लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
सारखी किच कीच चाललेली. पदर सांभाळ. केस किती आखूड कापलेस? आता वेणी कशी घालणार? खुर्चीवर सावरून बसावे स्त्रियांच्या जातीने. कुंकू लावलेस का? मला मेलीला आताशा दिसत नाही म्हणून विचारले हो.
चाहत साखर कमी पडलीय. साखर संपली असेल तर नवऱ्याला सांगायचे. तो काय तुझ्या मुठीतच(मिठीत?).मला अजून डायबेटीस नाही हो.
पोळ्या किती जाड लाटल्या आहेस? मुद्दामहून ना? का नाजूक हात दुखताहेत. आमच्या काळी मी एकटी दहा जणांच्या पोळ्या... आता काय राजा राणीचा संसार. इन मीन तीन.
भाजीत किती मीठ पडलय.
अजून बरच काही. कधी म्हणून कधी समाधान नाही.
एकदा मात्र कहर झाला.
“सुनबाई साधी मेथीची भाजी करता येत नाही. तुझ्या आईने माहेरी काय शिकवले?”
“अहो सासूबाई, ते माझे माहेर होते. केटरिंग कॉलेज नव्हते.”
मग एके दिवशी दारात टॅक्सी उभी राहिली.
सुनेने साबा आणि साबू च्या दोन बॅगा भरल्या, टॅक्सीत नेऊन ठेवल्या.
“सुनबाई कुठे बाहेर जायची तयारी आहे का?”
“हो तुम्हा दोघांची व्यवस्था त्या नदी काठच्या वृद्धाश्रमात केली आहे. तिथ खरपूस भाजलेल्या पातळ पोळ्या, घट्ट वरण, शिजलेला भात, दोन वेळ चवदार चहा मिळेल. तिकडे देऊळ आहे. तिथं भजन प्रवचन कीर्तन चालते. टीवी आहे. आस्था चानल बघायाल मिळेल. जय मा देवी असे पिक्चर बघायला मिळतील.”
सगळ्यात म्हणजे इतर सास्वान्च्या जोडीने सुनांच्या नावाने बोटं मोडायला मिळेल.
आमच्या बाब्या म्हणजे सुनेच्या ओंजळीने पाणी पिणारा. शामळू. ऑफिसमध्ये काय रुबाब. घरात मात्र कबाब. गोगल गाय.
पैशाची काळजी करू नका. आल एक्सपेन्सेस प्रिपेड!
आम्ही दोघ येऊ मधुन मधून भेटायला.
टॅक्सी सुरु झाली आणि भुर्कन निघून गेली.
व्हाट ए मेसी एंड!
प्रतिक्रिया
15 Jun 2023 - 7:55 pm | कर्नलतपस्वी
बघितल्यावर पदोपदी वाटते नारायण ठोसरांचा निर्णय एकदम बरोबर होता.
15 Jun 2023 - 8:28 pm | भागो
नारायण ठोसर हे महान सद्पुरुश होते. त्यांच्या मार्गावर चालणे सर्वांना कसे जमेल. गृहस्थाश्रम पार पडल्यावर वानप्रस्थाश्रम स्वीकारणे योग्य. हाच मार्ग आहे. कुत्सित बोलण्या ऐवजी थोडी मदत करता आली तर करावी. स्वतःचे ज्ञान दुसऱ्यांना गोड शब्दात द्यावे. (KT)
15 Jun 2023 - 9:05 pm | चित्रगुप्त
प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम' नेमके कसे असावे ? वृद्ध लोक जंगलात गेल्यावर खाण्यापिण्याची, अंथरूण-पांघरुणाची, सुरक्षित जागी रहाण्याची सोय कशीकाय होत असावी ? यावर काही माहिती उपलब्ध आहे का ? जाणकारांनी खुलासा करावा.
-- मी सहज कल्पना केली, की अनिवार्य कारणामुळे कधी जर एकट्याने जंगलात एक रात्र जरी काढण्याची वेळ आली, तरी किती पंचाईत होइल ?
वानप्रस्थाश्रम
16 Jun 2023 - 1:29 am | साहना
वनप्रस्थाश्रमाचे रिग्वेदिक नाव आहे अंतिगृह, म्हणजे शेजाऱ्या सारखे राहणे. निवृत्त झाल्यानंतर वयोवृध्दांनी मुख्य घर तरुणांच्या स्वाधीन करून आपण बाजूला राहणे. इथे जंगलांत जाऊन राहणे अपेक्षित नव्हते. वानप्रस्थाश्रम त्या तुलनेने आधुनिक संकल्पना आहे.
अनेक वानप्रस्थ जंगलात म्हणजे मुख्य नगरापासून दूर राहत पण ह्याचा अर्थ झाडाखाली झोपायचे असे नाही. समवयस्क लोकांना घेऊन जंगलांत आश्रम बांधून राहायचे. थोडक्यांत सध्या रिटायरमेंट कम्युनिटी आहेत त्या पद्धतीने.
गांधारी, विदुर, धृतराष्ट्र आणि कुंती ह्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि ते बरोबर राहत असत आणि एका वणव्यांत त्यांचा सर्वांचा एकत्रित मृत्यू झाला.
16 Jun 2023 - 6:33 am | राजेंद्र मेहेंदळे
ट्रेकिंग च्या निमित्ताने भलभलत्या ठिकाणी राहिलोय. देवळे, ओसरी, गुहा वगैरे तर नेहमीच, पण कधी बस्/रेल्वे स्टेशन सुद्धा.
कधी कधी जंगलात राहणेही फार वेगळा सुखदायी अनुभव असू शकतो. थोडक्यात माणसाच्या मनाला जिथे शांतता मिळेल तिथे रहावे--जन्म दो दिसांची वस्ती, कोठेतरी करावी असे रामदास स्वामी म्हणतात.
16 Jun 2023 - 7:17 am | चित्रगुप्त
तरूणपणी सायकलने इंदौर-बडोदे, तसेच इंदौर-अजिंठा-वेरूळ वगैरे प्रवास केले, तेंव्हा असेच कुठेही खडकावर, पुलाच्या पाळीवर वगैरे झोपायचो, परंतु ते थोडे दिवस. कधीकधी रात्री बारा-एकला एक कलंदर मित्र येऊन हाका मारून उठवायचा, मग दोघे सायकलने शहराबाहेर दूर दूर फिरायला जायचो. परंतु उतारवयात कायमचे जंगलात उभयता रहायला जायचे म्हणजे कठीणच. अगदी आत्ता मी घरात बसलोय, तिथून शंभर फुटांच्या अंतरावर दाट झाडी, मोठमोठे वृक्ष, खाली उतारावर झरा वगैरे आहे तिथे अंधार पडल्यावर जाण्याची माझी आता हिंमत नाही. (विषारी कॉपर हेड साप कधीकधी दिसतात). बाकी साहना यांनी लिहील्याप्रमाणे त्याकाळी सोयी असतील. आणि अगदी सगळेच पन्नास वर्षाचे झाल्यावर तसे करत असेही नाही, कदाचित एकाद-दुसराच करत असेल, तसे आजही अनेक लोक जंगलात,उघड्यावर वगैरे रहात असतात. असो.
16 Jun 2023 - 7:22 am | प्रचेतस
भारतरत्न पां. वा. काणे ह्यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास ह्या अजोड ग्रंथात ह्याविषयी विस्ताराने माहिती आली आहे.
वानप्रस्थ म्हणजे वनामध्ये राहणारा तापस अथवा मुनि. वानप्रस्थ आणि वनप्रस्थ हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. वैखानस हे वानप्रस्थाचे प्राचीन नाव असावे. ऋग्वेदातील काही सूक्तांचे ऋषि वानप्रस्थ होते. वानप्रस्थांचे नियम ज्यात दिले आहेत असा वैखानसशास्त्र नावाचा एक ग्रंथ प्राचीन काळी अस्तित्वात असावा. जो वैखानस शास्त्रातील नियमांना अनुसरून वागतो तो वैखानस वानप्रस्थो वैखानसशास्त्रसमुदाचारः अशी व्याख्या बौधायनाने दिली आहे. संपत्तीच्या मागे लागण्यापेक्षा संपत्तीचा संचय करण्याची इच्छा न करणे हे अधिक चांगले असे वैखानसाचे मत असल्याचे महाभारतात म्हटले आहे. वैखानस हा तिसरा आश्रम असल्याचे वेदान्त सूत्रावरील भाष्यात श्री शंकराचार्यानी म्हटले आहे. शूद्राव्यतिरिक्त सर्वांना वानप्रस्थ होता येते.
बौधायनसूत्रा मध्ये वानप्रस्थांचे निरनिराळे सूक्ष्म भेद वर्णन केले आहेत. त्यांत पचमानक (शिजविलेले अन्न आणि पक्व फले भक्षण करणारा) आणि अपचमानक (तसे न करणारा) असे दोन प्रमुख भेद सांगून पुढे त्यांचे सर्वारण्यक, वैतुषिक इत्यादि अनेक पोटभेद सांगितले आहेत. बृहत्पराशराने वैखानस, उदुंबर, वालखिल्य आणि वनवासी असे चार भेद सांगितले आहेत. वैखानस सूत्रात सपत्नीक आणि अपत्नीक असे दोन प्रकार सांगून त्यांचे औदुंबर, वालखिल्य इत्यादि पोटभेद सांगितले आहेत. रामायणात वालखिल्य, अश्मकुट्टक इत्यादि तापसांची नावे दिली आहेत.
वानप्रस्थ होण्याचा विहित काल दोन प्रकारानी संभवतो. ब्रह्मचर्याचा अवधि झाल्यावर लागलीच वानप्रस्थ होता येते अथवा गृहस्थाश्रमात काही वर्षे काढल्यानंतर वानप्रस्थ होता येते. वानप्रस्थ केव्हा होता येते ह्याविषयी मनूने असे सांगितले आहे की जेव्हा एकाद्या मनुष्याला आपल्या शरीरावर सुरकुत्या पडण्यासारखी आणि केस पांढरे होण्यासारखी चिन्हे दिसतील आणि तो आपल्या पुत्राचा पुत्र अवलोकन करील तेव्हा त्याने वनाचा आश्रय करावा. ह्या अटीवरून मनुष्याच्या वयाचा केवळ बोध होतो म्हणजे वानप्रस्थ होण्यापूर्वी मनुष्य वृद्ध झालेला असला पाहिजे. ५० वर्षाच्या वयानंतर कोणाही मनुष्याला वनाचा आश्रय करता येतो अशा अर्थाचे एक स्मृतिवचन आहे.
वानप्रस्थासंबंधी अनेक नियम स्मृतींनी आणि धर्मसूत्रांनी सांगितले आहेत. वानप्रस्थाने आपल्या शरीराला हालांची सवय करून कडक तपश्चर्या करावी. आपल्या गावात असताना भक्षण करीत असलेली अन्ने वर्ज्य करावी. शय्येसारखी घरगुती साधने वर्ज्य करावी. पूर्ण ब्रह्मचर्याने राहावे. आत्मसंयमन करावे. निरनिराळ्या उपनिषदांचा अभ्यास करावा. दानशील असावे परंतु दान स्वीकारू नये. इत्यादि नियमांचा त्यांत समावेश होतो. वानप्रस्थ झालेल्या ययाती, धृतराष्ट्र ह्यांच्या सारख्या राजपुरुषांची उदाहरणे महाभारतात दिली आहेत. स्त्रियांना देखील वनात जाता येत असे. पांडूच्या मृत्यूनंतर सत्यवती आपल्या दोन सुनांसह तपश्चर्येकरिता अरण्यात गेली आणि तेथे मरण पावली. श्रीकृष्णाने देहत्याग केल्यावर त्याच्या सत्यभामा प्रभृती स्त्रियांनी तीव्र तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने वनात प्रवेश केला होता.
वानप्रस्थाला एकाद्या असाध्य रोगाची पीडा होऊन आह्निक कृत्ये नीटपणे पार पाडता येईनासे झाल्यावर अथवा मृत्यु समीप आला असे वाटल्यावर त्याने महाप्रस्थानाला निघावे आणि पाणी आणि वायु भक्षण करून देहपतन होईपर्यत चालावे अथवा जलात अथवा अग्नीमध्ये प्रवेश करावा अथवा कड्यावरून उडी मारावी. सामान्यतः आत्महत्या करणे अथवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे कृत्य धर्मशास्त्रकार महापातकांपैकी एक असल्याचे मानतात. तथापि वानप्रस्थाने मृत्युप्राप्तीकरिता महाप्रस्थानाला निघण्यास स्मृतींनी संमती दिली होती. मात्र महाप्रस्थान नंतर वर्ज्य समजले गेले.
16 Jun 2023 - 8:21 am | भागो
प्रचेतस
ह्या रंजक आणि सखोल माहितीसाठी अनेकानेक आभार.
16 Jun 2023 - 1:46 pm | Bhakti
वाह! नशीबवान आहेत पूर्वीचे लोक.पण आता आयुर्मान वाढले पण सोस न सुटल्यामुळे हे प्रश्न वाढत चालले आहेत.या विषयांवर मिपावर जेव्हा पासून आहे तेव्हापासून काही गोष्टी मिपाकरांकडून खुप छान समजल्या आहेत.
-आपली पुंजी वानप्रस्थाश्रमापुर्वी भरभक्कम हवी,मुलांवर परावलंबित्व नको.
-मुलांना तारुण्याचे स्वातंत्र्य घेऊ द्यावे,त्यांवर अधिक हक्क गाजवू नये.
-कर्तव्यामध्ये आनंद शोधावा, मुजोरी प्रमाणे कर्तव्य करू नये ;)
शप्पथ मिपावर आल्यामुळे मला या गोष्टी उमजल्या नाहीतर आणखीन दहा वर्षे लागले असते हे समजायला :)
-वानप्रस्थाश्रमासाठी हिमालयात जाऊ इच्छिणारी_/\_
16 Jun 2023 - 10:19 am | सुबोध खरे
मुळात आपण कमावलेल्या घरात आपण हातपाय चालत असतील तोवर सुखाने राहावे आणि मुलगा सून / मुलगी जावई यांचे घर वेगळेच असावे असे मला वाटते.
जेंव्हा हातपाय चालेनासे होतील तेंव्हा अशा वृद्धांची काळजी घेणाऱ्या वृद्धाश्रमात आपली सोय पहावी.
साधारणपणे दोन स्त्रिया एकाच स्वयंपाकघरात गुण्यागोविंदाने नांदणे कठीणच असते.
याचे कारण सत्ता. मग ती स्वयंपाकघरावर असो कि मुलगा/नवरा.
सासू सुनेचे नाते हे पटणारे नसतेच. ते पटवूनच घ्यावे लागते आणि त्यात तडजोड करण्याची दोन्ही बाजूंची तयारी असावी लागते.
त्यातून बारीक बारीक गोष्टी सोडून देणे सामान्य स्त्रियांना जमत नाही आणि त्याबद्दल एक ऐवजी चार शब्द बोलणे हा सर्वसाधारण स्त्रियांचा स्थायीभाव असतो.
यामुळे रोजच्या रोज खटके उडणे साहजिक असते.
मुळात राजा राणीच्या संसारात राणीची सासू हि कल्पनाच अस्तित्वात नाही.
आपण तरुण असताना आपल्याला राजा राणीचा संसार हवा होता हे विसरून( तो मिळाला कि नाही हा मुद्दा अलाहिदा) बायका वय वाढले कि एकत्र राहण्याचा आग्रह धरतात. याचे कारण आपल्या वृद्धावस्थेबद्दल चिंता आणि मुलावर असलेली सत्ता.
आपली मुले हि आपली मुदत ठेव आहे आणि ती वेळ आली कि परिपक्व होऊन तिचा फायदा घेता येईल हि धारणाच मुळात चुकीची आहे.
मुलांसाठी मी इतक्या खस्ता खाल्ल्या हे अनेक सुरात आणि तालात ऐकायला मिळते. यातील उपकाराची भावना चूक आहे.
मुलं वाढवताना आपल्याला मिळालेल्या आनंदाची आपण किंमत करत नाही पण केलेल्या कष्टाची किंमत मात्र वसूल करू पाहता हि वस्तुस्थिती आहे.
मी माझ्या घरात माझ्या बायकोबरोबर सुखाने राहणार आहे. मऊमऊ गादीवर वातानुकूलित खोलीत झोपणे हाच माझा वानप्रस्थाश्रम.
उगाच उठून बोंबलत जंगलात वगैरे जाणे मला जमणार नाही. २२ वर्षे लष्करात भारतभर फिरून भरपूर जंगलं, समुद्र आणि वाळवंट पाहिलेले आहेत.
आणि माझ्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या बायको/ नवऱ्यासोबत माझ्या सोबत राहायचे ठरवले तर त्यांचे स्वागत आहे.
परंतु त्यांनी वेगळे राहायचे ठरवले तर त्याला सर्वतोपरी मी मदत करेन.
यात कोणताही अहंभाव असण्याचे कारण नाही
16 Jun 2023 - 3:19 pm | भागो
सर
आपल्या प्रतिसादातले प्रत्येक वाक्य पटलेय.
16 Jun 2023 - 5:09 pm | चित्रगुप्त
-- हे तर लईच भारी.
16 Jun 2023 - 11:55 am | कंजूस
आताही कच्छी लोक हे करतात. पण त्याचं नाव वानप्रस्थाश्रम वगैरे नसून संन्यास हे आहे. तो अवलंबणारे आमच्या शेजारीच होते. आदर्श आणि व्यावहारिक व्यवस्था. कसं ते सांगून होत नाही. त्यांच्याकडे समाजात असे आदर्श आहेत त्यामुळे मनाची तयारी असते.
शेवटी काय तर पैशाचं सोंग आणता येत नाही आणि मी स्वतंत्र पायावर उभा राहीन तेव्हा लग्न करेन वगैरे ठरवणे म्हणजे भारतात ८५% तरुणांची लग्ने होणार नाहीत. तरुण पिढीच पुढे सरकली नाही तर म्हाताऱ्यांचं काय? सध्याचे बरेच आश्रम फक्त केंद्र सरकारच्या पेंशनवर जगणाऱ्यांनाच परवडणारे आहेत. २००६ पासून पेन्शन ही बंद झालंय.
पन्नाशीनंतर कान आणि साठीनंतर तोंडही बंद ठेवणे हेच मर्म.
16 Jun 2023 - 12:30 pm | विअर्ड विक्स
"पन्नाशीनंतर कान आणि साठीनंतर तोंडही बंद ठेवणे हेच मर्म."
या वाक्यासाठी प्रणाम .
अच्छी लाइन है लिखके रखता हूं
16 Jun 2023 - 3:21 pm | भागो
पन्नाशीनंतर कान आणि साठीनंतर तोंडही बंद ठेवणे हेच मर्म.>>>
नमूद करून ठेवतोय.
16 Jun 2023 - 5:07 pm | चित्रगुप्त
खरी समस्या सासरेबुवांची असते हो. सासूला मुला-सुनेसमोर तोंड बंद ठेवावे लागले की मग ती कसर सासरेबुवांना बोलून भरून काढत असते. सासरेबुवांचे तोंड मुळात जन्मभर बंदच असते. त्यामुळे निदान हवे ते खाण्यासाठीतरी ते उघडता यावे या प्रयत्नात असतात, पण उतारवयात हे खाऊ नका-ते खाऊ नका यामुळे तेही उघडणे कठीण होऊन बसते.
-- एक (बंदतोंड्या) सासरा.
16 Jun 2023 - 7:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
रोचक प्रतिसाद
16 Jun 2023 - 3:26 pm | भागो
सर्व प्रतिसादाकांचे आभार.
सर्वच्या सर्व प्रतिसाद "सुखी जीवनाचा मूूलमंत्र" शिकणारे आहेत.
16 Jun 2023 - 9:42 pm | श्रीगुरुजी
आईवडीलांनी मुलाचे लग्न झाल्यानंतर मुलगा व सुनेला वेगळा संसार थाटून दिला पाहिजे. आईवडीलांच्या घराजवळच पण स्वतंत्र घरात मुलगा-सुनेने रहावे, म्हणजे सणवार प्रसंगी एकत्र सण साजरे करता येतील व इतरवेळी स्वतंत्र राहता येईल.
भविष्यातील विवाद टाळण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी लग्न होतानाच वेगळे होणे उत्तम.
17 Jun 2023 - 8:42 am | कंजूस
वेगळे राहिलं तर.
17 Jun 2023 - 9:34 am | सुबोध खरे
मराठी मालिका बंद पडतील ना
अजिबात नाही
आपण वेगळं राहून एकत्र कुटुंब पद्धतीचं गुणगान गाणाऱ्या मालिका चवीने पाहणे हेच तर उत्तम मनोरंजन आहे.
आपण फ्लॅट मध्ये राहून चाळीतच कसा प्रेमाचा ओलावा असतो याबद्दल गहिवर काढणे हा तर मागच्या पिढीचा आवडता कार्यक्रम आहे.
आजच्या पिढीला माणसांबद्दल प्रेमच नाही. ते सदानकदा कसे उपकरणांत (मोबाईल किंवा लॅपटॉप) गुंतलेले असतात हा राग तर वेगवेगळ्या सुरात आणि तालात ऐकायला मिळतो.
जाता जाता -- १९७५ पासून रविवारी संध्याकाळी चित्रपटापायी आणि गुरुवारी संध्याकाळी छायागीतापायी चौपाट्या कशा ओस पडलेल्या असायच्या त्याची आठवण झाली
आणि
तेंव्हाची पुढची पिढी दूरचित्रवाणीला कायम इडियट बॉक्स म्हणायची याचीही आठवण झाली.
17 Jun 2023 - 10:00 am | कर्नलतपस्वी
पहिल्यापासूनच जग व्यवहारी आहे. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच गोड. म्हणूनच कामा पुरता मामा ताका पुरती आजी
कित्येक कुटुंबात दोन्ही पिढ्यांची फरपट होताना दिसते.प्रत्येक पिढी आपलंच खरं असे धरून तेच उगाळत बसते. काल पर्यंत ज्यांचे नाव घेताना थकत नव्हते तेच आज नकोसे वाटतात.
सत्ता संघर्ष हा एक मोठ्ठा इशू आहेच.
अती परिचयात अवज्ञा,काम सांगीतल्यावर नातवंड सुद्धा कधी म्हणतात मी काय नोकर आहे का?
शक्य असेल तर दुर रहा,वृद्धांनी म्हातारपणी माझे कसे होईल याची चिंता करणे सोडून स्वानंदा करता जगले पाहीजे.मुलांनी मुलांची लढाई स्वतः लढावी.
मी नव्हतो तरी हे जग होते मी नसेल तेव्हाही हे जग असेल. कबीरदास म्हणतात,
जब मैं था तब हरि नहीं अब हरि है मैं नाहीं ।
प्रेम गली अति सांकरी जामें दो न समाहीं ॥
दोस्तहो, प्रेमाच्या गल्लीत फक्त दोघेच जण प्रेमाने राहू शकतात.
बाकी डाॅक्टर सुबोध खरे यांच्याशी १००% सहमत.
मी तर बरेच दरवाजे बंद केले आहेत.