दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
वा रा कांत
चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या.
११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे)
सर्वात जास्त पुस्तके लिहीण्याचा विक्रम याच माणसाने केला, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे आहे.चंद्रकांत सखाराम चव्हाण यांनी बाबुराव अर्नाळकर या टोपण नावाने लिहीले. यांच्या रहस्य कथा इतक्या लोकप्रिय झाल्या त्यामधे त्यांचे खरे नाव लपले.लहानपणी बाबू म्हणत मोठेपणी बाबुराव. अर्नाळ्याचे म्हणून अर्नाळकर.तेच नाव जनमानसात रुजले,वाढले आणी अजरामर झाले.
द पां खांबेटे,नाथमाधव,धारप यांच्या पुस्तकाच्या बरोबरच अर्नाळकरच्या पुस्तकांवर आम्हा मुलांच्या उड्या पडायच्या.
मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते.त्यांनी १०४२ कदाचित जास्तच,रहस्यकथा लिहिल्या. खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या मुलांना व त्याच बरोबर मोठ्या माणसांना वाचनाची गोडी लावली. त्यांची रहस्यकथा आमच्या बाल मनाला एका जागी तासंतास खिळवून ठेवायची.कथांचे नायक झुंजार,धनंजय-छोटू,मेजर सुदर्शन, इन्स्पे दिलीप,डिटे.रामराव,दर्यासारंग मराठी घरांघरांतले झाले.मुबंई,
ग्रांटरोड,गिरगाव,कामाठीपुरा, काळाघोडा,धोबीतलाव इ.नावे आणी अंडरवर्ल्डची तोंड ओळख यांच्याच रहस्य कथांमुळे वाचकांना झाली.
११७ वर्षानंतर सुद्धा यांची पुस्तके आज बाजारात दिमाखात उभी आहेत.ते एकुण ९३ वर्ष जगले. १९८८-८९ मधे डोळ्याच्या विकारा मुळे लेखन थाबंले.एकंदरीत लेखन कारकिर्दीचा आढावा घेता साधारण एका महिन्यात चार कथा या वेगाने रहस्यकथा लिहील्या.गिरगावात त्यांचे चष्म्याचा दुकान होते.रहस्य कथा लोकप्रिय होत असताना लोक खरेदीला कमी पण काय लिहीतात हे बघायला दुकानात गर्दी करू लागले, या वाचकांच्या प्रेमाचा लिखाणात व्यत्यय येवू लागला म्हणून दुर कुठे तरी एकांतात लिखाणास बसूलागले.
ग्रांटरोडवरील एका चाळीत बाबुराव रहात होते.सुरवातीच्या काळात स्व. भारतरत्न लतादीदी जवळच राहात होत्या.बाबुरावांची आणी मंगेशकर कुटुंबाची ओळख होती.
लेखकाने वाचक वर्गाला अक्षरशाः झपाटून टाकले होते. सतीशभावसार या झपाटलेल्या वाचकाने निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक लिहीले. लतादीदी,रत्नाकर मतकरी यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहीला आहे.
अशा या अफलातून लेखकास त्रिवार वंदन.
साभार,आठवणीच्या पोतडीतून व अंतरजालावरून.
काळापहाडचा पंखा.
प्रतिक्रिया
9 Jun 2023 - 4:58 pm | भागो
कर्नल साहेब
तुम्ही तर माझ्या काळजाला हात घातला.
बाबुराव अर्नाळकर माझे सर्वात आवडीचे लेखक.
अशा या अफलातून लेखकास त्रिवार वंदन.>>>+१
10 Jun 2023 - 1:34 am | शेखरमोघे
माझ्याही जीवनातील एका प्रिय -आणि लहानपणी अभ्यास सोडून ज्यान्ची पुस्तके वाचल्याबद्दल अनेक वेळेला रागावून घेतले - लेखकाचे अगदी यथायोग्य केलेले वर्णन आवडले.
त्यान्च्या मानसपुत्रात आणखीही एक असलेलेले नाव काळापहाड. तसेच त्यान्च्याबद्दलची Guiness Book (१९९५) मधील माहिती :
(b. 9 Jun 1907) of Maharashtra State, India published 1,092 short mystery stories in book form and several nonfiction books between 1936 and 1984.
10 Jun 2023 - 8:08 am | भागो
मला झुंजार जास्त आवडतो.
10 Jun 2023 - 5:50 am | प्रचेतस
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या लायब्रवरीत विपुल होत्या, शालेय वयात त्यांनी भरपूर रिझवले. शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांनी शालेय जीवन समृद्ध केले.
10 Jun 2023 - 8:10 am | भागो
ह्यात काकोडकरांचा पण समावेश करा.
10 Jun 2023 - 9:07 am | प्रचेतस
काकोडकर एखाद दुसरंच पुस्तक वाचलं असेल पण ते काही इतकं भावले नाहीत. आशू रावजी दिनू काकडे हे नाव सुद्धा त्याकाळी फेमस होतं. त्यांच्या कादंबर्यांत उत्तान वर्णनं असत.
10 Jun 2023 - 6:07 am | कंजूस
कारण शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांच्या कथा कादंबऱ्या मी कधीच वाचल्या नाहीत. अजूनही नाही वाचत.
आमचे हिंदी विषय शिकवणारे त्रिपाठी गुरुजी नेहमी सांगत "मी एवढा च्यांगला मराठी बोलू शकतो कारण बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचतो.'
कर्नलसाहेब धन्यवाद. चांगली माहिती मिळाली.
10 Jun 2023 - 8:40 am | Bhakti
मलाही इतक माहिती नव्हतं ..नाव ऐकून होते,गिनीज रेकॉर्ड वाह!
त्यांच्या कथांवर सिनेमा वा मालिका आहे का?
जसं फाफे पुस्तकाबद्दल फक्त ऐकून होते, जेव्हा तो सिनेमा आला तेव्हा नीट ओळख झाली.
10 Jun 2023 - 9:30 am | कर्नलतपस्वी
१९६६ मधे धनंजय हा कृषणधवल चित्रपट बाबुराव यांच्या कथा नायकावर आला होता. संपूर्ण माहीती साठी,
https://www.marathifilmdata.com/chitrapat/dhananjay/
10 Jun 2023 - 9:42 am | कर्नलतपस्वी
मनापासून आभार.
दिवस होते ते फुलायचे
स्वप्नांच्या बागेत उडायचे
आता सारखी मनोरंजनाची साधने नव्हती. पुस्तकांचे व्यसन. काळापहाड ओसरीवर वाचला तर काकोडकर लपून माळ्यावरती, आधांरलेल्या खोलीत.
प्रत्येक लेखकास वय होतं. ते त्यांच्या लेखनात दिसायचे व त्या त्या वयाचे वाचक ती पुस्तके वाचायचे.
तीसरी चौथीच्या वाचकांनी कधी ना सी फडके किंवा काकोडकर वाचले नाहीत तर नववी दहावीच्या मुलांनी चांदोबा,कुमार यांना हातात घेतले नाही.
माझा वाचन प्रवास म्हणून लेख लिहून ठेवलायं मला भावला तर मिपावर डकवेन.
11 Jun 2023 - 7:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त ओळख!! पहीली ते कॉलेज वाचन प्रवास येउंद्या की मिपावर. बहुतेक सर्वांचा प्रवास तसाच असेल. (ओसरीवरची आणि माळ्यावर वाचायची पुस्तके अर्थात वेगळी :))
11 Jun 2023 - 6:43 pm | कुमार१
छान.
त्यांचे खरे नाव ऐकले होते.
13 Jun 2023 - 7:09 pm | चित्रगुप्त
सुंदर लेख आहे. अर्नाळकरांची पुस्तके वाचण्याचा आयुष्यातला तो काळ विविध गोष्टींसाठी अविस्मरणीय असा आहे. बाबूरावांखेरीज 'मधुकर अर्नाळकर' पण होते (हे नाव बाबूरावांनीच घेतलेले टोपणनाव असल्याचे ऐकले होते)
अवश्य लिहावा ही आग्रहाची विनंती.
धनंजय-छोटूवर सिनेमा असल्याचे प्रथमच समजले. त्यातली गाणी हुडकून ऐकायला हवीत. जालावर शोधता ती गाणी खालील आहेतः १) तू रंगेली आम्ही खट, २) जीवाच्या रवीला कितीदां पुकारू, ३) हम एक हंसी हमपे लाखो निगाहे, ४) न मिला है न मिलेगा मुझे आराम कही, ५) आज लगी है शर्त निराली, ६) हातात बांगडी सोन्याची ही पोरी कोनाची पायातं वाले चांदीचे ही पोरी कोनाची
यापैकी (गायन आणि संगीत ) रामचंद्र चितळकारंचे गीतः
https://www.youtube.com/watch?v=-JWwsJO4vng&t=18s
13 Jun 2023 - 7:27 pm | कर्नलतपस्वी
हे बाबुराव अर्नाळकरांचे भाऊ. ते सुद्धा लेखक होते.
14 Jun 2023 - 1:32 pm | टर्मीनेटर
बापरे! इतक्या रहस्यकथा कथा लिहिणाऱ्या बाबुराव अर्नाळकरांच्या अफाट कल्पनाशक्तीला त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏
बाबुराव अर्नाळकरांच्या काही रहस्यकथा वाचल्या आणि आवडल्या असल्या तरी त्यांच्या पुढच्या पिढीतील लेखक कै. सुहास शिरवळकरांची लेखनशैली आणि त्यांच्या रहस्यकथांमधील 'मंदार पटवर्धन', 'फिरोज इराणी', 'बॅरीस्टर अमर विश्वास' आणि 'दारा बुलंद' ह्या पात्रांनी मनावर केलेल्या गारुडामुळे असेल कदाचीत, पण 'झुंझार', 'धनंजय', 'काळापहाड' हे बाबुरावांचे मानसपुत्र मला तरी फारसे आकर्षीत करु शकले नाहीत!
14 Jun 2023 - 1:50 pm | कर्नलतपस्वी
असावा. शिरवळकरांचे एकही पुस्तक मी वाचले नाही. (गिनीज बुका मधे नाव लिहीतील का!). त्यांच्या उमेदीच्या काळात मी बाहेर होतो.
वाढत्या वयात तिलस्म खुपच परिणामकारक असते. जशी अक्कल वाढते त्यातला फोलपणा करतो.
मुद्दाम ,टाटा स्काय वर दुरदर्शनवाला चॅनल घेतलाय. देख भाई देख सारखी त्यावेळेस प्रसिद्ध
असलेली मालिका आज कंटाळवाणी वाटते.
असेच असेल काहीतरी.