किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

कॉमी's picture
कॉमी in जनातलं, मनातलं
2 Jul 2023 - 11:40 am

"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात."

मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते. त्याचे शटर आयलंड, द डिपार्टेड हे सिनेमे माझे खूप आवडते आहेत. शटर आयलंड म्हणजे मानसशास्त्रीय - थरार पटांमधला सर्वात धक्कादायक सिनेमा आहे. तर द डिपार्टेड मध्ये गुंडांमध्ये गुप्तपणे पोलिसांसाठी हेरगिरी करणारा लिओ आणि पोलिस असून त्याच गुंडासाठी काम करणारा मॅट डीमन ह्यांच्यात जो उंदीर - मांजराचा खेळ दाखवला आहे त्याने अक्षरशः श्वास रोखून सिनेमा बघावा लागतो. खेरीज, स्कोर्सेजी चे वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, टॅक्सी ड्राईव्हर हे सुद्धा खूप गाजलेले सिनेमे आहेत.

त्याच्या आगामी सिनेमाचा टिझर ट्रेलर पाहिला. सिनेमाचे नाव आहे "किलर्स ऑफ द फ्लॉवर मून". सिनेमात लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर हे दिग्गज अभिनेते आहेत. टिझर पाहून खूपच प्रभावित झालो. पुढे ट्विटर वर समजले की त्याचं नावाच्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. खूप उत्सुकता वाटल्याने पुस्तक घेऊन वाचले.

जॉन ग्रॅन नावाच्या शोधपत्रकाराने अनेक जुनी कागदपत्रं पाहून, अनेक लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. त्यात पुस्तक येण्याआधी ज्ञात असलेल्या बाबींचे संकलन तर आहेच, पण ज्ञात गोष्टीपेक्षा आणखी धक्कादायक वस्तुस्थिती सुद्धा अतिरिक्त संशोधन करून जॉन ग्रॅनने मांडली आहे.

अमेरिकेतल्या मूलनिवासी टोळ्या युरोपियन लोक येण्याआधी गव्यांची शिकार करून राहत असत. ओसेज लोक आधी ह्याच प्रकारे आत्ताच्या मिसिसिपी आणि मिझुरी नद्यांच्या प्रदेशात राहत असत. त्यांचे ओसेज भाषेतले स्वतःचे नाव "मधली नदी" असे होते. त्याचे फ्रेंच भाषांतर (calm waters ह्या अर्थाने) होऊन ह्या लोकांना ओसेज हे नाव नंतर पडले. पुढे ते कॅन्सास परिसरात राहू लागले. पण त्या भागात युरोपियन लोकांच्या वसाहती वाढू लागल्या, गव्यांची संख्या घटू लागली तसे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी त्यांना तिथून स्थलांतरित होणे भाग पडले. तत्कालीन अमेरिकन सरकारने त्यांना सध्याच्या ओक्लाहोमा भागात जमीन दिली. ही जमीन खडकाळ आहे. त्याचा शेतीसाठी उपयोग नाही . त्यामुळे ओसेज लोकांचे पारंपारिक प्रमुख म्हणले, की ही जमीन आपल्या लोकांसाठी चांगली आहे, कारण गोरी माणसं आपल्याला इथे त्रास देणार नाहीत. पण झाले उलटेच. ओसेज जमिनीखाली तेलाचा साठा आढळला. ओसेज लोकं क्षणार्धात धनाढ्य झाली. ह्या जमिनीवर कायदेशीर हक्क फक्त ओसेज टोळीच्या लोकांचाच होता. ओसेज टोळीच्या यादीत नाव असलेल्या लोकांचा आणि त्यांच्या वारसांना तेल उत्पादनाचे हक्क विकून पैसे मिळत. त्यामुळे ओसेज लोकं हे अमेरिकेतले सर्वात धनाढ्य गटांपैकी एक झाले. आजवर झोपड्यांमध्ये राहणारे ओसेज मोठे बंगले, आलिशान गाड्या घेऊन राहू लागले.

ओसेज लोकांची संपत्ती अनेक अमेरिकन लोकांना खुपत होती. आणि, ओसेज लोकांबद्दल असलेल्या वांशिक पूर्वग्रहांमुळे ओसेज लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर अनेक बंधने घालण्यात आली. ओसेज लोकांना एक ओसेज नसलेला "गार्डियन" नेमावा लागे. विशिष्ठ मर्यादेपेक्षा खर्च करण्यासाठी ह्या गार्डियनची परवानगी लागे. ओसेज लोकांच्या वतीने आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार ह्या गार्डियनला असत.

ओक्लाहोमातील ओसेज लोकांच्या स्वायत्त राज्यात ग्रे हॉर्स म्हणून वस्तीत मॉली बर्कहार्ट ही ओसेज महिला तिच्या पतीसोबत राहत होती. तिचा पती, अर्नेस्ट बर्कहार्ट, हा युरोपियन वंशाचा होता. १९२१च्या फ्लॉवर किलिंग मे महिन्यात, मॉलीची बहीण ॲनी बेपत्ता झाली. काहीच दिवसांत तिचा मृतदेह सापडला. तिचा खून झाला होता. त्याच आठवड्यात दुसऱ्या एका ओसेज पुरुषाचा सुद्धा खून झाला. त्यानंतर पुढील दोन वर्षं अनेक ओसेज लोकांचे संशयास्पद मृत्यू झाले.

त्याकाळात अमेरिकेत योजनाबद्ध पोलीस तपास यंत्रणा नव्हती. लोकल शेरीफ तपास करत. पण त्यांचे अनुभव क्षेत्र हे गँग, पळालेले कैदी ह्यांना पकडण्याचे असायचे. गुन्हा घडल्यावर पद्धतशीर तपास करून पुरावे गोळा करणे त्यांना तितके जमत नसे. त्याऐवजी ज्यांची ऐपत आहे ते लोक खाजगी गुप्तहेर नेमत. अशी पिकर्टन ही गुप्तहेर संस्था प्रसिद्ध होती. शेरलॉक होम्सच्या ' साईन ऑफ फोर ' ह्या कादंबरीत ह्या संस्थेचा उल्लेख वाचल्याचे आठवते. पण, हे गुप्तहेर सुद्धा अनेकदा अतिशय धूर्त आणि अप्पलपोटे असत. पैसे देऊन खोटे साक्षीदार तयार करणे, गुन्हेगार सापडल्यावर त्याच्याकडून लाच खाणे, ज्युरीस पैसे चारणे, अवैधरीत्या पाळत ठेवणे हे उद्योग हे गुप्तहेर सर्रास करत. तर राष्ट्रीय पातळीवर अमेरिकेत संस्था होती, ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशन. ह्या संस्थेने पाठवलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा ओसेज खूनांचे रहस्य सोडवता आले नाही. उलट एका अट्टल गुन्हेगार कैद्याला आपला हेर म्हणून जेल मधून ब्युरोने काढले, आणि तो पळून गेला आणि त्याने आणखी गुन्हे आणि जीवितहानी केली. ही बाब ब्युरोने कशीबशी लपवली आणि नाचक्की होऊ दिली नाही. १९२५ मध्ये जे. एडगर हूवर ह्या व्यक्तीने ब्युरोची सूत्रे हातात घेतली आणि ब्युरोचे नाव बदलून नवीन नाव ठेवले, फेडरल ब्यूरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI).

हूवर हा स्वतः पक्का नोकरशाही मध्ये मुरलेला माणूस होता. त्याला स्वताला तपास कामाचा शून्य अनुभव होता, पण व्यवस्थापनात तो कुशल होता. त्याने आज दिसते ती ताकदवान संस्था उभी केली. हूवर स्वतः सत्तेचा लालसी होता, त्याने अनेक राजकारण्यांवर गुप्त माहिती मिळवून त्यांना ब्लॅकमेल केले हे नंतर समोर आले. पण, त्याने ब्युरोला तज्ञांच्या देखरेखीखाली तपास करण्याचे शास्त्रशुद्ध धडे दिले. त्याने प्रत्येक FBI एजंटला ट्रेन असे केले की कोणताही एजंट कोणत्याही ठिकाणी जाऊन तपास करू शकेल. आता FBI ची मदार मोजक्या कुशल तपासकारांवर नाही तर पद्धतशीरपणे दिलेल्या नियमांप्रमाणे पुरावे गोळा करणाऱ्या फौजेवर आहे.

पण, हूवर जेव्हा ब्युरोचा प्रमुख झाला तेव्हा तसे नव्हते. थॉमस व्हाईट ह्या कसलेल्या माणसाला त्याने ओसेज खूनांची उकल करण्यास पाठवले. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी अगदी भयंकर षडयंत्र शोधून काढले. त्यांच्या तपासाची गोष्ट पुस्तकात दिली आहे. जॉन ग्रॅन ह्यांनी ह्या तपासात एफबीआयला जितके सापडले, त्यापेक्षा ह्या घटनांचा आकार बराच मोठ्ठा होता हे आणखी संशोधन करून दाखवले आहे, ते पुस्तकाच्या शेवटी दिले आहे.
तपासाची गोष्ट अगदी थरारक आहे. समोर आलेले षडयंत्र इतके थक्क करणारे होते की त्याकाळात हा तपास खूप गाजला. एफबीआयच्या एजंट्सची छवी तयार करण्यासाठी हूवरने ह्या तपासाचा पूर्ण वापर केला.

सिनेमाच्या टिझर मध्ये एक सीन आहे - जो ह्या घटनेचा थरार उत्तमरीत्या दाखवतो. लिओनार्डो जो ह्या सिनेमात मॉलीच्या पतीचे पात्र वठवत आहे, आपल्या मुलांना एक गोष्ट वाचून दाखवत असतो. तो ते वाचत असताना उंची कपडे घातलेल्या श्रीमंत अमेरिकन लोकांचा समूह चर्चा करताना दाखवला आहे, आणि ते सगळे थांबून कॅमेऱ्याकडे बघतात. अर्नेस्ट (लिओ) वाचतो "Can you find the wolves in this picture ?"

इतिहाससमाजसमीक्षा

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

2 Jul 2023 - 12:03 pm | आंद्रे वडापाव

तुमच्या वाचनाचा व चित्रपट पाहणे / माहिती असण्याचा अवाका मोठा आहे.
दाद द्यावीशी वाटली म्हणून आवर्जुन उल्लेख केला.

बाकी हा चित्रपट पा.खु. मनात साठवून ठेवत आहे...

रोचक कथानक! चित्रपट परीचय आवडला 👍
'द डिपार्टेड' आणि 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हे स्कोर्सेजीचे सिनेमे आवडले असल्याने 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हा त्याचा आगामी चित्रपटही नक्की बघणार!

इपित्तर इतिहासकार's picture

2 Jul 2023 - 1:02 pm | इपित्तर इतिहासकार

सिनेमा येईल तेव्हा येईलच पण तोवर आता हे पुस्तक मिळवून वाचणे आले...

किलर ऑफ द फ्लॉवर मून खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे.

कल्पनाच भारी वाटते.
परिक्षण आवडले. कदाचित आमच्या कुटुंबातील तरूणाई कडे हे पुस्तक असावे. वाचण्याचा प्रयत्न करावा असा विचार डोकावतो.

तुषार काळभोर's picture

3 Jul 2023 - 12:02 am | तुषार काळभोर

मार्टिन स्कॉर्सेजी आणि लिओनार्डो डीकप्रिओ, रॉबर्ट डीनिरो, ब्रॅण्डन फ्रेसिअर म्हणजे उत्तम चित्रपट पाहण्याची मेजवानी.

चित्रपट आणि पुस्तक परिचय आवडला!
killers of the flower moon

सर्व प्रतिसादकांचे आभार.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2023 - 3:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

वा खु सा. चित्रपट कधी पाहायला मिळेल माहीत नाही.

राघव's picture

5 Jul 2023 - 2:59 am | राघव

उत्तम परिचय! वाचायला हवे! धन्यवाद :-)