुसार पुजारी सरांना रूपरेषा पाठवली. त्यानंतर त्यांनी मला ह्या कार्यशाळेसाठी बोलावलं.
अनुभवी तरुण!
कार्यशाळेमध्ये श्री. पुजारी सरांची भेट झाली! त्यांनी इतर दिग्गजांशी ओळख करून दिली. भोंडे हायस्कूलचे प्राचार्य श्री माधव भोंडे आणि सौ. राधिका भोंडे मॅडम, माजी कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर सर व इतर जण होते. श्री. भोंडे सर आणि भोंडे मॅडम ह्यांनी ह्या एकेडमीसाठी मोठी मदत केली आहे. ह्या अनुभवी तरुणांना भेटणं एक वेगळा अनुभव होता. तरुण डॉ. व्यंकटेश गंभीर सरांनी सहजपणे सांगितलं की, नुकतेच ते सिंहगडावर चढून आले आहेत. आणि ह्या तरुणाचं वय आहे फक्त ७५! आणखी एक तरुण व्यक्ती- उद्योगपती श्री. नारायण भार्गव सर हाताला प्लास्टर केलेलं असूनही मुंबईवरून स्वत: कार चालवत इथे आले आहेत. अगदी एका हाताने त्या काय गोष्टी करू शकतात ह्याचं हे एक उदाहरण आहे फक्त!
(कल्पना चावला सेंटरच्या कामाबद्दल इथे माहिती मिळेल: https://www.facebook.com/profile.php?id=100069161393854&mibextid=ZbWKwL )
प्रज्वलित होणारी मने
“लोक प्रबोधनाचा ध्यास घेतलेल्या" श्री. संजय पुजारी सरांनी त्यांची व्हिजन व संकल्पना मांडल्या. कराडच्या कल्पना चावला विज्ञान केंद्राची आजवरची वाटचाल त्यांनी थोडक्यात सांगितली. त्यांनी सांगितलं की, कशा त्यांच्या एका कार्यक्रमामुळे अदिती वडगांवकर ह्या बारामतीच्या मुलीला विज्ञान व अंतराळात करीअर करावसं वाटलं आणि पुढे ती नासामध्येही गेली. लहान मुलांसोबत काम करण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रातील आणखी एक दिग्गज डॉ. पंडीत विद्यासागर सरांनी आपल्या निवेदनामध्ये विज्ञानाच्या पायावर भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिक्षणक्षेत्रातील धुरीण ताराबाई मोडकांनी सांगितलेल्या सूत्राचा उल्लेख केला- शिकताना मुलं हलली पाहिजेत, बोलली पाहिजेत आणि हसलीही पाहिजेत. प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोग विद्यार्थ्यांना जास्त शिकवतात, असं त्यांनी सांगितलं. गुरूत्वाकर्षणाच्या गणनेसाठी पेंडुलमसोबत केलेल्या प्रयोगाचा अनुभव त्यांनी सांगितला. टिव्हीवर महाभारत बघताना त्यांना घटोत्कचाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचाही त्यांनी उल्लेख केला. जर एखाद्या व्यक्तीची उंची दुप्पट झाली तर त्याचं वजन खूप जास्त वाढेल. एखादा व्यक्ती ५० मीटर उंचीचा झाला, तर त्याचा रक्तदाब अतिप्रचंड असेल! त्याचे स्वर तंतू (व्होकल कॉर्ड) ही इतके रुंद असतील की तो सामान्य आवाज ऐकूही शकणार नाही! अशा गमतीमधून विज्ञान जास्त चांगलं कळतं. लोणावळ्याचं अक्षवृत्त मोजणं किंवा पाण्याखालचं का दिसत नाही हे सांगणारे प्रयोग ह्याच्याबद्दलही ते बोलले. विद्यार्थ्यांची ऑलंपियाड स्पर्धांसाठीसुद्धा तयारी केली पाहिजे, असं ते म्हणाले.
साप, बेडूक आणि माणूस
डॉ. व्यंकटेश गंभीर सरांनी सांगितलं की, शिक्षण हे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही मनोरंजक असलं पाहिजे. एमएससीला आलेल्या विद्यार्थ्यांनाही एंटासिडची परिणामकारकता मोजण्याची टेस्ट माहित नव्हती, असा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. ज्योत नेहमी वर का जाते, मेणबत्तीच्या वर एका विशिष्ट प्रकारे कापून कागदाचं भेंडोळं ठेवलं तर ते का हलतं अशा साध्या पण विज्ञान उलगडणा-या प्रयोगांचा त्यांनी उल्लेख केला. गमतीदार कहाण्यांद्वारे त्यांनी शीत रक्ताचे प्राणी आणि उष्ण रक्ताचे प्राणी हा फरक सांगितला. बेडूक हा शीत रक्ताचा प्राणी आहे. थंड वातावरणामध्ये तो मृतवत होतो. त्याचा प्रयोग म्हणून एका बाटलीत बेडकाला सोडायचं आणि नंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे. सुरूवातीला बेडूक खूप उड्या मारतो आणि नंतर मेल्यासारखा पडतो. मुलं म्हणतात की बेडूक मेला. पण नंतर त्याला बाटलीतून काढून बाहेर ठेवायचं. मुलांशी इतर बोलायचं. आणि हळु हळु बेडूक परत जागा होतो! त्यांच्याकडून अशा प्रसंगांमधून विज्ञान ऐकताना छान वाटलं. सटिक प्रश्न आणि कृतींद्वारे निरीक्षणाला चालना देण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. कुतुहलाला चालना दिली पाहिजे, ते म्हणाले.
नावीन्यपूर्णता आणि समायोजन
इनस्कल्प्ट टेक्नोलॉजीज- इनलर्नचे श्री सत्यजीत जगताप अटल टिंकरिंग लॅब्ज, STEM हे डोमेन, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसोबतचे अनुभव, रॉकेटरी, एरोडायनॅमिक्स आणि ऑटोमेशन अशा विषयांबद्दल बोलले. ते ब्रिटनमध्ये कसे काम करत होते, ब्रेक्झीटमुळे कसं परत यावं लागलं, रोबोटीक्स टीम लीडर म्हणून गुजरात सायंस सिटीमध्ये त्यांनी कसं काम केलं हे त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये प्रत्यक्ष करून शिकण्याला म्हणजे कार्यानुभावाला जास्त महत्त्व दिलं जातं, व त्यामुळे तिथले विद्यार्थीही खूप पुढे असतात असं ते म्हणाले. त्यांनी त्यांचे रोबोटीक्सचे डेमोसुद्धा दाखवले. अगदी तिसरीपासूनचे मुलं हे उपकरण बनवू शकतात, असं सांगितलं. 3D डिझाईन, 3D प्रिंटर, कोडिंग, मॉड्युलर रोबोटस अशा नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर होत आहे व एप्लिकेशन्स कसे बनवले जात आहेत हेही त्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ, अल्ट्रासोनिक रोबोटीक उपकरणामुळे अंध व्यक्तींची मदत करता येऊ शकते. एआय, मशीन लर्निंग, रोव्हर्ससारखं तंत्रज्ञान व वापर ह्याबद्दलही ते बोलले. रोबोटीक उपकरणाद्वारे प्रदूषित नदी सहजपणे स्वच्छ करता येऊ शकते. विजेची बचत करण्यासाठीही अशा उपकरणांचा उपयोग होतो. STEM क्षेत्रामध्ये मुलींनी येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे व आधुनिक तंत्रज्ञान व साधनं दिली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं. रोबोटीक्स हे युवकांसाठी रोजगार निर्मितीचं क्षेत्रही ठरू शकतं, ते म्हणाले.
इस्रोमध्ये काम केलेले आणि अनेक दशकांचा शिक्षण व अभ्यासक्रम ह्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या डॉ. जगदीश मठ सरांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यामध्ये निसर्गासोबत पुन: जोडले जाण्याची गरज, कारकुनी कामापासून प्रतिभासंपन्न बुद्धीमत्तेला वाचवण्याची गरज, अध्यात्मिक दृष्टीने मॅसलॉच्या पिरॅमिडला उलटे करण्याची गरज, जीवन कौशल्ये, अनुभव आधारित शिक्षण आणि तर्कशास्त्रीय विचारांना चालना देताना भावना व सृजनशीलतेला जतन करण्याची गरज अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. प्रयोग करण्याची संधी देणं आणि चुकांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनि सांगितली. कारण माणूस त्यामधूनच शिकू शकतो. शिक्षकांची भुमिका आणि त्यांचे सक्षमीकरण तसंच जमिनीचे संवर्धन आणि जैव तंत्रज्ञान ह्याबद्दलही ते बोलले. इस्रो जमिनीच्या आणि प्रदूषित जमिनीच्या संवर्धनासाठीसुद्धा काम करतं, असं त्यांनी सांगितलं. विज्ञानाचा पाया हा अध्यात्मिक असला पाहिजे, ते म्हणाले.
संशोधनाचे सामर्थ्य
त्यानंतर डॉ. कविता मठ ह्यांनी तर्कशास्त्रीय विचारसरणी, शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज, अंतर्गत व बाह्य मूल्यमापनाची प्रणाली, दूरदृष्टीची गरज ह्याबद्दल मत व्यक्त केले. चाट जीपीटीचा वापर विद्यार्थ्यांना करू द्यावा का नाही, अशा गोष्टींवर विचार करण्याची गरज त्यांनी सांगितली. संशोधन, आकडेवारी आणि बेंचमार्किंगचं महत्त्व त्यांनी उदाहरणांमधून सांगितलं. अध्यापनशास्त्राचा अवलंब आणि विश्वास ह्याबद्दल त्या बोलल्या. डॉ. जगदीश मठ ह्यांच्याप्रमाणेच अध्यात्म महत्त्वाचं आहे, असं त्यासुद्धा म्हणाल्या.
भोंडे फार्मवर आकाश दर्शन सत्र
संध्याकाळी भोंडे फार्मच्या प्रशस्त परिसरात आकाश दर्शन सत्र झालं व त्यामध्ये मान्यवरांना आकाशातले ऑब्जेक्टस दाखवण्याची संधी मला मिळाली. अशा दिग्गजांसमोर बोलताना किंचित अस्वस्थ वाटलं. परंतु नंतर जाणवलं की, विज्ञान आणि निसर्गासाठी तर सगळे जण समान आहेत. ही मंडळी दिग्गज असली तरी विज्ञान आपण सर्वांना समान पातळीवर आणतं. थोडक्यात माझ्या पार्श्वभूमीबद्दल माहिती सांगितली, लहानपणी मला आकाश दर्शनाची आवड माझ्या मामाने कशी लावली, मी आठवीत असताना एक पाक्षिक कसं काढलं होतं ह्याबद्दल थोडक्यात बोललो. माझ्या आकाश दर्शन आणि मुलांसाठीच्या फन- लर्न सत्रांचे अनुभवही थोडक्यात सांगितले. जेव्हा मुलं चंद्र व त्याचे खड्डे- विवर बघतील, तेव्हा त्यांना तिथे जावसं वाटेल. जेव्हा मुलं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक- ISS बघतील, त्याचं काम समजून घेतील, तेव्हा त्यांना अंतराळाविषयी गोडी वाटेल. माझ्या टेलिस्कोपमधून चंद्र, शुक्राची चंद्रासारखी कला, पुष्य तारकागुच्छ, सप्तर्षीमधला वसिष्ठ जोडतारा असे ऑब्जेक्टस दाखवले.
नाबाद ९५ असलेल्या बनारसी लाल चावला ह्या अद्भुत व्यक्तीची भेट
दुस-या दिवशी ह्या कार्यशाळेमधील सर्वोच्च प्रसंग अनुभवता आला. कल्पना चावलाचे ९५ वर्षांचे वडील श्री. बनारसी लाल चावलांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भेट झाली. त्यांना असं समोरासमोर भेटणं रोमांचक अनुभव होता. ९५ वय असूनही ते उत्साहाने बोलले आणि सगळ्यांना आशीर्वाद देत होते. त्यांना असं बोलणं कठीण जात होतं, पण त्यांचा उत्साह जाणवत होता. तेही अनुभवी “तरूणच” आहेत हे त्यांनीही दाखवून दिलं. कराडहून लोणावळ्यात आलेल्या कल्पना चावला विज्ञान केंद्राची आता कल्पना चावला स्पेस एकेडमी होते आहे. तिच्या ह्या विस्ताराला त्यांनी शुभेच्छा दिल्या. अपार उत्साहाने ते सगळ्यांशी बोलले आणि टीमचं कौतुकही करत होते. त्यांना माहिती असलेल्या मंडळींची विचारपूससुद्धा करत होते. ही भेट कायम लक्षात राहील!
दोन्ही चावलांचं कर्तृत्व आपण कल्पना करू शकत नाही एवढं मोठं!
ह्यावेळी पुजारी सरांनी सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची वाटली. ते श्री. बनारसी लाल चावलांना कसे भेटले, त्यांनी सरांना मुलासारखं मानलं आणि त्यांच्या कराडच्या कामाला आशीर्वाद दिला हे सरांनी सांगितलं. कल्पना चावला इतकीच प्रेरणादायी कहाणी सिनियर चावलांचीही आहे. १९४७ मध्ये फाळणीनंतर ते काहीही साधन नसलेल्या स्थितीत भारतात आले. हळु हळु पुढे जात ते उद्योगपती बनले आणि श्रीमंत झाले. पण पुढे ह्या श्रीमंतीचा त्यांना कंटाळा आला आणि ते समाज सेवक बनले आणि त्यांनी अनेक ठिकाणी देणग्या दिल्या व संस्थांना मदत केली. रुग्णालयं सुरू केली. काही काळाने त्यांनी आपली मालमत्ताही सोडून दिली आणि गेले काही वर्षं ते भाड्याच्या घरात राहात आहेत. त्यांनी अनाथालये आणि वृद्धाश्रमसुद्धा काढली आहेत. जेव्हा कल्पना चावला तरूण होती, तेव्हा त्यांनी तिला सर्व स्वातंत्र्य दिलं. हे खरं तर तेव्हाच्या हरयाणाच्या पितृसत्ताक समाजाच्या संदर्भात बघायला पाहिजे. हा समाज आजही पितृसत्ताक आहे. कल्पना चावलांप्रमाणे त्यांचंही कार्य प्रेरणादायी आहे.
पुजारी सरांनी नंतर अंतराळवीर कल्पना चावलाबद्दल फारशा माहिती नसलेल्या गोष्टी सांगितल्या. तिचं नामकरण झालंच नव्हतं आणि शाळेमध्ये प्रवेश घेईपर्यंत तिचं मोंटू हे लाडाचं नावच वापरलं जात होतं. पण शाळेत नाव लिहीण्याची वेळ आली तेव्हा तिनेच स्वत: निर्णय घेऊन स्वत:चं नाव कल्पना असं ठेवलं. लहानपणी ती विमानांचे आणि मुलांचे खेळ खेळायची. अगदी लहान वयात तिने तिची दिशा ओळखली व त्या दिशेने पुढे जात गेली. तिची वाटचाल पुढे होत गेली आणि मग तिने अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्यावेळी सिनियर चावलांनी तिला चार्टर्ड विमानाने अमेरिकेला पाठवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ती व तिचा नवरा अमेरिकेत अगदी साधेपणाने राहायचे. तिला नासामध्ये मिळणारे पैसे ती कुठे वापरत होती असा प्रश्न पडायचा. पण १ फेब्रुवारी २००३ ची तो कोलंबिया शटलचा अपघात घडल्यानंतर जेव्हा सर्व अंतराळवीरांवर प्रतिकात्मक अंत्य संस्कार केले गेले तेव्हा तिला श्रद्धांजली वाहायला शेकडो अनाथ मुलं आली, तेव्हा ती हे पैसे कुठे देत होती हे कळालं. तिने मुलांच्या शिक्षणासाठी व अनाथ मुलांसाठी मोठ्या देणग्या दिल्या होत्या.
स्वप्नांकडून प्रत्यक्षाकडे जाणारा रस्ता खरोखर आहे...
कल्पना चावला पक्षीप्रेमीसुद्धा होती आणि पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तिने हरयाना सरकारला मोठी देणगीही दिली होती. ती पर्यावरणासाठीही संवेदनशील होती. त्याबरोबर तिने अंध व्यक्तींनाही मदत केली होती. म्हणजे ती केवळ महान वैज्ञानिक किंवा अंतराळवीर नव्हती तर एक चांगली माणूससुद्धा होती. तिचे जे थोडे अवशेष मिळाले ते तिच्या इच्छेनुसार भारतात आणले जाणार होते. पण श्री. बनारसी लाल चावलांनी तेव्हा सांगितलं की, सर्व विश्व तिचं घर आहे. त्यामुळे ते अवशेष अमेरिकेतच ठेवले गेले. तिचं हे सगळं कार्य करून ती अंतराळात विलीन झाली तेव्हा तिचं वय ४० वर्षं सुद्धा नव्हतं! तिने पुढे कोणती मोठी कामं केली असती, ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.....
अशी ही खूप प्रेरणादायी कार्यशाळा ठरली. त्यामुळे त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्यासोबत शेअर करावेसे वाटले. वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
- निरंजन वेलणकर (09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, फन- लर्न सत्र आणि आकाश दर्शन सत्र)
प्रतिक्रिया
5 Jul 2023 - 9:43 pm | कर्नलतपस्वी
प्रेरणादायी लेख.
स्वप्नांकडून प्रत्यक्षाकडे जाणारा रस्ता खरोखर आहे...
नक्कीच आहे पण आगोदर स्वप्न बघायला शिकले पाहिजे.
लेख आवडला.
6 Jul 2023 - 3:15 am | nutanm
मार्गी स.न. आपण लेखाच्या शेवटी लिहिलेले फन लर्न, आकाश दर्शन, अध्यात्म, ध्यान हया विषयांवर शाळेतल्या मुलांना व इतर लोकांना ही माहिती पर व्याख्याने देत असता तर मला फन लर्न विषयाची खूप उत्सुकता आहे त्या बद्दल येथे लेख टाकल्या स उत्तम पण इतर दुसरीकडे कुठे वाचायला मिळतील , कळल्यास छान वाटेल , साईटवर जाऊन मला वाचता येतील तर कॄपया लिंक द्यावी. अगावूच आभारी असेन.
6 Jul 2023 - 10:38 am | विजुभाऊ
माझ्या सातारच्या शाळेत शास्त्राच्या शिक्षकांनी शास्त्र मंडल सुरू केले होते. यात दर शनिवारी आम्ही जमा व्हायचो आणि वेगवेगल्या विषयांवरील माहिती घ्यायचो. एखाद्या लघूद्योगाला भेटही द्यायचो.
असे प्रयोग वारंवार आइ सर्व शाळांमधे व्हायला हवेत.
अर्थात हे बरेचसे शिक्षकांवर अवलंबून असते
6 Jul 2023 - 10:50 am | इपित्तर इतिहासकार
मुलांमध्ये विज्ञाननिष्ठ विचार रुजवणे उत्तमच कार्य आहे.
कल्पना चावला खरेच एक प्रेरणादायी अंक आहे भारतीय विज्ञान परंपरेतला. तिने स्वतःचे नाव स्वतःच ठेवल्याचा मजेशीर trivia आजच कळला.
पु.ले.शु.
6 Jul 2023 - 11:09 am | Bhakti
कल्पना चावला एक मोठं प्रेरणास्थान आहे.
तिचं अकाली निघून जाणं खुप चुटपुट लावत अजूनही.
खुपच छान काम आहे.सर्वांना शुभेच्छा!
7 Jul 2023 - 10:09 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! :)
कल्पना चावला ही खरंच मोठी प्रेरणास्रोत आहे!
@ विजूभाऊ जी, अरे वा. छानच.
@ नूतनम, धन्यवाद! माझ्या फन लर्नबद्दल इथे लिहीलं होतं- https://www.misalpav.com/node/50250.
धन्यवाद.
7 Jul 2023 - 1:42 pm | शलभ
खूप मस्त लेख. तुमचे सगळेच लेख छान असतात.
7 Jul 2023 - 6:12 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
8 Jul 2023 - 2:23 pm | चौथा कोनाडा
माहितीपुर्ण आणि प्रेरणादायी लेख.
कल्पना चावला पक्षीप्रेमीसुद्धा होती आणि पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तिने हरयाना सरकारला मोठी देणगीही दिली होती. ती पर्यावरणासाठीही संवेदनशील होती. त्याबरोबर तिने अंध व्यक्तींनाही मदत केली होती. म्हणजे ती केवळ महान वैज्ञानिक किंवा अंतराळवीर नव्हती तर एक चांगली माणूससुद्धा होती.
ग्रेट !
बनारसी लाल चावलांची माहिती देखील थक्क करणारी.
धन्यवाद, मार्गी !
8 Jul 2023 - 3:25 pm | गवि
चांगली माहिती आणि लेख. उपक्रम देखील चांगला.
कल्पना जेव्हा तिच्या टीममेंबर्स सोबत कोलंबिया स्पेस शटल मधून अंतराळात झेपावली तेव्हाच लगेचच जमिनीवरील नियंत्रकांना कळलं होतं की हे लोक काही जिवंत परत येणार नाहीत. पण तरीही ही गोष्ट अंतराळवीरांना न कळू देता नॉर्मल संभाषण करत अनेक आठवड्यांचे मिशन पूर्ण करताना त्यांच्या मनावर किती विलक्षण दडपण असेल याची कल्पनाच करवत नाही.
10 Jul 2023 - 3:18 pm | मार्गी
सर्वांना पुनश्च धन्यवाद! :)
@ गविजी, आपलं मत निश्चितच अभ्यासातून आलं असणार. त्यामुळे आपल्या मताचा आदर करतो. मलाही काहीसं असं वाचल्याचं आठवत होतं की, यान उडालं तेव्हा किंचित नुकसान झालं होतं. पण विकीपीडिया सांगते की, त्या घटनेमुळे असं काही नुकसान होण्याची शक्यता नासामध्ये नगण्य समजली गेली. आधीही तत्सदृश घटना घडल्या होत्या ज्यात नुकसान झालं नव्हतं. ह्यावर आपल्याकडे अजून इनसाईटस असतील तर नक्की शेअर कराल ही विनंती. धन्यवाद.
19 Jul 2023 - 3:39 pm | शानबा५१२
ह्या माहीतॉयुक्त लेखाबद्दल धन्यवाद. खुप्श्या गोष्टी पहिल्यांदा महीती झाल्या. आपल्या बौध्दीक क्शमतेचे कतुक करावसे वाटते. आपणास खुप शुभेच्छा!
19 Jul 2023 - 3:40 pm | शानबा५१२
ह्या माहीतीयुक्त लेखाबद्दल धन्यवाद. खुपश्या गोष्टी पहिल्यांदा माहीती झाल्या. आपल्या बौध्दीक क्षमतेचे कौतुक करावसे वाटते. आपणास खुप शुभेच्छा!
1 Aug 2023 - 12:33 pm | विअर्ड विक्स
लेख आवडला . अनेक नवीन संदर्भ मिळाले