चौसष्ट रुपयांची बचत

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
22 May 2023 - 11:44 pm

बचत हे आम्हा मध्यमवर्गीयांचं आमरण व्यसन. पैसे वाचवले याचा आनंद काही वेगळाच असतो. बरोबरच आहे. आपला कष्टाचा पैसा उगाच का दवडायचा?

निवृत्तीनंतर वेळ भरपूर, शिवाय मिळकत बंद! आम्ही खाजगी क्षेत्रातले मजूर त्यामुळे पेन्शन नाही, फक्त टेशन. सबब काहीही खरेदी करायचं झालं तर वाण्यापासून अनेक ऑन लाईन विक्रेत्यांच्या किमती पडताळून पाहायच्या. जो स्वस्त तो आपला. कालंच घरातला तेलाचा बुधला संपला आणि राखिव बुधला वापरात आणला गेला. म्हणजे तेल विकत घेणे आले.
तपासाअंती अ‍ॅमेझॉन फ्रेश वर ९९९ चा बुधला ६९९ रुपये हा सर्वात स्वस्त दर आढळून आला. मागणी नोंदवणार तेवढयात डोक्यात किडा वळवळला. चहा एक किलोचा पुडा घेण्यापेक्षा १००ग्रॅमचे दहा पुडे घेतले तर साधारण शंभर रुपये वाचायचे ते आठवलं. वाचायचे अशासाठी मुकेश शेठच्या कृपेने आजकाल १ किलोचा पुडा घेतला तरी १०० ते १६० रुपये वाचतात. त्यामुळे छोटे पुडे घेणं बंद झालं. हे सांगण्याचा प्रपंच अशासाठी की चहाचा न्याय तेलाला का लागू नसावा असा किडा वळवळला. तात्काळ कळफलक बडवला आणि खरोखरच ५ लिटरच्या बुधल्यापेक्षा एक लिटरच्या पाच पिशव्या स्वस्तं असल्याचा साक्षात्कार झाला. एका लिटरला १२७ रुपये म्हणजे एकूण रुपये ६३५ म्हणजेच ६४ रुपये बचत! स्वतः वर खुश होत मी मागणी नोंदवली. आधीचा संपलेला बुधला टाकायचा राहिला होता त्यामुळे पिशव्या सांभाळण्यापेक्षा पिशव्या फोडून तेल बुधल्यात भरून ठेवायचं ठरवलं

दुसर्‍या दिवशी सकाळी माल घरपोच मिळाला. नाश्ता पार पडला होता. स्वयंपाकघर रिकामं होतं. भांडी घासणार्‍या बाई यायला थोडा वेळ होता. बायको बाहेरच्या खोलीत कुणाशीतरी फोनवर बोलत होती. बायकोनं ' या तेलाच्या पिशव्या कोण सांभाळत बसणार? 'अशी कटकट सुरू करायच्या आंत मी तेल बुधल्यात ओतून तिला चकित करायचं ठरवलं. ओट्याच्या टोकाला सिंकच्या कठड्यावर बुधला आणून, झाकण उघडून ठेवला. एक जुनं फडकं जे बाहेर तारेवर वाळत होतं ते आणलं. झालच तर ओट्याखालच्या कपाटात ठेवलेलं फनेल आणि कात्री देखिल आणली. सर्व सज्जता झाल्यावर त्या तेलाच्या पिशव्या आंत ओट्यावर आणून ठेवल्या. पहिली पिशवी उचलली, सफाईदारपणे पिशवी वरच्या टोकाला एका कोपर्‍यात कापली आणि बुधल्याच्या तोंडात ठेवलेल्या फनेलमध्ये ओतली. दूध पिताना लहान मुलं कधी कधी फुर्रकन दूध बाहेर काढतात तद्वत जाणारं तेलं मधेच जागीच खोळंबायचं. मग एका हातात पिशवी सांभाळत दुसर्‍या हाताने फनेल हलवुन तेल बुधल्यात जिरवायचं. पहिली पिशवी बुधल्यात रिकामी झाली आणि चेहर्‍यावर स्मित झळकलं. लगोलग दुसरी पिशवी जिरवली. मग तिसरी. तिसरी पिशवी वरच्या टोकाला कापून बुधल्यात ओतायला उचलली, आणि घात झाला. हाताची बोटं तेलकट, पिशवीही तेलकट ; नकळत पिशवी हातातून सटकली आणि मी सफाईने ती कसरत करत झेलताना तेल सांडलं. किमान अर्धी पिशवीतरी कामी आली असावी.

क्षणांत स्वयंपाकघराची अवस्था "खालून तेल, वरं तेलं, तेलं बाजूनी " अशी झाली. जमिनीवर तेल. ओट्यावर तेल. सिंकच्या कठड्यावर तेल, सिंकमधल्या भांड्यांवर तेल. फ्रिज्च्या दरवाजावर तेल. ओट्याखालच्या कपाटांच्या खाली फटीतून आत तेल. आणि साक्षात माझ्या देहाच्या डाव्या भागावर खांद्यापासून ते दोन्ही पायातल्यी रबरी चपलांना तैलस्नान! क्षणभर मी हतबुद्ध झालो. काय करावे सुचेना. नकळंत दबक्या आवाजात बयकोला हाक गेली. तो आवाज ऐकताच चाणाक्ष बाय्केला समजलं की काहीतरी गडबड आहे. स्वयंपाक घराच्या दारापाशी पोचताच बायको ते विहंगम दृश्य पाहून अवाक झाली. तिच्या चेहर्‍यावर एकाच वेळी हास्य आणि संताप झळकले. "तिथेच थांब"! कर्फ्यु मध्ये रस्त्यावर दिसलेल्या माणसाला पोलिस हटकतात त्याच जरबेच्या आवाजात बायको ओरडली. मग बराच वेळ माझं बौद्दिक झालं. "सरळ पाच लिटरचा बुधला आणायचा तर हे उपद्व्याप कोणी सांगितले होतं? " पासून 'तेल कसं भरायचं' यावर ज्ञान मिळालं. "आता हे कोण निस्तरणार? आधी सांगितलं असतंस तर मी आले असते मदतीला इत्यादी ऐकवलं गेलं. नशिब, त्या दिवशी शुक्रवार होता. शनिवार असता तर "तेल ओतलंच आहे, आता रूईच्या पानांचा हार आणते"हेही ऐकावं लागलं असतं.

आता ऐकावं तर लागणारंच होतं. बायकोनं एक जुना टॉवेल आणुन दिला, हात पुसायला. चपला कढुन ठेवायला एक प्लास्टिकची पिशवी देण्यात आली. उभं राहायला चार घड्या मारलेला एक जुना अभ्रा आला. मी किचन नॅपकिन रोलची मागणे केली; तेल टिपायला असा दुसरा उपाय नाही. ती पुरवण्यात आली,वर ऐकवण्यात आलं की तेल गेलं आणि निस्तरायला एक पेपेर रोल जाणार. आता अंगावरचं तेल निघालं तरी खाली आणि सिंकवर/ मध्ये सांडलेल्या तेलाचा प्रश्न होताच. वरच्या सफाईसाठी जुने कपडे देण्यात आले. मग खाली सांडलेलं तेल टिपायला बायको लांब दांडा लावलेली इस्त्रीच्या आकाराची फरशा साफ करायची घासणी घेऊन आली. परिस्थिती आटोक्यात आल्यावर पेपर नॅपकिनला पावलं पुसुन मला थेट अंघोळीला जायचं फर्मान सुटलं. तेलकट कपडे साबणात बुडवायला टब देण्यात आला. तोपर्यंत कामाच्या बाई आल्या. आपलं काम वाढलं हे त्यांनी ओळखलं. पण वरकरणी सगळं स्वछ होईल असं आश्वासन देत त्यांनी हे कसं झालं ते बायकोला विचारलं. बाइंनी संपूर्ण स्वयंपाकघर , ओटा, सिंक, भांडी वगैरे पुसुन लख्ख केलं. मी मुकाट्यानं अंघोळ केली. प्रकरण थंडावलं.

असो. पण या निमित्ताने अनेक गोष्टी झाल्या
चौसष्ट रुपये वाचले
तेल कसं ओतावं (किंवा ओतु नये) याचं प्रशिक्षण मिळालं
संपूर्ण स्वयंपाकघर ओट्यासह धुतलं गेलं
घरात घालायच्या चपला धुतल्या गेल्या
अनेक जुनी फडकी कामी आली
ऊठ सूठ वस्तू टाकून न देता जपून ठेवल्याचा कसा फायदा होतो हे ऐकायला मिळालं
दिवाळी नसतानाहे अभ्यंगस्नान घडलं

वावरजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

सुखी's picture

23 May 2023 - 5:41 am | सुखी

हेहे.. डोळ्यासमोर तेल्यामारुती उभा राहिला

खेडूत's picture

23 May 2023 - 6:04 am | खेडूत

हा हा हा...!
अहो दादा ते चौसष्ठ रुपये कॅनसाठी होते ना.
वाचवण्यापेक्षा ते वाचले असे घरच्या अकाऊंटन्टला पटवून देणे महत्त्वाचे. अजून किस्से येऊ द्या. :)

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 11:51 am | सर्वसाक्षी

यांना काही सांगणे व्यर्थ आहे. निकाल सुनावणी आधीच तयार असतो

विजुभाऊ's picture

23 May 2023 - 11:56 am | विजुभाऊ

जागतीक व्याप्तीचा आणि सर्वकालीक असणारा सर्वानुभव.

कंजूस's picture

23 May 2023 - 6:30 am | कंजूस

माझ्या आइडी नावाला जागून मी किती वाचवत असेल ते ओळखा.

कर्नलतपस्वी's picture

23 May 2023 - 7:04 am | कर्नलतपस्वी

जेनो काम तेनो थाय
बिजा करे गोता खाय....

आपलं क्षेत्र स्वयंपाक घराच्या उंबरठ्या पर्यंत.

सांग काम्या आणी ओ नाम्या म्हणतात ते चालेल पण नंतरचे कुरुक्षेत्र नको.

असे काही करायला गेलो तर भीक नको कुत्रं आवर आशी परिस्थिती होते.

सेवानिवृत्तीनंतरचा विरंगुळा म्हणायचा आणी काना डोळा करायचा.

हाय काय नाय काय

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 11:54 am | सर्वसाक्षी

कर्नल साहेब,
कोविड कृपेने स्वयंपाक यायला लागला. आता पोळ्या अगदी वर्तुळ आपल्यासारख्या येत नाहीत पण बरेच पदार्थ उत्तम जमतात, नवं निर्मिती होते
धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2023 - 10:11 am | राजेंद्र मेहेंदळे

किस्सा आवडला. मलाही विशेषतः तेलाच्या बाबतीत किमती पडताळुन १ ली/५ली/१५ली /सुर्यफूल की शेंगदाणा/धारा की जेमिनी/ मोर का डी मार्ट हे असले करायची सवय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रिय पेचप्रसंग जसे की मलेशियाने पाम तेल निर्यात बंद केली किवा रशियाने काळ्या समुद्रातुन जाणारी युक्रेन ची जहाजे अडकवली असे काही वाचनात आले की संभाव्य धोका ओळखुन मी लगेच घरात तेल भरुन टाकतो.

मोठ्या डब्यातुन छोट्या डब्यात तेल भरण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे बाजारात एक साधा ३०-४० रुपयाचा हवेच्या दाबावर काम करणारा पंप मिळतो तो वापरायचा म्हणजे मोठ्या कॅन मधुन तेल काढणे सोपे जाते. त्यातही खालची बरणी/कॅन ताटात ठेवायचा म्हणजे तेल त्यातच सांडते आणि पुन्हा वापरता येते.

त्यातुन जमिनीवर तेल सांडलेच तर हाताने समईत भरुन देवांसाठी वापरायचे. असे सगळे झाले की मग पेपर्/टिश्यु वापरुन जमीन पुसायची. अगदीच गुळ्गुळीत वाटले तरच सर्फ वगैरे टाकायची चैन करायची आणि पुसुन घ्यायचे :)

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 12:00 pm | सर्वसाक्षी

मेहेंदळे साहेब
पाच लिटर बुधल्यातून रोजच्या वापरातील भांड्यात तेल काढायची एक सोपी युक्ती आहे जी मी वापरतो आणि जराही न सांडता तेल ओततो.
तेल ओतताना बुधला सहसा लांबीच्या बाजूने म्हणजे उभा धरला जातो. त्याऐवजी जर आडवा करून ओतला तर तेल बाहेर उडत किंवा सांडत नाही
ही युक्ती मी इन्व्हर्टर च्या बॅटरीत पाणी भरणाऱ्या विलेक्ट्रीशन कडून शिकलो
धन्यवाद

बुधला वगैरे शब्द वाचून अलिबाबा चाळीस चोरच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले. कृपया लेखकाने रागवू नये व इतरांनी फक्त हसावे म्हणून लिहिलेय.

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 12:02 pm | सर्वसाक्षी

तुम्ही लिहीपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं
धन्यवाद

त्यातुन जमिनीवर तेल सांडलेच तर हाताने समईत भरुन देवांसाठी वापरायचे.>>>
अरे रे. देवा त्यांना क्षमा करा.
They don't know what they are doing.

विवेकपटाईत's picture

23 May 2023 - 3:20 pm | विवेकपटाईत
सरिता बांदेकर's picture

23 May 2023 - 4:56 pm | सरिता बांदेकर

मस्त किस्सा, छान फूलवून सांगितला आहे.
असे किस्से मला वाटतं रोजच होत असतात.
पण ते खुलवून सांगता आलंय तुम्हाला.आमच्या घरात मला रोजच ‘ पाच रुपये वाचवायला पन्नास घालवले‘ हे रोजच बोलावं लागतं.
आणि वर ‘मदत केली तरी तुझी कटकट चालूचचालूच’
ही दोन वाक्य होतातच.
लिहीत रहा अस्से किस्से.

चौकस२१२'s picture

23 May 2023 - 6:50 pm | चौकस२१२

खरोखरच ५ लिटरच्या बुधल्यापेक्षा एक लिटरच्या पाच पिशव्या स्वस्तं असल्याचा साक्षात्कार झाला.
हे नेहमीच असत कि कधी कधी?
रिटेल होलसेल पेक्षा स्वस्त कसं काय भाऊ ?

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 7:37 pm | सर्वसाक्षी

हे नेहमीचेच आहे
अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ.
छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 7:37 pm | सर्वसाक्षी

हे नेहमीचेच आहे
अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ.
छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

विजुभाऊ's picture

23 May 2023 - 11:52 pm | विजुभाऊ

वस्तू लहान पॅक मधे घेतली तर अंतीमतः ती स्वस्तच पडते हा अनुभव आहे.
पूर्वी घरात धान्य भरायला वगैरे सातार्‍याला गेलो की तेथून घेऊन यायचो.
पण असे लक्ष्यात आले की असे केले की धान्याची सांड लवंड खराब होणेवगैरे नुकसान होते आणि त्यात उलटा जास्त खर्च होतो.
त्यामुळे जेवढे लागते जसे लागते ( अगदी जे आय टी / जे आय एस नाही ) पण जेवढे लागते तेवढेच आणतो. वेळ वाचतो. घरातली जागा वाचते.

चौथा कोनाडा's picture

26 May 2023 - 1:28 pm | चौथा कोनाडा

तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ.

हाच अनुभव कॉफी पुडीचा (सॅशे) पुर्वी हौसेने बाटली आणायचो (झकास दिसायची स्वंपाघरा त) पण आर्द्रतेने घट्ट दगड व्हायची .. मग वापरा आधी त्यात थोडे पाणी / दुध काही वेळ घालून ठेवायला लागायचे, कॉफी करताना प्रमाण कधीकधी जास्त व्ह्यायचे ... पुडीने त्या सर्व समस्या सुटल्या ! :-)

सर्वसाक्षी's picture

26 May 2023 - 2:29 pm | सर्वसाक्षी

प्रवासात शॅम्पू किंवा तेलाच्या बाटलीतून द्रव बाहेर आला तर लोचा. त्यापेक्षा ससे बरे.

प्रचेतस's picture

23 May 2023 - 9:01 pm | प्रचेतस

तेलाचा १५ लिटरचा पत्र्याचा डबा आणणे अधिक स्वस्त पडते असा अनुभव आहे. डब्याचा भाव लिटरमागे पिशव्यांपेक्षाही कमी येतो शिवाय रिकाम्या डबा वाण्याला किंवा भंगारवाल्याला दिल्यास त्याचेही २० रु येतात, डबा तेलाच्या किटलीत ओतणे थोडे जिकिरीचे होते मात्र झाकणाच्या बाजूस अजून एक छिद्र पाडल्यास तेल सलग धारेने धारेने किटलीत न सांडता भरता येते. ऍमेझॉनवर शक्यतो टिन मिळत नाही मात्र दुकानांत मिळतो, शिवाय कोपऱ्यावरचा वाणीही फुकटात घरी पोहोचता करतो.

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 9:47 pm | सर्वसाक्षी

आजकाल बहुतेक तेलं १५ लिटर प्लास्टिक डब्यात मिळतात. दिवसेंदिवस घरातील आटत चाललेली स्वयंपाकघरं आणि गायब झालेले माळे वा कोठीच्या खोल्या आणि कुटुंबातील घटती सदस्य संख्या पाहता १५ लिटरचा डबा फारसा सोयीचा नाही.
वाणी डबा फुकट घरपोच करतो हे खरं पण जालबाजारापेक्षा १५-२०% अधिक पैसे लावतो. उदाहरणार्थ ३१५०रू चा १५ लिटर डबा जिओवर १७००-१८०० ला मिळतो. छापील किंमत ३१००+. वाणी या किमतीत देत नाहीत. देत असते तर शेजारचा दुकानदार सोडून जालखरेदी कशाला?
फ्रुट बॉण्ड १ किलो वाणीदादा ठोकून ५५०-५८० घेतो जालावर ४१५-४८० घरपोच. १०० ग्रॅम पुडे ४७₹

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 9:48 pm | सर्वसाक्षी

ऑटो करेक्ट च्या आगाऊपणा मुळे फ्रुट बॉण्ड‌‌‌ झाले आहे

तुषार काळभोर's picture

23 May 2023 - 10:13 pm | तुषार काळभोर

शाम्पू आणि चहापावडर यांच्या बाबत सहमत. पण मला नेहमी असं वाटत आलं आहे की बहुधा छोट्या पाकिटात मिळणाऱ्या वस्तू, जसे शाम्पूचे सॅचे आणि चहा पावडरीचे ५०-१०० ग्रॅम पाकिटे यात, 'शिल्लक उरलेला' माल विकत असावेत.
शाम्पूच्या बाबतीत मागील दहा वर्षांपासून मात्र सॅचेच वापरतो.

तेलाच्या पाच लिटर डब्याची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे तो डबा स्वतः .

एक लिटर पाउच मध्ये कंपनीला तो खर्च नसतो. पण पंधरा लिटर चा डबा जसा वीस रुपयांना विकला जातो तसा हा पाच लिटरचा प्लास्टिक डबा विकला जात नाही.

अजूनतरी किराणा सामान ऑनलाईन घेतलं नाही. एक्सपायरी डेटच्या भीतीने.

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 10:43 pm | सर्वसाक्षी

उरलेला माल वगैरे नाही पण अल्प किंमतीत नामांकित उत्पादन वापरायला मिळते म्हणून नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग बजेटचा एक भाग म्हणून कमी किमतीत छोटे पॅक विकले जातात. शिवाय शॅम्पू एक लिटर बाटली पेक्षा सॅशेचा खर्च विशेषतः वाहतूक आणि वेष्टण खर्च कमी असतो. शिवाय कमी नफ्यावर विकण्यात दूरगामी फायदा असा की बाटली मध्ये २०० मिली. शॅम्पू एका ग्राहकापर्यंत पोचतो तर पाच मिली सॅशेद्वारे तोच २०० मिली दहा वीस तरी ग्राहकांपर्यंत पोचतो आणि ब्रॅण्ड व्हिजिबीलीटी वाढते.

चौथा कोनाडा's picture

23 May 2023 - 10:28 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !
😀 😀 😀

भारी किस्सा .... झकास रंगवून सांगितला आहे.
आमचे ही किस्से सांगावे की काय असे वाटू लागले !

फायनली बचत केवढ्याला पडली?

सर्वसाक्षी's picture

23 May 2023 - 10:32 pm | सर्वसाक्षी

बाकी सांडलेलं तेल, कामी आलेले टीपकागद वगैरे खर्च या सदरात धरायचे

राघव's picture

23 May 2023 - 10:42 pm | राघव

नवऱ्यानं (न ठरवता) वेंधळेपणा करायचा आणि बायकोनं त्यावर तोंडसुख घ्यायचं हा सार्वकालिक प्रापंचिक नियम आहे! त्याला अपवाद फारच कमी असावेत!
आमचे असे अनेक किस्से आहेत. बायकोला ते किस्से आठवून आणि परत परत उगाळून सांगण्यात, कसलं सुख मिळतं म्हणून सांगू!!

आता अक्षरशः आजच घडलेला किस्सा:
बायको माहेरी गेलेली, उद्या परत येणारे. तोवर काही दिवस भावाकडे रहायला गेलो होतो कोथरूडात. आज परत आलो वाकडला सकाळी. सगळी तयारी करून अगदी वेळेत निघालो. कसला अभिमान दाटून आला होता मनांत.. व्वा रे व्वा! अगदी ७:३० ला सकाळी घरी हजर होतो मी.
पण हाय रे दैवा..! नेमकी घराची चावी विसरलो. अभिमानाचं विमान केवळ उतरलं नाही जमिनीवर.. पार भुईसपाट झालं.
भावाला फोन केला तर त्यानंही मनसोक्त हसून घेतलं. जेव्हा त्याला सांगितलं की "आता तूच घेऊन ये इकडे चावी" तेव्हा वरमला जरा! मग त्यानं स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली. शेवटी एकदाचे आम्ही ९:०० ला घरात दाखल झालो!
अगदी हातातलं सामान ठेवत नाही तोवर बायकोचा फोन आला. मी मनांत म्हटलं नाही तेव्हा कधी स्वतःहून फोन करायची नाही.. पण अशावेळेस हटकून करेल ही फोन. पण तिला अजून तरी माझ्या वेंधळेपणाचा किस्सा सांगीतला नाहीये. उद्या पोहोचली परत की विचारेलच खोदून की "अगदी सक्काळी निघणार होतास ना कोथरुडाहून? मग इतका उशीर कसा झाला.." वगैरे. तेव्हा मग सांगेन आणि खाईन बोलण्या..! :-)

स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली
हायला शॉलिड कल्पना .. हे प्रथमच ऐकलं .. "उ बर डिलिवरी एनिथिंग अल्मोस्ट एनिथिंग" अशी सध्या जाहिरात चालू आहे त्यात त्यांनी " विरसरभोल्यांसाठी " अशी सेवा सुरु केली पाहिजे

चांदणे संदीप's picture

26 May 2023 - 12:49 pm | चांदणे संदीप

मस्त, खुशखुशीत किस्सा.
अशाच काही वाढीव प्रकरणांमुळे मी किचनमध्ये एरवी जात नाही. घरी कुणीही नसल्यास मित्र जमवून मग किचन आणि तिथल्या सर्व वस्तूंशी भेट होते. शक्यतो, तिथले जिन्नस न वापरता नवीन तेवढ्यापुरते आणून त्याची पुरावा ठेवता विल्हेवाट लावणे हे प्रेफरेबल असते. :)

सं - दी - प

मुक्त विहारि's picture

27 May 2023 - 12:12 am | मुक्त विहारि

आवडला

मेनकेला खूष करणे, हे लग्न करून मग सन्यास घेण्याची पहिली पायरी आहे .... इति, बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात....

पर्णिका's picture

30 May 2023 - 5:38 am | पर्णिका

किस्सा छान लिहिला आहे... प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा केलात. पण किचन स्वच्छ करण्यांत बराच वेळ गेला असणार !

मग बराच वेळ माझं बौद्दिक झालं.

हे तर होणारच :)

नंदन's picture

30 May 2023 - 5:58 am | नंदन

खुसखुशीत किस्सा!

चित्रगुप्त's picture

30 May 2023 - 8:28 pm | चित्रगुप्त

बाई गं कसं, भरवत नाही गं... खाली तेल, वरं तेलं, तेलं बाजूनी.. कसं सांडलं गं...
असो ऐसा प्रसंग जाला.. जाला तो होवोनि गेला.. आता तरी आपणाला... शहाणे करावे...
--- चौसष्ट रुपये वाचले..तेल कसं ओतावं (किंवा ओतु नये) याचं प्रशिक्षण मिळालं.. संपूर्ण स्वयंपाकघर ओट्यासह धुतलं गेलं..घरात घालायच्या चपला धुतल्या गेल्या..अनेक जुनी फडकी कामी आली..ऊठ सूठ वस्तू टाकून न देता जपून ठेवल्याचा कसा फायदा होतो हे ऐकायला मिळालं..दिवाळी नसतानाहे अभ्यंगस्नान घडलं .... हेही नसे थोडके.

-- मस्त लिहीलंय, सगळा प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभा राहिला.